Skip to main content

शाप

लेखक मनीषा
शुक्रवार, 25/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
(शतशब्द कथा) तिन्हीसांजेच्या संधिप्रकाशात एक कृश आणि अतिजिर्णं असा वृद्ध वटवृक्षाच्या पारावर विसावलेला होता. पारावर एक लहानसे हनुमान मंदिर होते. दिव्याला नुकतीच तेलवात केलेली असावी.लोक येतजात होती. तितक्यात एका लहान मुलाला घेऊन मोठा जमाव तेथे आला. देवदर्शन करून त्यांनी तिथल्या लोकांना प्रसाद वाटला. या वृद्धाला प्रसाद देत एकजण म्हणाला, "आशीर्वाद द्यावा बाबा, घरी पुत्र जन्मला". "मी असा भणंग.. काय आशीर्वाद देणार?" वृद्ध उत्तरला. "या मारूतीरायासारखा चिरंजीव हो म्हणा". वृद्धाच्या चेहर्‍यावर विलक्षण वेदना उमटली. अबोलपणे हात उंचावत त्याने मनोमन आशीर्वाद दिला. सारेजण गेल्यानंतर, आपल्या मस्तकाचे जीर्ण-मलिन वस्त्रं सोडवून, तिथल्या दिव्याचे तेल कपाळावरील जखमेला लावत म्हणाला.. "देवा चिरंजीवित्वाचा शाप भोगणारा, मी शेवटचाच असू दे.."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5567
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

हम्म्म! चांगली आहे शतशब्द कथा.

अश्वत्थाम्यासाठी चिरंजीवित्व हा शापच बनला आहे!

****

मस्त लिहीलंय मनीषा...

उत्तम

शत शब्द कथा असा खरेच काही साहित्य प्रकार आहे का ? असल्यास नवीन माहिती मिळाली ... बाकी कविता १४ ओळींची ऐकली होती शाळेत कधीतरी ...............

कथा आवडली. अवांतरः अश्वत्थाम्याबद्दल अजिबातच दया वाटत नाही. अतिअवांतर ( कदाचित अनावश्यक माहिती) : पूजनीय अनंत दा. आठवले उर्फ वरदानंद भारतींच्या पुस्तकात अश्वत्थाम्याला ३००० वर्षे भटकावं लागेल असा शाप मिळाल्याचा उल्लेख आहे. ते म्हणतात महाभारत संपून ५००० वर्षे उलटून गेली. त्यामुळं नर्मदा परिक्रमा अथवा इतर कुठंही अशी व्यक्ती भेटली म्हणजे अश्वत्थामा भेटला असं समजणं अथवा तसा उल्लेख चुकीचा आहे.

In reply to by प्यारे१

३००० हजार वर्षे कुणाची? माणसाची की ब्रह्मदेवाची?

In reply to by प्रचेतस

उद्या म्हणशील आभाळाला आधार काय? बाकी, अश्वत्थाम्याची नाडीपट्टी कोणाला मिळालीय का?

In reply to by प्रचेतस

मला ठाऊक नाही. ऐकिव माहितीवरुन. अवांतरः ऑडिट झालेलं दिसतंय वल्लीचं (म्हन्जे तेच्या हापिसचं ;))

In reply to by प्रचेतस

हा बघ आधार. इ.स. ६३४ चा ऐहोळे येथील दुसर्‍या पुलिकेशीचा शिलालेख. पीडीएफच्या पेज क्र. ४ वर गेलास तर ३३वे कडवे पहा. तिथे दिलेय की इ.स. ६३४ साली महाभारत युद्ध संपून ३७३५ वर्षे झाली म्हणून. म्हणजे तेव्हापासून जर पुढे १२६५ वर्षे मोजली तर इ.स. १८९९ साली महाभारत युद्ध संपून ५००० वर्षे झाली असे म्हणायला पाहिजे. http://www.sdstate.edu/projectsouthasia/upload/Aihole-Inscription-of-Pu… पण इथे एक गोम आहे. नुसत्या या पुराव्यावर विश्वास ठेवला तर महाभारताचा काळ हडप्पापूर्व येतो, आणि हडप्पापूर्व काळात वैदिक काळ नेला तर.......यू नो द्याट ;) प्लस तितक्या जुन्या काळात महाभारताशी संबंधित ठिकाणी म्हणण्यासारखे विशेष पुरावेही सापडले नाहीत. जे सापडलेत ते मुख्यतः इ.स.पू. ११००-८०० या काळातले आहेत. अर्थात मूळ प्रश्न सुटला नाही हे वेगळे सांगायला नकोच.

In reply to by बॅटमॅन

म्हाभारतात…दोन्ही बाजूंना शस्त्र-अस्त्र एलियन्स नि पुरवलेली काय :P नारायणास्त्र,ब्रम्हास्त्र वैग्रे

In reply to by मालोजीराव

अर्थातच! अहो अजिंठा-वेरूळची लेणीही एलियन्सनी बांधलेले हिष्ट्री च्यानेलवर पाहिले नैत काय? त्याप्रमाणेच तेव्हाही चालू होते ते सर्व ;)

In reply to by बॅटमॅन

धन्स रे. :) बाकी हेमाद्रीच्या यादवप्रशस्तीमध्ये देवगिरीच्या यादवांचे कुल नहुषापासून - )नहुष, ययाती, यदु...वसुदेव, कृष्ण....) सुरु होते असे दाखवले आहे. बहुधा त्यांची ४४ वी पिढी. =)) आधार बघून नक्की सांगतो.

In reply to by प्रचेतस

अरे ते दाखवणारच :) समजा पर पिढी ५० वर्षे जरी धरली तरी इसपू फार तर १४०० पर्यंत जातो हा प्रकार. आधार पहा जरूर. एनीवे, जनमेजय आणि महापद्म नंद यांच्यात साधारणपणे हजारेक वर्षांचे अंतर आहे म्हणतात बॉ. पाहिले पाहिजे.

In reply to by प्रचेतस

चेपु वर काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध साईनाथ नावाच्या कालाकाराचं पेज पाहण्यात आलं. हा देवदेवतांची चित्रं काढतोच... पण त्याचा रामायण - महाभारताचा अभ्यासदेखील बराच असावा. त्यावरच त्यानेअश्वत्थाम्याबद्दल लिहीलं आहे. मनोरंजक धागा आहे. @मनीषा - कथा आवडली. जे.पी.

In reply to by जे.पी.मॉर्गन

मोली आर्ट म्हणून पेज आहे तेच ना हे? जबरी प्रकार आहे राव तो, पोरगं लै अभ्यासू आणि खत्तरनाक कलाकार आहे.

मारुतीराया प्रमाणे चिरंजीव असणे व डोक्यावर जखम बाळगुन अमरत्वाला सामोरे जाणे यात जमींन आस्मांचा फरक आहे... सबब कथा पुरेसी पटली नाही !

पूजनीय अनंत दा. आठवले उर्फ वरदानंद भारतींच्या पुस्तकात
वरदानंद भारतीं तेवढे खरे आणि बाकीचे खोटे हे कशाच्या आधारावर म्हणता आहात? अग्निकोल्हा ह्यांच्या मताशी सहमत. भगवान विष्णूंनी मारुती रायांना चीरांजीवित्वाचा आशीर्वाद तर अश्वथाम्याला चीरांजीवित्वाचा शाप दिला

In reply to by म्हैस

भगवान विष्णूंनी मारुती रायांना चीरांजीवित्वाचा आशीर्वाद तर अश्वथाम्याला चीरांजीवित्वाचा शाप दिला
ह्याचे संदर्भ देऊ शकाल काय?