✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आम्हा घरी धन..

म
मोदक यांनी
Sun, 05/26/2013 - 12:53  ·  लेख
लेख
राम्राम मंडळी. खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया. लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या. मी सुरूवात करतो.. ******************************************************** गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन... ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत. आकाश आपल्यावर प्रसन्न असलं, कीं तिथून समुद्ररेखा दिसू शकते. सूर्य अस्ताला जात असावा, उतरता उतरता तो क्षितिजाशी टेकावा, त्या क्षणी थेट पश्चिम क्षितिजाशी सूर्यप्रकाशानं चकाकणारं सागरजळ दिसतं. अनेकदां ते पाहिलंही आहे. अर्थ असा, की थेट समुद्रापासून रायगडावेरी कशाचीही अटक नाही. समुद्रावर गर्दी करून जमलेला मेघांचा समूह पूर्वेच्या दिशेनं चालून येवू लागला, की त्याला आढळतो रायगड. एखाद्या प्रचण्ड चौरंगासारखा. अन् मग तो असा बरसू लागतो की सांगता पुरवत नाही. लोटावर लोट चालून येतात. ते थांबतच नाहीत. येतात आणि गडाच्या माथ्यावर कोसळतात. त्यांच्याबरोबरच येते धुई. ती सगळा डोंगर आपल्या कवेत घेते. हातावरचं कांही दिसत नाही. अगदीं आपल्या नाकाचा शेंडादेखील. त्या दिवसात धनगरं आपापल्या झापांमधून रानशेण्यांची शेकोटी करून तासन् तास तापत बसतात. इकडे पाऊस धुवांधार कोसळत असतो, तों तों धनगरं मात्र प्रसन्न होत असतात. कारण असा मोप पाऊस बरसला, की गड हिरवागार होणार असतो. त्याची म्हसरं अन् गावल्या भरपूर जोगावणार असतात. कासंड्या भरभरून दूध देणार असतात. तर त्या धनगरांशेजारी बसून एकीकडे शेकत, दुसरीकडे त्याच्या चौकश्या करीत बसणं इतकं सुखाचं असतं, म्हणून सांगू! त्यांच्यापास हवा तेवढा वेळ असतो. ती मोकळी झालेली असतात. भरंवसा निपजलेला असतो, कीं हा परदेशी पाहुणा आपला मित्र आहे. सखा सुहृद आहे. असं अंतर हरपलेलं असतं. मग ती नाना परींचं बोलत असतात. सुखाचं. दु:खाचं. प्रापंचिक चिंतांचं. गाईम्हशींचं. त्यांच्या वेतांचं. दुधाचं. तें सगळं ऐकून वाटू लागतं, की आपण आपल्या भोंतीचा प्रपंच म्हणजेच सगळं विश्व असं गृहीत धरतो, ते किती चूक आहे! मात्र हे ध्यानी येण्यासाठींही असं त्यांच्या पोटात शिरावं लागतं. त्यांच्या मनी भरंवसा निपजूं द्यावा लागतो. किंवा धर्मशाळेतल्या खोलींत चिप्प बसून असावं. नगारखान्याच्या ओवर्‍यात हात पाय पोटाशी घेवून बसावं. जगदीश्वराच्या देवळांत आसरा घेऊन पावसाचं चण्डनृत्य आनभवीत असावं. ध्यानी येवू लागतं, की पावसाच्या या धारानृत्यालाही एक ताल आहे. कधी तो धुमाळीचं बोट धरून बरसतो. कधी एकतालाच्या ठोक्यांत खाली उतरतो. कधी त्या धारांच्या त्रितालाचा ठेका सुरू असतो. चहुंकडून घेरून येणारं धुकट कुंद असतं. स्वत:वेगंळं काहीही दिसत नाही. कशाचंही भान नसतं. त्यात हा ताल असा कांही अंगी भरतो, की सांगता पुरवत नाही. हळूं हळूं पाऊसधारा उणावू लागतात. धुकट विरूं लागतं. कमींत कमी दिवसांतले कांही तास तरी मग बाहेर पडावं. पायांतळी वाहाणारे इवलाले वहाळ वलांडीत चहूं दिशा भटकावं. टकमकावर जावं. दिसली, तर तळातली शोभा पाहावी. काळ दुथडी भरून वाहात असते. पुन: धुकटं झाकोळून येतात. मग माघारे वळून, पायांतळी सांचलेल्या डबक्यांतलं पाणी उडवत गंगासागरावरून बालेकिल्ल्यात शिरावं. नगारखान्याबाहेर पडावं, बाजारपेठेत शिरावं. पावसधारांनी काय कवतिक केलं आहे, ते ध्यानी येवू लागतं. तें पाणी भुईचं कवच भेदून आत शिरलं. कड्यांची आवरणं भेदून आत घुसलं. त्या कवचा-आवरणाखाली गतवर्षी उन्हाळ्यांत वाळून कोळ झालेली तृणबीजं सुरक्षित असतात. तें पाणी त्यांच्या भंवताली गोळा होतं. त्यांना गुदगुल्या होतात. ती फुगतांत. टरारतात. अंग ठसठसू लागतं. मग तें वरील बाजूनं फुटतं. एक नाजूक लवलवता कोंब बाहेर येतो. पोपटी रंगाचा. तो भुई-कडा भेदून वर उठतो. मोठ्या नवलानं भंवताल न्यांहाळू लागतों. एक. दुसरा. तिसरा. सहावा. दहावा. शंभरावा. हजारावा. अन् पाहतां पाहतां अवघं धरतीमंडळ हिरव्या सौंदर्यानं बहरून येतं. सगळे डोंगर, दरे, कडे, दरकुटं, ओघळी, घळी, लवणं असं सगळं चिरतरूण होऊन जातं. महिन्या दीडमहिन्यात तृणपुष्पं आपले डोळे विस्मयानं उघडीत आकाश न्याहाळूं लागतात. सोनावळी धुमारते. तेरडा उंच उंच उठूं लागतो. त्याला कळे फुटतात. ती अनाम तृणपुष्पं, ती सोनावळी, ती तेरड्याची फुलं, असा काही विलक्षण रूपगौरव डोंगरभर दाटतो म्हणून सांगू! पायातळी असा वनपुष्पांचा गालिचा अंथरलेला असतो, आणि आपण विराण्या देशींच्या राजपुत्रासारखे त्या रूजाम्यावरून अवशेष धुंडाळीत हिंडत असतो... ********************************************************
  • आम्हां घरी धन... (२)
  • आम्हां घरी धन.....(३)

Book traversal links for आम्हा घरी धन..

  • आम्हां घरी धन... (२) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
वाङ्मय
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
87444 वाचन

💬 प्रतिसाद (172)

प्रतिक्रिया

संपलो संपलो!!

आदूबाळ
गुरुवार, 05/30/2013 - 01:47 नवीन
संपलो संपलो!! :)) :)) दुवा... दुवा... असाच एक श्री श्री टारझनभौ यांचा प्रतिसादः
परवाच मी पुण्याला चाललो होतो .. बाईकवर .. तोच रस्त्यात मला एक गाय दिसली , तिने मला हाय केले .. पण मला घाई असल्याने मी तिला बाय म्हंटले , म्हणतात ना "जिसका टोपी उसका डिजे " . पण झाले काय ते माहित नाय , तिला आला राग .. तिने उगारली शिंगं माझ्यावर पण मी ही तयारीतंच होतो , तिला समोरुन चाल करुन येताना पाहुन मी माझं जॅकेट काढलं , आणि जरा वॉर्म अप केलं , शेवटी म्हंटलं च आहे "आंधळा दळतो आणि गणपा चिकन तंदुरी बनवतो " . तो गाय अजुंनंच चेकाळली आणि जोरात माझ्या रोखाने येऊ लागली .. मग मी सुमारे २०१ जोर आणि बैठका आलटुन पलटुन मारल्या , आता माझी बॉडी दबंग मधल्या सलमान खान सारखी फुगत होती नव्हे फुगलीच .. माझं टिशर्ट अगदी फाटलाच जसे "भित्र्या पाठी ब्रम्हराक्षस आणि नाना पाठी संपादक " तसेच अगदी . एक हवेचा झोका आला तोच मला चौकट राजा ह्या अप्रतिम सिनेमातले "एक झोका ... एक झोका .. चुके ... काळजाचा ठोका एक झोका " हे बालगीत आठवले त्यावरुन मला कोणीतरी नुकताच बालगितांचे आवाहन करणारा धागा काढल्याचे आठवले , हे सगळं मला एका सेकंदाच्या एक हजार दोनशे चाळीस (अंकी १२४१) वेळा आठवलं पण अक्षरात माझा एक लिहायचा राहिल्या , त्यामुळे बँकेने मला ५० रुपये चार्ज केले आणि माझी घोर अशी फसवणुक केली . त्याबद्दल मी बँका कशी फसवणुक करतात या धाग्यावरचा एक प्रतिसाद आठवुन हसत सुटलो तशी ती गाय मला वेडा समजली आणि ह्याच्या शी पंगा घेण्यात आपलंच नुसकान हाय हे तिला उमगले .... पण तोवर उशीर झाला होता ... म्हणतात ना " काळ आला होता पण नळाला पाणी नव्हतं ! " तसंच काहीसं . गायी चे अँटिलॉक डिस्क ब्रेकिंग फेल झाले आणि ती माझ्या अंगावर येउन आदळनार तोच मी पटकन मागे जाऊन तिचं शेपुट धरलं आणि अशी हॅलिकॉप्टर सारखी फिरवली .. अशी फिरवली ... की तिला चश्मा च लागला , म्हणतात ना "काखेत कळसा आणि गाई ला चश्मा " . तसं तोच गाई चा मोबाईल वाजला .. मोबाईल वर आलं "दुबैचा शेख कॉलींग .. दुबैचा शेख कॉलींग .. " गाई ने मला माझ्या आयडी चा वास्ता दिला तेंव्हा माझा राग मी आवरता घेतला , पण तरीही तिला मी असं सोडणार नव्हतो .. " डोक्यात शिंग असणारी ... " ह्या नव्या लेखमालेत तिच्यावर लेख पाडणारंच होतो .. शेवटी तिने ही मान्य केले संत कोदाराम आपल्या अभंगांत म्हणतात तेच सत्य . "दुबैचा मित्र बोले तास भर .. बोले भारंभर ... कोदा म्हणे " असा अनुभव कोणाला आला असेल तर बोला , त्याच्या खरडवहीत " तुम्ही जोहार आहात " असं मोठ्या अक्षरात लिहील्या जाईल . smiley - विडीफुकु
या एका प्रतिसादातच मी टारझनभौंचा "फॅण" झालो :))
↩ प्रतिसाद: मोदक

खपलो

सुधीर
Fri, 05/31/2013 - 22:36 नवीन
काय भारी कल्पनाशक्ती आहे. हहपूवा :)
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ह पु वा

चौकटराजा
Sat, 06/01/2013 - 08:58 नवीन
हसून हसुन पोटाची पुरती वाट लागली !!!
↩ प्रतिसाद: आदूबाळ

इस्पीकचा एक्का

मोदक
Sat, 06/01/2013 - 12:53 नवीन
इस्पीकचा एक्का
एकदा एक गुरू शिष्याबरोबर दुसर्‍या गावी चालला होता. रस्त्यात एक नदी लागली आणि गुरु-शिष्य पाणी प्यायला पाण्यात उतरले. त्या पाण्यातून एक विंचू वाहताना गुरूने पाहिला. त्याने भूतदयेने त्याला ओंजळित उचलून काठावर न्यायला सुरुवात केली. अर्थातच विंचवाने गुरुच्या हाताला दंश केला आणि तो परत पाण्यात पडला. गुरूने त्याला परत उचलले, परत विचवाने दंश केला आणि तो पाण्यात पडला. असे तीन चारदा झाल्यावर गुरू त्या विंचवाला काठावर आणण्यात यशस्वी झाला. शिष्य हे सगळे विस्मयाने पाहात होता. तो गुरूला म्हणाला, "गुरुजी, एका क्षुद्र जीवाकरिता तुम्ही हे काय करत होता? हा वेडेपणा नाही का?" गुरु म्हणाला, "एक क्षुद्र जीव जर त्याचा नांगी मारण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही तर सर्वोत्तम जीव समजल्या जाण्यार्‍या माझ्यासारख्या माणसाने माझा मदत करण्याचा चांगला गुणधर्म का सोडावा?"
↩ प्रतिसाद: आदूबाळ

भटक्याराव..

चिगो
Wed, 05/29/2013 - 21:30 नवीन
भटक्यारावांनी जो लिहीलाय तो
गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे !
माझ्या माहितीप्रमाणे गोनिदांच्या "दुर्गभ्रमणगाथा" मधला उतारा आहे..
↩ प्रतिसाद: मोदक

धन्यवाद मित्रा..

चिगो
Wed, 05/29/2013 - 20:53 नवीन
धन्यवाद, मित्रा.. तुझ्यासारख्या जुण्या-जाणत्या मिपाकरानं माझं काहीतरी चोप्य-पस्ते करावं, ह्यातच सारंकाही आलं.. सुशिभक्ती अजूनही सुरु आहे.. फक्त आता बोलत नाही, वाचतोय.. मेघालयात ये, भटकंतीसोबतच ४-५ दिवसतरी बाहेर पडणार नाहीस एवढी "सुशिंभक्ती" मांडतो.. ;-) सध्याचा काऊंट ३४-३५ असेल.. आता मुळ धाग्याबद्दल.. धागा श्रीमंत होतं चाललाय. मलाही "कणा" ही कविता खुप आवडते.. सुरेश भटही आवडीचे. त्यांच्या काही ओळी माझ्या खवत पर्मानन्ट विराजल्या आहेत.. धाग्यावर हिंदी कविताही चालताहेत, हे बघून केलेली ही गुस्ताखी.. "मैनें उसके हाथोंसे सबकुछ छुटतें हुए देखा है लोगोंको उसके वजूद को, नोंचतें खसोंटते हुए देखा हैं.. कहतें हैं, वो देवताओंसेभी बढकर होती हैं मैंने तो उसको अपनोंकेही पैरोंमें घसीटते हुए देखा हैं दिल में जमानेभर क प्यार लिए उसें आलिशान बंगलोंके कोनों में, सिमटते हुए देखा हैं देखा हैं उसे, अपने ही बेटों के बीच युं बटते हुए मैनें इक मां को, बिखरते हुए, टूंटते हुए देखा है.."
↩ प्रतिसाद: सुहास..

मैनें इक मां को, बिखरते हुए, टूंटते हुए देखा है...क्या बात है!

बहुगुणी
Wed, 05/29/2013 - 22:01 नवीन
अप्रतिम, चिगो! या हिंदी ओळी कुणाच्या आहेत?
↩ प्रतिसाद: चिगो

पाठपुरावा केला म्हणून कळलं...

बहुगुणी
Fri, 05/31/2013 - 07:15 नवीन
पाठपुरावा केला म्हणून कळलं की या ओळी चिगो यांच्याच आहेत! बहोत खूब!
↩ प्रतिसाद: बहुगुणी

चिगो हे कवीही आहेत तर म्हणजे!

बॅटमॅन
Fri, 05/31/2013 - 13:04 नवीन
चिगो हे कवीही आहेत तर म्हणजे!!!! भारीच कविता एकदम :)
↩ प्रतिसाद: चिगो

ओतुरचं जग ('दीपावली' दिवाळी २००६)

इनिगोय
Wed, 05/29/2013 - 19:43 नवीन
ओतुरचं जग ('दीपावली' दिवाळी २००६) - अनिल अवचट ओतूरला दुष्काळ पडतो का? त्या काळात मला कधीही नदी आटलेली आठवत नाही. बारा महिने वाहणारी नदी होती. आमच्या आडाचं पाणी आटल्याचं आठवत नाही. पण तरीही दुष्काळाची एक आठवतेय घटना, आमच्याच घरात पाहिलेली. सकाळी उठून आम्ही खाली आलो, तर आजी, वडील, आई बोलत उभे. काय झालं? चोरी झाली. चोर मागच्या भिंतीवरून उडी मारून आले. आणि काय चोरलं? तर रात्रीचं उरलेलं जेवण जेवून गेले! ते इतके सभ्य की जाताना ते ताट-वाटी घासून गेले होते. भिंतीच्या कडेला उभी दोन पितळेची कल्हईची ताटं मला आजही आठवतात. आजी म्हणत होती, उपाशी होती गं माणसं. मला माहीत असतं तर आणखी ठेवलं असतं अन्न. असा जमाना, जिथे चोर होते सभ्य.

अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद

किसन शिंदे
Wed, 05/29/2013 - 20:34 नवीन
अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्री जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारही तितकाच उग्र आहे. पौरूषाचा मुर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री. त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरूषी आहेत. त्याचे खेळणे-खिंदळणेही पुरूषी आहे. त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्री हा ज्वालामूखीचा उद्रेक आहे. अति प्रचंड, अति राकट, अति दणकट अन काळाकभिन्न. रामोश्यासारखा!! पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो. आडदांड सामर्थ्य हेच त्याचें सौंदर्य. तरी पण कधी काळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजुक लेणी घातली. त्याच्या आटीव अन पिळदार देहाला कुणाची दृष्ट लागू नये, म्हणून मराठी मुलखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या. त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला. मनगटांत किल्ले-कोटांचे कडीतोडे घातले. सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरी तो दिसायचा तसाच दिसतो! रामोश्यासारखा! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा!! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही. डोळेच फिरतात! मुसळधार पावसांत तो न्हाहू लागला की, त्याच्या खांद्यांवरून धो धो धारा कालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणें, खिदळणें ते! बेहोष खिदळत असतो. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ राजाशिवछत्रपती या बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकात अजिंक्य सह्याद्री या प्रकरणात सह्याद्री जे अप्रतिम वर्णन केलंय त्यातलाच हा थोडासा भाग! माझा अतिशय आवडता!! बाबासाहेबांनी सह्याद्रीला दिलेली तालमीच्या मातीतून अंग घुसळून आलेल्या रामोश्याची उपमा एकदम चपखल. पौष माघाची थंडी सरली कि फाल्गुनातल्या होळीनंतर सह्याद्री आपला राकटपणा धारण करायला सुरूवात करतो ते वैशाख वणवा संपेपर्यंत. जेष्ठात काळ्यासावळ्या मेघांनी भरून आलेलं आभाळ त्याच्या कडेकपार्‍यांत धो धो कोसळलं की सह्याद्री आपला राकटपणा विसरून हिरव्या पोपटी रंगाची झुल पाघंरायला सज्ज होतो. या सह्याद्रीवर कितीही आणि कोणीही लिहलं तरी ते कमीच! 'गोनीदां' नंतर बाबासाहेबांच हे शब्दसामर्थ्य मला प्रचंड आवडतं. या राकट दणकट सह्यकड्यांची साक्षात हिमालयासोबत वसंत बापटांनी केलेली तुलना सह्याद्रीचं वेगळेपण दाखवून जाते.

तुझ्या स्वाक्षरीतल्या

इनिगोय
Wed, 05/29/2013 - 20:43 नवीन
तुझ्या स्वाक्षरीतल्या ओळीदेखील सुरेख आहेत. पूर्ण कविता असेल तर दे की इथे..
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

नदीच्या किनारी नदीला म्हणावे

किसन शिंदे
Wed, 05/29/2013 - 21:07 नवीन
नदीच्या किनारी नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या नसातून यावे अभंगात गोडी तुझ्या भाकरीची तहानेत माझ्या तुला ओळखावे माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल माझी मराठी माऊली तिची विठोबा साऊली ज्ञाना, नामा, तुका, एका उभे कैवल्य राऊळी माझा मराठी गुलाल त्याला अबीराचा वास माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ सळसळती आतून माझ्या रक्तात पिंपळ कवी – अशोक बागवे संपुर्ण कविताच सुंदर असली तरी हे कडवं खुप खास!
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल
↩ प्रतिसाद: इनिगोय

वा.. खासच हे कडवं पण..

कोमल
Wed, 05/29/2013 - 22:55 नवीन
वा.. खासच हे कडवं पण..
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

व्वा, मोदकराव....

तिरकीट
Wed, 05/29/2013 - 20:56 नवीन
व्वा, मोदकराव.... हा आता धागा नाहीये..... सुंदर गोफ विणल्यासारखा होतोय....... पुनश्च धन्यवाद.....

"शेवटी संस्कृती म्हणजे

मोदक
Wed, 05/29/2013 - 21:25 नवीन
"शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळाचे पाणी, दुसर्‍याचा पाय चुकून लागल्यावरदेखील आपण केलेला प्रथम नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आज्जीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी, दसर्‍याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थिंचा गंगार्पणाच्यावेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणार्‍या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूल हात लागून घाटदार मडके घडावे तसा ह्या अदृष्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कपबशीचा! -- पु ल देशपांडे. ************************************************************* "स्वतः भुकेला असताना इतर भुकेल्याकडे लक्ष न देता खाणे ही प्रकृती, स्वतःचे पोट भरलेले असताना देखील इतर भुकेल्याकडे लक्ष न देता अजून खाणे ही विकृती, आणि स्वतः खाण्याआधी इतरांच्या भुकेकडे बघणे ही संस्कृती" ************************************************************* "जो आपल्या कृतीतून संस्कृती निर्माण करतो तो देव, प्रकृती करतो तो मानव आणि विकृती करतो तो दानव". ************************************************************* नक्की कुठे थांबावे (प्रतिसादामध्ये / अवांतरामध्ये / वादामध्ये) अशा आयडींसाठी.. ;-) एक तरुण संन्यासी जंगलात तप करीत असताना त्याने सोबत म्हणून एक मांजर पाळले. त्याला नियमित दूध मिळेना म्हणून त्याच्यासाठी एक गाय पाळली. तिच्या शेणाचा दुर्गंध त्याच्या कुटीपासून दूर रहावा म्हणून - आणि वन्य प्राण्यांपासून तिचे संरक्षण व्हावे म्हणून - थोड्या अंतरावर त्या गायीसाठी त्याला एक गोठा बांधावा लागला. गायीला चरायला नेणे, गोठ्याची सफाई वगैरे करण्यात त्याचा फार वेळ जाऊ लागला नि त्याच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला म्हणून हे सगळे काम करण्यासाठी त्याने एक बाई ठेवली. यथावकाश त्याने तिच्याशी लग्न केले.

पोपट - पाडगावकर

मैत्र
Wed, 05/29/2013 - 21:43 नवीन
प्रवासात आगगाडीतून येताना शेताच्या लाल लाल बांधावर दिसला एक हिरवाहिरवागार पोपट. मग पोपट हिरवेगार उडाला. पोपट माझ्या मनात शिरला. पोपट माझ्या मनात फिरला मन हिरवेगार करीत, विचार हिरवेगार करीत, स्वप्ने हिरवीगार करीत. पोपट बसला खांद्यावर आणि क्षणभर मी झालो एक हिरवेगार झाड... मी म्हटले, "मिस्टर पोपट, कसे काय?" तो म्हणाला, "मिस्टर कवी, कसे काय?" भलताच मिस्कील होता पोपट. हिरवाहिरवागार पोपट. प्रवासभर पोपट बोलत होता खूप. प्रवासभर मीही बोलत होतो खूप. पोपट म्हणाला, "मिस्टर कवी, करता काय?" मी म्हटले, "नोकरी करतो." पोपट म्हणाला, "नोकरीमध्ये करता काय?" मी म्हणालो, " नोकरीमध्ये खोटे हसतो. खोटे बोलतो. बंद गळ्याच्या मठठांना शहाणे म्हणतो. लाचारांना शूर म्हणतो. हलकटांना सज्जन म्हणतो. समर्थाच्या श्वानांना सलाम करतो. झकास करतो मूल्यांची पोपटपंची. पहिलीला पगार घेतो : रहाणीची मान जरा उंच करतो. " पोपटाने माझ्या डोळ्यांत पाहिले : मला भलतीच भीती वाटली. वाटले, हा भूल घालून नेईल मला हिरव्या हिरव्या पंखांवरून लाल लाल बांधावर. माझे एक प्रमोशन ड्यू होते : पोपटाची मला खूप भीती वाटली. पोपटाने पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांत पाहिले : डोळे भरून माझ्या डोळ्यांत पाहिले आणि तो उडून गेला. हिरव्या हिरव्या पंखांवर निळे निळे आभाळ झेलीत लाल लाल बांधाकडे पोपट एकटा उडून गेला. -- मंगेश पाडगावकर ९-१०-१९६६ (साहित्य अकादमी विजेता काव्यसंग्रह -- सलाम) बोरकरांच्या काव्याबद्दल लिहिताना जे कालातीतपणाची भावना येते त्याचाच प्रत्यय पाडगावकर अनेकदा देतात. गुरू शिष्य शोभतात आपापल्या वेगळ्या शैलीतही.. परंपरागत आणि झूल पांघरलेली सफेद कॉलर कामे करताना अचानक हापिसातल्याच प्रदर्शनात हा काव्यसंग्रह आणि हे रत्न हाती लागले. ६६ सालची अतिशय जुन्या वातावरणातली मुंबई आणि आज जवळजवळ ५० वर्षांनंतर कुठल्याही इतर ठिकाणी तीच जाणीव टचकन करून देणार्‍या अतिशय साध्या शब्दातल्या ओळी...

गीतकार- सुरेश भट, गायक - महेन्द्र कपूर--पूर्तता माझ्या व्यथेची..

फिरंगी
Wed, 05/29/2013 - 21:45 नवीन
पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्‍ती मिळावी. वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही गांजणार्‍या वासनांची बंधने सारी तुटावी. संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा कापलेले पंख माझे, लोचने आता मिटावी. सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी. काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी ? राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !

इथले अनेक शब्दप्रभू अफाट लिहून जातात...

बहुगुणी
Wed, 05/29/2013 - 22:26 नवीन
इथले अनेक शब्दप्रभू अफाट लिहून जातात...रामदास, सहजराव, बिका, भानस...यादी मोठी आहे... 'बामनाचं पोर' या नावाने पूर्वी लिहिणार्‍या सदस्याने (आता त्यांनी आय डी बदलला आहे की काय हे माहीत नाही, त्यांचं नवीन लिखाण वाचल्याचं आठवत नाही) एका प्रतिसादात खालील ओळी लिहिल्या होत्या: .. आयुष्य म्हणजे आजवरच्या श्वासांची बेरीज नव्हे तर श्वास विसरायला लावणार्‍या, रोखून धरलेल्या क्षणांची बेरीज....

माझे अति आवडते...गुलजार -- यार जुलाहे

मैत्र
Wed, 05/29/2013 - 22:36 नवीन
#बहुगुणी... थोडे हिंदी.. खास तुमच्यासाठी.. मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते जब कोइ तागा टुट गया या खत्म हुआ फिर से बांध के और सिरा कोई जोड़ के उसमे आगे बुनने लगते हो तेरे इस ताने में लेकिन इक भी गांठ गिराह बुन्तर की देख नहीं सकता है कोई मैनें तो ईक बार बुना था एक ही रिश्ता लेकिन उसकी सारी गिरहें साफ नजर आती हैं.. मेरे यार जुलाहे मुझको भी तरकीब सिखा दो यार जुलाहे...

धन्यवाद हो, मैत्र!

बहुगुणी
गुरुवार, 05/30/2013 - 01:36 नवीन
या गुलझारच्या काही त्रिवेण्या: ************ तमाम सफहे किताबोंके फ़डफ़डाने लगे हवा धकेल के दरवाजा आ गयी घर में कभी हवा की तरह तुम भी आया जाया करो! ************ सारा दिन बैठा मैं हाथ में लेकर खाली कास रात जो गुज़री, चांद की कौडी डाल गयी उसमें सूदखोर सूरज कल मुझसे ये भी ले जायेगा! *********************** सामने आये मेरे, देखा मुझे, बात भी की मुस्कराए भी, पुरानी किसी पहचान की खातिर पुराना अखबार था, बस, देख लिया, रख भी दिया! ************* ज़मीं भी उसकी, ज़मीं की नेमतें उसकी ये सब उसी का है, घर भी, ये घर के बंदे भी खुदा से कहिये, कभी वो भी अपने घर आये! *************** कभी कभी बाज़ार में यूं भी हो जाता है कीमत ठीक थी, जेब में इतनें दाम नही थे ऐसे ही इक बार मैं तुम को हार आया था! ************ वह जिस सांस का रिश्ता बंधा हुआ था मेरा दबा के दांत तले, सांस काट दी उसने कटी पतंग का मांझा मुहल्ले भर मे लुटा! ************ चुडी के टुकड़े थे, पैर में चूभते ही खूं बह निकला नंगे पांव खेल रहा था, लड़का अपने आंगन में बाप ने कल दारू पी के मां की बाह मरोडी थी! ************ बुड बुड करते लफ्जों को चिमटी से पकड़ो फेंको और मसल दो पैर की ऐडी से अफवाहोंको खूं पीने की आदत है! ****************
↩ प्रतिसाद: मैत्र

कभी कभी बाज़ार में यूं भी हो

आदूबाळ
गुरुवार, 05/30/2013 - 01:53 नवीन
कभी कभी बाज़ार में यूं भी हो जाता है कीमत ठीक थी, जेब में इतनें दाम नही थे ऐसे ही इक बार मैं तुम को हार आया था!
मनाला चरा पाडून गेली ही त्रिवेणी...
↩ प्रतिसाद: बहुगुणी

सारा दिन बैठा मैं हाथ में

इनिगोय
Sat, 06/01/2013 - 16:34 नवीन
सारा दिन बैठा मैं हाथ में लेकर खाली कास रात जो गुज़री, चांद की कौडी डाल गयी उसमें सूदखोर सूरज कल मुझसे ये भी ले जायेगा!
ही एक अतिशय आवडती रचना आहे! आभार..
↩ प्रतिसाद: बहुगुणी

सलाम

मोदक
Wed, 05/29/2013 - 22:57 नवीन
सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणार्‍याला सलाम, न बघणार्‍याला सलाम, विकत घेणार्‍याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणार्‍याला सलाम, सलाम,भाई,सबको सलाम. वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम, शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम, देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम, रिकाम्या हातातून ऊद कढणार्‍या बडेबुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भितीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम, बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम, साहेबाची टरकवणार्‍या त्याच्या साहेबाला सलाम, सलाम,प्यारे भाईयों और बहनों, सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम, भाषणांचे,सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम, वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम, त्यांची वेसण धरणार्‍या राज्यकर्त्यांना सलाम, ज्याच्या समोर माइक्रोफोन त्याला सलाम, त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम, लाखोंच्या गर्दीला सलाम, गर्दी झुलवणार्‍या जादुगारांना सलाम, भाईयों और बहनों सबको सलाम. नाक्यावरच्या दादाला सलाम, हातभट्टीवाल्याला सलाम, स्मगलरला सलाम, मट्‍केवाल्याला सलाम, त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम, लोकशाहीला बी सलाम, ठोकरशाहीला बी सलाम, सत्तेचा ट्रक चालाविण्यार्‍यांना सलाम, ट्रकखाली चिरडलेल्या, गांडुळांना,कुत्र्यांना सलाम, ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम, विमानातून बाँब फेकणार्‍याना सलाम, शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम, काळाबाजारवाल्यांना सलाम, त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम, गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम, तिरडीचे सामान विकणार्‍यांना सलाम, तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम, मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम, सलाम, प्यारे दोस्तों,सबको सलाम. बिळांना सलाम, बिळातल्या उंदरांना सलाम, घरातल्या झुरळांना सलाम, खाटेतल्या ढेकणांना सलाम, पिचलेल्या बायकोला सलाम, दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम, गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम, किडक्या धान्याला सलाम, भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रॉकला सलाम, धंद्यांच्या मालकाला सलाम, युनीयनच्या लीडरला सलाम, संपाला सलाम, उपासमारीला सलाम, सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम, चाळीचाळीतून तुंबलेल्या संडासातल्या लेंड्यांना सलाम, मानगूट पकडणार्‍या प्रत्येक हाताला सलाम, सलाम,भाईयों और बहनों,सबको सलाम. या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम, या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम, सर्व बिलंदर घोषणांना सलाम, जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम, या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्‍यांना सलाम, उपनिषदे आणि वेदांना सलाम, साखरकारखान्यांच्या दादांना सलाम, त्यांच्या शेकडो लोर्‍यांना सलाम, निवडणुकींना सलाम, निवडणुकफंडाला सलाम, अद्रूष्य बुक्यांना सलाम, मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम, ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम, त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम, दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम, या बातम्या वाचाणार्‍या सर्व षंढांना सलाम, सलाम,भाईयों और बहनों,सबको सलाम. सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले तर डोके फोडतील, हलकट लाचारांचा देश म्ह्टले तर रस्त्यावर झोडतील, खरीदले जाणार्‍यांचा देश म्हटले तर वाटा रोखतील, देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाईट बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील, शोषण करणार्‍यांचा देश म्हटले तर नोकरीवरुन काढतील म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम, आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम, या महान देशाच्या महान परंपरेला सलाम. सलाम प्यारे भाईयों और बहनों,सबको सलाम. अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिंन माफ करना भाईयों, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला गांडीवर म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम, सलाम,सबको सलाम, भाईयों और बहनों,सबको सलाम. ------------------मंगेश पाडगांवकर

बा मोदका, फार्फार भारी आयडिया

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/29/2013 - 23:56 नवीन
बा मोदका, फार्फार भारी आयडिया काढलीस ! हा धागा एक कायमची वाचनखूण झाली आहे !!!

रामप्रसाद बिस्मिल

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 05/30/2013 - 01:25 नवीन
रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाक उल्लाह खान यांच्यातली ही जुगलबंदी आणि त्यातून तयार झालेल्या या अमर काव्याचा जन्म, एका सभेमध्ये बिस्मिलच्या शायरीच उत्तर अश्फाकने आपले उस्ताद जिगर मोरादाबादीच्या गझलेच्या कडव्यातून दिलेलं, बिस्मिल म्हणाले होते, बहे बहरे-फना में जल्द या रब! लाश 'बिस्मिल' की। कि भूखी मछलियाँ हैं जौहरे-शमशीर कातिल की।।" ( या बहरून उठलेल्या अंतकाळात माझे शव वाहून जाउदे; की भुक्या मासोळ्या शत्रूच्या तलवारी प्रमाणे आहेत) आमेन असं म्हणून अश्फाक म्हणतात "कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है। जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है।।" अश्फाक आर्य समाज मंदिरात बिस्मिलकडे काही कामानिमित्त गेलं असताना एक गझल गुणगुणत होते. "कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है। जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है।।" शेर ऐकून बिस्मिलने स्मितहास्य केलं असतं अश्फाक ने विचारले की मी काही चुकीचं बोललो काय, तर बिस्मिल म्हणतात की असा भाग नाही मिर्जा गालिबच्या जुन्या जमिनीवर एखादा शेर सांगितला म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. अजून काही रंगवलं असतं तर आम्ही पण इर्शाद म्हणलो असतो. अश्फाक काहीशा आव्हान देणाऱ्या स्वरात म्हणले की "तो राम भाई! अब आप ही इसमें गिरह लगाइये, मैं मान जाऊँगा आपकी सोच जिगर और मिर्ज़ा गालिब से भी परले दर्जे की है" त्यावेळेस बिस्मिल साहेब म्हणतात "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना है जोर कितना बाजु-कातिल में है?" सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बांजुए कातिल में है l करता नहीं क्यूं दूसरा कुछ बातचीत, देखता हूं मैं जिसे वो चुप तेरी महफिल में है ए शहीद-ए-मुल्क-ओ-मिल्लत मैं तेरे ऊपर निसार, अब तेरी हिम्मत का चरचा गैर की महफिल में है सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l वक्त आने दे बता देंगे तुझे ए आसमान, हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है खैंच कर लायी है सब को कत्ल होने की उम्मीद, आशिकों का आज जमघट कूच-ए-कातिल में है सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l है लिये हथियार दुशमन ताक में बैठा उधर, और हम तैय्यार हैं सीना लिये अपना इधर. खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l हाथ जिन में हो जुनून कटते नही तलवार से, सर जो उठ जाते हैं वो झुकते नहीं ललकार से. और भडकेगा जो शोला-सा हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l हम तो घर से निकले ही थे बांधकर सर पे कफ़न, जान हथेली पर लिये लो बढ चले हैं ये कदम. जिन्दगी तो अपनी मेहमान मौत की महफिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l यूं खडा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार, क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है. दिल में तूफानों कि टोली और नसों में इन्कलाब, होश दुश्मन के उडा देंगे हमें रोको ना आज. दूर रह पाये जो हमसे दम कहां मंज़िल में है l वो जिस्म भी क्या जिस्म है जिसमें ना हो खून-ए-जुनून तूफानों से क्या लडे जो कश्ती-ए-साहिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बांजुए कातिल में है l (बिसमिल अजीमाबादी)

__/\__

मोदक
गुरुवार, 05/30/2013 - 01:48 नवीन
__/\__ झोप उडवलीस बे मंद्या!!!!!
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

आमीरच्या रंग दे बसंती मध्ये

किसन शिंदे
गुरुवार, 05/30/2013 - 02:16 नवीन
आमीरच्या रंग दे बसंती मध्ये अतुल कुलकर्णी आणि कुणाल कपूर यांनी अनुक्रमे रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाक उल्लाह खान छान रंगवले होते. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बांजुए कातिल में है अतुल कुलकर्णीने रामप्रसादच्या भुमिकेसाठी आपली निवड व्हावी म्हणून या ओळी गोर्‍या मड्ड्मला म्हणून दाखवलेल्या आठवल्या.
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

मस्त

फारएन्ड
गुरुवार, 05/30/2013 - 03:52 नवीन
मस्त! याचीच एक व्हर्जन - कदाचित विडंबन- 'गुलाल' चित्रपटात तो पीयुष मिश्रा गाताना दाखवला आहे. त्याचे शब्दही इंटरेस्टिंग होते.
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

__/\__

प्यारे१
गुरुवार, 05/30/2013 - 13:41 नवीन
__/\__ स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स! किमान ह्या शब्दांसाठी तरी देशातल्या प्रत्येकानं थोडं प्रामाणिक व्हावं.
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

जबरदस्त रे..

कोमल
गुरुवार, 05/30/2013 - 14:55 नवीन
जबरदस्त रे.. रोमांच उठले.. __/\__
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे

यशोधरा
गुरुवार, 05/30/2013 - 05:04 नवीन
दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल सहज कधी तू घरात लावशील सांजवात माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल - सुरेश भट

अरे वा! ही आली का इथे!

इनिगोय
Sat, 06/01/2013 - 16:36 नवीन
अरे वा! ही आली का इथे!
मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल
क्या बात!
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१.... उत्तम धागा!!

सानिकास्वप्निल
गुरुवार, 05/30/2013 - 12:39 नवीन
कविता महाजन ह्यांच्या भिन्न कादंबरीतूनः मी हमसत धूमसत जितूचे हात गच्च पकडून अस्मिताच्या मांडीवर कोसळले. रडत रडतच म्हणाले, मला एड्स झालाय!.... " भला मोठा लांबरुंद रस्ता. डांबरी. काळा-करडा. बाजूनं फूटपाथ काळ्या घडीव दगडांचे. प्राण्यांची प्रचंड मोठी झुंड... एक झुंड नव्हे, अनेक झुंडी धावत येताहेत. रस्ता पूर्ण भरून गेलाय. एनलार्ज केलेल्या आकृत्यांसारखी घसघशीत मोठ्या आकारांची जनावरं. भली मोठी वळणदार शिंग. म्हशींसारख्या रुंद पाठी, पण भरपूर उंच मजबूत दणकट काळेभोर प्राणी. रानडुकरांसारखी त्वचा... चांगलीच जाड, केसाळ. वेगानं ताठलेले दिसताहेत त्यांचे अंगभरचे केस. घोड्यांसरखा तुफान वेग आहे त्यांच्या धावण्याला. त्यांच्या आकारमानाला न शोभेसा. आणी त्यांच्या काळ्या गोंडेदार शेपट्या जाडजूड विणलेल्या दोरखंडासारख्या टणक लहरताहेत हवेत सणसणीत गोफणीसारख्या. मी फूटपाथवर अंग चोरून उभी. मागे खूपच खूप उंच घरं आहेत. इंग्लिश धाटणीची वाटतात. एकसारखी. सगळं दगडी बांधकाम आहे. चिरेबंदी. कातीव. दारंखिडक्या दिसतच नाहीत. मी शोधतेय. कुठून आत शिरता येईल का बचाव करण्यासाठी. पण नुसती नजर फिरतेय सगळीकडे आणी मावळत जाताहेत सार्‍या शक्यता. काही हालचाल करण्याची हिंमत होतच नाही. कुठल्याही क्षणी हे झुंड फूटपाथवर येईल. किंवा झुंडीतला एखादा चुकार प्राणी मला शिंगावर उचलून घेईल. त्या जाड शेपटीनं मान आवळून टाकील. किंवा आपल्याच धुंदीत ते तुडवत जातील मला त्यांच्या टपोर कडक दगडी टाचांखाली. खाली वर आजूबाजूला सगळीकडे दगड. आणी मी मृदू मांसल स्पंजी नरम गरम लालबुंद रक्तानं थबथबलेली. चेंदामेंदा."

१. Specialization is knowing

बाळ सप्रे
गुरुवार, 05/30/2013 - 17:47 नवीन
१. Specialization is knowing more and more about less and less until one knows everything about nothing. :-) (Vice versa for generalization) २. दूरदर्शनवर विज्ञानावर आधारीत एक माहीतीपूर्ण कार्यक्रम होता "Turning Point". त्यात शेवटी प्रश्नोत्तरे असत. हा प्रश्न आणि त्याला दिलेलं उत्तर एकदम लक्षात राहील असं होतं. उत्तर बहुतेक जयंत नारळीकर यांनी दिलं होतं. प्रश्न होता जसं Kidney, heart transplant करतात तसं भविष्यात Brain transplant करता येईल का? उत्तर होतं - You can get new heart, kidney but not brain, because YOU are the brain. Brain transplant will mean somebody else getting your body.

टर्निंग पॉईंट प्रा. यशपाल

आदूबाळ
गुरुवार, 05/30/2013 - 18:39 नवीन
टर्निंग पॉईंट प्रा. यशपाल चालवायचे ना?
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हो.. त्यात वेगवेगळे

बाळ सप्रे
Fri, 05/31/2013 - 09:47 नवीन
हो.. त्यात वेगवेगळे शास्त्रज्ञ, प्राध्यापक पाहुणे म्हणून येत आपआपल्या विषयावर बोलायला आणि प्रश्नोत्तरांसाठी..
↩ प्रतिसाद: आदूबाळ

उनकी याद करें…

कोमल
गुरुवार, 05/30/2013 - 20:56 नवीन
उनकी याद करें… जो बरसों तक लड़े जेल में, उनकी याद करें। जो फाँसी पर चढ़े खेल में, उनकी याद करें। याद करें काला पानी को, अंग्रेज़ों की मनमानी को, कोल्हू में जुट तेल पेरते, सावरकर से बलिदानी को। याद करें बहरे शासन को, बम से थर्राते आसन को, भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, के आत्मोत्सर्ग पावन को। अन्यायी से लड़ें, दया की मत फरियाद करें। उनकी याद करें। याद करें हम पुर्तगाल को, ज़ुल्म सितम के तीस साल को, फौजी बूटों तले क्रांति को, सुलगी चिनगारी विशाल को। याद करें सालाज़ारों को, ज़ारों के अत्याचारों को, साइबेरिया के निर्वासित, शिविरों के हाहाकारों को। स्वतंत्रता के नए समर का शंख निनाद करें। उनकी याद करें। बलिदानों की बेला आई, लोकतन्त्र दे रहा दुहाई। स्वाभिमान से वही जियेगा, जिससे कीमत गई चुकाई। मुक्ति माँगती शक्ति संगठित, युक्ति सुसंगत, भक्ति अकम्पित, कृति तेजस्वी, धृति हिमगिरि-सी, मुक्ति माँगती गति अप्रतिहत। अंतिम विजय सुनिश्चित, पथ में क्यों अवसाद करें? उनकी याद करें। -श्री अटलबिहारी वाजपेयी

मौनाची भाषांतरे

तिरकीट
गुरुवार, 05/30/2013 - 21:25 नवीन
आता वाटतं की नऊ नऊ महिने घेणार एक एक शब्द यायला आता वाटतं भरभरून द्यावसं वाटावं, असं नाहीच काही द्यायला एका भाबड्या प्रामाणिकपणे सारंच मांडत आलो इतके दिवस आता वाटतं – नको होतं सारं इतक्या लग्बगीने सांगायला आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ, कसे सचैल भिजायचो इतके दिवस – मजा वाटते आहे ! काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती वाटते आहे … आता वाटते इतका अधाशीपणा नको होता करायला थोड्या धीराने घेतलं असतं, तर उरलीही असती श्रीशिल्लक काही आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास प्राणात खोल शोधतोय त्राण; गवसत नाही ! भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो – क्षमा ! बहरून आला होतात त्या उद्यानांनो – क्षमा ! झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, फूल खुडण्यात पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे ! पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो यावर आता विश्वास ठेवायचा फक्त … हाताची घडी घालून, शांतपणे मिटायचे डोळे थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं, आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त ! - मौनाची भाषांतरे, संदिप खरे

सुखांची यादी :-)

दिपक
Fri, 05/31/2013 - 10:24 नवीन
He is the Richest whose pleasures come cheapest. -Unknown Chin Shengt’an नावाचे एक चीनी विद्वान अतिवृष्टीमुळे त्यांच्या मित्राबरोबर एका देवळात दहा दिवस अडकून पडले होते. नुसतंच बसलोय तर करायचं काय ? लेखक महाशयांनी त्यांच्या 'सुखांची' एक यादी बनवली. Chin's 33 Happy Moments या नावाने ती प्रसिध्द आहे. सुखांची ती यादी नुकतीच वाचनात आली. विचार केला, आपण पावसामुळे अडकून पडण्याची वाट कशाला पहायची ? चीनच्या 'चीन' साहेबांकडून प्रेरणा घेऊन स्वतःची यादी बनवायची ठरवली. प्रामाणिकपणे सांगायचं तर, बराच वेळ काहीच सुचेना. मग ठरवलं, जसं आठवेल तसं लिहून ठेवायचं. चार पाच दिवसांच्या या प्रोसेसमध्ये एक गोष्ट लक्षात आली. तिखट-गोड भेळ खाताना मधेच कैरीची फोड दातात यावी आणि जिभेवरचा सगळा 'समा' बदलून जावा तसंच सुखाचं असावं. सुख 'शोधत' बसलो तर हाताला लागत नाही. खिशात एक छोटा कागद ठेवू लागलो. जगता जगता जिथे 'कैरी' लागली ते प्रसंग टिपून ठेवले, काही अनुभवलेले प्रसंग आठवून लिहिले. त्यातील काही निवडक शेअर करतोय... • घरात वीज नसते. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात, पंखे-टीव्ही चालू नसलेल्या घरात सगळे व्यवहार चालू असतात. नीजानीज होते. मला थंडीतही डोक्यावर (आवाज करणारा) पंखा लागतो. आता तर उन्हाळ्याचे दिवस. झोप कशी लागणार? घामट अंगाने आडवा होतो. एकदा डावा, एकदा उजवा असे हात बदलत वर्तमानपत्राने वारा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असतो. हात दुखायला लागतो. मी डोळे बंद करतो. माझ्या ओळखीतली माणसं मोजू लागतो, कळपातल्या मेंढ्या मोजतो...पण झोपेचं चिन्ह नाही. वीज कंपनी, सरकार, उन्हाळा, डास यांच्या नावाने चडफडत असताना कधी डोळा लागतो ते कळत नाही.... आणि... खुsssप वेळाने घामट अंगावर एक गार झुळूक येते. मी डोळे उघडून छताकडे पाहतो. वीज आली या आनंदात पंखा (आवाज करत) गोल गोल नाचत असतो. त्या अंधाऱ्या खोलीतही ‘चैतन्याचा प्रकाश’ पडल्याचा भास होतो. • डावीकडे....थोडं वर...इतकं वर नाही गं...थोsssडं खाली...हा, बरोबर. तिथेच...! माझा हात पोचू न शकणारी, माझ्या पाठीवरची 'खाज सुटणारी' जागा बायकोला बरोब्बर सापडते. समाधी लागल्यासारखे माझे डोळे आपसूक बंद होतात. • मी आणि माझा शाळेतला वर्गमित्र खूप वर्षांनी शाळेजवळ भेटतो. मित्राला सिगरेट ओढायची लहर येते. आम्ही शाळेजवळच्या एका दुकानात जातो. आमच्या वेळचा दुकानदार आता नसतो. मी सहज विचारतो, 'अजूनही तो पिशवीतला पेप्सी-कोला मिळतो का?.... मिळतो ? मग एक ऑरेंज, एक कालाखट्टा द्या...दुकानदार फ्रीज उघडतो. फ्रीजमध्ये पेप्सी कोलाचे जितके नग असतात ते सगळे विकत घेण्याइतके पैसे पाकिटात असतात. मला शाळेचे दिवस आठवतात. पेप्सी कोलासाठी खिशात जपून ठेवलेलं पन्नास पैशाचं नाणं आठवतं. मी खिशातल्या पाकिटातून एक नोट काढतो. दुकानदार म्हणतो, सुट्टे पैसे द्या. मी पाकिटाची चेन उघडतो आणि सुट्टे पैसे देतो. मी दाताने पेप्सी-कोलाची पिशवी फोडतो तशी ऑरेंज सरबताची एक चिळकांडी मित्राच्या शर्ट वर उडते. मी सॉरी म्हणतो. मित्र म्हणतो, सुधारणार नाहीस साल्या ! तिशी पार केलेले आम्ही दोन टोणगे पेप्सी-कोला खात खात दुकानातून बाहेर पडतो. • रस्त्यात एक माणूस दिसतो. कुठे तरी पाहिलंय याला...पण जाम आठवत नाही..दातात पेरूची बी अडकावी, ती बराच वेळ निघू नये आणि त्याहून कहर म्हणजे आपली जीभ सारखी-सारखी दाढेच्या त्याच फटीकडे जात रहावी तसा या माणसाचा चेहरा दिवसभर छळत राहतो. चार दिवसांनी, काहीही संदर्भ नसताना, त्या चेहऱ्याचा धनी अचानक आठवतो. ऑफिसातला एक कलीग विचारतो, 'काय रे आज खूष दिसतोयस.' मी म्हणतो, 'नाही, काही विशेष नाही.' मी चक्क खोटं बोलतो. • दोन दिवसांची ऑफिस टूर आटपून मी संध्याकाळी घरी येतो. घरी शुकशुकाट. वॉचमन सांगतो की सगळे शेजारच्या बागेत गेलेत. मी बागेशी जातो. माझा अडीच वर्षांचा मुलगा घसरगुंडीवर खेळताना दिसतो. मी त्या दिशेने चालत जातो. माझ्या मुलाचं माझ्याकडे लक्ष जातं. बाबाssssssssss ! असं तिथूनच ओरडून तो माझ्या दिशेने धावत सुटतो आणि माझ्या पायाला घट्ट मिठी मारतो. बागेतले सगळे माझ्याकडे बघायला लागतात. मी त्यांच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करतो. मुलाचं बोट धरून घसरगुंडीशी जातो. 'डॅडी' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर अनुपम खेरला जितका आनंद झाला असेल त्याच्या दहा पट आनंद मला आत्ता होत असतो. • बायकोच्या साडीला मॅचिंग ब्लाउज घेण्यासाठी मी बायको बरोबर 'मॅचिंग सेंटर' मध्ये जातो. आज नशीब माझ्या बाजूने असतं. बायकोला हवी असलेली हिरव्या रंगाची शेड ‘फक्त’ चौतीस मिनिटात सापडते. • एक पावसाळी रविवार सकाळ. आई म्हणते, 'जेवण झाल्यावर ठाण्याला जायचंय. अमुक तमुकच्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी आहे.' बाहेर टोम पाऊस पडत असतो. आमची जेवणं होतात. जड अंगाने (आणि जड अंतःकरणाने) मी पार्टीला घालायचे कपडे बाहेर काढतो. तेवढ्यात कोणाचा तरी फोन वाजतो. ठाण्याहून फोन असतो. पावसामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला असतो. मनात नाचणाऱ्या आनंदाच्या कारंजाचे पाणी बाहेर जराही न सांडता मी इस्त्री केलेले कपडे निमुटपणे कपाटात ठेवतो. खिडक्यांचे पडदे लावून घेतो. खोलीत अंधार होतो. पंखा मध्यम गतीने चालेल असा ठेवतो. अंगावर पांघरूण घेतो. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज कानात साठवून घेतो. भीमसेनजींचा 'रामकली' लावतो. पंडितजी पहिला 'सा' लावतात आणि अंगावर काटा येतो. रविवार दुपार, पावसाळी काळोख, डोक्याखाली उशी, डोक्यावर पंखा, अंगावर पांघरूण, झाडाच्या पानांवर पडणाऱ्या पावसाचा आवाज, पंडितजींचा रामकली, आणि जडावून मिटत जाणारे डोळे हे सगळं एक तरफ और बाकी दुनिया एक तरफ..! • मी काहीतरी लिहायला बसतो. सुचत नाही तेव्हा बराच वेळ खिडकी बाहेर बघत बसतो. काहीतरी सुचतं, पण ते लिहिल्यावर इतकं ग्रेट नाही असं वाटतं. मी लिहिलेलं खोडून टाकतो. बायको बाहेर येण्याबद्दल विचारते. मी नाही सांगतो. ती मुलाला घेऊन बाहेर जाते. वाटतं, आता एकटाच आहे - मस्त लिहित बसेन. काहीतरी खर्डेघाशी करतो पण मजा येत नसते. कोऱ्या कागदांकडे मी बराच वेळ नुसताच पाहत राहतो. बेल वाजते. 'खूप बोलणारे' बिल्डींग मधले एक काका दरवाजात उभे. मी उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून 'या' म्हणतो. ते खरोखरीच आत येतात. ते बोलू लागतात. आणि अचानक कुठल्यातरी संदर्भावरून मला लिखाणाला विषय मिळतो. काका रंगात येऊन भ्रष्टाचार, वर्ल्ड कप वगैरे वर बोलत असतात, पण माझं त्याकडे लक्षच नसतं. माझ्या डोक्यात लेखाची मांडणी सुरु होते. सुरुवात अशी करूया.. नको अशी करूया... म्हणता म्हणता सगळा लेख डोक्यात तयार होतो. आता फक्त जाऊन कागदावर उतरवायचा बाकी असतो. तासभर बोलून झाल्यावर काका उठतात आणि जाऊ लागतात. चपला घालता घालता मी काहीतरी बोलेन या अपेक्षेने माझ्याकडे बघतात. माझ्या नकळत मी patkanबोलून जातो - 'बरं झालं काका, आलात ते !’ • मंगळवार. सकाळचे दहा वाजलेले. चर्चगेटचा गजबजलेला अंडरग्राउंड सबवे. भोवताली माणसांचा समुद्र. फेरीवाले-भिकारी यांच्या मधून वाट काढत मी चालत असतो. अंगातून घामाच्या धारा. एका दुकानात लावलेल्या रेडियो मधून काहीतरी कानावर पडतं - वक़्त ने किया, क्या हसीं सितम | तुम रहे न तुम, हम रहे न हम.... कैफ़ी आज़मीचे शब्द, सचिनदेव बर्मनची चाल आणि गीता दत्तचा स्वर मला कैद करतात. मी जागच्या जागीच थिजून जातो. एका जागी स्वस्थ उभा राहून मी ते अख्खं गाणं ऐकतो. स्वतःला या 'क्षुद्र' जगात परत आणतो आणि माझ्या कामाला निघतो. ‘जायेंगे कहाँ, सुझता नहीं | चल पडे मगर, रास्ता नहीं | क्या तलाश है, कुछ पता नहीं !’...... ...या ओळींसाठी चर्चगेट स्टेशनपेक्षा अधिक योग्य जागा आणखी कुठली असू शकेल ? मी माझ्या 'सुखांच्या यादीवरून' पुन्हा एकदा नजर फिरवतो. सुखाचे हे सगळे अनुभव त्या त्या वेळी उपभोगुन एकही अनुभव आत्ता, या क्षणी माझ्या मुठीत नसतो. मग नक्की खरं काय? सुखाचा 'तो' अनुभव ? की त्या सुखाची नुसती 'आठवण' ?... मी विचार करत असतानाच माझा मुलगा अमृत माझ्याजवळ येतो. 'बाबा, चल, घोडा-घोडा खेळूया.' मी कागद पेन बाजूला ठेवून निमूटपणे अमृत बरोबर चालू लागतो. मी घोडयासारखा ओणवा बसतो. अमृत माझ्या ओणव्या पाठीवर बसतो. मी जरा हललो की अमृत खिदळत राहतो. मी मागे वळून अमृतचा खिदळणारा चेहरा बघतो. अमृतच्या हास्यात मला माझं ‘आणखी एक’ सुख गवसतं आणि मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरही !
दुवा - http://kahitarinavinahe.blogspot.in/2011/03/blog-post_24.html

निव्वळ अप्रतीम!!!!!!!!!

मोदक
Fri, 05/31/2013 - 10:55 नवीन
निव्वळ अप्रतीम!!!!!!!!!
↩ प्रतिसाद: दिपक

+१

मदनबाण
Fri, 05/31/2013 - 11:11 नवीन
जबरदस्त !
↩ प्रतिसाद: मोदक

क ड क!!

किसन शिंदे
Fri, 05/31/2013 - 14:12 नवीन
क ड क!!
घरात वीज नसते. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात, पंखे-टीव्ही चालू नसलेल्या घरात सगळे व्यवहार चालू असतात. नीजानीज होते. मला थंडीतही डोक्यावर (आवाज करणारा) पंखा लागतो. आता तर उन्हाळ्याचे दिवस. झोप कशी लागणार? घामट अंगाने आडवा होतो. एकदा डावा, एकदा उजवा असे हात बदलत वर्तमानपत्राने वारा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असतो. हात दुखायला लागतो. मी डोळे बंद करतो. माझ्या ओळखीतली माणसं मोजू लागतो, कळपातल्या मेंढ्या मोजतो...पण झोपेचं चिन्ह नाही. वीज कंपनी, सरकार, उन्हाळा, डास यांच्या नावाने चडफडत असताना कधी डोळा लागतो ते कळत नाही.... आणि... खुsssप वेळाने घामट अंगावर एक गार झुळूक येते. मी डोळे उघडून छताकडे पाहतो. वीज आली या आनंदात पंखा (आवाज करत) गोल गोल नाचत असतो. त्या अंधाऱ्या खोलीतही ‘चैतन्याचा प्रकाश’ पडल्याचा भास होतो.
_/\_
↩ प्रतिसाद: दिपक

कडक!!!!!!! लैच जब्री अणभव _/\

बॅटमॅन
Fri, 05/31/2013 - 14:45 नवीन
कडक!!!!!!! लैच जब्री अणभव _/\_
↩ प्रतिसाद: दिपक

टूटे हुए चूड़ियों से जोड़ूं ये

आदूबाळ
Fri, 05/31/2013 - 11:55 नवीन
टूटे हुए चूड़ियों से जोड़ूं ये कलाई मैं | पिछले गली में जाने क्या छोड़ आई मैं || बीती हुई गलियों से | फिर से गुज़रना || पैरों में ना साया कोई सर पे ना साये रे | मेरे साथ जाये ना मेरी परछांई रे || बाहर उजाड़ा हैं | अन्दर वीराना || यारा सीली सीली बिरहा की रात का जलना | ये भी कोई जीना हैं | ये भी कोई मरना || - गुलजा़र

वाहवा..

इनिगोय
Fri, 05/31/2013 - 13:21 नवीन
आणि लता!!
↩ प्रतिसाद: आदूबाळ

एकदा शांत वेळी हे गाणं लागलं,

गवि
Fri, 05/31/2013 - 14:35 नवीन
एकदा शांत वेळी हे गाणं लागलं, अंधार होता आणि एकदम डोळ्यात पाणी येईल इतकं ओढून घेतलं गाण्याने. एरवी कधी असं होत नाही सहसा, पण या गाण्याबाबतीत झालं बुवा..
↩ प्रतिसाद: इनिगोय

वाहवा..

किसन शिंदे
Fri, 05/31/2013 - 15:11 नवीन
वाहवा.. आणि ह्रदयनाथ मंगेशकर!!
↩ प्रतिसाद: इनिगोय

ही मूळ धून हिंदुकुशाच्या

आदूबाळ
Fri, 05/31/2013 - 17:29 नवीन
ही मूळ धून हिंदुकुशाच्या डोंगराळ भागातली आहे.
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

स्मरणे- शांता शेळके

यशोधरा
Fri, 05/31/2013 - 13:04 नवीन
कोमल हळवी उदास झाली मावळतीची किरणे आतआतूनी दाटून आली विस्मृत काही स्मरणे दूर कुठेतरी जशा हालती मंदपणे तरुशाखा तसेच काही आत जाणवे मंद मंद हुरहुरणे काळोखावर उअमटत जाता प्रकाशटिंबे ओली एक एक चांदणीसंगती खोल उसासा भरणे वाहत येता झुळ्झुळ वार, वास जुईचा ज्वाला त्या गंधासह गीत पुराणे ओठांवर थरथरणे भोवताल तिमिरात बुडाले अशा सुन्न एकांती अलग स्वतःला करणे आणिक फक्त एकटे उरणे - शांता शेळके
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा