राक्षस रसायनाची गोष्ट.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
9 Jul 2008 - 8:39 pm

तसा मी सुखी गृहस्थ आहे. सरकारी नोकरी.कस्टम्स मध्ये. जेनपीटी (उरण)ला अप्रेजर.मुंबईत राह्यचं. सुटीत पुण्याचं घर. सुंदर बायको.एक मुलगा. त्याचंही शिक्षण पूर्ण होत आलं आहे.पैसा गाठीशी बांधलेला आहे. दहा वर्षं बाकी नोकरीची. नंतर पेन्शन आहे.सगळं काही सेट झालेलं आहे.संध्याकाळी दोन पेग . रविवारी साडेतीन.राक्षस रसायनाची आठवण व्हावी असं काहीच झालं नव्हतं.
आता राक्षस रसायनाची गंमत काय आहे ते आधी सांगतो. उरण ला पोस्टींग झालं तेव्हा बोकडविर्‍याजवळ आमचं जुनं घर आहे तिथं फेर्‍या वाढल्या. हे आमचं आजोबांचं घर.साठ सत्तर वर्ष जुनं. मी फारसा या घरी कधी गेलो नव्हतो. आजोबा बरीच वर्षं एकटेच राहत होते. त्यांच्यावर जबाबदार्‍या आहेत असं सांगायचे.आजी नव्हतीच. पण तरी जबाबदार्‍या कसल्या. बाबांनी विचारलं नाही. मी तर लहानच होतो.तर सांगायचं काय तर घर तसंच. रिकामं बंद घर. पण चोरी नाही. आजोबांच एक रेप्युटेशन वेगळंच.सांगायचं काय तर
या घरात मला राक्षस रसायनाचा बुधला मिळाला. त्यासोबत एक छोटी पोथी पण . जुन्या मराठी भाषेत.मला वाचून कळलं की यातले रसायन प्राशन केल्यास प्रचंड राक्षसी ताकद प्राप्त होते.जे मनात धरू ते साध्यं सिध्दम्.
त्या दिवशी दुपारी श्रवण पटनाईक भेटायला आला होता.आमचाच एक अप्रेजर.आमच्यात न बसणारा. त्याचे करीयर खूप चांगले. ओरीसातून बालासोरजवळच्या खेड्यातून आलेला डायरेक्ट रीक्रूट.इंपोर्टर याला जाम घाबरायचे. राँग डिक्लेरेशन हा इंपोर्टरचा खरा धंदा असतो. सेटींग असतं वरपासून गेटपर्यंत.घड्याळं खेळणी म्हणून क्लीअर करायची. पटनाईक यात नव्हता ही मोठी अडचण.याच्या डोळ्याला डोळा देणं कठीण काम. माणसाला आरपार बघण्याची ताकद नजरेत.जरब नजरेत. पण स्वच्छ माणूस.
इंपोर्टरची जात हरामी. चार महिन्यापूर्वी गेम सेट करून सस्पेंड करवला.आज परत आला होता. सन्मानानी सुटल्यानंतर.प्रमोशन वर . जेनपीटी ला. तोरा मिरवणं त्याच्या स्वभावात नाही. पण एक सावधानतेची सूचना द्यायला म्हणून आला असावा.
सर , आय नो. यु वर पार्ट ऑफ द कोटरी. लेकीन ध्यान रहे.
मै चोरीसे डरता हूं . कोतवालीसे नही. कोतवाली चार दिनकी.चोरी का दाग मेरे दिलसे नही जाएगा सात जनम.
त्याचं बोलणं असंच गूढ असायचं.
पण येणार्‍या वादळाची सूचना.कुजबुज सुरु झाली.
दुपारपर्यंत दोषारोपण पूर्ण झालं.
मी जबाबदार होतो पटनाईक च्या पुनरागमनासाठी.चार खिळे जास्त मारले असते तर मुडदा पेटीतून बाहेर नसता आला.
परीमार्जन एकच. पटनाईकच्या हाताखाली मी काम करायचं.त्याला सांभाळायचं.थोडक्यात रोजच उत्पन्न बंद. बाकी चोर खूष्. हिस्सा वाटप कमी.पुढच्या वेळेस पेटीत दोन मुडदे असतील. त्यातला एक माझा. मेसेज वॉज क्लीअर.
डोकं भणाणून गेलं.मग आठवलं राक्षस रसायन.बुधला आणला. परत पोथी वाचली . संध्याकाळचा मूहूर्त नेहेमीचा बार . माझ्या आसपास टेबल वर कुणीच नसणार.काहीतरी नविन करतोय असं वाटत होतं पण गंमतही वाटत होती. हा मार्ग नवा होता.
बूच उघडून वाट बघत बसलो.मला वाटलं धूर येणार. धूरातून राक्षस साकार होईल आणि म्हणेल हुकम करो मेरे सरकार. तसं काहीच झालं नाही.पाच मिनीटे वाट पाहून मी कंटाळलो परत एकदा पोथी चाळली. त्यात सांगीतल्यासारखं सगळं काही केलं होतं. मी चिमट्यामध्ये बर्फाचा क्यूब घेऊन ग्लासात टाकणार एव्ह्ढ्यात समोर लक्ष गेलं. क्युब चुबळूक् आवाज करत ग्ग्लासात पडला.समोर तो येऊन बसला होता. तो तोच होता . शंकाच नाही.
जसा राक्षस असतो तसा.
माझ्या मनात जो आकार होता तसाच
तसाच असतो मी तो हळूच म्हणाला,खुर्चीचा हात मी घट्ट धरून ठेवला .
गुळगुळीत टक्कल. हातापायावर लांब केस, जाड भिवया, दोन शिंगं. पाठीमागून वळण घेउन खांद्यावर टाकलेली, टोकदार शेपूट.
काय दिसतो ना राक्षस. ?हाहाहाहा..
एकदा हसून दाखवलं .
मी आजूबाजूला पाहिलं. नव्हतं कुणी बघत .माझ्या काखेत , तळहाताला घाम यायला सुरुवात झाली.उठून पळून जावं वाटत होतं पण पाय थंडगार पडले.जोरात मुतायला लागली.पण उठायचा धीर संपला
राक्षस म्हणाला हा अवतार फक्त तुझ्यापुरता मर्यादीत आहे.
आरशात बघ समोरच्या माझ्यासमोर एक पन्नाशीचा माणूस हातात ग्लास घेउन बसला होता.
हा कोण ?माझा आवाज कापत होता.
मीच ! दुसर्‍याना दिसतोय तो असा.
डोक्यावर दोन चापट्या मारल्या आणि शिंगं आत गेली.शेपूट काढून फोल्ड करून समोर पाकिटात ठेवली. सर्रकन आवाज आला हाता पायावरचे केस पण गेले. वेल्क्रो ..वेल्क्रो ..हसत हसत त्यानी सांगीतलं.आता त्याचा अवतार जरा नॉर्मल वाटायला लागला.मी थोडा सैलावलो.लघवीच सेन्सेशन नाहीस झालं.
प्रोफेशनल अटायर काय करणार बाबा.खरं सांगायचं तर तुझ्या मनात राक्षस आहे चांदोबामधला.
ओके. तरीच तू मला असा दिसतोयस तर.
पण मग खरा खरा दिसतोस तरी कसा?
बघ जरा.आता माझ्यासमोर सफारी घातलेला मध्यम वयीन माणूस होता.सफारी , खिशाला पेन, चश्मा. जवळ जवळ माझ्यासारखाच.
हे ठिक आहे? बरं वाटतंय का.?
मी मान डोलावली. हा हिप्नॉटीजमचा प्रयोग तर नाही ना?
नाही त्यापे़क्षाही भारी आहे हा राक्षस प्रकार!
जादुगार नाहीच इथे .म्हणजे? मी शंभर टक्के आभासी आहे.म्हणजे मी आहे पण आणि नाही पण.
मला गरगरायला लागलं होतं . काय भानगड झाली ही.?
मेफीस्टोफेलीसची शपथ आभासी अस्तीत्व खरं असतं .. बाकी सगळा टाईम पास.
हा मेफीस्टोफेलीस कोण. आमचा कुलराक्षस.
उगाचच उघडली ती बाटली. व्हिस्की फ्लॅट वाटायला लागली.
माझं मन वाचल्यासारखं करून तो म्हणाला नाही चिंता करू नकोस कामासाठी आलोय ते माहिती आहे मला. बरं आपण कामालाच लागू या आता.एक वैधानीक इशारा.
आता हे काय नविन ?
तू सिगरेटचं पाकीटपाह्यलस ना? हो. त्या पाकीटावर लिहीलेलं असतं ना तंबाखू का सेवन आपके सेहत के लिये हानीकारक आहे...तसंच राक्षस रसायनाचं आहे.ते एकदाच सुटत. पिण्यापूर्वी.
नंतरचे डोज कोण देणार मला?
सगळं सांगतो पण आधी वैधानीक इशारा.
दोन्ही हाताचे तळवे वर करून त्यानी सुरुवात केली.
हे रसायन घेणे किंवा न घेणे ऐछीक आहे.
हे रसायन कुठल्याच प्रकारची हमी देत नाही.
हे रसायन फक्त पूरक मानसीक अन्न आहे .
या बुधल्यातील रसायन कधीच संपत नाही.
आमच्या प्रतिनिधीला याचे मूल्य जमा करण्याचे अधिकार नाहीत.
रसायनाचे निर्माते त्याला जबाबदार नाहीत
रसायनाचा पुरवठेदार भागीदार होत नाही.
याचे मूल्य म्हणजे रसायन घेणार्‍याला आत्म्याचा एक तुकडा लिहून द्यावा लागेल.
हा व्यवहार लेखी जरी नसला तरी एकदा रसायन प्राशन केल्यावर व्यवहार पूर्ण झाला.
फक्त ना परतीच्या बोलीवर हे रसायन मिळेल.
झालं संपलं.
विमानातल्या एअर होस्टेस जितक्या आनंदाने रेस्क्यू ड्रील समजावतात तेव्हढ्याच आनंदानी ही सगळी वाक्ये राक्षसानी म्हटली. (सुरक्षा हेतू त्यानी ते सगळं रेकॉर्ड केलेल्याची बातमी पण मला दिली.)
आतापर्यंत किती विक्री झाली असेल?
युगानुयुगं विक्री होतेच आहे. आकांक्षाचा आवाका जेव्हढा मोठा साध्य करण्याची हाव जेवढी मोठी तेव्हढी विक्री जास्त.
अर्थात, माझे आकडे फक्त घरगुती वापराचे आहेत.
म्हणजे इंस्टीट्युशनल सेल पण आहे का?
हो पण त्याला मी इंस्टीट्युशनल सेल म्हणत नाही.
राजकीय राक्षस रसायन सेल हा आमचाच एक वेगळा विभाग आहे.
ते काय बरं करतात? माझं धैर्य आता वाढत चाललं होतं. दुसरा पेग संपत आला होता म्हणून असेल कदाचीत.
राजकीय रसायन फार जहाल आणि महाग असतं.लेकुरवाळ्यांचं काम नाही ते.
हे बघ आताच एका मुख्यमंत्र्यांना त्यांची मुदतवाढवून हवी होती.
त्यांना रसायनामुळे ते मिळण्याची शक्ती मिळाली पण मोबदल्यात बरेच नरबळी द्यावे लागले.
विदर्भात त्यांनी व्यवस्था करून दिली.पहिलीच वेळ असल्यामुळे त्यांच्या मतदार संघाला वगळण्याची परवानगी मिळाली होती.
ठिक आहे म्हणजे सवलती मिळतात तर.
हा हा हा... रीटेंशन ऑफ कस्टमर.हा.... हा....
दहा -पंधरा वर्षापूर्वी एक कामगार नेता आला होता. आमचा मेजर कस्टमर. त्यानीही बरेच बळी दिले.ससे कसे पिलांना खातात तसा हळूहळू सगळ्या अनुयायांचा बळी दिला. मुंबई ताब्यात घेणं काय खाऊ आहे. पण मग एका शिष्यानी पण राक्षस रसायन घेतलं .त्यानी त्याला मारलं . तसा त्याचा उपयोगही संपला होता. पण सौदा म्हणजे पक्का.
हे पहा मी काही तसा म्हणता तेव्हढा निर्ढावलेला नाहिय्ये.आणि हे नरबळी वगैरे मला सांगू नका..
मला थोडेसे वैयक्तीक प्रॉब्लेम आहेत . पण मी काही..ओके?
ओके .नरबळी वगैरे सांगत नाही पण थोडीशी नितीमूल्ये तरी ताबडतोब गहाणवटीत द्यावी लागतील.
जशी..जशी... हां तुझा मुलगा एका मुलीशी लग्न करणार आहे..त्याला त्या मुलीला फसवायला सांग. मी सुंदर रिप्लेसमेंटची व्यवस्था करतो. हं. म्हणजे माझे दोन व्यवहार पूर्ण होतील. मुलीच्या बापाला फसवण्याचं काम मी अंगावर कालच घेतलंय.
माझा मुलगा त्यातला नाही. मला सांगीतल्याशिवाय काही करायचा नाही.. फसवणूक? छे. नाही करायचा तो . माझा मुलगा आहे तो .
थोडा अव्यवहारी आहे.. पण तरुण आहे..
तुझा मुलगा तुझ्या इतकी सफाईनी फसवणूक करू शकणार नाही असं म्हणायचं आहे का तुला ?
माझ्या रागाचा पारा उसळला.माझ्या आयुष्यात मी..
सबूर सबूर राक्षस म्हणाला.
हात बघू तुझा.वा. वा. तुळशी वृंदावन आहे तुझ्या हातावर.
नार्वेकर ज्योतीषी हातावर मत्स्य चिन्ह आहे म्हणाले होते. स्वस्तीक पण आहे म्हणाले होते...
हा.. हा... तो.. ..तो माझाच कस्टमर आहे ..
मी सांगतो तुझ्या हातावर सतीचं वृंदावन आहे..
आमच्या घरात सतीची चाल कधीच नव्हती रे बाबा.
का? विसरलास का? पुनाळकर वाडीतल्या मुलीला दिलेल्या वचनांची यादी...
बापरे .. तुला कुणी सां..
मी राक्षस आहे विसरलास का तू...
गिरगावातली राहती जागा मिळते म्हटल्यावर विसरलास ना ती मुलगी.
विचार पण नाही केलास . प्रतारणेच्या वणव्यात सती गेली. जन्मभर जळून मेली ती.
तेच वृंदावन आहे तुझ्या हातावर..
आता सांग आहेस का तयार..
मला कळेना हा राक्षस आहे की..याला कुणि सांगीतलं असेल बरं.?
फार लांब जायला नकोय. हे पहा तळहातावर पाम टॉप सारखा स्क्रीन दिसायला लागला.
माय अकाउंट . त्यात दोन भाग आहेत. माय स्टार्स आणि माय स्कार्स.
हे माय स्कार्स फोल्डर उघड.आतापर्यंतच्या सगळ्या लपवलेल्या गोष्टी यात सेव्ह केल्या आहेत.
काल एक कपूरचा कंटेनर पास केलास .ते आलंय यात. श्रवण पटनाईक ते पण प्रकरण आलंय
मी चपापलो. पटनाईक परत परत समोर येत होता. चोरीसे डरो कोतवालीसे नही.
वर्षानुवर्षं लपवून ठेवलेला भूतकाळ अचानक वर तरंगायला लागला...हा तुझा डिजायनर नरक आहे.
माय स्टार्स मधली शेवटची एंट्री फार जुनी आहे रे.
असणारच . भाबडा निरागस प्रामाणिक माणूस फार लवकर संपला.
असू दे. आता तुझ्या मुलाचा प्रॉब्लेम बघू या..
मुलगा चांगला आहे रे. मुलगा व्हायला पाहिजे होता राजकुमार सारखा. एकदम धारदार ,
चिनॉय सेठ, जिनके घर शिशोके के होते....
त्यासाठी बाप असावा लागतो भक्कम बुलंद छातीचा बलराज सहानी सारखा.तू झालास का? इतिहास साक्ष आहे. बाबराच्या एका प्रार्थनेनं पोराचा जीव वाचला. आहे तेव्हढी ताकद तुझ्या मायेत?
दोन पेगची नशा संपली.
बरं आपण तुझं नीड बेस्ड ऍनालीसीस करू या.
काय हवंय तुला?
मला वरीष्ठांच्या अरेरावीचा त्रास होतोय.
मग दे त्यांना शिव्या तोंडावर.
हे रसायन घेतल्यावर जमेल का ते?
शिव्या त्यांच्या पाठीमागे घालणार असशील तर तुझ्या हातातली दारु पुरेशी आहे तुला बळ द्यायला..गांडू नशा ..
तोंडावर देणार असशील तरी या रसायनाचा उपयोग नाही,
त्यासाठी ते एलीमेंट मूळातच स्वभावात असावं लागतं.यस्मीन् कुले त्वमुत्पन्ने...
हां ,हे रसायन घेतलंस तर तू त्याच्यासारखा तरबेज कावेबाज होशील, कुटील कारस्थानं. खोठे कागद . खोट्या साक्षी,लांगूलचालन ,
बघ तुझे वरीष्ठ लवकरच रीटायर होणारेत. त्यांचं सर्वीस रेकॉर्ड गहाळ करून टाकू या.
बसतील बोंबलत काही वर्षं.
येतील तुझ्याकडे हात जोडून . बघ सौदा लवकर पूर्ण कर.त्या मुलीला फसवायला सांग. मी तुला ऑफीसच्या समस्येवर तोडगा काढून देतो.
तू त्या फायली आणून देशील?
छे.. छे..मी फक्त रसायनाचा एक डोज त्या सेक्शनहेडला देईन...
रसायनाचा पुरवठेदार तुझा भागीदार होत नाही.
मग काय उपयोग या रसायनाचा?
घेउन बघ. एक हप्ता गळ्याखाली उतरला की हजारो कल्पना सुचतात.महत्वाकांक्षेच्या अव्यक्त अपूर्णांकांचे पूर्णांक करायचे रस्ते सुचायला लागतात. शेतकरी पण क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष होतो रातोरात.हात कापत नाही, जीभ कोरडी पडत नाही, रात्री भयाण स्वप्न पडत नाहीत.
सोपं आहे एव्हढं?
सोपं आहे याचा दावा करतंय कोण?जिभेवरचा घास घशाखाली जायला श्वासनलीकेचा रस्ता बंद करावा लागतो.नाहीतर एक महाभयानक ठसका लागतो. सवय व्हावी लागते पण रसायन पूरक अन्नाचं काम करतं. त्यानंतर काय वाट्टेल ते गिळून टाक ठसका लागत नाही.
करू या सौदा पूर्ण?
आज व्हिस्कीची नशा होत नव्हती.रोजच्यासारखी. रोज दोन पेग नंतर सगळं काही डबाबंद. रात्री आठ तास पेटीपॅक.सका़ळी नवी सुरुवात.निर्णय घेणं जरूरीचं होतं.मुलाचा चेहेरा डोळ्यासमोर आला.हळवा पोरगा माझा. लहानपणी हातावर गार विरघळायची तरी रडायचा.सांगायचं कसं त्याला फसव त्या पोरीला म्हणून .त्याच्या हातावरही उगवेल सतीचं वृंदावन.बापानी पोराला चक्रव्युहात ढकलल्यासारखं होईल . नको ते.
फार वेळ लागतो आहे. राक्षसानी रीमाइंडर दिलं.पण फायदा पण तेव्हढाच आहे. मरो दुसर्‍याची ...
नाही .नाही.
ठिक आहे तर .मी तुझ्या मुलाला भेटतो.
खबरदार.
तू मला थांबवणार?
हो.
कसं ?
खरं तेच सांगीन.
तुला कमीपणा .
सहन करीन.
गुर्मी दारुची तर नाही.
नाही. मायेत अडकतो आहेस?
अडकलो होतो.
आता?
तू जा.तूच बोलतो आहेस ?
हो मीच.
पाच मिनीटे शांततेत गेली. मी समोर तो आहे की नाही हे पण बघत नव्हतो.मला बरं वाटतं होतं.
राक्षसाचा एकदा परत आवाज आला.
मी बुधला लादीवर टाकला. खळकन काच फुटल्याचा आवाज आला. काचेचे तुकडे तु़कडे झाले होते.
मी मोहाचे दोर कायमचे कापले होते.
आभारी आहे.
हू केअर्स?
खरोखर आभारी आहे.
का?
तुझ्या मोहाचं बंधन माझ्यावर होतं. पाश घट्ट होत होते दिवसेंदिवस.तुझी लालच माझ्या साखळदंडाची एकेक कडी होती.
रहाट गाडग्याची मडकीच फुटली . आता तेच पाणी परत परत बागेत शिंपलं जाणार नाही. तू जर आज रसायन प्याला असतास तर तू आणि मी कायमचे बांधले गेलो असतो. तेच विष परत परत पसरत राहीलं असतं.
आता जा ना . माझ्या आवाजाला धार आली होती.
फक्त थोडा वेळ.
मी तुझ्या आसपास होतो तुझ्या लहान पणापासून.
तुझी पहिली चहाडी , चोरी ,व्यभिचार पहात होतो. मला खात्री होती एक दिवस आमंत्रण येईलंच तुझ्याकडून.
मी फक्त वाट बघत होतो. तुझ्या मनाचा एक कोपरा मला रात्रीपुरता पुरेसा होता. बस्स् एक कोपरा एक रात्रीसाठी,
बोरातल्या अळीचा तक्षक व्हायला पुरेसं आहे,एक आमंत्रण.
तू सुखाचा शॉर्टकट शोधायला निघालास तेव्हा खात्री झाली, यू येणार .
गडात एक फितूर असला की गड पडायला नाही वेळ लागत.
तुझ सुखाचा शोध दुरून पहात होतो.सुखाचा शोध ?
आणखी एक भ्रम.
एक शेवटचं सांगतो .सुख शोधायला गलीव्हर सारखं सफरीवर जावं लागत नाही.
आसपास बघ जरा. मुबलक आहे.
बायकोनी वाढलेली गरम चतकोर भाकरी.
म्हातारीनी केलेला चहा, अर्धा जरी बशीत सांडला असला , त्यात साय पडली तरीही.
पोरांनी लाडात येउन भरवलेला अर्धामुर्धा घास.
पहाट होईस्तो मित्रांबरो बर गायलेली गाणी.
मला वाटत सुख इथेच कुठेतरी दडलेलं आहे.
पण राक्षसच का?
माझा सखा एंजल कुठेतरी असेलच ना? मी न राहवून विचारलं
एंजल ? देवदूत?
आपण सगळेच एंजल असतो पण वाटेत चकवा भेटतो.
बरयं मी येतो आता.सॉरी . मी जातो आता.
राक्षस जखमी वानरासारख खुरडत चालायला लागला.
पाठमोरा वळल्यावर खिशातून रुमाल काढला. डोळे पुसायला.
मी एकदाच आवाज दिला .
आजोबा...मी ओळखलं होतं तुम्हाला.
राक्षस रसायनाचा शाप कायमचा संपला होता.

----------------------------------------------------------------------------------------------------

कथा

प्रतिक्रिया

वरदा's picture

9 Jul 2008 - 9:01 pm | वरदा

सुरेख लेख...

आपण सगळेच एंजल असतो पण वाटेत चकवा भेटतो.

मस्तच!
माय अकाउंट . त्यात दोन भाग आहेत. माय स्टार्स आणि माय स्कार्स.

सॉलीड एकदम...
सगळाच लेख आवडला....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 Jul 2008 - 7:21 pm | डॉ.प्रसाद दाढे

रामदासजी साष्टा॑ग द॑डवत! पिसि-जेसित तुमच्या अलौकिक प्रतिभेची चुणूक दिसलीच होती. हा लेख म्हणजे मिपावरील एक साहित्यलेण॑ आहे.. सुरेख, अप्रतिम! कृपया आणखी लिहा.. आता (राक्षसी?) भूक खवळली आहे!
अवा॑तरः पुढच्या मिपा कट्ट्यावर सदेह दर्शन द्या.. खूप उत्सूकता आहे तुमच्याबद्दल.

विद्याधर३१'s picture

9 Jul 2008 - 9:09 pm | विद्याधर३१

एकदम सही लेख....

रामदासजी आपणतर एकदम फ्यान झालो तुमचे.
पीसी जेसी काय, स्वगत काय, शिंपिणीचे घरटे काय....

आणी आता हे.
छान असेच येउद्या.
पु. ले. शु.

विद्याधर

विसोबा खेचर's picture

10 Jul 2008 - 12:13 am | विसोबा खेचर

रामदासजी आपणतर एकदम फ्यान झालो तुमचे.

अगदी हेच म्हणतो...!

रामदासजी जियो...!

आपलं असंच उत्तमोत्तम लेखन मिपावर येऊ द्यात एवढीच विनंती...!

तात्या.

अवांतर -

बाय द वे, एखाद आठवडा पाहुणा संपादक होऊन अग्रलेख लिहायची जिम्मेदारी घेता काय? निश्चित तारीख आपसात पत्रापत्री करून ठरवता येईल! :)

तात्या.

आपण सगळेच एंजल असतो पण वाटेत चकवा भेटतो.
क्या बात है!
फारच सुंदर लिहिले आहेत.एकदम अंगावर आली कथा.

चतुरंग

धनंजय's picture

9 Jul 2008 - 9:17 pm | धनंजय

एका वाचनाने भागले नाही.

कोलबेर's picture

10 Jul 2008 - 12:22 am | कोलबेर

एक एक वाक्य अंगावर येणारे! तुमचे सगळेच लेख प्रिंट काढून संग्रही ठेवण्या सारखे आहेत.

सर्किट's picture

10 Jul 2008 - 1:50 am | सर्किट (not verified)

आता आधीचेही लिखाण वाचायला हवे.

- सर्किट

संजय अभ्यंकर's picture

9 Jul 2008 - 9:58 pm | संजय अभ्यंकर

बाकी लिहूच शकत नाही!
इतके सुंदर!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jul 2008 - 10:05 pm | llपुण्याचे पेशवेll

जेसिपिसी आणि हे आणि ते कवितेचे रसग्रहण सगळेच उत्तम..

पुण्याचे पेशवे

यशोधरा's picture

9 Jul 2008 - 10:18 pm | यशोधरा

कसलं सही लिहिता तुम्ही!! दंडवत!! _ /\_

नीलकांत's picture

9 Jul 2008 - 10:31 pm | नीलकांत

काय लिहीलंय रामदासजी...! आपण तर खल्लास झालो एकदम.

नीलकांत

प्राजु's picture

10 Jul 2008 - 1:39 am | प्राजु

अप्रतिम आहे लेखन. २ दा वाचलं..
अतिशय सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

10 Jul 2008 - 2:24 am | नंदन

आहे. भन्नाट लिहिलंय.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

10 Jul 2008 - 2:25 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

अभिज्ञ's picture

9 Jul 2008 - 11:37 pm | अभिज्ञ

दादानु आपले पाय कुठे आहेत....दंडवत घालु इच्छितो.
एकसे बढकर एक लेख,अन हि तर अंगावर येणारी अजुन एक जबरदस्त कथा.......
दि ग्रेट.
लगे रहो...

अभिज्ञ.

स्वप्निल..'s picture

10 Jul 2008 - 12:48 am | स्वप्निल..

रामदासजी,

..सुख शोधायला गलीव्हर सारखं सफरीवर जावं लागत नाही.
आसपास बघ जरा. मुबलक आहे.

एकदम मस्त्..लेख आवडला..असच लिहित रहा..

>>अवांतरः पीसी जेसी संपला काय? शेवट वाचल्यासारखा वाटत नाही...शोधतो परत एकदा..

स्वप्निल..

मदनबाण's picture

10 Jul 2008 - 4:06 am | मदनबाण

एकदम सुंदर.....

मदनबाण.....

राजेश's picture

10 Jul 2008 - 6:53 am | राजेश

बहुत मझा आया...

राजेश.

सहज's picture

10 Jul 2008 - 7:26 am | सहज

ललीत लेखनाचे बादशाह!!

भन्नाट स्टोरी, पाठोपाठ दोन वेळा वाचली.

अरुण मनोहर's picture

10 Jul 2008 - 8:18 am | अरुण मनोहर

पीसीजेसी, नंतर राक्षस! वाचकांना मेजवानीच आहे.

मुक्तसुनीत's picture

10 Jul 2008 - 8:48 am | मुक्तसुनीत

ही देखील कथा आवडली.

सैतानाशी असणारे माणसाचे नाते , सैतानाला आत्मा विकणे या संकल्पना रेनेसां कालीन साहित्यापासून ते कालपरवापर्यंतच्या डेव्हिल्स ऍडव्होकेट नावाच्या इंग्रजी सिनेमा पर्यंत निरंतर लेखकाना आव्हान देत आलेल्या आहेत. नीतीमत्तेकडे बघण्याचा हा एक दृष्टीकोन म्हणायला हवा. एकूणच "कन्सेप्ट ऑफ ईव्हल" या , धर्म-नीती-तत्वज्ञानातील एका महत्त्वाच्या संकल्पनेचा हा आणखी एक आविष्कार , असे म्हणायला हरकत नाही.

संकल्पना तीच , पण एखाद्या निष्णात लेखकाच्या हाती आली की तिला कसा तो आकार देतो , भाषेचे रूपडे लेववतो , आपल्या शक्तिनिशी या संकल्पनेला कसा भिडतो याचे , वरील लिखाण हे एक उदाहरण आहे.

आनंदयात्री's picture

10 Jul 2008 - 11:23 am | आनंदयात्री

असेच म्हणतो, रामदास काका खुप सुंदर लिहता तुम्ही. कथा हळुहळु पकड घेत गेली, शेवटचं आजोबा मी ओळखलं होतं तुम्हाला तर अप्रतिम .. मस्त कथा.

रामदास फ्यान क्लबात मी पण सामील.

झकासराव's picture

10 Jul 2008 - 10:57 am | झकासराव

खुप आवडली. :)
रामदासकाका आम्ही तुमचे फॅन्,एसी सगळच झालोय.
एक से बढकर एक सुरु आहे तुमच.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मनिष's picture

10 Jul 2008 - 11:04 am | मनिष

संकल्पना तीच , पण एखाद्या निष्णात लेखकाच्या हाती आली की तिला कसा तो आकार देतो , भाषेचे रूपडे लेववतो , आपल्या शक्तिनिशी या संकल्पनेला कसा भिडतो याचे , वरील लिखाण हे एक उदाहरण आहे.

हेच म्हणतो...सुंदर आहे!

प्रमोद देव's picture

10 Jul 2008 - 12:11 pm | प्रमोद देव

आधी काहीच कळले नाही. मला वाटली तुमची आत्मकथा(मला दुसरे काय सुचणार म्हणा! ;) ) असावी.
पण मग हळूहळू कळायला लागले. (एकूण डोकं कमीच ना! :D )
झकास आहे विश्लेषण!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

भडकमकर मास्तर's picture

10 Jul 2008 - 1:29 pm | भडकमकर मास्तर

_नवीन कथाही सकाळीच वाचली...
असं नेहमी घडते की मी आपला लेख / कथा वाचल्यावर कंप्यूटरसमोरून उठून खिडकीसमोर दहा मिनिटं निवांत उभा राहतो... आपलं लेखन थोडं मनात मुरू द्यायला ,त्यावर विचार करायला फार आवडतं... ( ज्याप्रमाणे इतर वाचन मी भराभरा संपवतो तसे आपले बाबतीत होत नाही :) )... हा राक्षसपेयाचा लेख / कथा ही उत्तम... आणि शेवट पॉझिटिव्ह झाला हे छान ...
अधःपतनाची गोष्ट .त्याचं कारण ,त्याची गरज आणि शेवटी त्या विळख्यातून बाहेर पडणे हे सारे फार झकास आले गोष्टीत... _____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सुमीत's picture

10 Jul 2008 - 4:43 pm | सुमीत

कथा आवडली, कथेत वापरलेले रुपक आणि इतर उल्लेख लाजवाब.
बरे, आता पीसी़जेसी चे पुढचे भाग वाचायचे आहेत.

सुमीत

प्रियाली's picture

10 Jul 2008 - 5:27 pm | प्रियाली

याला नेमकी कथा म्हणावे का याबाबत साशंक आहे पण हे जे काही आहे ते मस्तच आहे. वाचायला मजा आली.

राधा's picture

10 Jul 2008 - 7:10 pm | राधा

आपल लिखाण आवडला.........

पामटॉपवरचे माय स्कार्स, माय स्टार्स आवडले.

साती

अनिल हटेला's picture

11 Jul 2008 - 1:38 pm | अनिल हटेला

अप्रतीम !!!!!

सही !!!

एका बैठकीत वाचली ,आजुबाजुला काय चललये सगळ-सगळ विसरलो होतो....

सही!!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विसुनाना's picture

11 Jul 2008 - 2:50 pm | विसुनाना

एखादी एकांकिका वाचावी तसं वाटत होतं.
खूप छान.

मनस्वी's picture

11 Jul 2008 - 3:18 pm | मनस्वी

मस्त लिहिलंय रामदास काका. आवडलं.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jul 2008 - 3:19 am | बिपिन कार्यकर्ते

व्वा....

बिपिन.

ऋषिकेश's picture

13 Jul 2008 - 10:05 am | ऋषिकेश

झकास! कथा आवडली

-('मिसळ'लेला) ऋषिकेश