Skip to main content

एकटेपण...!

एकटेपण...!

Published on 09/01/2011 - 17:03 प्रकाशित मुखपृष्ठ
माणसाला सगळ्यात जास्त भिती कशाची वाटत असेल …..मरणाची ?? अं हं……चुकलात…. !! अहो… एकटेपणाची. बाकी कुठल्याही संकटाला तो तोंड देऊ शकतो पण एकटं राहण्याची वेळ आली तर मात्र तो ढेपाळतो. किंबहुना ह्या गोष्टीचा तो विचार करणंही टाळतो. कधी कधी गोंधळ, गर्दीचा इतका वैताग येतो की असं वाटतं दूर दूर पर्यंत कोणीच दिसायला नको, जवळ असायला नको. एकांत हवा. पण एकांत आणि एकटेपणा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकांत सुद्धा काही वेळापुरताच हवासा वाटतो. नंतर त्या एकांताचं रुपांतर एकटेपणात होतं आणि मग तो नकोसा होतो. लहानपणी तर आपल्याला कायम कोणीतरी सोबत खेळायला हवं असतं शिवाय आई, बाबा सुद्धा हवे असतात. तरुणपणी आपला चॉईस बदलतो पण सोबत लागतेच. म्हातारपणी तर सोबत गरजच बनते. उतारवयातल्या एकटेपणाला घाबरुनच तर आपण तरुणपणात लग्न, संसार, मुलं, बाळं ह्यात स्वत:ला अडकवून घेतो. सोबत नेहमीच एक सुरक्षिततेची भावना देते…. मग ती कोणत्याही वयात असो. कुठल्याही आनंदाच्या क्षणी किंवा कुठल्याही दु:खाच्या क्षणी आपण एकटं राहणं टाळतोच. आनंदाच्या परमशिखरावर असतांना सुद्धा तो आनंद उपभोगायला आपल्याला कोणीतरी सोबत हवं असतंच. एकटं आनंदी कसं राहू शकणार ? लॉटरीचं तिकीट लागलं….. खूप पैसे मिळाले…. पण पुढे काय ? त्या पैशाचं सुख कुणाच्या तरी सोबतीनंच लाभेल ना…!! मग ती सोबत कुणाचीही असो. कधी कधी सगे, सोयरे नसले तर माणसं चक्क कुत्री, मांजरी पाळतात. त्यांच्या सोबत आपला आनंद वाटतात. पण एकटेपण टाळतात. दु:खातही रडायला कुणाचा तरी खांदा लागतोच. खचलेल्या मनाला उभारी द्यायला कुणीतरी लागतंच. आपल्यासाठी कुणीतरी रडणारं असावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि तसं माणूस मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झटतो. आपण एकटेच जन्माला येतो आणि एकटेच जातो हे जरी अंतिम सत्य असलं तरी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपण कायम सोबतीसाठी धडपड करतो. त्याच धडपडीत आयुष्य संपतं. संसार, संसार म्हणजे तरी काय असतं ? आपण आपल्या लोकांचं विश्व तयार करतो आणि त्यांना आनंद, समाधान देण्यासाठी कष्ट करतो. कुठलंही काम करतांना सुद्धा शेवटी काम झाल्यानंतर कुणीतरी ते बघून पसंतीची पावती देणं हे ही तितकंच आवश्यक असतं. त्यासाठी ही कुणीतरी लागतंच. शारिरीक भुकेसारखी मानसिक भूक पण असतेच आणि ती भूक भागवायला कोणीतरी सोबत लागतेच. एकटेपण खायला उठतं. त्या पायी वेड लागायची पाळी सुद्धा येते. आपण कितीतरी सेलीब्रेटीजची उदाहरणं बघतो. सेलीब्रेटीज कशाला सामान्य माणूसही माणसांचा भुकेला असतो. “माणसात असणं” हेच मुळी नॉर्मल माणसाचं लक्षण मानल्या जातं. एकला चोलो रे……. हे म्हणायला ठीक आहे. पण आचरणात आणायला तितकंच कठीण आहे. एकटेपणावर उपाय शोधण्याचे आपले सतत प्रयत्न सुरु असतात. पण एका ठराविक वेळेनंतर त्यावर कुणाची तरी सोबत हा्च एकमेव उपाय असतो. एकटं असतांना आपण नेटवर जरी असलो तरी तिथेही आपण माणसंच शोधत असतो. माणूसपण शोधत असतो. माणूस म्हटलं की त्यात कळप आलाच. जनावरंच फक्त एकटी राहू शकतात. एकटेपण म्हणजे भयाण रात्र, एकटेपण म्हणजे रखरखीत वाळवंट ! असं एकटेपण जगात कुणाच्याही वाट्याला न येवो !
लेखनप्रकार

याद्या 7617
प्रतिक्रिया 40

खरच आहे जयवी.मी आत्ता अशाच फेजमधुन जातेय.यात मला माझ्या ५ वर्षाच्या मुलीचाही खुप आधार वाटतोय.मी तिच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करते आहे. त्या तीला कितपत कळतात मला माहित नाही पण मला खुप आधार वाटतो तीच्याशी बोलल्यावर.

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

भाग्यश्रीताई हा एकाकी काळ लवकरच जाईल. प्रत्येक रात्रीनंतर मंगल उषा ही येतेच येते. आपल्याला आणि आपल्या छकुलीला खूप खूप सदिच्छा.

In reply to by रेवती

माणसाला सगळ्यात जास्त भिती कशाची वाटत असेल …..मरणाची ?? अं हं……चुकलात…. !! अहो… एकटेपणाची. कधी मरण जवळुन बघा .. किंवा सिरियसली मरायचा विचार आला असेल तेंव्हा काय मानसिक स्थिती होते ते पहा. "त्यामानाने" मग एकटेपणा लै सुसह्य वाटेल . एकटेपणा ही देखील भयंकर गोष्ट आहे , नाही असं नाही. पण तिची मरणाशी केलेली तुलणा पटली नाही. बाकी लेख एकदम भावनिक ,. - एकटा

ह्म्म... म्हणुनच तरुण वयात मित्र मैत्रिणी जोडणे आवश्यक आहे. म्हणजे पुढे रिटायर्ड लाईफ जगताना मैत्री करण्यापासुन सुरुवात नको. मला नातेवाईकांपेक्शा मित्र मैत्रीणीच जवळचे वाटतात का कोण जाणे पण हे खरे आहे.

In reply to by पर्नल नेने मराठे

घरापासुन दूर राहताना, मित्र मैत्रिणिंची सोबत आणि त्यांचा आधार यांच्याच बळावर सध्या आयुश्य सुरु आहे! नातेवाईकांपेक्षा मला माझे मित्र मैत्रिणी जवळचे वाटतात!

लेख सुंदर आहे. विषयाशी थोडी असहमती. एकटेपणा पहिली काही वर्षं त्रासदायक ठरू शकतो पण एकदा त्याची सवय झाली की त्याचीच चटक लागते. अशी संधी (!! की "अशी वेळ" म्हणू?) प्रत्येकालाच मिळते असं नव्हे. एकटं राहण्याची वेळ कोणावर जरूर यावीच अशी इच्छा नाही पण आलीच तर तितकी भीतीदायक अवस्था नाहीये ती एवढंच सांगायचेय. आणि अगदी मज्जेत राहता येतं एकट्याने. मात्र रोग, विकलांगता अशा कारणांनी आपण कोणावर तरी डिपेन्डंट होतो आणि त्याचीच भीती उलट अशा एकटेपणा प्रिय असलेल्या लोकांना वाटते.. असो.. लेखाची मांडणी तुम्ही मनापासूनच केली आहे आणि छानच आहे. पण तुम्हाला बहुधा न दिसलेली आणि माहीत नसलेली दुसरी बाजू दाखवायचा प्रयत्न केला.

In reply to by गवि

एकटं राहण्याची वेळ कोणावर जरूर यावीच अशी इच्छा नाही पण आलीच तर तितकी भीतीदायक अवस्था नाहीये ती एवढंच सांगायचेय. आणि अगदी मज्जेत राहता येतं एकट्याने.
सहमत, विशेषतः सध्याच्या यूगात जेव्हा तूम्ही जर आर्थीक्द्रूश्ट्या थोदे संपन्न असाल तर मला वाटत नाही एकटेपणा ही काही फार मोठी तडजोड आहे. + तूम्हाला अध्यात्म मार्गाची आवड असेल तर मग ही गोश्ट म्हनजे दूधात साखरच. विशेषतः एकटेपणा असण्यात कीमान आपण नाटकी पणा तर दूर ठेवतोय ? एकटे पड्ण्याच्या भीतीने अनावश्याक समूह जोपासला की ऊगीचच मग "पझल' – मध्यमवयीन स्त्रीचा ‘स्व’शोध" यासारख्या चीत्रपटांसाठी कथा आपोआप तयार होतात...

In reply to by आत्मशून्य

>>>>>सहमत, विशेषतः सध्याच्या यूगात जेव्हा तूम्ही जर आर्थीक्द्रूश्ट्या थोदे संपन्न असाल तर मला वाटत नाही एकटेपणा ही काही फार मोठी तडजोड आहे. + तूम्हाला अध्यात्म मार्गाची आवड असेल तर मग ही गोश्ट म्हनजे दूधात साखरच. मी स्वतः एकटेपणाचा मनसोक्त आनंद घेत आहे. मला भरपुर मित्रही आहेत. पाहिजे तेव्हा पहिजे ते करण्यासारखं स्वातंत्र्य यासारखं सुख जगात नाही. आपला संपुर्ण वेळ आपल्या गोष्टींसाठी खर्च करता येतो. हे मी कर्तोय गेली ५ वर्ष.

In reply to by गवि

ननिंशी सहमत. संपन्न, स्वतंत्र, व्याधीहीन एकटेपणासारखं सुख नाही. प्रत्येक क्षणावर आपला ताबा असतो. मुखवटे बाळगण्याची गरज नसते. सहवास हा आधार देणारा असतो यात वादच नाही. पण संतुलित आयुष्यात (काही प्रमाणात) एकटेपणाचीही गरज असते. निदान काही लोकांना तरी. मात्र समाजप्रिय समाज एखाद्याच्या गप्पिष्टपणाचे गोडवे गातो तर एकटेपणाची काहीशी हेटाळणी करतो. ननिंनीच म्हटल्याप्रमाणे तुमचा लेख छान झालेला आहे. मात्र प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, एक चूक एक बरोबर अशी नसते एवढंच म्हणण्याचा प्रयत्न.

जनावरंच फक्त एकटी राहू शकतात. असं वाटत नाही... उलट बहूतेक सर्व जनावरे अगदी जंगली सुद्धा कळप करुनच राहतात. एकटे पण इतकं त्रासदायक असेल असं काही वाटत नाही .. जर आपण आपल्याला हवं तसं एकटेपण आखून, मापून घेऊ शकलो तर ते आनंददायक असू शकते . व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. काहींना सतत माणसांच्या घोळक्यात रहायाला आवडते. अशा लोकांसाठी एकटेपण ही शिक्षा असते . पण काहींना ती शिक्षा वाटत नाही . तर उलट ते एकटेपणा एन्जॉय करतात. पण हे खरं आहे कि एकटेपण कोणावर लादले जाउ नये.

In reply to by मनीषा

आत्मशून्य आणि मनीषा यांच्याशी सहमत!! मी स्वःता एकटेपणा मस्त एन्जॉय करतोय.....

एकटेपण म्हणजे भयाण रात्र, एकटेपण म्हणजे रखरखीत वाळवंट ! असं मला स्वानुभवावरून अजिबात वाटत नाही. मुळात मी एकटं राहण्याची संधीच शोधत होतो. कामानिमीत्त २ वर्ष एकटा राहिलो आहे. खूप एंजॉय केलं. आणि मी घरी नसल्याने २ वर्ष घरच्यांनीही खूप एंजॉय केलं.

अरे मुलांनो, एकटेपण म्हणजे बाहेरच्या जगाशी पूर्णपणे संबंध तोडणं. तुम्ही लोक जे बोलताय...ते फक्त आजूबाजूचे लोक आणि नातेवाईक ह्यांच्याबद्दलच बोलताय. नेटवर, ऑफिसमधे, फोनवर , टिव्ही वर...... कुठेही कसलेही संबंध नसणं म्हणजे एकटेपण. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या बेटावर एकटं सोडलं तर.......!! आता पुन्हा विचार करा.

In reply to by जयवी

जर तुम्हाला एखाद्या बेटावर एकटं सोडलं तर.......!! असं एकटेपण कास्ट अवे मधला चक नोलंड सोडून अजून कुणाच्या नशिबी आल्याचं मला तरी माहिती नाही. त्यामुळे त्याबाबत विचार केला नाही. आता हे बेट म्हणजे माणसांचं बेट असा गर्भितार्थ ह्या वाक्यात असेल तर तो मला कळला नाही.

In reply to by आदिजोशी

लेखातील विचारांशी सहमत. अ‍ॅडीभौ, तुम्ही म्हटलं, खाली गविंनी म्हटलं की एकटेपणाचे दिवस एन्जॉय केले वगैरे, पण एकटं राहायची वेळ आली की आपणच आपल्या मनाची त्यासाठी तयारी करू लागतो. आणि मग "मी एकटा आहे पण आनंदी आहे, खुष आहे" अशा समजातच जगू लागतो आपण. मग त्याची सवय जडते. अर्थात त्यात काही चूक नाहीच, सर्व्हायवल टेकनिक आहे ते. चक नोलंडचं काय झालं ती एक कथा आहे. तो त्या परिस्थितीतूनही विलक्षण मानसिक ताकदीच्या जोरावर सुटला वगैरे चित्रपटात दाखवायला ठीक आहे मात्र तशा प्रकारच्या एकटेपणात मनुष्य तगणं शक्यच नाही. 'नो मॅन इज अ‍ॅन आयलँड' हेच खरं!

In reply to by मेघवेडा

मला वाटतं... ज्याला मनुष्य सहवास हवा आहे आणि त्याला एकट रहावं लागत असेल त्याला तो भयंकर त्रासदायक वगैरे ठरेल. पण जर कुणाला एकांत हवा आहे. मग तो दीर्घकाळासाठी का असेना; तर मग त्याला तो त्रासदायक नाही वाटणार. वर गविंच्या वक्या वाक्याशी सहमत.

In reply to by जयवी

या दोन स्वतंत्र् गोष्टीबाबत आपण वैचारीक्पणे गोंधळला तर नाहीत ना ?

सात वर्षं एकटा खोली घेऊन राहिलो. बिलीव्ह मी.. दोज वेअर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ.. :) आताही मजा आहे.. पोर आहे खेळायला..पत्नि भांडायला आणि सुख दु:ख शेअर करायला.. हे ही छान्..ते ही छान.. आणि एक.. पुस्तकी वाटेल आणि पटणार नाही, पण खरं आहे ते सांगतो: एकटेपणा मनात असतो..एकटा माणूस कुठेही कितीही गराड्यातही एकटाच.. अवांतरः दोन ज्यू रस्त्याने चाललेले असताना दोन नाझी सैनिक त्यांच्या मागे येताना दिसतात. एक ज्यू दुसर्‍याला म्हणतो, चल पळ लवकर.. ते दोघे आहेत आणि आपण एकटे आहोत..

लेख छान लिहिलाय. कधी कधी नको असतानाही एकटेपणा येतो आणि मग त्याचीसुद्धा सवय होते...आता प्रतिसादात लेखिकेने लिहिल्याप्रमाणे वेळ कुणावर येण्याची शक्यता कमीच वाटते. बाकी मला एकटीला फिरायला, शोप्पिंग करायला, जेवायलासुद्धा आवडतं...सगळ्याचा मनसोक्त आनंद घेता येतो...इतर लोक बरोबर असतील तर थोडा याच्या कलाने मग त्याच्या कलाने असं करत वेळ निघून जाते...अर्थात हे माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाची आवड वेगळी.

when you are with yourself, you have the space to connect with your higher self fully without the interference of incompatible consciousness of other people around you. It is very different when you are by yourself than when you are with others.Therefore it is highly important that you be with the right kind of people. Being with the wrong kind of people only lowers your state of consciousness and shrinks your awareness. We are always affected by the collective consciousness of the people around us, because whenever we are surrounded by people, our mind becomes part of the group mind. Being by yourself actually frees you from the group mind that is why you can connect to God best when you are alone. You can also connect with God better with the people who are truly in greater conscious resonance with you एकटे राहीले की आध्यात्मतेच्या जवळ जाता येते (धर्म अन आध्यात्मता हे खुपदा एकच समजले जाते पण आध्यात्मता ही धर्माच्याही खुप पुढची पायरी आहे ) 'Being Alone' - One becomes more Spiritual and not Just Religious. मला आठवते माझी मरहूम (स्वर्गवासी) अम्मी नेहमी मध्यरात्री उठूनही नमाज पढायची विचारले तर एकच म्हणायची 'तन्हाई और खामोशी में किगई ईबादत, खुदा के ज्यादा करिब लाती हैं' त्यावेळेला मी खुपदा हसण्यावारी नेले होते पण ती गेल्यावर तिने त्यावेळी केलेल्या ईबादत (Worship) चे महत्व मला जाणविले. आपण प्रत्येक जण एकटेच जन्माला आलो आहोत अन मरणही एकटेच एकाकी अनुभवणार हेच या आयुष्याचे अंतिम सत्य आहे ! देवा शिवाय कोणीच या सृष्टीचा कर्ताकरविता नाही ! शेवट पर्यंत जर कोणी आपल्याबरोबर रहातो तो फक्त आपला आत्मा, रुह, your own conscious हे जर सतत लक्षात ठेवले तर एकटे रहाण्याची हिंमत आपोआप येते. :-)

In reply to by शिल्पा ब

मी कुठे म्हटलं कि मला सगळं समजलं ? फक्त माझ्या ओळखीचे एक ध्यानयोगी असच काहिसं म्हणायचे एव्हढच. तसं वहिदाने छान सोप्या शब्दात तिचे विचार मांडलेत. तुमचे प्रश्न सरळ तिकडेच FWD... अर्धवटराव

लेख आवडला. एकटेपणा हा जर स्वत:च्या घरात असेल.. म्हणजे घरि कोणीच नाही.. तर मी काही काळ सहन करू शकते. पण त्याकाळात मी, माझे लेखन आणि इंटरनेट... दुसरं काही नाही लागत. तसंच मी शॉपिंगला, फिरायलाही एकटीला जायला आवडतं मला. पण मग काही काळाने एकटेपणा खायला उठतो. मला नाही आवडणार कायमचे एकटे रहायला.

मलाही एकटेपणा नाही आवडत. "मला एकटेपणा एंजॉय करता येतो." हे खरा (भयाण) एकटेपणा न भोगल्याचं लक्षण आहे असं वाटतं. माझी ७० वर्षाची (एकटी राहणारी) व्यायाम मैत्रिण नेहमी "मजेत आहे, मजेत आहे" असं घोकत असते. हे ती मला नव्हे तर स्वत:ला बजावत असते. स्त्रियांना येणारे एकटेपण आणि पुरुषांना येणारे एकटेपण यात फरक असण्याची शक्यता आहे असे वाटते. माणसांमध्ये राहूनही एकटेपणा येण्याची उदाहरणे आहेत. 'एकांतवासाची शिक्षा' हाही एक शिक्षेचा प्रकार असायचा पूर्वी! यामध्ये बरेच लोक वेडे व्हायचे किंवा आत्मघात करायचे ही ऐकीव माहिती आहे.

In reply to by रेवती

'एकांतवासाची शिक्षा' हाही एक शिक्षेचा प्रकार असायचा पूर्वी! यामध्ये बरेच लोक वेडे व्हायचे किंवा आत्मघात करायचे ही ऐकीव माहिती आहे. अशी शिक्षा अजुनही देतात काही दिवसांसाठी...म्हणजे महीना वगैरे ...असा एकटेपणा सहन करायला मनाने तुम्ही खंबीरच असायला हवेत.

In reply to by रेवती

'एकांतवासाची शिक्षा' हाही एक शिक्षेचा प्रकार असायचा पूर्वी! यामध्ये बरेच लोक वेडे व्हायचे किंवा आत्मघात करायचे ही ऐकीव माहिती आहे. पॅपिलॉन या पुस्तकात आहे एकांतावासाची शिक्षा. तसंच स्वातंत्र्यवीरांच्या "माझी जन्मठेप" या पुस्तकातही एकांतवासाचे वर्णन केले आहे. फार भयानक आहे वर्णन दोन्ही पुस्तकात.

In reply to by प्राजु

एकांतवासाची शिक्षा' हाही एक शिक्षेचा प्रकार असायचा पूर्वी! यामध्ये बरेच लोक वेडे व्हायचे किंवा आत्मघात करायचे ही ऐकीव माहिती आहे. ह्म्म... तुरुंगात अंडासेल मधे माजुरड्या कैद्यांना सरळ करण्यासाठी ठेवले जाते असे म्हणतात... अवांतर :--- कसाबला ऑर्थर रोड तुरुंगात विशेष अंडासेल मधे ठेवण्यात आले आहे आणि हा सेल उभारण्यासाठी २४ लाख खर्च करण्यात आले आहेत !!! २४ लाख आणि त्या कसाबच्या सुरक्षेसाठी ? यालाच शाही पाहुणचार म्हणावा काय ? ;)

काही गोष्टी जगात अशा असतात ज्या आपल्या मानण्यावर असतात.त्यावर लोकांची देखील विभागणी होऊ शकेल. काही लोक त्यांच्या जवळ सगळं असून देखील एकटे असतात. काही लोक सगळे जवळ असताना केवळ एखादी व्यक्ती अथवा गोष्ट नाही म्हणून एकटे असतात. काही लोक एकटेपणातच सर्वस्व शोधतात.

When you need some one desperately, no one has a minute to spend with you. But When you want to be alone, People have a life to spend with you...!

In reply to by पर्नल नेने मराठे

मी या नियमाला अपवाद समजा. desperately कधि कोनाचि गरजच पडली नाही, सगळा वेळ बायको बरोबरच असतो, आई-वडिल, ईतर नातेवाईक आनी मित्र आदि ८-२० किलोमिटर पर्यंतच राहतात. जेव्हा एकटे रहावेसे वाटते तेव्हा माझ्या सासुला कॉल करतो. गोग्गोड गप्पा मारुन आनि काहि निमित्त काढुन बायकोला माहेरि पाठ्वितो. फिर मै और मेरा अकेलापन --> 5-6 घंटेकेलिये Full Enjoyment

आपण असं म्हटलं तर जास्त योग्य शब्दात होईल का? १) एकटेपणा डिफॉल्ट (कंपल्सरी) असून इतरांमधे मिसळणं ऑप्शनल (ठरवून करावं लागेल असं..) असावं की २) भोवती गोतावळा, गल्बला (चांगल्या वाईट दोन्ही अर्थाने) असणं डिफॉल्ट (कंपल्सरी) आणि एकांत मिळणं ऑप्शनल (ठरवून करावं लागेल असं..) असावं. यातला कोणता पर्याय आपल्याला जास्त आवडेल हे स्वतःशी विचारुन मग ठरवता येईल की एकटेपणा भीतिदायक किंवा सुखकारक ते. बाकी आपल्या चॉईसने आपल्याला हवं ते मिळणं अगदी दुर्मिळच म्हणा.. :) आणि एक.. एकदा का पोरे बाळे, जीवनसाथी यांच्या सोबत असण्याची सवय झाली की मग परत एकटेपणाकडे जाण्याची कल्पना दु:सह वाटते हे नि:संशय सत्य. मुद्दा फक्त एकटेपणा आधीच हजर असेल किंवा नंतर कधी आपापतः वाट्याला आलाच तर त्यातून होणारा सुरुवातीचा त्रास वगळता तो तितकासा वाईट ठरत नाही हे समजणे महत्वाचे.

जनावरंच फक्त एकटी राहू शकतात.. हे विधन चुकिचेय जयवी.. गोतावळा वाचुन पहा..तसेही त्याना व्यक्त करण्याचे सामर्थ्य दिले नाहीय म्हणुन ..नाहीतर ते ही असे व्यक्त झाले असते.. पण काहि समग्न व्यक्तीना एकटेपण भावते..आणि त्यातुनच नवोन्मेष होतो.. काही जण एकटेपण न्युनत्वा मुळे स्वतःहुन स्वीकारतात.. पण त्यातही ते एकटे नसतात पुर्वीच्या घटनांचा विचार किंवा त्यांची स्वमग्नताच त्यांची सोबती असते..

एकटेपण स्वखुशीने स्विकारलं तर ठीक आहे...... पण ते लादलं गेलं तर मात्र कठीण !! जनावरंच फक्त एकटी राहू शकतात हे माझं वाक्य मलाच नंतर खटकलं ...... त्यामुळे ते मागे घेते :)

कधिकधि बायको शनिवरी तिच्या माहेरि जाते, तेव्हा एकटे असन्यात काय मज्जा असते सांगु. मग संगनकावर, TV च्या रिमोट वर, घरातिल प्रत्येक वस्तुवर माझा आनी केवळ माझाच हक्क असतो.

ह्म्म... एकटेपणा लयं वाईट्ट बघा !!! :( जो अनुभवतो त्यालाच ते बरोबर कळतं !!! जाउंद्या... बाकी वरचे काही प्रतिसाद फार छान आहेत. अवांतर :--- जगात माणुस एकटा येतो आणि एकटाच जातो... सर्व संबंध हे काही काळा पुरतेच असतात.