एका नवीन देवस्थानाचा जन्म
लेखनप्रकार (Writing Type)
'एका नवीन देवस्थानाचा जन्म' ही व्यंकटेश माडगूळकरांची एक जमलेली कथा आहे. माणदेशातील एका लहानशा गावात ही कथा घडते. जून महिन्यातल्या एका सकाळी त्या गवात एक भला मोठा वानर येतो. वैराण, रखरखीत माणदेशात झाडेझुडे कमीच, त्यामुळे असले प्राणी बघायची काही त्या गावकर्यांना सवय नसते. त्यातून हा वानर चक्क मारुतीच्या देवळातच घुसतो. आणि मग येऊन एका झाडावर निवांत ऊन खात बसतो. हे बघणार्या गावकर्यांना मग तर काय साक्षात हनुमान आपल्या गावात आला असे वाटायला लागते. पण शाळेला येणार्या मुलांपैकी एक गुलाम मुलगा त्या माकडाला एक भिर्रकन धोंडा फेकून मारतो. मग तो माकड चिडतो आणि उंच पिंपळाच्या झाडावर जाऊन बसतो. आता हळूहळू तिथे गर्दी जमायला लागलेली असते आणि साक्षात हनुमान आपल्या गावात आला, म्हणून गावकरी त्याच्या आदरातिथ्याच्या तयारीला लागतात. गावातला गुरव त्याला भाकरीचा कोर खायला घालू इच्छितो, मूठभर शेंगदाणे आणतो, पण तो माकड काही कशाला दाद देत नाही. लोक म्हणतात की घ्येनार नाही बहुतेक. का, तर हे गुरव तोंडावरनं असं गरीब दिसतंय पन फाजील मनुष्य आहे ,म्हणतात. देवाच्या दिव्याला लोक गोडंतेल द्येत्यात, तर त्यात ह्यो भजी तळून खातोय, म्हणतात. देव अंधारात आणि भजी याच्या तोंडात असा परकार हाये, म्हणतात लोक. मग गुरवच गावातल्या आबानानांना म्हणतो, की नाना माझ्या पाप्याच्या हातचं घेणं काय याला पसंत दिसत नाही, तर तुमी पुढं व्हा आणि त्याला एवढं हे चार दाणं द्या, म्हणतो तो गुरव. आबानाना गावातले चांगले वयस्क भाविक असतात. नानांना मोठा बहुमान झाल्यासारखं वाटतं. ते पुढे होतात आणि या अंजनीसुताला विनंती करतात. म्हणतात की देवा, नगरीची इच्छा आहे की तुम्ही एक चार दाणे घ्या. आता असा अनमान करु नका. त्याबरोबर तो वानर हळूहळू खाली यायला लागतो. बघणारे म्हणातात, की बघा, आम्ही म्हनलं न्हवतं का की घेणार म्हणून. का, तर वडील मनुष्य आहे. वडील माणसांचं ऐकावं लागतं. मग लहान-मोठं असं केलेलं कशासाठी असतंय? एक चार तरुणांचं टारगट टोळकं म्हणतं की आम्ही आमचं मत राखून ठेवतो. येईल, न येईल, काय ते पुढचं पुढं बघू. आता काय सांगता येणार नाही. आता तो वानर हळूहळू खाली येतो आणि आबानानांच्या हाताला कच्चकन चावून परत झाडावर जाऊन बसतो. त्याबरोबर आबानाना अगाई मला माकाड चावलं म्हणून किंचाळतात. आता माकाड बरं का, हनुमंता, अंजनीसुता असलं काही नाही. ते टारगट टोळकं म्हणतं की बगा, नाना आता सज्जन दिसतुया, पर तरुणपणी त्यानं कायकाय केलेलं असंल ते त्याचं त्यालाच ठावकी. द्येवाला डोळं असत्यात, म्हणते ते.
मग अशा रीतीनं बघताबघता तो वानर गावातल्या धाबारा लोकांना चावून काढतो. मग बाकी आबानानांचा पैलवान मुलगा पिसाळतो आणि म्हणतो की आता मी बघतोच या द्येवाकडं. लई डाळ नासली या द्येवानं. आणि हातात दोन धोंडं घेऊन तो या द्येवाच्या मागं लागतो. त्याच्याबरोबर त्याचे काही सवंगडीही हातात काठ्याबिठ्या घेऊन येतात. म्हणतात, की नानाचा पोरगा आज वानेर हानतोय भौतेक. चला रं, लई दिसात आपल्याला काही हानायला गावलं न्हाई, ह्या वानराला हानूया आज. मग या रानातनं त्या रानात, या बांधावरनं त्या बांधावर असा त्या वानराचा पाठलाग करतात ती पोरं, आणि शेवटी नानाच्या तरण्या पोराचा अवलगामी ठोका लागून तो वानर जाग्यावरच प्राण सोडतो.
आता हा वानर मेला म्हटल्यावर सगळ्यांना उपरती होते. आत्ता, कालपरवा आपण हनुमान जयंती साजरी केली आणि आज वानेर हानला हे काही बरोबर नाही असं त्याना वाटायला लागतं आणि मग त्याचं जणू प्रायश्चित्त म्हणून त्या वानराची माणसासारखी प्रेतयात्रा काढतात, गुलाल, बुक्का, ताशा आणतात, घोषणाबिषणा देतात आणि ओढ्याच्या काठाला त्याचं दहन वगैरे करतात.
आता म्हातार्या आबानानाच्या मनाला बाकी ही गोष्ट लागून राहाते. त्याला वाटतं की वानेर आपल्या हाताला चावला, त्यात त्याची चूक काहीच नाही. का, तर करु नये त्या गोष्टी या हातानं केलेल्या आहेत. मग या रुखरुखीचं प्रायश्चित्त म्हणून नाना हजार-बाराशे रुपये खर्च करुन तो वानर जिथं पहिल्यांदा दिसला होता तिथं एक देऊळ बांधतात, गावच्या गवंड्याकडून एक हनुमानाची मूर्ती बनवून घेतात, भटाकडून त्याची प्रतिष्ठापना करतात आणि रोज सकाळी अंघोळ करुन त्याची पूजा-अर्चा सुरु करतात. हळूहळू गावात बोलबाला होतो की त्यी नानाचा हनुमान हाय ना, त्ये कडक देवस्थान हाये. पावतोय त्यो नवसाला, म्हणतात लोक. आधीचा पण पावत होता, तसं काय म्हणण्यात अर्थ नाही, पण ह्यो कायम पावतोय, म्हणतात लोक.
आणि अशा रीतीने गावात एका नवीन देवस्थानाचा जन्म होतो.
माडगूळकरांची ही कथा मानवी वृत्ती, विचार आणि कृती यांवर प्रकाश टाकून जाते. आधी अंजनीसुता म्हणून आरती ओवाळणारे आणि हाताला चावा बसताच त्या अंजनीसुताला 'माकाड' म्हणणारे आबानाना आपल्या आसपास दिसायला लागतात. जन्म, वाढ, परिपक्वता आणि लय या सृष्टीच्या क्रमात एखाद्याला मारुन मग त्याचं स्वतंत्र देऊळ उभारणारे, त्याची पूजा-अर्चा करणारे नाना आपल्यातलेच एक वाटायला लागतात. आधीच्या पावणार्या मारुतीला नमस्कार करणार्यांची पावले आता या नानाच्या नव्या 'कडक' मारुतीकडे वळताना दिसतात. तेच ते भाविक, तोच तो घंटानाद, तोच मारुती आणि तोच शेंदूर....देऊळ बदलले म्हणून काय? 'गाभारा सलामत तो देव पचास' हे आठवते. माडगूळकरांनी ही कथा माणदेशातील एक घटना म्हणून लिहिली असली तरी तिला (कदाचित माडगूळकरांना अपेक्षित नसणारे) एक वैश्विक परिमाण लाभले आहे, असे मला वाटते.
प्रतिक्रिया
शनीवारीच ही कथा आणि प्रतिक्रीया ठेवलीत.
तात्पर्य
बाज आवडला.
चांगले लेखन... जाता जाता
स्मृती जागविल्यात..
भाष्य
+१
वा सन्जोपराव श्टुरी आवडली.. -
सुंदर कथा आणि विवेचन..
वाचली होतीच कथा.
होतं रे असं कधी कधी. :)
वैशिष्ट्यांबाबत दोन पाच हजार
मन१राव! प्रत्येक चांगल्या
कथेचा डायरेक्ट संबंध नाही पण ही कथा वाचल्या नंतर
छान!
कथेची छान ओळख करुन दिली आहे.
विवेचन
माहित असुनही
आवडली.
हीच कथा का बरे?
नवं देऊळ कशाला !
आर तिज्या मारी...
शब्दार्थ : नवं देऊळ = नवं
एका चांगल्या कथेच्या
माडगूळकरांची ही कथा मानवी
हनुमान
कथा आणि त्यावरील विवेचन
मौज.
छान