Skip to main content

मुंज

लेखक प्रभो
Published on बुधवार, 21/04/2010
मागच्या आठवड्यात एक पत्रिका आली घरी. गुल्ट्या रूमीला मराठी वाचता येत नसल्याने कोणाच्यातरी लग्नाची पत्रिका वाटली त्याला. मी घरी आलो तर बोंबलत विचारलं..'किसका शादी है? इनव्हिटेशन आया है.' त्याच्याकडून पत्रिका घेऊन पाहिली तर ताईने पाठवलेली. राहुलच्या मुंजीची. पत्रिका वाचताना मन हळूच मगे गेलं ...१९९३ मधे. मुलगा आठ वर्षाचा झाला की मुंज करायची असा आमच्या घरचा रिवाज. आजोबा लवकर वारल्याने वडिलांची मुंज खुपच उशिरा झालेली. त्यामुळे त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा होती की आपल्या मुलाची मुंज एकदम धुमधडाक्यात करायची. माझी तिसरीची परिक्षा संपली आणी सगळ्यांनाच वेध लागले मुंजीचे. बाबांनी फंडातून बरेचशे पैसे काढले. एवढे काढले की त्यावेळी नॉर्मल मुंजीच्या खर्चापेक्षा ते नक्कीच जास्त होते. पत्रिका छापल्या गेल्या. आई बाबांसोबत बसून लिस्ट मधल्या सगळ्या पाहुण्या रावळ्या - मित्र मंडळींना पत्रिका पाठवल्या गेल्या. जवळच्या नातेवाईकांना पत्रे ही पाठवली. सगळ्या नातेवाईकांसाठी कपडे घेऊन मुंजीचा बस्तापण बांधला गेला. माझ्यासाठी एक सुंदरसे पितांबर घेतले. एक लॉकेट , एक वळी घेतली. वर्षभरापूर्वीच माझ्या आतेबहिणीचे लग्न झाले होते, त्यात भावजींनी घातलेला जोधपुरी मला जाम आवडला होता. बाबांच्या मागे लागून मी तोही घेतला होता. मुंजीच्या आदल्या रात्री पासूनच कार्यालय बूक केलं होतं. मावश्या आणी आत्या लोक २-३ दिवस आधीच घरी आले होते. अंगणात चुलीवर मोतीचूर लाडवाचे घाणे पडत होते. फुल्ल राजा होतो मी ते ५-६ दिवस. मुंजीच्या दिवशी सकाळ पासून सगळ्यांची गडबडघाई चालू झाली. गुरुजींनी मंत्रोच्चार करताना नाव्ह्याला माझे चकोट करायला सांगितले. भोवर्‍यावर एक वाटी ठेवून तो चालू झाला. आंघोळ झाल्यावर लंगोट घालून वरून एक पंचा गुंडाळून यज्ञकुंडाजवळ बसवून ब्रम्हचर्याची दिक्षा देण्यात आली. भिक्षुकीची प्रॅक्टीस पण झाली. धुपाच्या/धुराच्या वासाने वातावरण भरून गेलं होतं. लहान असल्याने जास्त काही समजत नव्हतं , पण आपल्याला सगळे एवढा मान देतायत हे पाहून मस्त वाटत होतं. सगळे विधी झाल्यावर मस्त श्रिखंड पुरीचे जेवण हाणलं शेवटच्य पंक्तीला.. :( संध्याकाळी घोड्यावर बसून मारूतदर्शन करून थोड्या वेळाने घरी आलो. माझ्या सगळ्या मित्रांना टकलावरून हाथ फिरवायची हौस..जो तो येता जाता माझ्या टकलावर हाथ साफ करायचा. पुढे आमच्या वसाहतीत दोन तीनच मुंजे असल्याने आमची डिमांड वाढली. त्याबद्दल नंतर कधीतरी.... *जेवणासाठी मुंजा, बामण हवा असल्यास मला व्यनि ने संपर्क करावा :D
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 4221
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

छान.. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

छान.. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या छोटेखानी लेख आवडला. माझ्या मुंजीच्या दोन दिवस आधी मला एकदम पाच पर्यंत पाच आला. त्यात गंमत अशी झाली की आम्ही पश्चिम उपनगरातून रेल्वेने येत असताना, सांताक्रूझ स्टेशनजवळून जात असताना विमानतळावरील विमाने दिसली. कुठेतरी डोक्यात राहीले असावे. रात्री मला फणफणून ताप. १०५ म्हणजे कधिही जास्तच, त्यावेळेस अजूनच गंभिर वाटले. मी अर्धवट झोपेत होतो, कुठेतरी स्वप्नात ती विमाने दिसत होती. म्हणून मला विमान दिसतयं असे म्हणालो... बापरे! सगळे एकदम घाबरलेच, कसले विमान याला आता दिसायला लागले म्हणून ;) मग मी सांगितले अहो मी तसा जागा आहे, स्वप्नात सकाळची विमाने दिसली.. मग जीव पिंपात पडला! डॉक्टरांना घरी बोलवावे लागले. मग त्यांनी औषधे देऊन ताप कंट्रोलमधे आणला. मात्र मुंजीत डोक्यावरील केसांपेक्षा इतरच काटछाट सांगितली. परीणामी एकदाच अंघोळ (स्पंजबाथ), केस कापले जात आहेत हे केवळ फोटोपुरतेच, तीच अवस्था जेवताना पण... :-( दुसर्‍या दिवशी सोडमुंज झाली. बाकी मुंज हा सर्व विधी संस्कार म्हणूनच झाल्याने कधी संध्या वगैरे करायच्या भानगडीत पडलो नाही आणि घरच्यांनी पाडले देखील नाही. तरी देखील केवळ घरातीलच नाही तर इतर नातेवाईक, शेजारी-पाजारी आणि घरच्यासारखे असलेले/वागलेले डॉक्टर यांच्या सर्वांच्या काळजी घेण्याने, आस्थेने मदत करण्याने, आणि अर्थातच उत्सवमुर्ती म्हणून केलेल्या प्रेमाने, वेगळ्याच अर्थाने त्या वयात, जे काही प्रेमाचे आणि आत्मियतेचे संस्कार झाले, ते कायमचे मनात रूजले असे वाटते. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मुंज मधला ज आहे जल म्हणतो त्यातला. माझा मुलगा तो ज म्हणायचाच नाही. तो म्हणायचा जमाव मधला ज आणि जानव्याला जांजव ते ही जमावातला ज ..अ‍ॅट ऑल प्लेसेस... एक दिवस ही संध्यापूजा नाही . त्याच्या बाबाला वेळेच मिळाला नाही शिकवायाला. 8| आता १० वर्षांनी मुलगा जांजव म्हणजे काय ते ही विसरला असावा. विचारायला हवं मुंज आठवते आहे का? मधलामीनल. http://myurmee.blogspot.com/

In reply to by मीनल

इकडे पण तेच आहे...मुंजीनंतर २ वर्ष केली संध्या....

हाहाहा ;) छानंच रे प्रभ्या :)

माझ्या मुंजीच्या वेळी माझी चौथीची स्कॉलरशिपची परीक्षा होती. ४ फेब्रुवारीला मुंज आणि ५ फेब्रु. ला परीक्षा. शाळेत कोचिंग क्लास असायचा. मला एकही दिवस क्लास बुडवायचा नव्हता. मी जाणारच म्हणून रडून गोंधळ घातला. एकदा ग्रहमख झाल्यावर मुंजामुलाने बाहेर जायचे नाही म्हणून घरचे तयार नव्हते. (घरी सगळे पाहुणे म्हणून बाबांना त्यांचे हस्तलाघव दाखवायला चान्स नव्हता! नाहीतर माझी काय बिशाद गोंधळ करायची!! ;)) घरापासून शाळा हाकेच्या अंतरावर त्यामुळे शाळेत निरोप पोचवला. शेवटी रसाळ बाई घरी आल्या त्यांनी मुंजीच्या दिवशी घरी माझा एक तास अभ्यास घेतला आणि मगच आस्मादिक मुंजीला उभे राहिले! B) (मुंजीचा इफेक्ट म्हणून असेल कदाचित पण मला स्कॉलरशिपही मिळाली! ;) ) चतुरंग

In reply to by चतुरंग

(घरी सगळे पाहुणे म्हणून बाबांना त्यांचे हस्तलाघव दाखवायला चान्स नव्हता!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) आता मात्र आमचाच बाजार उठला =)) ह ह पो वा ती - रंगेश हस्तलाघवी

मुंजीचे वर्णन आवडले. घरच्यांना उत्साह असला, की कुठचीही कार्ये छानच घडून येतात. अवांतर -मग काय, राहुलच्या मुंजीला जाणार का?

आम्हाला का नाही रे बोलावलं मुंजीला प्रभ्या? शाळेत दांडी मारून आलो असतो ना! The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही