Skip to main content

पुढच्यासाठी

लेखक अमेय६३७७ यांनी बुधवार, 18/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कुणास ठाउक बाग कुणाची कुणी शिंपली हिरवी झाडे तारुण्याचे मोल, कुणाच्या हाडांची अन झाली काडे हिरवळ दिसते, पानोपानी मंजुळ किलबिल मंद स्वरांची जागोजागी खूण सापडे चराचरातिल अद्वैताची विश्वाचा हा जरी कोपरा कोप-यातले विश्व सुखाचे भय- क्रोधाला इथे न थारा इथे न वाढे तण्य फुकाचे आनंदाने भोग दान हे घाल तशी भर अपुली काही किंवा केवळ पाही इतुके कीड- वाळवी लागत नाही ठेव आठवण त्या पहिल्याची झाड लावले येथे ज्याने आपसूक मग सुचेल तुजला पुढच्यासाठी ठेवुन जाणे -- अमेय
लेखनविषय:

वाचने 11566
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

सुंदर..

सुंदर

मस्त.

सुंदर रचना...

आहा! फार सुंदर रचना. तुमच्या कविता अगदी लयबद्ध असतात.

सुन्दर

आहा! एक आक्खा लेख जे काम करु शकत नाही ते काम तुमच्या कविता करत आहेत.

एक बदल सुचवु काय? >>आपसूक मग सुचेल तुजला>> मग ऐवजी नंतर वापरले तर मीटरमध्ये बसेल. अवांतर--इथे न वाढे तण्य फुकाचे--तण्य असा शब्द कधी ऐकला नव्हता.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तण्य हा शब्द विशेषण म्हणुन शिकला होता. (ताणले जाण्याची क्षमता.), पण कविने तो "तन" या अर्थाने वापरलाय, ज्यात काही चूक नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

वृत्तानुसार 'नंतर' नाही चालायचा. पण लयीत नाही असं का वाटतेय? "आपसूक मग.. सुचेल तुजला" असा पादाकुलकाच्या नेहमीच्या लयीनुसार (८ + ८) वाचनक्रम आहे. तण्य हा शब्द मी माझ्या आजोबांकडून (ज्यांना बागकाम आवडायचे) वारंवार ऐकलाय. चुकीचा असेल अशी शन्का नव्हती. आता तुम्ही काढलेल्या शंकेमुळे शोध घेतो. तण याच अर्थाने वापरलाय. चुकीचा असेल तर बदलेनच.

In reply to by अमेय६३७७

अमेयजी ,माझा काही वृत्त मात्रा वगैरेचा फार अभ्यास नाही,सहज वाटले ते सांगितले. अवांतर..नंतर ऐवजी "आणिक" "मागुन" चालेल काय? :)

सुरेख कविता!

आनंदाने भोग दान हे घाल तशी भर अपुली काही किंवा केवळ पाही इतुके कीड- वाळवी लागत नाही >>> मर्मावर घाव! ठेव आठवण त्या पहिल्याची झाड लावले येथे ज्याने आपसूक मग सुचेल तुजला पुढच्यासाठी ठेवुन जाणे>>> आहाहा... नतमस्तक! __/\__

फारच साध्या सोप्या .. कळणार्या भाषेत लिहितो ब्वा तु मित्रा .. ऊगाचा शब्दांचा ना रुपकांचा .. कसलाच सौंदर्यफुफाटा (शरदीनी फेम) नाहि .. मस्त !

छान! आपल्या आयुष्यातला प्रचंड विरोधाभास अधोरेखित करणारी लयबद्ध कविता आवडली.

छान कविता

एकदम लयबद्ध झाली आहे. आवडली

कविता लयबद्ध आहे - नेहमीच असतात तुमच्या कविता. पण ... असे बरेच 'पण' डोक्यात आले वाचताना - ते अप्रस्तुत ठरतील इथं म्हणून लिहित नाही :-)

In reply to by आतिवास

कवितेविषयी काही 'पण' असतील तर नक्कीच वाचायला आवडतील. अर्थात या कवितेच्या अनुषंगाने कवितेव्यतिरिक्त काही विचार आले असतील आणि इथे मांडणे अप्रस्तुत वाटत असेल, तर संवादाचे इतर मार्गही आहेत. :)

काय म्हणु सांग मित्रा........खुपच खास......कवितेच्या सुरवातीची दोन कडवी वाचतो तेव्हा नेहमीची साधी कविता वाटते..... तिसरे कडवे कविता म्हणुन खुपच खास.........तर शेवटची दोन कडवी कवितेला खुपच उंचावर नेतात....... पुर्वीचे संत कसे साध्या सोप्या अभंगातुन खुप मोथे काहितरी सांगुन जायचे........अगदी तसच काहीतरी......

अतिशय आवडली. तुमची कविता निराळी आहे हे नक्की. अत्यंत साध्या सोप्या, नेहेमीच्या वापरातल्या शब्दांतून काव्य फुलते आणि मनाचा ठाव घेते. कोणतेही जडजंबाळ शब्द, उपमा अलंकार यांची खैरात न करताही उत्तम कविता कशी असावी याचा वस्तुपाठच. (विश्वाचा हा जरी कोपरा - कोप-यातले विश्व सुखाचे सारख्या ओळीतून मर्ढेकरांची आठवण व्हावी..) -चतुरंग

प्रतिसाद द्यायला भाग पाडणारी, सरळ, साधी, सोपी अन् तरीही आशयगर्भ कविता. खूप आवडली. धन्यवाद. :)

ठेव आठवण त्या पहिल्याची झाड लावले येथे ज्याने आपसूक मग सुचेल तुजला पुढच्यासाठी ठेवुन जाणे सुरेख...