व्यक्ति आणि व्यक्ति

राधा's picture
राधा in जनातलं, मनातलं
9 Jul 2008 - 8:22 pm

माझी आई

आई म्हंटल की सगळ्यांना 'एका प्रेमळ हाताची' आठवण होते, मला पण असच वाटतं पण 'माझी आई' म्हंटल की या प्रेमळ हाताने तिने केलेल्या पदार्थांची आणि त्यामुळे घडणार्‍या 'comedy' किस्स्यांची जास्त आठवण येते. त्यातलाच एक सांगते. मी विदर्भातली असल्यामुळे वर्‍हाडी भाषा ओघाने येइलच. या 'घतने'तले पात्र म्हणजे माझी आई, आम्ही भावंड आणि पन्या-मिनी(प्रणय आणि मिनल). पन्या- मिनी यांची ओळख सध्या आमचे शेजारी एवढीच करुन देते कारण त्यांचे 'किस्से' सांगायला वेगळ लि़हाण कराव लागेल. तर कामाच्या वेळी नसणारे पण खाण्याच्या वेळी न चुकता येणारे असे हे बहिण - भाऊ.
आईने तिच्या माहेरी क्वचीतच स्वयंपाक घरात पाय ठेवला असेल, त्यामुळे सासरी तिने खर्‍या अर्थाने स्वयंपाकघराला ' प्रयोगशाळा' बनवले. बाबांनी करुन घेतली हो हळू हळु सवय पण आमी भावंड नाक मुरडायचो. पण आईने आम्हाला न जुमानता नविन पदार्थ करायचीच. असच एकदा ती शेजारच्या काकुंकडुन ढोकळे शिकुन आली आणि आज हा पदार्थ मी 'करुनच राहणार' असा प्रण केला. तरी त्या काकु आईला म्हणाल्या होत्या 'अव् अत्रे ताई जमत नसन तर सांगजा मी देतो करुन' पण आईने मदत नाही स्विकारली. आतापर्यत कधी नव्हे त्या उत्साहाने तीने तयारी केली. मी आणि भाऊ बघत होतो आणि 'जे काही होइल ते चांगलच होउ दे रे बाबा' अशी प्रार्थना करत होतो.
आईने सर्व तयारी केली आणि पसरट भांड्यात ढोकळे लावले. काकुंनी सांगीतल्या प्रमाणे सगळ केलं. लगेच खमंग वास सुटला आणि आमच्या तोंडाला पाणी सुटला. केव्हा आई ते भांड बाहेर काढते अस झालं . पण आईने जसं ते भांड बाहेर काढल आमच्या तोंडच 'पाणी पळालं'.आईने ते भांड एका ताटावर उलट केल व त्याचे काप करु लागली. आता तर ते ढोकळे की चुनवड्या हे ठरवण कठीण झालं. तरी तिने आम्हाला ते खायला दिल आम्ही केविलवाण्या नजरेने तिच्या कडे बघत होतो. 'माय माऊली 'ती तिला आमच्या डोळ्यातले भाव समजले ती हळुच म्हणाली 'खाऊन घ्या ते. फुगले नाही म्हणुन काय झाल ढोकलेच आहेत ते'. पण या वेळी आम्ही बगावत केली 'नाही खाणार म्हणजे नाही खाणार' अस दबक्या आवाजात 'खड्सावुन' सांगीतल. चव घेउन पाहिल्या नंतर तिला पन हे भलतच काही झालय याची खात्री पटली . पण केलेल्या 'पदर्थाच' करायच काय? असा प्रश्ण आम्हाला पडला. आणि अचानक कोडं सुटल. पन्या - मिनी 'देवासारखे' धावुन आले.
त्या दोघांना पाहुन आम्हाला आश्चर्य वाटल. भितीही वाटली की यांना ढोकळ्या बद्दल माहिती झाल की काय. पण अस काही नव्हत, ते लोक खेळुन दमले म्हणुन पाणी प्यायला आले होते. नेहमी प्रमाणे पन्या आत घुसला आणि म्हणाला 'पानी द्याजी काकु, भाय तहान लागली'. पण स्वयंपाक घरात पाय ठेवताच मिनी ला खमंग वास आला ती म्हणाली 'काई केला काजी काकु, मस्त वाअस येथ हाय' . बस तिथेच दोघा फसले आणि आईने ' डाव साधला'. ती म्हणाली ' मी एक जिक्कण केली आहे ..........खाणार?'
पन्या चे डोळे चमकले. खुशी पाई त्याला बोलण पण सुचत नव्हत. आणि मग काय 'डायलॉग वर डायलॉग' चढवले जात होते.

पन्या - काकु लई मस्त आहा जी तुमी, खरस ......लई भुक लागली होती.
मिनी - काकु तुमी हाय मनुन जी , नाई तर आमची आई तर कुठस खाले जाउ नाइ देत..
पन्या - जाउ भी कशी देइन व मिने....? अव काकु थ्या खर्चे काकु हाय ना एक फुटाना देते अन दहा दिल्याचे सांगते........मंग आईले राग येते, म्हंते अत्रे काकु सोडुन कुटस खाले जायच नाही
दोघांच्याही जिभेवर 'सरस्वती 'नाचत होती. आणि आम्ही मजा बघत होतो. तेवढ्यात आईने ढोकळ्यांच्या 'डिश' त्यांच्या समोर केल्या.
पन्या -हे का वय जी काकु?
आई- खाउन तर बघ.
पन्या-मिनी ने घास घेतला अन् एकमेकाकडे पाहु लागले. नेमका काय खातोय हे दोघांनाही समजत नव्हता.
मिनी - काकु हे बेसन (डाळीच पीठ) दह्यात कालवुन केला का जी?
आई- नाही.
पन्या -हे चुनाच्या वड्या व्हय का जी?
आई- नाही.
मिनी- पहील्यांदास केला का जी?
आई-हो.
आईचं 'एका शब्दात उत्तरे द्या' असं चालु होत. पण किती ताणणार पन्या- मिनी ची 'सहनशीलता' संपली. आता घास चावुन न खाता पन्या नुसता गिळत होता.
पन्या- काकु थोडस लोनच द्याजी लावुन खाले.
मिनी- मले पानीस द्याजी..... धकत (गिळणे) नाही आता.
पन्या- सांगा ना जी काकु हे का वय...........?
तेवढ्यात मिनी चे डोळे चमकले आणि ती ओरडली ' काकु हे ढोकळे हाय का काल चवान काकु न केलते थे..........?' आई बिचारी 'हो ' म्हणाली. आता मिनीला चेव चढला व ती म्हणाली; 'अव काकु मंग पहीलेस काउन नाइ बोलल्या जी . तवाचे विचारत होथो आमी' पन्या तरी कशाला मागे राहील तो म्हणाला ' काकु अव ढोकलेस कराचे होथे तर शिकुन तरी घ्याचे जी. थे तर अशे दिसत व्हते जस शेनाच्या गौर्‍या थापल्या'
आता मात्र आम्हाला आमच्या आईची अशी ' बेईज्जती' सहन नाही झाली. मी त्याना म्हंटला खायचा असेल तर खा नाही तर जा. तसे त दोघा म्हणाले ' तस नाही व ताई पन नाहीस धकत आता'
शेवटी आईला दया आली. बाबा यायची पण वेळ झाली. तिने ढोकळे एका कागदात बांधले आणि त्यांना देत म्हणाली ' घरी जाउन खा. आणि नाहीच गेला तर गायीला लावा ' आतापर्यत कधी नाही गेले इतक्या स्पीड नी ते दोघा घरी धावत गेले. आम्ही सगळा पसारा बाबा यायच्या आत आवरला. बाबा रोजच्या वेळेवर बरोबर ८ वाजता आले . हाथ्-पाय धुतले आणि माझ्या भावाला म्हणाले ' अरे कौस्तुभ गाडीच्या डिक्कीतुन सामान काढ रे' त्याने सामान काढले आणि बघतो तर काय बाबांनी ढोकळे आणले होते विकत.
आम्ही बघतच होतो तेवढ्यात बाबा म्हणाले ' अरे तुझ्या आईच्या हातचेच खाय्चे होते पण विचार केला नाही जमले तर खाणार कोण........?' मी, आई आणि भाऊ पोत धरुन हासु लागलो . बाबांना मात्र समजत नव्हत की त्यांनी असा कोणता मोठा 'joke' मारला. आम्ही सगळ्यांनी मस्त ढोकळ्यावर ताव मारला. बाबांना मात्र या घटने बद्दल काहीही सांगीतला नाही.
दोन दिवसांनी घसा खराब झाला म्हणुन पन्या बाबांना दाखवायला आला तेवा आईला म्हणाला 'काकुजी आमी नाई खाल्ले थे ढोकले, गाईलेस घाला लागले. आता तिनं बी खाल्ले का ते मी नाई पाहील............' हे ऐकुन आम्ही पळलोच पण बाबा बघतच राहीले...............

मौजमजा

प्रतिक्रिया

शितल's picture

9 Jul 2008 - 10:01 pm | शितल

हा हा हा
सह्ही पुन्हा एकदा हसुन हसुन डोळ्या॑चया फ्टी झाल्या आणि डोळ्यातुन पाणी आले.
=))
राधे , मस्त किस्सा आहे ढोकळ्याचा.

चंबा मुतनाळ's picture

9 Jul 2008 - 10:23 pm | चंबा मुतनाळ

छान झाले आहे लिखाण. वर्‍हाडी बोली बर्‍याच दिवसांनी वाचायला मिळाली.

वरदा's picture

9 Jul 2008 - 10:29 pm | वरदा

मज्जा आली गं राधा छान लिहिलायस...
काकु हे बेसन (डाळीच पीठ) दह्यात कालवुन केला का जी?

बिच्चारा..... =))
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

नंदन's picture

10 Jul 2008 - 3:29 am | नंदन

किस्सा, आवडला. जिक्कण = जिन्नस/पदार्थ का?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

10 Jul 2008 - 3:37 am | धनंजय

वर्‍हाडी गोडच भारी.

राधा's picture

10 Jul 2008 - 6:04 am | राधा

जिक्कन = गंमत :)

टारझन's picture

10 Jul 2008 - 3:59 am | टारझन

=)) =)) =))
राधा तै ... जबराट... आजून तुमच्या आईच्या प्रयोगवह्या ऊघडा....
अव काकु थ्या खर्चे काकु हाय ना एक फुटाना देते अन दहा दिल्याचे सांगते
कॅन ईमॅजिन .... सही लिहीलय


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

विसोबा खेचर's picture

10 Jul 2008 - 8:56 am | विसोबा खेचर

हा हा हा!

राधा, मस्त लिहिलं आहेस. वर्‍हाडी बोलीभाषा वाचायला गोडच वाटली! :)

तात्या.

सहज's picture

10 Jul 2008 - 9:04 am | सहज

आता तिनं बी खाल्ले का ते मी नाई पाहील............

:-)

झकासराव's picture

10 Jul 2008 - 9:48 am | झकासराव

ही ही ही ही ही
मस्त जमलय लिखाण. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रमोद देव's picture

10 Jul 2008 - 10:17 am | प्रमोद देव

राधे मस्त लिहिलं आहेस. तुम्हा कुटुंबियांची खेळकर वृत्ती आवडली.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आनंदयात्री's picture

10 Jul 2008 - 11:41 am | आनंदयात्री

मस्त लिहलय राधा. आन दो और भी.

छगनराव's picture

15 Jul 2008 - 7:21 pm | छगनराव

बढीय लिहीलय.आता अजुन किस्से येउ द्या.

अभिज्ञ's picture

15 Jul 2008 - 8:30 pm | अभिज्ञ

लेख छानच झालाय.
व-हाडि बोलीभाषा आवडली.
असेच अजून लेख येउ द्यात.

अभिज्ञ.

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Jul 2008 - 9:25 pm | llपुण्याचे पेशवेll

तुमचे ढोकळापुराण लै ब्येस राधाताई...
पुण्याचे पेशवे