✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

धिक्कार ते अधिकार : माझा प्रवास व्हाया..३

च
चिगो यांनी
Mon, 05/16/2011 - 13:40  ·  लेख
लेख
धिक्कार ते अधिकार : १ http://www.misalpav.com/node/17920 धिक्कार ते अधिकार :२ http://www.misalpav.com/node/17974 मेन्सचा रिझल्ट आल्यावर कळले, की ३४-३५ मार्कांनी इन्टरव्ह्यू कॉल हुकला. (तेव्हा ते फक्त ३०-३५ मार्क्स वाटले, पण नंतर पुढे त्यांचं महत्त्व कळालं...) ************************************************************* मेन्स देऊन परत आल्यावर मी माझा दिल्लीतला मुक्काम हलवला.. तसंही तिथं राहून आता काही फायदा नव्हता. मी नागपूरला आलो, आणि S.I.A.C. नावाच्या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेत राहून अभ्यास करायला लागलो. पुन्हा प्रीलिम्स दिली. ह्यावेळी मात्र वेळ वाया घालवायचा नाही म्हणून लगेच दादाकडे अभ्यासाला निघून गेलो. प्रीलिम्सचा रिझल्ट जवळ आला, तसा आमच्या (प्रिपरेशनच्या) ग्रुपने मुंबईतून परीक्षा द्यायची असे ठरवलं. आता आली पंचाईत !! माझी ही मुंबईची, आणि दादाला हे माहीत असल्याने तो काही जाऊ देणार नाही हे वाटतंच होतं. तो बोललाही तसं, पण मी अभ्यास करण्याचं सांगून, ग्रुपचा फायदा वगैरे सांगत त्याला कन्व्हीन्स केलं. वहीनींनी पण मला मदत केली. आलो मुंबईला.. इथे आल्यावर हिने खुप समजून घेतलं. खरंतर आम्ही जवळपास दोन वर्षांनी एवढे जवळ राहत होतो, पण तिने कधीच भेटायचा वगैरे हट्ट केला नाही... ह्या वेळी माझ्या मित्रांना वाटायचं, की मी खुप टाईमपास करतोय. कारण की, ऑलमोस्ट दर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी मी हिला कॉलेजला जातांना भेटायचो. (ती सांभाळून घेत असली तरी मला चैन पडायला पाहीजे ना ;-)) तसंच, मी रोज संध्याकाळी मरीन ड्राइव्हवर पळायला आणि व्यायाम (इन्क्लूडींग डोळ्यांचा :D) करायला जायचो. त्यामुळे सगळ्यांना वाटतं होतं, की मी सिरीयस नाहीये अभ्यास आणि परीक्षेबद्दल म्हणून.. पण खरंच सांगतो, ह्याचा मला खूप फायदा झाला. तसाही दिवसभर अभ्यास करण्याचं नाटक करत बसण्यापेक्षा, स्वतःशी प्रामाणिक राहून, एन्जॉय करत अभ्यास केलेला कधीही बरा... मित्रांशी गप्पा मारत, कचर्‍याचा निचरा करत केलेला अभ्यास मेंदूवर कोरलाही जातो आणि तुम्ही कंटाळत पण नाही. .....झालं. होल्ले होले Mains आली आणि आम्ही लिहून घालवली. नागपुरला परतलो. आता पुढचं टेन्शन यायला लागलं. ह्याही वेळी नाही झालं तर काय? एक तर आपण नुस्ते बी.एस्सी., त्यातही सेकंड क्लास.. म्हणून मग एम. बी. ए. साठी CET दिली. पुन्हा DUची Lawची परीक्षाही दिली.. आंणि पुढच्या भविष्याकडे वाट लावून बसलो. मेन्स ते तिचा रिझल्ट ह्यात खूप वेळ जातो, जवळपास चार महीने. आपण परीक्षा दिली हेही विसरायला होतं कधी कधी... ४ मार्च २००९ : आई-पप्पांना नात्यातल्या एका ठिकाणी जायचं होतं. मी त्यांना बस-स्टँडवर सोडायला जाणार, एवढ्यात मित्राचा फोन आला, "मेन्सचा रिझल्ट आलाय. पण सर्व्हर बिझी आहे." मी म्हटलं, बरं... आतून भिती वाटत होती. आईला सांगितलं. आईनी धीर दिला, "जास्त टेंशन घेऊ नकोस, जे होईल ते बघता येईल." मी त्यांना सोडून परत आलो. गावात कुठलं आलंय नेट्-बीट?? दादाला फोन केला नी रोल नंबर सांगितला. थोडा वेळ गॅसवर... दादानी फोन केला नी बोलला, " कॉन्ग्रट्स ! मेन्सचा किल्ला मारला तू." मी पुन्हा चेक करायला सांगितलं. नंतर भैयाला फोन करुन पुन्हा बघ म्हटलं... झालो होतो, आम्ही मेन्सच्या दरवाज्याला खिंडार पाडून इंटरव्ह्यूच्या खोलीकडे रवाना झालो होतो... काही दिवसातच इंटरव्ह्यूची तारीख सांगणारं पत्र आमच्या हातात पडलं... ४ एप्रिल २००९: माझा इंटरव्ह्यू सकाळच्या सत्रात होता.. सकाळी सकाळी सजून UPSC च्या दरवाज्यातून आत शिरलो. आजपर्यंत ह्या गेटला फक्त आसुसल्या नजरेने बघत आलो होतो. आत येवून एका हॉलमधे आम्हाला गोलाकार टेबलांभोवती, इंटरव्ह्यू बोर्डप्रमाणे बसवण्यात आलं. मला श्री. चलम ह्यांचा बोर्ड होता. एक बोर्ड सहा जणांच्या मुलाखती घेणार, आणि माझा नंबर पाचवा.. ऑब्व्हियसली, टरकत होतीच... शेवटी माझा नंबर आला. आधीच्याचा इंटरव्ह्यू सुरु असतांनाच तुम्हाला बोलावून बाहेर बसवतात. मी बाथरुममध्ये जावून, सगळी ताकत लावून हलका होवून आलो. काही लोक एकदम "कूल" बनत होते. आपण टेंस होतो ब्वॉ... बोलावणं आलं.. दारावर टकटक करुन, "मे आय कम इन, सर" करुन आत शिरलो. इशारा केल्यावर खुर्चीत बसलो. तिथेही एका गोलाकार टेबलाभोवती सहा जण बसले होते. चेयरमन समोर, आणि दोघं जणं तर अगदीच पाऊण हाताच्या अंतरावर.. (ही जनरली तुमच्या हावभावांवर वगैरे नजर ठेवतात.) चलम गुरुजींनी सुरुवात केली. "सो मिस्टर चिन्मय" मी "यस सर" बोललो. मला वाटत होतं की माझ्या नावाच्या अर्थापासून सुरवात करतील. मी प्रॅक्टीस पण केली होती तशी... ;-) चलम : "Chinmay, Yesterday was Ramnavmi." मी : "Yes sir" चलम : "It is celebrated at a few places even today" मी: "May be, Sir" चलम : "So tell about any large, ancient temple of Ram" मी गप.... नंतर बोललो, "Do you want to know about any temple in and around Nagpur, Sir?" ते म्हणे, "No. Tell me about a very famous temple, throughout India. It should be a large one, and atleast thousand years old" मी मनात विचार करतोय. काही आठवेचना. एकदा मनात आलं की अयोध्येचं नाव घ्यावं, पण म्हटलं नको, अजून सब-ज्युडाईस आहे जागा. तेव्हढ्यात सरच बोलले, "Don't tell about Ayodhya as it is a disputed site." मी काहीच बोलत नाही हे पाहून त्यांनी प्रश्न विचारला, "Is Rama an ancient persona, or a modern one?" मी उत्तर दिलं,"According to Hindu mythology, Ram is God and an ancient persona." "So, tell me." मी बोललो, "सॉरी सर, आय कान्ट रिकलेक्ट." चलम : "Ok. It is Bhadrachalam, on the banks of Godavari in Andhra pradesh." मी म्हणालो, "थॅन्क यु, सर." त्यांनी पुढची तोफ डागली, "हू वॉज परशुराम?" सगळे मेंबर्स त्यांच्याकडे बघायला लागले. त्यांनी 'ऐसेईच' टाईपमधे खांदे उडवले. मी मनात म्हणालो, "च्यायला, हे येडं मला IAS बनवायला बसलंय का पुजारी बनवायला?" मी उत्तर दिलं, " परशूराम वॉज सन ऑफ सेज जमदग्नी अॅन्ड रेणूका. अॅन्ड ही किल्ड हीज मदर ऑन द ऑर्डर्स ऑफ हिज फादर." चला, समाधान झालं असेल असं वाटत असतांनाच पुढचा प्रश्न, "विल यु डू दॅट?" म्हटलं, "नो सर. अॅन्ड माय फादर वोंट एव्हर टेल मी टू डू सो." सगळे हसले. त्यानंतर क्लायमेट चेंज, क्योटो प्रोटोकॉल वगैरे वर प्रश्न विचारुन त्यांनी मला बाजूच्या मॅडमच्या हातात सोपवलं. मॅडमनी गोध्रा, ऑनर किलींग वगैरे गोष्टींवर पिद्दा पाडला. त्यानंतर अरुणाचल, वंशवाद, भाजपाचा इलेक्शन मेमोरेंडा (जो त्याच दिवशी आला होता) वगैरे वर पिडून झालं. शेवटी एकानी माझ्या ग्रॅज्युएशन कॉलेजचे ३ प्लस आणि ३ मायनस पॉईंट विचारले. सगळ्यात शेवटच्या सदस्याने प्रश्न विचारला," एवढ्यात कुठलं नवीन पुस्तक वाचलयंस?" मी उत्तर दिलं, "ययाति, वि.स. खांडेकरांचं. पुस्तक जुनं आहे, पण मी आताच वाचलंय." म्हणे, "ते तर मराठीत आहे." म्हटलं," मी तेच लिहीलंय छंद म्हणून". मला संक्षिप्त कहाणी विचारली पुस्तकाची. सांगितली. मला म्हणे, " तू काय शिकला ह्यातून ?" म्हटलं, "भौतिक सुखं उपभोगण्यात काही वाईट नाही. पण कर्तव्य आलं, की ड्युटी प्रिसाईड्स ओव्हर प्लेजर." फंडा भारी झाल्याने असेल कदाचित, एका मिनिटानी मला बाहेर पाठवण्यात आलं... झालं... इन्टरव्ह्यू नंतर मी नागपूरला परत आलो. पहील्या वेळी प्रीलिम्सला उडलो, दुसर्‍या वेळी मेन्सला, त्यामुळे ह्यावेळी इन्टरव्ह्यूत दांडी उडणार अशी मला आशंका होती... ४ मे २००९: प्रीलिम्स पून्हा जवळ आली होती. पण अभ्यासात काही मन रमेना.. म्हणून मग मावशीकडे जावून तिला आणि बहीणींना पिडत बसलो होतो. अडीच-तीनच्या दरम्यान मित्राचा फोन आला. (ही पण एक गंमत.. ह्या वर्षी सगळे रिझल्ट्स मला फोनवरच कळले.) "रिझल्ट आलाय. तुझी १३५वी रँक आहे." माझा विश्वासच बसेना. पुन्हा दादा, वैनी, भैय्याला फोन करुन बघायला सांगितलं.. नंतर SIACला आलो. सगळे अभिनंदन करत होते. मी त्यांना बोललो," थांबा रे बाबांनो, मला स्वतःच्या डोळ्यांनी बघु द्या एकदा.." बघितला रिझल्ट... काय वाटत होतं ते सांगता येत नाही... वयाच्या १९व्या वर्षी २४चा गणला गेलेला, आणि वयाच्या ४०व्या वर्षी ग्रॅज्यूएट होण्याचं भविष्य वर्तवल्या गेलेला मी, २६व्या वाढदिवसाच्या महीनाभर आधी UPSCच्या फायनल मेरीट लिस्ट मधे आलो होतो !! मला आधी माझ्या त्या "मातीत हात" वाल्या आजोबांना आणि त्या ज्योतिष्याला पेढे द्यायचे होते. आजोबांना ते दिलेही नंतर... ज्योतिषिबुवा मात्र माझं वर्तमान कळल्याने आणि आपलं भविष्य चुकल्याच्या धक्क्याने असेल, आधीच भुतकाळात जमा झाले होते.. :-( नेमका दिवस आठवत नाही... मी आईसोबत तुळजापुरला भवानी मातेच्या दर्शनाला गेलो होतो. मातेचं दर्शन घेऊन, गाभार्या बाहेरच्या आरतीमंडपात आलो. तेव्हढ्यात माझ्यासोबत सिलेक्ट झालेल्या मित्राचा फोन आला... मला IAS अलॉट झाली होती. I finally became an IAS Officer :-) ************************************************************** हा लेख लिहीण्यामागे फक्त तोपगिरी वा आत्मस्तुती हा उद्देश नाही. तो थोडाफार असेलच. पण मुख्य कारण हे आहे की आता रिझल्ट्सचा वेळ जवळ येतोय.. कुणीही अपयशी ठरु नये ही सदिच्छा असली तरी कुणाला ना कुणाला अपयशाला सामोरं जावंच लागेल. कदाचित त्यातला कुणी आपल्या ओळखीतलाही असेल. अशावेळी एखाद्या खचलेल्या, ढेपाळलेल्या जीवाला, जो आत्मघाताच्या टोकावर उभा आहे त्याला, माझ्या ह्या प्रवासातून काही आधार मिळावा म्हणून हा खटाटोप. पालकांनीही अपयशाचे प्रामाणिक विश्लेषण करुन त्यांना पुढे लढायला आधार द्यावा ही विनंती.. माझ्या सिलेक्शन नंतर एका ठिकाणी मी बोललो होतो. "अपयशानंतर आत्महत्या करुन स्वतःचा फोटो घरात टांगवून घेण्यापेक्षा, आय. ए. एस. बनून फोटो पेपरात झळकावून घेण्यात जास्त मजा आहे." शेवटी सुरेश भटांच्या ह्या ओळी आहेतच की लढायची ताकत द्यायला.... "आजचे अमुचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव विजय तो कसला, उरावर जखम जो करणार नाही !!" लढो.... *********************************************************** समाप्त !!

Book traversal links for धिक्कार ते अधिकार : माझा प्रवास व्हाया..३

  • ‹ धिक्कार ते अधिकार : माझा प्रवास व्हाया...२
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
इतिहास
जीवनमान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव

प्रतिक्रिया द्या
36028 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

मस्त लेखमाला...

भडकमकर मास्तर
गुरुवार, 05/08/2014 - 00:22 नवीन
मस्त लेखमाला... :)
  • Log in or register to post comments

हेच म्हणते

सखी
गुरुवार, 05/08/2014 - 01:08 नवीन
सगळी लेखमाला परत वाचली, परत तितकीच आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

धन्यवाद भडकमकर मास्तर खाणकाम

सुहास झेले
गुरुवार, 05/08/2014 - 01:16 नवीन
धन्यवाद भडकमकर मास्तर खाणकाम केल्याबद्दल... एक अप्रतिम लेखमाला वाचण्यास मिळाली :) :)
  • Log in or register to post comments

सहमत

पिवळा डांबिस
गुरुवार, 05/08/2014 - 02:56 नवीन
सुरेख लेखमाला!! का कुणास ठाऊक पण आजवर नजरेतून सुटली होती... ड्रिलिंग केल्याबद्दल डेन्टीस्ट डागतरांचे आभार!!! वरचा मित्रवर्य श्रामोचा प्रतिसादही आवडला... (आणि त्याची आठवण एक कळ उठवून गेली...) :( चिगोसाहेब, तुमचे अनुभव असेच शेअर करा. तो आसामातल्या अनुभवाचा धागाही आवडलाय!!! काही वेगळं वाचायला मिळतंय!! जियो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

खरच

चाणक्य
Wed, 05/14/2014 - 00:39 नवीन
माझ्याही नजरेतून सुटली होती. छान लेखमाला खरच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

छान लेखमाला

Prajakta२१
Tue, 05/13/2014 - 22:42 नवीन
प्रेरणादायी लेखमाला :-) धन्यवाद
  • Log in or register to post comments

सुंदर ! आजच ही सगळी लेखमाला

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 05/13/2014 - 23:30 नवीन
सुंदर ! आजच ही सगळी लेखमाला वाचली !! बेलाटेड अभिनंदन ! ही लेखमाला तरुणाईसाठी नक्कीच बोधकारक आहे !!!
  • Log in or register to post comments

उत्तम लेखमाला.

मधुरा देशपांडे
Tue, 05/13/2014 - 23:34 नवीन
उत्तम लेखमाला.
  • Log in or register to post comments

सुंदर...

विटेकर
Fri, 05/30/2014 - 12:55 नवीन
यशासारखे दुसरे काहीच नसते हे म्हणतात ते किती खरे आहे !
  • Log in or register to post comments

पुन्हा वाचलं

समीरसूर
Fri, 05/30/2014 - 16:28 नवीन
चिगोसाहेब, पुन्हा वाचलं आणि पुन्हा अंगावर सर्रकन काटा आला. निश्चित ध्येय, अपार कष्ट, जिद्द, सातत्य, आणि तीक्ष्ण बुद्धी या जबरदस्त गुणांच्या बळावर तुम्ही जो हा यशाचा एव्हरेस्ट सर केलेला आहे, तो खरोखर अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. तुमचं लिखाण खूप छान आहेच. तुमच्या जिद्दीला आणि विचार करण्याच्या पद्धतीला सलाम! या वयात मला स्वतःला एवढा प्रगल्भ विचार जमला नसता. म्हणूनच असे कुठलेच रोमहर्षक अनुभव माझ्या गाठीशी नाहीत. आणि म्हणूनच तुमच्या या उत्तुंग यशाचं जरा काकणभर जास्तच कौतुक वाटतं. :-) तुम्हाला पुढील रोमहर्षक आणि भरीव प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा! :-) --समीर
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

चिगो
गुरुवार, 06/11/2015 - 09:13 नवीन
धन्यवाद.. पण
तुमच्या जिद्दीला आणि विचार करण्याच्या पद्धतीला सलाम! या वयात मला स्वतःला एवढा प्रगल्भ विचार जमला नसता. म्हणूनच असे कुठलेच रोमहर्षक अनुभव माझ्या गाठीशी नाहीत.
हे म्हणजे उगाच काहितरीच, राजे.. आम्ही तुमच्या 'सटल सेन्स ऑफ ह्युमर'चे फॅन आहोत. तो दुनियादारी (चित्रपट नव्हे) ;-) पाहील्याशिवाय येत नाही, हा अनुभव आणि मत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

अभिनंदन

माधुरी विनायक
Fri, 05/30/2014 - 16:57 नवीन
अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद या अनुभव कथनासाठी. परीक्षार्थी आणि त्यांचे पालक/ कुटुंबिय अशा दोन्ही गटांसाठी उपयुक्त अनुभव कथन. तुमच्या चिकाटीला सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

चिगोशेठ.. प्रणाम!!!!!!

मोदक
Wed, 06/10/2015 - 22:00 नवीन
चिगोशेठ.. प्रणाम!!!!!! @ मधुरा देशपांडे - लिंकबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वा! खूपच सुंदर लेखमाला!

रुपी
गुरुवार, 06/11/2015 - 04:43 नवीन
अतिशय प्रेरणादायी आहे तुमची लेखमाला. उत्खनन करणार्‍यांचे आभार!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/11/2015 - 09:02 नवीन
अनेक वर्षांनी उशिराने का होईना या यशाबद्दल तुमचे अभिनंदन. खूप प्रेरणादायी अनुभवकथन. आजवर वाचायचे राहून गेले होते. या निमित्ताने स्व. प्रमोद महाजन यांचे एक वाक्य आठवले. No defeat is final until you stop fighting.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ... जोशी हा धागा वर आण्ल्याबद्दल ...

स्वीत स्वाति
गुरुवार, 06/11/2015 - 10:26 नवीन
चिगो अभिनन्दन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अप्रतिम

सिरुसेरि
गुरुवार, 06/11/2015 - 12:23 नवीन
अप्रतिम प्रेरणादायी अनुभवकथन . कुठेतरी नरेन्द्र जाधव यांच्या 'आमचा बाप आणि आम्ही' ची आठवण आली. तुमच्या लेखावरुन तुमचे भाऊसुद्धा खुप कर्तुत्ववान आहेत हे दिसते. त्यांचाही ध्येयप्रवास तुमच्या नजरेतुन वाचायला मिळाला तर तो असाच प्रेरणादायी ठरेल . अधिकारपदावर पोचल्यावर आतापर्यंत आलेले अनुभव यांबद्दलही सांगा .
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

चिगो
गुरुवार, 06/11/2015 - 14:06 नवीन
धन्यवाद..
तुमच्या लेखावरुन तुमचे भाऊसुद्धा खुप कर्तुत्ववान आहेत हे दिसते. त्यांचाही ध्येयप्रवास तुमच्या नजरेतुन वाचायला मिळाला तर तो असाच प्रेरणादायी ठरेल .
होय.. दादाचे कर्तुत्व, त्याचा ध्येयप्रवास आणि आतापर्यंत त्यानी केलेलं काम माझ्यापेक्षा अत्यंत उत्तुंग आहे. पण त्याबद्दल मी लिहीणे, हे अनुभवहीन आणि म्हणूनच उथळ, वरवरचे वाटेल. त्याला फुरसत मिळालीच आणि इच्छा असेल तर तुम्ही सुचवलंय ते सांगून बघेन..
अधिकारपदावर पोचल्यावर आतापर्यंत आलेले अनुभव यांबद्दलही सांगा..
प्रत्येक अनुभवाला काही कंगोरे असतात. ते सगळेच कुठल्याही सरकारी नियमावलींनी बांधलेल्या सरकारी कर्मचारी/ अधिकार्‍याला उघडपणे सांगता / मांडता येत नाहीत. आणि शेवटी कितीही संतुलिततेचा आव आणला तरी अभिनिवेश थोडाफार तरी झळकणारच. माझे लिखाण म्हणूनच 'बायस्ड'होईल, त्यामुळे मी फार लिहीत नाही.. जे काही थोडंफार अनुभवलंय, ते ह्या आधी मांडलंय मिपावर. (लिंक मिळत नाहीय. क्षमस्व..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

अनुभवकथनाचा दुवा

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/11/2015 - 18:06 नवीन
हा त्या अनुभवकथनाचा दुवा - थरार : नको इतका जवळून !! त्याबाबरोबर हा दुवाही द्यावासा वाटला, सफर-ए-चेरापुंजी :: लिव्हींग रुट्स ब्रीज..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

धन्यवाद आणि अभिनंदन..

उपास
गुरुवार, 06/11/2015 - 15:36 नवीन
तुमच्या चिकाटीला सलाम आणि हे असं लिहून ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.. हे नजरेतून सुटलं होतं तेव्हा पण आता वाचायला मिळालं आणि भरुन पावलो. ह्यापेक्षा प्रेरणादायी ते वेगळ्ं काय.. ! माझी स्वतःची जिद्द, पेशन्स अशा परिक्शांच्या तयारीला कमी पडले, तसेच पदवीनंतर कुठलीही काँपिटीटीव्ह परिक्षा न देता आल्याचं कायम शल्य आहे मनात, नोकरीची घाई करायला नक्कोच होती असं आता वाटतं.. असो!
  • Log in or register to post comments

काँपिटीटीव्ह परिक्षा

सिरुसेरि
गुरुवार, 06/11/2015 - 16:37 नवीन
काँपिटीटीव्ह परिक्षा मध्ये सगळीच उत्तरे बरोबरच वाटतात . जसे की- भारतातील पहिले बंदर कुठले - यांवर विशाखापट्ट्नम आणि कोलकत्ता दोन्ही उत्तरे बरोबरच वाटतात .
  • Log in or register to post comments

मान्य..

चिगो
गुरुवार, 06/11/2015 - 16:58 नवीन
मान्य..
काँपिटीटीव्ह परिक्षा मध्ये सगळीच उत्तरे बरोबरच वाटतात .
डोळ्यात तेल घालून वाचणे म्हणजे काय आणि त्याची कसोटी ही परीक्षेच्या दिवशी कळते. एक शब्द हुकणे/चुकणे ह्यापायी बोंब होते सगळी. तुम्ही प्रिलीम्सबद्दल बोलताय बहुतेक, पण उदाहरणच द्यायचे झाले तर २००८च्या मुख्य परीक्षेत 'सायंस अँड टेक्नॉलॉजी'वर पुर्वीच्या परीक्षांमध्ये "टू मार्कर्स" असलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न होते, प्रत्येकी १५ मार्कांचे.. घाईघाईत आणि तणावात बर्‍याच जणांनी ह्या पंधरा मार्कांच्या प्रश्नाची उत्तरे दोन मार्कांच्या प्रश्नांसारखी दोन ओळींत लिहीली. म्हणजे तब्बल ४५ मार्कांसाठी फक्त ६ मार्कांची उत्तरे!! जिथे एका मार्काच्या फरकानेपण (तो फरक कुठल्या रँकवर आलाय ह्यावरुन) ३-४ ते १०-१२ रँक्स असा फरक पडू शकतो, तिथे ही चुक आत्मघाती होती.. पण ती झाली आणि बरेच जण झोपले, हे नक्की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

अत्यंत प्रेरणादायी लेख....

असंका
Fri, 06/12/2015 - 22:34 नवीन
अत्यंत प्रेरणादायी लेख.... धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

मस्तच

इरसाल कार्टं
गुरुवार, 03/16/2017 - 15:17 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

हे धागे नेहमीच प्रेरणा देत

मोदक
Tue, 05/26/2020 - 13:39 नवीन
हे धागे नेहमीच प्रेरणा देत असतात.. __/\__ बाकीच्यांना याचा आस्वाद घेता यावा म्हणून लेख वर काढत आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच

diggi12
Wed, 05/22/2024 - 12:58 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

प्रेरणादायी!!

Bhakti
Wed, 05/22/2024 - 13:28 नवीन
प्रेरणादायी!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा