✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ.

क
कौन्तेय यांनी
गुरुवार, 03/22/2012 - 11:47  ·  लेख
लेख
मी जन्मसिद्ध पार्लेकर. आम्हाला गावच नाही. आई-वडील तसे वऱ्हाडातले, पण आता तिथे कुणाचंच काही आणि कोणी शिल्लक नाही. त्यामुळे आमचं सगळं मुंबई एके मुंबईच. 'सब भूमी गोपाल की' हे तत्व प्रथमपासून पाळल्यामुळे याचं कधी दुःख जरी वाटलं नाही तरी एक शल्य सतत मनात होतं. मग आपल्या मुलांना नि त्यांच्याही मुलांना कुंकवापुरतं का होईना पण एक गाव असावं, गावी जायला घर असावं, खेळाबागडायला अंगण असावं, आपले झाडं लावायचे, शांततेत बसायचे शौक (हो, आता शांतता हा मोठा ऐषारामी शौकच म्हटला पाहिजे) पुरवावेत इ. इ. म्हणून एका टुमदार गावात रिकामा गावठाण भूखंड शोधून, रीतसर कायदेशीर बाबी पूर्ण करून तिथे घर बांधायचं काढलं. किल्ल्याच्या पायथ्याचा गाव. मग काय सोन्याहून पिवळं. सेकंड होम, सप्ताह-अखेर बंगले योजना, रो हाउसेस (नावाची खुराडी) अशा लोकप्रिय योजनांत मुद्दामून न जाता प्रत्यक्ष गावात, एकुटवाणं घर बांधायचं, ज्यात जमीनीचा सात-बाराही स्वतःच्या नावावर असेल म्हणजे जमीनीच्या त्या तुकड्यावर खरीखुरी मालकी असेल म्हणून ही उठाठेव केली. एकही नवा पैसा जास्तीचा न देता, वाट्टेल तिथे वाट्टेल तितक्या वेळी अत्यंत ताप-त्रासदायक चकरा मारून का होईना पण सातबारा नावावर झाला या समाधानात जेव्हा ग्रामपंचायतीकडे घरबांधणीची परवानगी घ्यायला गेलो तेव्हा दाताखाली पहिला दगड आला. पंचायत समिती सदश्श्यांनी सहा जणांचे म्हणून लंपसम्‌ २०००० रु. मागितले. काही दिवस चाल ढकल करून ते दिले. आयुष्यात लाचखोरी करण्याचा हा पहिला प्रसंग. आणि शेवटचाच अशी मनाशी घट्ट गाठ बांधून घरबांधणी सुरू केली. सदस्यांनी दिलेल्या प्रेमळ सूचनावजा आदेशांप्रमाणे बांधणीचं कंत्राट गावातल्याच उपसरपंचाला (हाही विनोदच. यांची बायको खरी उपसरपंच. पण हे भाऊ सगळीकडे स्वतःची ओळख उपसरपंच म्हणून देत फ़िरतात. महिला सक्षमीकरण की जय!). मध्यंतरी अण्णा हजाऱ्यांचं वगैरे आंदोलन होऊन गेलं. एकदा भाऊंना फ़ोन लावला तर म्हणे आता एक आठवडाभर खूप बिझी आहे, गावात भ्रष्टाचार विरोधी रॅली काढायचीए ना! पण आता आमचं बांधकाम पूर्णत्वाकडे जाताना घरपट्टी लागू करण्यासाठी आवेदन केलं तर सगळ्यांसाठी त्याचे पंधरा हजार मागत आहेत. 'नाय हो, आम्ही गावात कुणालाच नाय सोडला' हे स्पष्टीकरण. पैसे द्यायचे नाहीत हे ठरलेलंच आहे पण मला वाटतं की ते देऊन टाकून थोडी मनःशांती विकत घेण्याचा मोह कधीही होऊ शकतो. गावातल्यांना नि पंचायत समितीला नडायला माझी ना नाही. पण या कारणांमुळे मनात शंका निर्माण होतात -
  1. अशाने आपली तत्वपूर्ती साधली तरी पुढच्या मोठ्या काळासाठी सगळ्यांशी वाकड्यात जाणं हा वेडेपणा ठरेल अशी भीती वाटते.
  2. पुन्हा 'आहेरे-नाहीरे' वर्ग, शहरचे-गावचे, कदाचित ब्राह्मण-इतर यां अशा भिन्नतांपोटी गावकऱ्यांचा आपल्याबद्दल नेमका काय ग्रह असेल / होईल हेही सांगता येत नाही.
  3. मोक्याच्या ठिकाणीं बसलेल्या व्यक्तींनी असे पैसे मागणे हा त्यांचा हक्क प्रस्थापित झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शासकीय फ़िया भरून आपलं काम होईल असं मानणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे हे वास्तव आहे.
  4. आनंदाचे चार क्षण अनुभवता यावेत म्हणून बांधलेल्या घराच्या रूपाने नवीन विकतची दुखणी नि मनस्ताप येऊ नयेत!
... तर मंडळी, या मुद्द्यांवर कुणाचं काही म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ. असल्यास अवश्य इथे मांडाव्यात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27502 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

गोळाबेरीज

कौन्तेय
Fri, 03/23/2012 - 21:09 नवीन
मंडळी, साधक बाधक नि भरघोस गप्पांसाठी सगळ्यांचे आभार. आत्तापर्यन्त झालेल्या चर्चेतून बरेच मुद्दे हाती आले. काही उत्तरं मिळाली, तर काही नवीन प्रश्न मिळाले! चर्चौघात मिळालेल्या या दुव्यांचाही उपयोग झाला http://misalpav.com/node/20887 | http://www.misalpav.com/node/17574 .या चर्चा मंथनात काही मला मानवणारे व काही न मानवणारे पण वेधक, ठोस मुद्दे सापडले ते असे (द्विरुक्ती वा विस्तारभयास्तव प्रत्येक व्यक्तीचा मुद्दा त्याच विशिष्ट स्वरूपात वा क्रमाने जसाच्या तसा देत नाही) -
  1. प्रत्येकाचा बाप असतो.
  2. कायदा-सुव्यवस्थेच्या व मालकी हक्काच्या भिन्न ग्रामीण व शहरी कल्पना नि त्यांची कार्यवाही (काहींनी मांडलेले वाईट अनुभव)
  3. पैसे टाका, मोकळे व्हा, ’पुढाऱ्याच्या नावाचं एखादं फ़्लेक्स लावा’
  4. आमदाराला वास्तुशांतीला बोलवा; पैसे मागणाऱ्यांत फ़ूट पाडा.
  5. काही ठिकाणी माघारही श्रेयस्कर. पण तत्त्वपूर्ती हाच एकमेव निकष असेल तर अटीतटीची लढाई खेळावी.
  6. आपलं आयुष्य किती - आपण लढतोय किती
  7. मानसिक ताण तणाव झेपणार असतील तरच लाच न देता टक्कर देण्याच्या फ़ंदात पडा.
  8. गावच्या लोकांना जिंका - प्रेमाने, पैशाने (वा इतर कशानेही) [प्रेमाने जिंकायला वावच नाही. अख्खं गाव विकत घेण्याइतके पैसे असल्याविना या वाटेला जाऊ नये].
  9. गावगुंड व झोटिंगांना प्रसंगी जशास तसे उत्तर देण्याची तयारी हवी.
  10. वीकेंड होम ही नापास संकल्पना आहे.
  11. प्रसंगी आडमुठेपणा, खमकेपणा दाखवून देण्यासाठी गुंडपुंड पुढाऱ्यांच्या ओळखी लागतात.
  12. खेडूत मित्र वाढवावेत.
  13. अनधिकृतच बांधकाम करून मग ते नाममात्र दंड भरून अधिकृत करून घेतले तर खर्च कमी येतो.
  14. जगात सगळीकडे असलेल्या लाचखोरीच्या समांतर व्यवस्थेला आपणही कधी कळत कधी नकळत शरण गेलेलो असताना नेमका याच बाबतीत कांगावा का?
  15. जोशी ... छळ ... नेपाळ ... दारू ... कट्टा ... सुरळित
  16. धागाकेसरी पिपळ्या पैलवानाचा पराक्रम
  17. हितसंबंधांचं महत्त्व. गावाचे व तुमचे एकमेकांच्यात रुजलेले असावेत.
  18. व्यवहार, संवादकौशल्य वा इतर साधने पुरेपुर वापरल्याशिवाय चुना लागू देऊ नये.
सगळ्याची गोळाबेरीज म्हणून मधे म्हटल्यानुसार गावाच्या पंचायतीमधे उभा राहून कुणी (१) शहरी, (२) सुखवस्तू दिसणारा, (३) फ़ॉरेनवाला, (४) अनोळखी, नवखा, उपरा माणूस - केवळ स्वतःवर शेकत आहे म्हणून सचोटीचे फ़ंडे देऊ लागला तर त्याचे लगेचचे नि दूरगामी परिणाम चांगले नसतील. या कारणामुळे आत्तातरी विकतची मनःशांती आपलीशी करावी लागेलसं दिसतंय. पण सरते शेवटी जर त्या मार्गाने गेलोच तर
  • - आपण आपलं पाह्यलं, पण गरीबानं काय करायचं?
  • - आपण इतके पैसे दिल्याने गरीबांना नाडणाऱ्या व्यवस्थेला आपण आणखी बळकटी दिली नि घरपट्टी देण्याचा रेट वाढवून ठेवला त्याचं काय?
  • - हा; किंवा आपल्यातला अथवा समाजातला किमान एक दोष तरी निवारण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही?
ही शल्यं मनात राहणार आहेत. असो. बाकी या सूत्राच्या अनुषंगाने इथे सुरू झालेली चर्चा सुफ़ळ संपूर्ण झाली असं मी माझ्याकडून जाहीर करतो. शुभम्‌ भवतु।
  • Log in or register to post comments

- आपण इतके पैसे दिल्याने

JAGOMOHANPYARE
Fri, 03/23/2012 - 21:20 नवीन
- आपण इतके पैसे दिल्याने गरीबांना नाडणाऱ्या व्यवस्थेला आपण आणखी बळकटी दिली नि घरपट्टी देण्याचा रेट वाढवून ठेवला त्याचं काय? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> त्याची चिंता तुम्ही करु नका... घर कच्चं आहे, पक्कं आहे, नवीन आहे, जुनं आहे, आतल्या सोयी.. अशा गोष्टींवर फाळा ठरतो... त्यामुळं इतरांची चिंता तुम्ही करु नका. - हा; किंवा आपल्यातला अथवा समाजातला किमान एक दोष तरी निवारण्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> याला मात्र फक्त तुम्हीच जबाबदार आहत.. पार्ल्याला फ्लॅट घेऊन किती वर्षे झाली? तेंव्हा बी एम सी ला किती पैसे मोजले होते? तेंव्हा जर वरच्या १८ पैकी काही केले असते तर ही वेळ कदाचित आली नसती नै का? ------------------------------------------------------------------------- शहरास्ते पंथानः :) ---------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

गरीबानं काय करायचं?

खेडूत
Fri, 03/23/2012 - 21:19 नवीन
>>> आपण आपलं पाह्यलं, पण गरीबानं काय करायचं? -- गरिबाला असले प्रश्न पडतच नाहीत!
  • Log in or register to post comments

प्यारे मोहन,

कौन्तेय
Fri, 03/23/2012 - 22:17 नवीन
जागो. तुमचा पार्ले नि शिवाजीपार्क यां 'स्थळां'बाबत काही नाजुक तगादा असेल - मी समजू शकतो; पण त्याचा राग या चर्चासूत्रावर का काढता??? आणि आता तेही संपलं आहे. मंडळ आभारी नाही! गुडनाइट.
  • Log in or register to post comments

धागा उशीरा पाहीला ... तरीही ...

सातबारा
Sat, 03/24/2012 - 00:27 नवीन
तुम्ही धाग्याचा शेवट केलेला आहे. मात्र मी आत्ताच धागा पाहील्याने माझे काही स्वानुभवाचे बोल. वर दिलेले खेडूत, पिपळ्या, अर्धवट यांचे उपाय चांगलेच आहेत. त्यात पुढील भर घाला .. - दारात एक कार कायम उभी असू द्यात. - दुसर्‍यांना मनापासून मदत करता आली पाहीजे. ( अर्थीक नाही. पैसे उसने दिले की गेले. वेळेला आपल्या कडील वस्तू इ. शेअर कराव्यात.) - दुबळी कडी असा माणूस ओळखून त्याला अंकीत करा. मात्र त्याचे काही चुकले की कानातील केस जळतील अशा अस्सल शिव्या त्याला द्या. तुम्हाला घाण घाण शिव्या येतात हे जगाला माहीत असू द्यात. (आधी अभ्यास करा. पॉवरफुल माणसाला शिव्या द्याल तर मग .. ) - पोलीस हे खाकी वर्दीतील सहाय्यक तुमच्या बाजूनी करुन घ्या. एकदा शेजार्‍याच्या पोराने खोडी काढायला माझे ड्रीप चे लॅटरल दारु पिवून उपटून काढले. मी पोलीसाला १००० रु. दाखविले. ५०० आत्ता ५०० काम झाल्यावर , त्याला उचल. माझे हजार गेले. पोलीसाने त्याला दोन कानफटात मारल्या त्याचे कडून ही ५०० काढले. आता माझ्या कडे चोरी होत नाही.बोअर मारताना शेजार्‍याच्या आंब्याची फांदी जी आमचे कडे वसवा/ अतीक्रमणच होती, थोडी छाटली, त्याने बोअर ची गाडी बंद केली ,बोअर वाल्याला धमकावले. एकदम टेन्शन. त्याला म्हटले **** त दम असेल तर अर्धा तास इथेच थांब. तालुक्याला जावून पोलीस जीप व सहा पोलीस आणले. खर्च ५००० रुपये. नंतर चार बोअर झाले. - तुमच्या जमीनीचा तुकडा तुम्हाला विकायचा आहे अशी आवई उठवा. (सर्व जमीन नाही , तुकडा फक्त) ओळख नसलेले लोक राम राम घालतात. -विरुध्ध पार्टीला तुम्ही जमीन विकणार असा संशय दोन्ही पार्टींमध्ये पेरा. दोन्ही पार्ट्या तुमची काळजी घेतील. - विरुध्ध पार्टीतील सावकारांना तुमच्या जमीनीचे अमिष दाखवून किरकोळ कर्ज दोघांकडून ही काढा. (एवढेच कर्ज, की जे तुम्ही कधीही फेडू शकाल.) ते कर्ज थकवा. तुम्हाला आपोआप रक्षणकर्ते मिळतील. - तुम्हाला कशाची ही घाई नाही हे दाखवा. काम नाही झाले तरी विचलीत होवू नका. -हा माणूस काहीही करु शकतो याच्या नादी लागायला नको असे तुमच्याबद्दल रिपोर्टस लोकांपर्यंत जावू द्यात. ( मात्र तसे काहीही करण्याच्या भानगडीत पडू नका) - फार कोणाच्यात मिसळू नका. गावच्या राजकारणात तर अजीबात जावू नका. मात्र दोनचार प्रतिष्ठीत लोकांशी गोड बोलून संपर्कात रहा. - बिन्धास्त भ्रष्टाचार करा. (भ्रष्टाचा विरोधी आंदोलनात काय घडते ते जवळून पहात आहे. सन्मार्ग आपला नाही हे माहित करुन घ्या) पस्तीसाव्या वर्षी पुणे सोडून शेतावर स्थायीक व्हायचा निर्णय घेवून मी गेली पंधरा वर्षे शेतावर राहूनच हे सर्व एन्जॉय करतो आहे. त्यामुळे पहील्या धारेचा सल्ला देवू शकतो आहे.
  • Log in or register to post comments

आभारप्रदर्शन!

कौन्तेय
Sat, 03/24/2012 - 07:05 नवीन
सातबाराराव, काय हान्‌लाय्‌!!. ... व्वा - मझा आला. माझी फ़क्त एका निवासी भूखंडाव्यतीरिक्त कुठलीही शेतजमीन नसल्याने तुम्ही दिलेले सगळेच जालिम उपाय आजमावता येणार नाहीत, पण एकंदर अर्क रामबाण आहे. आभारी आहे. कसलेला अध्यक्ष सभेत नेहमी उशीरा येऊन समारोपाच्या भाषणात अशी काही सर्व्हिस टाकतो की सगळे जाम प्याक्‌! ... ! तुमचं समर्पक, मुद्देसूद नि चपखल समारोपाचं भाषण पाहून मला पुन्हा एकदा आभारप्रदर्शनाला उभं रहावं लागलं. बहुत बढिया. आयोजकांनी सभा संपन्न म्हणून घोषित केली असली तरी अजून पसायदान होणं बाकी आहेसं दिसतं. चेक्‌ चेक्‌ चेक्‌ - ध्वनिपरीक्षण एक दोन तीन ...
  • Log in or register to post comments

अगदी अगदी. भिमाईचे पिपळ्याराव

रेवती
Sun, 03/25/2012 - 02:31 नवीन
अगदी अगदी. भिमाईचे पिपळ्याराव आणि सातबारा यांनी मस्त प्रतिसाद दिलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय

कौंतेय साहेब

तिमा
Sat, 03/24/2012 - 18:14 नवीन
मला कल्पना आहे की सगळी चर्चा संपली आहे. पण वर पार्ल्याचा उल्लेख आला म्हणून लिहावेसे वाटले की माझा अनुभव लिहावा. आम्ही पार्ल्यात गेली ४० वर्षे रहात आहोत. आम्हीही पासपोर्ट काढला आहे, पोलिस स्टेशनात गेलो आहे. पण पासपोर्टसाठी तरी अजून आमच्याकडे कधीही कोणीही पैसे मागितले नाहीत आणि आमचे काम वेळेत झाले. कोणाचीही ओळख काढावी लागली नाही. बाकी सर्व चर्चा ऐकून गांवाविषयी धडकीच भरली. आमची धांव फार तर पुण्यापर्यंत! तुमच्या कामात तुम्हाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

ये हुई ना बात -

कौन्तेय
Sun, 03/25/2012 - 06:02 नवीन
नमस्कार. धागाबाह्य लेखन, विषयांतर, प्रतिसादाला प्रतिवाद, तिरकी तिरकी चर्चा, मग भांडणं, व्यक्तीगत हल्ले नि चर्चाविघटन या गोष्टी टाळायच्या म्हणून मीही काही लिहिलं नव्हतं. तुमच्या या अहवालातून मोठे महान प्रश्न पडलेल्यांना उत्तर मिळावं. धन्यवाद. शेवटी गाववालेच धावून आले बघा! पारपत्र (मराठीत पासपोर्ट) व वाहनचालन परवाना यां दोन्ही ठिकाणी वा पो. चौकीत मला जास्तीचे पैसे द्यावे लागले नव्हते. पारल्याचं घर बाबांचं आहे. पंचेचाळीस वर्षांपूर्वी त्यांनीही त्या व्यवहारात पैसे चारलेले नाहीत. मी माझ्या नवी मुंबईतील रहात्या घराच्या व्यवहारातही नाहीत. नशीबाने प्रस्तुत चर्चेतला निवासी भूखंडही गावाबाहेरच्या एका वयस्कर गृहस्थाचा होता, जो तत्वनिष्ठही आहे (गृहस्थ). त्यामुळे आमचा सगळा व्यवहार पांढराच होऊ शकला. गटबुक नकाशा हस्तगत करण्यासाठी ज्या स्थानिक मित्राने खेट्या घातल्या त्याला दाद मिळत नाहीएसं पाह्यल्यावर मी मुद्दाम भारतवारी काढली नि तहसील कार्यालयात थडकलो तर तिथल्या जबाबदार साहेबाने पंधराव्या मिनिटाला तिरक्या नजरेने माझ्या हातात तो ठेवला. तिथलं बदललेलं वातावरण बघता मी त्यांना तहेलकाचा पत्रकार वगैरे वाटलो असण्याची शक्यता आहे. तसं मित्र मला म्हणाला. नवा सातबारा काढण्यासाठी मात्र तलाठ्याला पाचेकशे रु द्यावे लागलेले. तस्मात, गोळाबेरीज पाहता माणसाचा चांगुलपणा नि पैसे न चारताही कामं होण्याची शक्यता या गोष्टी गृहित धरण्याइतपत आयुष्याचा चांगला अनुभव मला आजवर आलेला आहे. याला नशीब म्हणू वा आईवडिलांची पुण्याई. म्हणून समानशील मित्रांशी अनुभवांची देवघेव व्हावी यासाठी हा धागा काढला 'होता'. अन् त्यावरच्या त्वरित नि् अर्थपूर्ण प्रतिसादांसाठी (निंदेसकट) मिपा.करांचे आभार मानावे तितके कमी आहेत. शुभम् भवतु -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

अवघड आहे...

दादा कोंडके
Sun, 03/25/2012 - 03:02 नवीन
बापरे, लेख आणि प्रतिक्रिया वाचून माझं स्वप्न मोठ्ठं होण्याआधिच त्याच्या गळ्याला नख लावलं मी. :(
  • Log in or register to post comments

काय नाय ओ, बिन्‌धास्‌ -

कौन्तेय
Sun, 03/25/2012 - 06:34 नवीन
दादा, 'लगिन पहावं करून नि घर पहावं बांधून' म्हणतात. करून पहावं! जोखीम आहे कबूल, पण ती कशात नाही? घेऊन टाकायची. पुढचं पुढे! आवश्यक पूर्वतयारी केली की झालं. जर लोकांच्या वाईटच अनुभवांवर विसंबायचं ठरवलं तर आयुक्ष्यात कुठे जायला नको न्‌ काही करायलाच नको. शुभ पंथावर बिनधास्स जावा -
  • Log in or register to post comments

गावात हा त्रास पण शहरात हा

आशु जोग
Sun, 03/25/2012 - 12:43 नवीन
गावात हा त्रास पण शहरात हा त्रास नसतो असं आहे का !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा