✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ.

क
कौन्तेय यांनी
गुरुवार, 03/22/2012 - 11:47  ·  लेख
लेख
मी जन्मसिद्ध पार्लेकर. आम्हाला गावच नाही. आई-वडील तसे वऱ्हाडातले, पण आता तिथे कुणाचंच काही आणि कोणी शिल्लक नाही. त्यामुळे आमचं सगळं मुंबई एके मुंबईच. 'सब भूमी गोपाल की' हे तत्व प्रथमपासून पाळल्यामुळे याचं कधी दुःख जरी वाटलं नाही तरी एक शल्य सतत मनात होतं. मग आपल्या मुलांना नि त्यांच्याही मुलांना कुंकवापुरतं का होईना पण एक गाव असावं, गावी जायला घर असावं, खेळाबागडायला अंगण असावं, आपले झाडं लावायचे, शांततेत बसायचे शौक (हो, आता शांतता हा मोठा ऐषारामी शौकच म्हटला पाहिजे) पुरवावेत इ. इ. म्हणून एका टुमदार गावात रिकामा गावठाण भूखंड शोधून, रीतसर कायदेशीर बाबी पूर्ण करून तिथे घर बांधायचं काढलं. किल्ल्याच्या पायथ्याचा गाव. मग काय सोन्याहून पिवळं. सेकंड होम, सप्ताह-अखेर बंगले योजना, रो हाउसेस (नावाची खुराडी) अशा लोकप्रिय योजनांत मुद्दामून न जाता प्रत्यक्ष गावात, एकुटवाणं घर बांधायचं, ज्यात जमीनीचा सात-बाराही स्वतःच्या नावावर असेल म्हणजे जमीनीच्या त्या तुकड्यावर खरीखुरी मालकी असेल म्हणून ही उठाठेव केली. एकही नवा पैसा जास्तीचा न देता, वाट्टेल तिथे वाट्टेल तितक्या वेळी अत्यंत ताप-त्रासदायक चकरा मारून का होईना पण सातबारा नावावर झाला या समाधानात जेव्हा ग्रामपंचायतीकडे घरबांधणीची परवानगी घ्यायला गेलो तेव्हा दाताखाली पहिला दगड आला. पंचायत समिती सदश्श्यांनी सहा जणांचे म्हणून लंपसम्‌ २०००० रु. मागितले. काही दिवस चाल ढकल करून ते दिले. आयुष्यात लाचखोरी करण्याचा हा पहिला प्रसंग. आणि शेवटचाच अशी मनाशी घट्ट गाठ बांधून घरबांधणी सुरू केली. सदस्यांनी दिलेल्या प्रेमळ सूचनावजा आदेशांप्रमाणे बांधणीचं कंत्राट गावातल्याच उपसरपंचाला (हाही विनोदच. यांची बायको खरी उपसरपंच. पण हे भाऊ सगळीकडे स्वतःची ओळख उपसरपंच म्हणून देत फ़िरतात. महिला सक्षमीकरण की जय!). मध्यंतरी अण्णा हजाऱ्यांचं वगैरे आंदोलन होऊन गेलं. एकदा भाऊंना फ़ोन लावला तर म्हणे आता एक आठवडाभर खूप बिझी आहे, गावात भ्रष्टाचार विरोधी रॅली काढायचीए ना! पण आता आमचं बांधकाम पूर्णत्वाकडे जाताना घरपट्टी लागू करण्यासाठी आवेदन केलं तर सगळ्यांसाठी त्याचे पंधरा हजार मागत आहेत. 'नाय हो, आम्ही गावात कुणालाच नाय सोडला' हे स्पष्टीकरण. पैसे द्यायचे नाहीत हे ठरलेलंच आहे पण मला वाटतं की ते देऊन टाकून थोडी मनःशांती विकत घेण्याचा मोह कधीही होऊ शकतो. गावातल्यांना नि पंचायत समितीला नडायला माझी ना नाही. पण या कारणांमुळे मनात शंका निर्माण होतात -
  1. अशाने आपली तत्वपूर्ती साधली तरी पुढच्या मोठ्या काळासाठी सगळ्यांशी वाकड्यात जाणं हा वेडेपणा ठरेल अशी भीती वाटते.
  2. पुन्हा 'आहेरे-नाहीरे' वर्ग, शहरचे-गावचे, कदाचित ब्राह्मण-इतर यां अशा भिन्नतांपोटी गावकऱ्यांचा आपल्याबद्दल नेमका काय ग्रह असेल / होईल हेही सांगता येत नाही.
  3. मोक्याच्या ठिकाणीं बसलेल्या व्यक्तींनी असे पैसे मागणे हा त्यांचा हक्क प्रस्थापित झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शासकीय फ़िया भरून आपलं काम होईल असं मानणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे हे वास्तव आहे.
  4. आनंदाचे चार क्षण अनुभवता यावेत म्हणून बांधलेल्या घराच्या रूपाने नवीन विकतची दुखणी नि मनस्ताप येऊ नयेत!
... तर मंडळी, या मुद्द्यांवर कुणाचं काही म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ. असल्यास अवश्य इथे मांडाव्यात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27502 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/22/2012 - 12:11 नवीन
अहो प्रत्येकाचा एक बाप असतो, तो शोधा म्हणजे झाले. एखादा आमदारपुत्र गाठा, त्याला दोन चार वेळा तुमच्या नव्या आणि सध्या मोकळ्या घरात रेव्ह पार्टीला, श्रमपरीहाराला पाठवून द्या. ;)
  • Log in or register to post comments

अहो, रोगापेक्षा उपाय भयंकर

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 03/22/2012 - 12:50 नवीन
अहो, रोगापेक्षा उपाय भयंकर व्हायचा. पंचतन्त्रातली पक्षी, साप आणि मुंगुस हि गोष्ट आठवली. (किंवा अमोल पालेकर, स्वरूप संपत, शत्रुघ्न सिन्हा आणि उत्पल दत्त चा नरमगरम नावाचा सिनेमा) :-) बाकी धाग्याच्या विषयावर अनुभव सांगणारे इथे नक्की सापडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पण मी काय म्हणतो,

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/22/2012 - 13:20 नवीन
कुणीतरी पुढाकार घ्यायला नको का ? आता संधी मिळाली आहे तर धागाकर्त्याने हा उपाय करून बघावा. ह्याचे जे काय परिणाम होतील त्यामुळे इतर अशा प्रकारच्या नाडलेल्या लोकांना नवीन रामबाण उपाय तरी सापडेल, किंवा निदान ह्याचे तोटे झाले तर ते काय असतील ह्याचे ज्ञान तरी होईल ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

परीकथेतील कशाला

कौन्तेय
गुरुवार, 03/22/2012 - 13:52 नवीन
मेहेन्दळ्यांनी म्हटलं रोगापेक्षा उपाय भयंकर. मला वाटून गेलं की हाडी मासी मुरलेल्या गळवाला सणक आली म्हणून घरच्या सुरीने कापून काढावे की संयत वैद्यकीय उपचार घेऊन कसे बरे करावे या विवंचनेत असलेल्याला "अहो दारू पिऊन टुन्न व्हा नि वर एक इंजक्शन मारियुआनाचं मारा - बघा दुःख पळतं की नाही" असा सल्ला देण्यासारखं आहे! प्रतिसादातल्या खेळकरपणाचं स्वागत. तुम्ही तुमचं नाव खरंतर 'वस्तुस्थितीतील राजकुमार' ठेवायला हवं. तुमचे शौक वा गहन प्रश्नांवरचे आमदारांच्या रेव्ह पार्ट्या आदि गुलछबू उतारे पाहून तुमचा पत्ता १० जनपथ आहे की काय अशी शंका कुणालाही यावी! येऊ द्या अजून ... (शंका नव्हे, प्रतिसाद)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्रचंड अनुभव आहे या

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 13:40 नवीन
प्रचंड अनुभव आहे या गोष्टीचा.. तुमच्या अनुभवांची कार्बन कॉपी आहे असं समजा.. शब्दशः.. आपल्यासारखे कोणीतरी गावगाड्यात भरडले गेले / जात आहे हे पाहून बरं वाटावं की वाईट अशा द्विधा स्थितीत मन आहे.. गावाविषयी आणि गावकर्‍यांविषयी मला तिडीक बसली आहे.. असा होलसेल तिरस्कार अत्यंत चूक असतो हे माहीत असूनही ते टाळता येत नाहीये.. माझं ठाम मत हे तीन वेगवेगळ्या गावांमधे एकीकडे जमीन/सातबारा इ इ बाबत, दुसरीकडे घर, पंचायत, घरपट्टी, अशा सर्व अनुभवांतून झालं आहे.. ही गावंही कोकण, घाट, खानदेश अशा वेगवेगळ्या जॉग्रफीमधली आहेत.. त्यामुळे गावातली गुंडगिरी, दहशत, प्रत्येक कामात पैसे काढण्याची सरपंच, तलाठी आदिंची हाव, घराशी संबंधित सर्व सिव्हिल वर्क्स तिथल्या स्थानिक कारागिरांकडून करुन घेण्यासाठी धमकीचे फोन हे सर्व सर्व सोसलेलं आहे.. सुतार, मिस्त्री, प्लंबर, बांधकाम व्यावसायिक वगैरे हे लोक स्थानिक असण्याचा आग्रह समजू शकतो, पण ते ज्या गचाळ दर्जाचं काम करतात आणि दुप्पट किंवा तिप्पटही चार्जेस घेतात, त्याउप्पर बाहेरुन माणून आणू दिला जात नाही.. आणलेल्या माणसाला धमक्या / हाणामार्‍या करुन पळवून दिलं जातं.. आपल्यालाही धडाधड फोन येतात. गाडी भरुन माणसं जमाव करतात.. आणि म्हणे यांच्यासोबत शेजार जमवून आनंदाने रहायचं.. खेड्यातली जमीन कसणे, टुमदार घर वगैरे स्वप्नांचा कचरा झाला आहे.... मी स्वत: ब्राह्मण आहे हे माझ्या कधीच लक्षात नसतं पण त्यांच्या नेमकं असतं.. तस्मात ब्राह्मण असण्यावरुन तर इतकी वाईट वागणूक मिळते की तो तिरस्कार सहन करण्यापेक्षा तिथली शेती स्थानिकांना मातीमोलाने विकून टाकली.. जाऊदे.. त्यातल्या आणखीन आठवणी काढून तपशीलवार देणं म्हणजे धुतलेले हात परत गटारात घालण्यासारखं आहे.. शहरी मित्रांना इतकंच सांगू इच्छितो की शहरातच घराची जुळणी करा.. लहानसा फ्लॅटही बरा.. किंवा मग खेड्यात जाणारच तर गाव विकत घेता येईल इतका जास्तीचा पैसा असला तरच हात घाला त्यात..
  • Log in or register to post comments

निषेध !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/22/2012 - 14:01 नवीन
मी स्वत: ब्राह्मण आहे हे माझ्या कधीच लक्षात नसतं पण त्यांच्या नेमकं असतं.. तस्मात ब्राह्मण असण्यावरुन तर इतकी वाईट वागणूक मिळते की तो तिरस्कार सहन करण्यापेक्षा तिथली शेती स्थानिकांना मातीमोलाने विकून टाकली..
वरील प्रतिसाद हा अतिशय विद्वेष पसरवणार आहे. सदर प्रतिक्रियेचा व प्रतिसादकाचा मी निषेध करतो. सर्वच जाती धर्मांना कुठे ना कुठे चुकीची वागणूक ही मिळतच असते. काही काळापूर्वी बामणांनी इतरांना कसे वागवले होते हे प्रतिसादक महाशय विसरलेले दिसतात. ते गावाची गोष्ट करत आहेत, पण एकेकाळी कित्येक जाती-धर्मांना देवळात देखील प्रवेश मिळत नसे हे विसरून कसे चालेल ? अशाच गावांमधून दलितांचे हत्याकांड केल जाते आणि दलित स्त्रीयांना विवस्त्र फिरवले जाते. मात्र अश विषयांवरती कोणी उघडपणे निराशा, शोक व्यक्त करताना दिसत नाही. अशा प्रकाराच्या प्रतिसादांची निदान मिसळपाव सारख्या निधर्मी संस्थळावरती दखल घेतली जावी अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सही?

कपिलमुनी
गुरुवार, 03/22/2012 - 14:10 नवीन
सही राहीली की ओ.. परादास आठवले दुर्लक्षित पँथर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अपेक्षित प्रतिसाद.. आले

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 14:12 नवीन
अपेक्षित प्रतिसाद.. आले छिद्रान्वेषी लोक लगेच.. बाकीची व्यथा काही तुम्हाला दिसली नाही, अन ब्राह्मण शब्द तेवढा दिसला.. हल्ली साधा ब्रा काढण्याची सोय राहिली नाही.. (ब्रा म्हणता ब्रह्महत्या किंवा तत्सम अर्थाने.. ) लगेच अ‍ॅट्रॉसिटीचे कोणतेसे कलम लागलेच म्हणून समजा.. गावात कोणत्या जातीचे किती लोक आहेत ते मला माहीत नाही.. पण मला ही जाणीव करुन दिली जाते हे नक्की. अगदी पहिल्यांदा मी दिवसभर जमिनीच्या सर्व्हे नंबरवरुन माझ्या कै. आजोबांची कोर्टातून सुटलेली जमीन शोधत होतो.. सापडत नव्हती.. शेवटी एका गावकर्‍याने हलक्या आवाजात मला "बामणाची जमीन म्हणताय का?.." असं विचारलं आणि मग लगेच जमीन सापडली.. असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एक सुचवण

मूकवाचक
गुरुवार, 03/22/2012 - 14:15 नवीन
हल्ली ब्रा काढण्याची सोय राहिली नाही.. लगेच अ‍ॅट्रॉसिटीचे कोणतेसे कलम लागलेच म्हणून समजा.. इथे ब्र काढण्याची सोय राहिली नाही अशी सुधारणा करायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

काय ब्रं क्रावं.. बूच लावून

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 14:19 नवीन
काय ब्रं क्रावं.. बूच लावून केलेल्या सूचनेचं.. ?? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

बाकीची व्यथा काही तुम्हाला

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/22/2012 - 14:19 नवीन
बाकीची व्यथा काही तुम्हाला दिसली नाही, अन ब्राह्मण शब्द तेवढा दिसला..
तो मुद्दाम दखल घेतली जावी अशा प्रकारे लिहिला गेल्याने दिसला.
गावात कोणत्या जातीचे किती लोक आहेत ते मला माहीत नाही.. पण मला ही जाणीव करुन दिली जाते हे नक्की.
तुम्हाला माहिती नाही ? मग तुम्हाला तुमच्या जातीमुळे छळणारे तुमचे जातवालेच नसतील कशावरुन ? ज्ञानेश्वरांना देखील छळले होते म्हणे.
अगदी पहिल्यांदा मी दिवसभर जमिनीच्या सर्व्हे नंबरवरुन माझ्या कै. आजोबांची कोर्टातून सुटलेली जमीन शोधत होतो.. सापडत नव्हती.. शेवटी एका गावकर्‍याने हलक्या आवाजात मला "बामणाची जमीन म्हणताय का?.." असं विचारलं आणि मग लगेच जमीन सापडली.. असो..
अहो तशी पद्धत असते गावाकडे. बामणाचा वाडा, बामणाची विहीर, बामणाची जमिन इ.इ. आणि काय हो महारवाडा, मांगाची वस्ती शब्द तुम्हाला खटकत नाहीत का ? नुसती 'बामणाची जमिन' शब्द वापरला तर किती लागला तुम्हाला तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पराषेट, मूळ विषयाला धरुन

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 14:22 नवीन
पराषेट, मूळ विषयाला धरुन बोला.. फाटे फोडू नका.. गावकरी आणि शहरी लोकांचे त्यांच्यासोबतचे अनुभव असा विषय आहे.. त्याविषयी आपले मौलिक मत द्या.. उगाच धागा ओढत घोंगडी कशाला उसवायची म्हणतो मी... आँ ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मी फाटे फोडतोय ?

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/22/2012 - 14:27 नवीन
सतत आपल्या जातीवर किती अन्याय होतो हे दाखवणार्‍यांपैकी तुम्ही एक आहात. उलट 'वरील लेखात जाती विषयी आलेले वाक्य काढावे' अशी तुमच्यासारख्या समंजस सदस्यांनी मागणी करायला हवी होती. पण शेवटी तुम्हीपण त्यांच्यापैकीच निघालात. आम्ही लोक आता शिकतोय, तुमच्या बरोबरीला येतोय हे तुम्हाला सहन होत नाही. मी व माझी संघटना तुम्हा लोकांचा निषेध करते. उद्या सकाळी १०.०० वाजता क्रांती चौकात तुमच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचे मी इथे जाहिर करतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

उद्या सकाळी १०.०० वाजता

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 14:31 नवीन
उद्या सकाळी १०.०० वाजता क्रांती चौकात तुमच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचे मी इथे जाहिर करतो आहे.
तुम्ही मला पाहिले असावेत अशी आशा करतो.. पुतळा बनविण्यास केवढे मटेरियल लागेल याचा अंदाज आहे ना? आणि जाळायलाही रॉकेलचा ट्यांकर मागवून ठेवा हो.. -(हितचिंतक) गवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बरोबर !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/22/2012 - 14:35 नवीन
(हितचिंतक) गवि
आमचे हित झाल्याने ज्यांना चिंता वाटते ते हे हितचिंतक. असो.. आम्ही ह्या विद्वेषी बामणी धाग्यावरुन रजा घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>>>१०.०० वाजता क्रांती चौकात

यकु
गुरुवार, 03/22/2012 - 14:33 नवीन
>>>>१०.०० वाजता क्रांती चौकात तुमच्या पुतळ्याचे दहन करणार असल्याचे मी इथे जाहिर करतो आहे. ---- क्रांती चौकात सध्‍या पुतळे दहनास मनाई आहे. तिथे मोठ्ठा फ्लायओव्हर बांधला, आणि दर सहा महिन्याला पाडला जात आहे. तुम्ही बामणांचे नेहमी येणेजाणे असलेल्या बालगंधर्वसमोर, किंवा बामणांचा बजबजाट असलेल्या पुणे विद्यापीठासमोर उदबत्ती लाऊनच गविंचा निषेध करा! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुला रे मेल्या कोणी शाप

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 14:36 नवीन
तुला रे मेल्या कोणी शाप दिला.. ? यकुच बरा होतास की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

इथे केलेली पापकर्मे भोवली

यकु
गुरुवार, 03/22/2012 - 14:45 नवीन
इथे केलेली पापकर्मे भोवली हो! भोगतोय आता किमान हजार वर्षे हा शाप. (दग्ध आणि शापित) यक्कु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

दहन करायला नेलेला पुतळ्याचे

विजुभाऊ
Mon, 04/09/2012 - 20:01 नवीन
दहन करायला नेलेला पुतळ्याचे भाडे थकलय. ते लवकर भरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ब्राम्हण्याचा अभिमान/गर्व न

बाळ सप्रे
गुरुवार, 03/22/2012 - 18:02 नवीन
ब्राम्हण्याचा अभिमान/गर्व न बाळगणार्‍याला पण जन्माने ब्राह्मण असल्यामुळे त्रास देणे हे देखिल निषेधार्थच आहे.. यात कुठेही पूर्वी ब्राह्मणांनी केलेल्या अन्यायाला पाठिंबा नाही.. त्यांचा मुद्दा एवढाच होता.. पैसे खाणे हा एक छळ आणि वर तुमच्याप्रमाणे काही कारण नसताना जातिचा उल्लेख करायचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मी स्वत: ब्राह्मण आहे , मला ही गवि साहेब तसा अनुभव आला आहे.

निश
गुरुवार, 03/22/2012 - 14:48 नवीन
मी स्वत: ब्राह्मण आहे , मला ही गवि साहेब तसा अनुभव आला आहे गावाला. फरक एव्हढाच आहे की, आम्ही शेती वीकली नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गावकरी जबरदस्तीने जमीन

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 15:24 नवीन
गावकरी जबरदस्तीने जमीन बळकावून त्यावर बसलेले असते आणि पूर्णतः बेकायदेशीररित्या जमिनीत घुसून बसलेले असूनही त्यांच्याकडे कोणत्याही क्षणी जमिनीवर हक्क सांगण्याची संधी कायद्याने असती तर कदाचित विकावी लागली असती.. असो.. पुन्हा जातीयवाद व्हायचा.. अधिक त्रांगडी न होता तुमचे गावतले सर्व काम पार पडो ही शुभेच्छा.. आमचीही रजा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

गवी साहेब, खरच असो होउ नये म्हणुन रखवालदार ठेवले आहेत

निश
गुरुवार, 03/22/2012 - 15:30 नवीन
खरच असो होउ नये म्हणुन रखवालदार ठेवले आहेत. आपली जमीन जाण दुसर्‍या ला तेहि जबरदस्तीने ह्या सारख दु:ख नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

विमे आणि पराची हि सौजन्यदाहक

स्पा
गुरुवार, 03/22/2012 - 13:42 नवीन
विमे आणि पराची हि सौजन्यदाहक चर्चा वाचून डोळे पाणावले :D
  • Log in or register to post comments

तुमच्या डोळ्यांना

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 03/22/2012 - 15:01 नवीन
तुमच्या डोळ्यांना पाणावाण्याखेरीज काही कामे नाही वाटते सध्या. फडके रोड वर फिरत जा जरा, डोळ्यांना करण्यासारखे बरेच काही मिळेल. फडके रोड नको असेल तर हापिस कॅन्टीन आहे. नाहीतर हापिसातून बाहेर पडून पवईत जा. तिथे पण बरेच काही आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

फडके रोड वर फिरत जा जरा,

धन्या
गुरुवार, 03/22/2012 - 15:29 नवीन
फडके रोड वर फिरत जा जरा, डोळ्यांना करण्यासारखे बरेच काही मिळेल. फडके रोड नको असेल तर हापिस कॅन्टीन आहे. नाहीतर हापिसातून बाहेर पडून पवईत जा. तिथे पण बरेच काही आहे.
ते दातात सिमेंट भरायला जातात की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

@ते दातात सिमेंट भरायला जातात

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/22/2012 - 17:51 नवीन
@ते दातात सिमेंट भरायला जातात की.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

शेवटचा हात मारुन झालाय म्हणे

सूड
Fri, 03/23/2012 - 00:17 नवीन
शेवटचा हात मारुन झालाय म्हणे त्या शिमेटवर, त्यामुळे पाणावायला फक्त डोळेच उरलेत. ह्या पावसाळ्यात मिठीला पूर येऊ नये असं वाटत असेल तर आधी स्पाकाकाचे डोळे पाणावणं कसं थांबेल याचा शासनाने विचार करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

.

मन१
गुरुवार, 03/22/2012 - 14:17 नवीन
एकाच जात्यातले आपण दोन दाणे .... भरडून जगणे हेच नशिबाचे देणे....
  • Log in or register to post comments

गवि!!! आवरा!! राजीनामा मागतोय

यकु
गुरुवार, 03/22/2012 - 14:25 नवीन
गवि!!! आवरा!! राजीनामा मागतोय मला आमचा मॅनेजरऽऽ! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) कसले 'ब्रा' काढत बसलाय!
  • Log in or register to post comments

हा हा हा

चाणक्य
गुरुवार, 03/22/2012 - 18:34 नवीन
कसले 'ब्रा' काढत बसलाय!
हा हा हा.... भर शांततेत फिस्कन हसलो ना राव. तरी बर बॉस जवळ नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

द्या द्या पैसे,

५० फक्त
गुरुवार, 03/22/2012 - 14:28 नवीन
तुम्ही जर कायमचं त्या घरात राहायला जाणार नसाल तर, तुमच्या मागं मा. श्री. परा, यांनी सांगितलं आहे तसंच होणार आहे तिथं, त्यापेक्षा सरळ तो बाप शोधा, पैसे टाका, काम करुन घ्या, मोकळ व्हा. अगदीच शक्य असेल तर त्यांच्या नावानं एखादं फ्लेक्स वगैरे लावायचं जमवता येईल का तुमचं नाव टाकुन ते पहा आणि मग बघा तुमची सगळी कामं कशी पटकन होतात ते पहा.
  • Log in or register to post comments

चला..

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/22/2012 - 14:33 नवीन
कोणालातरी माझ्या बोलण्यातले मर्म कळाले तर. मी तर म्हणतो हे देखील जमत नसेल तर गेला बाजार तिथल्या आमदाराला वास्तुशांतीला बोलवा आणि बघा मजा. ते ही जमत नसेल तर पैसे मागणार्‍या ४ लोकांच्यात फूट पाडा. हाय काय आन नाय काय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

सावधान!

सर्वसाक्षी
गुरुवार, 03/22/2012 - 14:33 नवीन
कौंतेय, आपला अनुभव कुणी बांधकाम व्यावसायिक आपल्या जाहिरातीत वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेटा मस्त पैकी आपला अनुभव लिहुन खाली ठळक अक्षरात जाहिरात करेल "हे सगळे त्रास सहन करण्यापेक्षा आमच्या प्रकल्पातील टुमदार घरकुल घ्या आणि घराबरोबर मनःशांतीही मिळवा"
  • Log in or register to post comments

कर्मयोग

सुधीर
गुरुवार, 03/22/2012 - 14:56 नवीन
सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी नसतात, काही ठिकाणी माघार घेणेच समंजसपणाचे असते. पण जर का हीच तुमच्या आयुष्याची महत्त्वाची लढाई असेल तर पूर्ण ताकदीने लढा आणि जिंकाच! कोण जाणे, त्या गावाबरोबर तुमचही नाव इतिहासात कोरले जाईल?
  • Log in or register to post comments

३ वाक्यं

कौन्तेय
गुरुवार, 03/22/2012 - 15:27 नवीन
तीनही वाक्यं आशयगर्भ. आभार -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी

५० फक्त
गुरुवार, 03/22/2012 - 15:32 नवीन
सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी नसतात, असं नव्हे तर, ज्याला आपण लढाई म्हणतो, ती लढाईच नसते, आपला ना तो गोष्टीतला ससा झाला आहे, पाठीवर पान पडलं तरी, आभाळ पडलं म्हणुन जगभर बोंबलत फिरणारा. कुठलीही छोटी गोष्ट आपण लढाई म्हणुन धरुन बसतो आणि मग ती हरली म्हणुन आपणच निराश होतो. तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती याच चालीवर आपलं आयुष्य किती आपण लढतोय किती- असं विचारायची पाळी आली आहे, एक दिवस असं लढता लढता आपली अवस्था सिकंदराच्या सैन्यासारखी होईल, लढणं नको आणि विजय पण नको पण मायदेशी आपल्या लोकांजवळ जायचं आहे, हा हट्ट धरुन बसु. पण एवढे लांब आलेले असु त्यांच्यापासुन की परत फिरलो तरी त्यांच्याजवळ पोहोचायच्या आधीच आयुष्य संपुन जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

गगदी तसंच नाही पण...

सुधीर
Fri, 03/23/2012 - 12:05 नवीन
सर्वप्रथम मिपाकर (आणि मायमराठीवर प्रेम करणार्‍या पाहुण्यांनाही) गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! काही गल्लत होतेय, मला जी लढाई अपेक्षित आहे ती, सदसद्विवेकबुद्धी आणि अंतर्मनाच्या कौलाने दिलेली लढाई! "ह्या लढाईसाठीच जणू आपला जन्म झालाय" असं वाटतं ती लढाई. मग ह्याचा शब्दशः अर्थ घेतला तर, तीच लढाई जी महाराज "स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा" असं म्हणून लढले, तीच लढाई ज्याच्यासाठी वीर बाजींनी खिंड लढवली, तीच लढाई ज्यासाठी नरवीर तानाजी "आधी लगीन कोंढाण्याचं" म्हणून रायबाचं लग्न बाजूला सारून लढले आणि शब्दशः अर्थ नाही घेतला तरी तीच लढाई ज्यासाठी लोकमान्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" असं म्हणून इंग्रज सरकार विरुद्ध दंड थोपटले, तीच लढाई ज्यासाठी आंबेडकरांनी दलितांवरील अन्याय दूर करण्याचं ठरवलं, तीच लढाई ज्याच्यासाठी कोलंबसाने अमेरिका आणि वास्को-द-गामाने भारतात जायचा मार्ग शोधला, तीच लढाई ज्यासाठी राइट बंधूंनी विमान बनवण्याचा ठरवलं आणि तीच लढाई ज्यासाठी चार्ल्स लिंडबर्गने न्यूयॉर्क ते पॅरिस प्रवास केला! सिकंदर आणि सम्राट अशोक बर्‍याच लढाया लढाया लढले खरे पण त्या त्यांचा लढाया नव्हत्याच मुळी, कदाचित सम्राट अशोकाची खरी लढाई "बुद्धाच्या शांतीच्या संदेशाचा राज्यात आणि दूर परराज्यात प्रचार करणं" ही असावी. मला तरी असं वाटतं की, बर्‍याचवेळा अशी लढाई लढून आपलंच नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते त्यामुळेच, ती लढावी, का लढू नये अशी द्विधा मनस्थिती होते. इथेच नेमकं, भगवद्-गीते मधलं तत्त्वज्ञान "निर्णय क्षमतेसाठी" मदत करतं पण एकदा का निर्णय झाला की, "कर्मण्ये वा..." ह्या हिंदू तत्त्वज्ञानाला मिपाकरांच्या भाषेत फाट्यावर मारून (तात्पुरता), पाश्चिमात्यांच्या "जिंकण्याची कला"(विनींग थिअरीज) वा "स्फुर्थी मिळवण्याची कला" (मोटिव्हेशनल थिअरीज) (किंवा शिव खेरांच्या "You can win" सारख्या थिअरीज) आत्मसात करून ती लढाई जिंकण्यासाठीच लढता येते. तुम्ही म्हणता त्यात काहीसं तथ्य असावंही, कारण "युगांतर" मध्ये इरावती कर्वे असंच काहीसं म्हणतात, "माणसाचा प्रवास हा त्याच्या स्वभाव धर्म आणि आचरणाला अनुसरून एका विशिष्ट दिशेने होत असतो, महाभारताची लढाई जिंकूनपण पांडवांना राज्य उपभोगण्याच सुख काही मिळालं नाही". मग ही सगळी "झंजट" का बरं करावी? माहीत नाही. सुख म्हणजे मग नक्की काय? मग भाऊ खांडेकरांच्या सुखाच्या शोधाचं तत्त्वज्ञान मन शांत करतं. ह्या झंजटीमधूनच निरस जीवनाला अर्थ येणार असेल तर ही झंजट व्यर्थ नसावी. बघू आज असं वाटतय खरं, जग सोडायची वेळ येईल तेव्हाच कदाचित कळेल काय खरं आणि काय खोटं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अनमोल -

कौन्तेय
Fri, 03/23/2012 - 13:38 नवीन
दुर्दैवाने 'प्राइसलेस' म्हटल्यावर जे वजन येतं ते अनमोल म्हटल्यावर येत नाही. पण सुधीर, तुमची प्रतिक्रीया पहिल्याच वेळी मी याच व्यापक अर्थाने घेतली होती. म्हणून तर तीनही वाक्यं आशयगर्भ असं लिहून पाठवलं. पण उलगडून दाखवल्याबद्दल आभार. एका पेशल धाग्याचा विषय आहे हा - चरैवेति.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

काम की चीजें

कौन्तेय
गुरुवार, 03/22/2012 - 15:24 नवीन
गवि - तुमच्या पहिल्या प्रतिसादात काय समजायचं ते समजलो. प.रा. - तुमची फूट पाडण्याची कल्पना एकदम भारी [आता १० जनपथाचा संशय आणखी बळावतोय बरं ...] तुम्हां दोघांचा वाद हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असला तरी संदर्भयोग्य नसल्याने नजरेआड करणे प्राप्त आहे. ५० फक्त - फ्लेक्स जबराट! खरोखर - सर्वसाक्षी - बिल्डरच्या योजनांपैकी तयार बंगला न घेण्यामागे काही भूमिका होती. त्यातला काही भाग वर दिलाही आहे. बिल्डरांना खुषाल जाहीरात करू द्या. तसंही आजकाल जाहीरात न करताच हे बंगल्यांचे प्रकल्प हातोहात विकले जात आहेत म्हणे. माझ्याप्रमाणे स्वतः खटपटी करून बांधलेले बंगले बिल्डरच्या तयार योजनांपेक्षा दीडेक पटीने महाग पडतात हा स्वानुभव बांधकाम व्हायच्या आधीच आला आहे + डोक्याचा ताप! अजूनही माझा निर्णय चुकला म्हणायचं नाही मला. या भ्रष्टाचार / लाचखोरीच्या सामान्यीकरणाकडे कसं बघायचं या बाबतीत तुमचं मार्गदर्शन घेतोय हे खरं.
  • Log in or register to post comments

गोदरेजचा सिग्नल

सर्वसाक्षी
गुरुवार, 03/22/2012 - 16:24 नवीन
कौंतेय, गेल्या ५ वर्षातला अनिष्ट प्रकार. पूर्व द्रुत महामार्गावर हल्ली संध्याकाळी ७-७.३० नंतर गोदरेज हॉस्पिटलच्या सिग्नलला लोक सर्रास फाट्यावर मारतात. मला हे आवडत नाही आणि पटतही नाही. मात्र एक गोष्ट लक्षात आली की दिवा लाल असूनही सगळी वाहने भरधाव जात असताना जर मी तत्वाखातर तिथेच उभा राहीलो तर मागुन येणारे वाहन मला धडक देईल. जगलो वाचलो तर पोलिस उपदेश करतील "काय राव तुम्ही? जीव मोठा की सिग्नल? असे कसे उभे राहता? जायचे होते सिगनल तोडुन तुम्हीही, जर पकडलच असत समजा तरी ५०-१०० रुपयांचा प्रश्न!" हल्ली मीही सगळ्या वाहनांबरोबर नाईलाजाने का होईना पण जातो. दिवा लाल असो की हिरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय

तुम्ही विचार करा

पैसा
गुरुवार, 03/22/2012 - 15:49 नवीन
लाच न दिल्याने येणारं टेन्शन, वेळ देणं परवडणारं असेल तर ठीक. पण आधीच तुम्हाला पुरेसा त्रास झालेला दिसतो आहे. तो वाढवाल तर घरावर त्या सगळ्याचा किती परिणाम होईल, सगळे प्लस मायनस समोरासमोर ठेवून बघा आणि निर्णय घ्या. एक पक्कं लक्षात ठेवायचं. लढा बिढा ठीक आहे पण आपल्याला हुतात्मा नक्कीच व्हायचं नाही!
  • Log in or register to post comments

हंऽ.. हेही खरंच

कौन्तेय
गुरुवार, 03/22/2012 - 16:04 नवीन
तणाव नि वेळ दोन्ही खरेतर परवडण्यासारखे नाहीतच. जटायूची क्षमा मागतो पण "अडविता खलासी पडलो" तरीही "पळविली रावणे सीता" हेही नकोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

म्हणून वर्षातून किमान एकदातरी

स्वातीविशु
गुरुवार, 03/22/2012 - 15:53 नवीन
म्हणून वर्षातून किमान एकदातरी गावाला जाऊन मी तुमचा, तुम्ही माझे असे एकत्र राहावे/वागावे. पैसा, नोकरी, शहरी राहणीमान या गोष्टी तर आपल्याजवळ आहेतच, पण थोडे आम्ही रत्नागिरीकर / सातारकर/कोल्हापुरकर / सांगलीकर/मिरजकर / इ.इ. अभिमानाने म्हणवून घ्यावे. :) मग अशा जमिनजुमला/वाडवडिलांकडून आलेली मिळकत किंवा नविन जागा खरेदी/बांधकाम अश्या प्रकरणात तुमच्या बाजूने नक्कीच कोणीतरी मदतीला धावून येतील. गावच्या लोकांना तुम्ही पैशाने नाही तर प्रेमाने जिंका, तरच तुमची "माझे गाव, गावचे घर" कल्पना अस्तित्वात येईल. :) (गावी नेहमी आवडीने जाणारी) स्वाती
  • Log in or register to post comments

रत्नागिरीकर /

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 16:01 नवीन
रत्नागिरीकर / सातारकर/कोल्हापुरकर / सांगलीकर/मिरजकर /
धाग्यावर प्रतिक्रिया थांबवूनही हे वाचल्यावर राहावलं नाही.. "गाव" म्हणजे वरील उल्लेख केलेल्यांपैकी किंवा तत्सम मुळीच नव्हे.. तालुक्याच्या ठिकाणालाही मी शहरच म्हणेन.. गाव म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीसपाटील .. इ इ.. गावगाडा हा प्रकार तुम्ही अनुभवला आहे की नाही हे माहीत नसल्याने याबाबत अधिक विधाने करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वातीविशु

+१

पैसा
गुरुवार, 03/22/2012 - 16:05 नवीन
आणि प्रेमाने जिंकणे वगैरे काही तिथे चालत नाही हे मी गेल्या २ वर्षातल्या विकतच्या मनस्तापावरून सांगू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 16:27 नवीन
पैसाताई,गुहागरजवळ माझं मूळ गाव आहे.. बाकी कोंकण ही माझं आणखी आवडीचं असण्यामागे कारण असं की तुलनेत (तुलनेतच) कोंकणातल्या गावगाड्याच्या पीडा खूपच कमी असतात.. त्यामानाने देशावर विचारु नका.. हातीपायी धड राहिलो तरी बरं म्हणायचं.. कोकणात नुसते उच्चारवात वाद चालतात पण अन्यत्र प्रत्यक्ष हातघाईवर प्रकरणं येतात.. उदा. कोंकणातल्या गावी मी तीनचार वर्षांत एकदा जातो तेव्हा आजुबाजूचे लोक घरी चहाला बोलावतात. तुम्ही आता इकडेच राहायला या वगैरे म्हणतात ... मग हळूच तुमच्या आंबीची खांदी आमच्या हद्दीत येऊन कौलावर आंबे कसे पडताहेत अशा स्वरुपाची कुरकुर करतात.. पण खानदेशातल्या गावी गेल्यावर लांबूनच शिवीगाळ, जमिनीच्या मोजणीच्या वेळी मोजणीच्या खुणा बुजवणे, जमीनीवर हातभट्ट्या लावलेल्या दिसणे, येताजाता धमक्या देणे, आपण तिथे असेपर्यंत पाळत असे प्रकार होतात. हे आजचे नाही, माझे आजोबा आणि बाबा प्रत्यक्ष शेती करत होते तेव्हाही औतास आडवे येणे, बांध तोडणे, हद्दी हलवणे, मारामार्‍या करणे हे चालायचं.. दरवर्षी जाण्याने त्यात काडीचा फरक पडणार नाही याची खात्री आहे.. सुट्टीत चार दिवस मजा म्हणून पाहुणा म्हणून गावाकडे जाणं आणि तिथल्या समस्यांशी थेट सामना होणं यात खूप फरक आहे हे नम्रपणे सांगावंसं वाटतं. अन्य एका गावात मी पूर्वी एक लहान घर घेतलं, तिथे घराची ग्रिल बसवण्यासाठी मी जवळच्या गावातूनच (ही दोन गावे वेगळी होती हेही मला माहीत नव्हतं त्यावेळी) एका माणसाला घेऊन गेलो.. स्थानिक लोक हेरगिरी करत पाळतीवर असतात याची पहिली प्रचिती आली.. आणलेला मनुष्य मापे घेत असतानाच गावच्या सरपंचाचा फोन माझ्या मोबाईलवर वाजला.. (मी त्याला ओळखतही नव्हतो.. राखणदाराकडून नंबर घेऊन वगैरे तो गावभर गेला होता).. आमच्या गावात येऊन बाहेरच्याला आणता, आमची शेजारच्या गावांशी भांडणं लावता.. नंतर काही भानगड झाली, इजा झाली तर मग तक्रार करु नका.. इथे तुम्ही नसता, घराची सेफ्टी आमचेच लोक बघतात.... वगैरे सुरु झालं. मग भानगड नको म्हणून तो आलेला मनुष्य एस्टिमेट बनवलेलं असूनही घाबरुन निघून गेला.. त्यानंतर त्याच कामाच्या तिप्पट एस्टिमेट करुन लोकल माणसाने दिलं.. घरासमोर गाडी भरुन गुंड आले.. नाइलाजाने काम पुढे ढकललं.. बरेच दिवस मनस्ताप झाल्यावर काम तर केलंच पाहिजे म्हणून ते त्याच माणसाला द्यावं लागलं.. त्याने कितीही सांगूनसुद्धा अतिशय ढोबळ आणि वाईट दर्जाचं काम केलं.. पण ऑप्शन नव्हता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदी हेच!

पैसा
गुरुवार, 03/22/2012 - 16:46 नवीन
पूर्वी कधीतरी आमच्या लांज्याजवळच्या देवधे गावातल्या जमिनीवर एक गावगुंड कूळ लावून घ्यायचा प्रयत्न करतोय हे सांगितलं होतं. ती केस तारखा पडत चालूच होती. त्या गुंडाने पोलीसपाटला कडून खोटंच पत्र मिळवलं आपण जमीन कसतो आहे म्हणून. वकिलाने सांगितलं तुम्ही आतापर्यंत तिथे गवत काढत होता, तर या वर्षी भात घाला. माझे सासरे एका गड्याला घेऊन गेले तर हा राक्षस माझ्या ८८ वर्षाच्या सासर्‍यांच्या अंगावर काठी घेऊन धावून आला. "म्हातार्‍या, आताच तुला संपवतो" म्हणत. त्या गड्याने सासर्‍याना कसं तरी तिथून वाचवून पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार नोंदवली, पोलिसांनी लगेच त्या गुंडाला लॉक अपमधे घातला. पण सुटून आल्यावर त्याला काही पश्चात्तप वगैरे नाहीच. आता कूळाच्या केसबरोबर ही पोलीस केसही सुरू आहे. माझ्या नवर्‍याला महिन्यातून निदान ४ फेर्‍या एकूण ३ केसेससाठी माराव्या लागतात. कारण महिन्यातून ६ ते ८ दिवस तारखाना हजर रहावं लागतं. घरातलं मांजर आपल्या घरात आलं म्हणून एका शेजार्‍याने मारून टाकल. दुसर्‍याने कुत्रा मारला. इथे प्रेमाने जिंकणे वगैरेला कुठे स्कोप आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१ / सुरस चमत्कारिक कथांना तोटा नाही

कौन्तेय
गुरुवार, 03/22/2012 - 16:47 नवीन
नेमका हाच विचार करून श्रम+सामग्री असंच एकरकमी कंत्राट त्या गावाच्या उपसरपंचपतीला दिलं. मालक म्हणून आमची भूमिका केवळ फ़रशा, नळ, विविध डिझाइन्स नि रंगछटा निवडण्याची राहील; बाकी पूर्ण प्रकल्प फ़क्त चावी-फ़िरवा करारावर पूर्ण करायचा ठरले. त्याने जवळच्याच एका घरातून वीज घेतली. त्याच्या नेहमीच्या पुरवठा करणाऱ्यापेक्षा दुसऱ्या एका रेती / सीमेंट सप्लायरसोबत त्यांचा काही अंतर्गत बेबनाव झाला. कदाचित त्याला पुरवठा करू द्यावा असं त्याचं म्हणणं असावं. तेवढा डूख धरून त्याने एम.एस.इ.बी.ला तक्रार केली की वीज बेकायदा घेतलीए. एमेसीबीने २०हजार रु. दंड ठोकला तो शांतपणे या कंत्राटदाराने माझ्या डोक्यावर टाकला. "ओ साहेब, आमच्या खिशातून जाणार आता हे पैशे" म्हटल्यावर मी फ़ार ताणलं नाही. पण शेवटच्या हिशेबात हा मुद्दा लावून धरू या समजुतीत मी सध्या आहे ... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बारा गाव बारा भानगडी.

गणपा
गुरुवार, 03/22/2012 - 18:19 नवीन
माताय तुमच्या गाववाल्यांत बरीच एकी दिसते. मध्यंतरी आमच्या गावाचा युपी, बिहार होऊ घातला होता. सगळे कंत्राटदार एकजात भय्ये. (गाववाल्यांचा आळशीपणा कारणिभुत होता म्हणा.) पण सध्या भय्या हटाव आंदोलन चालु आहे. पण गवि पैसाताय म्हणतात तसे लोकांना नाडण्याचे प्रकार ऐकिवात नाहीत बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा