Skip to main content

भक्ती........

लेखक निशदे यांनी मंगळवार, 17/01/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग, सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो || नाव घेती कोणी, कोणी धुंद होता कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो || दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी हातातील नाणी, उगीच मोजतो || पोटाचेच जिथे, रोजचे सायास कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो || उडवती नाणी, ओवाळिती नोटा सारे त्या भगवंता, लाच दाखविती || येई कोणी शेट, मागाहून पुढे देवाहून जास्ती, सलाम ठोकिती || हा परी इथे, खातो शिळेपाके, देवाच्या वाटी, साधा नमस्कार || भक्ती मनी दाटे, परी भूक लागे, पोटापुढे नसतो, मनाचा विचार || कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र कोणी आरोग्य, आयुही मागिती || सारी असली जरी, देवाचीच पोरं, एक दुजियाचा, नाशही मागिती || देव येई निघुनी, याच्यापुढे उभा, "मला लेका तुझा, नमस्कार भारी || येती लाखो माझ्या, सामोरी आडवे भक्तीपरी मात्र, पैशाची मुजोरी || बदलती देव, कपड्यासारखा भावापेक्षा यांची, धनाची सलामी || पैशाच्या तोडीचा, हवा आशीर्वाद देवालाही लावी, कराया गुलामी || पुंडलिक तूच, दामाजीही तूच पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी || जोडी दोन हात, घेई माझे नाम तृप्ती माझ्या मनी, तयाचीच सारी" || देव जाई निघुनी, मंदिरी कल्लोळ सारेची निष्फळ, प्रयत्न यांचे || दोषारोप चालू, पोलीसा सांगिती, पूरची लोटिती, हरेक उपायांचे || अखेरीस कोणी, आणिती पाषाण शेंदूर फासून, "देव" सारी म्हणे || पुनश्च चालू, दगडाचा जयघोष, देव परी दूर, पाहतो विषण्णे ||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2108
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

बऱ्याच काळाने लेखनाचा प्रयत्न केला...... किंबहुना मधल्या कित्येक महिन्यात काही सुचलेच नाही....... "कविता" या प्रकारात शिरण्याचा माझा पहिलाच प्रयत्न....... मागील लेखनप्रयास तुमच्या प्रतिक्रिया/सूचना यामुळे यशस्वी झाला...... यावेळीही तसेच होईल याच शंका नाही ...... :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अजून पर्यंत तरी संत साहित्याचे वाचन/अभ्यास केलेला नाही. हे अगदी सुचले तसे लिहिले आहे...... धन्यवाद

'देऊळ' आठवला.

'देऊळ' आठवला.

अत्यंत वास्तव वादी आणि उत्तम लेखन!

कविता मस्त ! प्रत्येक ओळीत सहा च अक्षरे असती तर वाचताना मजा अजुन आली असती असे वाटते उदा:
नाव घेती कोणी, कोणी धुंद होता कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो || दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी हातातील नाणी, उगीच मोजतो || पोटाचेच जिथे, रोजचे सायास कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो ||
येथे प्रत्येक ओळीत ६ अक्षरे आल्याने वाचायल छान होते आहे.. अभंगाच्या जवळ जाणारे लिखान