Skip to main content

कास पठार : फोटो काढण्यासाठी फी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 31/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच कास पठारावर फुलांचा बहर सुरु झाला . (त्यानिमित्ताने फोटो/ प्रवासवर्णनं येतीलच ) पण ह्यानिमित्ताने वनविभागाने काढलेले दरपत्रक फेसबुक | सातारा ह्या पेज वर पाहण्यात आले . गाड्या प्रवेश फी , व्यक्तिगत प्रवेश फी , फोटोग्राफी फी , कचरा केल्यास दंड ,मागील वर्षीच्या वसुलीतुन आसपासच्या गावात केलेली कामे असे बरेच डिटेल्स आहेत त्यात . ( फेसबुक वरील फोटो इथे कसा शेयर करता येईल हे माहीत नसल्याने फोटो देता आलेला नाही) ह्यातला "फोटो काढण्याची फी " हा प्रकार फार खटकला . प्रवेश फी वाहनांवर फी समजु शकतो , फुलाम्चे नुकसान अन प्रदुषण पसरवणे ह्यासाठी दंड असणे ही लॉजिकल आहे . पण फोटो काढण्यासाठी फी हे जरा जास्तच नाही का वाटत ? आता कास पठार ही जर अजिंठा लेण्यांसारखी डेलिकेट जागा असती किंव्वा अत्यंत कष्टाने जमवलेल्या वस्तुंचे संग्रहालय असते किंव्वा कोणा प्रसिध्द चित्रकाराची गॅलरी असती तर अशी फी समजु शकतो . पण कास ही कोणाची प्रॉपर्टी नव्हे... तो निसर्गाचा चमत्कार आहे. आणि अशा ठिकाणी फोटो काढण्याचे स्वातंत्र फुकट असले पाहिजे. असे फोटो काढण्यावर फी लावणे तुम्हाला लॉजिकल वाटते का ? जगात इतरत्र कोठे नैसर्गिक पर्यटन स्थळांवर असे फोटो काढण्यावर फी आहे ? अवांतर : १)फी मोबाईल कॅमेराला १० रुपये , साध्या कॅमेराला ५० अन डिजीटल एसेलारला १०० रुपये , अर्थात फारच नॉमिनल आहे ...पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो ... आधी रस्ते सुधारणेच्या नावाखाली रस्त्यांवर लूट नाके झाले ... आता पर्यटन स्थळांवर फोटो काढायला फी ...पुढे मागे परत जीझीया कर यायला ही हरकत नाही . २) ह्याच विषयाला अजुन एक कंगोरा आहे भुमिपुत्रांचा... सातारची लोकं गेली कित्येक वर्षे कोणतेही नुकसान न करता कासच्या निसर्ग सौदर्याचा आनंद लुटत होते , आता त्यांनाच प्रवेशासाठी अन फोटो काढण्यासाठीही फी लावणे जरासे अन्याय वाटते . ( लूट नाक्यांवर जसा बोर्ड दिसतो की " स्थानिक (की ज्यांच्याच जमीनी घेवुन रस्ते बनवले ) लोकांना टोल मधुन सुट नाही त्यांनी सवलतीचे मासिक पास घ्यावेत " तसाच बोर्ड कासवरही लावायला हवा आता .) राहुन राहुन बोस्टन टी पार्टीची आठवण येत आहे .

वाचने 19674
प्रतिक्रिया 66

प्रतिक्रिया

आता फोटो काढायला फी. फि ५० असो वा ५००० रु - त्याचा पुढे वापर कसा होणार आहे - हे समजायला हवे. पावति देतात का? बर्याच ठिकाणि प्रवेश फी घेतात - पण त्याचा वापर मेन्टेनन्स साठि केला जातो. पण फोटो काढण्यासाठी फी - हे अति आहे.

In reply to by जे.जे.

मी जुलै २०१३ ल गेलो होतो. फोटोसाठी फी बोर्ड लावलेले होते. पण मी फी न भरता तसाच गेलो होतो आनी भरपुर फोटो काढले होते. कोणीही विचारले/अडवले नाही. हे पहा: 1 2 3 4 5

बोरीवलीच्या संजय गांधी उद्यान (पूर्वीचे नॅशनल पार्क) इथे कॅमेरासाठी शुल्क आकरले जायचे. ही गोष्ट १९७६ सालची आहे आजची परिस्थिती माहीत नाही. त्याकाळी कोणीही फिरता विक्रेता जसे, चणे-फुटाणे विकणारा सुद्धा, तुम्हाला कॅमेराचा पास विचारू शकायचा. मी एका चणे-फुटाणे विक्रेत्याला पास दाखविण्यास नकार दिल्यावर त्याने मला, नॅशनल पार्क व्यवस्थापनाने, त्याला तसे अधिकार दिल्याचे पत्रक दाखविले. त्यावर त्याचे छायाचित्र आणि त्याला असणारा अधिकार हे लिहीलेले होते.

In reply to by प्रभाकर पेठकर

आता राष्ट्रीय उद्यानात कॅमेरासाठी शुल्क आकरले जात नाही तसेच तिथे आता खाद्य पदार्थ विकण्यास बन्दी असल्याने,असे विक्रेते सर्रास उपलब्ध नसतात,ही वस्तुस्थिती गेल्या वर्शीची आहे,सद्ध्या बदल झाले असतील तर माहीत नाही.

कॅमेरासाठी लावलेले श्ल्क मला तरी चुकीचे वाटत नाही. कास पठार ही "डेलिकेट"च जागा आहे. ती डेलिकेट जागा नाही असे समजू नका. तिथे अनेक दुर्मिळ वनस्पती उगवतात आणि बरेचदा काय - नेहमीच पर्यटक आणि अतिउत्साही फोटोग्राफर्स ती पायाखाली तुडवतात. आपण दुर्मिळ झाडे पायाखाली तुडवत आहोत हेही त्यांच्या गावी असते. मुळात पायाखाली येणारी वनस्पती काय आहे, ती दुर्मिळ असू शकते - rather आपण पायाखाली काय तुडवत आहोत तेच बर्‍याच जणांच्या गावीही नसते! तेह्वा निदान आता शुल्क लावल्याने अतिहौशीपणामुळे होणार्‍या नुकसानाला थोडा तरी पायबंद बसेल अशी आशा आहे. निसर्गाचा चमत्कार टिकून रहावा म्हणूनच सगळे प्रयत्न आवश्यक आहेत. लोकांना तिथेच खायला बसणे, पोझेस (?) देऊन फोटो काढणे वगैरे प्रकार करताना पाहिले आहेत. सांगायचे व्यर्थ प्रयत्नही केले आहेत. अगदी झाडे उपटतानाही पाहिले आहे! तेथील वन विभागाचे लोक उत्तम काम करत असतात. २ -३ दा जाऊन तिथल्या कर्मचार्‍यांशी बोलून माहिती घेऊन हे सांगत आहे.

In reply to by यशोधरा

+१ हेच लिहायला आले होते..... मागे एकदा एक महाभागाने फुलांची रोपटी मुळासकट उपटुन बदामाचा मोठा आकार जमिनीत कोरला होता व त्यात मुडद्यासारखे झोपुन फोटो काढायचे उरफाटे उद्योग त्याच्या ग्रुप ने सुरु केले होते... अर्थात ही गोष्ट कुंपण घालण्या आधीची आहे... सशुल्क फटुग्राफी ला फुल्ल सपोर्ट असणारी - सातारकर आनंदिता

In reply to by आनन्दिता

फुलांचे कोणी नुकसान करत असेल तर त्याला जबरी दंड लावावा , ह्याला कोणाचीच हरकत नाही .पण जो माणुस कोणतेही नुकसान न करता , फुलाम्ची हानी न करता फोटो काढत आहे त्याला फी का ? आणि राहता राहिला आसपासच्या गावांच्या विकासाचा प्रश्न : तर त्यांनी येवढी ही गर्दी येत आहे त्यांच्या साठी चहा नाष्टा राहण्याची सोय , फुलाम्ची माहीती देण्याची सोय, गाड्या पार्किंग ची सोय , वगैरे करुन उत्पन्न कमवावे. पण हे असे फोटो काढण्यावर फी लावणे हे व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हल्ला करणे वाटते.

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि ते वेगवेगळ्या कॅमेर्यांना वेगवेगळा दर का? की डिएसएलआर वाल्याला श्रीमंत मानुन 'प्रोग्रेसिव रेट' लावला जातोय? ;-)

In reply to by चिगो

बर्‍याच देवस्थानात देखील फोटो काढण्यास मनाइ असे बोर्ड असतात. देवस्थानाच्या ऑफिसमध्ये हेच फोटो मात्र सशुल्क उपलब्ध असतात. त्याबद्दल कोणी कधी आक्षेप घेत नाहीत. देवाच्या मूर्तीचे फोटो काढले म्हणून काय बिघडणार असते? पण तरीदेखील कोणी कधी याबद्दल तक्रार करत नाहीत.

In reply to by विजुभाऊ

पण एकतर बरीचशी देवस्थाने ही खाजगी असतात. हा देवस्थानाच्या उत्त्पन्नाचा एक सोर्स असू शकतो. दुसरं म्हणजे जनरली देवळात जातांना मुख्यत्वे हेतू 'देवदर्शन' हा असतो. सहलीला जातांना त्यात मजा आणि (चेपु आणि डिजीटल / मोबाइल कॅमेरे आल्यापासून) ती इतरांशी शेअर करणे हा असतो.. :-) तिसरी गोष्ट म्हणजे बहुतेक देवळांच्या गाभार्याचा मार्ग हा अरुंद/चिंचोळा असतो.. आता प्रत्येकजण मनाजोगता फोटो येईपर्यंत गाभार्यात गर्दी करु लागला तर कसे चालायचे, राव? आणि जनरली गाभार्यातील मुर्तीचे फोटो काढायला मनाई असते, इतरत्र नाही..

In reply to by विजुभाऊ

असाच अनुभव आला होता.पैसे घेउन आमच्याच मोबईलने देवीचे फोटो काढून दिले होते त्यांचाच पुजार्‍याने. मग नियम कोणासाठी?

In reply to by यशोधरा

यशोधरा, कॅमेरा शुल्क धोरणास माझाही पूर्ण पाठींबा आहे. त्याच बरोबर ठिकठिकाणी वेगवेगळे सुचना फलक लावावेत. दुर्मिळ, औषधी झाडांना नांवांचे आणि त्यांच्या औषधी गुणधर्माचे वर्णन करणारे फलक लावावेत. प्रवेश शुल्क, कॅमेरा शुल्क वगैरे आकारून स्वच्छ प्रसाधनगृह, उपहारगृह, विश्रांतीगृह आणि ठिकठीकाणी कचर्‍याचे डबे वगैरे वगैरे सोयीसुविधा पुरवाव्यात. सेवकवर्ग गणवेषात असावा जो नियम तोडणार्‍यांवर लक्ष ठेवेल. त्याच बरोबर जनतेचे प्रबोधन शाळा-कॉलेज पासून करावे. तो ऐच्छिक नाही तर एक अनिवार्य विषय असावा. दुर्दैवाने आजकाल पालकांनाच सामाजिक भान कमी दिसून येते. असे पालक भविष्यातील सुजाण नागरिक कसे घडविणार? नुसतेच पैसे कमविणे, ऐहिक सुखाची साधने मिळविणे एवढाच जगण्याचा उद्देश राहता कामा नये. राजकारण्यांवर टिकाटिपण्णी करतानाच ह्या समाजाप्रती माझे कर्तव्य काय आहे हे जाणण्याची आणि ते पार पाडण्याची सामाजिक जबाबदारी उचलण्याची इच्छा शक्ती जोपासणे गरजेचे आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्याच बरोबर जनतेचे प्रबोधन शाळा-कॉलेज पासून करावे.
सहमत. आज सकाळचाच अनुभव. एक दांडगं कुत्रं फुटपाथवरच 'शी' करत होतं. त्याचा पट्टा धरून त्या कुत्र्याएवढाच उग्र दांडगा माणूस शांत पणे उभा होता. मी त्याला कुत्र्याला फुटपाथ शेजारच्या जागेत घेउन जायला सांगितलं तर, 'तुला काय करायचंय?' असं (कन्नड मधून) म्हणाला. :(

In reply to by प्रभाकर पेठकर

कासचा सेवकवर्ग गणवेशात पाहिला होता. कास पठाराची, तेथील फुलांची, वनस्पतींची माहिती देणारे पत्रक तिथे वनविभागातर्फे मोफत वाटले जाते. माहिती विचारली तर आस्थेने दिली जाते. आजकाल कॉलेजमध्ये पर्यावरण हा विषय असतो.

In reply to by यशोधरा

कासचा सेवकवर्ग गणवेशात पाहिला होता.
चांगली गोष्ट आहे. दुर्दैवाने, मी गेलो होतो तेंव्हा (धुवाँधार पाऊस आणि थंडी होती) मुळातला सेवक कुठे दिसला नाही, गणवेष राहू दे दूर. पाऊस वार्‍यापासून वाचायला साधी शेडही नव्हती कुठे. असो. कदाचित आता परिस्थिती बदलली असेल तर ते स्वागतार्हच आहे.
कास पठाराची, तेथील फुलांची, वनस्पतींची माहिती देणारे पत्रक तिथे वनविभागातर्फे मोफत वाटले जाते.
अशी परीपत्रके वाटण्यापेक्षा (आणि ती लोकं वाचतीलच अशी अपेक्षा करण्यापेक्षा) नजरेत भरणारे फलक जास्त परिणाम साधतात.
माहिती विचारली तर आस्थेने दिली जाते.
म्हणजे तुमच्या माझ्या सारखे जिज्ञासू. बाकी तरूणाई (आजकालची) माहिती विचारायला अजिबात जात नाही. पण फलक लावला असेल तर ५० टक्के तरी पर्यटक ते वाचण्याचे कष्ट घेतात. पुन्हा, ती माहीती थोडक्यात आणि मोठ्या अक्षरात असावी. छोट्या अक्षरात लिहीलेली बॉटनिकल नांवे आणि क्लिष्ट तपशील सामान्यांना माहीती वाचण्यास उद्युक्त करण्याऐवजी परावृत्तच करतात. आदर्श म्हणून प्राणीसंग्रहालयातील पाट्या पाहाव्या. A3 पेक्षा मोठे फलक नसतात. माहीती थोडक्यात असते.
आजकाल कॉलेजमध्ये पर्यावरण हा विषय असतो.
चांगली गोष्ट आहे. पण शाळकरी वय जास्त संस्कारक्षम असतं असं वाटतं.

In reply to by यशोधरा

हेच लिहायला आलो होतो. कास पठार ही महाराष्ट्राला मिळालेली एक नैसर्गीक देणगी आहे. ती टिकून रहावी,यासाठी हा अट्टाहास आहे. कास पठारावर काही दुर्मीळ वनस्पती आहेत. यात अशियात आढळणार्‍या दुर्मील कीटकभक्षी वनस्पती देखील आहेत. डॉ. श्रोत्री नी इथल्या पर्यावरणाबद्दल स्थानीकाम्च्यात जागॅऋती निर्माण केली. कास पठार नीट जपले जावे यासाठी ते खूप प्रयत्नशील आहेत.कास पठारावर किंवा कास तलावा च्या आसपास जे जम्गल आहे तेथे पर्यटकानी आजवर जे उपद्व्याप केले आहेत ते बघता कास पठारावर असे शुल्क लावून लोकाना थोपवून जे केले जात आहे ते निसर्गासाठी खरेच योग्य आहे. गिरीजा दादा. कास पठारच नव्हे तर महाराष्ट्रातील बरीच नैसर्गीक स्थळे पर्यटकाम्च्या अगोचरपणामुळे धोक्यात आहेत.

In reply to by विजुभाऊ

गिरीजा दादा. कास पठारच नव्हे तर महाराष्ट्रातील बरीच नैसर्गीक स्थळे पर्यटकाम्च्या अगोचरपणामुळे धोक्यात आहेत. >>> अहो मग अगोचरपणावर फी / दंड लावायला पाहिजे ना ? फोटो काढल्याने फुले झिजतात काय ? आग सोमेश्वरी अन बंब रामेश्वरी हा काय भलता प्रकार ? चुकीच्या वर्तना बद्दल जबरी दंड ठेवा वाटल्यास जेलची हवाही दाखवा त्यांना ....पण काही लोकं बावळट असतात म्हणुन सरसकटपणे सुजाण माणसांच्या व्यक्तिस्वातंत्रावर घाला घालु नये . असे लॉजिक आहे . (पण एकुणच बहुतांश लोकांचा चर्चेतील सुर पाहता , लोकांना स्वातंत्र्यापेक्षा दुसर्‍या कोणी तरी लादलेल्या नियमात निवांत बसायला आवडते असे दिसत आहे . किमान त्या नियमांचे लॉजिक तरी शोधुया . ) अवांतर :मंदिरात फोटो काढायला मनाई असते कारण मंदिर ही कोण्या संस्थानची प्रॉपर्टी असते ... सार्वजनिक मंदिरात फोटो काढायला मनाई नसते ...कास काही कोणाची प्रॉपर्टी नव्हे ... कासच्या जस्ट अल्याड एका वळणावर एक गणपतीचे( /मारुतीचे) साधे सोप्पे मंदीर आहे तिथे तुम्हाला फोटो काढण्यास कोणी फी लावली अथवा मनाई केली तर कळवा .

मी अलिकडेच कास पठारला गेलो होतो. तेथील कर्मचार्‍याने माझ्या फटूग्राफीला हरकत घेतली. मिपावर फटू चिकटवायचेयत म्हणालो." अरे वा मग चालू द्यात ! " तो म्हणाला. तळटीप- वरील प्रसंग स्वप्नात घडलेला असल्याने इथे फटू नाहीत याबद्द्ल दिलगीर आहोत.

जवळपास सगळीकडेच हा अनुभव येतोय, कॅमेरासाठी शुल्क लावले जाते, पण त्याची रीतसर पावती मिळत असेल तर हरकत नसावी. म्हैसूरला वृंदावन गार्डन ला सुद्धा असाच काहीसा अनुभव आला. तिथल्या माणसाने तोडक्या मोडक्या हिंदीमधे कॅमेरा कुठला आहे विचारले, माझ्या मित्राने (त्याहून तोडक्या मोडक्या) हिंदीमधे बोलत Nikon D3200 दाखवत सांगीतले की ह्यात video घेता येत नाही...त्या माणसाने १०० ऐवजी ५० चं तिकीट घेवून सोडुन दिलं....

फोटो काढण्यासाठीच काय पण मला वाटते कोणताही निसर्ग प्रत्यक्ष पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फीची आवश्यकता नसावी. निसर्गच काय पण कोणतीही गोष्ट जपण्यासाठी फी आकारण्यापेक्षा जरुरी असतं ते म्हणजे त्या गोष्टीबद्दल पद्धतशीरपणे निर्माण केलं जाणारं प्रेम आणि जबाबदारीचं नातं. निसर्गापोटी असणाऱ्या प्रेमामुळे जे येणार त्यांना हिरमुसले जरूर होईल, कदाचित ते येणार देखील नाहीत पण जे निसर्गाला पायदळी तुडवायला येणार ते फी आकारल्यानंतर त्या साऱ्या निसर्गावर आपला हक्क असल्यासारखे वागतील आणि नक्की येतील. त्याचे काय? फी हा प्रकार नियम तोडण्यासाठी दिली जाणारी देणगी ह्या पेक्षा जास्त काही नसावा बहुतेक.

फी कुठल्या नावाखाली घेतली यापेक्षा योग्य फी, योग्य कारणासाठी घेऊन ती योग्य पद्धतीने वापरली जाते की नाही हे जास्त महत्वाचे. एकाच जागी एकाच नावाने (उदा. प्रवेश फी) फी घेतली जावी. अनेक वेगवेगळे उपप्रकार पाडून फी भरणार्‍याच्या नकळत जास्त वसूली करण्याची चलाखी अनेक ठिकाणी दिसते... अगदी करवसूलीतही. मात्र जमा केलेले पैसे कोणकोणत्या प्रकारे खर्च केले आणि त्या प्रत्येक प्रकाराचा नक्की काय फायदा झाला हे सांगण्याच्या बाबतीत बहुतेक ठणठणाटच असतो (कारण ते बहुतेक गैरसोईचेच असते).

अहो सगळीकडे कॅमेरा घेऊन जायला फी असते. काही ठिकाणी तर फोटोसुद्धा काढायला मनाई असते. नवीन काय आहे ? त्यातून पुढच्या वर्षी निवडणूका येताहेत. तेव्हाही आल्यागेल्या मतदाराच्या हातावर काही ठेवावे लागते. महानगरपालिकेच्या निवडणूकीतला मताचा भाव ५०००/-. लोकसभेला तर विचारूच नका. त्यामुळे आत्तापासून पै पै जमवली तर जनतेला "तेरा तूझ को वापस" म्हणून परत करता येइल. नाही का ?

कासला जाणे टाळावे. रायरेश्वरच्या पठारावरही तितकीच सुंदर आणि भरपूर फुले असतात ती पाहावीत. तिथेच जंगमांकडे पिठलं भाकरी भात खावा आणि दिवसभर हुंदाडून घरी पोचावे.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद. रायरेश्वराच्या पठारावर आणि जंगमांच्या खानावळीला जायचे कसे ह्याचे तपशीलही कळू द्यात जरा.

In reply to by प्रभाकर पेठकर

भोरहून आंबवडे गाठावे. तिथे नागेश्वराचे यादवकालीन मंदिर आहे तसेच झुलता पूल आहे. आंबवडयाहून कोर्ले गावी जावे साधारण ७/८ किमी. तिथून घाटमार्गाने रायरेश्वराच्या शिडीपावेतो यावे. (रस्ता कच्चाच आहे.शिवाय फक्त दुचाकीच जाऊ शकते) नपेक्षा कोर्ले गावातून चालत तिथपर्यंत यायला दीड/दोन तास लागतात. तिथून लोखंडी शिडीमार्गे कडा चढून अर्ध्या तासात रायरेश्वरच्या मंदिरापर्यंत येता येते. इथेच शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली असे म्हणतात. तिकडील जंगमांची घरे तेव्हापासून आहेत. खानावळ नाही. पण त्यांना सांगितल्यास साध्या मावळी जेवणाची उत्तम सोय होते. अर्थात हा भाग तसा दुर्गमच आहे म्हणूनच जास्त सुरेख आहे. रायरेश्वराचे पठार अवाढव्य आहे. फुलांचे गालिचेच पसरलेले आहेत अगदी.

In reply to by प्रचेतस

....रायरेश्वराच्या शिडीपावेतो यावे. (रस्ता कच्चाच आहे.शिवाय फक्त दुचाकीच जाऊ शकते) नपेक्षा कोर्ले गावातून चालत तिथपर्यंत यायला दीड/दोन तास लागतात. तिथून लोखंडी शिडीमार्गे कडा चढून अर्ध्या तासात रायरेश्वरच्या मंदिरापर्यंत येता येते.
धन्यवाद. पण हे मार्गदर्शन १०-१५ वर्षांपूर्वी मिळाले असते तर गेलोही असतो. आता कठीण दिसते आहे. मुलाबरोबर त्याच्या दुचाकी वरून जाता येईलही पाहूया जमल्यास. पण लोखंडी शिडी आणि तीही अर्धा तास चढावी लागते? हे जरा, माझे आजचे वजन, आकारमान आणि गुडघ्यांची अवस्था पाहता मला अशक्य वाटते आहे. दुसरा मार्ग आहे का? चारचाकीचा? लांबचा असेल तरी चालेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सगळ्यात जवळचा हाच मार्ग आहे. बाकी सर्वच अवघड आहेत. आणि शिडी इतकी मोठी नाही. 15/20 पायर्या फ़क्त. तिथून पठारावर पोचल्यावर पुढे अर्ध्या तासाची सपाट वाटेने चाल.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरकाका.. शिडी फार अवघड नाहीये. एकतर एकदम पक्क्या बांधणीची आहे. डुगडुगत नाही. दुसरा मार्ग म्हणजे वाई गाठायची. वाईवरून धोम. धोमवरून जांभळी गावाकडे जाणारा रस्ता आहे. जांभळी गांवाच्या अलीकडूनच एक रस्ता थेट गडाकडे जातो, पण शिडीवरून जावेच लागते.

In reply to by प्रचेतस

हे रायरेश्वर प्रकरण नव्हतं ब्वा आपल्याला महिती. मस्त. खलास म्हैती मिळाली. खुप धन्स. प्ण कास का नको, जरा एक्ष्प्लेन करा ना.

कॅमेरासाठीचे शुल्क चुकीचे वाटंत नाही. फुले बघायला आलेली मंडळी विशेषतः जोडपी पठारावर बसून, आडवे पडून, जमेल तितक्या पोझेस घेऊन स्वतःचे फोटो जणू सिनेमाचं शूटींग करतो आहोत इतक्या उत्साहानं काढून घेत असतात. परीणामी खालची फुले आणि जमीन दबली जावून तिथे परत फुलं येण्याचं प्रमाण कमी होत जातं. म्हणून हे शुल्क ठेवणं हे योग्य वाटतं. ज्यांना सिरियसली फोटोग्राफी करायची असते त्यांना इतके कमी शुल्क गौण ठरावे. पर्यावरणवादी मंडळी, अनेक निसर्गप्रेमी - त्यात श्री. किरण पुरंदरे, पक्षीतज्ञ, डॉ. जयंत नारळीकर- ह्यांनी वनमंत्री श्री. पतंगराव कदम ह्यांची वेळोवेळी भेट घेऊन कासपठार संरक्षणासाठी आणि ते वर्ल्ड हेरीटे़ज मध्ये समाविष्ट व्हावे म्हणून प्रयत्न केले. हल्ली पठारावर फुले बघण्यासाठी मधून रस्ते केले असून बाजूनी बॅरीगेड्स लावलेले आहेत. कास पठार वर्ल्ड हेरीटे़ज मध्ये समाविष्ट झालेले आहे. कासकडे जाणारा मार्ग हा यवतेश्चरावरुन पुढे जातो. यवतेश्वर गांव संपल्यानंतर कासच्या दिशेने पहिल्यांदा यवतेश्वर पठार लागते. इथेसुध्दा कासमध्ये जी फुले आहेत त्याच जातीची फुले असतात. फक्त प्रमाण कमी असते. पुढे कांस पठार. तो रस्ता तसाच पुढे बामणोली कडे जातो.

फोटोग्राफरांकडून शुल्क घेण्यावर माझी सध्यातरी आपत्ती आहे. कारण हे शुल्क दिल्यावर मला कोणती सोय किंवा सेवा किंवा सुविधा त्या बदल्यात मिळणार आहे? पार्किंग वगैरेचे पैसे देऊन मी ती जागा वापरतो. जर फोटोग्राफर्ससाठी तिथेच वेगळा विभाग सुरू करून तेथे सामान्य पर्यटकांना फिरायला बंदी केली जेणे करून फोटो काढताना मध्ये मध्ये इतर लोक येणार नाहीत किंवा फोटोग्राफर्सना मदत म्हणून भाड्याने ट्रायपॉड वगैरे देत असले किंवा विशेष शेड वगैरे उपलब्ध करून दिली तर हे पैसे मी आनंदाने भरेन.

फोटोग्राफीला शुल्क वेडपटपणा आहे... वरती काही मुद्दे आलेत की शुल्क घेतल्यामुळे नुकसानाला पायबंद बसेल वगैरे..समजा फटू न काढता नुस्ते तसेच गेलो तर? त्याने नुकसान कमी होणारे थोडीच? डजंट मेक एनी सेन्स. नुकसान वगैरे थांबेल हे तर वट्ट पटत नै.

In reply to by दशानन

जे विरोध करणार आहेत त्यांना "कास पठार" काय आहे हे तरी माहीत आहे का?
>>> मी गेली २८ वर्ष सातार्‍यात रहात आहे . कासला वर्ल्ड हेरीटेज डीक्लीयर करायच्या कित्येक वर्ष आधी पासुन झूलॉगी डिपार्टमेंटसोबत कित्येकदा कासची पाहणी केली आहे . २ वेळा कास तलावाला प्रदक्षिणा घातली आहे ( तेव्हा २ गवे आणि एक हरीण दिसले होते ) कास पठार ते महाबळेष्वर असा प्रवास एकदा चालत अन एकदा गाडीवरुन केला आहे . कासपठारावर दोन दिवस एक रात्र कॅम्पीग केले आहे ( १९ ऑक्टोबर २००१ उल्कावर्षाव होता तेव्हा . जस्ट फॉर नोट , तेव्हा कासचा बहर उलटुन गेलेला असतो.) कासच्या अलीकडे असलेल्या बंडापर्वतावर जाऊन साप सोडले आहेत. (तिथेच आमच्या सरांनी बिबट्या स्पॉट केला होता पण तेव्हा नेमका मी नव्हतो :( ) पर्यावरणप्रेमी असण्यासाठी नियमांची गरज लागत नाही ...निसर्गाविषयी प्रेम असणे काळजी असणे एवढे पुरेसे असते . आता जरा फोटो काढण्याच्या फी चे लॉजिकल एक्स्प्लेनेशन द्याल का ...असेल तर ?

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी तेथील ग्रामपंचायतीला जो काही खर्च येत असेल तो कसा मिळणार त्याना? बहुतेक प्रत्येक हिल स्टेशनवर पर्यावरण रक्षणाची काही फी असते. आपल्याला पार्यावरण तर उपभोगायचे आहे. पण त्यासाठी लागणार्‍या खर्चात सहभाग नको आहे. असा फुकटेपणा कशाला करायचा. कॅमेर्‍यासाठी चे शुल्क हे पर्यावरण रक्षणासाठीच वापरले जाणार आहे ना? मग त्याचा उगाच बाउ कशाला. महाबळेश्वर सारख्या हिलस्टेशन वर बरेच पर्यटक येतात. ते तेथे बराच खर्च देखील करीत असतात. त्यातला काही खर्च स्थानीक पर्यावरण रक्षण करणार्‍या संस्थेच्या मदतीसाठी दिले गेले तर काय बिघडले. ते देखील अत्यंत वाजवी.

In reply to by विजुभाऊ

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी तेथील ग्रामपंचायतीला जो काही खर्च येत असेल तो कसा मिळणार त्याना?
एखादे स्थळ जागतिक वारसा म्हणून फक्त जाहीर करायचे नसते तर त्यासाठी लागणारा पैसा आणि इतर गोष्टी देखील शासनाने पुरवायच्या असतात म्हणून ग्रामपंचायतीला जो खर्च होईल तो शासन देईल ना.
बहुतेक प्रत्येक हिल स्टेशनवर पर्यावरण रक्षणाची काही फी असते. आपल्याला पार्यावरण तर उपभोगायचे आहे. पण त्यासाठी लागणार्‍या खर्चात सहभाग नको आहे. असा फुकटेपणा कशाला करायचा.
आधीच लोकांकडून कररूपाने जो पैसा गोळा होतो त्याचं काय? तो पैसा अशा आणि अनेक कारणासाठीच वापरायचा असतो. आता खर्च होतो म्हणून परत फी लावायची हे पटत नाहीच. आणि हिल स्टेशनवर मिळणाऱ्या साऱ्या गोष्टी मध्ये हा कर आधीच अंतर्भूत असतो त्यात आमचा फुकटेपणा कसला. उद्या हिल स्टेशनवर शुद्ध हवा असते म्हणून माणशी ऑक्सिजनचा वापर किती होतो त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागले तर चालतील का?

In reply to by विजुभाऊ

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी तेथील ग्रामपंचायतीला जो काही खर्च येत असेल तो कसा मिळणार त्याना?
कसले संरक्षण? १. सदर पैसे कोणाला मिळतात? २. त्या पैशाचा विनियोग नक्की कसा होतो त्यासम्बंधी माहिती कोण देईल? ३. त्याचा भुर्दंड फक्त फोटोग्राफर्सनाच का हे समजले नही. घ्यायचीच असेल फी तर सगळ्यांकडून घ्या. फोटोग्राफी करणार्‍यांनीच असे काय घोडे मारले आहे?

नर्मदा नदीवर गुजरात मध्ये भरूच जवळ खूप मोठे धरण बांधले आहे. धरणाच्या जवळच एक बाग विकसित केलेली आहे. या बागेमधून धरणाचा अजस्त्र बांध दिसतो. येथे पूर्वी, इतर अशा जागी असतो तसा छायाचित्र काढण्यास मनाई असल्याचा, फलक होता . तो नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून काढून टाकण्यात आला आहे, कारण आता गुगल sight seer वापरून कुठल्याही ठिकाणाची कधीही पाहणी करता येते असे सांगण्यात आले.(गुजरात मध्ये बर्याच गोष्टी मोदींच्या नावावर खपतात).

जिथे जिथे वनविभागाची ताकद कमी आहे आणि संबंधित भाग जागतिक जैवविविध संरक्षित भागांमध्ये आहे तिथे स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने वनविकास समिती स्थापन करून संबंधित परिसराच्या कामासाठी, सुशोभीकरणासाठी प्रयत्न करणे आणि त्यातून स्थानिक रोजगार निर्मिती करणे असा उद्देश आहे. असे मॉडेल माथेरान,भीमाशंकर येथे यशस्वीरित्या राबविले जात आहे. यामध्ये उपद्रवशुल्क गोळा करणे, प्रवेश फी ,फोटोग्राफी साठीचे शुल्क ,वनविभाग देणगी शुल्क , दंडात्मक कारवाई शुल्क (दारू बिरू सापडली तर किंवा नियमभंग केल्यास) इ. चा समावेश आहे. येणाऱ्या पैश्यातून सूचना फलक, माहिती फलक, पठारावर आढळणाऱ्या विविध वनस्पती प्राणी ,पक्षी यांची माहिती देणारे फलक, प्रसाधन गृहे , विश्राम गृह , पर्यटकांना स्लाईडशो आणि फोटोस च्या माध्यमातून माहिती देण्यासाठी एक कायमस्वरूपी संग्रहालय, कास पठार फिरण्यासाठी प्रदूषणरहित छोट्या कार्स इत्यादी गोष्टी करण्यात येणार आहेत. वनमंत्री ,खासदार उदयनराजे,सातारा झेड पी आणि मुख्य वनसंरक्षक यांच्या समितीद्वारे येत्या ३ वर्षात ३ टप्प्यात १५ कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी जर कोणी जाऊन आले असतील तर कास तलाव भागातला दारूच्या बाटल्यांचा खच आणि कास पठारावरच्या दुर्मिळ फुलांवर लोळत बसलेले शेकडो कपल्स ज्यांनी पहिले असतील त्यांना या गोष्टी स्वागतार्ह्य वाटतील.

In reply to by मालोजीराव

तुम्ही म्हणता तसे येत्या काही वर्षात झाले कासला तर मस्त काम होईल. घरच्यांबरोबर कास पठार, कास तलाव, सज्जनगड, ठोसेघर, चाळकेवाडी अशी २ दिवसाची सहल करायचे मनात आहे. मित्रांबरोबर गेलेलो तेव्हा कास तलाव हा एक अत्यंत सुंदर पण ती जागा तितकीच धोकादायक वाटली होती.

उपद्रवशुल्क हा प्रकार सिंहगडावर ही आढळतो, आपला फुल्ल आक्षेप आहे या नावावर. म्हणजे शुल्क घेऊन लोकांना उपद्रव करण्यास स्वातंत्र आहे का ? प्रत्येकजण गडावर उपद्रव करायला जातो का ? कमीपणा देण्यासारखा प्रकार आहे. :(

खरेतर मोबाईल कॅमे-याला सर्वात जास्त शुल्क हवे. ही फक्त त्या वेळेपुरती हौस असते ख-या अर्थाने हेतू साध्य होईल. जास्त वसुलीचा आणि कमी नुकसानीचा... ;)

In reply to by आशु जोग

जोग साहेब, पण हे फोटो बोरिवली येथिल राष्ट्रीय उद्यानातील आहेत याचा इथे काय सम्बन्ध?

आज कासला चाललोय ...सविनय कायदेभंग आंदोलन करायचा मानस आहे ... बघुया मोठ्ठा ग्रूप असेल तर नक्कीच करेन :)

In reply to by प्रसाद गोडबोले

सगळी चर्चा वाचली. लोकांना गवत-फुलांवरती चालायची परवानगी देऊ नये पण फोटो काढायला बंदी घालणे/शुल्क लावणे योग्य नाही असे वाटते.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Kaas-Pathar-Val… चला बरं झालं .... यंदा पाऊसच उशीरा आल्याने कासचा बहर उशीरा येईल ...आणि नेहमी इतका येणार नाही ... :) बाकी हिशेब बघा , ३ लाख माणसे आणि उत्पन्न केवळ १८ लाख ... नुसत्या प्रवेशफी प्रत्येकी ५ रुपयेनेच १५ लाख व्हायला पाहिजेत गाड्यांचे पार्किंग फी १० रु . मोठ्ठ्या गाड्यांना २० - ५० रुपये . फोटो काढायला १० - ५० - १०० रुपये . शिवाय उपद्रव मुल्य वेगळेच !! कशाचाही ताळमेळ लागत नाही ! आय टेल यू सगळा झोल आहे झोल !!

In reply to by टवाळ कार्टा

अजून काहीच नक्की नाही हो. दोन वेळा जाणार आहे मी. एकदा फॅमिलीसोबत आणि एकदा मित्रांसोबत. पहिल्या वेळी डोळ्यात आणि दुसर्‍या वेळी कॅमेर्‍यात साठवायचे आहे कास पठाराला. :D

In reply to by नांदेडीअन

मागच्या आठवड्यात गेलो होतो... फारशी फुले नव्हती तेव्हा. यावेळेस सीजन्स हलले आहेत त्यामुळे बहर सुद्धा कमी आहे. आता पाऊस ओसरला आहे त्यामुळे बहुतेक नवरात्रीच्या आसपास पठारावर फुलांचे गालिचे दिसायला लागतील.

In reply to by थॉर माणूस

सध्या जाऊ नका . अजुन बहर आलेला नसेल . नवरात्रीत जावा , तेही वीकडेला . एरव्ही भयंकर ट्रॅफीक असते . मी परवाच बंडा पर्वतावर वर जाऊन आलो , यवतेश्वर मंदीराच्या आलीकडे आहे ... लय जाम थ्म्डी अन वारे आहे !

नवरात्र गुरूवारपासून आहे. (२५ तारीख) विकेंडमध्ये जत्रा असते म्हणून शुक्रवारी सकाळी लवकर (२६ तारखेला) आणि नंतर २ किंवा ३ ऑक्टोबरला जावे म्हणतोय.

पर्यटकांच्या गर्दीने कास पठार बहरले... जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठाराकडे आता परराज्यांतील पर्यटकांचा मोठा ओघ सुरू झाला आहे. विशेषत: सुट्टीच्या दिवशी पठारावर पर्यटकांची तोबा गर्दी होऊ लागली असून, यंदाच्या हंगामाला आता खर्‍या अर्थाने सुरुवात होत आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे फुले बहरू लागली असून, लवकरच पठार फुलांनी पूर्णत: आच्छादून जाण्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे. कास पठाराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर पर्यटकांचा प्रचंड ओघ सुरू झाला होता. आतातर परराज्यांतील पर्यटकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने फुले बहरण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. कास पठारावर पांढर्‍या व निळ्या रंगांची गेंदाची फुले, जांभळ्या रंगाची सीतेची आसव, गेंध, कापरू, गुलाबी रंगाचा तेरडा, नीलिमा आबोलिमा, तुतारी, हिरवी निसुरडी, सोनकी, रानवागं, पिवळा तेरडा, पंद, रानजिरे, सिरोपिया जेनी, मोरकरचुडी, कंदील पुष्प, वाईतुरा, रानहळद, भुई आम्री, स्मितिया बेगोनिया, मेंदी खरपुडी, हत्तीसोंड, भारंगा, टोपली कारवी, गारवेल, डिप कांडी, काळा गेंध, गौरीहार अशा नाना फुलांच्या छटा सध्या कास पठारावर पाहावयास मिळत आहेत. तसेच, पिवळी सोनकी, गुलाबी व पिवळा तेरडाही ठिकठिकाणी दिसू लागला आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचा ओघ कमालीचा वाढू लागला आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, कोकण, ठाणे, सातारा यांसह मध्य प्रदेश, हैदराबाद, केरळ, आंध्र प्रदेश, गुजरातसह विविध ठिकाणचे पर्यटक कास पठारावर हजेरी लावत आहेत. वन विभागाने पर्यटकांसाठी फुलांचा एक क्रमांकाचा ब्लॉक खुला केला होता. त्यामुळे अनेक पर्यटक आपल्या मोबाईल व अन्य कॅमेर्‍यांद्वारे फुलांच्या रंगछटा टिपताना दिसत होते. फुलांचे विविध रंग पाहून पर्यटकांना आपला मोह आवरता येत नव्हता. पावसाने उघडीप दिल्याने पठारावर विविध फुले फुलण्यास प्रारंभ झाला असून, येत्या आठ दिवसांत पठार आणखी बहरेल, असे वन विभागाने सांगितले.

मी ३-४ ऑक्टोबरला कास पठारावर जाऊन आले.. माणशी १०/- फीस आहे.. ती ऑनलाईनपण भरता येते.. मजा म्हणजे आपल्याला एक मेल येतो (ज्यातही नीटसे काही कळत नाही..)..त्यात तारीख वार काहिही लिहीलेलं नसतं.. त्यामुळे हे तिकिट कुठेही आणि कितीही वेळा प्रिंट करुन वापरता येऊ शकेल... अर्थात असे तिकीट काढुन आपण फकत तिथे १-२ मिनिटे वाचवतो.. आम्ही आदल्या दिवशी सातार्‍यात मुक्कामाला गेलो आणि ७ ला कास पठाराकडे निघालो.. त्यामुळे फारशी गर्दी नव्हती.. फुलंही फार नव्हती पण वातावरण छान होते एकदम.. तिथे थोडावेळ काढुन मग "कास-बामणोली" ला गेलो.. इकडे बोटिंग करता येते. अत्यंत सुंदर जागा आहे.. सकाळच्या वेळेस तर फारच शांत आणि थंड वाटते.. ७००-८००/- मध्ये आम्ही ५ जण १.५ तास बोटिंग करुन आलो. जवळच संगम आहे ३ नद्यांचा आणि दुसर्‍या बाजुला तापोळ्याला जाता येते.. आम्ही संगम आणि दत्तमंदिर पाहिले.. बोट तुम्हाला एका किनार्‍याला सोडते, तिथे गुहेमध्ये शंकराची मोठी पिंड आहे.. वर काळ्या दगडात बनवलेला सुंदर नंदी आहे. गणपतीचेही एक मंदिर आहे... दाट झाडी, समोर पसरलेलं पाणी... शांतता... फार छान वाटतं... परतताना कास पठारावर चांगलीच गर्दी झाली होती.. शिवाय ऊनही खुप वाढले होते.. त्यामुळे भल्या सकाळीच कास पठारावर जाणे उत्तम... जमल्यास फोटो टाकीन...

In reply to by पिलीयन रायडर

डिसेंबेर महिन्यात कास पठारावर जाणे योग्य राहील का..? तसेच ठोसेघर धबधब्या बद्दल काही माहिती असेल तर सांगा..

In reply to by Gayatri Muley

ठोसेघर मी आत्ता पाहुन आले.. पण फारसं पाणी नाहीये सध्या.. त्यामुळे जरा हिरमोड झाला... फुलांच्या बहराबद्दल मला माहिती नाही.. उलट इथे कुणी सांगु शकत असेल तर मला परत जाता येईल...