✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग..

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 09/05/2010 - 11:41  ·  लेख
लेख
माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - भाग १ बापरे..! 'मला यांच्या गणपतीची पुजा करायच्ये?' मला काही खुलासा होईना.. 'बघू नंतर काय होईल ते होईल, आपण आपली पुढ्यातली ही डिश खाऊन काहितरी कारण सांगून सटकू इकडनं..' अस ठरवून मी समोरच्या बर्फीचा एक तुकडा तोंडात टाकला.. सुरेखच होती बर्फी.. अगदी ताजी! समोरच्या डिशमधलं थोडंफार खाल्लं मी. जरा वेळ तसाच तिथे बसून राहिलो. 'आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं' असा मनाशी विचार केला आणि उठलो.. तोच तो मगासचा टकल्या हिजडा आणि इतर दोघेचौघे हिजडे पुढे सरसावले. त्यापैकी एकाच्या हातात मोठासा स्वच्छ नॅपकीन! "आओ तात्यासेठ, अब न्हानेका और पूजा करनेका..!" न्हानेका और पूजा करनेका? मला काहीच समजेना. अल्लाजान होताच माझ्यासोबत. तो त्यांच्यातलाच.. त्याच्याशी बोलताना मला कळलं की आज मी त्यांचा पेश्शल पाहुणा आहे आणि मला पूजा करायच्ये किंवा सांगायच्ये! ही कुठली पद्धत? कुणाला विचारून? मला क्षणभर काय करावं ते कळेचना! 'सगळं झुगारून निघून जावं का इथून?' हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. पण माझ्या आजुबाजूला जमलेल्या, माझी इज्जत करणार्‍या त्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला खूप आनंद दिसत होता, उत्साह दिसत होता.. 'देखे क्या होता है.. जो भी होगा, देख लेंगे..' या माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार मी ती मंडळी म्हणतील ते करायचं ठरवलं. अधिक माहिती विचारता अल्लाजानकडून मला असं समजलं की मी एक पांढरपेशा उच्चभ्रू आहे असा त्यांचा समज आहे आणि माझ्या हातून आज त्यांच्या गणपतीची पूजा व्हावी अशी त्या मंडळातल्या हिजड्यांची इच्छा आहे आणि तशी पद्धतही आहे..! साला, मी एक पांढरपेशा उच्चभ्रू? जाऊ दे, तो चर्चेचा विषय आहे! झमझम बारमध्ये महिन्याकाठी सताठशे रुपये पगार मिळणारा मी उच्चभ्रू?! :) त्या गल्लीच्या मागल्या बाजूसच एका चाळवजा इमारतीत वेश्यायवसाय चालतो.. मला त्या लहानश्या खुराड्यातील तेवढ्याच लहानश्या मोरीवजा बाथरुमात नेण्यात आले.. त्या घरची मावशी अन् आजूबाजूच्या वेश्या यांनी मला वाट करून दिली.. एरवी बाराही महिने फक्त पोटातल्या भुकेच्या डोंबाचा अन् पर्यायाने केवळ वासनेचाच वावर असणार त्या खोलीत.. परंतु त्या दिवशी मला तसं काही जाणवलं नाही.. सण-उत्सवाचा, गणपतीच्या वातावरणाचा परिणाम? भोवती त्या वेश्यांची दोन-चार कच्चीबच्ची घुटमळत होती. कुणाच्या हातात गणपतीच्या पुढ्यातलं केळं तर कुणाच्या हाताता आराशीमधली चुकून सुटलेली रंगेबेरेंगी नकली फुलांची माळ, कुणाच्या हातात साखरफुटाणे तर कुणाच्या हातात कुठुनशी आलेली एखादी झांज! मला क्षणभर अभिमान वाटला तो माझ्या उत्साही व उत्सवप्रिय मुंबापुरीचा! काय काय दडवते ही नगरी आपल्या पोटात! सोबत तो टकला हिजडा होता. त्यानं माझ्या हातात एक नवीन साबणाची वडी आणि स्वच्छ टॉवेल ठेवला.. मी स्नान करून, टॉवेल नेसून बाहेर आलो.. आसपासच्या वेश्यांचं तोंड चुकवून अंगात शर्टप्यान्ट चढवली.. त्या टकल्या हिजड्याचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटत होतं.. तो मोरीच्या बाहेरच थांबला होता.. 'हा आज आपला पाहुणा आहे आणि याला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे.' एवढी एकच तळमळ दिसत होती त्याच्या चेहर्‍यावर..! उच्चभ्रू समजातल्या सो कॉल्ड हॉस्पिटॅलिटीचा त्यानं कोणताही कोर्स केलेला नव्हता..! तेवढ्या पाच मिनिटात त्या मावशीने चा करून माझ्या पुढ्यात कप धरला.. कोण ही मावशी? ८-१० वेश्यांचं खुराड सांभाळणारी.. तिनं मी अंघोळीहून येईस्तोवर माझ्याकरता चा देखील टाकाला?! कपडे घातल्यावर त्या टकल्यानं ते अय्यप्पाचं पवित्र मानलं गेलेलं कुठलंसं वस्त्र उपरण्यासारखं माझ्या खांद्यावर घातलं.. आम्ही त्या खोलीतून बाहेर गणपतीपाशी आलो आणि मी मुख्य गाभार्‍यात शिरलो.. "तात्यासेठ, ये लक्ष्मी है.. इसको बोलो पूजा कैसे करनेका, क्या करनेका..!" त्यांच्यातला एक लक्ष्मी नावाचा एक तरूण रूपवान हिजडा छानशी साडीबिडी नेसून तिथंच पूजा करायला म्हणून उभा होता.. माझं सहजच समोरच्या तयारीकडे लक्ष गेलं.. फुलं, अक्षता, अष्टगंध, समया, उदबत्त्या.. सगळी तयारी अगदी अपटूडेट होती.. ते सगळं पाहिल्यावर मी स्वत:ला विसरलो.. आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत पांढरपेशे आहोत आणि मुंबैच्या कामाठीपुर्‍यात उभे आहोत ही गोष्ट मी विसरून गेलो. माझं मन एकदम प्रसन्न झालं.. सुसंस्कृत, सुसंस्कृत म्हणजे तरी काय हो? नस्ता एक बोजड शब्द आहे झा़लं.. त्या क्षणी माझ्या आजुबाजूचे ते सारे हिजडे सुसंस्कुत नव्हते काय?! "प्रारंभी विनती करू गणपती.." दशग्रंथी तात्या अभ्यंकराने पूजा सांगायला सुरवात केली.. तशी त्या पार्थिवाची प्राणप्रतिष्ठा वगैरे पहिल्या दिवशीच झाली असणार.. मी सांगत होतो ती केवळ संध्याकाळची धूपार्ती! 'प्रणम्य शिरसा देवं', 'शांताकारं भुजगशयनं.', गणपती अथर्वशीर्ष...' च्यामारी येत होते नव्हते ते सारे श्लोक तिथे बिनधास्तपणे आणि मोकळ्या मनाने म्हटले! अगदी गेला बाजार शिवमहिन्म स्तोत्रातल्याही सताठ ओळी मला येत होत्या त्याही म्हटल्या - महिन्मपारंते परमविदुषो यद्यसदृषि स्तुतिर्ब्रह्मादिनाम् अपितदवसंनास्त्वयिगिरा: अथावाच्य.. आता आठवत नाही पुढलं काही.. पण कधी काळी ल्हानपणी मामांकडून शिवमहिन्माची संथा घेतली होती ती आता कामी येत होती. आपल्याला काय हो, शंकर तर शंकर.. तो तर बाप्पाचा बापुसच की! :) ओल्या बोंबलाच्या कालवणाने चलबिचल होणारा मी, अगदी पूर्णपणे एका भिक्षुकाच्या भूमिकेत शिरलो होतो... सहीसही ती भूमिका वठवत होतो.. 'काय साला विद्वान दशग्रंथी ब्राह्मण आज आपल्याला लाभला आहे!' असे भाबडे कृतज्ञतेचे भाव आजुबाजूच्या हिजड्यांच्या चेहर्‍यावर मला दिसत होते.. त्यांचा तो म्होरक्या टकला हिजडा तर अक्षरश: कृतकृत्य होऊन रडायचाच बाकी होता.. श्रद्धा, श्रद्धा म्हणजे दुसरं तरी काय असतं हो?! 'गंधाक्षतपुष्पं समर्पयमि..' असं म्हणून लक्ष्मीला गंध, अक्षता व फुलं वाहायला सांगितलं.. "अबे भोसडीके उस्मान गांडू.. वो फुल उधर नजदिक रख ना..!" फुलाचं तबक थोडं दूर होतं ते रागारागाने एका हिजड्याने कुणा उस्मानला नीट गणपतीच्या जवळ ठेवायला सांगितलं..! गणेशपुजन सुरू असतांनाच, "अबे भोसडीके उस्मान गांडू"? :) पावित्र्याच्या अन् शुचिर्भूततेच्या व्याख्या प्रत्येकाच्या, किंबहुना प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात..! :) "धूपं समर्पयामि, दीपं सर्पमर्पयामि.." दशग्रंथी अभ्यंकर सुरूच होते! आणि माझ्या सूचनांनुसार लक्ष्मी सगळं काही अगदी यथासांग, मनोभावे करत होती..की होता?! सरते शेवटी पूजा आटपली, आरती झाली.. मला पुन्हा एकदा आतल्या एका खोलीत नेण्यात आलं.. त्या मंडळातले सारे कमिटी हिजडे अगदी कृतकृत्य होऊन माझ्याभोवती जमले होते.. 'अब मुझे जाना होगा..देर हो गई है..' असं मी म्हटल्यावर थोडं तरी काही खाऊन गेलंच पाहिजे असा मला त्या टकल्यासकट इतर हिजड्यांनी आग्रह केला.. पाचच मिनिटात कुणीतरी गरमागरम पुर्‍या, छोले, गाजरहलवा असा मेनू असलेलं ताट माझ्या पुढ्यात घेऊन आला.. अखेर दशग्रंथी विद्वान तात्या अभ्यंकर अल्लाजनसोबत तेथून निघाले.. एक वेगळाच अनुभव घेतला होता मी.. गणपतीकडे त्या यजमान हिजड्यांकरता काय मागणार होतो मी? 'यांचा शरीरविक्रयाचा धंदा चांगला होऊ दे' - हे मागणार होतो? आणि मुळात त्यांच्याकरता देवाकडे काही मागणारा मी कोण? माझीच झोळी दुबळी होती.. त्यांच्या झोळीत माप टाकायला गणपती समर्थ होता..! निघण्यापूर्वी त्या टकल्या हिजड्यानं माझ्या हातात एक पाकिट आणि हातात एक पिशवी ठेवली आणि मला नमस्कार करू लागला.. वास्तविक मलाच त्याच्या पाया पडावसं वाटत होतं..वयानं खूप मोठा होता तो माझ्यापेक्षा...! तेथून निघालो. पाकिटात शंभराची एक कोरी नोट होती.. सोबत ही पिशवी कसली? 'आमच्याकडे जाताना भिक्षुकाला शिधा द्यायची पद्धत आहे..' अल्लाजानने माहिती पुरवली.. मी पिशवी उघडून पाहिली तो आतमध्ये एका पुढीत थोडे तांदूळ, दुसर्‍या पुडीत थोडी तूरडाळ..आणि दोनचार कांदेबटाटे होते.. डाळ-तांदुळाचा तो शिधा पाहून मला क्षणभर हसूच आलं.. 'अरे हे काय? डाळ-तांदुळाचा शिधा?' मी अलाजानला विचारलं.. "डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!" अल्लाजानच्या तोंडून सहजच निघालेलं ते वाक्य बी ए, एम ए, पीएचडी... सार्‍या विद्यांना व्यापून त्यांच्या पल्याड जाणारं होतं, गेलं होतं.. ! मला आजही त्या शिध्यातले डाळतांदूळ पुरत आहेत..! -- तात्या अभ्यंकर.

Book traversal links for माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - अंतीम भाग..

  • ‹ माझी कामाठीपुर्‍यातली भिक्षुकी - मी धूपार्तीचा भिक्षुक..! - भाग १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25667 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

निशब्द.....

बाबा योगीराज
Mon, 09/06/2010 - 23:32 नवीन
मला मिपा वर प्रवेश मिळल्याचा खूप आन्॑द आहे................... सु॑दर लिखान्..................माझी वाचन खाज पुर्णपने भागतेय.................... ____________________________
  • Log in or register to post comments

प्रतिसाद नोंदवून प्रशंसा

विसोबा खेचर
Tue, 09/07/2010 - 13:18 नवीन
प्रतिसाद नोंदवून प्रशंसा करणार्‍या, नावे ठेवणार्‍या, तसेच सर्व वाचनमात्रांचे मनापासून आभार.. तात्या.
  • Log in or register to post comments

लिखाण लै भारी तात्या! बाकी

मेघवेडा
Tue, 09/07/2010 - 14:45 नवीन
लिखाण लै भारी तात्या! बाकी नानाशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

घासकडवी , श्रामो यांच्या

पक्या
गुरुवार, 09/09/2010 - 11:55 नवीन
घासकडवी , श्रामो यांच्या सारख्यांचे बोजड लिखाण वाचण्यापेक्षा तात्यांचे सुटसुटीत लिखाण वाचायला चांगले वाटते.
  • Log in or register to post comments

घासकडवी आणि श्रामो आजकाल

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 09/09/2010 - 12:20 नवीन
घासकडवी आणि श्रामो आजकाल आमंत्रणपत्रिका वाटतात का, 'लेखन वाचायला या' म्हणुन ? मला का नाही पाठवत एखादी पत्रिका ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

ही जळजळ असेल तर इनो घ्या ...

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 09/09/2010 - 12:39 नवीन
ही जळजळ असेल तर इनो घ्या ... लाराकुमार Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

घासकडवी , श्रामो यांच्या

विसोबा खेचर
गुरुवार, 09/09/2010 - 13:00 नवीन
घासकडवी , श्रामो यांच्या सारख्यांचे बोजड लिखाण वाचण्यापेक्षा तात्यांचे सुटसुटीत लिखाण वाचायला चांगले वाटते.
पक्याराव, इतरांच्या लेखनाबद्दल इथे काही भाष्य करणं मला उचित वाटत नाही.. बाय द वे, माझं लेखन आपल्याला चांगलं वाटतं, या बद्दल आभारी आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

(विषय दिलेला नाही)

अवलिया
गुरुवार, 09/09/2010 - 15:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सुरेख...

चिगो
गुरुवार, 09/09/2010 - 14:13 नवीन
अतिशय सुरेख लेखन... काँग्रॅट्स तात्या. अगदी सहजपणे कामाठीपु-यातला सोज्वळ दिवस रेखाटलाय तुम्ही. थॅंक्स...
  • Log in or register to post comments

छानच लिहिलंय तात्या... हिजडे

स्मृती
गुरुवार, 09/09/2010 - 15:57 नवीन
छानच लिहिलंय तात्या... हिजडे जेव्हा त्यांच्या''एलिमेंट' मध्ये नसतात तेव्हा तुमच्या आमच्यासारखेच असतात याचा अनुभव अनेक वर्षांपुर्वी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये मला आला... तेव्हापासून त्यांच्याबद्दलची भिती साफ पळाली माझी... असो.. त्याविषयी पुन्हा केव्हातरी :)
  • Log in or register to post comments

"डालचावल के अलावा इन्सानको

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 09/09/2010 - 17:36 नवीन
"डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!">>>> जगण्याचे एकमेव सत्य सांगितलेत तात्या. खरेच हे असं काही वाचलं की तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची इच्छा उफाळुन येते.
  • Log in or register to post comments

थोड्या विलंबाने प्रतिसाद

विसोबा खेचर
Fri, 09/10/2010 - 13:58 नवीन
थोड्या विलंबाने प्रतिसाद नोंदवणार्‍या पांथस्थ,यशोधरा, मेघवेडा, पक्या, चिगो, स्मृती आणि विशाल यांचा मी ऋणी आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

"डालचावल के अलावा इन्सानको

Rahul D
Sun, 04/24/2016 - 23:52 नवीन
"डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!" जगण्याचे एकमेव सत्य...
  • Log in or register to post comments

"डालचावल के अलावा इन्सानको जिंदगीमे और क्या लगता है?!"

रघुनाथ.केरकर
Mon, 04/25/2016 - 12:25 नवीन
खरय...
  • Log in or register to post comments

कुंभार हो गाढवांची कमी नाही

सूड
Mon, 04/25/2016 - 21:28 नवीन
कुंभार हो गाढवांची कमी नाही हे बेंबट्याचे तीर्थरुप सांगून गेले ते काही खोटं नव्हे तर!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा