बंड्याचे बुद्धिबळ
मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती.
एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते. मलाही बुद्धिबळ खेळायला आवडायचे. त्याला म्हटले की खेळू एकदा. आता त्या संपूर्ण बालगोपाल मेळाव्यात बुद्धिबळाचा संच केवळ बंड्याकडेच होता. त्यामुळे त्याच्या घरी खेळणे अपरिहार्य होते. मग ठरले, एका दिवशी दुपारी आम्ही सगळे त्याच्याकडे जमलो. पट मांडला, डाव सुरु झाला. बंड्या ठीकठाक खेळत होता. पण अगदी अपराजित राहण्या इतका नाही. काही चालीतच त्याने वजीर मैदानात आणला. माझी घोड्यावरची पकड मजबूत असल्याने मी दोन घोडे उतरवले. पुढच्या काही चालीतच मला संधी मिळाली आणि एका घोड्याने एकाच वेळी राजा आणि वजीर दोघांवर हल्ला केला. झाले, राजा हलवावा लागणार आणि वजीर पडणार, आणि एकदा का वजीर पडला की डाव माझा. बंड्याचे अपराजित पणाचे रेकॉर्ड मोडणार. या आनंदात मी असताना अचानक बंड्याने घड्याळ पाहिले. "अरेच्या, तीन वाजत आले"!! असे उद्गारला आणि धडाधड डाव मोडून त्याने सोंगट्या डब्ब्यात टाकायला सुरुवात केली.
मी अवाक. अरे काय झाले? मी विचारले.
आमच्या घरी तीन नंतर बुद्धिबळ खेळायला मनाई आहे, बाबांना आवडत नाही, तो म्हणाला.
अरे, मागेच तर आपण दुपारभर खेळत बसलो होतो ना, शेजारचा पिंट्या बोलला.
तेव्हा हरकत नव्हती, आता आहे, इति बंड्या.
ओके, पण मी जिंकलो ना डाव, मी विचारले.
असे कसे, डाव तर रद्द झाला. उद्या परत नव्याने खेळू, बंड्या म्हणाला.
तेव्हा माझ्या लक्षात आले, बंड्याच्या अजिंक्यपणाचे गुपित. गेले काही दिवस का कोण जाणे पण बंड्याची खूप आठवण येतेय !!!
प्रतिक्रिया
लेख बाउंसर गेला की प्रतिसाद
काहीच झेपलं नाहीये
मलाही काहीच झेपलं नैये. कधी
धडा आवडला.
१ सद्भावना मनात आहे,
लहानपणी क्रिकेट खेळायचो
शक्यता आहे कि बंड्याशीहि
सिनेमा किंवा मालिका
चालेल! काढू सिनेमा, विमे
Pagination