Skip to main content

लग्नाला यायचं हं!

लेखक अभ्या.. यांनी शुक्रवार, 26/04/2013 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी शेजारी राहणाऱ्या पाटीलकाकांचा फोन आला. “अरे मुलीचे लग्न ठरलेय रे. तू पत्रिका छापतोस ना?” “काका कामाचा ताण आहे हो खूप, वेळ लागेल.” “ते लोकांना सांग रे. मला नको. उद्या मजकूर ऑफिसात आणून देतो. दोन दिवसात छापून दे लगेच.” एकतर प्रिंटिंगचे कुठलेच काम टाळू वाटत नाही त्यात हे काम जवळ जवळ घरचे असल्यासारखेच, मी हो म्हणून टाकतो. दुसरे दिवशी काका दोन फुलस्केप कागदावर लिहिलेला मजकूर घेऊन हजर होतात. आतापर्यंत तीनचारशे पत्रिका टायपून सराईत झालेला डीटीपी आपरेटर भराभरा कीबोर्ड बडवत काकांनाच सल्ले देऊ लागतो. “जावयांचे नांव कार्यवाहात टाका हो. ते स्वागतोत्सुक नसतात.” “ गल्लीतल्या मंडळाचे नांव व्यवस्थापक म्हणून करतो“ “आमच्या ताईच्या लग्नाला यायचं हं, जुनं झालं आता. बालनिमंत्रक नाहीतर किलबिल टाका.” “प्रतापरावांना दोन बायका आहेत काय़? महिरपी कंस करतो मग.” “गं. भा. करु का श्रीमती? ते सेंटरला घ्यावे लागेल.” “सचिन नितीनचे लग्न झाले नाही ना अजून मग श्री. नको, चि. करतो. आगामी आकर्षण आहेत ना ते.” या लग्नपत्रिकातील मजकुरांचे इतके संकेत आणि प्रकार आहेत की त्यावरसुध्दा एखादी पीएचडी व्हावी. एकदाचे मजकुराचे प्रुफ पाहिल्यावर काकांचे माझ्याबरोबर हिशोब चालू होतात. “आज पत्रिका छाप, उद्या पाकीट मग परवा सकाळी येतो न्यायला.” “अहो काका असे नसते हो. मी वेगळ्या प्रकारच्या पत्रिका छापतो. आणि अजून दोन महिने आहेत की लग्नाला.” “तुमचे छापायचे काम म्हणजे महिनाभर थांब असेच असते रे. पण वेगळ्या म्हणजे अजून कसल्या करतोस बाबा?” “अहो मी फोर कलरचे काम करतो फक्त. तुम्ही म्हणता त्या रेडीमेड पत्रिका असतात.” परत काकांचे प्रश्नचिन्ह. “जरा सांग तरी डिटेलमध्ये रे. काय काय करता तुम्ही लोक?” आता बघा तुम्हीच. आता हा मजकूर टाइप झाल्यावर एकदा वाचून बघणार, मग डिझाइनसाठी घेतली जाते a म्हणजे पीसीवरील कोरलड्रॉ फोटोशॉप हि अ‍ॅप्लिकेशन वापरून, काही स्कॅनड इमेजेस, काही फोटोग्राफ वा क्लीपआर्टस वापरून एक जशी पत्रिका दिसते त्याप्रमाणे तयार होते. b या कामात डिझाइनिंगचे आणि व्हिज्युअलायझिंगचे कौशल्य लागते तसेच कागदांच्या साइज, प्रिंटिंगचे ज्ञान, मशीनच्या साइज आणि इतर तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे देखील गरजेचे असते. हे सर्व सीएमवायके फॉर्मॅटमध्ये होते. आऊटपुट फाइल्स tiff, pdf किंवा cdr फॉर्मॅटमध्ये सेव्ह केल्या जातात. यांचे रेझोल्युशन उच्च असते (३०० ते ६०० डीपीआय, सेम साइज) हे काम पूर्ण झात्यानंतर त्याचा एक कलर प्रिंट काढून तो प्रुफरिडिंगसाठी ग्राहकाला दिला जातो. शक्यतो एका ग्राहकासाठी दोन अथवा तीन वेगवेगळी डिझाइन्स केली जातात. त्यातील मजकूरांच्या चुका, डिझाइनमधील इतर काही चुका दुरुस्त केल्या जातात. कधीकधी पूर्ण डिजाइन बदलले जाते. (माझ्यावर अशी वेळ आजपर्यंत तरी आली नाही, शक्यतो सुरुवातीला केलेलेच पसंत पडते असा अनुभव आहे.) c (कलरप्रिंटसाठी व शॉर्टरन प्रिंटिंगसाठी हा कलर प्रिंटर) हा मसुदा एकदा पक्का झाला की ग्राहकाचे काम पैसे देऊन तयार पत्रिका ताब्यात घेणे एवढेच उरते. आता आमचे खरे काम सुरु होते. ग्राहकाच्या अपरोक्ष कामाच्या सुरुवातीलाच बराच विचार केलेला असतो, जसे की पेपर साईज, कटींग, लॅमिनेशन, एन्हवलप आदी. कारण कागद आणि कार्ड ठराविक साईजमध्येच बाजारात उपलब्ध असतात. d उदा. कार्ड २२x२८, कागद १८x२३, १५x२०, १७x२७ ह्या इतर आकारात पण काही खास पेपर्स उपलब्ध असतात. १८x२३ इंच ह्या आकारालाच डेमी म्हणले जाते. सर्वांना माहीत असलेला ए४ हा १८x२३ चा साधारणपणे एक चतुर्थांश असतो. त्यामुळे हा विचार करुनच पत्रिकेची साईज ठरवली जाते. पत्रिकेसाठी किंवा ब्रोशर्ससाठी २५० जीएसएम(ग्रॅम/स्क्वेअर मीटर) आर्टकार्ड म्हणजे दोन्ही बाजूने चमक असणारा जाड कागद वापरला जातो. कमीत कमी कागदात, कमीत कमी प्रिंटींग मध्ये आणि कमीत कमी कागदाचा तुकडा वाया घालवून अपेक्षित काम करणे हेच यशस्वी प्रिंटरचे ध्येय असते. पीसीवर केलेले डिझाइन सीटीपी (कम्प्युटर टू प्लेट) यंत्रावर घेतले जाते. मूळ डिझाइनचे चार रंगात (स्यान, मॅजेण्टा, यलो, ब्लॅक) विभाजन केले जाते. पाचसहा वर्षापूर्वी हेच काम इमेजसेटरने फिल्म काढून त्या फोटोसेन्सिटिव्ह केमिकलने पत्र्याच्या प्लेट बनवून केले जाई. आता सीटीपी ने आपल्या लेसर प्रिंटरसारख्या डायरेक्ट चार प्लेटस मिळतात. इथपर्यंतच्या प्रक्रीयेला प्रीप्रेस म्हणले जाते. f (सीटीपी : कम्प्युटर टू प्लेट) आता ह्या चार प्लेटस ऑफसेट मशीनच्या सिलिंडर्सवर चढविल्या जातात. हि भलीमोठी मशीन्स एकाच वेळी चार रंगी छपाई करणारी असतात. शक्यतो जर्मन, झेक अथवा जापनीज मेकची हि मशीन्स ताशी १०००ते ३००० प्रति छापू शकतात. या क्षेत्रात हायडेलबर्ग, अ‍ॅडॅस्ट, रोलंड, कोमोरी लिथ्रॉन, मित्सुबिशी हि विदेशी मशीन्स जास्त आहेत. ऑटोप्रिंट सारख्या भारतीय कंपन्या कमी आहेत. एकरंगी छपाईत मल्टिलिथ आणि फरिदाबादच्या मशीन्स बर्‍याच ठिकाणी आहेत. मोठ्या मशीनवर एका वेळी तीन चार ऑपरेटर्स आणि हेल्पर्स काम करतात. f (कोमोरी ४ रंगी ऑफसेट मशीन) आता वेळ येते पोस्टप्रेसची. एकदा प्रिंटिंग झाले की त्यावर लॅमिनेशन (प्लास्टिकच्या पातळ फिल्म चा थर) केले जाते. हे थर्मल अथवा गमिंग अशा दोन प्रकारे वेगळ्या मशीनवर केले जाते. यात सुध्दा मॅट अथवा ग्लॉस फिनीश असे पर्याय असतात. j (लॅमिनेशन मशीन) काही वेळा स्पॉट लमिनेशन (डिझाइनचा विवक्षित भाग लॅमिनेशन) केले जाते. हि प्रक्रिया रासायनिक थर चढवून वेगळ्या मशीनवर अथवा स्क्रीन प्रिंटिंग पध्दतीने केली जाते. कधी कधी सोनेरी, चंदेरी, मोतिया रंगाची छपाई जी ऑफसेटवर होत नाही तीपण स्क्रीन प्रिंटिंग ने अथवा मेटॅलिक फिल्म वापरुन केली जाते. एम्बॉसिंग असेल तर त्याचा पण वेगळा डाय व मशीन असते. नंतर वेळ येते कटिंगची. सरळ रेषेत कटिंग असेल तर ते गिलोटीनने केले जाते. या मशीनला धारदार ब्लेड असते. हे मशीन मोटर पावरने, हायड्रॉलिक अथवा न्यूमॅटिक पावरने कागद कापते. आता कम्प्युटराइज्ड कंट्रोल्ड मशीनमुळे या कामातील धोके बरेच कमी झाले आहेत अन्यथा प्रत्येक प्रेसमध्ये एखादी दुर्दैवी कहाणी ऐकावयास मिळते. अजूनही येथे कटरशिवाय दुसर्‍या माणसाने येऊ नये असा संकेत आहे. k (गिलोटीन: पेपर कटिंग मशीन) डिझाइननुसार जर गोल, कर्व असेल तर डाय तयार करावा लागतो. हे डाय पंच एका पंचिंग मशीनवर चढवून असे कटिंग होते. कार्डला घडी घालण्याचे काम (क्रिजिंग) पण याच वेळी होते. काही ठिकाणी जुन्या ट्रेडल मशीनमध्ये पण थोडे फेरफार करून पंचिंग मशीन म्हणून वापरले जाते. l (हा कर्व्ह कटिंगचा व दोन घड्यांचा डायपंच, जो मशीनवर बसवून काम केले जाते.) m पत्रिकेची पाकीटे एका डायमध्ये कापून ती हाताने बनवली जातात. सराईत माणसे ताशी २००० पाकीटे सुध्दा घड्या घालून व चिकटवून तयार करतात. कोर्‍या पाकीटावर छापून अथवा आधी कागदावर छापून त्याची पाकीटे तयार करतात. n नंतर हे पत्रिका, पाकीटे गठ्ठे बांधून ग्राहकांसाठी तयार असतात. o “आता सांगा काका, कधी येता डिझाइन बघायला आणि त्यानंतर पत्रिका न्यायला?” “तूच हे सगळं झाल्यावर फोन करून सांग बाबा आणि हे घे अ‍ॅडव्हान्स.” .................................................................................................................... (ह्यात रंगीबेरंगी दोरे, गोंडे, मणी, छोट्या मूर्ती, हातकागद, कापड वगैरे वापरून केलेल्या पत्रिका समाविष्ट नाहीत. तो एक स्वतंत्र उद्योग आहे. अशा रेडीमेड पत्रिका घेऊन त्यावर एकरंगी अथवा दुरंगी छपाई करणे हा पण आता सर्वमान्य प्रकार आहे. या प्रकारात बराचशी बंधने असतात. उदा. बहुरंगी छपाई वा फोटोग्राफ्स छापता येत नाहीत. तयार अल्बममधील डिझाइन निवडावे लागते, किंमतीत फरक आदि. सर्वसामान्यपणे प्रिटिंग तंत्राचा हा अगदी छोटासा उपयोग आहे. पुण्यामुंबईसारख्या शहरात हा उद्योग बराचसा प्रगत आहे. सोलापूरमध्ये उपलब्ध तंत्राने सर्वांच्या बघण्यातली लग्नपत्रिका प्रत्यक्षात कशी तयार होते हे सांगायचा माझ्या अल्पमतीने हा छोटासा प्रयत्न. बरेचसे शब्द प्रचलित असल्याने वापरले आहेत, तांत्रिक नांव कदाचित वेगळे असू शकते. काही चित्रे जालावरून साभार. पर्यावरणरक्षकांनो मला माफ करा.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 69679
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

>> . हे सर्व सीएमवायके फॉर्मॅटमध्ये होते. सी.एम.वाउ.के. म्हणजे सियॉन, मजेंटा, यलो आणि ब्लॅक ना? फार पूर्वी पासून मला एक प्रश्न छळत आलाय. की स्क्रीनवरच्या रंगांसाठी बहुतेक वेळा आर.जी.बी. (रेड, ग्रीन, ब्ल्यु) वापरतात. पण फोटोशॉप, कोरल वगैरे स्पेशलाइझ्ड सॉफ्टवेअर्स सीएमवायके का वापरतात? त्याचा नेमका फायदा काय? आणखी एक म्हणजे स्क्रीन वर एकावर एक रंग मारत गेल्यास शेवट पांढरा रंग बनतो. त्याविरुद्ध कागदावर एकावर एक रंग मारत गेल्यास शेवटी काळा रंग होतो. म्हणजे जो रंग स्क्रीनवर दिसतो आहे नेमका तोच रंग (शेड) कागदावर तस्साच दिसेल असं नाही. मग ही गॅप टाळण्यासाठी नक्की काय करतात ? (एके काळी थोडं कलर कॅलिब्रेशन मधे काम केलेला )

In reply to by मराठे

सी एम वाय के वा आर जी बी अशी दोनच मॉडेल नाहीत. अनेक आहेत. जास्त लोकप्रिय आहेत ही दोन.आर जी बी चा ही फोटो छापता येतो पण त्यातील काळा रंग भुरकट काळा रंग येतो. सबब कमर्शियल कामात मुद्रणासाठी आर जी बी वापरले जात नाही. तेथे सायन,मॅजेंटा, यलो व ब्लॅक असे चार वेळा वेगवेगळे मुद्रण होते. सांगणे न लगे की त्याच्या फोटोत ही चार चॅनेल्स असतात. हौशी लोकानी एकदा आर जी बी च सीएमवायके दोन्ही मुद्र्ण करून पहावे. फरक दिसेलच !

हे लेखन खूपच आवडले. मी लहान असताना काही नातलगांकडे प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय होता. ऑफसेट प्रिंटींग वापरले जायचे. तू सांगितलेले व त्या काळात अस्तित्वात असलेले बरेच प्रकारचे पत्रिकांचे प्रिंटींग मी डोळ्याने पाहिलेले आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर, अगोदरच्या वर्षातील वह्यांची कोरी पाने एकत्र करून त्यांच्याकडून एका आकारामध्ये कापून व बांइंडींग करून रफ वही पण बनवून घ्यायचो. ते गिलोटीन ज्या क्रूरतेने कागदी गठ्ठे कापत असे त्याच्या जवळ जायलाही भय वाटायचं. त्या काळात अक्षरजुळणी फारच त्रासदायक प्रकार होता. दोन दशकांपूर्वीच्या एका हिंदी चित्रपटात (बहुधा प्रतिघात) पोलिस असलेल्या नायकाचा मित्र मारला जाण्यापूर्वी प्रिंटींग प्रेसमध्ये अक्षर जुळणी करून शेवटचा संदेश ठेवतो. योगायोगाने नायक तेथे आल्यावर त्याच्या हाताचा पंजा त्या सेट करून ठेवलेल्या अक्षरांवर पडतो अन त्याला तो संदेश मिळतो. ९० च्या दशकात डिटीपीचे आगमन झाले अन ऑफसेट प्रिंटींगला येत गेलेली अवकळा मी पाहिली आहे. अजून येऊदे तुझे या क्षेत्रातले अनुभव. बाकी अशी फसवी शीर्षके का वापरतोस रे, उद्या लांडगा आला रे आला असे नको व्हायला..

In reply to by श्रीरंग_जोशी

थोडीशी गफलत होतीय श्रीरंगा. अस्तंगत झालेले ते ऑफसेट नव्हे, ते लेटरप्रेस. ते ट्रेडल मशीनवर उभे राहून छापायचे, त्यावर एक मोठी रंगाची फिरती तवकडी असायची आणि त्यावरचे रोलर. उलटे खिळे जुळवून त्याचा ठसा कागदावर घ्यायची ती जॉन गटेनबर्गची आद्य पध्दत. खरेतर डीटीपी सुरु झाल्यापासून ऑफसेटला सोनेरी दिवस आले. कारण प्रीप्रेसचा खर्चच कमी झाला. डीटीपीचा अर्थच मुळी डेस्क टॉप पब्लिशिंग आहे. म्हणजे जे काम करायला एखादी मोठी खोली आणि भारंभार यंत्रे लागायची ते आता एका मेजावर (पीसी) होते. बाकी शीर्षकातला लांडगा गुपचूप येऊन जाणारे. ;)

In reply to by अभ्या..

बरोबर आहे तुझे, अभ्या. लेटरप्रेस प्रकार होता तो. मोठ्या यंत्राशेजारी एक माणूस उभा रहायचा अन प्रत्येक पान छापून (शाई लावलेला अक्षरांच्या आरशातल्या प्रतिबिबांचा साचा त्यावर दाबून) झाले की ते काढून कोरे पान ठेवायचा.

शीर्षक वाचून उत्सुकता ताणली गेली. :) लेख उत्तम झालाय. वेगळ्या विषयावर आणि संबंधीत असूनही जास्त माहिती नसलेला विषय आहे हा. आता पुढचा भाग येऊ दे. - नीलकांत

अभ्या, सगळ्यांना तुझ्या लग्नाची बघ किती काळजी! लेख मस्तच झालाय. लग्नपत्रिकेतला मजकूर, फ्लेक्स वरचे साहित्यिक मजकूर यांच्यावर पण एक खुसखुशीत लेख यूंद्या...

माहीतीपुर्ण लेख आहे :). मला वाटले की तुम्च्या लग्नाचे जाहिर निमंत्रण आहे.

मी १० वी मधे असताना
स्र्कीन पेन्टीग
च काम केले आहे. हे खुप च मस्त आहे.

छान छान. टेक्नीकल काही समजत नाही फारसं...म्हणजे नाहीच. असो. लग्नाचा सिझन येउ घातलाय म्हणुन ही झैरात चांगली केलीये.

व्वा! असे तंत्रज्ञान समजावून सांगणारे अजून लेख येऊ द्यात. मजा येते वाचताना. ज्ञानात भर पडते.

पत्रिका चांगल्या प्रिंटर कडे टाका हो. नाहीतर शेवटी सगळ्यांनी लग्नाला यायच ऐवजी तिकिट विक्रि चालू आहे असे छापलेले यायचे. सौजन्य - नारायण

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रकाशकाका तसल्या गफलतींचा जमाना गेला आता. ;) लोक एखादा ऊकारपण चुकलेल्या पत्रिका घेत नाहीत किंवा पैसे द्यायची टाळाटाळी करतात. त्यासाठी प्रत्येक प्रुफावर असा शिक्का मारुन ग्राहकाची/तपासणार्‍याची सही घेतल्याशिवाय आम्ही छापतच नाही. :) a

In reply to by अभ्या..

पुर्वी मुद्राराक्षसाचे विनोद किंवा उपसंपादकाच्या डुलक्या अशा शीर्षकात असे किस्से यायचे. माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकात 'एकीचे नक्षत्र बदल्याने..... 'च्या ऐवजी 'एकीचे वस्त्र बदलल्याने.. असे छापले गेले आहे ते आठवले. स्वगतः चला या निमित्ताने स्वतःच्या पुस्तकाची टिमकी वाजवून घेतलीच की

एक चांगला लेख वाचला. मराठीत असे लेख कमी वाचायला मिळतात. नवीन शिकणार्‍यांना उपयुक्त. अभीनंदन. अश्या लेखकांना प्रोत्साहन द्यावे. हल्ली असे माहीतिपुर्ण लेख मिपावर येतात. त्यामुळे माझ्या सारखा कधीतरी मिपावर लिहीणार्‍याला आनंद वाटतो. धन्यवाद.

In reply to by आप्पा

अश्या लेखकांना प्रोत्साहन द्यावे.
=)) =)) =)) =)) सगळी शीर्षकाची करामत आहे आप्पा. ;) 'प्रतिरुप छपाई पध्दतीने रंगीत छपाईचे तंत्र' हे शीर्षक दिले असते तर टोटल पाच प्रतिसाद मिळायची चोरी झाली असती. ;) तुम्हाला आणि मला स्वतःला पण धन्यवाद आपल्यासारख्यांना इथे लिहायला आनंद वाटल्याबद्दल. ;)

पाहिलत :-/ एवढा त्रास असतो छ्पाईकर्तास्नी :-/ म्हुन मी माझ्या लग्नात पत्रिकाच छप्ली नै :-/ सर्रळ मेल करुन इन्वीटेशनवलं :प

In reply to by जेनी...

हिच तेवढी एकटी हुश्शार हाय. =)) =)) बाकी हिची आयडीया बी काय वाईट नाय. म्या पण 'हलवायाला डायबेटीस असतो" ह्यो नियम पाळणारे. ;)

अभ्याच्या लग्नाची चर्चा इतकी झालेली पाहून त्याला लगेच लग्न करून टाकावे (आणि प्रश्नोत्तरे बंद करावित)असे वाटल्यास नवल नाही. ;)

In reply to by रेवती

णकोरे अब्या :-/ असा लगेच लग्नाचा निर्नय नक्कू घ्युस :-/ इकडचे प्रश्न बंद करशिल ... पण तिक्कड्चे चालु होतिल :-/ :-/

In reply to by जेनी...

अभ्याने आत्ता लग्न करू देत नाहीतर चार सहा महिन्यांनी! प्रश्नोत्तरे कुठेतरी चालूच रहाणार ना पुजाजी! आत्ता पत्रिका स्वस्तात छापून होतील हा फायदा बघा ना! ;) पाहिजेतर मुलीकंडच्यांनाही डिस्काऊंट देवू, म्हणजे तेही खूष! इंप्रेशन जमेगा. ;)

In reply to by रेवती

आता स्वस्तात छापून होतील म्हणजे कळले नाही ओ रेवतीतै. मी काय मिपासाठी स्कीम बिम नाय काढलेली. हा माझा कायमसाठीचा धंदा आहे छपाईचा. कागदाचे रेट दरवर्षी वाढतेत हे खरं म्हणून काय आधीच छापून ठेवू की काय पत्रिका? बाकी प्रश्नांचे म्हणताल तर हर सवाल का जवाब है अपने पास ;)

In reply to by जेनी...

बघ पूजा, आसं हाल असतेत बग एखांद्या होतकरु, हुश्शार, हॅन्डसम तरुणाचे ;) मीच एकटा बिनलग्नाचा हाय काय हितं. त्या बॅट्याला, स्पावड्याला, वल्लीला, गुर्जींना पण ओढा की रिंगणात. ;)

In reply to by अभ्या..

लग्नाला यायचं हं असं उत्साहात कोण म्हणायलंय? होतकरु, हुश्शार, हॅन्डसम तरुण कोण? म्हणून इतर बिनलग्नाचे असले तरी सुपरमार्केट (हे ब्याम्या कडून) उठवायचं कुणाचं??????????? होतात ना गुदगुल्या? ;)

In reply to by अभ्या..

अवघड आहे. कृ शि सा न वि वि. तंगड्या ठिवा कौन्टरवर. दर्शन घितो.

In reply to by प्यारे१

लग्नाला यायचं हं असं उत्साहात कोण म्हणायलंय? होतकरु, हुश्शार, हॅन्डसम तरुण कोण?
म्हणून म्हणून म्हण्णार कोण? अभ्याशिवाय हायेच कोण?

In reply to by अभ्या..

हिहिहि .. अब्या आता तु म्हण्ला म्हुन मी आपलं मांजं एक निरिक्षाण नोंदवती बर्का ;) म्म्म्म ह्यातल्या वरच्यातल्या क्वालिटीचं वर्गीकरण केलं तं बर्का .. गुर्जि = होतकरु वल्ली = हुशार अब्या = हँडसम ;) बाकीचे गडी बाद :D राग्वु नको बर्का अब्या पण हे माझं निरिक्षणे :-/

माझ्या आमंत्रणाला प्रतिसाद देणार्‍यांचे सर्वांचे अगदी मनापासून आभार. माझ्या लग्नाची वाट बघणार्‍यांना सुध्दा लवकरच खरे आमंत्रण मिळेल. बाकी हा व्यवसाय जितका लिहिलाय तेवढाही सरळ नाही. एका साध्या पत्रिकेच्या तयार होण्याचा हा मार्ग आहे. हे अगदी सुरळीत होईल असेही नाही. कधी कागदांचा हिशोब चुकतो तर कधी प्लेट प्रिंटींगचा. कधी ऑपरेटर दांडी मारतात तर वीज गुल होते. कामगारांचे आणि मशीनचे मेंटेनन्स बघता बघता एक डोळा रिकव्हरीवर ठेवावा लागतो. एकदा लग्न लागले की कुठलाही ग्राहक पैसे आणून देत नाही. त्याची गरज भागलेली असते. डीझाइनसाठी चार चार दिवस पीडणारे लोक प्रिंटींगसाठी एकही ज्यादा दिवस वाट पहायला तयार नसतात. तरीही कुठे म्यापलिथो, क्रोमो, सिनारमास. डबल्डेमी अशी नावे ऐकली की वेगवेगळ्या आकाराचे, जाडीचे कागद दिसायला लागतात. शेजारी फोनवर कुणी प्लेटा, मास्टर आणि रिमांचा हिशोब सांगू लागला की मन आनंदाने भरुन येते. कागदांच्या गट्ठ्यात आणि शाईच्या वासात जीव अगदी हरखून जातो. स्क्रीन, लिथो, ऑफसेट, रोटो, फ्लेक्सो, ग्रेव्हीअर, डी़जीटल प्रिंटिंग असे कुठलेही प्रिंटिंग नाही की ज्याचे आर्टवर्क मी अजून केलेले नाही. कधी ऑपरेटरांना मस्का लावून तर कधी त्यांच्या शिव्या खाऊन मी बर्‍याच मशीनरी ऑपरेट केल्या आहेत. जरी हा व्यवसाय आयटीइतका ग्लॅमरस नसला तरी नक्कीच क्रीयेटीव्ह आहे. घरात या व्यवसायाची काहीही पार्श्वभूमी नसली तरी लहानपणापासून प्रेस हा प्रकार आवडणारा मी आज त्याच व्यवसायात आहे याचाच मला आनंद आहे. म्हणून पुनःश्च एकदा धन्यवाद सार्‍यांनाच :)

In reply to by अभ्या..

जरी हा व्यवसाय आयटीइतका ग्लॅमरस नसला तरी नक्कीच क्रीयेटीव्ह आहे.
ग्लॅमरबिमर सोडा ओ, क्रिएटिव्हिटीला वाव अन च्यालेंज महत्वाचे.
घरात या व्यवसायाची काहीही पार्श्वभूमी नसली तरी लहानपणापासून प्रेस हा प्रकार आवडणारा मी आज त्याच व्यवसायात आहे याचाच मला आनंद आहे.
है शाब्बास!! :)

लगीनसराईच्या मोसमात समयोचीत आणि माहीतीपुर्ण लेख आवडला ! :-) शिर्षकाने चकवल होतं.

भारीच हां अभ्या.. तसं म्याबी ४-५ वरीस स्क्रीन्प्रिंटींग केलंय. बारका हुतो तवा थपाक्-थपाक वर काम बी केलय.. ऑफसेट प्रिंटिंग मचिने मावशीकडे असल्याने या उद्योग सुद्दा जवळुन पाह्यलाय..

In reply to by यसवायजी

भारीच रे. आता जर्मनीला जातोयास तर आल्यावर एकदा भेट बाबा. वारीला जाउन आलेल्यान्च्या बी पाया पडताव् आम्ही :)

In reply to by अभ्या..

@ आता जर्मनीला जातोयास तर आल्यावर एकदा भेट बाबा. अरे वारी कधीच झालीय. आता फक्त वरनन चाल्लय. तेवढंच जीके वाढतंय.. टिपी होतुय.. आनी आठवनीतबी र्‍हातया.. @वारीला जाउन आलेल्यान्च्या बी पाया पडताव् आम्ही भेटुयाच कवातर.. पर पाया बिया सोडुन सोडा ओ..

मस्त माहितीपर लेख. सर्वांप्रमाणे आधी स्वतःच्या लग्नाबद्दल आहे, असेच वाटले होते. गेल्या शतकातील पोस्टरे, डब्या-बाटल्यांची-धोत्रांची लेबले, कॅलेंडरे, इ.इ. बद्दल एकादा लेख लिहिता आल्यास बघा.

" माझ्या लग्नाची वाट बघणार्‍यांना सुध्दा लवकरच खरे आमंत्रण मिळेल." येण्याच्या तयारीला लागू ? जाहीर आमंत्रण वाचून कधी गेलो नाही पण मिपावरचे आमंत्रण ओले वाटते त्यातून सोलापूरचा उल्लेख हळवे करून जातो