गाणारं वायोलिन!!
एखाद्या वाद्यातून जर तुम्हाला मराठी भावगीताचे बोल जसेच्या तसे, हो जसेच्या तसेच, म्हणजे अगदी काव्यातल्या जोडाक्षरांसकट आणि गायकाच्या/गायिकेच्या आवाजातली मींड, ताना, आलाप या बारकाव्यांसकट ऐकू आले तर तुम्हाला काय वाटेल?
तुम्ही अचंबित व्हाल, इतकेच नव्हे तर या माणसाच्या प्रेमातच पडाल! माझंही अगदी असंच झालंय.
प्रभाकर जोग नावाच्या एका अवलियाचे काही यूट्यूब वीडिओज मध्यंतरी बघितले त्याचवेळी मी वेडा झालो होतो. आज मी ते वीडिओ पुन्हा बघितले आणि मग मला राहवेना म्हंटलं आता मात्र या चमत्काराची ओळख मिपाकरांना करुन द्यायलाच हवी.
मराठी संगीत क्षेत्रातले हे अतिशय नाणावलेले व्यक्तिमत्त्व आहे. अतिशय प्रतिभावंत वायोलिनवादक आणि संगीतकार म्ह्णून ते प्रसिद्ध आहेत. अनेक सुप्रसिद्ध गाणी त्यांच्या नावावर आहेत. वानगीदाखल - 'स्वर आले दुरुनी', 'किती सांगू मी सांगू कुणाला' या सुप्रसिद्ध गाण्यांचे ते संगीतकार आहेत.
वायोलिन हे वाद्यच मुळात काळजाला हात घालणारं आहे. मन सैरभैर करुन टाकायची ताकद असलेलं हे वाद्य कमालीच्या कौशल्यानं जोग यांनी हाताळलं आहे. वाजवताना त्यांच्या चेहेर्यावरचे भाव देखील बदलत नाहीत. ज्या सहजतेने त्यांनी वादन केले आहे ते केवळ थक्क करुन टाकणारे आहे.
वायोलिनला सतार किंवा सारंगी सारख्या पडद्या नसल्याने नेमका कुठल्या जागी बोटाने दाब दिल्याने अपेक्षित स्वर उमटणार आहे हे ठरलेले नसते, ते केवळ अंतःस्फूर्तीने आणि सरावानेच जमू शकते!
जोगांची डाव्या हाताची बोटे विलक्षण तयारीने त्या तारांवर दाबली जात असतात, त्यांच्या उजव्या हातातला गज वायोलिनच्या चार तारा कुरवाळत हालत असतो आणि मंत्रमुग्ध करणार्या स्वरांच्या वर्षावामध्ये आपण चिंब भिजून जात असतो!
'बाई मी विकत घेतला शाम'. 'जगाच्या पाठीवर' चित्रपटातलं हे अजरामर गीत आधीच माझं लाडकं. गदिमांचे दिव्य स्पर्श झालेले सहजसाधे शब्द, बाबूजींचं अत्यंत गोड संगीत आणि अशाताईंचा केवळ दैवी असा आवाज या त्रिवेणी संगमावर मराठी माणूस फिदा न होईल तरच नवल! मूळ गाण्याच्या सुरुवातीची पेटी शामराव कांबळ्यांनी वाजवलेली आहे. (वादनाच्या क्षेत्रातले जे काही चमत्कार आपल्याकडे आहेत किंवा होऊन गेले त्यातले शामराव कांबळे एक होते. मला वाटतं दुर्दैवाने गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. चूभूदेघे.)
नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम
अशा ओळींपासून हे गाणं सुरु होतं आणि एका क्षणात आपण वायोलिन ऐकतोय का आवाज हे समजेनासं होतं.
पहिली ओळ बाबूजींच्या आवाजात आणि नंतर गाणं आशाच्या आवाजात हा फरक देखील कानांना जाणवतो हे विशेष!
अंतर्याच्या शेवटी जी हरकत घेऊन आशाताई समेवर येतात ती तशीच्या तशी वायोलिन मधून येते!
मधल्या सगळ्या हरकती, बाबूजींनी घेतलेल्या ताना, आशाताईंच्या खास सानुनांसिक आवाजातले शब्द सगळं सगळं उमटतं!
शेवटच्या चौथ्या कडव्यातले शब्द आहेत - जितुके मालक तितुकी नावे, हृदये तितुकी, याची गावे
इथे 'जितुके, तितुके' असंच वाजतं 'जितके, तितके असं नाही! कान देऊन ऐका.
गीतरामायण. पुन्हा एकदा गदिमा आणि बाबूजी ही जोडी.
हे तर मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारंच आहे. 'पराधीन आहे आहे जगती पुत्र मानवाचा' हे कारुण्यपूर्ण गीत म्हणजे संपूर्ण जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा साध्या शब्दात मांडलेला अर्क आहे!
दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
गदिमांचे शब्द हे एवढे सरस्वतीच्या लेखणीतून आल्यासारखे वाटतात की रामाने याच शब्दात भरताला समजावले असेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही संदेह नाही!
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा सर्व कर्मजात
या ओळींकडे लक्ष द्या - पहिल्या ओळीतला पहिला 'दोषी' हा दीर्घ आहे आणि दुसरा 'दोषि' र्हस्व आहे ते तसेच वाजतात - आणि 'ष' पोटफोड्याच वाजतो, शहामृगातला 'श' नाही! (बाबूजींच्या गाण्यातला 'ष' तर प्रसिद्धच होता तेव्हा इथे ती चूक होणे अक्षम्यच!). स्वरातलं कारुण्य, आलाप, गाण्यातले आर्त भाव एवढ्या खोलवर जातात की डोळ्यात पाणी आल्याखेरीज राहत नाही. आणि त्यातून हे वायोलिन. छ्या, काही खरं नाही!
'सखि मंद झाल्या तारका'. सुधीर मोघ्यांचं हे अप्रतिम गीत, राम फाटकांचं अफलातून संगीत आणि पुन्हा एकदा बाबूजींचा स्वर. या गाण्यात सखि मंद झाल्या तारका ही ओळ वेगवेगळ्या प्रकारे गायलेली आहे ती वायोलिनवर ऐकताना आंगावर काटा उभा राहतो!
शेवटच्या कडव्यात 'बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे' अशी पहिली ओळ आहे त्यात मृत्यू शब्द तुम्ही ऐकाच मी वर्णन करु शकत नाही! आणि त्यानंतरच्या ओळीत 'थांबेल तोही पळभरी' यात बाबूजींची 'थांबेल' शब्द म्हणण्याची एक विशिष्ठ लकब होती तीदेखील सहीसही उमटली आहे! पाहिजे तर मूळ गाणं ऐकून मग हे ऐका. केवळ लाजवाब!
'सांज ये गोकुळी' हे देखील माझं अतिशय आवडतं गाणं. सुधीर मोघ्यांचे अप्रतिम शब्द. श्रीधर फडक्यांचं कमालीचं ताजंतवानं आणि प्रसन्न करणारं विलक्षण संगीत आणि या गाण्यात आशाचा आवाज काय लागलाय, केवळ अशक्य!
जोगांनी हे गाणं ज्यापद्धतीनं वाजवलंय ते ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की हे गाणं श्रीधर फडक्यांनी मुळात वायोलिनसाठीच बनवलं होतं! बाकी मी फार काही सांगत बसत नाही, ऐकाच!
अजून बरीच मराठी गाणी आहेत. जालावर मिळतीलच तुम्हाला. जरूर ऐका.
पण जोगांनी हिंदी गाणंही तेवढ्याच तयारीने वाजवलं आहे (इथे 'गायलं आहे' असं म्हणायचा मला फार मोह होतोय!).
लताचं 'बैंया ना धरो ओ बलमा' हे 'दस्तक' मधलं अफाट गाणं. मुळात मदनमोहनच्या या उच्च गाण्याला हात घालायची हिंमत होणं हेच कर्मकठिण वाटावं अशी परिस्थिती त्यातून हे वाजणार आहे वायोलिनवर सगळीच 'तारांवरची' कसरत पण हे गाणं काय वाजवलंय महाराजा! केवळ सुंदर. लताच्या आवाजातले बारकावे आणि मदनमोहनच्या संगीतातल्या सिग्नेचर्स अक्षरशः अफलातून पकडल्या आहेत या माणसाने! त्रिवार वंदन!!!
त्यांची आणखीन हिंदी गाणी मिळाली तर रसिकांनी दुवे द्यावेत. माझे त्यांना लाख दुवे मिळतील! :)
यू ट्यूब वरती 'Ganare violin' असाच सर्च द्या आणि हा खजिना हाती लागेल.
(अत्यानंदित) चतुरंग
वर्गीकरण
प्रतिक्रिया
केवळ अप्रतिम....
अशी मिमिक्री
एक वेगळी आठवण-डॉ.विद्याधर ओक