✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रूममेट

ज
ज्ञानेश... यांनी
Wed, 02/09/2011 - 10:24  ·  लेख
लेख
सकाळचे साडेसात. तू आपल्या बेडवर अजगरासारखा अस्ताव्यस्त पसरलेला आहेस. ओठाच्या कोपर्‍यातून ओघळलेला मुखरस तुझी कळकट्ट उशी भिजवतो आहे. हेही तसे रोजचेच. गेल्या काही शतकांत साबणाचा स्पर्शही न झालेला तुझा टॉवेल अर्धा बेडवर, अर्धा जमिनीवर असा लोळतोय. गेली तीन वर्षे सातत्याने हेच दृष्य मला सकाळी उठल्यावर दिसते आहे. त्याला कारणही आहे म्हणा. तुझी सातत्याने नाईट शिफ्ट, आणि माझी सकाळची. मी निघण्याच्या तासभर आधीच तर तू येऊन झोपलेला असतोस ! संध्याकाळी मी रूमवर येतो, तेव्हा तू जेवायला मेसवर आणि तिकडून परस्पर कामावर. आपण दोघेही जागृतावस्थेत असे रविवारीच थोडेफार येतो एकमेकांच्या वाट्याला. तेही, मी ट्रेकवर आणि तू तुझ्या मैत्रीणीच्या गावाकडे गेलेला नसशील तर ! तीन वर्षे झालीत मला या रूमवर येऊन. माझ्या आधीपासून तू इथे राहतोस. माझ्या आधी जो इथे रहात होता, त्याच्याही आधीपासून तू इथेच आहेस असे कळले. या रूमच्या रंगहीन, जुनाट भिंतीइतकाच तूसुद्धा या रूमचा अविभाज्य भाग असावास, असे मला कायम वाटत आले आहे. घरमालकही तुझ्यावर कधी गुरकावतांना दिसत नाही. तुझ्या निर्ढावलेपणाला तोसुद्धा सरावला असावा. आज मात्र मला तुझी चीड येत नाहीये. मला आठवताहेत, ते या रूममधले माझे सुरूवातीचे दिवस. नव्या जॉबची नवलाई, नवी स्वप्ने घेऊन माझा या नव्या शहरातला पहिला प्रवेश. आणि एका दूssssरच्या नातेवाईकाने एका स्वस्तातल्या इस्टेट एजंटकरवी मला मिळवून दिलेली ही रूम. (मी त्याच्याकडे मुक्काम टाकेन की काय अशी भीती असावी बिचार्‍याला !) त्यादिवशीसुद्धा झालेले तुझे पहिले दर्शन फारसे सुखावह नव्हते. सावळा, लुकडा आणि सर्वसामान्य किंवा कुरूपात जमा होणारा आपला देह घेऊन दुपारी केव्हातरी अंघोळ करून तू आपल्या अडीच इंच व्यासाच्या आरशात बघत दाढी कोरत होतास. निव्वळ साबण चोपडलेले तुझे गालफड खर्र खर्र असा त्रासदायक आवाज करत होते. रूमभर एक कुबट वास भरून राहिलेला होता, आणि कचरासुद्धा. नंतर मला त्याची सवय झाली, हा भाग अलाहिदा ! तू शब्दश: नि:संग आहेस. तुला कपड्यांचा साबण विकत घेतांना मी कधी पाहिलेले नाही. माझा कपड्यांचा साबण तरी वापरत असशील, अशी एक वेडी आशा माझ्या मनात आहे. अंघोळीचा साबण मात्र घेतोस विकत ! गोदरेज नंबर वन. तो बहुधा दाढीमुळे आवश्यक असावा. तुझी टूथपेस्ट ही द्रौपदीच्या थाळीसारखी असते. संपता संपत नाही. तुझे मोजून तीन ड्रेस दिसतात मला. आणि एक चौथा आहे, पण तो फक्त मैत्रिणीला भेटायला जातांना घालत असतोस. याशिवाय तुझ्याकडे एक चप्पल, एक ऍक्शनच्या स्पोर्ट शू ची पेअर, एक सोलापुरी चादर, एक ’रंग ओळखा’ टॉवेल, तेल, कंगवा, आणि एक पुस्तकांनी भरलेली ट्रंक एवढी जंगम मालमत्ता आहे. त्यातली पुस्तके कोणीही पाहिलेली नाहीत. मीसुद्धा. एकंदर आर्थिकदृष्ट्या तुझे फारसे बरे चाललेले दिसत नाही. तुला चहाशिवाय अन्य जिन्नस हॉटेलात किंवा टपरीवर घेतांना कोणी पाहिलेले नाही. तू स्वत:बद्दल फार कमी बोलतोस. किंवा एकूणातच घुम्या आहेस. तुझे माझे फारसे जमणार नाही, असे मला आधी वाटले होते. दुर्दैवाने माझा हा तर्क पडताळून पाहण्याइतकाही आपला सहवास कधी घडला नाही. तीन वर्षात आपण फक्त तीन वेळा सोबत हॉटेलात जेवलो. (ते तीनही माझे वाढदिवस होते !) हॉटेलात माझ्या मित्रांशीही तू कामाशिवाय एक शब्द बोलला नाहीस. याशिवाय एक सिनेमा पाहिला, जो अति टुकार असल्याने आपण इंटरव्हलमधून बाहेर पडलो, आणि माझ्या बाईकवर शहरभर भटकत राहिलो. तुला त्या दिवशी पहिल्यांदा आणि शेवटचेच आनंदात पाहिले मी ! तुझ्या एरवीच्या निर्विकारशा सामान्य चेहर्‍यावर ’आनंद’ ही भावना मोठी देखणी दिसत होती. (आदल्या दिवशी नक्कीच तुझ्या मैत्रिणीने काही आनंददायक सांगीतले असावे, असा तर्क मी केला.) त्या दिवशी रात्री दीड वाजता तुला कॉफी पिण्याची लहर आली चक्क ! मग आपण रेल्वे स्टेशनवरच्या ’कमसम’ मधे जाऊन बसलो, पहाटे चारपर्यंत. तिथे तू मला तुझ्या मैत्रीणीचे नाव सांगीतलेस. तिची आणि तुझी लव्ह स्टोरीसुद्धा थोडक्यात (दीड तासात) ऐकवलीस. मला झोप येत असल्याचे बघून तू आवरते घेतलेस. बिल देऊन मी बाईक काढली आणि आपण परतलो. अरे हो- तुला साधी बाईकसुद्धा चालवता येत नाही ! बस्स. तीन वर्षातल्या आपल्या दोघांच्या अशा एवढ्याच आठवणी. बाकी सगळी नुसती निरीक्षणे. त्या कॉफीवाल्या दिवसानंतर, खरं तर रात्रीनंतर तू पुन्हा आपल्या कोषात गेलास ते आजतागायत. नंतर आणखीही काही घडले असावे कारण एव्हाना तू अगदीच अबोल-- खरं तर मुका झाला आहेस. मी तुला कधी तुझ्या समस्यांबद्दल विचारले नाही, आणि तू स्वत:हून काही सांगायचा तर प्रश्नच नाही. मी विचारायला हवे होते का?? असे असूनही, आपले एक नाते तयार झाले. आपण मित्र आहोत का? बहुधा नाही. "रूममेट्स" हेच त्या नात्याचे नाव. आपण नकळत एकमेकांची काळजी घेतो. अगदी सहजच. आणि गरज नसेल तेव्हा दखलही घेत नाही एकमेकांच्या अस्तित्वाची. मला हे फार आवडते. तू, मी आणि ही टीचभर रूम मिळून एक स्वयंपूर्ण, एकजिनसी असे विश्व तयार झाले आहे- जे कुठल्याही बाह्य प्रेरणेशिवाय सुरळीत चालत असते. मानवी ह्रदयासारखे जणू. आपल्यात काही अलिखीत करार झाले आहेत. मला सकाळी घाई असते म्हणून तू बाथरूम मोकळे ठवतोस. मी गेल्यावर अंघोळ- तयारी करतोस. (यात बहुधा तुझीही सोय आहेच.) याबदल्यात मी रूम आवरून ठेवतो. माझा पेपर तुला दररोज वाचायला मिळतो. तुझा अडीच इंच व्यासाचा आरसा एव्हाना मीसुद्धा विनासायास वापरू लागलो आहे. मी कधी तुझ्या ट्रंकेतल्या पुस्तकांची, तुझ्या मैत्रिणीची, तुझ्या जॉबची चौकशी करत नाही. तूसुद्धा माझ्या दर रविवारच्या एकट्याने गड-किल्ले भटकण्यात कधी फारसा रस दाखवला नाहीस. माझ्या बाईककडे आणि कधीकधी दारात येणार्‍या शेळीकडे तू त्याच कोरड्या समभावाने बघतोस. तू चुकूनही माझ्या मोबाईलला हात लावला नाहीस. हल्ली हल्ली तू मला आवडू लागला आहेस ! तुझी आठवण नक्कीच येईल. हो, मी ही रूम सोडून जातो आहे. आठवडाभरापुर्वीच ठरले खरं तर. तुला सांगणारही होतो.. पण आपली भेट कुठे होते रे? एकाच छपराखाली राहणारे दोन अनोळखी जीव आहोत आपण. काल ड्यूटीवरून आल्यावर मी सामान पॅक करायला घेतले, तेव्हा विचारायला हवे होतेस तू. किंवा मी तरी सांगायला हवे होते. आज रविवार. त्यामुळे तुला वाटले असणार की मी नेहमीसारखी भटकण्याची तयारी करतो आहे. तू काहीच विचारले नाहीस ! आता सकाळी दहा अकरा वाजता उठशील तेव्हा तुला हे पत्र मिळेल. या पत्रावर ठेवलेले माझे FasTrack घड्याळ चुकून इथे राहिलेले नाही. ते तुझ्यासाठीच ठेवले आहे. मला माहित आहे, ते तुला फार आवडते म्हणून. तुझ्या मैत्रिणीला भेटायला जातांना कायम मागुन घ्यायचास. तू माझ्याकडून- दिवसभरासाठी का होईना, पण हक्काने मागून घेतलेली अशी ही एकच वस्तू ! आपण दोघांनी शेअर केलेल्या अवकाशातल्या काही क्षणांची यानिमित्ताने तुला आठवण येईल, अशी एक (वेडी?) आशा ठेऊ का? मिस करेन तुला. फोन कर. पेपर नको असल्यास त्या पोर्‍याला सांग तसे. परत या शहरात आलो, तर नक्कीच भेटेन तुला. मला खात्री आहे, तू याच रूममधे असशील, तेव्हाही ! तुझाच- रूममेट.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11744 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

+३ असेच म्हणते

सविता
Fri, 02/11/2011 - 18:58 नवीन
+३ असेच म्हणते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

वा, ज्ञानेशराव!

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/10/2011 - 04:22 नवीन
छान प्रकटन! लिखाण आवडलं!! आम्हाला आमचा अब्दुल खान आठवला... "इन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा!!!" ;)
  • Log in or register to post comments

उत्तम लिखाण ! अजून लिहा

मितान
गुरुवार, 02/10/2011 - 13:03 नवीन
उत्तम लिखाण ! अजून लिहा :)
  • Log in or register to post comments

ज्ञानेश, छान लिहिलं

शाहरुख
गुरुवार, 02/10/2011 - 20:48 नवीन
ज्ञानेश, छान लिहिलं आहे..आवडले !!
  • Log in or register to post comments

छान

धनंजय
Fri, 02/11/2011 - 05:40 नवीन
छान. (माझ्या अनेक रूममेटांपैकी एकाचे नाव ज्ञानेश होते की काय ते आठवून बघतो आहे...)
  • Log in or register to post comments

:-)

ज्ञानेश...
Fri, 02/11/2011 - 11:18 नवीन
पुन्हा एकदा, दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

मस्त लिहीले आहे!

फारएन्ड
Fri, 02/11/2011 - 06:06 नवीन
आवडले!
  • Log in or register to post comments

ज्ञानेश, छान लिहिलं आहे..आवडले !!

सुत्रधार
Fri, 02/11/2011 - 11:28 नवीन
पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

अतीव सुंदर

गवि
Fri, 02/11/2011 - 16:49 नवीन
अगदी मनातलं.. क्लोज टू हार्ट लिखाण.. खूप छान.
  • Log in or register to post comments

छान लिहलं आहे. आवडलं.

प्राजक्ता पवार
Fri, 02/11/2011 - 17:49 नवीन
छान लिहलं आहे. आवडलं. हॉस्टेलच्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पु. ले.शु.
  • Log in or register to post comments

छान लिहिलं आहे........

मनराव
Fri, 02/11/2011 - 18:33 नवीन
छान लिहिलं आहे........ ज्ञानोबा..........
  • Log in or register to post comments

सहज-सुंदर लेख! पुलेशु

मराठे
Fri, 02/11/2011 - 19:13 नवीन
सहज-सुंदर लेख! पुलेशु
  • Log in or register to post comments

सहज लिहिले आहे

निशदे
Fri, 02/11/2011 - 22:14 नवीन
त्यामुळे लेख प्रवाही झाला आहे......असे रूममेट कधी काळी माझेही होते. त्यामुळे लेख आवडला.....
  • Log in or register to post comments

खुप छान...

चिगो
Sun, 02/13/2011 - 19:57 नवीन
मस्त लिहीलय.. आमच्या सगळ्या जुन्या रुममेट्सची आठवण झाली.. पण त्यातले सगळेच सर्वगुणसंपन्न होते, कुणीच घुमा-बिमा नव्हता.. मजा यायची.. गेल्या काही शतकांत साबणाचा स्पर्शही न झालेला तुझा टॉवेल अर्धा बेडवर, अर्धा जमिनीवर असा लोळतोय. << आमच्या पण टॉवेलची थोडीफार हीच अवस्था असायची. चादर तर "भयानक" अशीच असायची.. :tongue: (पुर्वाश्रमीचा) अस्वच्छ चिगो
  • Log in or register to post comments

छान लेख

लवंगी
Sun, 02/13/2011 - 21:51 नवीन
मस्त लिहिलय.. डोळ्यापुढे उभा राहिला रुममेट
  • Log in or register to post comments

१ नंबर लिहिलंय. फास्ट

अप्पा जोगळेकर
Sun, 02/13/2011 - 23:41 नवीन
१ नंबर लिहिलंय. फास्ट ट्रॅकचं घड्याळ वाला प्रसंग आवडला.
  • Log in or register to post comments

लेख खुप छान आहे. मी पण

प्रितेश सुभाश रणदिवे
Sun, 02/20/2011 - 17:28 नवीन
लेख खुप छान आहे. मी पण होस्तेल वर राहात अस्ल्यने we had exactly same conditions in the room, you touched by your description. thanks a lot.
  • Log in or register to post comments

ज्ञानेश आवडले रे हे लिखाण.

विजुभाऊ
Mon, 02/21/2011 - 11:06 नवीन
ज्ञानेश आवडले रे हे लिखाण. झकास जमलय.
  • Log in or register to post comments

छान आहे..झकास

Rahul D
Sat, 04/30/2016 - 22:26 नवीन
छान आहे..झकास
  • Log in or register to post comments

रूम मेट आवडला !! छान लिहिलंय.

अपरिचित मी
Mon, 05/02/2016 - 10:56 नवीन
रूम मेट आवडला !! छान लिहिलंय...
  • Log in or register to post comments

मस्त

सविता००१
Mon, 05/02/2016 - 11:40 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा