स्वप्नातल्या देशा

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
1 Jan 2013 - 2:19 pm

"सपने मे देखा एक सपना, वो जो है ना अमिताभ अपना..............." ऐकत होतो आणि खरोखरच अमिताभ आला. सुरुवातीच्या चहापाण्याच्या चार गप्पा झाल्यावर (म्हणजे फक्त गप्पाच झाल्या. पुणेकर आहे म्हटले मी. साले लोक न बोलावता घरी येणार वर यांच्यासाठी चहा करा हे कोणी सांगितले आहे?" ) अमिताभन्ने चाचरत मुद्द्याला हात घातला. पिक्चर काढतो आहे म्हणाला. मला हिरो होण्यासाठी गळ घालत होता. आधी ष्टोरी विचारायच्या बेतात होतो पण मग साशंक मनाने आधी उरलेली स्टारकास्टच विचारली. तर म्हणाला तुम्ही हिरो, अभिषेक साइड हिरो, ऐश्वर्या हिरोइन, जया तुमच्या आईचा रोल करेल आणी मी खलनायक.

नाही म्हणले तरी मला ठसका लागला. नशीब पाणी पीत नव्हतो नाहितर जोश मध्ये शाहरुख खानने अमिताभच्या सूनेच्या तोंडावर जशी चूळ मारली होती तशी मी अमिताभच्या तोंडावर मारली असती. अमिताभ ओशाळला असता ते ठीक आहे. पण पुण्यात पाणी किती महाग आहे आजकाल. येत्या उन्हाळ्यात मिळेल की नाही माहित नाही. लवासाला जावे लागेलसे दिसते. आमचे दादा दयाळु आहेत. अजुन तरी लवासा सगळ्यांना पाहण्यासाठी खुले आहे. पाणीही मुबलक आहे तिथे. भरपुर पाहता येइल.

असो. तर ठसका लागण्याचे मुख्य कारण अमिताभ खलनायकी भूमिका करणार हे होते. त्याने खलनायकी भूमिका केलेल्या आधीच्या चित्रपटांचे काय हाल झाले होते ते मी बघितलेत. "आग " विझवायला तर पाणी पण मिळाले नव्हते. म्हटले "या आगीत इतका होरपळल्यानंतर परत हे धाडस". तो दाढीतल्या दाढीत हसला. आताशा कौन बनेगा करोडपतीमध्ये कोणी त्याची उगाच तूप लावुन स्तुती केली की तो असाच हसतो. रेखाबद्दल कोणी प्रश्न विचारला तरी असाच हसतो. तुझी सून तुझ्या पोराबरोबर कमी आणि तुझ्याबरोबरच जास्त दिसते असे म्हटले तरी असाच हसतो. अभिषेकचे काय होणार असे विचारले की असाच हसतो. खलनायकी भूमिका अभिषेकचे भले करण्याच्या प्रयत्नातुन असावी असा मी समज करुन घेतला. बाकी स्वतःबरोबर अभिषेकला कडेवर घेउन काढलेले चित्रपट काही फारसे चालत नाहित आणि चालले तरी त्याचे क्रेडिट अभिषेकला मिळत नाही म्हणुन मी त्याला कडेवर घेउन चित्रपट चालवावा आणि अभिषेकची हिंदी चित्रपटसृष्टीतील गाडीही चालवावी असा त्याचा इरादा असावा हे मी लगेच ताडले.

मी फार नाही थोडेफार चेंजेस सुचवले:

१. जया भादुरी आई नसून आज्जी दाखवावी. आईची भूमिका काजोल करेल. काजळीच्या रंगासारख्या काजोलचा पोरगा (म्हणजे मी) इतका गोरा कसा हा प्रश्न कोणाला पडल्यास तो त्यांचा प्रश्न. अमिताभचा मुलगा इतका माठ कसा हा प्रश्न कधी कोणाला पडला आहे काय?

२. ऐश्वर्या माझ्यापेक्षा मोठी आहे हे चित्रपटात दाखवावे (ती तशीही माझ्यापेक्षा मोठीच आहे पण मी चालवून घेइन). आता मला टक्कल पडले आहे आणि तिला नाही हे इथे गैरलागू आहे. ऐश्वर्याला टकला कसा काय चालु शकतो हाही प्रश्न गैरलागू आह. डेमी मूरला नाही ब्रुस विलीस चालला?

३. मी चित्रपटात एकदाही ऐश्वर्याला उचलुन घेणार नाही. झाडांमागे पळताना नाही, स्विमिंगपूल मधुन बाहेर येताना नाही (हे मस्ट. म्हणजे स्विमिंग पूल असणे आणि त्यात मी आणी ऐश्वर्याने स्विमिंग करणे हे दोन्ही मस्ट. तळ्यात पाणी २ फूटापेक्षा जास्त नसले म्हणजे झाले. मला पोहता येत नाही), गुंडापासुन (च्यायला म्हणजे चित्रपतात अमिताभच की. विसरलोच) वाचवताना नाही. रिक्स कोण घेणार. सद्यस्थितीतल्या ऐश्वर्याला उचलायचे म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी सगळ्या दुख्या मागे लावुन घेणे आले.

४. ऐश्वर्याचा आणि माझा लव्ह शीन चालु असेल तेव्ह अभिषेकने समोर थांबता कामा नये (अमिताभही नाही. समोर खलनायक नको).

५. अभिषेक चित्रपटात काम करणार नाही.

शेवटची अट ऐकुन अमिताभ तीनताड उडाला. "मग काय उपयोग?" म्हणाला "अभिषेक नसेल तर त्याचे करीयर वाचवणार कोण? आता तू नाहीच म्हणतोस म्हणुन रजनीकांत कडे जाणे आले."

तो गेला. मी विचार करतच राहिलो की अरेरे अभिषेकला चालवुन घेतला असता तर स्विमिंग पूलातली ऐश्वर्या ................. विचार करता करताच ऐश्वर्याने त्याच स्विमिंग पूलातले पाणी डोक्यावर टाकले. खडबडुन उठलो तर सत्यजीवनातली ऐश्वर्या (कजाग शशिकला म्हणणार होतो खरेतर पण ती हा लेख वाचण्याची पुर्ण शक्यता असल्याने ऐश्वर्या) खरोकह्र रिकामी बादली घेउन समोर उभी होती. नशीब तिने लाथा घालुन नाही उठवले. आजचा दिवस बरा होता म्ह्णायचा. निमूटपणे उठलो आणि रिकामी बादली आणि कळकट फडके (माझे एकेकाळचे बनियान) घेउन कामाला लागलो.

*************************************************************************************

परत स्वप्न पडले. "सपना मेरा टुट गया" ऐकत होतो. च्यायला या स्वप्नातले सगळे खुप खरे वाटते. जाग येते तेव्हा स्वप्न खरे होते की आता चालु आहे ते स्वप्न असा प्रश्न पडतो. कधीकधी वास्तव काय आहे ते जाणुन घेउन सुद्धा स्वप्नच खरे आहे असे मानुन पुढे सरकत रहावेसे वाटते.

"सपना मेरा टुट गया .................." कोणीतरी चेहरा नसलेली मुलगी गात होती. कमालीची आर्तता. कमालीचे कारुण्य. ती फक्त गात होती. मी ऐकत होतो. गाण्यातुन काही अपेक्षा परावर्तित होत नव्हत्या. ऐकुन फक्त दु:खाच्या जाणीवा होत होत्या. गाणे ऐकु येत होते पण समोर तर टीव्हीवर चर्चासत्र चालु होते. मग गाणे कोण म्हणते आहे. लोक शिरा ताणताणुन वाद घालताहेत. त्यांचा आवाज तर वाटत नाही. डोके भणभणायला लागले. त्या गाण्यापेक्षा, त्या आवाजापेक्षा, त्यामागचा गूढपणा जास्त भेसूर वाटत होता. चर्चा चालुच होती " बलात्कार्‍यांना शिक्षा काय असावी?"

कोणी म्हणाले फाशी द्या, कोणी म्हणाले हातपाय तोडा, कोणी म्हणाले कॅस्ट्रेशन उत्तम. मग त्यात वाद झाले "सर्जिकल की केमिकल". काही पोक्त माणसे मात्र या अघोरी शिक्षेच्या विरोधात होते. देव त्यांचे भले करो. "आय फॉर अ‍ॅन आय" ही काय आपली संस्कृती झाली? अर्रे १७ वेळा अभयदान देणार्‍या पृथ्वीराज चौहानाच्या देशातले आम्ही ( त्याच चौहानाला एकदाच हरवुन त्याच घोरीने डोळे फोडुन हालहाल करुन मारले याच्याशी आम्हाला सोयरसुतक नाही) आम्ही क्षमाशील. कारण आम्ही माणसे. गुन्हा करणार्‍या जनावरांशी जनावरांसारखे वागलो तर आमच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय? आपण सिव्हिलाइज्ड (कोण म्हटतय रे ते की मग फाशीची शिक्षा कशी देता म्हणुन). प्रत्येकाला सुधारण्याचा एक चान्स दिलाच पाहिजे. शिवाय अजुन कोणीतरी म्हणाले की शिक्षा सौम्यच हवी. कडक शिक्षा व्हायला लागली. तर गुन्हेगार बलात्कारित तरुणीला जिवंत ठेवेल का? मारुनच टाकेल की नाही? खरे आहे. सध्या तरी ७ वर्षाचीच शिक्षा असल्याने गुन्हेगार विचार करतात की राहिना की पोरगी जिवंत . असा काय फरक पडतो? पकडले गेलो तर जाउन येउ ४-५ वर्षे आता. हाय काय अन नाय काय? परत आल्यावर बघु दूसरी कोणीतरी.

स्वप्नातच दूसर्‍या स्वप्नात शिरलो तर खरेच बलात्काराची शिक्षा ७ वर्षांवरुन ७ दिवसांवर आणण्यात आली होती. प्रणबदांनी टीव्हीवर जाहीर निवेदनच दिले तसे (मला आताशा प्रणबदा प्रतिभाताईंसारखे का दिसतात देव जाणे. चष्म्याचा नंबर तपासून घ्यावा लागेल.) आणि काय सांगु महाराजा दुसर्‍या दिवसापासुन पोलिस स्टेशनात रांग लागायला लागली. प्रामाणिक बलात्कारी रांगा लावुन लावुन बलात्काराची घाऊक जबाबदारी घ्यायला लागले. तू पाच तर मी सात असे कलगीतुरे सामने रंगायला लागले. मीही मनोमन विचार करायला लागलो, महिन्याभराची सुट्टी टाकुन ३-४ " कार्ये " उरकुन घ्यावीत काय? बॉसने आधीच सुट्टी टाकली नसेल म्हणजे मिळवली नाहितर आमची सुट्टी रद्द व्हायची. च्यायला आमचे नशीब हे असेच. काही धड गोष्टी नशिबातच नाहेत आमच्या.

आणि तेच पोक्त गृहस्थ परत एका चर्चासत्रात सांगत होते "बघा मी तुम्हाला म्हणत नव्हतो. शिक्षा सौम्य करा, गुन्हेगार पकडले जातील"

*************************************************************************************

खाडकन जागा झालो. कोणीतरी अजुनही गात होते. पण गाताना आता हलकेसे विव्हळणे ऐकु येत होते. "सपना मेरा टुट गया" मधली अरूणा इराणी गात होती की कोणी ज्योती, कोणी अमानत, कोणी निर्भया, कोणी दामिनि की कोणी अनामिका. कोण होती काही कळाले नाही. खुपच उदासवाणे वाटत होते. अंधारुन आलेल्या, हवा स्तब्ध झालेल्या दुपारी जसा भकासपणा येतो तसा काहीसा प्रभाव वातावरणावर होता. मला असह्य झाले. मरु दे आपल्याला काय घेणे देणे आहे म्हणुन परत पांघरुण ओढुन झोपी गेलो. कधीकधी वास्तवापेक्षा स्वप्नात असणेच जास्त बरे वाटते आणि कधीकधी वास्तवाचे भानच उरत नाही हेच खरे.

धोरणमुक्तकसमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनालेखमतवाद

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

1 Jan 2013 - 2:47 pm | चित्रगुप्त

एकदम फर्मास, झकास लेखन. सलाम.

कधीकधी वास्तवापेक्षा स्वप्नात असणेच जास्त बरे वाटते आणि कधीकधी वास्तवाचे भानच उरत नाही हेच खरे....
.... हा शेवट अंतर्मुख करून गेला...

नववर्षाची दमदार सुरवात. :)

अन्या दातार's picture

1 Jan 2013 - 10:54 pm | अन्या दातार

हा लेख कसा काय सुटला नजरेतून?? सॉलिड लिवलंयस रे!!

पैसा's picture

2 Jan 2013 - 12:28 am | पैसा

फार छान लेख! शेवट खूप आवडला.

रेवती's picture

2 Jan 2013 - 1:33 am | रेवती

छान. लेखन आवडले.

आनन्दिता's picture

2 Jan 2013 - 2:05 am | आनन्दिता

मस्त लिहीलाय लेख...

किसन शिंदे's picture

2 Jan 2013 - 8:59 am | किसन शिंदे

झक्कास लिहलंय. शेवटचा पॅरा छानच..

प्रमोद्_पुणे's picture

2 Jan 2013 - 11:57 am | प्रमोद्_पुणे

..पण पहिल्या स्वप्नाचा दुसर्‍याशी ताळमेळ लागला नाही.

सस्नेह's picture

2 Jan 2013 - 12:08 pm | सस्नेह

पहिला मूड अन दुसरा एकदम Contrast वाटले.
लिखाण छान.

मस्त लिहिलं आहेस रे, धन्यवाद.

मन१'s picture

22 Feb 2013 - 1:31 pm | मन१

मस्तच.

शुचि's picture

22 Feb 2013 - 8:11 pm | शुचि

हाहाहा =)) फर्मास लिखाण!

अग्निकोल्हा's picture

22 Feb 2013 - 10:03 pm | अग्निकोल्हा

शेवट मस्त साधलाय...

अभ्या..'s picture

22 Feb 2013 - 10:42 pm | अभ्या..

वॉव. ग्रेट. एकदम भारी