✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुलगी का नको?

य
युयुत्सु यांनी
Tue, 08/16/2011 - 14:01  ·  लेख
लेख
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला. मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात. ० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो. ० मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन लोकांच्या दू:खाची नेमकी कारणे हीच आहेत. एकुलती एक मुले वाढवणे जसजसे अनिवार्य होणार तसे सध्याची समाजाची मानसिकता या समस्या जास्त गंभीर बनवणार. या दोनही समस्यांची "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार. टीप : ही जाहीरात नाही!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
50233 वाचन

💬 प्रतिसाद (171)

प्रतिक्रिया

कसला बदल?

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 04:55 नवीन
पण कधीपासून ते सांगता येईल काय? त्यापूर्वी परिस्थिती उलट नव्हतीच आणि मुलगे मुलींकडे जात नव्हते हे सिद्ध झाले आहे काय? पूर्वी बर्‍याच प्रदेशांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती असं ऐकलंय ते खोटं आहे का?
मी तरी भारतात परिस्थिती उलट असल्याबद्दल ऐकलेले नाही. तसे काही जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धती असल्याचे ऐकले आहे पण सरसकट तशी परिस्थिती असल्याचे ऐकलेले नाही. तुम्ही ठामपणे म्हणताय तर त्या बर्‍याच प्रदेशांची माहिती द्या बघू.
मुद्दा एवढाच आहे की हे ही एक चक्रच असू शकते. यात मुलीच्या किंवा मुलाच्या भ्रूणहत्येचे समर्थन करण्याचा हेतू नाही. आता चाललंय त्याच्या उलट निर्णय घेऊन चक्र उलट फिरण्याशिवाय काहीही होणार नाही. आज मुलांना म्हत्व आहे म्हणून स्त्रीभ्रूणहत्या होतात, उद्या मुलींना महत्व आले तर पुरुषभ्रूणहत्या होतील. म्हणून व्यवस्थेत वेगळा काहीतरी बदल हवा असे वाटते.
म्हणजे काय? चक्रात घालून फिरवल्याप्रमाणे शब्द वाटले. अर्थ काहीच कळला नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

माझा नृवंशशास्त्राचा अभ्यास

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 06:00 नवीन
माझा नृवंशशास्त्राचा अभ्यास नसल्याने आत्ता माहिती देऊ शकत नाही. मिळवून देईन. उर्वरित भाग कळला नाही त्याला मी काही करु शकत नाही. कसला बदल? : पैशाचं अतोनात महत्व कमी करु शकत नसल्यास विवाहाचं अतोनात महत्व कमी करणे, विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना व संततीला हीनत्व न देणे आणि योनिशुचितेच्या कल्पना बाद करणे असे काही बदल करता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना

धन्या
Wed, 08/17/2011 - 09:51 नवीन
विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना व संततीला हीनत्व न देणे आणि योनिशुचितेच्या कल्पना बाद करणे असे काही बदल करता येतील.
तुम्ही तर अगदी संस्कृतीच्या मुळावरच घाव घालायला उठलात राव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 09:54 नवीन
खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध झाला तर घाव घालावेच लागतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

संस्कृतीवर कुणी घाला घातला तर

धन्या
Wed, 08/17/2011 - 10:06 नवीन
संस्कृतीवर कुणी घाला घातला तर त्यांच्या घरांवर दगड मारायचीही संस्कृती आहे... जपून राहा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

याला इशारा म्हणायचं की धमकी?

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 11:35 नवीन
याला इशारा म्हणायचं की धमकी? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

केवळ वस्तुस्थितीची

सुधीर१३७
Wed, 08/17/2011 - 15:01 नवीन
केवळ वस्तुस्थितीची जाणीव........................ :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मिपावरच्या "चर्चा" कोणी किती

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 15:15 नवीन
मिपावरच्या "चर्चा" कोणी किती गंभीरपणे घेत असेल त्या वस्तुस्थितीचीही जाणीव आहे मला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७

विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना

आत्मशून्य
Wed, 08/17/2011 - 16:24 नवीन
विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना व संततीला हीनत्व न देणे आणि योनिशुचितेच्या कल्पना बाद करणे असे काही बदल करता येतील.
अभिनंदन वांझोट्या चर्चेपेक्षा एकदम मूळमूद्याला हात घातल्या बद्दल खरोखर अभिनंदन. पण लगेच केवळ एखादा असा विचार अभ्यासासाठी मांडणेही त्यावर मूक्त चर्चा/मंथन न करता तडक संस्कृती वोरोधी ठरवले जाइल असं वाटलच होतं. पण हे संस्कृती विरोधी ठरवणार्‍यांना एकच प्रश्न ? स्त्रियांना पूरूषांसमान मानणे हे तूमच्या संस्कृती विरोधी नाही काय ? पूरूषांनी कसेही बदफैली जगावे आणी स्त्रीने मात्र लग्न करूनच मग माता बनावे.. वा वा वा, छान उध्दार होणार अशा संस्कृती रक्षकांकडून स्त्रियांचा :(. एकदम समान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

यावरुन आठवले..

सहज
Wed, 08/17/2011 - 16:43 नवीन
समांतर अवांतर- समानतेच्या गफ्फात व्यसनी बाई चालेल का? जी कारणे पुरुष सर्रास दारु प्यायला देतात ती बायकोने दिली गेली व समाजाने स्वीकारली तर ती समानता म्हणायची का संस्कृती बुडाली म्हणून गळा काढायचा? दुवा फु बै फु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

हे म्हणजे

आत्मशून्य
Wed, 08/17/2011 - 17:49 नवीन
काकूला मिशा असत्या तर तिला काका म्हटले असते म्हणण्यासारखे झाले. असो, थोडा गोंधळ आहे आपल्या विधानात, तूम्ही संस्कृती बुडाली म्हणून गळा नक्कि केव्हां काढणार ? १) स्त्रि ने दारू पीली म्हणून ? की २) तीने गफ्फा मारताना पूरूषांची कारणे ढापली म्हणून ? का ३) ह्या गोश्टी समाजाने स्विकारल्या म्हणून ? बाकी प्रश्न क्लिअर झाला की संस्कृती रक्षक याचे उत्तर तूम्हाला नक्कि देतील ही अपेक्षा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

घाव घालणे

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 17:53 नवीन
संस्कृतीला मूळव्याध झाला तर घाव घालावेच लागतील.
संस्कृतीला मूळव्याध झाला आहे हे तुमचे वैयक्तिक मत आहे परंतु तसे मानून बघायला गेले तर जगातील प्रत्येक संस्कृती मूळव्याधीग्रस्त आहे असेच म्हणावे लागेल. ज्या देशांत योनिशुचिता, कुमारीमाता वगैरे प्रश्नांना प्रश्न मानले जात नाहीत त्यांच्याकडे वेगळ्या अडचणी आहेत. कोणतीही संस्कृती घाव घालून दोन तुकडे केल्याने सुधरत नसते तेव्हा संस्कृतीत बदल हवे असतील तर ते टप्प्या टप्प्याने, पायरी-पायरीने यायला हवेत असे वाटते. त्यातील पहिली पायरी, मुलांनी लग्न झाल्यावर शक्य असल्यास मुलीकडे राहायला जावं. (या विचाराने अनेक मिपाकर पुरुष का बरे गठळले ते कळले नाही. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अडचणी या असो की वेगळ्या,

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 20:13 नवीन
अडचणी या असो की वेगळ्या, जोपर्यंत योग्य ते बदल घडवण्याचे प्रयत्न होतात तो पर्यंत आशा असतेच. मुलीच्या घरी मुलाने जाऊन राहिल्याने हळूहळू मुलींचे महत्व वाढत जाईल हे खरेच, पण मग हळूहळू मुलींचे महत्व आजच्या मुलांएवढे होऊन फक्त अदलाबदल होऊन हा प्रश्न उलटा होऊन पुन्हा उद्भवणार नाही असे ठामपणे म्हणता येईल का? बायकोच्या घरी जाऊन राहायचे या कल्पनेने मिपाकर पुरुष गळाठले कारण स्वतःच्या घरात बायको इतका अधिकार आणि नियम गाजवते तर तिच्या घरी गेलो तर काय होईल याची कल्पना करून पाहिली असेल बहुतेकांनी. यावर एक छान कल्पनारंजक गोष्ट होईल खरी. जसा सालस गरीब बायकांना दुष्ट सासरच्यांचा त्रास असतो, माहेरी जाऊ दिले जात नाही, माहेरच्या कोणाला येऊ दिले जात नाही तसं सालस जावयांच्या बाबतीत व्हायला किती वर्षे लागतील असा अंदाज आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

असे कसे?

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 20:16 नवीन
हळूहळू मुलींचे महत्व आजच्या मुलांएवढे होऊन फक्त अदलाबदल होऊन हा प्रश्न उलटा होऊन पुन्हा उद्भवणार नाही असे ठामपणे म्हणता येईल का?
अदलाबदल होणे म्हणजे १००% असे थोडेच? जिथे गरज असेल तिथे मुलांनी मुलीकडे जावे, किंवा मुलींनी मुलांकडे. उलट त्यामुळे बॅलन्स येईल असे वाटते.
यावर एक छान कल्पनारंजक गोष्ट होईल खरी. जसा सालस गरीब बायकांना दुष्ट सासरच्यांचा त्रास असतो, माहेरी जाऊ दिले जात नाही, माहेरच्या कोणाला येऊ दिले जात नाही तसं सालस जावयांच्या बाबतीत व्हायला किती वर्षे लागतील असा अंदाज आहे?
कधी लिहिताय? वाचण्यास उत्सुक....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

>>जिथे गरज असेल तिथे मुलांनी

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 20:50 नवीन
>>जिथे गरज असेल तिथे मुलांनी मुलीकडे जावे, किंवा मुलींनी मुलांकडे. उलट त्यामुळे बॅलन्स येईल असे वाटते. हे पटले. कोणतीही रुढी करण्यापेक्षा परिस्थितीप्रमाणे लोकांना जगू देणे आपल्या समाजाला इतके अवघड का जाते कोण जाणे? एकत्र राहणार नाही अशी अट घालणे आणि ती मान्य करणे हे सध्याच्या काळात होते आहेच. कदाचित पुढच्या पिढीत तुम्ही म्हणता तसेही होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

पण तरीही कल्पनाविलासाच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/17/2011 - 21:09 नवीन
पण तरीही कल्पनाविलासाच्या बाबतीत प्रियालीशी सहमत. वेताळाला पुन्हा झाडावर चढवाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/18/2011 - 09:23 नवीन
खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध झाला तर घाव घालावेच लागतील. हा हा हा चालूद्या. तुमच्याकडे मूळव्याध झालीतर घाव घालतात का? आम्ही तर काही लोकांना कैलास जीवन लावताना पाहीले आहे. बाकी संकृती बदलण्याच्या गोष्टी करणारे अंमळ अपरीपक्व असतात असे आमचे वैयक्तीक मत आहे. बाकी चालूद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

परिपक्व म्हणजे मराठीत पिकलेले

नगरीनिरंजन
गुरुवार, 08/18/2011 - 09:31 नवीन
परिपक्व म्हणजे मराठीत पिकलेले ना हो? आम्ही अंमळ नाही तर अगदी १००% अपरिपक्व आहोत आणि बालीशही आहोत हे आम्हाला मान्य आहे आणि मरेपर्यंत आम्ही तसेच राहायचा प्रयत्न करणार आहोत. चालू आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

+१

पंगा
गुरुवार, 08/18/2011 - 17:57 नवीन
तुमच्याकडे मूळव्याध झालीतर घाव घालतात का? आम्ही तर काही लोकांना कैलास जीवन लावताना पाहीले आहे.
हो असेच काही उपाय करतात (कैलास जीवन, प्रिपरेशन एच वगैरे) असे ऐकले होते खरे. क्वचित्प्रसंगी शस्त्रक्रिया करावी लागते असेही ऐकले होते, पण शस्त्रक्रियेच्या निश्चित स्वरूपाविषयी कल्पना नव्हती. ती करून देऊन माझ्या सामान्यज्ञानात भर घातल्याबद्दल श्री. नगरीनिरंजन यांचे मनापासून आभार. शस्त्रक्रिया इतकी अघोरी आणि "मूलगामी" असेल याची कल्पना नव्हती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

>>शस्त्रक्रिया इतकी अघोरी आणि

नगरीनिरंजन
गुरुवार, 08/18/2011 - 18:48 नवीन
>>शस्त्रक्रिया इतकी अघोरी आणि "मूलगामी" असेल याची कल्पना नव्हती. शस्त्रक्रिया मूलगामी नसेल आणि मुळावर नुसतीच मलमपट्टी लावून ठेवली तर मूळ बरे होत नाही आणि पुनःपुन्हा वाढते. >>असो हो हो. असो. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/17/2011 - 05:15 नवीन
वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा आपल्या माणसात राहणे कुणीही पसंत करेल..
पटलं नाही. आर्थिक स्वावलंबन असल्यास आपल्या स्वतःच्याच घरात रहाणे हा मार्ग वृद्धांना आपलासा का वाटू नये? मुलांच्या (मुलाच्या अगर मुलीच्या) घरात रहाणे म्हणजे दुसर्‍याच्या घरात रहाणे, जिथे आपल्याला तडजोडी कराव्या लागणार. तसं करण्यापेक्षा स्वतःच्या घरात रहाणं श्रेयस्कर नाही का? मुलांना जन्म देण्याचं एक आणि/किंवा महत्त्वाचं कारण म्हातारपणी काळजी घ्यायला कोणी असावं असंही असतं का? (तसं असेल तर त्या मुला-मुलींसाठी मला "अरेरे" म्हणावंसं वाटलं.) अपत्यांच्या नोकरीची ठिकाणं आवडली नाहीत किंवा जीवनपद्धती पटली नाही किंवा माझं आयुष्य मला हवं तसं मी जगेन किंवा अपत्यांना तीन खोल्यापेक्षा मोठं घर परवडत नाही (जे तसंही लहान पडतं) म्हणून आपापल्या घरात आनंदात रहाणारे वृद्ध मी स्वतःच्या घरात आणि ओळखीतही पाहिलेले आहेत. मी स्वतः एकही वृद्धाश्रम पाहिलेला नाही, पण होस्टेलात जसं मुलं-मुली आनंदात रहातात आणि/किंवा रहायला शिकतात तसं वृद्धांच्या बाबतीत होत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

१००% सहमत. माझ्या नव्व्दीच्या

रेवती
Wed, 08/17/2011 - 06:12 नवीन
१००% सहमत. माझ्या नव्व्दीच्या घरातल्या (चुलत्) आजेसासूबाई त्यांच्या मुलाकडे किंवा मुलीकडे न राहता वृद्धाश्रमात राहतात आणि न चुकता अपत्यांच्या भेटत राहतात. त्यांना हे जेटयुगातले फाष्ट संसार मान्य नाहीत तसेच त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. त्यांना उगीच रिक्षाने फिरणेही पसंत नाही. त्यांच्या वृद्धाश्रमापासून सक्काळी लवकरची बस (कमी गर्दीची) पकडून मुलाबाळांना भेटायला जातात. सगळ्या समारंभांना वेळेत हजर असतात. मुलांची (आता नातवंडांचीही) आयटी जीवनपद्धती न आवडणे हे कारण आहे पण म्हणून उगीच रुसून बसल्या आहेत असे नाही. वृद्धाश्रमात डॉक्टरी तपासण्या होत असतात. शिवाय मुलांना वेळेवर स्वत: होवून स्पेशल तपासणीची आठवण करून देतात. "बघुया त्याला/ तिला आईच्या चेक अपची आठवण तरी आहे का?" असले प्रकार नाहीत म्हणून त्यांचं कौतुक वाटतच वाटतं. इतकच नाही तर माझ्या बाबांच्या मित्राचे दोन नातेवाईक (मुले हिरवी झाल्याने) इथल्या असिस्टेड निवासात राहतात. बाबांनी एवढ्यात त्यांना फोन केले तर ८४ आणि ८५ वर्षाचे ते बहिण भाऊ त्यांच्या वयाला साजेश्या आनंदात होते आणि विकांताला मुला/मुलीकडे जात होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्या आजेसासूबाई दाखवत

धन्या
Wed, 08/17/2011 - 10:00 नवीन
तुमच्या आजेसासूबाई दाखवत असलेला समजूतदारपणा जर सासवांनी दाखवला तर मुलींच्या बर्‍याचशा समस्या निकालात निघतील. म्हणजे अगदीच काही वृद्धाश्रमात जायला हवं अस काही नाही, पण रोजच्या आयुष्यात रुसवेफुगवे, मानसन्मान बाजूला ठेवलं, "आमच्या वेळी नव्हतं हो बाई असं काही" हे पालूपद बंद केलं तर कौटुंबिक स्वास्थ्य चांगलं राहण्यास नक्कीच मदत होईल.
मुले हिरवी झाल्याने
कल्पना छान आहे. उगाच आपलं देशस्थ, परदेशस्थ शब्द वापरुन वादाला तोंड देण्यापेक्षा त्या त्या देशाचा त्यांच्या चलनी नोटांच्या रंगांचा उल्लेख करायचा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मुले हिरवी झाल्याने ह्याचा

वपाडाव
Wed, 08/17/2011 - 17:22 नवीन
मुले हिरवी झाल्याने
ह्याचा अर्थ ग्रीन कार्ड होल्डर असा अहे हो वाक्डे !!!! चलनी नोटा तर भारतातही हिरव्याच आहेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

उप्स... गडबड झाली असं

धन्या
गुरुवार, 08/18/2011 - 10:16 नवीन
उप्स... गडबड झाली असं दिसतंय... तिकडे साता-समुद्रापार जाउनही ग्रीन कार्डच्या नादी न लागल्यामुळे या गोष्टीचा फार विचार केला नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

व्यक्ती तितक्या

शैलेन्द्र
Wed, 08/17/2011 - 10:10 नवीन
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, स्वता:चे छंद जपत मुरलेला वानप्रस्थ जगणारे जितके आहेत त्याहुन खचीतच जास्त मुला- नातवंडांच्या संसरात, "भरल्या गोकुळात" आनंद मानणारे आहेत. आपण जे कमावलं, जे मागे ठेवलं, ते आज आपला वंश उपभोगतोय हे पाहण्यात अतिव समाधान मानणारे सगळे जेष्ट नागरीक खेडवळ किंवा बुरसटलेल्या विचारांचे आहेत असं म्हणता येइल काय? माझ्या आईला देवदर्शनापेक्षा नातवाची शी साफ करण्यात जास्त आनंद मिळतो म्हणुन तिच काही चुकतं अस मला वाटत नाही, तसचं तिच्या मानसिकतेविरुद्ध तिला तथाकथीत अभिजात आवडींकडे ढकलणेही पटत नाही. आपल्या पालकांना एकटं ठेवण्याच्या विरुद्ध असलेला तरुण वर्ग आजही भारतात तरी बहुसंख्य आहे, तसच ही कल्पणाही सहन न होणारे जेष्टही बहुसंख्य आहेत. कितीही म्हटल तरी एकट राहण्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात, सगळ्यांचीच प्रक्रुती निकोप नसते. मानसीक आंदोलन, एकटेपणाचा त्रास, तुटलेपणाची भावना या सार्‍याचा सामना करावा लागतो. जे विदेशात चांगल वाटत ते भारतात तितक सोप नाही. मुळातच भारतिय माणुस हा जरा दाटीवाटीने राहणारा प्राणी आहे.. हे सगळ बघता शक्य असेल तेंव्हा बहुसंख्य मुलं आपल्या पालकांना आपल्याच बरोबर ठेवतात(व ठेवाव- वैयक्तीक मत) व पालकही तेच पसंत करतात.. राहता राहील, पालकांनी मुलांकडुन ही अपेक्षा करावी का? करु नये.. पण कुठेतरी असते हे कसं अमान्य करायचं? तसच जे आयुष्य/वेळ्/श्रम आपल्या पालकांनी आपल्याला दिले, त्यांच्यासाठी, जर आपल्या तारुण्यात काही तडजोडी कराव्या लागल्या तर त्या करण्यातही आनंद मानणारे सगळी जोडपी वेडी कालबाह्य ठरतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मी स्वतः एकही वृद्धाश्रम

युयुत्सु
Wed, 08/17/2011 - 15:48 नवीन
मी स्वतः एकही वृद्धाश्रम पाहिलेला नाही, पण होस्टेलात जसं मुलं-मुली आनंदात रहातात आणि/किंवा रहायला शिकतात तसं वृद्धांच्या बाबतीत होत नाही का?
साधी गोष्ट आहे. तारूण्य आणि वार्धक्य या दोन जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक गरजा वेग वेग ळ्या असू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चक्क सहमत

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 18:13 नवीन
तारूण्य आणि वार्धक्य या दोन जीवनाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, प्रत्येक वृद्ध व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक गरजा वेग वेग ळ्या असू शकतात.
युयुत्सुंशी चक्क सहमत आहे असे म्हणावे लागत आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

सहमत आहे. पण नुसता आर्थिक

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/18/2011 - 09:44 नवीन
सहमत आहे. पण नुसता आर्थिक स्वावलंबन हाच निकष नसतो त्यात. थोडेसे शारीरीक परावलंबित्व आले तर एका वृद्ध व्यक्तीचे दुसर्‍या वृद्ध व्यक्तीला करायला तितकेच झेपेल असे नाही. त्यात ती व्यक्ती जोडीदार गमावलेली असेल तर एकट्याने राहणे वृद्धापकाळी जीवावर येते. म्हणूनच कदाचित मुलाकडे जाणे वगैरे गोष्टी असाव्यात. वृद्ध झाल्यावर थोडेसे मानसिक आणि शारीरीक परावलंबित्व आल्यावर, मानसिक आधार असलेले , जवळीक असलेले कोणतरी बरोबर असावे असे वाटते म्हणून वृद्धाश्रमात किंवा होस्टेल मधे राहणे वृध्दांना तितकेसे जमत नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

"मुलीच्या आईवडिलांनी हक्काने

बद्दु
Wed, 08/17/2011 - 17:12 नवीन
"मुलीच्या आईवडिलांनी हक्काने मुलीकडे येऊन राहण्यापेक्षा जावयानेच लग्न झाल्यावर मुलीकडे राहायला जाणे योग्य होईल." हे वाक्य विचारपुर्वक लिहिले गेले असावे!! हो, कारण सध्याच्या परिस्थितीत ९०% पुरुष ( लग्न झालेले) हे नोकर्‍या करीत नसल्यामुळे ते सहजपणे आपल्या सासरी राहायला जाउ शकतील किंवा नोकरी असेल तर तिला ( म्हणजे नोकरीला) लाथ मारुन आपल्या सासरी जातील. ( तिथे घरी बसेल/ टवाळक्या करेल/ घरकाम करेल ..वगैरे वगैरे..) तोपर्यंत घरातील कर्ती-सवरती बायको नोकरी -व्यवसाय करेल; .... असो; तुम्ही सध्या सासरी की माहेरी ( अर्थात लग्न झालेले असेल तरच उत्तर द्या), आणि हो, तुमचा बेटर हाफ ( म्हणजे नवरा हो) कुठे मुक्कामाला असतात? ( त्यांच्या ) माहेरी कि सासरी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

थयथयाट कशाला?

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 17:20 नवीन
हे वाक्य विचारपुर्वक लिहिले गेले असावे!!
नक्कीच!
परिस्थितीत ९०% पुरुष ( लग्न झालेले) हे नोकर्‍या करीत नसल्यामुळे ते सहजपणे आपल्या सासरी राहायला जाउ शकतील किंवा नोकरी असेल तर तिला ( म्हणजे नोकरीला) लाथ मारुन आपल्या सासरी जातील. ( तिथे घरी बसेल/ टवाळक्या करेल/ घरकाम करेल ..वगैरे वगैरे..) तोपर्यंत घरातील कर्ती-सवरती बायको नोकरी -व्यवसाय करेल; ....
हे मात्र तुम्ही अजिबात विचार न करता लिहिले आहे. नोकरी करणे आणि सहजपणे सासरी राहायला जाणे यांचा परस्परसंबंध काय? आज अनेक बायका ज्या नोकरी करतात त्या सहजपणे आपल्या सासरी जातात पण आजही पुरुषांची ही मानसिकता नाही हे स्पष्ट दिसून येते. किंबहुना, वरील प्रतिसादातून प्रदर्शित झालेली मानसिकता स्त्रियांच्या विरोधी आहे हे स्पष्ट दिसून येते. नवर्‍याने घरकाम केले तर काहीही बिघडत नाही. उलट कंबर कसून घरकाम करायलाच हवे. घरी बसणारी बाई टवाळक्या करते असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आई/ बहिणीबद्दल किंवा बायकोबद्दल तुमचे विचार पाहून वाईट वाटले.
तुम्ही सध्या सासरी की माहेरी ( अर्थात लग्न झालेले असेल तरच उत्तर द्या), आणि हो, तुमचा बेटर हाफ ( म्हणजे नवरा हो) कुठे मुक्कामाला असतात? ( त्यांच्या ) माहेरी कि सासरी ?
मी माझ्या स्वतंत्र घरात राहते. त्याआधी जेव्हा परदेशातून देशात काही वर्षे होतो तेव्हा मुंबईत घर नसल्याने माझ्या आईवडिलांच्या घरी राहिलो आहोत. त्यात मला किंवा माझ्या नवर्‍याला शरम वाटत नाही पण तुम्ही अगदी वैयक्तिक उतरलात त्यावरून तुमची मानसिकता लक्षात आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बद्दु

"आज अनेक बायका ज्या नोकरी

बद्दु
Wed, 08/17/2011 - 17:52 नवीन
"आज अनेक बायका ज्या नोकरी करतात" किती टक्के बायका नोकरी करतात? आकडे द्या , मग बोलु या विषयावर. "नोकरी करणे आणि सहजपणे सासरी राहायला जाणे यांचा परस्परसंबंध काय?" सहजपणे सासरी राहायला जाणे हे नविनच ? "आजही पुरुषांची ही मानसिकता नाही " मानसिकतेचा प्रश्नच नाही. ... जास्त लिहिण्यात अर्थ नाही. "त्याआधी जेव्हा परदेशातून देशात काही वर्षे होतो तेव्हा मुंबईत घर नसल्याने माझ्या आईवडिलांच्या घरी राहिलो आहोत त्यात मला किंवा माझ्या नवर्‍याला शरम वाटत नाही पण तुम्ही अगदी वैयक्तिक उतरलात त्यावरून तुमची मानसिकता लक्षात आली" मुंबईत घर नसल्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे राहीला- हे तुम्ही स्वतः मान्य करता. त्यात शरम काय वाटायची? अशा परिस्थीतित "आईवडिलांकडे राहणे " हे त्यावरचे अत्यंत practical उत्तर होते. बाकी तुमच्या अगदी वैयक्तिक अशा बाबींमध्ये मला बिलकुल रस नाही, तुम्हाला असा भास झाला असल्यास तो तात्काळ दुर करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

टक्केवारी

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 17:59 नवीन
टक्केवारी द्यायला मी संख्याशास्त्री नाही. किंबहुना, तुम्हाला टक्केवारी हवी असेल तर तुम्ही काढा शोधून. अनेक स्त्रिया नोकरी करतात एवढे सत्य तुम्हाला का बरे नाही चालत? टक्केवारी मागणं वगैरे म्हणजे मुद्दे नाहीत म्हणून वाद घालणं आहे. गेली ५०पेक्षा अधिक वर्षे अनेक बायका नोकरी करत आहेत आणि त्यापैकी जवळपास सर्वच बायका नवर्‍याच्या घरी राहायला गेल्याचे दिसते. तुमच्याकडे त्यापेक्षा वेगळा डेटा असेल तर अवश्य सादर करा.
सहजपणे सासरी राहायला जाणे हे नविनच ?
सहजपणेच जातात. जात नसतील तर सिद्ध करा. बाकी सहजपणे हा शब्द तुमचाच आहे. :)
मानसिकतेचा प्रश्नच नाही. ... जास्त लिहिण्यात अर्थ नाही.
मानसिकता नाही हा तुमचा प्रतिसाद सिद्ध करत होता.
बाकी तुमच्या अगदी वैयक्तिक अशा बाबींमध्ये मला बिलकुल रस नाही, तुम्हाला असा भास झाला असल्यास तो तात्काळ दुर करावा.
जर रस नव्हता तर विषय काढलात कशाला? माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर उतरलात कशाला? बायका घरात बसून टवाळक्या करतात हे सांगायला? की आपण बायकोकडे राहायला गेलो तर पुरुषी इगो दुखावतो हे दाखवून द्यायला?
मुंबईत घर नसल्यामुळे तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे राहीला- हे तुम्ही स्वतः मान्य करता. त्यात शरम काय वाटायची? अशा परिस्थीतित "आईवडिलांकडे राहणे " हे त्यावरचे अत्यंत practical उत्तर होते.
धन्यवाद. माणसाने प्रॅक्टिकलच राहायला हवे. किंबहुना, एकुलती एक मुलगी असेल आणि तिच्या आईवडिलांकडे लग्नानंतर एखादा मुलगा राहायला गेला तर तोही अत्यंत प्रॅक्टिकल आणि योग्य विचार आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बद्दु

झकास सामना रंगला आहे

सही रे सई
गुरुवार, 08/18/2011 - 17:29 नवीन
मी प्रियालीशी पूर्ण सहमत. खरं तरं या विषयावर वेगळा धागा काढून चर्चा व्हायला पाहिजे. जावयाने गरजेप्रमाणे आपल्या सासूसासर्‍यांकडे जावून राहायला काहिच हरकत नाही. या कडे समाजाने जर वेगळ्या द्रुष्टीने पाहिले नाही तर मग मुलीच्या भ्रूणहत्येला थोडा तरी आळा बसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

कार्यकारणभाव?

पंगा
गुरुवार, 08/18/2011 - 17:41 नवीन
जावयाने गरजेप्रमाणे आपल्या सासूसासर्‍यांकडे राहण्याने (आणि समाजाने त्याकडे विचित्र नजरेने न पाहण्याने) मुलीच्या भ्रूणहत्येला आळा नेमका कसा बसेल ते कळले नाही. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई

आधार हेच मुख्य कारण

शाहिर
Tue, 08/16/2011 - 16:39 नवीन
आज च्या युगा मध्ये सुद्धा किति जन एकुलत्या एक मुलि च्या आइ वडिलांना कायमचे संभालायल तयार असतात ??
  • Log in or register to post comments

पुष्कळ लोक असतात. अगदी स्वतः

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/18/2011 - 09:59 नवीन
पुष्कळ लोक असतात. अगदी स्वतः च्या घरात सांभाळत नसले तरी त्यांना जवळचे घर बघून देणे दिवसातून एकदा जाऊन त्यांची विचारपूस करणे, काही मदत लागली तर करणे, त्यांच्या घरी काही धर्मकार्य करायचे असेल तर पूर्ण मदत करणे अशा गोष्टी करणार्‍या अनेक एकुलत्या एक मुली आणि त्यांचे पती मी पाहीले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

यूयूत्सू दादा, अत्यंत चांगला धागा काढलात.

आत्मशून्य
Tue, 08/16/2011 - 18:09 नवीन
अभिनंदन. अभिनंदन. अभिनंदन. असं त्रिवार अभिनंदन. टिपः- तूमच्या टिपांना फार महत्व देण्यापेक्षा मिपाकर्स धाग्याचा मजकूर काय आहे याचे अवलोकन करून अनूमान काढायला प्राधान्य देतात, असं निरीक्षण आहे
  • Log in or register to post comments

युयुत्सु, तुम्हालाही मुलगी

शिल्पा ब
Wed, 08/17/2011 - 05:17 नवीन
युयुत्सु, तुम्हालाही मुलगी आहे हे वाचून आनंद झाला. पण मग तरीही तुम्ही बायकांच्या विरुद्ध कसे काय हो? तुमचे आधीचे लेख(?) वगैरे वाचलेले असल्याने उगाचच एक प्रश्न मनात डोकावला इतकेच.
  • Log in or register to post comments

हाहाहा... त्यांचा राग

धन्या
Wed, 08/17/2011 - 10:03 नवीन
हाहाहा... त्यांचा राग त्यांच्या पिढीतल्या बायकांविरुद्ध असावा. त्यांच्या मुलींच्या पिढीविषयी त्यांची काही तक्रार नसावी ;) ह घे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

पण मग तरीही तुम्ही बायकांच्या

युयुत्सु
Wed, 08/17/2011 - 15:36 नवीन
पण मग तरीही तुम्ही बायकांच्या विरुद्ध कसे काय हो?
मी सरसकट स्त्री विरोधक नाही, हे आता तुम्हाला पटले असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

???

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 17:09 नवीन
मी सरसकट स्त्री विरोधक नाही, हे आता तुम्हाला पटले असेलच.
तुम्ही स्त्रियांच्या कुठल्या बाबींमध्ये सहमत आहात, कुठे त्यांना पाठिंबा देता हे तरी कळू दे. अन्यथा, तुम्ही सरसकट स्त्रियांचे विरोधक नाहीत हे कसे पटायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

मुलगी ही परक्यांच धन हा समज -

विजुभाऊ
Wed, 08/17/2011 - 08:06 नवीन
मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो. हे पटले नाही. आपली मुले( मुली/ मुलगे) हे आपले धन का समजावे? त्याना स्वतन्त्र व्यक्तीमत्व असते. एक स्वतन्त्र व्यक्ती म्हणून ती समाजात वावरत असतात.मुलाना वाढवण्याच्या खर्चाचा इतका विचार करावा लागत असेल तर तो खर्च करून नये. आपण मुलांवर( मुली/ मुलगे) जो खर्च करतो तो त्यानी आपल्याला त्याचा परतावा द्यावा म्हणून नव्हे तर मुलांनी ( मुली/ मुलगे) स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी. स्वतःची मुले स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहिलेली मुले( मुली/ मुलगे) पहाणे हा प्रत्येक आईबापासाठी अभिमानाचा, आनंदाचा विषय असतो. त्यातून परतावा मिळेलच हा विचार बांडगूळ आहे. आपण मुलाला वाढवले म्हणून त्याने म्हातारपणी आपल्याला आधार द्यावा. आपले ओझे मुलाने वहावे हा विचार करण्यापेक्षा आपण म्हातारपणीसुद्धा कोणावरच भार न होता रहाता येईल या पद्धतीने पैशाचे प्लॅनिंग करावे. त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही कोणत्या काळात वावरताय हो तुम्ही? नीट संबन्ध ठेवले तर जावई आणि मुलीदेखील आईबापाची तितकीच काळजी घेतात जितकी सुना आणि मुले घेतात ० मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते. हे लॉजीकच चुकीचे आहे. मुलगी तिचा स्वतःचा वंश देखील वाढवते. मुलीने एकुलते असणे हा तिचा दोश आहे का? आणि समजा एकुलती एक मुलगी असली तर आईबापाची प्रॉपर्टी तिने स्वतःसोबत नेली तर त्याबद्दल आक्षेप कशाला? समजा तिने ती प्रॉपर्टी स्वतःसोबत नेली नाही तर त्याचे काय होईल? दुसरा कोणीतरी उपटसुंभ त्याचा मालक बनेल. मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते युयुत्सुजी अगदी खरे बोलायचेच झाले तर तुम्ही अजूनही मध्ययुगीन मानसिकतेत वावरताय असेच म्हणावे लागेल. आपली मुलगी शिकुन मोठी होईल. तिच्या आवडीच्या क्षेत्रात ती यशस्वी करीयर करेल. समाजात मानावे वावरेल असा विचार करण्यापेक्षा. ती कोणाचीतरी सून होईल इतका तोकडा आणि काल् बाह्य विचार करून मुलीच्या मनात ( चूल अणि मूल) हीच प्रतिमा रुजवण्याचे काम आपणच करीत असतो मुलींबद्दलची समाजाची अशी आजारी मानसीकता घडवण्याचे काम ही विचारसरणीच करीत असते. समाजाची मानसिकता बदलायची असेल तर आपण आपल्या मुलीला योग्य शिक्षण देवुन तिला खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे तिचे व्यक्तीमत्व घडवणे हे प्रत्येक पालकाने केले पाहिजे.
  • Log in or register to post comments

या धाग्यावरचे काही प्रतिसाद

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 08/17/2011 - 11:03 नवीन
या धाग्यावरचे काही प्रतिसाद "Shooting the messenger" प्रकारचे वाटताहेत. युयुत्सुंनी वर दिलेली मते त्यांची असतील असे गृहीत धरण्याचे कारण नाही. त्यांनी समाजात काय दृष्टीकोन आहे ते लिहिले आहे. त्यांना ती मते पटतात असे निदान या धाग्यात तरी म्हटले नाही. असे असताना त्यांच्यावर टीका करण्यात काय हशील आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मुलगी म्हणजे फक्त लग्न करून

विजुभाऊ
Wed, 08/17/2011 - 11:21 नवीन
मुलगी म्हणजे फक्त लग्न करून सासरी जाणार यातच तिची इतीकर्तव्यता या विचारसरणी बद्दल वाईट वाटते. ही विचारसरणी सोडून मुलीना पालकानी भक्कम पाठिंबा दिला तर मुली कर्तृत्ववान होऊन आईबापाना आधार होऊ शकतील. मुलगी म्हणजे ओझे हा विचार आपल्या समाजाने सोडून द्यायला हवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

बेकायदा गर्भलिंगनिदान

गणा मास्तर
Wed, 08/17/2011 - 08:31 नवीन
ह्या मुलगी नको असणारर्‍यांना बेकायदा गर्भलिंगनिदान करणार्‍यांची साथ मिळते. खरेतर त्यामुळे हा प्रश्न आणखी बिकट होत चालला आहे. गर्भलिंग निदान टाळण्यासाठी काय करता येइल. गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

गर्भलिंग निदान टाळण्यासाठी

धन्या
Wed, 08/17/2011 - 10:13 नवीन
गर्भलिंग निदान टाळण्यासाठी काय करता येइल.
गर्भपाताचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने बर्‍याचशा गर्भलिंगनिदान करणार्‍या इस्पितळांना टाळे ठोकले आहेत अशी ऐकीव माहिती आहे. हेच आपल्याला करता येईल. जर आपल्या लक्षात आलं की एखादया इस्पितळात गर्भलिंगनिदान चाचणी केली जाते तर त्याविरुद्ध आवाज उठवायचा. आपल्याला नाहीच जमलं तर एखादा मोठा झिंदाबाद-मुर्दाबादवाला पकडायचा. त्याला व्यवस्थित समजावून सांगायचं. अगदी समाजाचं भलं व्हावं म्हणून नाही केलं तरी त्याला चमकायला मिळतंय म्हणून तो पुढचं सारं नक्की करेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर

सरसकट गर्भलिंग निदान कशाला

पक्या
Wed, 08/17/2011 - 14:16 नवीन
सरसकट गर्भलिंग निदान कशाला टाळायला हवे? एखाद्याला माहित करुन हवे असेल की त्याला मुलगा होणार की मुलगी तर तसे त्याला माहित करुन घेता यायला हवे. गर्भलिंग निदान साधारण ५ व्या महिन्यानंतर केल्यास त्यास हरकत नसावी., कारण त्या महिन्यानंतर गर्भ वाढीला लागलेला असतो आणि त्यावेळी शक्यतो गर्भपात करता येत नाहि / केला जात नाही. स्रर्वसाधारणपणे ३ र्‍या महिन्यापर्यंत गर्भपात केला जातो त्यामुळे त्या ठराविक काळापर्यंत गर्भलिंग निदान केले जाऊ नये. नंतर ५ व्या महिन्यानंतर केल्यास त्यास काहि हरकत नसावी असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

साहेब, रोगापेक्षा औषध वाईट

शैलेन्द्र
Wed, 08/17/2011 - 14:27 नवीन
साहेब, रोगापेक्षा औषध वाईट होइल हे.. पाचव्याच काय, अगदी सहाव्या/ सातव्या महीन्यातही गर्भपात्/अर्भक काढुन टाकणे शक्य आहे. यात आईच्या जीवालाही धोका संभवतो, कारण असं करण्याचा प्रयत्न करणारे, डॉक्टर कडे जास्त पैसे लागतील म्हणुन स्थानीक पातळीवरच, घरगुती उपायाने हे करायचा प्रयत्न करतील.. काही गोष्टींची हुरहुरच चांगली असते हो.. कशाला सगळ जाणुन घ्यायच?..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

आईच्या जीवाला धोका असतो

पक्या
Wed, 08/17/2011 - 14:32 नवीन
आईच्या जीवाला धोका असतो म्हणूनच ५ व्या महिन्यानंतर तसे कुणी करत नाही. अगदि घरगुती उपाय पण नाहि कुणी करत . पुर्वी जेव्हा बर्थ कंट्रोल ची साधने नव्हती त्यावेळी बिब्बा खाणे वगैरे प्रकार बायका करत असत. पण हल्ली असे काही होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा