अण्णा, प्लीज जपा..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
22 Aug 2011 - 12:27 pm

प्रिय अण्णा,

सर्वप्रथम तुमच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमचं स्वच्छ चारित्र्य, तुमची साधी राहणी, तुमची सात्त्विकता, तुमच्यातली सादगी, तुमच्यातली निरागसता, तुमचं सेवाव्रत या सर्वांना माझा सलाम. अगदी मनापासून. अण्णा, खूप भावता तुम्ही मला..

आता काही मुद्दे -

१) काही दिसांपूर्वी तुम्ही आणि तुमची टीम असं म्हणत होतात की सरकारनं त्यांच्या लोकपालपदासोबत तुमचंही जनलोकपाल बील संसेदेपुढे किमान सादर तरी करावं; मग संसद त्यावर जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल. किंवा त्यावर आधारीत पुढील वर्चा किंवा आंदोलनाची दिशा ठरवता येईल.

२) पण सरकारने नेहमीप्रमाणे सगळ्यांना धोका दिला आणि फक्त स्वत:चंच बील सादर केलं. त्यामुळे सरकारच्या या फसवणुकीविरुद्ध तुम्ही उपोषणाला बसलात ज्याला माझ्यासकट अनेकानेकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता.

४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..!

५) अण्णा, अनेक सरकारांनी गेल्या ४२ वर्षात काहीना काही कारणं, सबबी सांगून लोकपाल बील अस्तित्वात आणलं नाही हे अगदी मान्य. त्याकरता जनतेतल्या प्रचंड असंतोषाला तुम्ही तोंड फोडलंत हेही नक्कीच खूप मोठं काम. परंतु एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की,

अ) जरी एखाद्या कायद्याला ४२ वर्ष उशीर झालेला असला तरी,

ब) किंवा आज प्रचंड लोकपाठिंब्याच्या बळावर तुम्ही लौकरात लौकर हा कायदा करण्यास सरकारला भाग पाडलं असलं तरी,

क) किंवा याच लोकबळावर तुम्ही सरकारच्या सिंहासनाला धक्का लावलेला असला तरी,

येत्या चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.

आणि म्हणूनच ३० तारखेच्या आत आमचंच लोकपाल बील जसंच्या तसं पास करा नाहीतर चालते व्हा, हा मला तरी थोडासा अट्टाहासच वाटतो. परंतु हा केवळ तुमचाच अट्टाहास आहे/असेल असंही मला मुळीच वाटत नाही. या मागचा तुम्हाला पुढे करून आपला अजेंडा मांडणारा बोलविता धनी कोण आहे हे मला माहीत नाही..! असं वाटण्याचं कारण असं की महाराष्ट्रातही तुम्ही अनेक आंदोलनं/उपोषणं केली आहेत आणि आवश्यक तिथे किंवा बहुतांशी वेळेला समजुतीनं घेऊन आवश्यक ती माघार घेऊन संबंधितांना आवश्यक ती स्पेसही दिली आहे असा अनुभव आहे. परंतु या वेळेला मात्र इतर काही मंडळींकडून तुम्हाला मुद्दामून जिवघेण्या जिद्दीला भाग पाडलं जात आहे असा मला संशय आहे..!

६) अण्णा, अजून काही गोष्टी मांडू इच्छितो -

अ) आम्ही तुम्हाला ओळखतो अण्णा, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया ह्या गेल्या ३-४ महिन्यातच अचानक उगवलेल्या व्यक्तिंना मी किंवा इतर भारतीय जनता ओळखत नाही. यांच्या अजेंड्याबद्दल, किंबहुना 'त्यांच्यात काहीही हिडन अजेंडा नाही..' असं निदान मी तरी छातीठोकपणे म्हणू शकत नाही..!

ब) एक कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने मी किरण बेदींना नक्कीच आदारपूर्वक ओळखतो. परंतु ह्या आंदोलनात मात्र 'त्यांच्याकडेही काहीही हिडन अजेंडा नाही..' असं का माहीत नाही, परंतु मी ते म्हणू शकत नाही..!

तेव्हा अण्णा, लहान तोंडी मोठा घास घेतो आणि इतकंच सांगतो, की अण्णा जपा. स्वत:ला जपा..! आज तुम्ही अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि किरण बेदी यांच्या पूर्णपणे नसलात तरी बर्‍याच अंशी कह्यात गेला आहात असं मला जाणवतं आहे आणि भितीही वाटते आहे.

अण्णा, तुम्ही खूप आपले वाटता म्हणूनच इतक्या मोकळेपणाने लिहितो आहे. दिल्ली, आपला देश इत्यादींबद्दल मलाही नि:संशय खूप आदर आहे. परंतु अण्णा, आजही तुम्ही राळेगणसिद्धीला हवे आहात, देशापेक्षाही महाराष्ट्राला प्रथम हवे आहात इतकंच नम्रपणे सांगू इच्छितो..

अजून काय लिहू..?

तुमचाच,
तात्या.

समाजविचारसद्भावनाशुभेच्छामतमाध्यमवेधप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

स्पा's picture

22 Aug 2011 - 12:34 pm | स्पा

अगदी मनातल्या भावना मांडल्याबद्दल तात्यांचे आभार

श्रावण मोडक's picture

22 Aug 2011 - 12:37 pm | श्रावण मोडक

चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.

सहमत.
या मुद्यांवर अधिक चर्चा व्हावी.

ऋषिकेश's picture

22 Aug 2011 - 3:25 pm | ऋषिकेश

+१
शिवाय, अण्णांच्या मागण्या अधिक असमंजस होत आहेत या लेखातील मुळ मतितार्थाशीही सहमत

मराठी_माणूस's picture

22 Aug 2011 - 3:35 pm | मराठी_माणूस

या मुद्यांवर अधिक चर्चा व्हावी.

कृती कधी होणार

खरे तर ५ एप्रिलपासून १६ ऑगस्टपर्यंत सरकारने काय केले? आज "चर्चेला तयार आहोत" असे म्हणणार्‍या सरकारने ४ महिने १० दिवस इतका भरपूर वेळ देऊनही ही मोहीम 'फुस्स' होईल अशा आशेन वेळ दवडला असेच मला वाटते. पण आंदोलनाची धार बोथट न होता आणखीच तीक्ष्ण झाली त्यामुळे सरकारचे धाबे दणाणलेले आहे! म्हणून या "बगळ्यां"बद्दल मला तरी सहानुभूती नाहीं.
आता ममोसींना "honourable discharge" द्यावा असेच मला वाटते! अर्थात मी नेहमीप्रमाणे अल्पमतातच असेन!
केजरीवालांबद्दल वाचा http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal इथे. त्यांना आतापर्यंत खालील पारितोषिके.सन्मान मिळालेले आहेतः
2004: Ashoka Fellow, Civic Engagement.[7]
2005: 'Satyendra Dubey Memorial Award', IIT Kanpur for his campaign for bringing transparency in Government.[4]
2006: Ramon Magsaysay Award for Eminent Leadership.[1]
2006: CNN-IBN, 'Indian of the Year' in Public Service [12]
2009: Distinguished Alumnus Award, IIT Kharagpur for Eminent Leadership.[13]
2010: Policy Change Agent of the Year, Economic Times Corporate Excellence Award along with Aruna Roy.
तेंव्हां केजरीवाल हे "लंबी रेसका घोडा" असावेत असेच मला वाटते.

सुनील's picture

22 Aug 2011 - 12:45 pm | सुनील

आज तुम्ही अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि किरण बेदी यांच्या पूर्णपणे नसलात तरी बर्‍याच अंशी कह्यात गेला आहात असं मला जाणवतं आहे आणि भितीही वाटते आहे.
परवाच वाचलेली बातमी - राळेगण सिद्धीतील अण्णांच्या कायम संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना रामलीला मैदानात अण्णांची भेटदेखिल मिळू शकली नाही. शेवटी अण्णांना न भेटताच हे कार्यकर्ते दिल्लीहून राळेगण सिद्धीला परतले.
कोण असावेत हे झारीतील शुक्राचार्य?

अण्णांचा गुळाचा गणपती न होवो म्हणजे झालं!

विसोबा खेचर's picture

22 Aug 2011 - 12:55 pm | विसोबा खेचर

परवाच वाचलेली बातमी - राळेगण सिद्धीतील अण्णांच्या कायम संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांना रामलीला मैदानात अण्णांची भेटदेखिल मिळू शकली नाही.

हो, माझ्याही ऐकिवात आली आहे ही बातमी. ज्यांच्यामध्ये अण्णा अगदी २४ तास सहजगत्या वावरले अश्या राळेगणसिद्धीतल्या कुणा गावकर्‍याला किंवा कार्यकर्त्याला अण्णांना भेटण्यास आता केजरीवाल किंवा सिसोदियाची परवानगी लागणार ही बाब अत्यंत काळजीची आहे..!

तात्या.

कवितानागेश's picture

22 Aug 2011 - 1:16 pm | कवितानागेश

कदाचित सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक असेल. भेटायला आलेले लोक विश्वासार्ह आहेत हे कळणार कसे?

बाळकराम's picture

22 Aug 2011 - 4:58 pm | बाळकराम

तात्या,

केजरीवाल, सिसोदिया वा किरण बेदी यांच्या सारख्या अभ्यासू आणि प्रामाणिक लोकांवर "यांचा हिडन अजेंडा काही ठाऊक नाही बुवा" असा पवित्रा घेऊन तुम्ही अण्णांच्या आंदोलनाला अडथळेच आणत आहात! माहिती असेल तर पुराव्यानिशी माहिती द्या, उगाच आपले नाक कापून भल्या कार्याला अपशकुन करु नका! तुमची कळकळ जरी चांगली असली तरी ती अस्थानी आहे, अशा वावड्या उठवून तुम्ही तुमच्या आवडत्या काँग्रेसला एकप्रकारे मदतच करता आहात!

नितिन थत्ते's picture

22 Aug 2011 - 5:23 pm | नितिन थत्ते

>>तुम्ही तुमच्या आवडत्या काँग्रेसला

तात्यांवर हा आरोप आजवर कोणी केला नसेल !!!!

तात्यांना आता चुल्लूभर पानीमें डुबण्याखेरीज गत्यंतर नाही.

सविता००१'s picture

22 Aug 2011 - 12:54 pm | सविता००१

अगदी मनातले लिहिले आहे तात्या तुम्ही. धन्यवाद

चेतन सुभाष गुगळे's picture

22 Aug 2011 - 1:11 pm | चेतन सुभाष गुगळे

इतका पद्धतशीर, तर्कशुद्ध विचारांचा लेख यापूर्वी कधीच कुठल्याच नियतकालिकात, संकेतस्थळावरील धाग्यात वाचनात आलेला नाही. ज्यावर आक्षेप घ्यावा, असहमती दर्शवावी असा एकही मुद्दा, एकही वाक्य या लेखात आढळलेलं नाहीय.

१०० टक्के परिपूर्ण, अचूक असा हा लेख आहे. (अत्र्यांच्या स्टायलीत म्हणायचं तर गेल्या दहा हजार वर्षात इतका समतोल लेख लिहीला गेलेला नाहीय)

इतका सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं लेखन सहसा आढळत नाहीच.

तात्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. हा लेख अण्णा आणि टीमपर्यंत कसा पोचू शकेल आणि त्यावर ते किमान विचार तरी करतील याबद्दल आता प्रयत्न होणे गरजेचे आहे.

तात्या हा लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध होईल अशी व्यवस्था करा. लोकसत्ता कडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाटते.

ह्या विचारांची पूर्ण ताकदीनिशी प्रसिद्धी होणे आवश्यक आहे.

पल्लवी's picture

22 Aug 2011 - 1:16 pm | पल्लवी

रविवार सकाळ्मधील समीरण वाळवेकर तसेच अमोल पालेकर यांचे लेख वाचावेत ही विनंती.

मराठी_माणूस's picture

22 Aug 2011 - 5:10 pm | मराठी_माणूस

असहमती दर्शवावी असा एकही मुद्दा, एकही वाक्य या लेखात आढळलेलं नाहीय.

नुसताच लेख वाचलेला दिसतोय. प्रतीसाद पण वाचा , बरेच मुद्दे मिळतील.

बाळकराम's picture

22 Aug 2011 - 5:48 pm | बाळकराम

समीरण वाळवेकर हा "गरीबांचा सुमार केतकर" आहे- यातच सगळं आलं नाही का?;)

बाळकराम's picture

22 Aug 2011 - 5:07 pm | बाळकराम

<<१०० टक्के परिपूर्ण, अचूक असा हा लेख आहे. (अत्र्यांच्या स्टायलीत म्हणायचं तर गेल्या दहा हजार वर्षात इतका समतोल लेख लिहीला गेलेला नाहीय)>>...बाब्बौ!!...मज्जाय बुवा एका माणसाची!

पल्लवी's picture

22 Aug 2011 - 1:13 pm | पल्लवी

जे काही चालू आहे ते नक्की कुठल्या दिशेने चालले आहे असा प्रश्न पडतो.
अट्टाहासाने, ब्लॅकमेलिंग करून काय साधणार ? सत्ता पडली तरी येणारे नवे सरकार धुतले तांदूळ असणार आहे का ?
मुळात ही लोकपाल समिती भ्रष्टाचारमुक्त राहील ह्याची सुद्धा काय गॅरंटी ?

आणि तुम्हा-आम्हा सामान्य जनतेला जे समजते ते माध्यमांना कळ्त नसेल का ? अण्णा अट्टाहासच करत आहेत हे त्यांना स्पष्टपणे दाखवून देणे/समजावुन सांगणे हे माध्यमांची जबाबदारी नाही का ?

बाळकराम's picture

22 Aug 2011 - 5:55 pm | बाळकराम

हे बिल पास झालं नाही तर सुरेश कलमाडी, ए राजा वा इतरानी केलेला भ्रष्टाचार परत होणार नाही याची गॅरंटी देणार का तुम्ही? की सगळे राजकीय भ्रष्टाचार्‍याना उपरती होउन ते चांगले वागायला लागतील अशी तुमची अपेक्षा आहे? ;)

पल्लवी's picture

22 Aug 2011 - 9:09 pm | पल्लवी

हे बिल पास झालं तर त्यात लूप होल्स असणार नाहीत किन्वा ते शोधून शोधून कोणीच कधीच भ्रष्टाचार करणार नाही याची गॅरंटी देणार का तुम्ही? हे बिल पास झालं तर आणि तरच राजकीय भ्रष्टाचार्‍याना उपरती होउन ते लग्गेच लोकपाल बिलास घाबरुन चांगले वागायला लागतील अशी तुमची अपेक्षा/आशा आहे? काँग्रेसविषयी मला काही प्रेम वगैरे नाही. पण काँग्रेसचे आत्ताचे सरकार गेलेच इतर पक्षाचे सरकार लग्गेच भ्रष्टाचार त्यागून देईल असे तुम्हांस वाटते का ? भाजप वगैरे जे सध्या अण्णांच्या बाजुने आहेत ( किंवा तसे भासवत आहेत ), ते आता सत्तारुढ असते तर त्यांची काय भुमिका असली असती असे आपणांस वाटते ?

मराठी_माणूस's picture

23 Aug 2011 - 8:55 am | मराठी_माणूस

स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे काही आलबेल होईल ह्याची गॅरंटी त्या काळी कोणी दीली होती का ?

स्वतन्त्र's picture

23 Aug 2011 - 12:31 pm | स्वतन्त्र

मुळात ही लोकपाल समिती भ्रष्टाचारमुक्त राहील ह्याची सुद्धा काय गॅरंटी ?

१०० % सहमत !

मराठी_माणूस's picture

23 Aug 2011 - 2:42 pm | मराठी_माणूस

ठीक आहे. तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत तुम्ही पाठींबा देउ नका अथवा पर्याय सुचवा

पल्लवी's picture

23 Aug 2011 - 7:56 pm | पल्लवी

>>स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे काही आलबेल होईल ह्याची गॅरंटी त्या काळी कोणी दीली होती का
कदाचित ह्यासाठीच आधी स्वातंत्र्य की आधी समाज सुधारणा हा वाद रंगला होता टिळक आणि गोखल्यांमधे.
स्वातंत्र्य मिळालं की ते सांभाळ्ण्याची कुवत समाजात असावा, हा विचार त्यामागे असावा. असो.

>>तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत तुम्ही पाठींबा देउ नका.
अच्छा म्हणजे जे चालले आहे त्याला चांगले म्हणा, नाहीतर तुम्ही विरोधक ?!

अधिक स्पष्ट करुन सांगायचे झाल्यास, भ्रष्टाचार नष्ट करणे कोणाला नको आहे ? अण्णांबद्दल कोणाला आदर नाही ? हे ह्या स्तरावर, ह्या जोमाने होणे गरजेचे होतेच ह्याबद्द्ल कोणाचे दुमत असेल ? पण हे सगळे करताना / घडताना तारतम्य हरवले जाउ नये, अती ताणून जे मिळू शकेल त्याचेही मिळण्याचे चांसेस (मराठी शब्द ? ) घालवु नये, आपणच निवडून आणलेल्या सरकाराला आता संधी मिळताच शिव्या घातल्या जाउन प्रकरण हातघाईवर आणु नये असे वाटते.

>>पर्याय सुचवा.
शेवटी काय आहे ना, सामान्य माणुस काय किंवा बिग शॉट्स काय, जोपर्यंत माणुस स्वतः "भ्रष्टाचार करणार नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारे हातभार लावणार नाही" असे self-policing करत नाही, तोपर्यंत सगळं अवघडच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Aug 2011 - 1:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत तुम्ही पाठींबा देउ नका.
>>>>अच्छा म्हणजे जे चालले आहे त्याला चांगले म्हणा, नाहीतर तुम्ही विरोधक ?!

पाठींबा न देणे म्हणजे विरोध करणे नाही.
पटत नसेल तर पाठींबा देऊ नका हे एकदम सरळ तर्कात बसणारे वाक्य आहे. त्यांनी काय, पटत नसेल तरी पाठींबा द्या म्हणायचे की काय :-) ?

मराठी_माणूस's picture

22 Aug 2011 - 1:26 pm | मराठी_माणूस

१)सरकारचे वागणे जर "नाक दाबल्या वर तोंड उघडते" असेच असेल तर काय करावे.
२)घाइगडबडीतत उरकण्या सारखी ही गोष्ट नसेल पण ४२ वर्ष हा काळ घाइचा म्हणात येणार नाहे.
३)उर्वरीत महाराष्ट्रात कायम काळोखाचे साम्राज्य (लोड शेडींग) असले आणि आरडाओरड केली तरी काहीही फरक पडत नाहे , पण तेच मुंबईत घडले तर लगेच दखल घेतली जाते. त्यामुळेच दिल्लीचे महत्व.
४)विसंगत वागण्याची फक्त सरकारचीच मक्तेदारी नाही.आंदोलनातील विसंगती कदाचीत सरकारच्या विसंगतीचाच परीणाम असु शकतो.

मालोजीराव's picture

22 Aug 2011 - 1:40 pm | मालोजीराव

चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.

याची गरज आहे असं वाटत नाही, कारण यापूर्वी जनता गाढ झोपेत असताना अतिशय महत्वपूर्ण,'अर्थपूर्ण' अशी बिल्स विना चर्चा,लोकसभेत राज्यसभेत गोंधळ चालू असताना मंजूर झाली आहेत.सरकारकडून जनतेला या बिलासंदर्भात लेखी शब्द मिळणे अपेक्षित आहे. कारण सोनियाजी परदेशात पळून गेल्यात,मनमोहनजी यांच्या तोंडून कोणतेही सकारात्मक शब्द निघत नाहीयेत आणि मनु संघवी,सिब्बलांच्या तोंडावरची मग्रुरी 'फोटोजेनिक' आहे.

चार महिन्यांपेक्षा जास्त वेळ देऊनही कांहीं झाले नाहीं. तेंव्हां आता वेळ देत नाहींत ही ओरड अस्थानी आहे. जेंव्हां "टीम अण्णा" सरकारशी बोलणी करत होती तेंव्हाचा कपिल सिबल यांचा बेरकी चेहेरा, कुत्सित हास्य आणि टर उडविण्याचा पवित्रा मला अजूनही आठवत आहेत. त्यावेळची असली वागणूक आता भारी पडते आहे काँग्रेसी नेत्यांना! त्यात राजमाता आजारी आणि राजपुत्र कुठे तरी कमी महत्वाच्या जागी वावरतोय्! मग काय करणार बिचारे ममोसिं तरी?
आता प्रिया दत्त, एरॉन, शशी थरूर हे खासदार तर फुटलेले दिसत आहेत. परवा-परवापर्यंत अण्णांच्या विरुद्ध काँग्रेसचे समर्थन करणारे संजय निरूपण अण्णांच्या टोपीत आज अगदीच 'विदू' दिसत होते. (अर्थात् ते जातिवंत दलबदलूच आहेत!)
राजकारणात वेळ कांहीं सांगून येत नाहीं म्हणून सगळे खासदार दोन्ही डगरींवर हात ठेवून आहेत. अगदी "तू नहीं और सही, और नहीं और सही" हे गाणे गाताहेत बरेच खासदार! घरो-घरी बैठकी चालल्या आहेत. आपापसात काय बोलतात कुणास ठाऊक!
भाजपाही "सरशी तिकडे क्षक्षक्ष" या तंत्राचा उपयोग करताना दिसतो आहे. फक्त लाल बावटेवाले मात्र त्यांच्या निवेदनांवरून आपल्या तत्वांशी प्रमाणिक वाटले.
"येन केन प्रकारेण प्रसिद्धा रुंधती भवेत्" या न्यायाने या बाईही काल बोलल्या!

नितिन थत्ते's picture

22 Aug 2011 - 1:53 pm | नितिन थत्ते

अण्णांच्या रूपात भगवान श्रीकॄष्णच प्रकटले असताना अशा शंका घेणे शोभत नाही.

जल्ला तुम्ही एकपण संधी सोडु नका. ;)

प्रियाली's picture

22 Aug 2011 - 3:57 pm | प्रियाली

तात्याचा लेख आवडला. तरीही,

अण्णांच्या रूपात भगवान श्रीकॄष्णच प्रकटले असताना अशा शंका घेणे शोभत नाही.

याच्याशी +१. ;-)

तात्याच्या लेखावर सुधीर काळे यांचा प्रतिसाद वाचनीय असेल असे भाकित आहे.

शानबा५१२'s picture

22 Aug 2011 - 2:05 pm | शानबा५१२

३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता.

४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..!

हा मुद्दा चुकीचा आहे.

अण्णा आदोंलनाच्या एक दीवस आधीच म्हणाले होते की 'सरकार पडले तरी चालेल पण भ्रष्टाचार संपला पाहीजे'

आणि जेव्हा अण्णा बोलतात की '...........सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही' तेव्हा त्यांना हेच म्हणायचे आहे की सरकार पाडणे आमचा उद्देश नाही पण जर बील पास होण्यासाठी ते गरजेचे असेल तर काही हरकत नाही.

मनीष तीवारी सारखा मुर्ख अण्णांवर 'सैन्यातुन पळाले' असा आरोप करतो,नंतर तो आरोप एक अमराठी माणुस चुकीचा असल्याचे माहीतीच्य अधिकारातुन दाखवुन देतो हे एक विशेष होते,त्यावर चर्चा नाही झाली.

बिहारची एक युवती उपोषणाला बसलेय्,तीन दीवसांनंतर तीला चालताही येत नव्हते,अण्णा सहा दीवसांनंतरही ओरडुन ओरडुन भाषण देतायत.

ह्यावरुन काय सिध्द होते?

पाषाणभेद's picture

22 Aug 2011 - 2:20 pm | पाषाणभेद

मी पण म्हणतो : अण्णा, प्लीज जपा..! पण थोड्या वेगळ्या अर्थाने.

जसे की अण्णा, प्लीज जपा..! पण जरा जिवाला! कारण असले अण्णा देशाला हवे आहेत.

अन तात्या, अहो कायदा होणे महत्वाचे. त्यात नंतर सुधारणा करता येईलच की.

एकदम बरोबर बोललात, पाषाणभेद-जी!
मलाही हेच वाटते कीं ही नालायक भ्रष्टाचार-रक्षकांची कोंडी फोडली गेली पाहिजे. त्यानंतर अण्णा हजारे आणि "टीम अण्णा" हजारोंनी सुधारणा करतील!

मुद्दे बरोबर आहेत.

एक वेगळा मुद्दा: सात आठ दिवस अन्न पूर्ण सोडून बसले तर कोणत्याही वयाचा मनुष्य टिकाव धरु शकेल असे वाटत नाही. आणि तरीही हे किंवा रामदेव बाबा वगैरे सात आठ दिवसांनीही बर्‍यापैकी ठीक दिसतात. हे पटत नाही.

पाणीही पीत नसतील तर दोन दिवसांतच अत्यंत घातक परिणाम होतील.

पाणी पिऊन फक्त खाणे बंद ठेवले तर तीन ते चार दिवसांत हायपोग्लायसेमियामुळे प्राणघातक स्थिती दिसणे स्वाभाविक असावे.

तितके काही होताना दिसत नाही.

काय असते नेमके हे उपोषण. संशय म्हणून नव्हे पण खरोखरीची शंका म्हणून विचारतोय.

होय्.सध्या उपोषणादरम्यान पाणी प्यायले जाते.

मुद्दे बरोबर आहेत.

>> एक वेगळा मुद्दा: सात आठ दिवस अन्न पूर्ण सोडून बसले तर कोणत्याही वयाचा मनुष्य टिकाव धरु शकेल असे वाटत नाही.
हो. अवघड परिस्थिती होते खरी. पण माणसाचा जीव काही जात नाही. "टिकाव धरणे " कशाला म्हणताय ते सांगा.

"जिवंत राहणे" ह्याला टिकाव धरणे म्हणत असाल तर,माणुस नक्कीच टिकाव धरु शकतो.
आमरण उपोषण करुन खरोखर मृत्यु पावलेली प्रथम व्यक्ती म्हणजे भगतसिंग ह्यांचे सहकारी जतिंद्रनाथ दास्. त्यांनी जेलमध्ये असताना १९२९ मध्ये आमरण उपोषण केले व ६३ व्या दिवशी त्यांचे निधन झाले.
भाषावार प्रांतरचनेसाठी, (विशेषतः आंध्र च्या मागणीसाठी) १९५२ आमरण उपोषण करुन पोट्टी श्रीरमलु ह्यांना उपोषणाच्या ८२व्या दिवशी मृत्युने गाठले.
मागच्याच १-२ महिन्यात गंगाशुद्धीकरण संबंधित प्रश्नासाठी स्वामी निगमानंद ह्यांनी ६५ दिवस उपोषण केल्यावर त्यांचा जीव गेला.उपोषणानेच तो गेला असावा असा अंदाज आहे.
ही सर्व उदाहरणे बघता, ५-७ दिवसात आपण म्हणता तसे जीव जायची शक्यता नाही. सुमारे८-१० दिवसात बाबा रामदेव ह्यांची तब्येत खराब झाली. पण त्यात विना अन्नपाणी केलेल्या दगदगीचाच अधिक सहभाग होता असे म्हणतात. त्यांनी निव्वळ उपोषणच केले असते आणि मौनव्रत धारण केले असते तर ते जरा अधिक काळ बरे राहिले असते.

>> आणि तरीही हे किंवा रामदेव बाबा वगैरे सात आठ दिवसांनीही बर्‍यापैकी ठीक दिसतात. हे पटत नाही.
माझ्या माहितीप्रमाणे बाबा रामदेव अत्यवस्थ झाल्याने त्यांना अ‍ॅड्मिट करावे लागले होते. ते काही बर्‍यापैकी ठिक दिसत नव्हते. म्हणुन तर दिग्गीराजा वगैरे मंडळी "others will also meet the same fate as that of Ramdev " वगैरे म्हणत होती. तुम्हीही अत्यवस्थ व दुर्लक्षित व्हाल अशी भिती घालत होती.

पाणीही पीत नसतील तर दोन दिवसांतच अत्यंत घातक परिणाम होतील.
पाणी पितात हो. अगदि व्यवस्थित पितात.(मला वाटते बाटलीबंद पाणी पीत असावेतएकात्यांना भेटायला गेलेल्या एका डॉक्टाराने ते पाण्यातुनच ग्लुकोज्/एलेक्ट्राल किंवा तत्सम घेतात असा दावा केलाय. http://www.youtube.com/watch?v=G4zRHEw21h8

>>पाणी पिऊन फक्त खाणे बंद ठेवले तर तीन ते चार दिवसांत हायपोग्लायसेमियामुळे प्राणघातक स्थिती दिसणे स्वाभाविक असावे.
नाही. वरील उदाहरणे पहावीत.

>>काय असते नेमके हे उपोषण. संशय म्हणून नव्हे पण खरोखरीची शंका म्हणून विचारतोय.
संशय(असल्यास) बलावण्यास कारण :- http://www.youtube.com/watch?v=G4zRHEw21h8.
माझ्या माहितीत :- "उपोषण म्हणजे अन्नग्रहण न करणे, त्याद्वारे स्वतःला निय्मित क्लेश देणे व मृत्युकडे वाटचाल. ह्या संभाव्य मृत्युची नैतिक जिम्मेदारी ही ज्याच्याविरुद्ध उपोषण केले जाते त्याच्यावर असते."
थोडक्यात, आधुनिक काळात मध्ययुगीन मुल्ये राहिलेली नाहित. सर्व प्रजेच्या संवर्धनाची थेट जिम्मेदारी ही सरकारकडेच असते अधोरेखित संकल्पना मुळात ब्रिटिशांच्या राज्यात होती. ती व्यवस्थित समजून घेउन, तिचा पुरेपुर वापर गांधीजींनी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर करुन दाखवला. उपोषण करणारी व्यक्ती पुरेसा जनाधार असलेली किंवा मिडियाच्या नजरेत असनारी असेल तर केवळ एखाद्या व्यक्तिच्या मृत्युनेही आख्खे सरकार गोत्यात येउ शकते, मग ते केंद्र असो वा रज्या वा अजुन कुठलेही. थोडक्यात, जुन्या हिंदीपिक्चरमध्ये हीरो-हिरोइनचे वडील कसे आपल्या अपत्याला त्याच्या प्रेमिकापासुन दूर होउन, स्वतःच्या मर्जीने ठरवलेले लग्न करण्यास भाग पाडण्यासाठी heart-attack आणत असत ना, तस्सच म्हणा हवं तर उपोषणाला. मुलीच्या बापाची कशी भूमिका असे की:- "मी मेलो तर जिम्मेदारी तुझी" वगैरे वगैरे. मग उगाच तो guilt टाळण्यासाठी हिरोइन्स कशा कुणाशीही खुशाल लग्नाला तयार होत ना, तसच सरकारनही व्हावं अशी अपेक्षा सरकारकडुन असते.

बाळकराम's picture

22 Aug 2011 - 6:10 pm | बाळकराम

<<सर्व प्रजेच्या संवर्धनाची थेट जिम्मेदारी ही सरकारकडेच असते अधोरेखित संकल्पना मुळात ब्रिटिशांच्या राज्यात होती.>>...हा शोध कुठून लावलात तुम्ही? भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचा इतका मोठा अपमान कुणीही केला नसेल ;(
हे जर खरं असेल तर जालियनवाला बाग, १८५७ ची वगैरे ब्रिटिशांनी घडवलेली शेकडो हत्याकांडे आणि त्यात मारलेली लाखो माणसे इ. काय नुसती भातुकलीच्या खेळण्यातली भांडणं होती वाटतं? ब्रिटिश जाऊन ६४ वर्षे झाली पण काळ्या इंग्रजांची जळजळ अजून जात नाही! दुर्दैव देशाचं, दुसरं काय ;(

मन१'s picture

22 Aug 2011 - 10:30 pm | मन१

अधोरेखित वाक्य कृपया out of contextवाचु नये. अधोरेखित वाक्यापूर्वीचे वाक्य पुढील वाक्याला एक विशिष्ट अर्थ देते. मुळात मी स्वातंत्र्यसैनिकांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. उपोषणाला बसल्यावर किंवा आंदोलन केल्यावर बोलणी करायला ब्रिटिश सरकार का येइ, ह्याचा अंदाज ह्यातुन येउ शकतो. म्हणुन्च जालियनवाला बाग हत्याकांडानंतर खुद्द ब्रिटनमधील सामान्य जनता सरकारवर तीव्र नाराज होती. राहिला प्रश्न १८५७ चा. १८५७ चं क्रौर्य दोन्ही बाजुंनी प्रचंड होतं. त्यातली एक बाजु उठाववाल्यांची तर दुसरी East India company नामक खाजगी कंपनीची होती. तो भयंकर रक्तपात पाहुनच ब्रिटिश शासनानं थेट सत्ता हातात घेतली. पुढेही सरकारशी युद्ध पुकारणार्‍यांसोबत ब्रिटिश सत्ता क्रौर्यानं वागली हे खरेच. मात्र सामान्य जनाच्या घरात घुसुन उच्छाद वगैरे मांडात बसणे त्यांना कबूल नसावे. ब्रिटनने भारत लुटला हे खरेच, पण त्यांच्या पूर्वसुरींच्या तुलनेत त्यांनी कुथेही demographic imbalance केलेला नाही.

आपण मुद्द्याबद्द्ल आणि मुद्द्यापुरतेच बोलला असतात तर बरं झालं असतं. "काळा इंग्रज" , "जळजळ" असे विखारी शब्द लगेच वापरायची काय जरुर होती ते समजले नाही. स्वातंत्र्यसैनिकांबद्द्ल अनादर करण्याचा हेतु नाही हे पुन्हा एकदा स्प्ष्ट करु इच्छितो.

असो, ही चर्चा मूळ चर्चाप्रस्तावाशी अवांतर जाताना दिसते आहे. अधिक काही असल्यास स्वतंत्र धागा उघडणे किंवा व्यनि-खरडी वापरणे इष्ट.

बाळकराम's picture

24 Aug 2011 - 3:27 pm | बाळकराम

चालेल, व्यनी/खरड स्वरुपात बातचीत करुयात! ते "काळा इंग्रज" वगैरे तुमच्या साठी नव्हते, इंग्रज हे विष्णूचे अवतार होते असं मानणारा एक वर्ग आपल्या देशात अजूनही आहे त्याना उद्देश्शून ते होते. आपला अनादर झाला असल्यास कृपया माफ करा.

शैलेन्द्र's picture

25 Aug 2011 - 10:44 am | शैलेन्द्र

"इंग्रज हे विष्णूचे अवतार होते असं मानणारा एक वर्ग आपल्या देशात अजूनही आहे "

इंग्रज विष्णुचे अवतार नसतीलही कदाचीत, पण अनेक मध्ययुगीन भारतीय राज्यकर्त्यांपेक्षा, इंग्रजांची व्यवस्था खुपच चांगली होते. मुख्य म्हणजे व्यक्तीसापेक्ष राज्यकारभाराकडुन, कायदेशीर किंवा व्यवस्थाधारीत कारभाराकडे भारताचा प्रवास इंग्रजी राजवटीतच झाला. इंग्रजांऐवजी जर पोर्तुगीजांनी भारत पादाक्रांत केला असता तर आज फार वेगळ चित्र असत.

प्रियाली's picture

22 Aug 2011 - 3:59 pm | प्रियाली

माझ्या माहितीतील एक जैन महिला पाण्यावाचून उपवास करून निदान आठवडाभर बोरिवली-चर्चगेट प्रवास करून ऑफिस गाठत असे. नंतर मात्र प्रकृतीमुळे ती ऑफिसला येणे बंद करे पण तिचे उपवास पूर्ण करे.

* हल्ली ते जैन उपवास किती दिवस चालायचे ते विसरले आहे पण उपवासानंतर तिची प्रकृती अर्धी झालेली असे.

वपाडाव's picture

22 Aug 2011 - 6:15 pm | वपाडाव

त्यास पर्युषण पर्व असे म्हणतात... हा कालावधी १० दिवसांचा असतो...
लोक आपापल्यापरीने (झेपेल तसे) उपवास करत असतात.
कुणी दिवसात एकच वेळ जेवण करतं कुणी १० दिवस पाण्यावर जगतं, कुणी सायंकाळच्या आत जेवणाच्या वेळा पाळतं (सहसा ही वेळ पाळणाय्चे काम चातुर्मासभर चालते.)
दिगांबर पंथाचे लोक हे सर्व गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत पाळतात.
आणी श्वेतांबर लोक गणेश चतुर्थीच्या आधीचे १० दिवस हे पाळतात.
नुस्ते पाण्यावर १० दिवस काढणार्‍यांचा भाद्रपदाच्या शेवटी सत्कारही केला जातो.....

प्रियाली's picture

22 Aug 2011 - 6:17 pm | प्रियाली

बरोबर :) मी विसरून गेले होते. माहितीसाठी धन्यवाद.

कार्यक्रम चौवीयार या नावाने पण ओळखला जातो. खास जैनी जेवण असते.
(ते साधारण पावणेसात ते सात या दरम्यान केले जाते. हीच गोष्ट लक्षात ठेवून जव्हेरीबाजार-प्रसाद चेंबर्स-दादर येथे बाँबस्फोट केले गेले.)

आपल्यातल्या डॉक्टरमंडळींनी यावर मतप्रदर्शन करावे, पण माझ्या वाचनानुसार हायपोग्लायसेमिया हा फक्त मधुमेह असलेल्या व्यक्तीलाच होत असावा व इतरांना होत नसावा.
चूभूद्याघ्या!
शिवाय मिताहारी माणसाला बरेच दिवस उपाशी रहाता येते. पाणी पीत राहिल्यास साधारणपणे १५ दिवस अशक्तपणाखेरीज इतर कांही काँप्लिकेशन्स होत नाहींत. पण डॉक्टरमंडळींनी यावर जरूर भाष्य करावे. मलाही बरोबर माहिती मिळाल्यास हवीच आहे.

गवि's picture

24 Aug 2011 - 10:11 am | गवि

मला पण. हायपोग्लायसेमियाबद्दलचा गैरसमज दूर करावा.

मनुष्य मरत नसेल पण निदान बोलण्याचालण्याच्या स्थितीत सात आठ दिवसांनी नक्की राहात नसेल.

पुन्हा अजून एक प्रश्न. पाण्याशिवाय तर मनुष्य सात दिवसही राहू शकणार नाही. अशा स्थितीत उपोषणाच्यावेळी पाणी पीत राहून आपले उपोषणदिवस वाढवणे हा उद्देश असावा का?

पाणीही न प्यायल्याने उपोषणाची धार शतपटींनी वाढेल काय? कारण क्रिटिकल कंडिशन लगेचच येईल.

की दहापंधरा दिवस तरी उपोषण चालावे अशी उभय पक्षांची इच्छा असते?

उपोषण हा मार्ग योग्य आहे का किंवा खरोखर मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाने मृत्यू ओढवणे (स्वामी निगमानंदांसारखा) अशी घटना सामान्यपणे सर्व उपोषणांबाबत (सध्याचे अण्णांचे उपोषण धरुन) घडू शकते का?

की जनरली अशा वेळी (म्हणजे खरेच मरण्याची पाळी आल्यास) समर्थकांकडून अन्य मार्गांनी योग्य परिस्थिती निर्माण करुन उपोषणकर्त्याला येनकेन प्रकारेण गळ घालून उपोषण सोडायला कारण पुरवले जाते?

जर याचे उत्तर हो असेल तर मग उपोषण ही निव्वळ स्टंटबाजी असते का? तशी असणे चूक की बरोबर हा पुढचा प्रश्न झाला. मुळात असते का हा प्रश्न सध्या डोकावतो आहे.

हे सर्व मी अण्णांच्या उपोषणाबाबत किंवा त्याला विरोध म्हणून नव्हे, तर एकूण उपोषण या "मोडॅलिटी"विषयी म्हटले आहे.

प्रचेतस's picture

24 Aug 2011 - 10:20 am | प्रचेतस

पाण्याशिवाय तर मनुष्य सात दिवसही राहू शकणार नाही. अशा स्थितीत उपोषणाच्यावेळी पाणी पीत राहून आपले उपोषणदिवस वाढवणे हा उद्देश असावा का?

उपोषण म्हणजे फक्त अन्न त्यागणे.
अन्न व पाणी दोघांच्याही त्यागाला प्रायोपवेशन म्हणतात.

सावरकरांनी प्रायोपवेशन केले होते. २२ दिवसांनी त्यांचे निधन झाले. (चूभूदेघे)

उपोषण आणि प्रायोपवेशन यातला फरक स्पष्ट ज्ञात आहे.

मुद्दा असा आहे की प्रायोपवेशन हे राजकीय अस्त्र म्हणून क्वचितच वापरले जात असावे. तिथे "उपोषण"च वापरले जाते. आणि बहुतेक वेळा ते साध्य होत नाही म्हटल्यावर काहीतरी सीन उभा करुन मोसंब्याचा रस पाजला जातो असं पाहण्यात येतं. हे प्रायोपवेशनाच्या बाबतीत कठीण आहे कारण ते हाय रिस्क आहे.

त्याविषयी म्हणत होतो.

बाकी सावरकरांनी प्रायोपवेशन केले असेल तर ते स्वतःचे जीवन ऐच्छिक रित्या संपवण्यासाठी. काही मागणीसाठी नव्हे.

अवांतरः स्वा. सावरकरांनी समुद्रात शिरुन देहत्याग केला असेही ऐकिवात आहे. खरे काय कोणास ठाऊक..

पण त्यांच्यासारखी पट्टीची पोहणारी व्यक्ती (आठवा: बोटीवरुन उडी) , पाण्यात शिरुन बुडू शकेल हे अतर्क्य वाटते. शेवटी कितीही डिटर्मिनेशन असले तरी पोहू शकणारी व्यक्ती एका क्षणानंतर सब्कॉन्शस माईंडच्या प्रभावाने हातपाय मारुन तरंगतेच.

बरेचसे मुद्दे पटले.
एकंदर गुळाचा गणपती होणार अशी चिन्हे आहेत.

मन१'s picture

22 Aug 2011 - 3:42 pm | मन१

लोकपालामुळे खरोखरीच देशाचं भलं होणार असं लोकांना वाटतय बहुतेक.

आणि तात्या,
(थोड्या उशीरा का असेना)मनःपूर्वक शुभेच्छा; दीर्घायुष्य मिळो.

चिरोटा's picture

22 Aug 2011 - 3:52 pm | चिरोटा

वाचनिय लेख. काही मुद्दे पटले. सिसोदिया, केजरीवाल हे अचानक उगवलेले लोक नाहीत. केजरीवाल ह्यांनी RTI संदर्भात बरेच काम केले आहे. चांगली डिग्री आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते आंदोलनात सामील झाले आहेत. अण्णांच्या आंदोलनामागे अमेरिका,पाक आणि संघपरिवाराचा हात आहे असे 'ज्येष्ठ पत्रकारी' लॉजिक कोणाचे असेल तर भाग वेगळा.

प्रियाली's picture

22 Aug 2011 - 4:04 pm | प्रियाली

केजरीवाल हे आयआयटी खडकपूरमधून शिकलेले असून बहुधा ते नंतर टाटा स्टीलमध्ये होते. तेथून त्यांनी निघून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जॉइन केले आणि तेथे ते अतिरिक्त आयकर आयुक्त होते असे कळते.

झी टीव्हीवर झालेल्या सारेगामापमध्ये अण्णा केजरीवालविषयी म्हणाले होते की "हा मनुष्य वेडा आहे. इतका उच्चशिक्षित असून आणि मोठ्या पदावरची नोकरी सोडून आज केवळ दोन जोडी कपडे घेऊन तो माझ्यासोबत वणवण भटकतो आहे."

असो. अण्णांना प्रभावी बोलता येत नाही. त्यांची भाषणे सुरचित नसतात. हे काम केजरीवाल उत्तम करतात असे जाणवले.

>>>अण्णांना प्रभावी बोलता येत नाही. त्यांची भाषणे सुरचित नसतात. हे काम केजरीवाल उत्तम करतात असे जाणवले.

म्हंजे केजरीवाल मुळे अण्णां टिम चांगली झाली म्हणायचे काय तुम्हाला ?

प्रियाली's picture

22 Aug 2011 - 5:00 pm | प्रियाली

म्हंजे केजरीवाल मुळे अण्णां टिम चांगली झाली म्हणायचे काय तुम्हाला ?

केजरीवालमुळे समोरच्याला काय सांगायचे आहे ते सांगणारा वक्ता अण्णांना मिळाला. अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत हिंदी समोरच्याला गोंधळवून टाकणारे असते.

विसोबा खेचर's picture

22 Aug 2011 - 5:15 pm | विसोबा खेचर

अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत हिंदी समोरच्याला गोंधळवून टाकणारे असते.

यावरून आमचे भीमण्णा आठवले. भीमण्णा मूळचे कानडी परंतु तेही काही वेळेला मराठी मिश्रित असं लय भारी हिंदी बोलायचे...:)

(भीमण्णांचा भक्त अन् हजारे अण्णांचा प्रेमी) तात्या.

प्रियाली's picture

22 Aug 2011 - 5:17 pm | प्रियाली

यावरून आमचे भीमण्णा आठवले. भीमण्णा मूळचे कानडी परंतु तेही काही वेळेला मराठी मिश्रित असं लय भारी हिंदी बोलायचे...

कायद्याची भाषा बोलताना स्पष्ट आणि रोखठोक बोलणे आवश्यक असते. भीमसेन जोशींना कायद्याची भाषा बोलावी लागली असती तर त्यांनीही एखादा वकील किंवा स्पष्ट बोलणारा वक्ता पुढे केला असता.

चांगले हिंदी न बोलता आल्याने आबांची स्थिती कशी झाली होती ते आठवा.

आपली,
(स्पष्टवक्ती)प्रियाली.

तात्या, टकल्या बापटाचा संताप यायचा बाकी आहे ना अजुन....
तो येउ द्या जरा लौकर....

मराठी_माणूस's picture

22 Aug 2011 - 4:26 pm | मराठी_माणूस

झी टीव्हीवर झालेल्या सारेगामापमध्ये अण्णा केजरीवालविषयी म्हणाले होते
सारेगमप मध्ये अण्णा?

प्रियाली's picture

22 Aug 2011 - 5:00 pm | प्रियाली

सारेगमप मध्ये अण्णा?

हो अण्णा आणि केजरीवालही.

पूर्ण कार्यक्रम येथे बघा - http://youtu.be/pm7iXs0b0CQ

सुधीर काळे's picture

23 Aug 2011 - 3:33 pm | सुधीर काळे

ह्ये वाचा आनी इच्चार करा!
http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal

वाहीदा's picture

25 Aug 2011 - 12:44 pm | वाहीदा

शनिवार सप्टेंबर ३० , २००६ ला आलेला हा लेख तात्या, तुम्ही जरुर वाचा :
Fighting the odds - Arvind Kejriwal :
http://www.telegraphindia.com/1060930/asp/weekend/story_6784531.asp

अरविंद केजरिवाल या सारखे किती जण आपल्यात आहेत ? हा माणूस अचानक उगवलेला नाही त्याचा लढा वाचा अन मग ठरवा त्याच्याकडे कुठला हिडन एजेंडा असू शकतो ते.... वाईट माणसे जगात आहेत याचा अर्थ चांगली माणसे पूर्णतः गायब झाली असा होत नाही.. अजून तरी काही चांगल्या लोकांमुळेच जगात कुठेतरी चांगल्या घडामोडी होतात.

जगात प्रत्येक बदमाशागणिक, असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही.
स्वार्थी राजकारणी असतात जगात , तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही.

या अब्राहम लिंकन च्या ओळीवर विश्वास ठेवा, मी व्यक्तीपुजा कधीच करित नाही पण किरण बेदी अन अरविंद केजरिवाल या दोन्ही व्यक्तींवर माझा तरी विश्वास आहे.

तुम्हें हो ना हो हमको तो इतना यकींन है,
टिम-अण्णा में कोई भ्रष्टाचारी नहीं हैं, नहीं है ! :-)

आदिजोशी's picture

22 Aug 2011 - 5:43 pm | आदिजोशी

कळवळ कळली, पण हा लेख इथे टाकून काय उपयोग? तो अण्णांपर्यंत पोचवा.

केजरीवाल आणि किरण बेदी ह्यांचे आत्तापर्यंतचे आयुष्य आणि प्रामाणिकपणाचे रेकॉर्ड बघता त्यांच्यावर शंका घेण्यासाठी आधी पुरावे शोधणं आवश्यक आहे. केजरीवाल ३-४ महिन्यात उगवले असं लिहून लेखकाने आपला ह्या विषयावरचा अभ्यास आणि एकंदरीत ह्या विषयाची जाण जगजाहीर केलीच आहे. किबोर्ड आहे आणि लोकं वाचत आहेत म्हणून काहीही टंकू नये. लोकांचा वेळ जातो आणि हाती काही लागत नाही.

देशापेक्षाही महाराष्ट्राला प्रथम हवे आहात इतकंच

हे विधान म्हणजे तर भंपकपणाचा कळस आहे. ज्या माणसाने उभ्या देशाला प्रेरणा दिली, लाखो लोकांना स्वयंस्फूर्तीने चेतना दिली त्या माणसाने केवळ महराष्ट्रापुरते रहावे असा विचार आण्णांचा खरा चाहता करूच कसा शकतो? उगाच अण्णांबद्दल फार प्रेम आहे हे दाखवण्याच्या नादात, भावनेला हात घालणारी छापील वाक्ये लिहिता लिहिता तारतम्य सुटलेले दिसते. आनंद आहे.

चतुरंग's picture

22 Aug 2011 - 7:32 pm | चतुरंग

अरविंद केजरीवाल अभ्यासू आणि हुषार माणूस आहे. विकीवर त्यांची बरीच माहिती आहे. तू नळीवर अनेक विडिओ सुद्धा आहेत. किरण बेदींबद्दल तर मी काही वेगळे सांगावे असे नाहीच. व्यवस्थेच्या आत राहूनही व्यवस्थेशी लढा देत राहणार्‍या अशा माणसांकडे हिडन अजेंडा आहे असे म्हणणे म्हणजे अवसानघात करण्याचा प्रकार आहे.
भावनेच्या भरात लेखन करुन मूळ मुद्याला नख लावले आहेत तात्या.

अण्णांनी देशव्यापीस्तरावरच काम करायला हवे. त्यांना हिंदी नीट येत नाही त्यामुळे मीडिया आणि इतर मुलाखत घेणारे यांच्या कायदेविषयक प्रश्नांना समर्पक आणि सडेतोड उत्तरे देणारे केजरीवाल सारखे सहकारी असणे अत्यंत आवश्यक आहे.

-रंगा

अप्पा जोगळेकर's picture

22 Aug 2011 - 8:29 pm | अप्पा जोगळेकर

असेच म्हणतो. सबंध लेखामधेच भंपकपणा दिसला.
देशापेक्षाही महाराष्ट्राला तुम्ही प्रथम हवे आहात म्हणजे काय ?
महाराष्ट्रापेक्षा राळेगण सिद्धीला तुम्ही प्रथम हवे आहात असं तिथले गावकरीसुद्धा म्हणतीलच.

उगाच अण्णांबद्दल फार प्रेम आहे हे दाखवण्याच्या नादात, भावनेला हात घालणारी छापील वाक्ये लिहिता लिहिता तारतम्य सुटलेले दिसते.
+१

सुधीर काळे's picture

23 Aug 2011 - 3:36 pm | सुधीर काळे

+१+१+१

शिर्षक सोडल्यास लेख सगळा काही पटला नाही.
आण्णांबद्दल प्रेम वाटणे आणि त्यांच्या चळवळीबद्दल आदर वाटणे यामध्ये सापडून गोंधळ झाल्यासारखा वाटतो आहे.
त्यांनी सगळा देश हलवून सोडला असताना राळेगणसिद्धीच्याच लेव्हलला विचार करून चालणार नाही (यात त्यांच्या गावाला कमी लेखत नाहिये.). बाकी भेटायला गेलेल्या कर्यकर्त्यांच्या बाबतीत झाले ते फार आश्चर्यजनक वगैरे नाही.
गावाहून अमूक एक माणूस येऊन भेट देवून गेल्याचे निरोप मात्र वेळेवर पोहोचल्याशी कारण!
हे काही आण्णांच्याच बाबतीत होत नाहिये. कोणताही मनुष्य महत्वाच्या कामात अडकलेला असताना अगदी घरचे लोकही भेटू शकत नाहीत.

विजुभाऊ's picture

22 Aug 2011 - 6:54 pm | विजुभाऊ

Just a thought
Can we bribe the Government to pass Jan Lokpal Bill??????????

कानडाऊ योगेशु's picture

22 Aug 2011 - 7:08 pm | कानडाऊ योगेशु

मल्टी करोड रुपयांच्या घोटाळ्यांच्या जमान्यात सरकारला एका "हजारे" ची किमंत ती काय?
अण्णांच्या आडनावात अजुन काही शून्ये असायला हवी होती.

वपाडाव's picture

23 Aug 2011 - 2:56 pm | वपाडाव

मल्टी करोड रुपयांच्या घोटाळ्यांच्या जमान्यात सरकारला एका "हजारे" ची किमंत ती काय?
अण्णांच्या आडनावात अजुन काही शून्ये असायला हवी होती.

Clapping Smiley

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Aug 2011 - 5:43 pm | llपुण्याचे पेशवेll

म्हणजे आणांचे आडनाव हजारे ऐवजी करोडे असते तर जास्त प्रभाव पडला असता का?

पल्लवी's picture

22 Aug 2011 - 9:15 pm | पल्लवी

facebook comment जिन्दाबाद !

>>एक कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने मी किरण बेदींना नक्कीच आदारपूर्वक ओळखतो. परंतु ह्या आंदोलनात मात्र 'त्यांच्याकडेही काहीही हिडन अजेंडा नाही..' असं का माहीत नाही, परंतु मी ते म्हणू शकत नाही..!

कोण आणि कोणाबद्दल शंका घेतो आहे हे वाचुन अंमळ हसु आले.

कानडाऊ योगेशु's picture

22 Aug 2011 - 7:05 pm | कानडाऊ योगेशु

केजरीवाल,बेंदीसारख्या मंडळीमुळे अण्णांच्या उपोषणाची तांत्रिक बाजु भक्कम झाल्यासारखी वाटते.
परवाच पेपरात वाचले कि किरण बेंदींनी अण्णांचे उपोषण हे "आमरण" नसुन "बेमुदत" आहे असे प्रसारमाध्यमांना सांगितले.
सरकारमध्ये जर कपिल सिब्बल,मनिष तिवारींसारखी शब्दच्छल करणारी बदमाष मंडळी असतील तर अण्णांकडेही त्याला सडेतोड उत्तरे देणारी मंडळी असायलाच हवीत.

सहमत.
आण्णांचे उपोषण तसेच जरा घाईघाईने निर्णय घ्यायची सक्ती वगैरे त्यांना स्वत:लाही पटत असेल असे नाही पण बदमाश कंपनीशी किती दिवस नियमाप्रमाणे वागत राहणार? कधीतरी आहे त्या तयारीनिशी, थोडे नियन पाळून तर थोडे झुगारून मैदानात उतरावेच लागणार होते. किरण बेदी, केजरीवाल यांची सगळीच मते पटली नाहीत (असे धरले) तरी आण्णांची बाजू जरा तरी बरी झाली. जरा 'उंगली टेढी' करून का होईना कामाशी गाठ घालणेही महत्वाचे!

सुधीर काळे's picture

23 Aug 2011 - 3:42 pm | सुधीर काळे

असयालाच हवीत आणि आहेत. मला केजरीवालांची पुढच्या लढाईची योजना फारच आवडली. ते म्हणाले कीं ही लढाई जिकल्यानंतर पुढचा मनसुबा आहे निवडणुकातील घाण उपसून ती प्रक्रिया पारदर्शक करणे. बस्स. असे झाले तर आपल्यासारखे लोकही निवडणूक लढवायला कचरणार नाहींत. असेच नवे-नवे विषय त्यांनी हातात घ्यावेत आणि विजयी व्हावे!
जय हो, अरविंदभाई!

नगरीनिरंजन's picture

22 Aug 2011 - 7:39 pm | नगरीनिरंजन

भारतीय लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही फार हुशार आहोत. स्वतः काही करत नसलो तरी काही करू पाहणार्‍या इतरांबद्दल अनेक शंका आम्ही घेतो. केजरीवाल आणि बेदी या दोघांनाही सरकारी नोकरीतच अमाप धनदौलत गोळा करता आली असती असे वाटते. असो.

गणेशा's picture

23 Aug 2011 - 7:25 pm | गणेशा

मनातली गोष्त बोललात.. आवडले आणि बरोबर पण वाटलेच

विकास's picture

22 Aug 2011 - 8:39 pm | विकास

दोन दिवसांपुर्वी लोकमत चॅनलवर निखिल वागळेंनी घेतलेली, डॉ. अभय बंग यांची मुलाखत शेवटची पाच-एक मिनीटेच पाहीली/पाहू शकलो. त्यात त्यांनी आंदोलनाच्या बाजूने खूप प्रभावी मते मांडली आणि नेहमीप्रमाणेच त्यांची मते पटणारीच होती. फक्त त्यात एक बोलताना जे काही थोडेफार ऐकले त्यामुळे "संशय का मनी आला" अशी अवस्था झाली. त्यांच्या मते राहूल गांधींनी यात मधे पडावे, ह्या मुद्यावर बोलताना, ते असे देखील म्हणाले की नाहीतरी त्यांना पंतप्रधान होयचे आहे, काँग्रेसला त्यांना पंतप्रधान करायचे आहे, तर मग ही संधी त्यांनी सोडू नये...

ज्यांना अण्णांवर आक्षेप आहे त्यांनी अजून दारूगोळा भरण्यासाठी खैरनार यांची देखील लोकमतवरील मुलाखत पहावी.

बाकी, "कोण आणि कोणाबद्दल शंका घेतो आहे हे वाचुन अंमळ हसु आले." ह्या कुंदनच्या वाक्याशी सहमत. :-)

धनंजय's picture

22 Aug 2011 - 11:24 pm | धनंजय

चांगली मुलाखत. मुद्दामून पाहाण्यासारखी. सुरुवातीची वीसेक मिनिटे आयबीएन लोकमतच्या यूट्यूब वाहिनीवरती बघता आली. (चित्रफितीत तेवढाच भाग आहे.)

जयप्रकाशनारायणांच्या चळवळीशी साम्यस्थळे आणि फरक सांगितले आहेत.
लोकांतली चेतना, निवडणूक-राजकारणाबाहेरील सामाजिक कार्यकर्त्याचे नेतृत्व, सरकारच्या वेगवेगळ्या कातडीबचाऊ आणि चुकलेल्या प्रतिक्रिया, ही साम्ये.
जयप्रकाश नारायणांना राजकारणही चांगले कळत होते, अण्णा हजारेंना नाही; जयप्रकाशनारायणांकडे शिस्तीच्या कार्यकर्त्यांची संघटना होती, अण्णा हजारेंकडे नाही; आणि गर्दी थोड्या काळासाठी चेतवलेली असते, त्यानंतर काय होईल याबद्दल चिंता : हे फरक.

"राहुल गांधी" हा भाग यूट्यूब फीत संपली तोवर आला नव्हता.

विकास's picture

22 Aug 2011 - 11:42 pm | विकास

"राहुल गांधी" हा भाग यूट्यूब फीत संपली तोवर आला नव्हता.

मी ती मुलाखत शनीवारी लाईव्ह बघितली होती. रेकॉर्डींग जर सगळे ठेवले नसेल तर माहीत नाही.

चांगली मुलाखत. मुद्दामून पाहाण्यासारखी.

सहमत. त्यात शेवटी निखिल वागळे म्हणाले होते की, बंग जेंव्हा बोलतात तेंव्हा विचारांना चालना मिळते. ते त्यांचे (बंग यांचे) भाष्य ऐकताना सतत जाणवले.

रेवती's picture

22 Aug 2011 - 11:43 pm | रेवती

गर्दी थोड्या काळासाठी चेतवलेली असते
असेच म्हणते.

अप्पा जोगळेकर's picture

23 Aug 2011 - 8:38 pm | अप्पा जोगळेकर

फक्त त्यात एक बोलताना जे काही थोडेफार ऐकले त्यामुळे "संशय का मनी आला" अशी अवस्था झाली. ह्या मुद्यावर बोलताना, ते असे देखील म्हणाले की नाहीतरी त्यांना पंतप्रधान होयचे आहे, काँग्रेसला त्यांना पंतप्रधान करायचे आहे, तर मग ही संधी त्यांनी सोडू नये...

त्यांनी राहुल गांधीं आणि काँग्रेस पक्ष यांची धोरणात्मक भूमिका काय असावी याबाबत काँग्रेसला सल्ला दिला. त्यामधे त्यांनी काही चुकीचे सांगितले असे वाटत नाही. जर राहुल गांधीने या प्रकरणात इनिशिएटिव्ह घेउन यशस्वी तडजोड केली असती तर तो भावी पंतप्रधान म्हणून योग्य आहे असा संदेश जनतेमध्ये गेला असता. शिवाय जनतेचा फायदा झाला असता तो वेगळाच. पण अशा प्रकारे ओनरशिप घेउन एक पाउल पुढे टाकण्यासाठी तो अकार्यक्षम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.


ज्यांना अण्णांवर आक्षेप आहे त्यांनी अजून दारूगोळा भरण्यासाठी खैरनार यांची देखील लोकमतवरील मुलाखत पहावी.

ज्यांनी अभय बंग यांची मुलाखत पाहिली आहे त्यांच्या मनातील जवळ जवळ सगळ्याच शंका फिटून जातील. अण्णांची जनलोकपाल विधेयकाची मागणी लोकशाहीच्या विरुद्ध आहे असा जो आक्षेप नोंदवला जातो त्याला चांगले उत्तर त्यांनी दिले आहे.

विकास's picture

23 Aug 2011 - 10:53 pm | विकास

त्यांनी राहुल गांधीं आणि काँग्रेस पक्ष यांची धोरणात्मक भूमिका काय असावी याबाबत काँग्रेसला सल्ला दिला. त्यामधे त्यांनी काही चुकीचे सांगितले असे वाटत नाही.

मला वाटले. हेच जर उदाहरण म्हणून कुमार केतकर यांनी मुलाखतीत बोलले असते तर चुकीचे वाटले नसते. पण जेंव्हा डॉ. बंग यांच्या सारखी सन्मान्य व्यक्ती बोलते तेंव्हा त्यातून जनमत निर्माण होऊ शकते. आज काही झाले तरी काँग्रेस हा सत्ताधारी घाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे, बहुमतवाला पक्ष नाही. त्याच्या एका सरचिटणिसाला महत्व देत, नाहीतरी त्याला काँग्रेसला पंतप्रधान करायचेच आहे, असे म्हणणे आणि ते मान्य करून बोलणे पटले नाही. त्यात लोकशाही दिसली नाही तर घराणेशाही ग्रूहीत धरलेली दिसली.

त्याच बरोबर अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे त्यांनी जाता जाता १९७५ चा अर्थात आणिबाणीचा मुद्दा आणला. "असे परत होण्याचे भय आहेच" असे म्हणत. वास्तवीक जे स्वतः जेपींच्या नवनिर्माण आंदोलनात होते, त्यांना कल्पना असावी की असली आणिबाणी आणण्याची घटनेतील तरतुद नंतरच्या जनता पार्टीने खूप अवघड करून नंतरच्या सर्वच सत्ताधिशांच्या अनिर्बंध अधिकाराला वेसण घातले होते.

इतका भाग सोडल्यासः ज्यांनी अभय बंग यांची मुलाखत पाहिली आहे त्यांच्या मनातील जवळ जवळ सगळ्याच शंका फिटून जातील.

ह्याच्याशी सहमतच!

http://www.samachar.com/Anna-says-he-will-speak-to-Rahul-PMO-or-Chavan-l...

अण्णा फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण यांच्याशीच बोलणार!

चला, ग्राऊंड वर्क सुरू झाले तर!

विकास's picture

22 Aug 2011 - 8:53 pm | विकास

अण्णा फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण यांच्याशीच बोलणार!

आता मला पृथ्वी देखील त्रिकोणी असू शकते असे वाटू लागले आहे.

प्रियाली's picture

22 Aug 2011 - 9:30 pm | प्रियाली

हेहेहे! मला सोने जांभळे असते असेही वाटू लागले आहे. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Aug 2011 - 12:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ज्योतिष, धर्म, नीतिनियम, ईश्वर ह्यांची अनुमाने आधी समजून घ्यावी आणि मग प्रत्यक्ष प्रमाण हाती धरावे, असं वाटायला लागलं आहे.

नंदन's picture

23 Aug 2011 - 12:31 am | नंदन

ईर्शाद! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Aug 2011 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री अण्णांनी काळजी घ्यायला हवी ही गोष्ट खरीच आहे. आजूबाजूला या आंदोलनाच्या निमित्ताने सोबत कोण असतील आणि सर्व चारित्र्यवान आहेत का ? सध्या तपासणीची ही वेळ नाही असे वाटते. लेखनातील काही मुद्दे पटण्यासारखे असले तरी-

केजरीवाल, सिसोदिया, बेदी यांच्यावर शंका घेणारे तुम्ही काही एकटेच नाही. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या लोकांकडे बराच पैसा जमा झाला आहे आणि वरील मंडळींच्या मागे भविष्यात चौकशांचा ससेमिरा मागे लागला तर हे लोक जाळ्यात सापडतील अशा आवया काही कमी नाहीत. आणि उद्याचं काही सांगता येत नाही.

जनलोकपाल विधेयकाचा हट्ट म्हणजे भारतीय संविधानाला धक्का पोहचविण्याचा प्रकार आहे. संसदेचा अवमान आहे. उद्या राष्ट्रविघातक गोष्टींसाठी अशा उपोषणाचा मार्ग कोणी चो़खाळला तर वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टींचा प्रचार सुरुच आहे. आपल्याच महाराष्ट्रात श्री अण्णा हजारे आणि त्यांच्या आंदोलनांकडे अनेकदा संशयानं पाहिल्या गेलं आहे.

विद्वान मंडळी या आंदोलनाला स्वप्नाळू लोकांचं स्वप्नाळू आंदोलन म्हणून हिणवत असले तरी आपण बॉ सदरील आंदोलनाने भारावून गेलो आहोत.

असो,

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Aug 2011 - 5:48 pm | llपुण्याचे पेशवेll

विद्वान मंडळी या आंदोलनाला स्वप्नाळू लोकांचं स्वप्नाळू आंदोलन म्हणून हिणवत असले तरी आपण बॉ सदरील आंदोलनाने भारावून गेलो आहोत.
सहमत. जनता इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे हे आमच्या दृष्टीने महत्वाचे. गांधींप्रमाणे आण्णांनीही डोक्यावर काठ्या बसणार नाहीत आणि घरदार बुडणार नाही असा मार्ग सुचवल्याने जनाधार मोठ्या प्रमाणावर लाभला आहे.

गांधींप्रमाणे आण्णांनीही डोक्यावर काठ्या बसणार नाहीत आणि घरदार बुडणार नाही असा मार्ग सुचवल्याने जनाधार मोठ्या प्रमाणावर लाभला आहे.

परफेक्ट.

यू सेड इट..