✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नवे व्यवसाय

न
नरेंद्र गोळे यांनी
गुरुवार, 11/14/2013 - 10:04  ·  लेख
लेख
शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे. शिवाय, साखरेच्या हव्यासाने, सर्व जमिनी ऊस पिकवू लागल्याने, भूजल पातळीचा झालेला र्‍हास आणि इतर आरोग्यपोषक अन्नधान्याखालील जमिनींत झालेली लक्षणीय घट पाहता (साखरेचा भाव आज गव्हापेक्षाही घटलेला दिसून आल्यास नवल नाही!), आजला साखर व्यवसायही समाजविघातक मानावा काय, ह्यावर चर्चा होऊ शकेल. मात्र आजमितीस निर्माण होणारे काही कालसापेक्ष नवे व्यवसाय समाजास पोषक आहेत की घातक ह्याचाच उहापोह इथे करायचा आहे. हे व्यवसाय, त्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा आधार आहेत ह्यात काही संशय नाही. मात्र त्यांच्या ग्राहकांना, त्यांच्या व्यवसायाने प्रभावित होणार्‍या समाजाला, कितपत लाभकारक आहेत, हे निश्चितपणे कळू शकेल, अशी आज परिस्थिती नाही. धर्मगाय आधुनिक महानगरांतील उपनगरांच्या मुख्य रस्त्यांवरच्या पदपथांवर तुम्हाला, डौलाने गायी बांधलेल्या दिसतील. त्यांना आवश्यक असलेल्या सकस खाद्यपदार्थांचे लाडू, गवत, चारा इत्यादींच्या साठ्यांसह त्यांचे मालकही ऐसपैस दुकान लावून बसलेले असतात. अशा दुकानांचा एकूण थाट आणि रुतबा पाहता, पदपथ रिकामे करत फिरणार्‍या महापालिकेच्या मोटारींपासून त्यांना अभय मिळत असावे, असे वाटण्यास वाव राहतो. अशा दुकानांच्या आसपास मंदिरही हमखास आढळून येते. मात्र हा व्यवसाय अमूक लोकच करत असावेत, असे निश्चयाने सांगता येणार नाही. हिंदू लोक, जैनांच्या पुण्यसंचयार्थ गायी पाळण्याचा व्यवसाय करतात, असेही असण्याची शक्यता दाट आहे. एरव्ही सन्मानाने मालकाच्या घरात राहणार्‍या ह्या गायी, व्यवसायाच्या वेळात मात्र महापालिकेच्या पदपथावरील मोक्क्याच्या जागांवर, हक्काने पुण्यवितरणाचा “धर्मगाय” व्यवसाय करण्यास हजर होत असतात. गायीचा मालक, व्यवसायाच्या वेळापत्रकानुसार ठराविक जागी; गाय, गायचारा, दुकानचालक इत्यादी सामग्री वेळेवर उपस्थित राहील ह्याची दक्षता घेतो. दुकानचालक, पुण्यसंचयार्थ येणार्‍या ग्राहकांकडून पैसे घेऊन, आपल्याच गायीला, आपलाच चारा, ग्राहकाच्या पैशाने भरवतो. ह्याकरता वापरलेली जागा महापालिकेची असते. त्या जागेवरून चालणार्‍यांना, तेवढ्यापुरते रस्त्यावर उतरून घ्यावे लागते. रस्त्यावर त्यामुळे रहदारी तुंबते. पण त्याचे काय एवढे मनाला लावून घ्यायचे! पुढेमागे धर्मगाय-मालक-चालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडे ह्यासंदर्भात आपण आपले नम्र निवेदन सादर करावे, झाले! अशा दुकानांची वेळापत्रके, दरपत्रके, त्यांच्या मांडणीची सुरेख प्रकाशचित्रे, दुकानचालकांच्या मुलाखती, ग्राहकांचा तौलनिक, सांख्यिकी अभ्यास इत्यादी विषय, शोधक पत्रकारांच्या लक्ष्यवेधावर (हिटलिस्ट) राहण्यास आमची काहीच हरकत नाही. वाचकांपैकी कुणी ह्यावर काही काम केल्यास अवश्य कळवावे. आरोग्यपेये आधुनिक महानगरांतील उपनगरांच्या मुख्य (म्हणजे विद्युत पारेषण तारांच्या खालच्या जागेतील, रेल्वेकाठच्या चिरटोळ्या, सुशोभित जागांवरील, किंवा “नाना-नानी पार्क” ह्या नावाने इतरांकरता, पक्षी, हास्यक्लबांकरता निर्माण केलेल्या महापालिकेच्या) उद्यानांच्या महाद्वारांकाठच्या जागा, ह्या अशा “आरोग्यपेयां”च्या दुकानांसाठी फारच सोयीच्या असतात. स्थानिक नगरसेवकांच्या आशीर्वादाने, किंवा त्याच्याच नातेवाईकांना चालविण्याकरता असे व्यवसाय अत्यंत सोयीचे मानावेत. अशा दुकानांतून दुधी, गाजर, काकडी, मुळा, भाजीपाले इत्यादीकांचे रस कलंकहीन पोलादाच्या (सरळ स्टेनलेस्टीलच्या म्हणा की राव!) बरण्यांतून विक्रीस उपलब्ध केले जात असतात. वेळ सकाळी सहा ते सात. अशाप्रकारे नित्यनियमाने रसपान करणारे लोक आरोग्याने मुसमुसत आहेत असे कुणाला लक्षात आल्यास, सदरहू लेखकाचे निदर्शनास आणून द्यावे. रसनिष्पादनार्थ वापरल्या जाणार्‍या फळ-भाज्यांची गुणवत्ता, दरपत्रके, ग्राहकांच्या आवडी-निवडीतील प्राधान्ये ह्याबाबतच्या माहितीत, एखादा मुमुक्षू वाचकही मोलाची भर घालू शकेल. कबुत्तरपालन कुठल्याशा मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी २,००० कबुत्तरे मुक्त करण्यात आली! अशी बातमी वाचल्यावर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की, मुळात ती कुठून बंदिस्त करून आणली? का आणली? आता इथे मुक्त केल्याने आसपासच्या लोकांना ती कशीकाय लाभदायक ठरू शकतील? इत्यादी इत्यादी. पण मग ते म्हणतील की, तुम्ही शंकाखोरच फार आहात बुवा. जाऊ द्या ना! खैर, जाऊ दिले. आता हा व्यवसाय सुरू झालेला आहे. कसला? पुण्यार्जनाचा. जागा - आधुनिक महानगरांतील उपनगरांच्या कुठल्याही रस्त्यावर किराणा मालाच्या दुकानासमोर. वेळ - सकाळी साडेपाच सहाच्या सुमारास. पोरकिडे, सोंडे न लागलेले ज्वारी, बाजरी, असले आरोग्यदायी धान्य भस्सकन पदपथावर भिरकावले जाते. निमिषार्धात असंख्य कबुत्तरे कुठुनशी फडफडत येतात. दाणे टिपू लागतात. दूर गुजरातेत, कच्छच्या रणात तर दररोज शेकडो पोती धान्य, वाहने भरभरून “पक्षी-चुग्गा-घरात” आणून टाकतात. सायबेरियातून आलेले पाहुणे, ते खाद्य अत्यंत आदराने उदरस्थ करतात. ते सोडा. पण शहराच्या पदपथावरली ही दुकाने, महापालिकेच्या जागेवर पुण्यार्जनसोहळा बारा महिने, दररोज सकाळी सुखेनैव पार पाडतात. पादचार्‍यांना तेवढ्यापुरते काहीसे पाय-उतार व्हावे लागते इतकेच काय ते! सार्वजनिक-श्वान तारण म्हणजे अर्थातच रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे तारण करणे. त्यांना बिस्किटे पुरविणे. पेडिग्री (कुत्र्यांचे आवडते, विलायती, पशुखाद्य) पुरविणे. कुत्रा चावल्याची असंख्य प्रकरणे रोज घडत असतात. भटक्या कुत्र्याने लहान मुलाचे लचके तोडल्याची घटनाही ऐकिवात आहे. त्यांच्या भुंकण्याच्या उच्छादाने त्रस्त झालेले लोकही काही कमी नाहीत. त्यामुळेच, भटक्या कुत्र्यांना पूर्वी महापालिकेचे लोक ठार मारत असत. मग प्राणीरक्षकांच्या भूतदयेस न्यायालये कुमक पुरवू लागली. काही प्राणीरक्षक तर इथपर्यंत म्हणू लागले की एखाद्या मुलाचे लचके तोडलेही असतील, म्हणून काय समस्त श्वानजातीच्याच निर्मुलनाचे उपाय करायचे की काय? त्यामुळे माननीय न्यायालयाचा आता भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा हुकूम आहे. तुम्ही काहीही करा हो! पण जोपर्यंत “सार्वजनिक-श्वान तारण” हा व्यवसाय म्हणून स्थिरपद आहे, तोवर कुणाची काय बिशाद आहे, भटक्या कुत्र्यांचे अन्न तोडण्याची! तर हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करणारा, त्यातून कुठलीही भौतिक गोष्ट मिळवत नाही. कदाचित आनंद मिळवत असेल. कदाचित पुण्य. पण हा व्यवसाय चालतो मात्र महापालिकेच्याच जागेवर. विनामूल्य. श्वान-भोजन-काळात पादचार्‍यांना जरा वळणाची वाट चालावी लागते इतकेच. उन्नतमाथा हे सर्व चारही व्यवसाय करणारे लोक नेहमीच उन्नतमाथा राहत असतात. त्यांना सार्वजनिक जागेचा आपण आपल्या व्यवसायाकरता उपयोग करून घेत आहोत हे चांगलेच माहीत असते. मात्र त्याखातर उगाचचची अपराधी भावना बाळगण्याचा त्यांचा स्वभाव नसतो. आपल्या समाजाचीही धारणा अशीच राहिलेली आहे की, स्वार्थासाठी जर कुणी सार्वजनिक जागेचा वापर करत असतील तर त्यांचा जीव तीळ-तीळ तुटतो. मात्र परमार्थाकरता चाललेल्या गैर- (का असेना) वापराकडे ते जाणून बुजून काणा-डोळाच करतात. ह्या व्यवसायिकांचीही दृढ श्रद्धा अशीच असते की, “आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे.” ह्या व्यवसायिकांच्या कामाच्या वेळाही काहीशा आगळ्याच असल्याने, महापालिकेचे कर्मचारी त्यावेळी काम करण्यासाठी नियुक्तच नसतात. डोळस सिंहावलोक आवश्यक आहे आता अशा प्रकारच्या व्यवसायिकांनी माझे काय घोडे मारले आहे? म्हणून मी असल्या चांभार चौकशा चालविल्या आहेत? कुठलेही नाही. मला प्रामाणिकपणे असे वाटते की, काही व्यवसाय हे मुळातच अनावश्यक असतात. जसे की वकीली. तसेच मला हेही व्यवसाय अनावश्यक वाटतात. त्याच्यामुळे, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. माणसे अनावश्यक व्यवसाय करू लागली की, समाज दिशाहीन होत भरकटत जातो, असे मला (उगाचच) वाटत राहते. तुम्ही काय म्हणता?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
5853 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

काही व्यवसाय हे मुळातच अनावश्यक असतात..

रिम झिम
गुरुवार, 11/14/2013 - 16:19 नवीन
तसेच काही लेख हे(ही)मुळातच अनावश्यक असतात.
  • Log in or register to post comments

*

जेपी
गुरुवार, 11/14/2013 - 16:39 नवीन
ये क्या हे ? में कहा हु ?
  • Log in or register to post comments

फालतू उद्योग करण्याची

arunjoshi123
गुरुवार, 11/14/2013 - 17:19 नवीन
फालतू उद्योग करण्याची प्रवृत्ती वाढू लागली आहे हे खरे.
  • Log in or register to post comments

चौपाटीवर एलेक्ट्रॉनिक मशीनचा

विजुभाऊ
गुरुवार, 11/14/2013 - 18:04 नवीन
चौपाटीवर एलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर करुन भविष्य सांगणारे लोक मिरची लिंबु एकत्र बांधून विकणारे आनि ते जडीबुटीवाले जिनसेंग शिलाजीत पलंगतोड विकणारे लोक्स.
  • Log in or register to post comments

हा धर्मगाय वाला बिझनेस भारी

मिनेश
Fri, 11/15/2013 - 14:34 नवीन
हा धर्मगाय वाला बिझनेस भारी दिसतोय.....no production cost....
  • Log in or register to post comments

मुळात व्यवसाय करणे ही पण एक

मारकुटे
Wed, 11/20/2013 - 18:55 नवीन
मुळात व्यवसाय करणे ही पण एक अनावश्यक गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

हम्म

पैसा
Wed, 11/20/2013 - 20:16 नवीन
दुसर्‍याच्या जागेवर धंदा करून तिसर्‍याच्या खिशातले पैसे काढणे कसे काय कायद्यात बसते माहित नाही. कबुतरे आणि भटकी कुत्री यांच्याबद्दल अतिशय सहमत आहे. कबुतरांनी आमच्या एका फ्लॅटच्या खिडक्या-गॅलरी यावर कब्जा केला आहे. दर वेळी तिथे गेले की तिथल्या खिडक्या साफसूफ केल्याशिवाय रहाता येत नाही. भटक्या कुत्र्यांनी आमच्या मांजरांना घराबाहेर जाणे अशक्य करून ठेवले आहे. आमचा एक आवडता बोका आमच्या डोळ्यादेखत या कुत्र्यांनी मारला तेव्हापासून त्या कुत्र्यांना कोणत्याही उपायाने हटवा ही माझी मागणी आहे. मुन्शिपाल्टीला अर्ज करून कोणी लक्ष देत नाही. मुन्शिपाल्टीची तत्कालीन अध्यक्षा आमच्या शेजारीच रहाते. तिचा स्वतःचा एक बोका या कुत्र्यांनी मारला पण ती तरी लक्ष घालायला तयार नव्हती. "कुत्रे पकडायचे कॉण्ट्रॅक्ट एकाला दिलं आहे, पण मी आजपर्यंत त्याला कधी कुठे पाहिला नाही." हे मुन्शिपाल्टीच्या अध्यक्षीणबैंचं उत्तर. आणखी काही बोलायची हिंमत आहे??
  • Log in or register to post comments

वकिली हा अनावश्यक व्यवसाय आहे

खटपट्या
Wed, 11/20/2013 - 23:03 नवीन
वकिली हा अनावश्यक व्यवसाय आहे ???
  • Log in or register to post comments

भटकी कुत्री अन गाय

स्पंदना
गुरुवार, 11/21/2013 - 05:06 नवीन
भटकी कुत्री अन गाय यांच्याबद्दल अतिशय सहमत. काय आव आणतात हे भटकी कुत्री वाले. एकेकाला धरुन बदडावेसे वाटते. आमची मुले सोसायटीत खेळु शकत नव्हती. रात्री हे दंगा यांचा. मी तर यावेळी जाउन मुद्दामहुन भांडण काढणार आहे भारतात आले की. ते विचारतात, आपही बताईये हम क्या करे? आता सांगणार आहे, घरला घेउन जा ही २०० कुत्री आणि पाळ. रस्त्यावर नकोत.
  • Log in or register to post comments

आम्ही जयपुरला गेलो होतो

परिंदा
गुरुवार, 11/21/2013 - 18:00 नवीन
आम्ही जयपुरला गेलो होतो तेव्हाचा हा किस्सा. तिथे जलमहाल पाहायला रात्री गेलो होतो, तर माश्यांसाठी खाऊ विकत घ्या म्हणून ३-४ पोरे मागे लागली होती. म्हणे सोनेरी मासे येतात खायला. रात्री अंधारात सोनेरी मासा येवो वा चंदेरी डोळ्यांना काय कप्पाळ दिसणार? हद्द म्हणजे काही मठ्ठ लोकं हा खाऊ(कणकेचे गोळे) विकत घेऊन त्या तलावात सोडतदेखील होती. कुठल्याश्या दुकानात एक पोस्टर पाहिले होते या भुतदयावाल्यांचे. त्यात सुखी जीवनासाठी खालील उपाय(?) दिले होते. १. कुत्र्याला खायला द्या. शत्रूचा नाश होईल. २. कबुतराला दाणे द्या. धंद्यात बरकत येईल. ३. गायीला चारा द्या. ग्रहपीडा दुर होईल. ४. मुंग्यांना साखर द्या. कर्ज मुक्ती होईल. ५. कावळ्याला खाणे द्या. पितर तृप्त होतील.
  • Log in or register to post comments

+ ६....

मुक्त विहारि
गुरुवार, 11/21/2013 - 18:07 नवीन
धाग्याला प्रतिसाद द्या, धागाकर्ता खूष होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

भटके कुत्रे, कबूतरे आणि

मुक्त विहारि
गुरुवार, 11/21/2013 - 18:10 नवीन
चारावाली गाय, ह्याबाबत सहमत.. आमच्या इथे पण एक चारावाली गाय घेवून एक बाई बसते.नुसते बसून ती दिवसाला ५०० ते ६०० रु, कमावते. पुढे मागे हाच धंदा मोठ्या प्रमाणात काढावा म्हणतो.
  • Log in or register to post comments

छान बिजीनेस आहे हा!

परिंदा
Fri, 11/22/2013 - 19:15 नवीन
छान बिजीनेस आहे हा! दिवसाचे ५०० म्हणजे महिन्याचे १५००० झाले की हो. शिवाय जास्त कष्ट बी नाय(गायवालीला नि गायीलाबी), एका जागी बसुन तर राहयच.
  • Log in or register to post comments

शिवाय दूध फुकट !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/22/2013 - 23:07 नवीन
शिवाय दूध फुकट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

बरोबरच दही,ताक,लोणी,तूप आणि

प्यारे१
Sat, 11/23/2013 - 17:04 नवीन
बरोबरच दही,ताक,लोणी,तूप आणि शेण व गोमूत्र फ्री,फ्री,फ्री!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हाहाहाहाहाहा~

वेल्लाभट
Fri, 11/22/2013 - 19:22 नवीन
हाहाहाहाहाहा~
  • Log in or register to post comments

अजुन काही व्यवसाय

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 11/22/2013 - 20:09 नवीन
अतिक्रमणाविषयीच बोलायचे तर अजुनही अनेक उदाहरणे घेता येतील १.१० बाय १५ चा गाळा आणि पुढे १५ फूट ओपन टू स्काय (बहुधा सोसायटीच्या कॉमन मालकीची) जागा अडवणारे हॉटेलवाले,वेल्डिंगवाले,गॅरेजवाले,गोडाउनवाले,बेकरी आणि डेअरीवाले हे फक्त जागा अडवत नाहीत तर नियमाप्रमाणे धुरासाठी चिमणी न लावता वरच्या लोकांना धुराचा त्रास देणे (हॉटेले),सतत ठाकठोक आवाज करुन वेळीअवेळी शांततभंग करणे,दुधाचे चिकट ओघळ,गंजलेले सामान इतरत्र वाटेत ठेवणे असे सौजन्यशील प्रकारही करतात. आणि महापालिका अतिक्रमण विभाग ,पोलिस व लोकल दादा,भाउ,आण्णांकडे तक्रार करुन काही फायदा होत नाही (त्यांचा हप्ता वाढत असेल फारतर) बाकी वकिली अनावश्यक व्यवसाय आहे याच्याशी असहमत.. एकदातरी रोड अ‍ॅक्सिडेंट्,पोलिस केस,लॉक अप,जप्ती,जमानत यापैकी कशात सापडाल तर समजेल
  • Log in or register to post comments

व्यवसाय की उपक्रम?

आनंद घारे
Fri, 11/22/2013 - 23:04 नवीन
धर्मगाय हा व्यवसाय आहे आणि त्यामधून काही लोक आर्थिक लाभ मिळवतात. त्यापासून पुण्यप्राप्तीचा मानसिक लाभ होतो अशी काही लोकांची समजूत असेल, पदपथावर चालणा-या लोकांना त्याचा थोडासा उपद्रव होतो. आरोग्यपेये विकणा-यांचाही व्यवसायच आहे, त्यापासून शारीरिक लाभ होतो अशी काही लोकांची समजूत असेल, कदाचित ती खरीही असू शकते. याचा कोणालाच उपद्रव होत नाही, कबुत्तरपालन हा व्यवसाय कसा? ती पाखरेही फारसा त्रास देत नाहीत. फक्त कधीकधी घरात घुसून घाण करतात. एरवी दिसायला सुरेख असतात. सार्वजनिक-श्वान तारण हा व्यवसाय कसा? हे प्रकरण मात्र समाजाला अतीशय तापदायक असते. एक मनेका गांधी सोडली तर मला तरी याचा कोणी पुरस्कर्ता दिसत नाही. तरीसुद्धा माणसांना मिळत नसेल एवढे संरक्षण या मोकाट कुत्र्यांना का मिळते ते समजत नाही. आमच्या वाशीतली कुत्री तर इतकी माजली आहेत की त्यांनाही बहुधा विशिष्ट ब्रँडची (मराठी शब्द?) बिस्किटेच लागतात. त्यांना खायला घालण्यासाठी उदार (?) पुण्यप्राप्तीइच्छुकांनी रस्त्यावर टाकलेले इतर अनेक अन्नपदार्थ तसेच पडून राहिलेले दिसतात. "तुला नाही मला, घाल कुत्र्याला" ही मराठी म्हण यांनी मोडीत काढली आहे. या उपक्रमांबाबत डोळस सिंहावलोकन आवश्यक आहे या निष्कर्षाशी सहमत. पण ज्याचा कोणाला उपद्रव होत नसेल अशा गोष्टी तुम्हाला आणि मला अनावश्यक वाटल्या तरी इतर कोणाला त्या चांगल्या वाटत असल्या तर त्यांना त्या करू द्याव्या असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments

लेखन आवडले...

मदनबाण
Sat, 11/23/2013 - 08:51 नवीन
लेखन आवडले... बाकी धर्मगाय मी बर्‍याच ठिकाणी अगदी लहानपणा पासुन पाहतो आहे,घरातुन सुद्धा पाहिली आणि टिपली होती इथे :-खिडकीतुन पाहताना...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा