संकल्पना : इज्ज़ाज़त सिनेमा मधील " मेरा कुछ सामान " या गीतावरून आली आहे.
आज राज घरी एकटाच होता. रजनीशी फारकत घेऊन चार दिवसच झाले होते. आयशा हि सध्या त्याच्याच घरी राहण्यास आली होती. आयशा सह कर्मचारी राजची. पण काही दिवसातच दोघाचे सुत जमले आणि तेरा वर्षाचा राज आणि रजनीचा संसार पत्या सारखा विखुरला. आयशाने घरी येताच रजनीचे जे काही सामान होते ते तिच्या घरी पाठवायला सांगितले राजला. वरतून अशी ताकीद हि कि जेव्हा मी ४ दिवसात पुण्यावरून परत येईन तेव्हा रजनीचा साधा रुमाल हि मला घरात नको आहे. झाले हि तसेच. आयशा ने जसे सांगितले तसे राज ने रजनीचे सर्व सामान पाठवून दिले. आज तो घरी एकटाच होता. एवढ्या वर्षात पहिल्यादा त्याला रजनीची कमी भासत होती. शेवटी एवढी वर्ष तिच्या सोबत या वास्तू मध्ये काढली होती त्याने. रजनीच्या आकंठ प्रेमात तो कितीवेळा तरी न्याहाला होता. ती त्याला पित्याचे सुख देऊ शकत नाही हि सल तिला नेहमी खात असायची. म्हणूनच कदाचित आयशाने त्याच्या आयुष्यात आल्यावर तिने म्हणावा तसा विरोध केला नव्हता. कारण राजच्या सुखातच ती स्वतःचे सुख मानायची. तरी पण आज असे का व्हावे असा एक प्रश्न उगाचच त्याला भेडसावत होता. इतक्यात डोअर बेल वाजली. या वेळी कोण असेल म्हणून राजने दरवाजा उघडला. दारात कोणी नव्हते. आपल्याला भास तर झाला नाही आहे ना असे एक वेळ वाटून गेले राजला. दरवाजा बंद करणार तोच त्याला दाराच्या उजवीकडे एक गुलाबी पाकीट आणि एक लाल गुलाब दिसले. अगदी तसेच जसे लग्ना अगोदर रजनी पाठवायची. तो पाकीट आणि गुलाब घेऊन घरात आला. सोफ्यावर बसत त्याने धडधड्त्या काळजाने पाकीट उघडले.
रजनीचेच पत्र होते ते.
" प्रिय राज,
माफ कर, खरे तर आता तुला प्रिय म्हणुन हाक मारायचा हक्क गमावून बसले आहे मी. तरी पण काही सवयी सहजा सुटत नाहीत ना. तू माझे राहिलेले सामान पाठवुन दिलेस ते मिळाले मला. धन्यवाद. पण काही गोष्टी अजुनहि राहिल्या आहेत रे. जो पर्यंत त्या गोष्टी मला मिळत नाही तो पर्यंत मी तुझ्या आयुष्यातून कशी जाईन पूर्णपणे. बस तेवढ्या काही गोष्टी पाठवून देशील का?
प्रथम जेव्हा तू मला पाहायला आला होतास आणि नजरानजर होताच तुझ्या त्या खट्याळ डोळ्यातला होकार हेरून मी
दिलेले माझे मंद स्मित अजून हि तुझ्याकडेच आहे. साखरपुड्या नंतर समुद्रावरचा मी केलेला तो पहिला स्पर्श ,लग्नाच्या पहिल्या रात्रीची ती उत्कंठा, ती स्पंदने, तो आवेश जमलेच तर दे पाठवून. बाईक वरुन तुझा अपघात झाला होता, तुझ्या उशाशी रडून तुझी काळजी करत घालवलेल्या रात्री जमल्या तर पाठवून दे. पहिल्या पावसात एकाच छत्री मध्ये अर्धे अर्धे भिजलेलो आपण, त्यावेळचे तुझ्या मिठीत विसावलेले माझे ओले मन अजूनही तुझ्याकडेच आहे. ते हि दे. नवीन घरात प्रवेश करताना माझ्या पाउलाची खुण अजुनही घरातल्या फरशीवर तशीच आहे, ती सुद्धा. पहिल्या बाळाची चाहूल लागताच आपण एक रोपटे लावले होते, आठवते? पण नाही उगवले रे ते कधी. ती कुंडी अजूनही तशीच आहे आणि त्यातली ती माती सुद्धा, जिला न जाणो मी किती वेळा माझ्या अश्रूंनी सिंचले आहे, ती कुंडी पाठवून देशील का? मला गाडी शिकवत असताना No entry मध्ये गाडी नेली होती आणि ट्राफिक मामानि आपल्याला पकडले होते, तेव्हा दंड आपण अर्धा अर्धा भरायचा असे ठरले होते, पण तुझ्याकडे तेव्हा पुरेशी रक्कम नव्ह्ती म्हणून ती रक्कम मी दिली परतफेडीच्या बोलीवर, ती पावती अजूनही तशीच कपाट मध्ये आहे तू सुद्धा पाठवून दे. २३७० रात्री ज्या तुझ्या कुशीत मी काढल्या, तुझ्या छातीवर असलेला तीळावर माझा ओठाचा स्पर्श अजूनही आहे, जमलेच तर पुसून टाक तो. उगाच केलेले रुसवे फुगवे, न पूर्ण झालेले किती तरी वचने, अपूर्ण राहिलेले काही आपले संकल्प, पूर्ण न करता आलेली ती स्वप्ने या अश्या सर्व गोष्टी जमल्यास तर दे पाठवुन. या तेरा वर्षात एक हि गोष्ट तुझ्या सहमती शिवाय केली नाही रे मी कधी .एक सहमती अजून दे, या सर्व आठवणीना तिलांजली देत असताना माझी चिता हि तिथेच बाजुला पेटलेली असू दे, देशील ना एवढी सहमती ?
तुझीच , नाही माफ कर, चुकले
फक्त स्वतःची हि न राहिलेली,
रजनी.
वाचन संख्या
2155
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
.........
खुप छान... आवडले.
नि:शब्द
बावळट आहेत तिघेही...
मला फार आवडत हे गाण. किती तरल