जियो मुंबै आणि एका देवमाणसाचा हस्तस्पर्श..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
14 Jul 2011 - 12:03 pm

काल संध्याकाळीच मुंबैतील स्फोटांच्या बातम्या विविध वाहिन्यांवरून पाहिला मिळाल्या. निरपराध नागरिकांवरील अमानुष हल्ल्यामुळे मन सुन्न झाले. २६/११ च्या आठवणी जाग्या झाल्या.

२६/११ च्या वेळी रात्री उशिरा जशी रक्तदानाकरता धावपळ केली होती तेच विचार पुन्हा एकदा मनात घोळू लागले. झाल्या प्रकारात आपण काय करू शकतो तर ते इतकंच की रक्तदानाकरता थोडीशी धावपळ. अस्वस्थ मनाने दादर विभागातल्याच ४-५ ओळखिच्यांना, मित्रांना फोन केले आणि आम्ही एकूण ३ मंडळी रात्री ९ च्या सुमारास जे जे ला पोहोचलो.

पोटात खड्डा पडावा, तुटावं अशी तेथील काही दृष्य बघितली. जखमींकडे बघवत नव्हते. पोलिस, डॉक्टर्स, परिचारिका यांची धावपळ सुरू होती. आम्ही प्रवेशद्वारातून आत पोहोचलो. आजूबाजूला गर्दी तर बरीच होती. रक्तदानाबाबत कुणाला विचारावं, रक्त कुठे घेत आहेत हा विचार सुरू असतानाच माझ्या पाठमोर्‍या एका खोलीतून जे जे चा काही कर्मचारी वर्ग बाहेर आला. मागून माझ्या खांद्यावर हलकेच एक हात पडला आणि गर्दीतून वाट काढत असताना माझ्या खांद्यावर हात ठेऊन ती व्यक्ति मला म्हणत होती..

"जरा वाट द्या प्लीज. जाऊ द्या प्लीज.."

मी त्या व्यक्तिकडे बघितलं आणि त्या प्रसंगात, त्या गर्देतदेखील मला क्षणभर भरून आलं. माझ्या खांद्यावर हात ठेवत वाट काढू पाहणारी ती व्यक्ति होती डॉ तात्याराव लहाने..! ते सध्या जेजे रुग्णालयाचे डीन आहेत.

"कृपया नातेवाईकांनी काळजी करू नये. येथे दाखल झालेल्या व्यक्ति या आमच्या भाऊबहिण आहेत याच भावनेने आम्ही सर्व ते उपचार करत आहोत. आमच्याकडून कसलिही कसूर होणार नाही.."

डॉ तात्याराव लहाने गर्दीला उद्देशून सांगत होते...!

किती मृदु परंतु आश्वासक स्वर! किती विनम्रपणा! किती साधेपणा..! आजपावेतो अक्षरश: हजारो डोळ्यांना प्रकाश दाखवणारा तो देवमाणूस..! भला माणूस, लाख माणूस..!

खरं तर एकदा मिपावर त्यांचं व्यक्तिचित्र/व्यक्तिमत्वचित्र या बद्दल एखादा विस्तृत मुलाखतवजा लेख लिहायचा असं डोक्यात होतंच परंतु काल असं अचानक त्यांचं क्षणिक दर्शन झालं, हजारोंना दृष्टी देणारा त्यांचा हात माझ्या खांद्यावर पडला आणि धन्य झालो. देवाघरचाच हात तो..!

त्यानंतर रक्तदानाकरता माहिती मिळाली आणि आम्हाला ..'तूर्तास जरूर नाही, तरीही वाटल्यास बाहेरच्या व्हरांड्यात थांबा..' असं सांगण्यात आलं. बाहेर येऊन पाहतो तर जवळ जवळ दीड-दोनशे माणसं आधीच तेथे रक्तदान करण्याकरता आली होती. अगदी स्वखुशीने, कुणीही न बोलावता, कुणीही कसलंही आवाहन न करता..!

पाऊस जोरावर होता. मुख्य व्हरांड्यात रुग्णवाहिकांमधून जखमींना दाखल करणारे अनेक सामान्य मुंबैकर आणि रक्तदानाकरता जमलेलेही सामान्य मुंबैकर..!

कालच्या घटनेत सामान्य परंतु धीरोदात्त मुंबैकराने पावसापाण्यात केलेली धावपळ बघितली, अनुभवली. आणि म्हणूनच आम्हाला अभिमान आहे मुंबै नामक या आमच्या अजब-गजब नगरीचा..! म्हणूनच आमचं विलक्षण प्रेम आहे आमच्या मुंबापुरीवर..! जियो मुंबै..!

कालच्या मुंबै हल्ल्यात शहीद झालेल्यांना विनम्र आदरांजली आणि जखमींना लौकरात लौकर आराम मिळो, हीव आई मुंबादेवीपाशी प्रार्थना..!

-- तात्या अभ्यंकर.

औषधोपचारसमाजजीवनमानविचारबातमीअनुभवप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

14 Jul 2011 - 12:15 pm | नन्दादीप

_/\_...

त्या सर्व मुंबईकरांसाठी.... आणि डॉ. तात्यांसाठी सुद्धा......

मूकवाचक's picture

14 Jul 2011 - 7:25 pm | मूकवाचक

_/\_

किती सुंदर लिहीलंय..

उगीच चडफड किंवा आत्मताडन करण्यापेक्षा आपल्या शक्य कोटीतला सर्वात चांगला मार्ग शोधून तुम्ही तिथे रक्तदानाला पोहोचलात.

याचा प्रसाद म्हणून तुम्हाला तो देवमाणूस आणि अशीच शेकडो देवमाणसं तिथे दिसली..

ग्रेट..

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jul 2011 - 12:26 pm | परिकथेतील राजकुमार

अशा देवमाणसांना मानाचा मुजरा.

टुकुल's picture

16 Jul 2011 - 3:28 am | टुकुल

अश्या माणसांबद्दल ऐकल कि खुप बर वाटत आणि त्याच वेळी स्वःताच्या निष्क्रियेतेचा पण राग येतो...

--टुकुल

गणपा's picture

14 Jul 2011 - 1:11 pm | गणपा

उगीच चडफड किंवा आत्मताडन करण्यापेक्षा आपल्या शक्य कोटीतला सर्वात चांगला मार्ग शोधून तुम्ही तिथे रक्तदानाला पोहोचलात.

किति साध्या पण प्रभावी शब्दांत भावना मांडल्यात तात्या.
पण मुंबईकरांच्या ह्याच स्पिरिट बद्दल जेव्हा मिडियावाले गळे काडुन ओरडत असतात तेव्हा त्यांची चीडच जास्त येते.

सर्व जखमींना लवकरात लवकर आराम पडो.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jul 2011 - 12:34 pm | बिपिन कार्यकर्ते

आमेन!

प्यारे१'s picture

14 Jul 2011 - 12:52 pm | प्यारे१

>>>>कालच्या घटनेत सामान्य परंतु धीरोदात्त मुंबैकराने पावसापाण्यात केलेली धावपळ बघितली, अनुभवली. आणि म्हणूनच आम्हाला अभिमान आहे मुंबै नामक या आमच्या अजब-गजब नगरीचा..! म्हणूनच आमचं विलक्षण प्रेम आहे आमच्या मुंबापुरीवर..! जियो मुंबै..!

सामान्य मुंबईकर आपल्या 'स्पिरीट' मुळे सगळ्याच आपत्तींमध्ये मदतीचा हात पुढे करत असतो. संकट हे 'संकट' असेल तर समजू शकतो. २६ जुलै चा पाऊस एकवेळ मान्य.
इथे असे नाही. त्यामुळेच वाईट वाटते की, नैसर्गिक संकटांप्रमाणेच या 'हैवानी/ अमानुष प्रकाराबद्दलच्या' प्रतिक्रिया आहेत. यामध्ये चीड निर्माण होण्यापेक्षा जास्त जाणवते ती हतबलता.
आपल्यावर अशा प्रकारचा/चे दहशतवादी हल्ले ठराविक काळाने नियमितपणे होणार आहे/आहेत याची जणू जाणीवच मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे अथवा आपल्या राज्यकर्त्यांच्या कृपेमुळे निर्माण केली गेली आहे आणि या जाणीवेला अशा हतबलतेमुळे मूक समर्थन मुंबईकर आपल्या वागण्यातून अलिकडच्या काळात देत आला आहे. जे सगळ्यात जास्त वाईट आहे.

आज मुंबईत 'पाऊस पडतोय' म्हणून बरेच जण कामावर नाहीत गेलेले. पण असं नाही ऐकायला मिळत की कालच्या स्फोटाची प्रतिक्रिया म्हणून काही तरी झालंय. षंढ झालो आहोत आपण. बस्स्स्स्स. हेच वास्तव आहे. बाकीची कौतुकं करावीत ज्याला करायचीत त्यानं.

>>>>कालच्या मुंबै हल्ल्यात शहीद झालेल्यांना विनम्र आदरांजली आणि जखमींना लौकरात लौकर आराम मिळो, हीव आई मुंबादेवीपाशी प्रार्थना..!

शहीद या शब्दाला तीव्र आक्षेप. आदरांजली आहेच. इथे तथाकथित शहीद होणार्‍या व्यक्तिलाच जर माहिती नसेल की त्याने का बलिदान दिले तर का म्हणायचं शहीद? काही विशिष्ट ध्येय उरी बाळगून त्यासाठी काम करताना मरणारी व्यक्ती म्हणजे शहीद.

कीडामुंगीच्या मौतीनं मेलेले हे आपलेच लोक आपल्या अकार्यक्षमतेचे बळी आहेत. कधी स्वीकारणार वस्तुस्थिती आपण????

एस एम एस येतोय 'बी ए रिबेल', खूप झालं, पेटून उठा. अरे म्हणजे नेमकं काय याचं उत्तर आहे का आपल्याकडं?

( ११ जुलै २००६ ला झालेल्या रेल्वे स्फोटांवेळी मी के ई एम च्या जवळ काम करत होतो आणि जवळपास सारखीच परिस्थिती के ई एम मध्ये ही होती. हतबलता रक्तात उतरली आहे आपल्या.)

गवि's picture

14 Jul 2011 - 12:56 pm | गवि

षंढ हा शब्द सगळीकडे मुक्तमुखाने येतो आहे आज.

आपण षंढ, राज्यकर्ते षंढ..

त्यातल्यात्यात आपण सामान्य नागरिकही षंढच..

नेमकं काय आहे हे षंढत्व.. ? "जागे न होणं", "एकत्र न येणं", "जाब न विचारणं" म्हणजे नेमकं काय? पैकी कोणत्या गोष्टींनी षंढत्व हा गुण सिद्ध होतो. ते न होण्यासाठी नेमकं काय करावं? (उठणे, जागे होणे, जागृत होणे, मतदान करणे वगैरे सोडून ठोस काही..?!?!?) तुम्हालाच नव्हे, एकूणच हा प्रश्न पडलाय म्हणून विचारला.

आत्मशून्य's picture

14 Jul 2011 - 1:13 pm | आत्मशून्य

बाकी हजारेंनी सरकारला जाब विचारायचा चांगला मार्ग शोधला आहे. असेच एखादे व्यापक पण निशस्त्र आंदोलन दहशतवादा विरूध्दा कारवाइ करायला भाग पाडण्यासाठी झाले तर सर्व पक्षांना अक्कल यावी अशी आशा आहे.

कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांवर जनतेची क्रूतीशीलतेमधे न ऊतरणारी व म्हणूनच सरकारला अस्तीत्व न जाणवणारी एकजूट म्हणजे षंढपणा होय.

प्यारे१'s picture

14 Jul 2011 - 1:21 pm | प्यारे१

नेमकं काय करायचं आणि मुख्यत्वे जे करायचं ते कोण करणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात आहे आणि त्याबाबत गोंधळ जास्त आहे.

इजिप्त, लिबिया ची पुनरावृत्ती होण्याची काही चिन्हे असू शकतील? निर्नायकी जनतेने घडवलेले उठाव जास्त काळ यशस्वी होऊ शकत नाहीत, शकणार नाहीत. तथाकथित लोकशाहीमध्ये आपल्याकडे असलेले सणवार, उत्सव, साखळी उपोषणं, मोर्चे, विविध राजकिय पक्षाच्या निरनिराल्या भूमिका असे 'प्रेशर रिलिफ वॉल्व्हस' जनता एकवटण्याच्या शक्यता कमी करतात.

आंदोलन हे कृती करायला भाग पाडण्यासाठी असावं, आणी ते आंदोलनच असाव कारण ते घटनेच्या चौकीटत असतच पण जनतेच्या अपेक्षांची समज सर्वपक्षांना देतं.

कोण करणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात आहे आणि त्याबाबत गोंधळ जास्त आहे.

होय कोण करणार याचाच सोक्षमोक्ष लावयला आंदोलन घडलं पाहीजे. सर्वांनी स्वेछ्चेने रस्त्यावर आलं पाहीजे हा ऊठाव न्हवे की एखाद्याचे नेतृत्व आवश्यक आहे. भारताने विश्वकप जिंकल्यावर झालेल्या जल्लोशाचे नेतृत्व कोण करत होते काय ? तसही मला वाटत नाही भारत धगधगता व अस्थीर असणे चीन सोडला तर आणखी कोणाला आवडेल व परवडेल.

प्यारे१'s picture

14 Jul 2011 - 2:32 pm | प्यारे१

चित्रपट/सामना पहायला आलेला प्रेक्षक एखादा फटाका फुटला तरी सैरावैरा धावू शकतो. जल्लोष करणं वेगळं आणि तू म्हणतो तसं आंदोलन करणं वेगळं. आंदोलनाची दिशा ठरवणं आवश्यकच आणि ती ठरवणारा कोणीही एक नायक असू शकतो.

नुकत्याच 'हाती आलेल्या बातमी'नुसार भारताचे जवळजवळ पंतप्रधान आणि काँग्रेस महासचिव मा. राहुल गांधी हे ' देशात असे दहशतवादी हल्ले होतच राहणार' थोडक्यात 'नो बिग डील' असे म्हणाले आहेत. मतमतांतरे असू शकतात. हे उदाहरण द्यायचं कारण म्हणजे सरकार चालवणार्‍या प्रमुख पक्षाचे ते जबाबदार नेते आहेत.

त्यामुळे फक्त ह्याच नाही तर इतरही घटनांमधून सरकार आपले आहे असे वाटणारी एकही कृती या सरकारकडून होताना दिसत नसेल तर निव्वळ आंदोलन करुन काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. दुर्दैव आहे पण उठावच आवश्यक वाटू लागला आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2011 - 1:37 pm | अत्रुप्त आत्मा

+१ प्यारेंशी सहमत

नि३सोलपुरकर's picture

14 Jul 2011 - 1:12 pm | नि३सोलपुरकर

वरील लेख वाचुन प्रतिक्रिया देण्यास कळ्फलक बडविणार इतक्यात, प्यारे१ ची प्रतिक्रिया वाचली आणी खरो़खर निरुत्तर झालो.

प्यारे१ शी सहमत,
आणि जखमींना लौकरात लौकर आराम मिळो, हीच देवापाशी प्रार्थना..!

श्रीयुत संतोष जोशी's picture

14 Jul 2011 - 1:06 pm | श्रीयुत संतोष जोशी

ह्या राजकारणी लोकांबद्दल काही बोलायला शब्द नाहीत. देवाचे आभार की त्याने आपल्याला एक मधलं बोट दिलय भावना व्यक्त करायला.

किसन शिंदे's picture

14 Jul 2011 - 1:32 pm | किसन शिंदे

श्रीयुत संतोष जोशीजी त्या मधल्या बोटाचा उपयोग करुन भावना व्यक्त करता येतात खरया परंतू नोटेपुढे बोटाचे काही चालत नाही हेच खरे सत्य.

पडली हाती नोट, लागले घसराया बोट ;)

अश्या प्रसंगी येथे नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नाही ..

तरीही तुम्ही आणि इतर माणसांनी जी मनापासुन मदत केली त्याबद्दल खरेच खुप बोलावे तेव्हडे थोडे आहे.
मुंबई ही असीच आहे.. कायम हेल्पफुल ..

कच्ची कैरी's picture

14 Jul 2011 - 2:44 pm | कच्ची कैरी

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांची बातमी एकुन तर मन एकदम सुन्न झाले पन विसोबा तुम्ही जखमींची मदत करण्यासाठी पुढे सरसावलात हे वाचुन खूप चांगले वाटले ,बाकी काय लिहावे सुचतच नाहीये कारन आधीच्या प्रतिसादांनीच विचार चक्रे जोरजोरात फिरायला लागली आहेत .शेवटी जखमी लोकं लवकरात लवकर ठीक व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

विसोबा खेचर's picture

15 Jul 2011 - 10:46 am | विसोबा खेचर

@..प्यारे१

इथे तथाकथित शहीद होणार्‍या व्यक्तिलाच जर माहिती नसेल की त्याने का बलिदान दिले तर का म्हणायचं शहीद?

कारण परवाचा हल्ला हा परकीय शक्तींनी देशावार केलेला हल्ला होता आणि देशावरच्या हल्ल्यात जे जे सैनिक आणि अगदी सामान्य नागरीकही मृत्युमुखी पडतात ते सारे माझ्या मते शहीदच होतात. तरीही आपल्या मताचा आदर आहेच..

असो.

तात्या.