चौथा मजला (उत्तरार्ध)
पुर्वार्ध [ इथे ] वाचता येईल.. आता पुढे..
------
रोहन आज लवकर घरी आला.. तसा तो हल्ली तासन तास कारखान्यातच असे. त्याच्या असं सतत कारखान्यात असण्याने आईला फारच काळजी वाटत असे. बाबा तिला नेहमी त्यांनी स्वतः एकेकाळी रात्र-रात्र केलेल्या कामाची साक्ष देऊन गप्प बसवत असत. आज मात्र रोहन वेळेत घरी आला. त्याला काय तो सोक्षमोक्ष लावायचा होता. रात्रीची जेवणं झाली. आई, तो आणि बाबा बरेच दिवसांनी एकत्र जेवले. आई खुष होती. जेवणं झाल्यावर अंगणातल्या पायर्यावर आई बाबा बसले होते. रोहनही तिथेच जाऊन बसला. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली
"अरे बोल रे रोहन. हल्ली तु फारसा बोलतच नाहीस. फार टेंशन्स आहेत का रे कारखान्यात?"
"अं? कारखान्यात टेन्शन्स! हं ती तर आहेतच पण ती कारखान्यातल्या कामामुळे नव्हे. इतरच गोष्टीमुळे"
"म्हणजे?" बाबांची उत्सुकताही चाळवली
"बाबा, मला सांगा तुमची आई कोण?"
"काय रे डोकं ठिकाणावर आहे ना?" बाबांचा आवाज त्यांच्याही नकळत चढला. आईने त्यांना शांत रहायची खूण केली. ती म्हणाली "अरे रोहन काय हा प्रश्न. आधीच आजी गेल्यापासून त्यांना तिची आठवण येत असते"
"कोणती आजी?"
"कोणती म्हणजे? तुला काय दहा आज्या होत्या काय रे?"
"अजून दहा बद्दल माहित नाही.. पण दोन तर नक्कीच होत्या"
बाबांच्या चेहर्याचा रंग बदलला. ते गांगरून गेले.
"काय? काय बोलतोयस तु?"
"खरं की नाही सांगा!"
आईचे डोळे विस्फारले होते. ती आता अजिबात मधे पडणार नव्हती. ती फक्त बाबा रोहनला कसे समजावताहेत हे बघणार होती.
"काय खर?" बाबांनी विचारलं
"की आजी तुमची जन्मदात्री नव्हती. सांगा बाबा तुम्हाला हे माहित होतं की नव्हतं"
बाबांच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं. ते मटकन खाली बसले. दोन मिनीटं काहिच बोलले नाहीत. जरा सावरल्यावर बोलु लागले "होय. माहित होतं. तुझ्या आजीला मूल होत नव्हतं. व मुल झालं नसतं तर हा कारखाना चुलत्यांच्या ताब्यात गेला असता. त्याच वेळी आपल्या वाड्यात पार्वती भाडेकरू म्हणून रहायला आली. अतिशय रेखीव, तरूण, फॅशनेबल आणि मुळची श्रीमंत. अगदी त्याकाळातही तुमच्या पंजाबी ड्रेससारखे कपडे घालणारी. काहि करायच्या इर्शेने घर सोडून आली होती. आजोबांना ती आवडली होती किंवा कसे हे माहित नाही. मात्र तुझ्या आजोबांनी त्याकाळात तिला मुलासाठी गळ घातली व भरपूर पैसे देऊ केले. पैशासाठी वाट्टेल ते करायची तयारीच करून आल्याने ती तयार झाली व गुपचुप एका मुलाला जन्म दिला"
"आणि ते मुल म्हणजे तुम्ही! बाबा तुम्ही. तुम्हाला जन्म दिल्यावर मात्र तिला पैशापेक्षा मुल महत्त्वाचं वाटु लागलं मात्र आजोबांनी तिला मुलाला हात लावायला देखील नकार दिला. पुढे ती मुलासाठी झूरत राहिली. तिला वेड लागलं. आजोबांनी तिला घराबाहेर काढलं. लोक तिला वेडी म्हणत मात्र ती पैशाचा कुलुपबंद-डबा हातात व त्याच्या किल्लीचा छल्ला कमरेला लाऊन गावभर फिरत राहिली"
बाबा काहि न बोलता उठले.
"उठू नका. मला सगळं कळून चुकलंय. मला स्वतः पार्वतीने हे सांगितलंय"
पार्वतीचं नाव ऐकलं आणि बाबा स्तब्ध उभे राहिले. दोन मिनीटं हा काय बोलतोय हेच त्यांना समजेना
"पार्वती कोण पार्वती?"
"वाटलंच मला. मला ती म्हणालीच होती की तुम्ही तिला ओळखही दाखवणार नाही म्हणून. ती अजूनही मॉडर्न कपडे घालत असली तरी ती तुमची आई आहे हे विसरू नका. आजोबा तर कृतघ्न निघालेच पण तुम्हीही सत्य समजल्यावरही तिला जवळ केले नाहित. पण वेळ अजूनही गेलेली नाही. ती वाट पाहतेय बाबा. तिला घरात घ्याल का? ती अजूनही मला भेटते. माझ्याशी बोलते."
"रोहनाऽऽ"
"मला ती त्याच दिवशी दिसली. कारखान्यात चौथ्या माळ्यावर पान ठेवायला गेलो असताना"
बाबा जवळजवळ ओरडलेच "अरे पण त्या माळ्यावरून तर तिने जीव दिला होता"
आता मात्र आई-बाबांना दरदरून घाम फुटला
"अरे काय बोलतोयस? ती कशी असेल?"
रोहन फक्त बोलला "ती आहे हे नक्की!" आणि सरळ आपल्या खोलीत गेला.
-----------
डॉ. कामत बाबांचे जुने मित्र आज ते दुपारी घरी आले. घरी आई-बाबा दोघेही त्यांचीच वाट पाहत होते.
"काय डॉक्टर, काय म्हणताहेत पेशंट"
डॉ. कामत म्हणजे नामवंत सायकायट्रीस्ट होते. बाबांचे खूप जवळचे मित्र असल्याने त्यांनी रोहनची केस हाती घेतली होती. आईने चहा आणून ठेवला. त्याचा आस्वाद घेत डॉ. कामत बोलु लागले
"केस फारच इंटरेस्टिंग आहे. रोहनने त्या मुलीला म्हणजे पार्वतीला बघितले अशी त्याला खात्री आहे. इतकेच नव्हे तर तो अजूनही तिला भेटतो बोलतो. तिच्याबद्द्ल खूप कृतज्ञता त्याला आहे. तिच्याबद्दल तो माझ्याशी खूप बोलला. मला ही स्कित्झोफ्रेनिआची केस असावी असा संशय आहे."
"काय? स्कित्झोफ.."
"स्कित्झोफ्रेनिआ. एक हॅल्युसिनेशनचा बराच पुढचा प्रकार. ज्यात माणूस स्वतःच काहि प्रसंग, व्यक्ती, स्थळे कल्पतो आणि त्यात रमून जातो. त्या वक्ती, प्रसंग त्याला खरे वाटु लागतात. भारतात दर लाखात जवळजवळ अडिचशे ते तीनशे लोकांना हा आजार आहे. तुमचयसाठी मी जितका खरा आहे तितकीच पार्वती त्याच्यासाठी खरी आहे"
"अहो पण त्याला माझ्या इतिहासाबद्दलची माहिती कशी?"
"तोच प्रश्न मलाही पडला आहे. म्हणूनच मी अजून हा स्कित्झोफ्रेनिआच आहे हे खात्रीने सांगत नाहि आहे. मला सांगा तुम्ही कधी रोहनला याबद्दल सांगितलं होतं का?"
"छे कधीच नाहि. मागे पितृपक्षात त्याने विचारलं होतं,पण तेव्हा उत्तर दिलं नव्हतं" आईने सांगितलं.
"आणि त्याच दिवशी त्याला पार्वती भेटली"
"बरोबर."
"बरं कधी लहानपणी त्याच्यासमोर पार्वतीबद्द्ल कधी चर्चा, वाद"
आईने बाबांकडे पाहिलं बाबांनी संमतीदर्शक मन हलवली. आई सांगु लागल्या
"रोहन अडिच तीन वर्षांचा असेल. तेव्हा मला पहिल्यांदा ही कथा समजली तेव्हा मी फार चिडले होते ह्यांच्यावर आणि सासुबाईंवरही. आमच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. आम्ही सहसा रोहनसमोर वाद घालायचे टाळायचो. मात्र त्या दिवशी माझा संयम राहिला नाहि. पण तेव्हा तो खूपच लहान होता. त्याला ते अजिबातच कळलंही नसेल किंवा लक्षातही नसेल"
"त्याच्या प्रकट मेंदूला लक्षात नसलं तरी सुप्त मनाने त्याची कुठेतरी नोंद घेतली असणार आणि तीच नोंद मूर्त रूप घेऊन त्याच्या समोर आली आहे. येत आहे. आपल्याला वेगाने पावले उचलायला हवीत. मी लगेच ट्रिटमेंट सुरू करतो. कारण त्याची पार्वतीमधील गुंतवणूक खूप वाढली आहे. देव न करो आणि काहि विपरीत घडो. उद्या पासून घ्यायला ह्या गोळ्या देतो."
इतक्यात कारखान्यातून फोन आला. बाबांनी तो कानाला लावला आणि ते ओरडलेच. "रोहन!ऽऽऽ"
"काय हो काय झालं?"
"रोहन.. रोहन"
"रोहन काय?"
"रोहननं कारखान्यातून फोन केला होता. म्हणाला, तुम्ही माझ्या खर्या आजीला घरात घेणार नाहिच त्यापेक्षा मीच ज्या आजीचा नातु आहे तिच्यासोबत तिच्या दुनियेत चाललोय. आणि फोन कट केला"
आई ला ऐकून भोवळच आली आणि ती खाली पडली.
--------
तेरावा दिवस संपला. घरी जमलेले पाहुणे एक एक करून गेले. आता घरात आई व बाबा दोघेच उरले होते. जेवायलाही तयार होतं पण दोघांचही मन नव्हतं
"अहो. तुम्ही जेऊन घ्या"
बाबांचं लक्षच नव्हतं. आईने त्यांना हलवलं
"अहो ऐकताय ना!"
"अं..हो.. ऐक ना गं. गेले काहि दिवस तुला मुद्दामच बोललो नाही"
"काय?"
"मी कारखान्यात पोचलो तोपर्यंत रोहनं त्याच चौथ्या मजल्यावरून उडी मारली होती. मी त्या मजल्यावर गेलो आणि तिथे मला हे मिळालं.."
बाबांनी ड्रॉवरमधून एका पिशवीतल्या वस्तु बाहेर काढून टेबलवर ठेवल्या. त्या वस्तु बघुन आईचा चेहरा पांढरा पडला. टेबलवर एक कुलुपबंद पेटी आणि एकच किल्ली असलेला चांदीचा छल्ला होता!!
(समाप्त)
[लेख एकटाकी लिहिल्याने टंकनदोष व शुद्धलेखनाच्या चुका असतील याची खात्री आहे. स्वसंपादन नसल्याने तेवढे नजरे आड करावे]
प्रतिक्रिया
बापरे
??
ॠषिकेश छान गोष्ट. चांगला
+१
मस्त रे!
?
ऋष्या, छान रे.. लिहित
खुप मस्त
छान
असेच म्हणतो.
+ २
मस्तच!
सहमत
वाचता वाचता चटकन शेवट आला..
अजून एक भाग लिहीता आला असता
+१ सहमत!
४ भाग
+१
चांगली मांडणी, पण आटोपती
मस्त रे....!
मस्त...कथा खूप आवडली...अजून
ताई, तुम्ही तुमच्या पितरांना
असं ए होय? बरं चालु द्या..
कथेचा शेवट अजूनही फुलवता आला
+१
शेवट अनपेक्षित आहे. रोहन असं
छान
धन्यवाद
छान आहे... अवांतर :मागच्या
अरे हो..... तुम्ही म्हटल्यावर
मस्त रे ॠ.. कथा आवडली
कथा आवडली