✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

झरण

र
रामदास यांनी
Tue, 04/12/2011 - 13:24  ·  लेख
लेख
लिहीतो आहे ते चर्‍हाट आनि पाल्हाळच आहे पण जसं आठवतं आहे आणि आठवतं आहे तोपर्यंत लिहावंच असं म्हणत लिहीतो आहे . म्हणजे ही गोष्ट डोंबीवलीची आहे. फक्त चार फलाट असलेले स्टेशन होते तेव्हाची. तेव्हा दिवा हे गुंड लोकांचं गाव आणि भांडूप तडीपारांचं गाव असं म्हटलं जायचं. नवडोंबीवली नावाची सोसायटी उभी राहत होती तेव्हा डोंबीवलीच्या घरांना भयगण्ड झाला नव्हता आणि दरवाजाच्या बाहेर लोखंडी जाळीचे सेफ्टी डोर नव्हते. नव डोंबीवली सोसायटी आणि जळगावचे टँकरमधले दूध जवळजवळ एकाच वेळी डोंबीवलीत आले. डोंबीवली म्हणजे फक्त डोंबीवली . ठाकुर्ली वेगळीच. तेव्हा चोळा पावर हाऊसच्या नळकांड्यातून काळा धूर येत होता आणि ठाकुर्ली स्टेशनच्या फलाटावर पण कोळशाची पावलं उमटायची . बारा बंगल्याची शान टिकून होती आणि नवनाथ गॅंग आणि पनवेलकर गॅंगची कोळशाच्या राखेसाठी खून पाडत नव्हते त्यासुमाराची गोष्ट, ठाकुर्ली आणि डोंबीवली एकमेकाच्या पायापायात येत नव्हते .सवा जोशी शाळेत ठाकुर्लीहून जायचे तर भाताची खाचरं आणि वांग्याच्या आकाराचे पिवळे हिरवे बेडूक तुडवत जायला लागायचं त्या दरम्यानची समजा .. फारच लांबलचक होतंय पण नवडोंबीवली च्या बाजूला नवरे वखार त्यानंतर आफळे राम मंदीर त्यानंतर ओतूरकर कला मंदीर . एक लाख चिमण्या एकाच वेळी चिवचिवतात ते मोठ्ठं झाड पण पाटकर बंगल्याच्या बाजूला नव्हतं तेव्हाची ही गोष्ट आहे. पंचायतीची विहीर होती आणि पाण्याची पंचाईत नव्हती तेव्हाच्या डॉबीवलीची गोष्ट. पाच मुलींच्या पाठीवर मुलगा झालेल्या (सहाच्या सहा बाळतपणं डॉक्टर वर्द्यांच्याच हातानीच )भक्कम बायका बालटीभर धुणं पाचशे एक च्या बारनी धोका आपटत धुवायच्या आणि मग घामानी थबथबलेल्या कपाळावर ओघळलेल्या दरबार गंधाची खूण नेटकी करून पुन्हा खाकी पावडर लावून कामाला लागायच्या त्या काळची गोष्ट . (ज्यांच्या कडे पाचशे एक बार नव्हता त्यांच्या हिरण छाप काळा साबण होता आणि पैसेवाल्यांकडे सनलाईट बार होता) मग डॉबीवली भरत गेली म्हणजे आंतर जिल्हा तांदूळ बंदी होती तेव्हापासून . सवा जोशीच्या बरोबर साऊथ ईंडीयन एज्युकेशन सोसायटीची शाळ आली. आता आपण ज्याला फ्लॅट म्हणतो त्याला तेव्हा लोकं ब्लॉक म्हणायची . म्हणजे या दहा ओळीच्या पाल्हाळात दहा वर्षं पुढे आलोच की आपण. आधी नवर्‍यांच्या वखारीवर पत्ता विचारला की पुरेसा व्हायचा आता मात्र बोडस मंगल कार्यालयाच्या पुढे आल्यावर पत्ता शोधायला लागायचा. पत्ता विचारण्याची खूण आता लागायला लागली होती आणि या खूणेला मराठीत लँड मार्क म्हणायचे नाहीत . ओतूरकरांच्या पुढे शेताडीत चाळी उभ्या राहील्या आणि शेताडीतल्या एका चाळीवर भिंतभरून पहीली जाहीरात लागली झरणची. भिंतीवरची त्या काळ्ची पहीलीच जाहीरात. आता गनी आर्ट्सवाला रेल्वेच्या भिंतीचे महीन्याला अडीच लाख घेतो म्हणे.ते जाऊ देत.तर झरणची जाहीरात म्हणजे लांब केस मोकळे सोडलेली बाई .तिच्या बाजूला एक छोटीश्शी कुपी आणि मोठ्ठ्या अक्षरात लिहीलं होतं झरण . गाडीतून जाताना झरणची जाहीरात दिसायची . स्लो गाडीतून जाताना झरण दिसलं की दिव्याला किंवा मुंब्र्याला उतरणारे ऊठून उभे रहायचे. डोंबीवलीत रहाणारे पत्ता सांगताना झरण पर्यंत सरळ या मग डावीकडे किंवा उजवीकडे या असं वगैरे सांगायचे . झरणची छोटीशी कुपी बाजारात मिळायची . पाव किलो खोबरेलात मिसळली की हिरवंशार केशतैल तयार व्हायचं . एकूणीसशे साठ सालचागुजरात अ‍ॅरोमॅटीक्स चा ब्रँड. प्रकाशचं माक्याचं तेल किंवा दुनाख्यांचं शकुंतला हेअर ऑईल महाग पडणार्‍यांसाठी परवडणारे तेल. दरबार गंध- खाकी पावडर -पाचशे एक बार -धनतक का डबल बी साबण -सनलाईट बार -डालडा असे काही मोजकेच ब्रँड तेव्हा होते . मग गिरगावतली आणि गिरणगावतली माणसं रहायला इकडेच आली. खानदेशी मास्तरं आली . तीनशे ग्रॅम भाजी घेणारी जोडपी आली. गाडगीळ चीफ ऑफीसर झाले -हेरंब सोसायटीसारखे शंभर लँडमार्क तयार झाले सुबत्ता आली आणि झरण तेल नाहीसं झालं पण -डोंबीवली पूर्व झरणच्या पुढे -हा पत्ता कायम तसाच राहीला. झरण म्हणजे एक अजरामर लँडमार्क झाला . गुजराथ अ‍ॅरोमॅटीक डायरसाहेबाना (ब्रँडच्यामालकांना)पण डोंबीवलीच्या झरणचा इतिहास माहीती आहे की नाही ...क्या पता ? माझी पण एक गडबड झाली मी झरण च्या ब्रँड बद्दल लिहीणार होतो पण ह्या झरणच्या कुपीचं बुच्चू काढलं आणि डोंबीवलीचा इतिहासच त्यातून भळभळून बाहेर पडला. आता ह्यात माझी काय चूक बरं ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
26309 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

आवडले

सुवर्णमयी
गुरुवार, 04/14/2011 - 02:59 नवीन
रामदास, नेहमीप्रमाणे तुमचे हे लेखनही आवडले . अगदी प्रवाही आणि सहज..असे.
  • Log in or register to post comments

फार सुंदर लिखाण !

ज्ञानेश...
गुरुवार, 04/14/2011 - 12:01 नवीन
फार सुंदर ! 'आवडले' हा शब्द अगदीच अपुरा आहे काय वाटले ते सांगण्यासाठी. स्पा आणि निनादचे प्रतिसादही छान !
  • Log in or register to post comments

मस्तं !

प्राजक्ता पवार
गुरुवार, 04/14/2011 - 14:27 नवीन
लेख आवडला .
  • Log in or register to post comments

निशब्द

चिंतामणी
Fri, 04/15/2011 - 00:59 नवीन
माझी पण एक गडबड झाली मी झरण च्या ब्रँड बद्दल लिहीणार होतो पण ह्या झरणच्या कुपीचं बुच्चू काढलं आणि डोंबीवलीचा इतिहासच त्यातून भळभळून बाहेर पडला. आता ह्यात माझी काय चूक बरं ? निशब्द
  • Log in or register to post comments

मस्त

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 05/05/2011 - 11:46 नवीन
आठवणी कशा लिहाव्यात याचा उत्कृष्ट नमूना. तुम्हाला असला आठवणींचा खजिना रिकामा करण्यासाठी काय द्यावे लागेल बरे ? आणि आम्हाला त्याचा आनंद लुटावा असे वाटणे यात आमची काय चूक ?
  • Log in or register to post comments

परत थोडं उत्खनन.

आदूबाळ
Sat, 08/17/2013 - 15:53 नवीन
परत थोडं उत्खनन. :)
  • Log in or register to post comments

आदुबाळ, उत्खननाबद्दल लक्ष लक्ष धन्यवाद!

बहुगुणी
Sat, 08/17/2013 - 18:34 नवीन
रामदासांचा हा लेख वाचलाच नव्हता, बिका म्हणतात तसं 'डिटेलिंग' म्हणजे काय याचा रामदास हे आदर्श आहेत, आणि म्हणूनच पिडा म्ह्णतात तसं या दासाचाही स्वामींना नमस्कार! [रामदासांचं असं लिखाण वाचलं की या एन्सायक्लोपेडिक (खरोखरीच्या बहुगुणी!) माणसाने 'जोपर्यंत आठवतं आहे तोपर्यंत लिहावं' असं म्हणून आम्हाला धास्तावू नये, तुमची स्मरणशीलता कायमच अबाधित राहो इतकीच सदिच्छा!]
  • Log in or register to post comments

__/\__

तुमचा अभिषेक
Sat, 08/17/2013 - 19:24 नवीन
__/\__ यापेक्षा सुंदर पाल्हाळ नसावं ! उत्खनन केलेल्याचे धन्यवाद
  • Log in or register to post comments

अप्रतिम.. कसदार लेखन

दत्ता काळे
Sat, 08/17/2013 - 21:01 नवीन
हा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद. जुनी डोंबिवली..१९७६ ते १९८३ ह्या सुमारास मी डोंबिवलीमध्ये रहात होतो. कोपररोडला. फिरायला जायचं ठिकाण टेकडी नाहीतर ठाकुरली. त्यावेळी ठाकुरलीला एकच रस्ता होता. अतिशय निसर्गरम्य. बाजूनी दाट झाडी. त्यात दडलेले रेल्वे ऑफिसर्सचे बंगले. निर्मनुष्य आणि शांत रस्ता होता.
  • Log in or register to post comments

झरण...!!!!!

विनोद१८
Sun, 08/18/2013 - 00:05 नवीन
धन्यवाद..रामदासजी....!!!! माझ्या डोम्बिवली व झरण बद्दल भरभरुन लिहील्याबद्दल.... आज हा लेख वाचला आणि आनन्द झाला. १९७७ ते २००० पर्यन्त झरणच्या मागे म्हात्रे नगरमध्ये राहिलो आता गोग्रासवाडीत. खरेच किती सुन्दर होती आमची डोम्बीवली तेव्हा....!!! रामदासजी आजही आपण डोम्बीवलिकर आहत काय ??? विनोद१८
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा