✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जयविजय

अ
अभ्या.. यांनी
Sat, 02/02/2013 - 15:08  ·  लेख
लेख
"ओ दादा येऊ का आतमदे" अगदी टिपिकल बार्शी टोनमध्ये आवाज आला. आधी कुठेतरी पाहिल्यासारखा वाटणारा चेहरा, साधे कपडे आणि हातात एक पिशवी. "जरा काम होतं फ्लेक्सचं. जास्त नाय ३० फुटाच हाय पन आरजंट पायजे" मला अजूनही आठवत नाहीये याला कुठं पाह्यलय मी. "जय्विजय पायजेत छापून ७ फूटाचे दोन" "दुपारी जेवायला गेलेले डीटीपी ऑपरेटर अजून आले नाहीत. बसा जरा." ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जयविजय डोळ्यासमोर उभे राहिले बार्शीतले वाडे, मोठमोठे दरवाजे, दारावर लग्नप्रसंगी रंगवले जाणारे भालदार चोपदार म्हणजेच बार्शीच्या भाषेत जयविजय. चार पाच रंगाने भरलेल्या वाट्या आन तीनच ब्रश घेऊन तासाभरात घ्रराचे लग्नघर करणारा पेंटर. तो तास आणायसाठी मात्र पत्रिका छापायला देतानाच त्याला आमंत्रण द्यावे लागे. लग्न अगदी तोंडावर आले की आम्ही बच्चे कंपनी त्याच्या मागावर सुटायची. दुकानी, त्याच्या घरी आणि तो काम करत असलेल्या घरी अशा सगळीकडे चकरा झाल्यावर हा कलाकार सापडायचा तानाजी चौकात देशीच्या गुत्त्यावर. "सकाळी येतो म्हणून सांग काकांना" एवढाच निरोप घेऊन आम्ही घरी परतायचो. "येईल रे, कुठे जातोय पळून, बँकेचा थकबाकीदार आहे तो", वडीलांचा दांडगा विश्वास. त्यामुळेच कदाचित दुसर्‍या दिवशी दारात बघावे तर त्याने रंग कालवायला सुरुवात केलेली असायची. पट्टी नाही, मोजमाप नाही, स्केच नाही पण दोन्हीकडेचे जयविजय अगदी मिरर इमेज असायचे. सुरुवातीला फिकट गुलाबी रंगात थोडीशी पिवळी छटा असणारा त्वचेचा रंग, लगेच पिवळ्या शेंदरी रंगात पितांबर आणि दागिने, जांभळ्या रंगाचा शेला आणि लाल कटीवस्त्र. सुरुवातीला नुसतेच रंग दिसत. काळा रंग निषिध्द असे म्हणून गडद तपकिरी रंगाचा लहान ब्रश एकदा फिरायला लागला की पाहता पाहता चित्र सजीव होई. एक पाय गुडघ्यात वाकवून हाती तिरपा दंड घेतलेले, अगदी देवासारखे देखणे मुकुटधारी जयविजय. बार्शीत श्री भगवंताचे मंदिर असल्याने पहिल्यापासूनच दरवाजावर भालदार चोपदार नव्हेत तर जयविजयच. खाली लफ्फेदार सही ठोकेस्तोवर घरातून चहा आलेला असायचा. चहा आणि बिदागी घेऊन तो जायचा पण माझे निरिक्षण काही संपायचे नाही. चाटे गल्लीतल्या त्याच्या दुकानासमोर उभारणे म्हणजे सुध्दा मौज असायची. शेजारी महाराष्ट्र ब्रास बँडवाल्यांची प्रॅक्टीस चालू आणि त्या तालावर इकडे दुकानाचे बोर्ड रंगवणे मी तासनतास बघत राहायचो. लस्सीचा ग्लास हातात घेतलेला अर्नोल्ड पासून चहा पिणार्‍या अमिताभ पर्यंत सगळे हुबेहुब उतरलेले असायचे. चित्रकलेच्या वहीत बर्‍याच प्रयत्नानंतर जमलेले जयविजय घेऊन एकदा त्याला दाखवावे वाटे पण त्याच्या तिरसटपणाची भितीही वाटायची एक रविवारी मात्र सकाळी सकाळी तो दारात उभा होता, चेहर्‍यावर अत्यंत अजिजी आणि आपली रंगीबेरंगी सायकल घेऊन. तासभर माझ्या वडीलांचे हप्ते न चुकवण्याचे आणि दारु न पिण्याचे उपदेश ऐकून तो निघणार इतक्यात मी माझे जयविजय त्याला दाखवले. "चांगलं काढताव पण मोठं झाल्यावर सायब व्हा बँकेतलं, तुमच्या वडलासारखं." एवढेच बोलून गेला. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आज पट्कन तेच जयविजय एका कागदावर काढून स्कॅन करुन पीसीवर त्यात रंग भरायला १५ मिनिटे खूप होती. "आमचे वडील पण शेम आस्लंच जयविजय काढायचे बघा. बार्शीत पेंटर होते, गेले १० वर्शाखाली" "आणि तुम्हाला नाही का येत मग पेंटींग?" बँकेतल्या साहेबाच्या मुलाचा निरर्थक प्रश्न "नाही जमत, वडीलानी पतसंस्थेत लावलय नोकरीला. आता घरात आरजंट लग्न ठरलय. मोकळं दार कसं ठेवायचं म्हणून तर हे फ्लेक्स लावतो दारावर"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24403 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

मस्त लिहिलं आहे पण शेवट एकदम

यशोधरा
Sat, 02/02/2013 - 15:12 नवीन
मस्त लिहिलं आहे पण शेवट एकदम गुंडाळला असं वाटलं.
  • Log in or register to post comments

एक नंबर! आवडलं!

आदूबाळ
Sat, 02/02/2013 - 15:22 नवीन
एक नंबर! आवडलं!
  • Log in or register to post comments

छान झालय....पण लै लवकर संपलं

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/02/2013 - 15:27 नवीन
छान झालय....पण लै लवकर संपलं नाटक..असं झालं
  • Log in or register to post comments

टचिंग!

स्पंदना
Sat, 02/02/2013 - 16:53 नवीन
त्याच्या कलाकारीन तुम्हाला खुप काही दिलं, पण त्याच्या पोटान कधीच त्या कलेच कौतुक त्याच्या मनी नाही उतरु दिलं> मस्त अमिना!
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे.

श्रिया
Sat, 02/02/2013 - 16:57 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

वर्णन मस्तच!! शेवट बरेच काही

बॅटमॅन
Sat, 02/02/2013 - 16:58 नवीन
वर्णन मस्तच!! शेवट बरेच काही सांगून गेला. बाकी मिरजेत उगारे आर्ट्सच्या कमानीसुद्धा लै भारी असायच्या आणि असतातही.
  • Log in or register to post comments

मस्तच!

पैसा
Sat, 02/02/2013 - 20:20 नवीन
आणखी लिहीत जा रे!
  • Log in or register to post comments

आवडले

श्रीरंग_जोशी
Sat, 02/02/2013 - 20:34 नवीन
शीर्षक वाचून वाटले एखाद्या बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रपटगृहाची कथा असावी. भावस्पर्शी चित्रण. जयविजयचे एखादे चित्र पाहायला मिळाल्यास मोदकावर तूप ओतल्यासारखे वाटेल.
  • Log in or register to post comments

>>>जयविजयचे एखादे चित्र

प्रचेतस
Sat, 02/02/2013 - 23:28 नवीन
>>>जयविजयचे एखादे चित्र पाहायला मिळाल्यास मोदकावर तूप ओतल्यासारखे वाटेल. =)) तुपाने माखलेला मोदक डोळ्यांसमोर आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सोप्पय

अभ्या..
Sat, 02/02/2013 - 23:38 नवीन
तुपाने माखलेला मोदक डोळ्यांसमोर आला.
खरं तर जयविजयपेक्षा हेच सोपे जाईल काढायला. मोदक अगदी घाटदार काढू पण ते माखलेले तूप आहे की अजून काही, हे चित्रात कसे समजणार? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगागागागागा, मोदकाला आता

प्रचेतस
Sat, 02/02/2013 - 23:48 नवीन
अगागागागागा, मोदकाला आता घाटदार पण करायलास... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

काहि कळलं नाही!

अग्निकोल्हा
Sat, 02/02/2013 - 20:53 नवीन
पन पब्लिक भारी म्हंतय मनजे मस्तच असनारं! असु... लित र्‍हा!
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे....

मुक्त विहारि
Sat, 02/02/2013 - 21:04 नवीन
आवडले...
  • Log in or register to post comments

मस्त रे अभि.. पहिलंच लेखन

इनिगोय
Sat, 02/02/2013 - 23:20 नवीन
मस्त रे अभि.. पहिलंच लेखन आवडलं. येऊदेत असे अजून अनुभव.
  • Log in or register to post comments

भौसाहेब,आवडला तुमचा लेख बरंका

अधिराज
Sat, 02/02/2013 - 23:37 नवीन
भौसाहेब,आवडला तुमचा लेख बरंका!
  • Log in or register to post comments

अब्या ते जयविजय पहायची खुप

जेनी...
Sun, 02/03/2013 - 03:27 नवीन
अब्या ते जयविजय पहायची खुप इच्छा आहे . जिवंत लिहिलयस .... पण जयविजय दाखव्ना ... पहायचे आहेत कसले असतात ते . प्लिझ .
  • Log in or register to post comments

अब्या राव ! स्केच आवडलं !

चौकटराजा
Sun, 02/03/2013 - 05:52 नवीन
अबू , हे पेटिंग वाटलं नाही पण खूप वेळा चित्रकाराची स्केचबुक पहाण्यात मजा असते. हे स्केच मला आवडलं बादवे तुझ्याकडे मोठ्या पन्ह्याचे प्रिंटिंग मशीन आहे काय? आमच्या येथील एका नगरसेवकाला साठ फूट बाय साठ फूट चा त्याच्या नातवाचा फ्लेक्स करायचा आहे.नातवाचा पहिलाच मासिक वाढदिवस आहे म्हणे !
  • Log in or register to post comments

चांगलंच लिहतोस कि रे. लेख

किसन शिंदे
Sun, 02/03/2013 - 07:28 नवीन
चांगलंच लिहतोस कि रे. लेख वाचून ते जय विजय पाहायची तीव्र इच्छा झालीय. विश्रांतीचा फायदा असाही होतो आहे म्हणजे तर. :)
  • Log in or register to post comments

मस्त रे, जय विजय बार्शीचे आणि

५० फक्त
Sun, 02/03/2013 - 09:36 नवीन
मस्त रे, जय विजय बार्शीचे आणि सोलापुरच्या बालाजीच्या देवळातले दोन्ही आठवले. खुप छान लिहिलं आहेस.
  • Log in or register to post comments

मान गये अमिना

लीलाधर
Sun, 02/03/2013 - 10:51 नवीन
वाचण्यात आले आहे. लय भारी जमलय रे :))
  • Log in or register to post comments

छान !

क्रान्ति
Sun, 02/03/2013 - 11:45 नवीन
आवडलं लेखन. खेड्यांत अजूनही असे 'जयविजय' दिसतात वाड्यांच्या, देवळांच्या प्रवेशद्वारावर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अभ्या..
Sun, 02/03/2013 - 11:49 नवीन
सर्वांना धन्यवाद. प्रतिसाद आणि चित्रे सोडून माझे हे पहिलेच लिखाण. अगदी आयुष्यातील पहिलेच म्हणले तरी चालेल. सगळ्यांनी कौतुक केले, त्यातल्या त्यात मिपावरचे कौतुक म्हणजे अगदी क्रिटीक्स कॅटेगरीत अ‍ॅवार्ड मिळाल्यासारखे. त्यामुळे खूप खूप आभार. बाकी ब्याटम्यानाप्पाचे उगारे आर्टस माझे अगदी खास मित्र. त्यांची पेंटींग अफलातूनच आणि वंशपरंपरागत सुध्दा. @चौराकाका, एवढा मोठा पन्हा नाही ओ. १०.५ फूट होते कसेबसे पण पेस्टींग करुन देऊ ६० फूट. @गिल्फुकाका, तुम्ही लिहित रहा एवढे म्हणले तेच समजले ;) तुमच्याएवढे व्यासंगी मला नाही जमणार लिहायला. पैसातै, अपर्णातै, यशोधरातै, इन्नातै, श्रीयातै या सगळ्या ताया आणि बाकीच्या दादा लोकांचे मनापासून आभार. पूजाला एक जयविजयची जोडी पाठवून देण्यात येईल. :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

शुचि
Sun, 02/03/2013 - 14:38 नवीन
लेख आवडला.
हे
आहेत का जय विजय?
  • Log in or register to post comments

असेच

अभ्या..
Sun, 02/03/2013 - 17:25 नवीन
हो शुचितै असेच असायचे जयविजय पण शैली जरा वेगळी. हे मी काढलेल्या चित्रात सुध्दा मूळ चित्रातला जो गोडवा आम्हाला जाणावायचा त्याच्या निम्मा सुध्दा नाही. :( तरी ज्यांना अगदीच माहित नाहीत त्यांच्यासाठी. :) Image removed. जयविजय अत्यंत सुंदर आणि अलंकारीक रुपात बार्शीच्या श्री भगवंत मंदिराच्या दरवाजावर तैलरंगात रंगवलेले आहेत. घरावर रंगवलेले साधे आणि कमी अलंकृत असायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

भारी बे अभ्या. बार्शीचं कुठलं

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 17:34 नवीन
भारी बे अभ्या. बार्शीचं कुठलं देऊळ म्हंतोय्स मी नाही बगायला ते, पण मिर्जंला किल्ला भागात एक नरसिंहाचं देऊळ हाये, आता पाडून नविन करायलेत पुन्ना. आदीच्या देवळाच्या भाएरच्या भिंतीवर जयविजय लै मस्त होते. जिल्बी चौकातून फुडं ग्येलो की आधी काशीविश्वेश्वर अन मंग व्यंकोबाचं देऊळ लागतं तिथेही हे जयविजय एग्जॅक्ट सेम फार्म्याटमंदी हैत. भारी बे एकच नंबर, त्यानिमित्तानं जुण्या आटवनी ताज्या झाल्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हे बघ रे लै जुने असलेले जय

प्रचेतस
Mon, 02/04/2013 - 09:39 नवीन
हे बघ रे लै जुने असलेले जय विजय Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

भारी रे. त्रिशुंड गणपतीच्या

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 11:34 नवीन
भारी रे. त्रिशुंड गणपतीच्या प्रेमात पडलोय आता आपण! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खी खी खी.

प्रचेतस
Mon, 02/04/2013 - 11:39 नवीन
खी खी खी. त्रिशुंड नाय रे हे. मोरगावचे हे एक अतिशय दुर्लक्षित असे जुने शिवमंदिर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अर्र तेच्या. लै भारी बे पण.

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 11:53 नवीन
अर्र तेच्या. :P लै भारी बे पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्तच!

दादा कोंडके
Sun, 02/03/2013 - 15:03 नवीन
पट्टी नाही, मोजमाप नाही, स्केच नाही पण दोन्हीकडेचे जयविजय अगदी मिरर इमेज असायचे.
अगदी खरं. आजुबाजूच्या शुभविवाह लिहिलेल्या घरात बिन्धास्तपणे जाउन आम्ही लहानपणी 'फरक ओळखा' खेळायचो. आणि शेवटी कंटाळून एक या बाजूला उभा आहे आणि एक त्या बाजूला उभा आहे हा फरक सांगत असू. :) आणि शाळेतून घरी येताना वाटेत पाट्या रंगवणार्‍या पेंटरच्या दुकानासमोर उभं राहून 'स-'र' च्या गाठी गिरवताना बघायला गंमत यायची. क्याड आणि रेडीयम आलं आणि ती मजा गेली. :(
  • Log in or register to post comments

अभ्या अनुभवलेखन जमलय रे पण

पियुशा
Sun, 02/03/2013 - 15:10 नवीन
अभ्या अनुभवलेखन जमलय रे पण लेख लै लवकर उरकला बोल्ले तो मुन्नभाई स्टाईल "रुम अभी शुरु नै हुवा के लगेच्च खतम हो गया ;)"
  • Log in or register to post comments

वॉव..!!

ह भ प
Sun, 02/03/2013 - 16:20 नवीन
जितक्या सहज बासुंदीची वाटी पीत पीत रहातो अन लक्षात येतं की अर्र संपली वाटतं..पण मन तृप्त झालेलं असतं.. अगदी तसं वाटलं.. मस्तच.. बाकी 'जयविजय'चा फटू पायजे व्हता राव.. बार्शीला जीवलग मित्राच्या मामाच्या घरी जाईन तेव्हा नक्की बघेन.. अन तानाजी चौकसुद्धा बघेन.. ;)
  • Log in or register to post comments

मस्तं लेखन....

प्रभाकर पेठकर
Sun, 02/03/2013 - 16:26 नवीन
मस्तं आहे लेखन. शेवट जरा झटपट आटपल्यासारखा वाटला खरा. पण, लेखनातून जो परिणाम साधायचा होता तो साधण्यात यश मिळाले आहे.
  • Log in or register to post comments

आवडले

वेताळ
Sun, 02/03/2013 - 18:21 नवीन
एकदम मस्त.... पुर्वी पेक्षा आताच्या काळात अंगभुत कौशल्याला खुप मागणी आहे.पुर्वी आमच्या इथे जे पेंटर काम करायला २० -३० रुपये घेत होते त्याची मुले लॅपटॉप वर काम करतात.मोठमोठी रंगवायची कंत्राटे घेतात.
  • Log in or register to post comments

छोटी पण मार्मिक कथा.

सस्नेह
Sun, 02/03/2013 - 19:40 नवीन
अभ्या लेखनाची कला कधी शिकलास ?
  • Log in or register to post comments

हे लेखन नजरेतून सुटलं होतं.

रेवती
Mon, 02/04/2013 - 01:53 नवीन
हे लेखन नजरेतून सुटलं होतं. जयविजय हा शब्द आला आणि सगळं मनाला भिडलं. आज्जी हाच शब्द वापरायची, भालदार चोपदार नाही. लेखन फार आवडलं. लेखनाचा शेवट काहीबाही वाटायला लावणारा आहे.
  • Log in or register to post comments

मस्त रे अब्या साॅरी अभ्या ..

जोशी 'ले'
Mon, 02/04/2013 - 07:47 नवीन
मस्त रे अब्या साॅरी अभ्या ...छान लिहलय, जय विजय हे विष्णु च्या दरबाराचे व्दारपाल ना? बहुतेक मंदिरां बाहेर पाहिलिय अशी चित्रे ते चित्र जरा मुळ लेखात टाकता आलं तर बघ
  • Log in or register to post comments

छानच लिहेले आहे! अजून येऊ दे.

नगरीनिरंजन
Mon, 02/04/2013 - 08:24 नवीन
छानच लिहेले आहे! अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments

आवडलं

स्पा
Mon, 02/04/2013 - 09:24 नवीन
अमिना, आवडलं .. मस्तच लिहील आहेस पण लवकर संपवलंस, अजून मोठं चालले असते
  • Log in or register to post comments

लै भारी बे अभ्या!

सोत्रि
Mon, 02/04/2013 - 09:40 नवीन
लै भारी बे अभ्या! भावस्पर्शी, मस्तच. -(मामाच्या वाड्यावर जयविजय असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

छानच लिहिलय. आवडलं.

कवितानागेश
Mon, 02/04/2013 - 10:06 नवीन
छानच लिहिलय. आवडलं. अवांतरः आमच्या शाळेत वर्गाबाहेर उभे केलील्या मुलांना जयविजय म्हणायचे. :प
  • Log in or register to post comments

@ मुलांना जयविजय म्हणायचे.>>>

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/04/2013 - 11:45 नवीन
@ मुलांना जयविजय म्हणायचे.>>> =)) आणी मुलिंना काय म्हणायचे??? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मुलींना

इरसाल
Mon, 02/04/2013 - 17:11 नवीन
जया-विजया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

छान

चावटमेला
Mon, 02/04/2013 - 10:11 नवीन
छान लेख. सांगलीत लहानपणी गांव भागातील जुन्या वाड्यांच्या दरवाज्यांच्या बाजूला असेच जय विजय पाहिल्याचे आठवतात.विशेष म्हणजे प्रत्येक वाड्याची ष्टाईल वेगळी वाटायची. कदाचित क्लायंट च्या रिक्वायरमेंट नुसार कस्टमाईझ केलेले असतील :)
  • Log in or register to post comments

वाह रे अभ्या,

नि३सोलपुरकर
Mon, 02/04/2013 - 11:30 नवीन
लेखणी पण मस्त चालवतोय की रे (ब्रशचा महीमा पाहिलाच आहे आम्ही) . छान लिहलेस, आमच्या गल्लीतील जुने वाडे आणी जोडबसवण्णा चौकातील हाटेल आठवले बघ." लस्सीचा ग्लास हातात घेतलेला दिलिपकुमार पासून चहा पिणारा अमिताभ "
  • Log in or register to post comments

ही हाटेलं म्हंजे मेहबुब आणि

५० फक्त
Mon, 02/04/2013 - 14:18 नवीन
ही हाटेलं म्हंजे मेहबुब आणि नंतर आलेलं नकी. खालच्या मजल्यावरुन वर लस्सी घ्यायला बांधलेली लिफ्ट आणि गोल प्लॅस्टिकच्या भांडयात ठेवलेले ७ ग्लास पाणी, मग नंतर चहा आणि क्रिमरोल. आता पण सोलापुरात गेलो की प्रत्येक वेळी तिथं जाउन येतो. आठवणीसाठी धन्यवाद. अंत्रोळीकरांच्या दवाखान्यासमोर यल्लादासींच्या दुकानात २-२ तास काढलेला मी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३सोलपुरकर

करेक्ट

नि३सोलपुरकर
Mon, 02/04/2013 - 15:04 नवीन
५० भाऊ : एकदम करेक्ट या एकदा सोलापरात, लस्सी चा सिझन सुरु होतोय टाकूया एखादी चक्कर मेह्बुबला. बाकी यल्लादासीं बद्दल म्या पामराने काय बोलावे ....गेले ते दिवस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

सोलापूरात या

अभ्या..
Mon, 02/04/2013 - 15:12 नवीन
५० दादा, नितिन एकदा सोलापूर कट्ट्याचा गांभीर्याने विचार करा रे. नुसत्या लस्सीचा करु पण कट्टा करू. बाकी यल्लादासी अजून आहेत, जुन्याच सिग्नेचरने फ्लेक्स छापतात कन्ना चौकात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३सोलपुरकर

अनुमोदन

नि३सोलपुरकर
Mon, 02/04/2013 - 15:28 नवीन
अभ्या, कट्ट्याला माझे पुर्ण अनुमोदन आहे आणी ५० भाऊंनी ठरवल्यास हे जमेल असे वाटते,५० भाऊंनी गांभीर्याने विचार करावा ही विनंती. बाकी यल्लादासी आहेतच :हो मा़झी थोडीफार ओळ्ख आहे त्यांच्याकडेही चक्कर टाकता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

फेब्रुवारीचा चवथा शनिवार, २३

५० फक्त
Mon, 02/04/2013 - 15:38 नवीन
फेब्रुवारीचा चवथा शनिवार, २३ तारीख सकाळी सकाळी ८ वाजता, श्री. सिद्धेश्वराच्या देवळात भेटु, बोला कोण कोण येणार ते.? मग सुधा इडली मध्ये इडली आणि मैसुर मसाला खायला जाउ, आणि नंतर मस्का स्लाईस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३सोलपुरकर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा