✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आपण का जगतो ?

ट
टारझन यांनी
Tue, 04/26/2011 - 22:27  ·  लेख
लेख
जरा नेहमीची गंमत जंमत बाजुला ठेऊन रोज रात्री आकाशाकडे पहात एकंच प्रश्न पडतो , " आपण का जगतो ? " प्रश्न तसा पाहिला तर साधा वाटतो आणि थोडा तसा पाहिला तर अगदी गुंतडा होतो आणि समाधानकारक उत्तर काही सापडत नाही. कोणी म्हणतं मी भाग्यवान ,माणुस म्हणुन जन्मलो. आहो पण झुरळंही जगतात नी आपणही जगतो. जिवनशैली वेगळी आहे . आपण थोडं ऐश आरामात जगतो ( डीपेंड्स ). मला कुंथुन कुंथुन विचार करुन ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही. मला चांगले आईबाबा आहेत , मित्र मैत्रिणी आहेत , चांगली नोकरी मिळकत काय असेल तर सगळे आहे, स्वस्थ आहे थोडक्यात मी आहे त्या आयुष्यात सुखी आहे पण तरीही प्रश्न उरतोच की "मी का जगतोय ? " लहानपणापासुन आईबापानं वाढवलं म्हणुन जगलो . नंतर लग्न झालं की बायको , पोरं झाली की त्यांच्या मागण्या पुर्ण करायच्या. पण जर मग ह्या गोष्टी नसतील तर जगण्यात काही राम नाही असे म्हणता येईल काय? बर्‍याच कोनांतुन विचार करुन पाहिल्यावरही, वेगळा विचार करुनही "मी का जगतोय ? " ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला सापडले नाही म्हणुन काथ्याकुट . तुम्हाला माहित्ये का तुम्ही का जगताय ? -( समाधानकारक उत्तरांच्या अपेक्षेत ) टारझन
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29440 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

जगायला नायट्रोजन पन लागतो.

नरेशकुमार
Wed, 04/27/2011 - 10:57 नवीन
जगायला नायट्रोजन पन लागतो. आनि H2O पन लागते. आनि ऑक्सिजन विसरुन कसे चालेल. ते सुध्धा पाहीजेच ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

भारतात अनेक लोक फुकट प्राण

अविनाशकुलकर्णी
Wed, 04/27/2011 - 08:10 नवीन
.
  • Log in or register to post comments

अरेरे!

पिवळा डांबिस
Wed, 04/27/2011 - 08:16 नवीन
प्राणवायू संपला वाटतं!!!!! :) (ह. घ्या अविनाशराव!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

>>आपण का जगतो? अजून मेलो नाही

नितिन थत्ते
Wed, 04/27/2011 - 08:48 नवीन
>>आपण का जगतो? अजून मेलो नाही म्हणून.
  • Log in or register to post comments

आपण

तिमा
Wed, 04/27/2011 - 09:10 नवीन
लहानपणी सगळ्याच नवीन गोष्टींचे कुतुहल असते म्हणून जगतो. तरुणवयात आणखी बर्‍याच गोष्टी आकर्षक वाटू लागतात, त्या मिळवण्यासाठी धडपडत पण एंजॉय करत जगतो. मध्यम वयात जो संसाराचा पसारा मांडून ठेवलेला असतो त्याची जबाबदारी असते म्हणून जगतो. आणि उतारवयात त्याआधीचा काळ खूप सुखांत गेला असेल तर त्याच्या आठवणींवर जगतो. दु;खात गेला असेल तर आता तरी चांगले दिवस येतील या आशेवर जगतो. शिवाय मेल्यानंतर नक्की काय आहे हे माहित नसल्यामुळे एक अनामिक भीति असते म्हणूनही जगतो. वैयक्तिकः मला मात्र मेल्यानंतर काय आहे ते जाणून घेण्याची अतीव उत्कंठा आहे पण आत्महत्या हा भ्याडपणा आहे शिवाय तसे केल्यास घरच्यांना निष्कारण त्रास होईल म्हणून जगतोय.
  • Log in or register to post comments

बहाना

ऋषिकेश
Wed, 04/27/2011 - 09:28 नवीन
जिनेवालो को जिने का बहाना चाहिये! असे जगण्याचे सांगण्यासारखे बहाणे हजारो आहेत पण त्यातलं कारण एकही नाही.. बहुदा मला जगायला आवडतं म्हणून जगतो.. जगण्याची आसक्ती संपली की असं जिवंत दिसणारं माणूस आणि प्रेत यात काय फरक? तेव्हा मरताना, मरणं ही आतापर्यंत न अनुभवलेला प्रवास असावा म्हणून आता जगतोय.. मनापासून जगून घेतोय!
  • Log in or register to post comments

टारझन राव, एकदा योगिनी

किसन शिंदे
Wed, 04/27/2011 - 09:27 नवीन
टारझन राव, एकदा योगिनी एकादशीला आळंदीत या आणि तिथून सुरुवात करून पायीच वारी करा पंढरपूर पर्यंत..... वारीतल्या कोणत्याही वारकरयाला हा प्रश्न विचारा तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळेल.:) बोला पुंडलिक वरदा....हरी विठ्ठल...
  • Log in or register to post comments

माझे मत.. आयुष्यात सगळ्या

मराठमोळा
Wed, 04/27/2011 - 09:38 नवीन
माझे मत.. आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे देता येतात पण "का?" या प्रश्नाचे उत्तर बर्‍याचदा मिळतच नाही. हे जग आहे, असं आहे, तसं आहे मी काय कसा कुठे कोण या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, पण मी का आहे या प्रश्नाचे उत्तर नाही. हे जगसुद्धा का आहे याचे उत्तर नाही. का हा सगळा प्रपंच निर्माण झाला याला देखील उत्तर नाही. या "का?" वाल्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करु नये, वेड लागू शकते. ;) थोडं अध्यात्मिक वाटेल पण सर्वजण एका कधीही न संपणार्‍या आनंदाच्या शोधात जगत असतात, जो मरेपर्यंत मिळत नाही. :) तसं पाहिलं तर मनुष्य आणि ईतर प्राणी काही वेगळं करत नाहीत. खाणे, झोपणे, प्रजनन आणि स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण या गोष्टींच्या अवती भवतीच माणसाचे सुख-दु:ख आणि आयुष्य फिरत असते. फरक हाच की माणसं जास्त विचार करतात, निसर्गाला आव्हान देत फिरतात, ईतर प्राणी हे करत नाहीत, ते निसर्गाच्या नियमांप्रमाणे जगतात, वागतात. ज्या दिवशी "मी का जगतो?" किंवा "मी का आहे?" या प्रश्नांची उत्तरे मिळतील त्या दिवशी जगण्याची ईच्छा संपेल कदाचित. :)
  • Log in or register to post comments

ऐका माझं गटणे, चहा घ्याच

विसोबा खेचर
Wed, 04/27/2011 - 09:38 नवीन
ऐका माझं गटणे, चहा घ्याच थोडासा..! ;) तात्या.
  • Log in or register to post comments

गटणे किती लक्की होता , त्याला

टारझन
Wed, 04/27/2011 - 10:15 नवीन
:) गटणे किती लक्की होता , त्याला भाईकाकांचं डोकं खायचं भाग्य मिळालं होतं :) बाकी थोडासा कशाला दोन च्या द्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सिंहावलोकन

योगी९००
Wed, 04/27/2011 - 10:12 नवीन
रात्रीच्या तारका (आकाशातल्या) पहाताना थोडे सिंहावलोकन केलेस तर तुझ्या आयुष्याच्या जमाखर्चाचा ताळेबंद स्थिरस्थावर होईल. तुझ्या मनो़ज्ञ मानसिकतेला "आपण का जगतो" याची महदोत्कट प्रचिती मिळून तुझ्या आत्म्याला अनुभूती मिळेल. (कुंथून कुंथून शिंहावलोकन केलेस तर तुला " आपण का *गतो" हे पण कळेल..)
  • Log in or register to post comments

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...

ज्ञानेश...
Wed, 04/27/2011 - 10:13 नवीन
आपण जगतो ते दुसर्‍यांसाठी. कुणाला अपत्य हवे असतो म्हणून आपण जन्मतो. कुणालातरी भाऊ मिळावा, मित्र मिळावा, प्रियकर, शेजारी, बॉस, कर्मचारी इ. इ. मिळावेत म्हणून आपण जगतो. थोडक्यात इतरांच्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी आपण जगतो. आणि आपल्यासाठी ते ! (बाकी हा एक असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर गद्यापेक्षा पद्यात देणे सोपे पडेल.)
  • Log in or register to post comments

माझी स्वाक्षरी पुरेशी आहे

५० फक्त
Wed, 04/27/2011 - 10:17 नवीन
माझी स्वाक्षरी पुरेशी आहे निदान माझ्यापुरत्या उत्तराला. अवांतर - काल राजधानी मध्ये जेवंण मस्त होतं, भजी, पन्हं, गाजर हलवा, दाळ ढोकळी अगदी छान छान.
  • Log in or register to post comments

पूर्वीसारखा चार्म नाय रहायला

इरसाल
Wed, 04/27/2011 - 15:53 नवीन
पूर्वीसारखा चार्म नाय रहायला राव राजधानीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

सर्व उत्तरांसाठी उन्नती

गवि
Wed, 04/27/2011 - 10:17 नवीन
सर्व उत्तरांसाठी उन्नती मासिकाच्या एका जुन्या विजयादशमी अंकात आलेला श्री. चौखुरेगुरुजी यांचा "जीवनोन्नतीचे सहा सोपान" हा लेख तुम्ही वाचाच टारुभाऊ.. (कुठला अंक विचारू नका.) - सखाराम गविटणे.
  • Log in or register to post comments

रामदास काका अन ज्ञानेश, बरच

स्पंदना
Wed, 04/27/2011 - 10:27 नवीन
रामदास काका अन ज्ञानेश, बरच समर्पक सांगुन गेले. एव्हढा धागा पुरेसा आहे जगण्याच बळ देण्यासाठी. हा आता जास्तच प्रश्न सतावत असेल तर जरा चार दिवस सद्वर्तन करुन बघायच. तस पण, मी माझ्या पुरत "का? आणि किती?" सोडुन" कस "जगलो? याला जास्त महत्व देते. माझ्या पुरता एक आरसा मी माझ्या मनी बाळगते, जोवर मी; त्या आरशात, माझी स्वतःची नजर न चुकवीता पाहु शकते, तोवर "खरी"मी!
  • Log in or register to post comments

जगण्याची इच्छाशक्ती मेलेली

टारझन
Wed, 04/27/2011 - 10:56 नवीन
जगण्याची इच्छाशक्ती मेलेली नाहीये हो :) मनात कोणतं पाप केल्याचं शल्य ही नाही . फक्त प्रश्नाचं उत्तर हवंय :) ह्यात डिप्रेशन नाहीये :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

मी तस म्हणत ही नाही. माझ

स्पंदना
Wed, 04/27/2011 - 11:03 नवीन
मी तस म्हणत ही नाही. माझ म्हणन एव्हढच की मला जेंव्हा एकंदर 'जगण्या' बद्दल प्रश्न पडतो तो ,' का?' ऐवजी 'कस ?' असा पडतो. मी तुमचा मुद्दा चुकिचा नाही डेपिक्ट केला, नाही तो बदलाय्चा प्रयत्न! आठवण आली 'असा मी असामी ' मधल्या प्रवचनाच्या सीनची. तु कोण? मी कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

खुप औघड आहे. मला कळ्लेल

नरेशकुमार
Wed, 04/27/2011 - 10:53 नवीन
खुप औघड आहे. मला कळ्लेल नाहीये अजुन पर्यन्त. ह्या पोस्ट वरुन काहीतरी कळेल असे वाटत आहे. रोज काम करायच, घरी यायचे. एक पिच्चर बघायचा, बायकोल घेउन बाहेर जायच. शनिवात रैवार लांब कुठेतरि फिरायला जायच. कधिकधि मिपावर यायच, एवधच काय ते येत. पन जगायच कशाला ते अजुन समजल नाही.
  • Log in or register to post comments

@ नकु, हे जे काय करता म्हणुन

५० फक्त
Wed, 04/27/2011 - 11:30 नवीन
@ नकु, हे जे काय करता म्हणुन लिहिलंय ना ते करणं सोडुन द्या २-३ महिने, लगेच कळेल का जगायचं ते.
  • Log in or register to post comments

ही

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 04/27/2011 - 11:37 नवीन
'जगाचे काय?' असेही वाटले... 'माझे काय?' हे त्याहून जास्त ! आरशातून तरंगायचे देहभर डोळे... वादळी... प्रसन्न... क्षणार्धात सुस्त... दरीत संध्याकाळ मावळतांना ऐकली होती दरीभर सांडलेली सनई वाटले होते - 'हेच जगणे !.... झालो मोठे... थोरसुद्धा होऊ....' खूप वर्षे झाली आता... अजून सनईसुद्धा आवडते; पण ऊसळत नाही आतून काहीच... वाटते - नुसतेच बसून राहू..... आभाळभरून सांडले होते प्रश्नच प्रश्न आणि ढगभरसुद्धा उत्तर मिळाले नाही....
ही संदीपदाची रचना आठवून गेली. ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता त्यांना ही रचना सापडून गेली....
  • Log in or register to post comments

दोन पैसे

प्यारे१
Wed, 04/27/2011 - 12:05 नवीन
कोण कुणास्तव जगतो मरतो कोण कुणास्तव सतत कष्टतो माणुसकीचा गहिवर येतो ज्याला जेव्हा जिथे सोयीचे जगात नसते कुणी कुणाचे - साळसूद. ( आत्मनस्तु कामाय सर्वंप्रियं भवति) एखाद्या खेळामध्ये उतरलो की तो पूर्ण करुनच बाहेर येता येते. काहीसे तसेच जीवनचक्र आहे. ' मिळालेले' जीवन जगणे हा एक खेळच.( मिळालेलेच. कारण त्याला चॉईस नसतो. चॉईस असता तर प्रत्येकाने जास्तीत जास्त चांगले रुप, धन, ऐश्वर्य, शारिरीक ताकद, आरोग्य इ.इ. घेण्याचा प्रयत्न आधीच केला नसता का? खरेतर ते आपल्याच पूर्वकर्मांमुळे 'मिळवलेले' असते पण त्यावर कुढण्यापेक्षा पुढचा विचार करणे अधिक श्रेयस्कर) आणि एखाद्या कैद्याला शिक्षा पूर्ण होण्याआधी पळून गेला तर शिक्षा जशी जास्त होते तसे आत्महत्या करणार्‍याला ही पुन्हा यावेच लागते आणि नवीन शिक्षा (नवीन मिळणारा जन्म) सव्याज भोगावी लागते. त्यामुळे मिळालेले जीवन जगणे आणि जगताना पुढची कर्मबीजे कमीत कमी निर्माण करणारं ठरावं हा जगण्याचं मुख्य हेतू असला पाहिजे. असावा. तीन 'डू' ज ( विधी) आणि तीन 'डोन्ट' स (निषेध) लक्षात ठेवावे. 'डू' ज - सत्य, आईवडिलांच्या आज्ञापालन आणि संत महंतांचे ऐकणे आणि आचरणे ( 'खर्‍या' संतांचे क्रायटेरिया वेगळे आहेत. ते सुद्धा पारखूनच घ्यावे लागतात अर्थात आपली सुद्धा पात्रता लागते.) 'डोन्ट' स - परस्त्री, परधन, परनिंदा/ परपीडा. या तिन्ही गोष्टी टाळाव्यात. बहुतांश भांडणं, वाद, खून, युद्धे यांचे मूळ हेच आहे. मानवी जीवन ही एक देणगी आहे. तिचा पुरेपूर वापर केला गेला तरच मनुष्य म्हणवता येईल नाहीतर, आहार निद्रा भय मैथुनंच... या श्लोकात सांगितल्या प्रमाणे आपणही पशुत्वाकडे वाटचाल करतो आहोतच.
  • Log in or register to post comments

दोनदा आल्याने

प्यारे१
Wed, 04/27/2011 - 12:09 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

हम्म !

सुहास..
Wed, 04/27/2011 - 12:26 नवीन
रिकाम्या वेळेत पडतात असे प्रश्न !! असो ..का जगतो यापेक्षा कसा जगतो याला महत्त्व असल्याने असा प्रश्न पडला नाही आणि कोणी विचारला तर सदैव दुर्लक्ष केले आहे ...आज ही करतो आहे .. धन्यवाद्स !!
  • Log in or register to post comments

गुगल

भारीबंडू
Wed, 04/27/2011 - 12:29 नवीन
अरे जरा गुगल वर शोधून पहा कि ... आम्ही तर बाबा खाण्यासाठी जगतो
  • Log in or register to post comments

मला वाटतं आपण स्वतःला जरा

मी ऋचा
Wed, 04/27/2011 - 12:39 नवीन
मला वाटतं आपण स्वतःला जरा जास्तंच सिरीयसली घेत सुटतो. आपण जन्माला येतो ते काही आपली ईच्छा म्हणून नाही आणि मरतो तेही काही आप्ली ईच्छा म्हणून नाही (जनरली). तेव्हा हा प्रश्णच माझ्यामते निरर्थक आहे उगाच वरील दोन अनैच्छिक क्रियांच्या मधल्या फावल्या वेळेतला टाईमपास..
  • Log in or register to post comments

या जन्मावर.. या जगण्यावर शतदा प्रेम करावे..

योगप्रभू
Wed, 04/27/2011 - 12:51 नवीन
काल एक सुंदर पुस्तक माझ्या संग्रहात समाविष्ट झालंय. मी भान हरपून ते वाचतोय आणि आनंदलहरींनी सुखावतोय. त्या पुस्तकाचे नाव आहे. 'जगावे का आणि कशासाठी?' लेखक : डॉ. वि. रा. करंदीकर, स्नेहल प्रकाशन, पुणे. प्रथमावृत्ती २००९. पृष्ठे १९६, किंमत १७५ रुपये. या पुस्तकाच्या समारोपात म्हटले आहे, की
विश्वचालक शक्तीशी तादात्म्य पावणे, हे मानवी जीवनाचे अखेरचे ध्येय आहे. ते साध्य होण्यासाठी अनेक जन्मांची तपश्चर्या आवश्यक आहे. ती साधना 'सत्यं शिवं सुंदरम' ते सत् चित् आणि आनंद ही आहे, याचे स्मरण मनात सतत जागते ठेवावे. जगावे कशासाठी? तर ही आनंदयात्रा करण्यासाठी.
(या ओळी उद्धॄत करताना प्रकाशकांची परवानगी घेतली आहे.)
  • Log in or register to post comments

विश्वचालक शक्तीशी तादात्म्य पावणे

सुधीर
गुरुवार, 04/28/2011 - 00:30 नवीन
हमम् ! पुस्तकाबद्धल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

सही

विनायक प्रभू
Wed, 04/27/2011 - 13:14 नवीन
स्वत: चे प्रश्न स्वत: सोडवतो अशी सही वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments

आपण तर बॉ टार्‍या कसे मिरे

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/27/2011 - 13:34 नवीन
आपण तर बॉ टार्‍या कसे मिरे वाटतो ते बघायला आंतरजालावर जगत आहोत.
  • Log in or register to post comments

जगणे

स्मिता.
Wed, 04/27/2011 - 15:01 नवीन
विषय बघून तो टार्‍याने काढला आहे यावर आधी विश्वासच बसला नाही. पण त्याने बर्‍याच वेळा सांगितलं की खरोखरच त्याला असं प्रश्न पडलाय आणि मी विचार करायला सुरुवात केली. बर्‍याच मिपाकरांनी समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. पण खरंच हा विषय साखळी सारखा आहे, एका प्रश्नाच्या उत्तरात दुसरा प्रश्न असलेला! टार्‍या, गंभिरपणे विचार करून एवढंच पुढे आलं की किमान आपण जन्म आपल्या मर्जीने घेतलेला नाही तर आपल्या आई-वडिलांनी काहितरी अपेक्षेने आपल्याला जन्माला घातले. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आपण जगत असतानाच दरम्यान आपल्या अपेक्षा निर्माण होतात आणि आपण या सामूहिक अपेक्षापूर्तीसाठी जगतो असं वाटतं. ज्या अपेक्षेने आई-वडील अपत्याला जन्म देतात त्याच अपेक्षेने ते अपत्य मोठे होऊन स्वतःच्या अपत्याला जन्म देते. कारण मध्यंतरीच्या काळात या समाजाचे, त्याच्या अपेक्षांचे संस्कार त्या अपत्यावर झालेले असतात. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शेवटी माणूस हा एक सजीव प्राणी आहे आणि इतर प्राण्यांमधे जे 'बेसिक इंस्टिंक्ट' आहे तेच माणसात आहे. त्यामुळे आपण जगत राहतो. सर्वसामान्य माणसाला पाहिलं तर तो आई-वडिल, भाऊ-बहीण, नवरा, बयको, मुलं, नातवंडं यांच्यासाठी जगत असतो, असं आपण म्हणतो. पण रस्त्यावरचा एखादा भणंग भिकारी, ज्याच्या मागे-पुढे कोणी नाही, ज्याला घर-दार नाही, अंगावर धड कपडे नाही की पोटाला २ घास नाही, जगत असतोच ना? त्याला कोणी समोर येऊन गोळी घातली तर मरणाची भीती वाटतेच ना? इतर प्राण्यांपेक्षा माणसाचा मेंदू प्रगत आहे म्हणून त्याने आपल्याभोवती संसाराचं जाळं करून घेतलंय आणि ते त्याला जगायला भाग पाडतं हे खरं असलं तरी प्रत्येक सजीव जगण्याच्या नैसर्गीक प्रेरणेमुळे जगत राहतो. ------------------------------------------------------------- अवांतरः- परवाच गप्पा मारताना विषय निघाला की मुलं हवीतच कशाला? असेही आता कोणती मुलं म्हातार्‍या आईवडिलांजवळ राहतात आणि त्यांची सेवा करतात? बहुतेक लोक म्हणतात मुलं होईपर्यंत सगळं चांगलं होतं. मुलं झाल्यावर जबाबदार्‍या वाढल्या, ताण वाढले, इ.... आजकाल मानवात पुनरूत्पादन हा 'बेसिक इंस्टिंक्ट' राहीलेला वाटत नाही. पण जास्त चर्चेनंतर असं लक्षात आलं की आपण तरूण असेपर्यंत आपले आई वडील बहुदा हयात असतात. लहानपणापासून आपले सुख-दु:ख त्यांच्यासोबत आपण वाटत असतो. पण आपल्या उतार वयात आपले आई वडील हयात असण्याची शक्यता फार कमी असते. तेव्हा आपले सुख-दु:ख वाटून घ्यायला आपल्या रक्ताच्या नात्याचे लोक पक्षी मुलं सोबत हवेत, नाहीतर आपण या जगात पार एकटे पडू या सुप्त प्रेरणेतून (स्वार्थ म्हणायला हवं की नको माहिती नाही) जोडपी अपत्य जन्माला घालतात. अर्थात आमच्या गप्पांत सुशिक्षीत (संतती नियमन करणारी) जोडपीच गृहीत होती. कारण मुलं झाली म्हणून आहेत असाही समाज आहेच.
  • Log in or register to post comments

माणूस आणि प्राणी

विटेकर
Wed, 04/27/2011 - 16:48 नवीन
त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शेवटी माणूस हा एक सजीव प्राणी आहे आणि इतर प्राण्यांमधे जे 'बेसिक इंस्टिंक्ट' आहे तेच माणसात आहे. त्यामुळे आपण जगत राहतो. आहार निद्रा भय मैथुनं च | सामान्यमेत्म पशुभिर्नराण म | धर्मोहितेषां अधिको विशेषा: धर्मेण हिना: पशु: भिसमानः || (संस्कृत शुद्ध लेखन चू. भू. द्या. घ्या.) Eating , sleep , fear and sexual instict are common to both human beings & animals . It is Dharma which seperates teh two because without Dharma the human being is same as the animal
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

बहुत जन्मांचा सेवट। नरदेह सांपडे अवचट।

विटेकर
Wed, 04/27/2011 - 16:33 नवीन
बहुत जन्मांचा सेवट। नरदेह सांपडे अवचट। येथें वर्तावें चोखट। नीतिन्याये॥ शत वरूषें वय नेमिले।त्यांत बालपण नेणतां गेलें। तारुण्य अवघे वेचलें । विषयांकडे ॥ वृद्धपणीं नाना रोग । भोगणे लागें कर्मभोग । आतां भगवंताचा योग । कोण बळें॥ लोक मरोंमरो जाती। वडिलें गेली हे प्रचिती । जाणत जाणत निश्चिती । काय मानिलें ॥ अन्न गृहांसी लागला । आणि सावकास निजेला। तो कैसा म्हणांवा भला । आत्महत्यारा ॥ तरी आतां ऐसें न करावें।बहुत विवेके वर्तांवे । इह लोक परत्र साधावें । दोहींकडे ॥ परमार्थ जन्माचे सार्थक । परमार्थ संसारी तारक । परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकांसी ॥ परमार्थ तो राज्यधारी । परमार्थं नाही तो भिकारी। या पर्मार्थाची सरी। कोणास द्यावी॥ अनंत जन्मीचे पुण्य जोडे । तरी च परमार्थ घडे। मुख्य परमार्थ आतुडे। अनुभवासी॥ जेणें परमार्थ वोळखिला। तेणें जन्म सार्थक केला। येर तो पापी जन्मला।कुलक्शयाकारणें॥ भल्याने परमार्थी भरावें । शरीर सार्थक करावें। पूर्वजांसी उद्धरावें। हरिभक्ती करुनी॥ धन्य धन्य हा नरदेहो।येथील अपूर्वता पाहो। जो जो कीजे परमार्थालाहो। तो तो पावें सिद्धितें॥ या नरदेहाचेनि लागवेगे । येक लागले भक्तिसंगे। येकी परम वीतरागें । गिरिकंदरे सेविली ॥ या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें । मुख्य सारासारविचारें । बहुत सुटलें ॥ या नरदेहाचेनि संमंधे । बहुत पावले उत्तम पदें । अहंता सांडून स्वानंदे । सुखी जाले ॥ पशुदेही नाहीं गती। ऐसें सर्वत्र बोलती। म्हणौन नरदेहीं च प्राप्ती । परलोकाची॥ तत्वग्यानी योगाभ्यासी । ब्रह्मच्यारी दिगंबर संन्यासी । षट दर्शनी तापसी । नरदेहींच जालें॥ म्हणौन नरदेह श्रेष्ठ । नाना देहां मध्ये वरिष्ठ । जयाचेनी चुके आरिष्ट । येमयातनेचें ॥ जय जय रघुवीर समर्थ !
  • Log in or register to post comments

बहुत जन्मांचा सेवट। नरदेह सांपडे अवचट।

sagarparadkar
Wed, 04/27/2011 - 17:04 नवीन
मी चुकून "नरदेह सांपडे चावट।" असेच वाचले :) बाय द वे हे 'अवचट' कोण? :) :) :) अवांतरः टारूभाऊंनी एक भलतंच लचांड लावून दिलंय सर्वांच्या डोक्याला .... मधेच कुठे एकदम वाट भरकटला कोणास ठाऊक
  • Log in or register to post comments

असतील हो कोणी तरी

सुधीर१३७
Sat, 04/30/2011 - 13:47 नवीन
असतील हो कोणी तरी तुमच्यासारखे खवचट .. कशाला उगा नस्त्या उठाठेवी.... :wink: (sagarparadkar, ह.घ्या.) ... अवांतरः टारूभाऊंनी एक भलतंच लचांड लावून दिलंय सर्वांच्या डोक्याला .... मधेच कुठे एकदम वाट भरकटला कोणास ठाऊक .... नाही हो, टारुभाउचे नेहमी भरकटणारे तारु आता जरा नीट चालायला लागलय... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Wed, 04/27/2011 - 17:11 नवीन
तुम्हाला माहित्ये का तुम्ही का जगताय ?
मरत नाई तव्हर मानुस जगतोय तस आमी बी जगतोय. जव्हा कव्हा मरनार तव्हा जगन संपलेल असनार! आन आस हाय कि मरन हाय म्हनुन जगन्याला किंमत हाय! नाय त कोन ईचारतो जगन्याला?
  • Log in or register to post comments

एक फुकटचा सल्ला

पंगा
Wed, 04/27/2011 - 18:07 नवीन
'आपण का जगतो' हा प्रश्न सोडून देऊन 'च्यायचे हे बाकीचे का जगून राहिलेत' या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात लक्ष घालावे. मूळ प्रश्न सोडून दिल्याने सुटणार नाही, परंतु उपप्रश्नाने त्याची दाहकता (असल्यास) कमी होण्याची शक्यता आहे, एवढेच.
  • Log in or register to post comments

अनेक तत्वज्ञ असे म्हणतात की

निनाद मुक्काम …
Wed, 04/27/2011 - 19:03 नवीन
अनेक तत्वज्ञ असे म्हणतात की ''खाणे ,पिणे ,निद्रा ,मैथुन ह्या क्रिया करण्यासाठी मानवाने जगणे म्हणजे जनावरासारखे जगणे '' ( थोडक्यात माणूस म्हणून जीवन सार्थकी लावण्यासाठी .........) त्यांचा आदर राखून मला असे विचारावेसे वाटते की निसर्गाने प्रत्येक प्राणिमात्राला त्याच्या जगण्यासाठी त्यांचा कोणता न कोणता अवयव विकसित केला आहे . वाघ किंवा सिंह ह्यांचे नखे व सुळे विकसित तर वटवाघूळ अंधारात पाहू शकते किंवा अशी अनेक अनेक उदाहरणे .आहेत . मानवाला निसर्गाने विकसित मेंदू दिला आहे .( म्हणून मानवाने स्वतः इतर प्राण्यापेक्षा विकसित समजावे का ?) गाय ही देवता मानायची व तिच्या पाडसाच्या वाट्याचे दुध स्वतः प्यायचे. तिच्या नवर्याला देव न मानता राबवायचे. व एक दिवस पोळा साजरा करायचा. किंवा जगातील सर्वोत्तम शिकारी जमात असलेल्या कुत्र्याला पाळीव बनवायचे. किंवा ह्या वसुंधरेचा उपभोग घेतांना इतर वन्यजीवांना प्राणी संग्रालयात ठेवायचे. जणू काही मुक्त जगण्याचा अधिकार फक्त आपल्याला आहे . पुष्कळ वेळा'' अरे जनावरासारखा का वागतो''. असे विधान करून जनावरे वागतात ते नीच प्रतीच व आपण मानव असल्याने आपले जीवन उच्च प्रतीचे असा दुजाभाव का ? आपणच निर्माण केलेली मुल्ये व आदर्श जपायची . रूढी ,परंपरा आपणच जपायची व त्यासाठी भले कोणत्याही ठरला जावे लागले तरी बेहत्तर. .निसर्गातील आदी शक्तीस विविध नावाने संबोधीत करायचे .व त्यावर काही समूह एकट्याचा मालकी हक्क सांगून आपापसात राडा घालायचा .देव ,खुदा , असे विविध नावाने ह्या निसर्गातील शक्तीला संबोधिले. की मग त्यांच्या नावावर मानव अनेक गोष्टी आपल्या समूहावर लादतो. .व सोवळ्यात मला कुणी शिवेल ही भीती बाळगत देवपूजा करतो. ह्यात भक्ती पेक्षा भीती अधिक असते .असे हे भक्ती कम भीतीयुक्त जीवन काय कामाचे .( आपल्या खाण्यात लसूण आहे का अभक्ष ) आहे हे हॉटेलात जाऊन वेटर ला विचारणारे पहिले की वाटते ''अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म ''जे समोर आहे ते खा की गुपचूप .) नीती मूल्यांच्या संकल्पना ह्या स्थळ व कालपरत्वे बदलतात .हे सत्य माहीत असून देखील .आमच्याच कल्पना खर्या असे मानून इतरांना कमी लेखायचे . मला एक कळत नाही ,मनुष्य हा सुद्धा एक प्राणी आहे ( होमो सेपियन ) त्याला निसर्गाने ही धरती आंदण दिली नाही आहे .तेव्हा एखादा माणूस हा इतर प्राण्यासारखे खाणे पिणे व इतर गोष्टींसाठी जगला तर त्यात काय वावगे आहे .? आज अनेक वर्ष डायनासोर हे ह्या धरणीचे सम्राट होते .माझ्या मते निसर्गाने दिलेल्या शक्तीच्या आधारावर ते आपले एक युग निर्माण करू शकले .पण त्यांना सुद्धा आपला बाडबिस्तरा येथून गुंडाळायला लागला . आज माणूस खर्या अर्थाने आपले स्वामित्व ह्या धरतीवर आपल्या विकसित मेंदूच्या जोरावर १५ ते २० हजार वर आधी निर्माण केले .( ५ हजार पुढे मागे असतील ) करोडो वर्षाच्या ह्या धरतीवर मुळात होमो सेपियन हे काही लाख वर्षाआधी आले .मग कशाला उगाच प्रगत असल्याची शेखी मिरवायची . आज इतर ताऱ्यांचे काही प्रकाश वर्ष हे अंतर मानवासाठी त्यांच्या प्रगतीची मर्यादा स्पष्ट करतात .तेव्हा उगाच मोठा आव न आणता आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगावे असे मला वाटते ..आयुष्य जगण्याचे विविध उद्दिष्टे असणारी काही प्रातिनिधिक उदाहरणे प्रकाश आमटे ( आदिवासी लोकांच्या कल्याणसाठी ,समाज सेवेसाठी ) बिल गेट व मुकेश अंबानी ( ह्यांना पैसा खर्च करण्यापेक्षा कमवण्यात जास्त रस असतो .) विजय माल्या ( ह्यांना कमवण्यात व योग्य ठिकाणी गमावण्यात जास्त रस असतो ) तमाम भारतीय राजकारणी ( ह्यांना पैशापेक्षा सत्ता व तिचे अमर्याधीत अधिकार उपभोग्यात जास्त रस असतो ) अनेक आजी माजी महात्मे व बुवा ( ह्यांना व्यक्ती पूजा करून घेण्यात व स्वतःचे विचार ,आचार ,मानसिकता लोकांच्या गळी उतरवण्यात जास्त रस असतो .) लता ,आशा .सचिन ( हे आपल्या छंदाचे व आवडीचे रुपांतर आपल्या व्यवसायात करतात त्यामुळे कर्म वादास जागून हे आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ असतात .) सावरकर ,भगतसिंग ( ह्यांचे जीवन उद्देश म्हणजे जो माय भूमीसाठी जगणे व मरणे) अत्रे , चार्ली ,भाई ( हसवणे हा ह्यांचा धंदा व हसवण्यातून समाजातील व्यंगांवर नेमेके बोट ठेवून समाजप्रबोधन करणे हा जोड धंदा ) थोडक्यात काय तर प्रत्येक माणसाचे जगण्याचे उद्देश वेगवेगळे असतात . आमचा एक मित्र ह्या साठी जगतो . तर मी स्वतः जगतो ते आयुष्याच्या शेवटी आपल्या पोरांना सांगायला की '' हमने दुनिया देखी हे '' भटकंती करणे त्यामागील उद्देश जगभरातील खाद्य ,पेय संस्कृती ,. जगातील विविध भागातील प्रदेश ,निसर्ग , तेथील माणसे त्यांची संस्कृती, .त्यांची मानसिकता जवळून पहाणे ..अर्थात रमेश मंत्री करतात तसा मनाजोगता प्रवास करावा . हे माझे जगण्याचे सबळ कारण आहे .
  • Log in or register to post comments

प्रवासीच

सुधीर
गुरुवार, 04/28/2011 - 01:57 नवीन
माझा मते, मी का जगतोय? ह्याच कालखंडात, ह्याच भौगोलिक परिस्थितीत (टाइम & स्पेस) का जगतोय? वा अशा इतर अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणं, चित्त स्थिरावणं, कर्माची जाणीव होणं, सुख-दु:खातलं अंतर कमी होणं आणि मोक्षाचा मार्ग कळणं ह्या सगळ्यांची एक साखळी असावी. आयुष्य हा प्रवास (ट्रेक?) मानला, तर प्रवासात ह्या पहिल्या टप्प्याच्या मुक्कामा पर्यंत पोहोचणं प्रथम गरजेचं आहे. भक्तीयोग, कर्मयोग, नि:स्वार्थी प्रेम (वा इतर मार्ग) आपल्याला ह्या टप्प्यापर्यंत घेऊन येतात (बहुदा अतीव दु:ख, निराशा ह्या नंतरच). पुढचा मार्ग/टप्पा नक्कीच सोपा नसावा. पण मार्ग कळणं हेही नसे थोडकं!
  • Log in or register to post comments

माझ्या मते जीवन जगणे म्हणजे

सांजसखी
गुरुवार, 04/28/2011 - 02:05 नवीन
माझ्या मते जीवन जगणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्यासोबत वाहणारा काळ व्यतीत करत जाणे.... बाकी सारा येणा-या जाणा-या श्वासांचा कचरा... जो घेणं वा सोडणं आपल्या हातात नाहीये..
  • Log in or register to post comments

आन॑दासाठी

kamalakant samant
गुरुवार, 04/28/2011 - 10:56 नवीन
मला असे वाटते की, आपण केवळ आन॑द मिळविण्यासाठी जगतो. लहानपणचे म्हणजे जेव्हा काही कळत नसते,ते॑व्हाचे जाउद्यात,पण कळायला लागल्यावर आपल्या बहुता॑शी क्रुती या आन॑द मिळविण्यासाठीच असतात असे वाटते. मग ती कुठलिही गोष्ट असो.अगदी सिगारेट जरी ओढली तरी ती काहितरी आन॑द मिळविण्यासाठीच ओढतो. आम्हाला जे भासते,दिसते त्यापासून इ॑द्रिया॑द्वारा आन॑द घेण्याचा प्रयत्न करत असतो.आणि त्यापासून आन॑द घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच जगत असतो.अर्थातच त्यातील द्रुष्य गोष्टि॑च्या नियमानुसार त्याबरोबर आन॑द व दु:ख दोन्ही येणार्.पण स्वभावत: माणसाला आन॑द हवा असल्याने पुन्हा तशाच दुसरया गोष्टि॑कडे तो वळतो व आन॑द मिळविण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात आन॑ददायी(क्षणिक का होइना) असले पाहिजे म्हणून तर आपण जगतो.
  • Log in or register to post comments

टार्झनराव

शरभ
गुरुवार, 04/28/2011 - 17:02 नवीन
टार्झनराव, तुम्हि age of empires खेळला आहत का ? नसाल तर एक्दा खेळुन बघा..... त्यामधे आपण माणस तयार करतो आणि त्याना काहि काम देतो....साधरण मरेपयण्त ते ती करत राह्तात.... for a moment, विचार करा कि तुम्हि त्यात्ले आहात...मग स्वताला विचारा का जगताय ? उत्तर मिळालेल असेल कदाचित.....
  • Log in or register to post comments

पुलंचे एक प्रेरणादायी पत्र

विटेकर
Fri, 04/29/2011 - 10:19 नवीन
पु लंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केला होता ज्यामध्ये पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाचं अतिशय निर्मळ विवरण स्वत: पु लंनी एका पत्रातून केलेलं आहे. या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं. त्याचंच हे उत्तर - १० जुलै १९५७, प्रिय चंदू रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे. तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस? पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच. तू तुझ्या पत्रात अखिल जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही? तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही. तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे! तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे. तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो. हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का? जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल! लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable? माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो. कळावे, भाई
  • Log in or register to post comments

छान पत्र आहे. आधी वाचलेलं

llपुण्याचे पेशवेll
Fri, 04/29/2011 - 10:46 नवीन
छान पत्र आहे. आधी वाचलेलं होतं. पुनर्वाचनाचा आनंद मिळाला. धन्यवाद. पुण्यात वसेकर नावाचे एक गृहस्थ ह्याच पत्राचा आधार घेऊन "मी आणि पुलंचा चष्मा" अशा नावाचा एक कार्यक्रम सादर करतात. त्यात हे पत्र सगळ्यात पहील्यांदा ऐकलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

पुलंच हे पत्र आधी एकदा वाचलं

किसन शिंदे
Fri, 04/29/2011 - 10:53 नवीन
पुलंच हे पत्र आधी एकदा वाचलं होतं...परत एकदा वाचलं. वाचल्यानंतर हे सर्वात जास्त लक्षात राहतं.. तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

खूप सुरेख पत्र. इथे

यशोधरा
Fri, 04/29/2011 - 13:13 नवीन
खूप सुरेख पत्र. इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

सहमत

रामदास
Sat, 04/30/2011 - 09:32 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मला कुंथुन कुंथुन विचार करुन

विजुभाऊ
Fri, 04/29/2011 - 11:52 नवीन
मला कुंथुन कुंथुन विचार करुन ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही. कायम कायम चूर्णाचा संग्रह आणी वापर कर . सवय बंद होईल दिलसे उत्तर :- टार्‍या कधीतरी पुलंच्या अपूर्वाइतील काही ओळी वाच " गड्या तू वंशाचा दिवा नसून दुवा आहेस........" त्या उतार्‍यात त्यानी संस्कार म्हणजे काय या बद्दल मार्मीक टीप्पणी दिली आहे. पुलंचेच " एक नापास आजोबा" वाच इतरांचे ठाऊक नाही. लोक जगावे कसे या बद्दल बोलतात. पुलनी जगावे कशासाठी या बद्दल गूज लिहीलय त्यांचे विचार या इथे वाच http://www.puladeshpande.net/jskj.php
  • Log in or register to post comments

हे कुठे मिळेल?

पंगा
Fri, 04/29/2011 - 22:16 नवीन
पुलंचेच " एक नापास आजोबा" वाच
हे कुठे मिळते हो आजकाल? याची वरिजनल कापी (दरवर्षीच्या प्रथेस अनुसरून) कुठल्याश्या सालच्या 'कालनिर्णय'च्या जानेवारीच्या पानामागे (ज्योतिर्भास्कर साळगांवकरांच्या राशिभविष्या(च्या कॉलमा)स खेटून) वाचल्याचे आठवते. हल्ली त्याची स्वतंत्र कापी मिळू लागली आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

| पुलंचेच " एक नापास आजोबा"

सुधीर१३७
Fri, 04/29/2011 - 22:39 नवीन
| पुलंचेच " एक नापास आजोबा" वाच हे कुठे मिळते हो आजकाल?>>>>>>>>>>> >>>>>> मिळते ना विजुभाऊंकडे.................. :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा