✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बारीक

म
मृत्युन्जय यांनी
Mon, 07/15/2013 - 14:43  ·  लेख
लेख
बारीक गेला. उणेपुरे ३२ वर्षे म्हणजे काही जाण्याचे वय नव्हते तरी गेला. दुपारी साडेतीन ला मीत्याच्याशी बोललो आणि साडेपाचला बारीक गेलाही होता. त्याच्या जाण्याचे दु:ख आहेच पण याचे जास्त दु:ख आहे की जगातुन एका चांगल्या माणसाने कायमची एक्झिट घेतली. वयाची ६० - ७० वर्षे जगाला ओरबाडुन झाल्यावर कॅन्सर होउन सुद्धा नको ती माणसे दशक २ दशक आरामात ओढतात आणि कोणाच्या अध्यातमध्यात नसणारा एक सामान्य माणूस २ तासात इहलोक सोडतो. देव आहे आणि तो नेहमीच सगळ्यांचे भलेच करतो, जो होता है अच्छे के लिये होता है वगैरे वगैरे सगळे पटत असुनही बारीकच्या जाण्याने त्याचे किंवा इतर कोणाचे काय भले झाले किंवा होणार आहे ते कळत नाही. वास्तविक बारीक हे काही त्याचे खरे नाव नाही. त्याची शरीरयष्टी लक्षात घेता त्याला पाडलेले हे त्याचे टोपणनाव. बारीक म्हटल्यावर जे काही डोळ्यासमोर उभे राहते त्या परिस्थितीशी सुतराम संबंध नसणारा. ५ फूट ९ इंच उंची, वजन काट्यावर उभा केल्यास दीडशतकाचा टप्पा ओलांडणारा काटा, डेव्हिड बून सारखी राखलेली भरघोस चहा साखर मिशी आणि अधुन मधुन राखलेली फ्रेंच बियर्ड या सगळ्या वर्णनातुन डोळ्यासमोर उभा राहणारर्‍या माणसाला बारीक म्हणुन हाक मारणे ही शुद्ध चेष्टा होती. आणी ती आम्हीच करायचो. ती खिलाडुवृत्तीने घेण्याची क्षमता केवळ बारीकमध्येच होती. आम्ही पहिल्यांदा भेटलो एका मित्राच्या घरी. वय वर्षे १५ असताना. त्याकाळी सायकल हा एक चर्चेचा विषय होता. पोटाचे टायर पंक्चर करण्यासाठी सायकल चालवणे हा उत्तम उपाय यावर चर्चा चालु होती. "मी सीट वाढवुन घ्यायचा विचार करतो आहे. चांगला व्यायाम होइल" अशी मताची पिंक टाकल्यावर बारीक महाशय, जे तेव्हाही शतकी टप्प्याच्या आतबाहेर होते, आणि वजन कमी करणे याप्रकरणाकडे गांभिर्याने न पाहणारे होते, आमच्या पार्श्वभागाकडे बघुन "सीट अजुन वाढवुन घ्यायची म्हणतोस?" असे उद्गारले होते. विषय वजन नियंत्रण आणि सायकलच्या सीटवरुन भलतीकडेच केव्हा वळला हे कोणाला कळालेच नाही. विषय भलतीकडेच कसा वळवायचा हे बारीक कडुन शिकण्यासारखे होते. हा प्राणी स्पष्ट शब्दात सांगायचे तर शुद्ध छळवाद होता. 'पाळायचा असेल तर माणसाने कुत्रा पाळावा, वेळ ही काय पाळायची गोष्ट आहे' हे त्याच्या जीवनाचे सूत्र होते. परीक्षेला तो वेळेवर यायचा ते केवळ परीक्षकांवर उपकार करण्याच्या उपजत सदसदविवेकबुद्धीने. एरवी तो वेळेवर आल्याची कुठलीही घटना कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीला (तो धरुन) माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. याच्यामुळे रात्रीचे जेवण ८ च्या ऐवजी १०.३० ला केल्याची कैक उदाहरणे आहेत. वरती हा शांतपणे सगळ्यांना सांगणार अर्रे जरा इमेल करत होतो. त्याच्या या इमेल प्रकरणामागे फिमेल आहे हे आम्हाला जरा उशिराने उमगले. त्या फिमेल ला भेटायला याला एकद मुंबैला जायचे होते. त्याच्याच कॉलेजमधली होती. पण पुण्याहुन मुंबैला फक्त एक मित्र खास भेटायला आला हे होणार्‍या सासू सासर्‍यांना नीटसे पचणार नाही असा विचार करुन बारीकने अजुन एका मित्राला मुंबैला येण्यासाठी तयार केले. हा तयार करणे हा एक भाग असायचा. बारीकचे पाल्हाळ ऐकण्यापेक्षा बर्‍याचदा समोरचे माणूस आधीच हत्यार टाकणे पसंत करायचा. या केसमध्ये बारीकने मित्राला फ्याशन स्ट्रीट वर खरेदी करण्याचे आमिष दाखवले. आणि मग भलत्याच फॅशन स्ट्रीट वर नेउन थोड्यावेळात काम आटोपले आणी मग रस्ता नीट माहिती करण्याच्यी मिषाने मैत्रिणीच्या घरी अंबरनाथला पोचला. मित्राला फक्त डेक्कन क्वीन ने जाण्यायेण्याचाच रस्ता काहिसा नीट समजला. बाकी फॅशन स्ट्रीट आणि अंबरनाथ जवळ जवळ नाहित हा त्याचा गैरसमज दूर होण्यापुर्वी बारीकचा साखरपुडा (अंबरनाथशीच) उरकला होता. अर्थात हा केवळ एकच प्रकार असा होता ज्यावेळेस त्याचे मित्र त्याच्यावर चरफडले असे काही नाही. बारीक मध्ये काही उप्द्व्याप इन बिल्ट होते. ते टाळणे कधीच शक्य व्हायचे नाही. कारण दूसर उपायदेखील नसायचा. खिशात १०-२० रुपये असले तर मिशीला तूप लावुन फिरायचे दिवस होते ते. त्यात बरेच काही भागवायला लागायचे. भक्त प्रल्हाद पाहण्याची हौस देखील. पिराब्लेम असा होता की त्याकाळी काही आजच्यासारखे नेट नव्हते. म्हणजे होते तसे पण परवडायचे नाही आणि बर्‍याचदा गोगलगायीच्या गतीने पुढे सरकायचे. त्यामुळे ज्ञानाजर्नाचा राजमार्ग बाबा व्हिडो पार्लर मधुन जायचा. तिथे जाउन भक्त प्रल्हादच्या कॅसेटी मिळवण्याचा आमच्यापैकी कोणाच्याच **त दम नव्हता. बारीक मात्र मंडईत जाउन ताजे सफरचंद निवडावेत त्या सहजपणे चांगली प्रिंट निवडुन आणायचा. मंडईत भाजीवाल्याला लाडिक दम देतात तसा दमही द्यायचा 'बघा चांगाली नसेल तर पैसे नाही देणार' म्हणुन. समोर व्हिडो पार्लर मध्ये बाबा नसुन बाबी असेल तरी बारीक त्याच निर्विकारपणे काम तडीस न्यायचा. त्यामुळे ज्ञानर्जनासाठी त्याला शरण जाणे भाग पडायचे. त्यात प्रॉब्लेम काहिच नव्हता. खरी मेख अशी असायची की एक कॅसेट आण म्हटल्यावर बारीक ३-४ घेउन यायचा. खिशातले ५- १० रुपये आणी हातात असलेला २-३ तासाचा वेळ याचा मेळ ४ क्यासेटशी कसा जोडायचा ही अडचण असायची. आमच्यासाठी खिषाचे वजन आणि बारीकसाठी क्वांटिटी महत्वाची ठरायची. मग तु नेहमी असेच करतो. आता सगळे पैसे यातच जाणार अशी कडकड व्हायची बारीकवर शून्य परिणाम व्हायचा कारण ३ तासातला अमूल्य वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही हे जाणुन भक्तगण आराधनेच्या मागे लागण्यात जास्त रस घेत आणि बारीकच्या आगाऊपणावर लवकर पडदा पडायचा. पुढच्यावेळेस ये रे माझ्या मागल्या व्हायचे. बारीकची अजुन एक त्रासदायक सवय म्हणजे लेक्चर देणे. त्याची आई त्याच्या लहानपणीच गेली. वडील देखील थकले होते. त्यामुळे बारीकवर घराची जबाबदारी पडली. तो वेळेआधीच पोक्त आणी समजूतदार झालो. आम्ही नव्हतो कदाचित. त्यामुळे तो सगळ्यांना बहुतेक सगळ्या बाबतीत लेक्चर झोडायचा. समोरचा माणूस ऐकण्याच्या मनस्थितीत नसताना स्वतःचे मत त्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करायचा. कधीतरी मग आम्ही त्याला विचारायचो "तु त्या अमक्याला ---- असे म्हणालास? त्याला समज नाही असे म्हणालास" . बारीकही त्याच शांतपणे उत्तरायचा "अर्रे हो. मग? काही चुकीचे बोललो का?. तो खरंच बालीश आहे अर्रे" आता या युक्तीवादावर फारसे प्रत्त्युत्तर नसायचे कारण बहुतेकदा बारीक बरोबरच बोलत असायचा. पण 'कटु सत्य कदापि बोलुन दाखवु नये' हे बारीकला कधीच झेपले नाही. "तुला कळत नाही" हे त्याने आम्हाल सगळ्यांनाच ऐकवले होते की 'बारीक सर्वज्ञ आहे. आपल्याला काय कळते' असे त्याच्यामागुन आम्ही बर्‍याचदा कुत्स्तितपणे बोलायचो. त्यामागे त्याची कळकळ आहे हे तो ज्याल लेक्चर द्यायचा त्याला सोडुन सगळ्यांना कळायचे पण लेक्चर घेणार वैतागायचा आणि कधी ना कधी तो सगळ्यांनाच लेक्चर द्यायचा त्यामुळे अधुन मधुन सगळेच वैतागायचे. याची भरपाई मग आम्ही अधुन मधुन त्याच्या बासरी वाजवण्याच्या सवयीवर लेक्चर देउन करायचो. विषय घुमवण्याच्या असामान्य ताकदीच्या जोरावर तिथेही तो आम्हाला भारीच पडायचा. असे असुनही कोणाला काही काम पडले तर सगळ्यात पहिल्यांदा कोणालाही त्याचीच आठवण यायची. कुठलेही काम त्याने आधी केले नव्हते असे नव्हतेच. युनिव्हर्सिटीत जाउन फॉर्म आणणे, लायसेंस काढणे, सरकार द्फ्तरातुन कामे करुन घेणे याबाबत बारीकला आश्चर्यकारक माहिती होती आणि त्याने कधी कोणाला मदत करायला नकार दिल्याचे ज्ञात नाही. काही कामानिमित्त एकदा पुणे विद्यापीठात जायचा योग आला तेव्हा त्याच्या असामान्य लूनावर मला बसवुन सिंबायोसिसचा गड चढुन त्याने मला स्वखर्चाने विद्यापीठात नेउन आणले. बारीक आणि मी असे दोघेही लूनावर बसुनही ती लूना केवळ बारीकची लूना असल्याच्या पुर्वपुण्याई वर तो गड चढुन गेली असावी. यथावकाश बारीक आणि आम्ही सगळे वेगवेगळ्या वाटेने शिक्षण पुर्ण केले. आम्ही रटाळ अकाउंट्सची मनधरणी करत राहिलो आणी तो मात्र त्याच्या आवडीच्या विषयात म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट मध्ये घुसला. लहानपणापासुनच खाण्यापिण्याची आवड (जी प्रथमदर्शनीच जाणुन यायचीच म्हणा :) ) आणि हातचे वळण या पुण्याईवर बारीक चांगलाच उस्ताद शेफ झाला. बारा गावचे पाणी पिउन तो त्यातुन फूड स्टायलिंग आणि फूड फॉटोग्राफी मध्ये कसा घुसला राम जाणे. आम्हाला केवळ त्याच्यावर रसना प्रसन्न आहे हे माहिती होते. हे फूड स्टायलिंग वगैरे सगळेच आम्हाला नविन पण त्यातही त्याने मास्टरी घेतली हे त्याच्या कामाकडे बघुन जाणवायचे. त्याला पोचवायला आलेल्या त्याच्या क्षेत्रातल्या दादा लोकांच्या तोंडुन ऐकले तेव्हा जाणवले की बारीक भलताच निष्णात होता. एरवीही आम्हाला ते कळायचे पण वेगळ्या प्रकारे. कुठल्याही हॉटेलात गेलो की बारीक वेटरचा आणि कॅप्टनचा क्लास घ्यायचा. ताफ्तान तुमच्याकडे कसा बनवतात किंवा ढमक्या पदार्थात हे घालता का किंवा तमकी ग्रेव्ही येल्लो असते की रेड, तुमच्याकडच्या कॉफीला याकारणाने फेस नाही आला वगैरे वगैरे गोष्टींवर तो बोलायला लागला की असे व्हायचे की अर्रे बारीक आधी त्याला ऑर्डर घेउन तर येउ देत. एकदा हातगाडीवरच्या सँडविचवाल्याला साहेबांनी ब्रेड आणी बटाटे कसे कापावेत याचे मौलिक ज्ञान दिले. ते ऐकुन तो इतका प्रभावित झाला की त्याने लगोलग बारीकला विचारले "तुम्ही तुमची गाडी कुठे लावता?" बारीकने खरोखर गाडी लावली असती तर बिचारे सगळे सॅंडविच वाले झोपले असते एवढी चांगली सेंडविचेस त्याने नक्कीच केली असती. इतका वैताग आणणारा प्राणी असुनही तो आम्हा सग्ळ्या मित्रांमधला दुवा होता. फेविकोल इतक्या घट्टपणे त्याने आख्खा ग्रुप सांधला होता. आम्हा इतर सगळ्यांचे एकमेकांशी बोलणे होवो न होवो बारीक सगळ्यांच्या संपर्कात असायचा. कोणी नौकरी बदलली, कोणाचा वाढदिवस आहे, कोणाच्या आईवडिलांची तब्येत कशी आहे हे सगळे बारीकला बरोबर माहिती असायचे. जेव्हा जेव्हा त्याला भेटलो तेव्हा तेव्हा तो एकदातरी काही कारणाने खोकला येइस्तोवर गडगडाटी हसायचा. कोणाची तरी खेचत बसायचा आणि परत जाताना किंवा पुढच्यावेळेस भेटताना कडकडुन मिठी मारुन सगळे मिटवुन टाकायचा. याबाबतीत तो कधीच उशीर करायचा नाही. त्याला पोचवायला आलेल्या दर दुसर्‍या माणसाचे म्हणणे होते की "अर्रे काल तर त्याचा फोन आला होता " , "काल तर त्याच्याशी बोललो" , "उद्या आम्ही भेटणारच होतो". आता मित्रांची खबर ठेवण्यासाठी आम्हालाच सगळ्यांशी बोलण्याचे कष्ट घ्यायला लागणार. अन्यथा आघाडीचा समन्वयकच गेल्यावर आघाडी टिकणार कशी? आम्ही नेहमी बारीकला उशिरा येण्यावरुन डिवचायचो, ओरडायचो. जगातुन एक्झिट घेताना त्याने वेळ खुप आधीची गाठली. गेले ३ महिने मी त्याला भेटलो नव्हतो. फोनवर बोलणे झाले तेवढेच मी जेव्हा वरती पोचेन तेव्हा विचारेन त्याना 'मिस्टर बारीक एवढी घाई कसली होती ? अजुन ५०-६० वर्षे तुमच्यामुळे उशिरा डिनर घ्यायची तयारी होती की आमची'. बारीक तेव्हाही बहुधा गडगडाटी हसेल आणि कडकडुन मिठी मारेल बहुधा. टिल देन यु आर नॉट एक्स्युज्ड मि. बारीक. बादवे बारीकचे नाव मी सांगितलेच नाही. सांगणारही नाही. ते महत्वाचे नाही. कारण बारीक तुमच्याही अवती भोवती कुठेतरी असेल. असेल तर त्याला ओळखा. आणि इतक्यात त्याला भेटला नसाल तर भेटा. कधी खुप उशीर होइल् सांगता येणार नाही. आणि फक्त हळहळत बसणे ही बारीकसाठी खुप फुसकी श्रद्धांजली असेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
अनुभव

प्रतिक्रिया द्या
12513 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

:(

बोका-ए-आझम
Sun, 07/17/2016 - 09:23 नवीन
:(
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा