Skip to main content

असेच काही उदासवाणे .....

लेखक अनघा आपटे यांनी मंगळवार, 30/10/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसला जाताना रस्त्यात एक सिग्नल लागतो, तिथे हमखास दोनतीन गरीब मुले-मुली तुमच्या गाडीपाशी येतात. हातात एक फडकं असतं, काही न बोलता गाडीची समोरची काच पुसू लागतात, जो पर्यंत तुम्ही पर्समधून पैसे काढत नाही तोपर्यंतच मात्र ...अर्थात सिग्नल ही काही सेकंदाचाच असतो. मी दर वेळी २ रु. हाती ठेवते, विचार करते किमान काम करून पैसे मिळवावेत एवढं समजलं आहे हे ही नसे थोडके. या वर माझी चेष्टा करणारी माणसे माझ्या आसपास असतातच. ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग आहोत तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे की ते कोणी एका दोघांच्याने दूर होणे शक्य नाही. पण मी पण या समाजाचाच जर एक भाग असेल तर मी कोणत्यातरी स्वरूपात माझा सहभाग त्याच्या निर्मूलनासाठी द्यायलाच हवा. अनेकदा मी चितळ्यांच्या दुकानात जाते, घरी विशेष अशा गोष्टी खाणारं कोणी नसतं तरी काही ना काही मिठाई, फरसाण घेवून येते, असू दे कोणी घरी अचानक आलं तर असावं म्हणून. त्या दुकानाच्या बाहेर अनेक लहान मुले भीक मागत असतात. त्या दुकानातून बाहेर पडताना मला इतका अपराधी वाटतं की नुसते एक दोन रु. हातात ठेवून काही फारसं साध्य होणार नाही. मग मी बाजूला एक दोन खाऊ ची दुकाने आहेत तिथून काहीतरी सामोसा, इडली वगैरे विकत घेवून त्यांना देते. तिथेच बाजूला इतर फुटकळ विक्रेते असतात जसे की लिंबे, गजरे, डाळिंबे विकणारे. परवा असंच काही एका मुलीला घेवून दिल्यावर बाजूला उभा असलेल्या गजरेवाल्याने ते तिच्या हातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. ते पाहून मी त्याला ओरडले, की तिला खावू दे. पण आपण तरी असे किती पुरे पडणार. अनेकदा नको असतानाही मी सिग्नलला गजरेवाल्यांकडून गजरे घेते. काही उपयोग नसतो मला त्यांचा. थोडा वेळ गाडीत छान सुवास दरवळतो इतकेच. आज सिग्नलला उभी असता नेहमीप्रमाणे एका मुलगी गाडी जवळ आली, काच पुसू लागली, पैसे देवू केल्यावर, माझ्या बाजूच्या खिडकीतून समोर ठेवलेले चुईंग गम सारख्या दिसणाऱ्या पाकिटाकडे बोट दाखवून ते मागू लागली, पण तिच्या दुर्दैवाने ते चुईंग गम नव्हतं, मी हातात पैसे ठेवून, ते देणार नाही सांगितला. सिग्नल संपून गाडी सुरु करेपर्यंत ती गाडी सोडेचना. आता जरी ते चुईंग गम असतं तर त्याने का तिचे पोट भरणार होते? इतकं उदास, इतकं हतबल वाटू लागलं नंतर मला की पुढे जावून मला गाडी चालवयालाच सुचेना, शेवटी मग गाडी बाजूला घेवून, थांबले, पाणी पिऊन, पाच मिनिटे तशीच शांत बसून राहिले मग पुढे गेले. पण प्रश्न हा की अस हे किती दिवस चालणार?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2709
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

हे असं नेहमीच चालणार. करुण असं जे दिसतं त्यासाठी संवेदनशीलता असणं हे माणसाच्या जिवंत असल्याचं लक्षण आहे. मात्र त्यासाठी स्वतःला जबाबदार धरणं किंवा आपण ऐषारामात राहतोय म्हणून गिल्टी होणं, हे टाळलं पाहिजे. वृद्ध, अपंग आणि अगदी लहान मुलं यांना कष्टाने काम करण्याचं तत्वज्ञान लागू पडत नाहीच. त्यांना रोकड देण्याऐवजी अन्न दिलं तर नक्कीच जास्त शहाणपणाचं आहे. या गोष्टींनी आपलं रोजचं आयुष्य डिस्टर्ब मात्र होऊ देऊ नये, कारण त्याने काही फरक पडत नाही.

In reply to by गवि

गविशी सहमत. तुम्ही सध्या जे करत आहात ते उत्तमच आहे, मात्र ह्याहुन अधिक काही करत नसल्याचे शल्य मनात ठेऊ नका. जे काही लिहायचे आहे ते गविने लिहले आहेच, मला हेच सांगायचे आहे. - छोटा डॉन

In reply to by गवि

सहमत आहे. संवेदनशील असणे चांगले आहेच पण त्यामुळे होणारा त्रास मुकाट सहन करणे अवघड असले तरी करावाच लागतो. तसंही भावना मारण्यात आपण हळूहळू पटाईत होत जातोच.

In reply to by नगरीनिरंजन

तसंही भावना मारण्यात आपण हळूहळू पटाईत होत जातोच.
सहमत! लहान असताना ठिकय (मानसीक वय वर्षे ८ ते १२) पण भारतात रहाणार्‍या लोकांना सिग्नलवरचे भिकारी पाहून रडू येतं म्हणल्यावर विश्वास बसणं अवघड आहे. एक आठवणः २००४ साली एक वेडसर भिकारी बाई सेनापती बापट रस्त्याच्या (ज्यावरून रोज लाखो लोकं जायची) कडेला उकिरड्यावर बसलेली दिसायची. दोन-तीन महिन्यानंतर बघितलं तर ती चक्क गरोदर होती. मग १-२ दिवस ती काहीच हलचाल न करता पडलेली दिसली आणि दुसर्‍या दिवशी ती तशीच दिसली तेंव्हा तीसर्‍या दिवशी तिला (बहुतेक) म्युनिसीपाल्टीनं उचलून नेलं. मी दोन्-तीनदा कुठल्याश्या संस्थेत फोन करून कळवलं होतं पण काहीच झाल नाही. आणि जास्त काही केलं नसल्याची टोचणी नाही.

कोणी भीक मागताना पहिले की आपण अगदी असाच असहाय व हतबल आहोत ही जाणीव मलाही होत असे. काही प्रमाणात अजूनही होते. मग मात्र मला राग आला. गावी नी सांगितल्या प्रमाणे संवेदना असणे ठीक आहे पण आपली अपराधी भावना येण्याचे कारण तपासून पहावे. एकदा गाडीतून जाताना एक मैत्रीण बरोबर होती . मी गाडीमधून एका कुबडीवाल्या माणसाला रु.५ दिले. त्याने आमच्या समोर रस्ता ओलांडून बिडी चे पाकीट घेतले व मस्त शिलगावू लागला.त्या मुलीशी गप्पा मारता मारता तिने हया तोडगा म्हणून नियमीत चांगल्या संस्थेत दान कारण्यास सुचवले. (ती दर महिन्याला वात्सल्य ट्रुस्ट ला नियमित देणगी देते.) त्याचे अनुकरण करून मी ही वनवासी कल्याण आश्रमास नियमित नाही पण कारण परत्वे देणगी देवू लागलो. आता संवेदनशील असल्याने हा त्रास होणारच पण अपराधी भावना खूप कमी झाली आहे. सुयोग्य संस्था निवडा व जमेल तशी जमेल तेवढी मदत करा आणि पहा काही फरक पडतो का ? वनवासी कल्याण आश्रमामध्ये देणगी द्यावी शी वाटली तर व्य.नी. करा. कृपया येथे व.क.आ (रा.स्व.संघचा ) उल्लेख संदर्भाने आला आहे. त्या वरून प्रतिक्रिया नकोत. आपल्या विचारांना अनुरूप संस्थेस मदत करावी एवढाच अर्थ घ्यावा.

निदान मुंबईत तरी मुलांना भीक मागायला पाठवणार्‍यांचे एक रॅकेट आहे.मग ती मुले सिग्नलवर गाडीच्या काचा पुसल्यासारखे करणारी असोत की रेल्वेमध्ये डब्यात झाडू फिरवल्यासारखे करणारी असोत किंवा थाळीतले हळदकुंकू वाहिलेले देवीचे चित्र तुमच्यासमोर नाचवून ब्लॅकमेल करणारी असोत.त्यांच्यातला दादा थोडासा दूरवर त्यांच्यावर लक्ष्य ठेवून उभा असतो.सगळी कमाई तो घेतो.मुलांना काही ठराविक पैसे दिले जातात्.खाण्याच्या वस्तू दिल्या तरी त्या हिसकावून घेतल्या जातात.खाऊन पिऊन व्यवस्थित दिसणारी मुले भिकेच्या धंद्यात चालत नाहीत. हा धंदा इतका जोमात चालतो की त्यासाठी मुले पळवून आणली जातात.आपण जर भीक दिली नाही तर हा धंदा चालणार नाही आणि कालांतराने बंदच पडेल.ह्यातले म्होरके कित्येकदा पोलिसांचे खबरे असतात.कदाचित त्यामुळे पोलिसही काणाडोळा करीत असावेत.शिवाय इतक्या मुलांम्होरक्यांना पकडून ठेवणार कुठे? आणीबाणीत मुंबईत एकही भिकारी दिसत नसे.असे बोलले जाई की या सगळ्यांना पकडून मध्य/उत्तर महाराष्ट्रात कुठेतरी दगड फोडणे,माती वहाणे अशा कष्टाच्या कामी सक्तीने लावले जात होते.फुकटेपणाची सवय लागलेले हे लोक तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत.(ही सर्व ऐकीव माहिती आहे.खर्‍याखोट्याची शहानिशा केलेली नाही.) एनजीओजच्या बाबतीतसुद्धा संशय घेण्याजोग्या पुष्कळ गोष्टी आहेत. एखाद्या संस्थेला देणगी द्यावी हे ठीक.पण तीविषयी व्यवस्थित माहिती काढावी. गेली दोन वर्षे लोकसत्ता हे वर्तमानपत्र गणेशोत्सवादरम्यान अशा संस्थांची माहिती आणि पत्ता प्रसिद्ध करते.तेही उपयुक्त ठरू शकेल. ता.क.- केवळ ह्याच नव्हे तर कुठल्याच गोष्टीविषयी अपराधी भावना फार काळ मनात बाळगू नये.कार्यहानी होते.

सगळे विचार खूपच विदारक आहेत...... आपण आपला खारीचा वाटा उचलावा आणि पुढे जावे. संवेदनशील मन असणे चांगले पण ते आतून प्रचंड टोचणी लावते ज्याचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नसतो ज्याला आपण जबाबदार नाही त्याविषयी अधिक विचार करून काही फरक पडत नाही......

अगदी युरोप आशियातील देशातही दिसणारे वास्तव आहे. हा आहे रे आणि नाहीरे मधील चिरंतन लढा आहे

हि भिकार्यांची राकेट्स थांबवणं हा यावर उपाय आहे. अवांतर: त्या चिंगम वाल्या पाकिटात नक्की काय होतं याचीच उत्सुकता लागून राह्यली व्हो :) (ह. घ्या.)

In reply to by इष्टुर फाकडा

:) तरी मी विचार करतिये अजुन हा प्रश्न कोणी कसा विचरला नाही? नवर्याने सिगारेट कमी व्हाव्यात म्हणुन ठेवलेले निकोरेट होते ते!

त्यांना जबरदस्तीने भिक मागायला लावले जात असेल्,पण धडधाकट माणसे पण जेंव्हा भीक मागताना दिसतात तेंव्हा चीड येते. बाकी आजच्या जीवनातल्या बर्‍याच समस्या ह्या अति शहरीकरणामुळे निर्माण झाल्या आहेत असं मला तरी वाटतं.याही समस्येचं मुळ यातच आहे.

भिकार्यांना भिक घालणे म्हणजे संवेदनशिल असणे नव्हे.दान करणारा या ठिकाणी स्वत:ला विषेश समजत असतो. दान देताना ते सत्पात्री असावे याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.भिक मागणे हा आज काही लोकांचा धंदा झाला आहे.गरजवंताला पैसे;वस्तू ई.खात्रीलायक संस्थांमार्फतच द्याव्या.त्या संस्थांसाठी स्वयंसेवक म्हणूनही वेळ देता आला तर जरूर द्यावा.गरजूंची सेवा या अशा मार्गांनीही करता येते.