इमोशनल फुलांच्या देशा…
आपण समाज म्हणून ढोंगी आहोतच पण फार इमोशनलही आहोत असं वाटतं.
आपला अहंगंड, इगो ही एक मस्त चीज आहे आणि त्यावरच सगळा खेळ सुरु आहे.
आपल्या भावनिक कोशंटचे किस्से असंख्य.
40- 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजधानीत राहिलेले बॉलिवूड स्टार्स कधीतरी कुठल्यातरी दबावाखाली एखाद्या मराठी कार्यक्रमाला हजेरी लावतात. एखादं वाक्य तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात. आमचे कान धन्य होतात. लगेच चर्चा अरे बच्चन मराठी बोलला, किंवा ती राणी मुखर्जी मराठीत बोलली.. अय्या!!! किंवा इंग्लंडची राणी मराठी बोलली, काय... तर, नमस्स्स्त्ते.
दोन वर्षांपूर्वी युवराज राहुल गांधी मुंबईत आले होते, त्यांनी ATM मधून पैसे काढले, रांगेत उभा राहून लोकलंचं तिकीट घेतलं आणि दुपारी २-३ च्या निवांतवेळी अंधेरी-दादर-घाटकोपर वगैरे लोकलने प्रवास केला. मुंबई लोकलचा प्रवास ‘अच्छा लगा’ अशी काहीतरी प्रतिक्रियाही दिली होती. किती कौतुक वाटलं होतं तेव्हा देशाला. हेलिकॉप्टरची सोय असताना राहुल गांधी लोकलने गेले. नायतर आपण मुंबईकर...रोजच्या गर्दीत कोंबून घेत साधा एक-दोन तासांचा प्रवास करायचा म्हटलं की जिवंतपणी नरकयातना आठवल्यासारखं करतो. राहुलजींकडून शिकायचं सोडून सतत किरकिर करत राहतो, गर्दी न सुविधा अन् यंव अन् त्यंव.
सर्वसामान्य लोकांना बेसिक सुविधा द्यायची ज्यांच्यावर जबाबदारी असते ते सरकार, ती सर्वपक्षीय राजकारणी मंडळी वर्षानुवर्षे आपल्याला फाट्यावर मारत असतात. पण वेळ आली की, ‘लोकशाहीत जनताच राजा आहे’ असं नेते म्हणतात, आपण खूश होतो, सगळं विसरुन जातो. प्रत्यक्षात पाच वर्षात एकच दिवस- मतदान यंत्राचं बटन दाबेपर्यंतराजा, बाकी 1825 दिवस कोण कुठला राजा? एक दिवस प्रजासत्ताक, बाकी नेतासत्ताकच.
तिच गोष्ट साखर उद्योगाची. साखर कारखाने म्हणजे राज्यातल्या राजकारणाचा दिंडी दरवाजाच. लाखो शेतकरी आणि हजारो कोटींचा उद्योग. पण ऊसाला दर द्यायची वेळ आली की राजकारण्यांमधला कारखानदार जागा होतो. जास्त दर देणं कसं अवघड आहे यावर त्यांचं चटकन एकमत होतं. मग शेतकरी रस्त्यावर उतरला की त्याच्यावर लाठ्या काठ्या गोळ्या ठरलेल्या. यंदा तर अगदी पद्धतशीरपणे ऊसदराचं आंदोलन चिरडलं गेलं. आंदोलन करु नका, तुम्ही शेतकरीच कारखान्याचे खरे मालक आहात असं यच्चयावत सगळ्या राजकारण्यांनी सांगितलं. कानाला ऐकायला किती बरं वाटलं, शेतकरीच कारखान्याचे खरे मालक आहेत. वास्तव काय आहे ते कोणत्याही छोट्या शेतकऱ्याची फरफट पाहून लक्षात येईल.
१६ डिसेंबरला देशाची राजधानी दिल्लीतल्या रस्त्यावर, चालत्या बसमधे एका तरुणीवर गँगरेप झाला. ६ नराधमांनी तीला किती निर्घृणपणे मारहाण केली हे आता सगळ्यांना माहिती झालंच आहे. त्या मुलीची झुंज अपयशी ठरली, तिचा मृत्यू चटका लावून गेला. त्या काळात अनेकांचे खरे चेहरे काही काळापुरते समोर आले. कोणी म्हणालं भैय्या म्हणाली असती तर रेप झाला नसता, कोणी म्हणालं कुठला तरी मंत्र म्हणली असती तर रेप झाला नसता, कोणी बोललं त्या मुलीचीही चूक होती तर कोणी म्हणालं रेप इंडिया में होते है, भारत में नही.
दिल्लीत तरुणाईच्या असंतोषानं उग्र रुप घेतलं तेव्हा, ना आपले पंतप्रधान समोर ना युवराज, विरोधी पक्षानंही राजकारणच साधलं. छे़डछाड, बलात्कारासारख्या घटना होऊ नयेत म्हणून आहे त्या कायद्याची कडक अंमलबजावणी करायचं राहिलं दूर आणि नव्या कायद्याला त्या पीडित मुलीचं नाव द्यायचं की नाही याचीच चर्चा.
लहान मुलीवर बलात्कार आणि हत्येचा आरोपी, जामीनावर सुटतो आणि तो आठवड्याच्या आत पुन्हा आणखी एका निष्पाप मुलीवर बलात्कार करुन हत्या करतो. नाशिक- औरंगाबादेतल्या घटना, पोलिस आणि न्यायव्यवस्थेचा कुचकामीपणा कळायला पुरेशा आहेत. आपण मेणबत्त्या घेऊन लगेच जमणार पण वेळेवर मदतीला समोर होणार नाही. अर्थात साक्षीदारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या पोलिस आणि न्याय व्यवस्थेनंही याचा विचार करायला हवा हे ही तितकच खरं.
पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलेलं चालतं पण हॉकीच्या खेळाडूंना विरोध करुन माघारी धाडणार. भारत –पाकिस्तान दरम्यान व्यापारी करारानं हजारो कोटींची आयात निर्यात होते पण त्यांच्याकडून कांदा आला की त्याला विरोध. मध्यंतरी क्रिकेटर जावेद मियांदाद भारतात येणार होता त्यावरुन वादंग सुरु होतं, का तर मुंबईचा-देशाचा दुश्मन दाऊद इब्राहिमचा तो व्याही. अरे त्या दाऊदचे भाऊ बहीण, नातलग इथेच आहेत. त्याचा भाऊ भारतात परत आला त्याला १० वर्ष उलटली. पण आम्ही लोकांना मुर्ख बनवत मियांदादला विरोध करणार.
पाकिस्तान LOC वर आपल्या जवानांची शीर कापून नेणार म्हणून संताप करणार आणि दुसऱ्या दिवशी आपण पाकला शेवटच्या वनडेत कसंतरी हरवलं की समाधानानं झोपणार.. कशी जिरवली पाकड्यांची.
किरण बेदीनं विमानाच्या इकॉनॉमी क्लासनं प्रवास केला आणि वरच्या क्लासच्या तिकिटाचे पैसे घेतले म्हणून आपण शंख करणार, आणि दरवर्षी खोटी मेडिकलची बीलं इमाने इतबारे कंपनीला देत राहणार.
सलमान खान असो की संजय दत्त, ते समाजात कसं वागतात त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार. त्यांच्या पडद्यावरच्या इमेजमधेच अडकून पडणार. वो दिल का बडा अच्छा है असं म्हणत राहणार. तोच न्याय आपल्या इतरांना लावतो का?
धर्मेंद्र –हेमापासून ते सैफ करीनाच्या अफेअरची, लग्नाची, वयाची चवीनं चर्चा करणार, पण आपल्या आजुबाजुचं ‘असं’ एखादं प्रकरण कानी आलं की त्यांच्या पिढ्यांचा उद्धार करत घोर कलयुग आल्याची चिंता करणार.
ज्या काळात (म्हणजे माझ्या लहाणपणी) आजच्या एवढा मोठ्या प्रमाणावर पैसा सर्वसामान्य मतदारांमधे सर्रास वाटला जात नव्हता, त्या काळात मतं मिळवण्यासाठी स्त्रियांना मंगळसुत्राची किंवा कुंकवाची शप्पथ आणि पुरुषांना ज्वारी उचलायला लावली जायची.
Emotional Fools चा एखादा शेअर बाजार असता ना, तर आपल्या देशानं गुंतवणुकदारांना कधीच निराश केलं नसतं. आपल्या भावनिक मुर्खपणाचा सेन्सेक्स कायम चढा राहिला असता, अधुन मधुन चांगला डिव्हीडंट आणि भरघोस बोनस ठरलेला.
गावाकडचे रोड खराब आहेत, माझ्या लहानपणीपासून. पावसाळा असो नसो अण्णाभाऊ साठे चौकात पाणी साचणं ठरलेलं. गेली अनेक वर्ष कधीही गावाकडे जा, तोच रस्ता, तेच खड्डे, तसंच पाणी आजही असतं रस्त्यावर. एवढंच नाही तर, रेल्वे आणण्याचा मुद्दा इतका जुनाय की, एवढ्या काळात इंग्रजांनी सबंध आशियात रेल्वेचं जाळं पसरवलं असतं. बीडच्या रेल्वेचं भूमीपूजन कितीदा झालंय की? भरवस्तीतल्या एका मैदानावर दोन वेळा झाल्याचं तर मला आठवतंय.
लहानपणी ऐकलं होतं YOU CANT FOOL ALL THE PEOPLE ALL THE TIME, खरंही वाटायचं. आपल्या देशातली परिस्थिती पाहिली की यातला फोलपणा लक्षात येतो. तेच राजकारणी, तेच मुद्दे, त्याच समस्या, तिच आश्वासनं, तिच हताशा, कुठे काय बदललंय? त्याच राजकारण्यांची तिसरी- चौथी पिढी, त्याच मुद्द्यांवर आपल्याला मुर्ख बनवतेय.
आपला नेता, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आपल्या हिताची काम करतो की नाही किंवा आपल्या विभागात – गावात पाण्याची, रस्ते, नाल्याची सोय त्यानं केलीय की नाही यावर त्याच्या कामाचं मुल्यमापन कधीच होत नाही, तर गावातल्या लग्नाला किंवा तेराव्याला तो कसा वेळ काढून येतो यावर त्याचा चांगुलपणा आपण जोखतो.
अशी हजारो उदाहरण सापडतील.
सिंघम मधे तो जयकांत शिक्रे म्हणतो ना ‘कुछ भी करने का लेकीन मेरा इगो हर्ट नही करने का’… जनतेचं, मॉबचं, गर्दीचं मानसशास्त्र तसंच असावं. राजकारणी असो की मोठी सेलिब्रिटी मंडळी त्यांना याची कल्पना असावी, त्यामुळेच ते जनतेच्या असल्या इगोची खूप काळजी घेत, सुखनैव राज्य करत राहतील... इमोशनल फुलांच्या देशात.
प्रतिक्रिया
हे सग्गळं बरोबर आहे अन डोकं
तर हे एक असो पण तुमच्या
या प्रतिक्रियेचाही नेमका
जरी या लेखाचा मुद्दा वेगळा असला
काही महिन्यांपूर्वी सी