विक्रम आणि वेताळः अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि समभाव
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा चालत ज्या झाडावर ते प्रेत लटकत होते तिथे तो गेला आणि झाडावरून प्रेत काढून ते खांद्यावर घेत तो चालू लागला. दहा-बारा पावले चालला नसेल तोच प्रेतात बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून निग्रहाने विक्रम चालत राहिला. कसंबसं आपलं हसू आवरत वेताळ विक्रमाला म्हणाला, "विक्रमा, मला तुझं अत्यंतिक कौतुक वाटतं. ज्याचा आपल्याला यत्किंचितही फायदा नाही अशा गोष्टीत उठाठेव करण्याचा तुझा हा दुर्दम्य उत्साह खरोखरच कौतुकास पात्र आहे. आणि याचे कौतुक म्हणून तुला त्याबद्दल काहीतरी पारितोषिकही दिलेच पाहिजे. दुसरे काही नाही तर किमान तुझा श्रमभार हलका करण्यासाठी मी तुला अशाच उठाठेवी करणार्या एका समाजविशेषाची गोष्ट सांगतो. नीट कान देऊन ऐक."
विक्रमाने काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
वेताळ गोष्ट सांगू लागला,
"सुजल सुफल म्हणवणारा एक देश होता. या देशात अनेक जातिधर्मपंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात असं म्हणण्याची पद्धत होती. खरं म्हणजे ते तसे राहातही होते पण त्या देशावर असलेल्या परकीय शक्तीच्या सत्ताकाळात दोन धर्मांमध्ये तेढ वाढवण्याचे काम परकीय राजसत्तेने मोठ्या कुशलतेने केले. त्यातला एक धर्म होता, त्या देशात अल्पसंख्येने असलेल्या लोकांचा अल्पसंख्य धर्म. त्याला आपण सोयीसाठी 'म' धर्म म्हणूया, आणि दुसरा होता त्या देशात बहुसंख्येने असलेल्या लोकांचा 'ब' धर्म. ब धर्म अत्यंत प्राचीन होता आणि त्याचे असे काही कडक नियम सद्यस्थितीत उरले नव्हते. या उलट म धर्माचे आपल्या अनुयायांसाठी अतिशय कठोर आचरणाचे नियम होते आणि ते नियम मोडल्यास अथवा धर्मचिन्हांचा अवमान होतोय असे वाटल्यास मृत्युदंडाचेही शासन करण्यास मागेपुढे पाहिले जात नसे. त्या धर्माच्या धर्मगुरुंचा लोकांवर असलेला वचक आणि नियंत्रण पाहून राज्यकर्तेही त्यांच्या विरोधात निर्णय घेण्यास कचरत असत आणि त्या देशात गणराज्य आल्यावर देशी राज्यकर्त्यांनी परकीय राज्यकर्त्यांचीच बहुतांश धोरणे पुढे राबवणे पसंत केले. का ते तुझ्यासारख्या राजनीतीच्या सूक्ष्म जाणकारास सांगण्याची गरज नाही.
म धर्माचे लोक त्या देशात अल्पसंख्य असले तरी जगात मात्र बर्याच संख्येने होते आणि बाहेरच्या काही देशांमध्ये म धर्माच्या तरुणांना धर्मयुद्ध करण्यासाठी त्याच धर्मातील काही लोकांकडून त्यांच्या फायद्यासाठी पद्धतशीरपणे भडकावले जात होते. अशा काही तरुणांनी भडकून जाऊन बराच रक्तपातही घडवला होता आणि त्या धर्मातल्या बहुसंख्य चांगल्या लोकांना अतिशय वाईट वाटेल असे वर्तन केले होते.
अशा परिस्थितीत त्या सुजल-सुफल देशातल्या आटपाट नगरीत एक तरुण आंतरजालावर एक संस्थळ चालवत असे. त्या देशातल्या तुझ्यासारख्याच स्वभावाच्या समाजविशेषाच्या भाषेत ते संस्थळ होते आणि त्या संस्थळाचे सभासद त्या देशाच्या समाजरचने प्रमाणेच बहुसंख्य ब धर्माचे आणि काही म धर्माचे होते. त्या देशात राहणारेच काय पण त्या देशात जन्मून परदेशात स्थायिक झालेलेही त्या संस्थळाचे सभासद होते. अशा या संस्थळावर अशा या परिस्थितीत एक विचित्र घटना घडली.
एका अज्ञात तरुणाने एके दिवशी त्या संस्थळाच्या कलादालनात एक चित्र चढवले. म धर्मातल्या परिस्थितीने उद्विग्न होऊन ते चित्र काढले असणार आणि तो तरुणही कदाचित म धर्मातला असावा असे वाटत होते पण ते इथे महत्वाचे नाही. त्या चित्रात रुक्ष अशा भूमीवर मानवी अवयवांचा सडा पडलेला दाखवला होता, विस्तीर्ण क्षितीजापर्यंत त्या अवयवांशिवाय काहीही नसलेल्या त्या जमिनीवर एक निष्पर्ण झाड मात्र होते आणि त्या झाडावर काही गिधाडे बसलेली दिसत होती. त्या जमिनीच्यावर आकाशात मात्र म धर्माच्या ध्वजासारखे भव्य चिन्ह दिसत होते आणि त्या चिन्हावर खाली झालेल्या कत्तलीमुळे रक्ताचे शिंतोडे उडलेले दिसत होते. काही लोकांच्या कृतीमुळे धर्म कसा बदनाम होतो हेच त्या तरुणाला दाखवायचे आहे हे स्पष्ट दिसत होते. चित्राची गुणवत्ता वादातीत होती आणि चित्र पाहणार्याच्या मनाला ते भिडल्याशिवाय राहात नसे.
असे हे चित्र संस्थळावर दिसल्यावर काही लोकांनी म धर्मात चाललेल्या प्रकाराबद्दल अत्यंत वाईट भाषेत टीका करणारे प्रतिसाद लिहीले, काहींनी संयमित भाषेत परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली तर काहींनी फक्त चित्राची समीक्षा करून त्यातले अधिक-उणे सांगितले.
असे हे चित्र संस्थळावर प्रकाशित होऊन बारा तास होत नाहीत तोच संस्थळचालक तरुणाला एक विरोप आला. त्या विरोपात म धर्मातल्या एका कुप्रसिद्ध संघटनेचे नाव होते आणि ते चित्र पुढील बारा तासात काढून टाकले नाही तर फार वाईट होईल अशी स्पष्ट धमकी होती.
संस्थळचालकाने तातडीने या विरोपाची माहिती आपल्या सभासदांना दिली आणि यावर काय कृती केली पाहिजे असा चर्चाप्रस्ताव टाकला.
आधी चित्रावर अत्यंत वाईट भाषेत प्रतिसाद देणार्या लोकांनी पुन्हा अत्यंत भडकावू भाषेत ते चित्र तिथून काढता कामा नये असे बजावून सांगितले, ज्या लोकांनी चित्रावर म धर्मातल्या परिस्थितीबद्दल संयमित चिंता व्यक्त केली होती त्यांनी 'चित्र काढले नाही पाहिजे पण पुरेशा संरक्षणाअभावी अथवा कोणत्याही आधाराशिवाय ते ठेवणे शक्य नसल्याने ते काढले जाईल' असे लिहीले. ज्या लोकांनी चित्राची समीक्षा केली होती ते मात्र तटस्थ राहिले आणि त्यांनी कोणतेही भाष्य करण्याचे टाळले. एकूणच परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि कोतवालाशी चर्चा करून शेवटी साधारण पाच-सहा तासांनी ते चित्र त्या संस्थळावरून हटवण्यात आले." इतकं बोलून वेताळ थांबला आणि त्याने विक्रमाच्या प्रतिक्रियेचा अदमास घेतला. मान खाली घालून विचार करत काही न बोलता तो चालतो आहे हे पाहून वेताळ म्हणाला," हे नृपवरा, चर्चा प्रस्तावावर बहुतेकांनी चित्र काढले जाऊ नये अशा आशयाचा प्रतिसाद दिलेला असूनही चित्र का काढले गेले? चित्रसमीक्षकांनी मौन बाळगणे का पसंत केले? संयमी सभासदांनी नाइलाजाने चित्र काढावे लागेल असे का सुचवले? सगळे सभासद एकाच समाजविशेषाचे घटक असूनही त्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या का?
या प्रश्नांची उत्तरे तू जाणत असूनही दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची सहस्त्र शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील."
विक्रमाने एक दीर्घ निश्वास सोडला आणि घसा खाकरून तो बोलू लागला,
"व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने प्रतिक्रिया वेगळ्या आल्या यात नवल ते काय? परंतु तू सांगितलेल्या माहितीवरून त्या सभासदांमध्ये तीन प्रमुख गट दिसतात. भडकावू भाषेत लिहीणारे प्रखर धर्माभिमानी लोक, संयमी लोक आणि निव्वळ चित्रसमीक्षा करणारे आणि धर्माधारित मुद्यांकडे दुर्लक्ष करणारे लोक. पैकी धर्माभिमानी लोक हे धर्माचे कट्टर अनुयायी आणि स्वघोषित रक्षणकर्ते असतात. यांच्या दृष्टीने धर्म हा नेहमीच संकटात असतो आणि दुसर्या धर्माच्या लोकांवर हल्ले करून आपल्या धर्माचे रक्षण केले पाहिजे असे त्यांना वाटत असते. या लोकांच्या तेजस्वी भाषेमुळे आणि शेरास सव्वाशेर अशा प्रवृत्तीमुळे बर्याच लोकांना यांचे आकर्षण वाटते. परंतु सगळ्याच धर्मात असे लोक असल्याने त्यांच्यात फारसा फरक नसतो आणि या वृत्तीमुळे तेढ कमी होण्याऐवजी वाढतच जाते. या लोकांनी चित्रावर भडक भाषेत लिहीले कारण त्यांना ते निमित्तच हवे होते, दुसर्या धर्मावर शिंतोडे उडवण्याचे. चित्र काढून टाकायला त्यांनी विरोध केला त्याचे कारण अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करणे हे नसून दुसर्या धर्माच्या लोकांना आपण घाबरू नये असे वाटणे होय. उद्या त्यांच्या विरोधात कोणी चित्र लावले तर ते अगदी दुसर्या धर्मातल्या लोकांसारखे वागतील यात काय संशय?
दुसरा गट, संयमी लोक, हे लोक खरोखर अल्पसंख्य असतात आणि या लोकांना खरोखर समभाव आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांची चाड असते. दोन्ही धर्मांना समान वागणूक दिली जावी असं त्यांना वाटत असतं. म्हणूनच त्यांनी चित्र काढले जाऊ नये अशी प्रतिक्रिया दिली. परंतु वास्तवाचे भान असल्याने आणि गणराज्यात कोणत्याही अल्पसंख्य, आक्रमक आणि एकगट्ठा समाजाला राज्यकर्ते दुखावणार नाहीत हे माहिती असल्याने ते चित्र काढले जाईल असे त्यांनी सुचवले. परंतु उद्या ब धर्मातल्या चिन्हांवर कोणी असे चित्र काढले तर त्या चित्रालाही ते नक्कीच विरोध करणार हे निश्चित. अभिव्यक्तिस्वातंत्र्य मारले गेलेच आहे तर किमान समभावतरी टिकवला जावा या साठी ते प्रयत्न करणार.
राहता राहिला तिसरा गट. या गटात उच्चविद्याविभूषित, सुखवस्तू आणि विद्वान लोक मोडतात. या लोकांना आपल्याकडे गुणग्राहकता, कलाप्रेम, व्यासंग इत्यादी वाखाणले गेलेले गुण असावेत असं मनापासून वाटत असतं आणि त्यासाठी ते विशेष प्रयत्नही करत असतात. आपण किती निरपेक्ष आणि न्यायबुद्धीचे आहोत हे स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी ते जात, धर्म, वर्ण आणि राजकारण यावर शक्यतो बोलायचे टाळतात, बोलले तरी ठाम भूमिका घेत नाहीत आणि घेतली तरी ती बर्याचदा अतिआदर्शवादी असते. स्वतःच्या गुणवाढीच्या विशेष प्रयत्नांमुळे हे स्वतःला हळूहळू इतर बहुजन समाजापेक्षा वेगळे समजायला लागतात, नेहमीच पोलिटिकली करेक्ट बोलायला लागतात आणि मग हळूहळू त्यांना समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या भावना कळणे बंद होते. सततच्या आदर्शतेच्या पाठपुराव्यामुळे हे लोक स्वतःच्या सद्य अस्तित्वाबद्दल समाधानी नसतात किंवा न्यूनगंड बाळगून असतात, त्यामुळे स्वतः ज्या परंपरेतून आले त्याचे रक्षण न्याय्य मार्गाने करण्याचेही विसरून जातात. उलट आपल्या परंपरेचा वगैरे कोणी अपमान केला तरी ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून त्यावर समीक्षा करू शकतात.
जेव्हा दुसरा आक्रमक गट अभिव्यक्तिस्वातंत्र्याला आव्हान देतो तेव्हा यांच्यातही राज्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन लढण्याची शक्ति नसल्याने ते मूकपणे पाहणे पसंत करतात. परंतु उद्या कोणी ब धर्मावर असे चित्र टाकले तर हे लोक पुन्हा त्या चित्राची कलेच्या दृष्टीनेच समीक्षा करणार आणि यात समभावाचा खून होतोय हे सोयीस्करपणे विसरणार यात काय संशय?"
विक्रमाचे हे उत्तर ऐकून संतुष्ट झालेला वेताळ म्हणाला, " वा विक्रमा वा! तुझ्या विश्लेषणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच! परंतु तू बोललास आणि मी निघालो. तरीही तू त्या समाजविशेषातल्या लोकांप्रमाणे नसती उठाठेव करत राहशील यात मला संदेह नाही."
इतके बोलून वेताळ प्रेतासह उडाला आणि पुन्हा स्मशानातल्या त्या झाडाच्या फांदीला जाऊन लटकू लागला.
प्रतिक्रिया
अग्गाय्यायायायाया......
छान
ऑन / ऑफ ...
>>वर वर्णन केलेला संस्थळावरील
मनात बाळगलेला पूर्वग्रह?
नाही. ब धर्माच्या बाबतीत जे
?
अगदी बरोबर. असे लोक दोन्हीकडे
>>डेन्मार्कच्या पेपरात
वा थत्तेचाचा वा! तो
धन्यवाद.
राहता राहिला तिसरा गट. या
+१
राहता राहिला तिसरा गट. या
>>."विचारवंत" म्हणजे हिच लोक
+१
ननि __/\__ पण पालथ्या घड्यावर
खुबी
आँ
आवडले
लिंडा गुडमन, थोडी वेगळी गटवारी वगैरे
गट १ सगळीकडे असतो आणि गट २
घासकडवी यांचा प्रतिसाद आवडला.
लॉग आऊट
एक
स्नॉब्ज?
लेख आवडला.
या धाग्याच्या निमित्ताने ...
चिंतातुर जंतू त्या धाग्यावरील
तो धागा पाहून बरे वाटले.
त्यांना तुम्ही अपवादच मानले असते
गंमतीदार.
सडकी प्रतिक्रिया?
खी: खी: खी: धर्माची गती
तर्क हुकलेला आहे.
माझा तर्क हुकलाही असेल पण
दोआप्रकाटाआ
अतिशय चपखल लेख. खूप आवडला.
वा!
>>एका संस्थळापुरते व त्याच्या
बाकी एका गटाला तिसरा गट किंवा