काश्मिरी पुलाव ..
काश्मिरी पुलाव :
हा माझा आवडता प्रकार आहे बर्याच दिवसापासून विचार करत होते कि ,एकदा वीकेण्ड्ला बनवावा ,पण साहित्याची जमवाजमव होत नव्हती.
गाजर आहे तर अननस नाही , अननस आहे तर सफरचंद नाही ,हिरवे मटार आहेत तर काजुबदाम संपलेले !
शेवटी या विकेंडला ठरवलंच सर्व साहित्य जमा करायचं आणी पुलाव बनवायचाच !
योगायोग बघा ,घरातले सर्वजण साखरपुड्याला बाहेर गेलेले ,घरात फक्त मी आणि आज्जी .
म्हटलं चला आज श्री गणेशा करूनच टाकूया .
एरवी किचनमध्ये माझी लुडबुड चालू असते तेव्हा " झाले हिचे उपद्व्याप सुरु ,,"हिला काय अवार्ड-बिवार्ड मिळणार आहे का? "उगा का संजीव कपूरच्या पोटावर पाय " असेच टोमणे ऐकायला मिळतात पण आज कुणी नव्हत टोमणे मारायला ;)
असो ..
चला मग लागा तयारीला .....
साहित्य :
२ कप बासमती तांदूळ (लांब शीत असणारा )
२ कप दुध
१ कप मलई
१ चमचा साखर ,मीठ चवीनुसार
जीर अर्धा चमचा
लवंग ३-४ ,
दालचिनी १-२ तुकडे ,
हिरवी इलायची ४-५
१ तेज पत्ता ( तमाल पत्र )
२ चमचे तूप
मनुके २ चमचे
गाजराचे काप अर्धी वाटी
हिरवा मटार ३ चमचे ,
बिन्स २ चमचे
मक्याचे दाने उकडलेले १ चमचा (ऑप्शनल)
अननसाचे तुकडे अर्धी वाटी (तुम्हाला जी फळे आवड्तात त्या नुसार)
काजू ,बदाम आवडीनुसार हवे तेवढे
सुके काळे मनुके २ चमचे
केसर चुटकी भर
कृती :
बासमती तांदूळ स्वच्छ धुवून १५ - २० मिनिट ड्रेन करा
दुध ,मलाई ,साखर ,केसर यांचे मिश्रण करून घ्या .
एका नॉनस्टिक पॅनमध्ये /कुकरमध्ये मध्ये २ चमचे तूप गरम करा
त्यात जीरा ,दालचिनी ,लवंग ,तेजपत्ता याचा तडका द्या
आता यात धुतलेले तांदूळ ३-4 मिनिट हळुवार परतून घ्या
चवीनुसार मीठ घाला
आता यात मिश्रित दुध घालून पॅनवर झाकण ठेवा
तांदळाची शीत अखंड राहावी या करिता त्याला एकदाच व्यवस्थित हलवून घ्या.
तांदूळ अर्धा शिजला कि , त्यात गाजराचे काप,बिन्स ,सुके मनुके ,अननसाचे काप ,काळे मनुके ,तळुन घेतलेले काजु घाला.
(फळे शिजायला जास्ती वेळ लागत नाही म्हणून ,तांदूळ अर्धा शिजल्यावर फळे घालावीत ,नाहीतर फळांचा लगदा होईल )
हा पुलाव चवीला गोडसर आणि यम्मी लागतो :)
(तुम्ही यात तुमची आवडती फळे पण घालू शकता संत्र ,सफरचंद ,अननस ,काळी द्राक्ष इत्यादी )

वाचन
13103
प्रतिक्रिया
0