✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लग्नाला यायचं हं!

अ
अभ्या.. यांनी
Fri, 04/26/2013 - 15:03  ·  लेख
लेख
सकाळी सकाळी शेजारी राहणाऱ्या पाटीलकाकांचा फोन आला. “अरे मुलीचे लग्न ठरलेय रे. तू पत्रिका छापतोस ना?” “काका कामाचा ताण आहे हो खूप, वेळ लागेल.” “ते लोकांना सांग रे. मला नको. उद्या मजकूर ऑफिसात आणून देतो. दोन दिवसात छापून दे लगेच.” एकतर प्रिंटिंगचे कुठलेच काम टाळू वाटत नाही त्यात हे काम जवळ जवळ घरचे असल्यासारखेच, मी हो म्हणून टाकतो. दुसरे दिवशी काका दोन फुलस्केप कागदावर लिहिलेला मजकूर घेऊन हजर होतात. आतापर्यंत तीनचारशे पत्रिका टायपून सराईत झालेला डीटीपी आपरेटर भराभरा कीबोर्ड बडवत काकांनाच सल्ले देऊ लागतो. “जावयांचे नांव कार्यवाहात टाका हो. ते स्वागतोत्सुक नसतात.” “ गल्लीतल्या मंडळाचे नांव व्यवस्थापक म्हणून करतो“ “आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं, जुनं झालं आता. बालनिमंत्रक नाहीतर किलबिल टाका.” “प्रतापरावांना दोन बायका आहेत काय़? महिरपी कंस करतो मग.” “गं. भा. करु का श्रीमती? ते सेंटरला घ्यावे लागेल.” “सचिन नितीनचे लग्न झाले नाही ना अजून मग श्री. नको, चि. करतो. आगामी आकर्षण आहेत ना ते.” या लग्नपत्रिकातील मजकुरांचे इतके संकेत आणि प्रकार आहेत की त्यावरसुध्दा एखादी पीएचडी व्हावी. एकदाचे मजकुराचे प्रुफ पाहिल्यावर काकांचे माझ्याबरोबर हिशोब चालू होतात. “आज पत्रिका छाप, उद्या पाकीट मग परवा सकाळी येतो न्यायला.” “अहो काका असे नसते हो. मी वेगळ्या प्रकारच्या पत्रिका छापतो. आणि अजून दोन महिने आहेत की लग्नाला.” “तुमचे छापायचे काम म्हणजे महिनाभर थांब असेच असते रे. पण वेगळ्या म्हणजे अजून कसल्या करतोस बाबा?” “अहो मी फोर कलरचे काम करतो फक्त. तुम्ही म्हणता त्या रेडीमेड पत्रिका असतात.” परत काकांचे प्रश्नचिन्ह. “जरा सांग तरी डिटेलमध्ये रे. काय काय करता तुम्ही लोक?” आता बघा तुम्हीच. आता हा मजकूर टाइप झाल्यावर एकदा वाचून बघणार, मग डिझाइनसाठी घेतली जाते a म्हणजे पीसीवरील कोरलड्रॉ फोटोशॉप हि अ‍ॅप्लिकेशन वापरून, काही स्कॅनड इमेजेस, काही फोटोग्राफ वा क्लीपआर्टस वापरून एक जशी पत्रिका दिसते त्याप्रमाणे तयार होते. b या कामात डिझाइनिंगचे आणि व्हिज्युअलायझिंगचे कौशल्य लागते तसेच कागदांच्या साइज, प्रिंटिंगचे ज्ञान, मशीनच्या साइज आणि इतर तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे देखील गरजेचे असते. हे सर्व सीएमवायके फॉर्मॅटमध्ये होते. आऊटपुट फाइल्स tiff, pdf किंवा cdr फॉर्मॅटमध्ये सेव्ह केल्या जातात. यांचे रेझोल्युशन उच्च असते (३०० ते ६०० डीपीआय, सेम साइज) हे काम पूर्ण झात्यानंतर त्याचा एक कलर प्रिंट काढून तो प्रुफरिडिंगसाठी ग्राहकाला दिला जातो. शक्यतो एका ग्राहकासाठी दोन अथवा तीन वेगवेगळी डिझाइन्स केली जातात. त्यातील मजकूरांच्या चुका, डिझाइनमधील इतर काही चुका दुरुस्त केल्या जातात. कधीकधी पूर्ण डिजाइन बदलले जाते. (माझ्यावर अशी वेळ आजपर्यंत तरी आली नाही, शक्यतो सुरुवातीला केलेलेच पसंत पडते असा अनुभव आहे.) c (कलरप्रिंटसाठी व शॉर्टरन प्रिंटिंगसाठी हा कलर प्रिंटर) हा मसुदा एकदा पक्का झाला की ग्राहकाचे काम पैसे देऊन तयार पत्रिका ताब्यात घेणे एवढेच उरते. आता आमचे खरे काम सुरु होते. ग्राहकाच्या अपरोक्ष कामाच्या सुरुवातीलाच बराच विचार केलेला असतो, जसे की पेपर साईज, कटींग, लॅमिनेशन, एन्हवलप आदी. कारण कागद आणि कार्ड ठराविक साईजमध्येच बाजारात उपलब्ध असतात. d उदा. कार्ड २२x२८, कागद १८x२३, १५x२०, १७x२७ ह्या इतर आकारात पण काही खास पेपर्स उपलब्ध असतात. १८x२३ इंच ह्या आकारालाच डेमी म्हणले जाते. सर्वांना माहीत असलेला ए४ हा १८x२३ चा साधारणपणे एक चतुर्थांश असतो. त्यामुळे हा विचार करुनच पत्रिकेची साईज ठरवली जाते. पत्रिकेसाठी किंवा ब्रोशर्ससाठी २५० जीएसएम(ग्रॅम/स्क्वेअर मीटर) आर्टकार्ड म्हणजे दोन्ही बाजूने चमक असणारा जाड कागद वापरला जातो. कमीत कमी कागदात, कमीत कमी प्रिंटींग मध्ये आणि कमीत कमी कागदाचा तुकडा वाया घालवून अपेक्षित काम करणे हेच यशस्वी प्रिंटरचे ध्येय असते. पीसीवर केलेले डिझाइन सीटीपी (कम्प्युटर टू प्लेट) यंत्रावर घेतले जाते. मूळ डिझाइनचे चार रंगात (स्यान, मॅजेण्टा, यलो, ब्लॅक) विभाजन केले जाते. पाचसहा वर्षापूर्वी हेच काम इमेजसेटरने फिल्म काढून त्या फोटोसेन्सिटिव्ह केमिकलने पत्र्याच्या प्लेट बनवून केले जाई. आता सीटीपी ने आपल्या लेसर प्रिंटरसारख्या डायरेक्ट चार प्लेटस मिळतात. इथपर्यंतच्या प्रक्रीयेला प्रीप्रेस म्हणले जाते. f (सीटीपी : कम्प्युटर टू प्लेट) आता ह्या चार प्लेटस ऑफसेट मशीनच्या सिलिंडर्सवर चढविल्या जातात. हि भलीमोठी मशीन्स एकाच वेळी चार रंगी छपाई करणारी असतात. शक्यतो जर्मन, झेक अथवा जापनीज मेकची हि मशीन्स ताशी १०००ते ३००० प्रति छापू शकतात. या क्षेत्रात हायडेलबर्ग, अ‍ॅडॅस्ट, रोलंड, कोमोरी लिथ्रॉन, मित्सुबिशी हि विदेशी मशीन्स जास्त आहेत. ऑटोप्रिंट सारख्या भारतीय कंपन्या कमी आहेत. एकरंगी छपाईत मल्टिलिथ आणि फरिदाबादच्या मशीन्स बर्‍याच ठिकाणी आहेत. मोठ्या मशीनवर एका वेळी तीन चार ऑपरेटर्स आणि हेल्पर्स काम करतात. f (कोमोरी ४ रंगी ऑफसेट मशीन) आता वेळ येते पोस्टप्रेसची. एकदा प्रिंटिंग झाले की त्यावर लॅमिनेशन (प्लास्टिकच्या पातळ फिल्म चा थर) केले जाते. हे थर्मल अथवा गमिंग अशा दोन प्रकारे वेगळ्या मशीनवर केले जाते. यात सुध्दा मॅट अथवा ग्लॉस फिनीश असे पर्याय असतात. j (लॅमिनेशन मशीन) काही वेळा स्पॉट लमिनेशन (डिझाइनचा विवक्षित भाग लॅमिनेशन) केले जाते. हि प्रक्रिया रासायनिक थर चढवून वेगळ्या मशीनवर अथवा स्क्रीन प्रिंटिंग पध्दतीने केली जाते. कधी कधी सोनेरी, चंदेरी, मोतिया रंगाची छपाई जी ऑफसेटवर होत नाही तीपण स्क्रीन प्रिंटिंग ने अथवा मेटॅलिक फिल्म वापरुन केली जाते. एम्बॉसिंग असेल तर त्याचा पण वेगळा डाय व मशीन असते. नंतर वेळ येते कटिंगची. सरळ रेषेत कटिंग असेल तर ते गिलोटीनने केले जाते. या मशीनला धारदार ब्लेड असते. हे मशीन मोटर पावरने, हायड्रॉलिक अथवा न्यूमॅटिक पावरने कागद कापते. आता कम्प्युटराइज्ड कंट्रोल्ड मशीनमुळे या कामातील धोके बरेच कमी झाले आहेत अन्यथा प्रत्येक प्रेसमध्ये एखादी दुर्दैवी कहाणी ऐकावयास मिळते. अजूनही येथे कटरशिवाय दुसर्‍या माणसाने येऊ नये असा संकेत आहे. k (गिलोटीन: पेपर कटिंग मशीन) डिझाइननुसार जर गोल, कर्व असेल तर डाय तयार करावा लागतो. हे डाय पंच एका पंचिंग मशीनवर चढवून असे कटिंग होते. कार्डला घडी घालण्याचे काम (क्रिजिंग) पण याच वेळी होते. काही ठिकाणी जुन्या ट्रेडल मशीनमध्ये पण थोडे फेरफार करून पंचिंग मशीन म्हणून वापरले जाते. l (हा कर्व्ह कटिंगचा व दोन घड्यांचा डायपंच, जो मशीनवर बसवून काम केले जाते.) m पत्रिकेची पाकीटे एका डायमध्ये कापून ती हाताने बनवली जातात. सराईत माणसे ताशी २००० पाकीटे सुध्दा घड्या घालून व चिकटवून तयार करतात. कोर्‍या पाकीटावर छापून अथवा आधी कागदावर छापून त्याची पाकीटे तयार करतात. n नंतर हे पत्रिका, पाकीटे गठ्ठे बांधून ग्राहकांसाठी तयार असतात. o “आता सांगा काका, कधी येता डिझाइन बघायला आणि त्यानंतर पत्रिका न्यायला?” “तूच हे सगळं झाल्यावर फोन करून सांग बाबा आणि हे घे अ‍ॅडव्हान्स.” .................................................................................................................... (ह्यात रंगीबेरंगी दोरे, गोंडे, मणी, छोट्या मूर्ती, हातकागद, कापड वगैरे वापरून केलेल्या पत्रिका समाविष्ट नाहीत. तो एक स्वतंत्र उद्योग आहे. अशा रेडीमेड पत्रिका घेऊन त्यावर एकरंगी अथवा दुरंगी छपाई करणे हा पण आता सर्वमान्य प्रकार आहे. या प्रकारात बराचशी बंधने असतात. उदा. बहुरंगी छपाई वा फोटोग्राफ्स छापता येत नाहीत. तयार अल्बममधील डिझाइन निवडावे लागते, किंमतीत फरक आदि. सर्वसामान्यपणे प्रिटिंग तंत्राचा हा अगदी छोटासा उपयोग आहे. पुण्यामुंबईसारख्या शहरात हा उद्योग बराचसा प्रगत आहे. सोलापूरमध्ये उपलब्ध तंत्राने सर्वांच्या बघण्यातली लग्नपत्रिका प्रत्यक्षात कशी तयार होते हे सांगायचा माझ्या अल्पमतीने हा छोटासा प्रयत्न. बरेचसे शब्द प्रचलित असल्याने वापरले आहेत, तांत्रिक नांव कदाचित वेगळे असू शकते. काही चित्रे जालावरून साभार. पर्यावरणरक्षकांनो मला माफ करा.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
69437 वाचन

💬 प्रतिसाद (119)

प्रतिक्रिया

कुणाच्या काकु??

जेनी...
Sun, 04/28/2013 - 01:03 नवीन
=)) कुणाच्या काकु?? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लग्नाला यायचं हं असं उत्साहात

बॅटमॅन
Sun, 04/28/2013 - 01:02 नवीन
लग्नाला यायचं हं असं उत्साहात कोण म्हणायलंय? होतकरु, हुश्शार, हॅन्डसम तरुण कोण?
म्हणून म्हणून म्हण्णार कोण? अभ्याशिवाय हायेच कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

गपरे वशाडमेल्या.

अभ्या..
Sun, 04/28/2013 - 01:05 नवीन
गपरे वशाडमेल्या. तुझं पण नाव टाकतो पत्रिकेत. गप्प बस जरा ;) ओ गुर्जी या की आताSSSSS
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हीहीही ओक्के

बॅटमॅन
Sun, 04/28/2013 - 01:11 नवीन
हीहीही ओक्के :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हिहिहि .. अब्या आता तु

जेनी...
Sun, 04/28/2013 - 01:07 नवीन
हिहिहि .. अब्या आता तु म्हण्ला म्हुन मी आपलं मांजं एक निरिक्षाण नोंदवती बर्का ;) म्म्म्म ह्यातल्या वरच्यातल्या क्वालिटीचं वर्गीकरण केलं तं बर्का .. गुर्जि = होतकरु वल्ली = हुशार अब्या = हँडसम ;) बाकीचे गडी बाद :D राग्वु नको बर्का अब्या पण हे माझं निरिक्षणे :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पुढं काय?

अभ्या..
Sun, 04/28/2013 - 01:22 नवीन
=)) =)) =)) हितं काय मिस्टर मिपा चाललेय काय? तू बी आपलं मार्कासहीत जजमेंट सुनवायलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हिहिहि

जेनी...
Sun, 04/28/2013 - 01:23 नवीन
हिहिहि =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

डँबिस बालिका.... =))

अत्रुप्त आत्मा
Sun, 04/28/2013 - 15:21 नवीन
गुर्जि = होतकरु>>> =)) वल्ली = हुशार>>>खिक्क... अब्या = हँडसम smiley>>> ह्हे ह्हे ह्हे... बाकीचे गडी बाद smiley>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अतिशय सुंदर माहिती कथेद्वारे

मेघनाद
Sun, 04/28/2013 - 12:24 नवीन
अतिशय सुंदर माहिती कथेद्वारे छान सांगितलीत साहेब …
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अभ्या..
Mon, 04/29/2013 - 22:50 नवीन
माझ्या आमंत्रणाला प्रतिसाद देणार्‍यांचे सर्वांचे अगदी मनापासून आभार. माझ्या लग्नाची वाट बघणार्‍यांना सुध्दा लवकरच खरे आमंत्रण मिळेल. बाकी हा व्यवसाय जितका लिहिलाय तेवढाही सरळ नाही. एका साध्या पत्रिकेच्या तयार होण्याचा हा मार्ग आहे. हे अगदी सुरळीत होईल असेही नाही. कधी कागदांचा हिशोब चुकतो तर कधी प्लेट प्रिंटींगचा. कधी ऑपरेटर दांडी मारतात तर वीज गुल होते. कामगारांचे आणि मशीनचे मेंटेनन्स बघता बघता एक डोळा रिकव्हरीवर ठेवावा लागतो. एकदा लग्न लागले की कुठलाही ग्राहक पैसे आणून देत नाही. त्याची गरज भागलेली असते. डीझाइनसाठी चार चार दिवस पीडणारे लोक प्रिंटींगसाठी एकही ज्यादा दिवस वाट पहायला तयार नसतात. तरीही कुठे म्यापलिथो, क्रोमो, सिनारमास. डबल्डेमी अशी नावे ऐकली की वेगवेगळ्या आकाराचे, जाडीचे कागद दिसायला लागतात. शेजारी फोनवर कुणी प्लेटा, मास्टर आणि रिमांचा हिशोब सांगू लागला की मन आनंदाने भरुन येते. कागदांच्या गट्ठ्यात आणि शाईच्या वासात जीव अगदी हरखून जातो. स्क्रीन, लिथो, ऑफसेट, रोटो, फ्लेक्सो, ग्रेव्हीअर, डी़जीटल प्रिंटिंग असे कुठलेही प्रिंटिंग नाही की ज्याचे आर्टवर्क मी अजून केलेले नाही. कधी ऑपरेटरांना मस्का लावून तर कधी त्यांच्या शिव्या खाऊन मी बर्‍याच मशीनरी ऑपरेट केल्या आहेत. जरी हा व्यवसाय आयटीइतका ग्लॅमरस नसला तरी नक्कीच क्रीयेटीव्ह आहे. घरात या व्यवसायाची काहीही पार्श्वभूमी नसली तरी लहानपणापासून प्रेस हा प्रकार आवडणारा मी आज त्याच व्यवसायात आहे याचाच मला आनंद आहे. म्हणून पुनःश्च एकदा धन्यवाद सार्‍यांनाच :)
  • Log in or register to post comments

जरी हा व्यवसाय आयटीइतका

बॅटमॅन
Mon, 04/29/2013 - 22:59 नवीन
जरी हा व्यवसाय आयटीइतका ग्लॅमरस नसला तरी नक्कीच क्रीयेटीव्ह आहे.
ग्लॅमरबिमर सोडा ओ, क्रिएटिव्हिटीला वाव अन च्यालेंज महत्वाचे.
घरात या व्यवसायाची काहीही पार्श्वभूमी नसली तरी लहानपणापासून प्रेस हा प्रकार आवडणारा मी आज त्याच व्यवसायात आहे याचाच मला आनंद आहे.
है शाब्बास!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लेख आवडला. माहीती रंजक वाटली.

श्रिया
Mon, 04/29/2013 - 23:02 नवीन
लेख आवडला. माहीती रंजक वाटली. लवकरच तुमच्या लग्नाच्या आमंत्रणाचाही धागा येऊ दे!
  • Log in or register to post comments

छान

दिपक
Tue, 04/30/2013 - 13:48 नवीन
लगीनसराईच्या मोसमात समयोचीत आणि माहीतीपुर्ण लेख आवडला ! :-) शिर्षकाने चकवल होतं.
  • Log in or register to post comments

भारीच हां अभ्या..

यसवायजी
Tue, 12/10/2013 - 21:26 नवीन
भारीच हां अभ्या.. तसं म्याबी ४-५ वरीस स्क्रीन्प्रिंटींग केलंय. बारका हुतो तवा थपाक्-थपाक वर काम बी केलय.. ऑफसेट प्रिंटिंग मचिने मावशीकडे असल्याने या उद्योग सुद्दा जवळुन पाह्यलाय..
  • Log in or register to post comments

भारीच रे.

अभ्या..
Tue, 12/10/2013 - 21:40 नवीन
भारीच रे. आता जर्मनीला जातोयास तर आल्यावर एकदा भेट बाबा. वारीला जाउन आलेल्यान्च्या बी पाया पडताव् आम्ही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

@ आता जर्मनीला जातोयास तर

यसवायजी
Tue, 12/10/2013 - 21:55 नवीन
@ आता जर्मनीला जातोयास तर आल्यावर एकदा भेट बाबा. अरे वारी कधीच झालीय. आता फक्त वरनन चाल्लय. तेवढंच जीके वाढतंय.. टिपी होतुय.. आनी आठवनीतबी र्‍हातया.. @वारीला जाउन आलेल्यान्च्या बी पाया पडताव् आम्ही भेटुयाच कवातर.. पर पाया बिया सोडुन सोडा ओ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

फारच छान माहीती!

पाषाणभेद
गुरुवार, 12/12/2013 - 20:12 नवीन
फारच छान माहीती!
  • Log in or register to post comments

मस्त माहितीपर लेख.

चित्रगुप्त
गुरुवार, 12/12/2013 - 22:03 नवीन
मस्त माहितीपर लेख. सर्वांप्रमाणे आधी स्वतःच्या लग्नाबद्दल आहे, असेच वाटले होते. गेल्या शतकातील पोस्टरे, डब्या-बाटल्यांची-धोत्रांची लेबले, कॅलेंडरे, इ.इ. बद्दल एकादा लेख लिहिता आल्यास बघा.
  • Log in or register to post comments

" माझ्या लग्नाची वाट बघणार्

देशपांडे विनायक
Fri, 12/13/2013 - 11:27 नवीन
" माझ्या लग्नाची वाट बघणार्‍यांना सुध्दा लवकरच खरे आमंत्रण मिळेल." येण्याच्या तयारीला लागू ? जाहीर आमंत्रण वाचून कधी गेलो नाही पण मिपावरचे आमंत्रण ओले वाटते त्यातून सोलापूरचा उल्लेख हळवे करून जातो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा