Skip to main content

रद्दड राठोड (Rowdy Rathore - Review)

रद्दड राठोड (Rowdy Rathore - Review)

Published on गुरुवार, 07/06/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
काल ऑफिसात फारच पकलो. जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं. आजकाल बहुतेक हिंदी सिनेमा च्यानल्सवर संध्याकाळी टिपिकल दक्षिण भारतीय सिनेमे हिंदीत डब करून माझ्यासारख्यांसाठीच असतात! पण, काल जरा जामच पकलो होतो म्हणून म्हटलं आज काही तरी वेगळं करू. आज पैसे देऊन फालतू सिनेमा बघू! पेपर बघितला. त्यातल्या त्यात 'फिल्मी' सिनेमा निवडला. शोचं टायमिंगही सोयीस्कर होतं. बास्स.. बाईकवर टांग टाकली आणि थेट थेटरात पोहोचलो ! ती संध्याकाळ होती 'राउडी राठोड' ची.. समोर लावलेलं अक्षय कुमारचं पोस्टर सिनेमा कस्स्सला 'फिल्मी' असणार आहे, ह्याची कल्पना देत होतं आणि भोवतालचं पब्लिकही एकदम 'डोंट अँग्री मी' टाईप छपरी होतं. मला माझ्या मनोरंजनाची खात्री मिळाली. सिनेमा नक्कीच टुक्कार असणार, ह्या विचाराने मला गुदगुल्या होत होत्या. -------- हे असं सगळं मी केलं असेल, असं जर तुम्हाला खरोखर वाटलं असेल तर तसं नाहीये !! प्रभुदेवा हा एक बरा दिग्दर्शक आहे (असं ऐकलं होतं), भन्साळीची निर्मिती म्हणजे अगदीच 'गेला बाजार' नसेल (असं वाटलं होतं) आणि अक्षय कुमार विचार करून सिनेमे निवडत असतो (असा गैरसमज होता) म्हणून मी सिनेमाला गेलो. (खरं तर मला प्रभूदेवाचा 'वाँटेड' आवडला होता. फुल्ल टाईमपास होता आणि हा 'राठोड'ही त्याच पठडीतला असेल अशीही एक अवास्तव अपेक्षा होती.) असो. आता, शेण तर खाल्लं. ते का खाल्लं, ह्याला काही अर्थ नाही. खाल्लं हेच महत्त्वाचं! त्यामुळे मी माझ्या ह्या मूर्खपणासाठी स्वत:ला मोठ्या मनाने क्षमा करतो आणि माझा गुन्हा विस्तृतपणे इथे विषद करतो. ही कथा आहे शिवा आणि विक्रम राठोड ह्या एकसारख्या दिसणाऱ्या दोन 'राउडीं'ची. शिवा एक पट्टीचा चोर आहे आणि विक्रम राठोड हा एक कर्तव्यदक्ष, शूरवीर व चाणाक्ष पोलीस ऑफिसर (ए. एस. पी.) शिवा मुंबईत तर राठोड उत्तर प्रदेशातील 'देवगढ' ह्या भागात. देवगढमध्ये 'बाबजी' ह्या गुंडाची हुकुमत चालत असते. तोच तिथलं सरकार असतो. पोलीस, सरकारी यंत्रणा सगळ्या त्याच्या टाचेखाली असतात. बाबजी, त्याचा मंद मुलगा आणि बलदंड भाऊ (टिटला) देवगढवासियांवर अनन्वित अत्याचार करीत असतात. लुटमार, हफ्ता वसुली, बायका पळवणे, खून, बलात्कार सगळं सगळं अगदी बिनधास्त उघड उघड चालत असतं. अश्या ह्या अराजक माजलेल्या भागात नवीन ए. एस. पी. म्हणून विक्रम राठोड येतो आणि अर्थातच बाबजीला भिडतो. टिटला राठोडवर प्राणघातक हल्ला करून त्याला डोक्यात गोळी मारतो आणि त्याला अख्ख्या गावासमोर लटकवून आपली दहशत अजून वाढवतो. पण डोक्यात गोळी जाऊनही राठोड मरत नाही! राठोडचे कनिष्ठ पोलीस साथीदार ही गोष्ट गुप्त ठेवून त्याच्यावर उपचार करवतात आणि तो बरा होतो. उपचारासाठी राठोडला मुंबईत आणलं जातं आणि तो जिवंत आहे हे बाबजीला कळतं. राठोडला मारण्यासाठी गुंडांची फलटण पाठवली जाते. तत्पूर्वी, आजारी राठोडच्या लहान मुलीची देखरेख करणे खूप कठीण होऊन बसल्याने आणि योगायोगाने राठोडचा डुप्लिकेट 'शिवा' नजरेस पडल्याने राठोडचे साथीदार मोठ्या शिताफीने राठोडच्या मुलीला शिवापर्यंत पोहचवतात आणि अशी परिस्थिती निर्माण करतात की शिवाला तिचा स्वीकार करावाच लागतो. पण, राठोडला मारण्यासाठी मुंबईला आलेल्या गुंडांच्या तावडीत शिवा सापडतो. मग त्याला वाचवायला खुद्द राठोड प्रकटतो. रक्तरंजित हाणामारीत तो किमान ३० एक जणांना ठार मारतो आणि स्वत:ही जबर जखमी होऊन नंतर मरतो! शूरवीर राठोडची कहाणी समजल्यावर शिवा गेट्स इम्प्रेस्ड ! तो राठोड बनून देवगढला येतो आणि बाबजी व त्याच्या साम्राज्याला संपवतो. (तेही फक्त शेवटच्या अर्ध्या तासात!) असं सगळं घडल्यावर एकदाचा हा रद्दड राठोड संपतो आणि सुटकेचा निश्वास घेण्यासाठी EXIT लिहिलेल्या पाटीकडे प्रेक्षक जीव मुठीत घेऊन पळत सुटतो. अनेक दिवसांनंतर इतका बंडल सिनेमा बनला असावा की ज्यात काही म्हणता काहीही चांगलं सांगता येणार नाही! संगीत तर इतकं टुकार की साजीद-वाजीद ला आजीवन प्रतिबंधित करावं. पटकथाकाराचं नाव दिसलं नाही. बहुतेक असा कुणी माणूस नेमलाच नसावा. प्रभूदेवाचा अभिनय त्याच्या दिग्दर्शनापेक्षा बरा आहे. (ह्याहून वाईट प्रतिक्रिया सुचली नाही.) सोनाक्षी सिन्हा नामक दांडोबाने पुढील सिनेमा (मिळाल्यास) 'हिरो' म्हणून करावा. तिची धटिंगण शरीरयष्टी 'हिरो' म्हणूनच शोभून दिसेल. खरं तर तिच्यापेक्षा एखादा ओंडका उभा केला असता तर त्यानेही जरासा अभिनय केला असता आणि जो काही नाच-बीच केला आहे, तेव्हढा त्या ओंडक्याकडून प्रभुदेवा व अक्षयकुमारने करवून घेतला असता. ह्या चौघांना (आणि पटकथाकार असल्यास तो पाचवा) गळ्यात धोंडा बांधून विहिरीत टाकावं, असा एक खुनशी विचार माझ्या मनातून काही केल्या जात नाहीये. त्यातल्या त्यात अक्षय कुमार (आता इतक्या वर्षांचा अनुभव आहे म्हटल्यावर) सुसह्य वाटतो. अन्यथा सिनेमा सहनशक्तीचा अंत पाहणाराच आहे. भन्साळीने शरमेने खजील होऊन कुठे तरी तोंड लपवून बसावं की इतक्या रद्दड सिनेमाशी त्याचं नाव जोडलं गेलं आहे.. हा सिनेमा मी थेटरात जाऊन पाहिला. ह्याचं प्रायश्चित्त म्हणून मी येत्या सुट्टीच्या दिवशी घरात बसून डीव्हीडीवर लागोपाठ तीन वेळा "बॉडीगार्ड" सिनेमा बघणार आहे. (भोग मेल्या आपल्या कर्माची फळं.. बघशील ? बघशील परत असला सिनेमा..? बघशील ?) (रामदासांनी त्यांची बासुंदीची वासना कशी मारली होती? तसंच काहीसं!) आता इतकं सगळं वाचल्यावर मी ह्या सिनेमाला दर्जात्मक रेटिंग वगैरे देईन, असं काही तुम्हाला वाटलं नसेल; ही अपेक्षा करतो. http://www.ranjeetparadkar.com/2012/06/rowdy-rathore-review.html
लेखनविषय:

याद्या 12431
प्रतिक्रिया 37

किती पैसे घालवलेत म्हणे?

झकासच लिहिले आहे................. :P

म्हणुनच तर पाहिला नाही!! ;) बाकी परिक्षण मस्त जमलय! :)

मजा आ गया पढके..भाऊ.. सोणाक्षी चे नाक अण्णा हजारे यांच्या नाका सारखे खालच्या बाजुला झुकलले आहे ....

सोनाक्षी सिन्हा नामक दांडोबाने पुढील सिनेमा (मिळाल्यास) 'हिरो' म्हणून करावा. तिची धटिंगण शरीरयष्टी 'हिरो' म्हणूनच शोभून दिसेल. खरं तर तिच्यापेक्षा एखादा ओंडका उभा केला असता तर त्यानेही जरासा अभिनय केला असता आणि जो काही नाच-बीच केला आहे, तेव्हढा त्या ओंडक्याकडून प्रभुदेवा व अक्षयकुमारने करवून घेतला असता. >>>>>> =))

In reply to by किलमाऊस्की

सोनाक्षी सिन्हा नामक दांडोबाने पुढील सिनेमा (मिळाल्यास) 'हिरो' म्हणून करावा. तिची धटिंगण शरीरयष्टी 'हिरो' म्हणूनच शोभून दिसेल. खरं तर तिच्यापेक्षा एखादा ओंडका उभा केला असता तर त्यानेही जरासा अभिनय केला असता आणि जो काही नाच-बीच केला आहे, तेव्हढा त्या ओंडक्याकडून प्रभुदेवा व अक्षयकुमारने करवून घेतला असता. >>>>>> =))
ठ्ठॉsssssठ्ठॉsssssठ्ठॉsssss =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अगा अग्गा ...गागागागागागागागागागागागागागागागागा....आई ग्गं....!..... हेमान्गी ताई......... त्रिवार सहमत!!! .... द्या रे कुणीतरी.... या अर्धटकल्या सोनाक्षीला कन्गना राणावतचा कर्ली हेअर'चा विग!!!! ;) =)) =)) =)) =)) =)) =))

पश्चातापदग्ध झाल्याने लिहिलेली समीक्षा आवडली. ;) सोनाक्षीबद्दल असलेले आपले मत वाचून हसू आले. येत्या विकांताची शिक्षा भोगण्याचे सामर्थ्य आपणास मिळो ही त्या देवाकडे प्रार्थना.

सोनाक्षी सिन्हा हीला हिरॉइन (अभिनेत्री नाही म्हणत आहे मी, ते बरेच वेगळे असते) का म्हणावे बरें ? चेहेर्‍यावरील माशी हलणार असा चेहरा करून डायलॉक्स मारणे म्हणजे अभिनय नव्हे आणि दांडपट्टा चालवण्याची कवायत म्हणजे नाच नव्हे हे तीला शत्रुघ्न ने समजावून सांगायला हवे होते. अरेच्चा पण प्रोब्लेमच आहे ना...आडातच नाही तर पोहोर्‍यात कुठुन येणार म्हणा :) बाकी अजुनही हा सिनेमा बघायची खा.. इच्छा जर कोणाची असेलच तर इंटर्व्हल नंतर सिनेमा बघा. कारण त्याआधि सिनेमात काय होते त्याचा अजुनही पत्ता लागलेला नाही. - ( रावडी ) सोकाजी

=))

आमचे वेळीच डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद! :-) बाकी तुमचे प्रायश्चित्त एकदम आवडले.! अवांतरः बॉडीगार्ड वगैरे सारखे अनेक डिव्हीडी गोळा करून अफझल गुरूस सतत दाखवल्या पाहीजेत. मग तो दयेच्या अर्जात लवकर फाशी द्या म्हणून याचना करेल!

>> सिनेमा नक्कीच टुक्कार असणार, ह्या विचाराने मला गुदगुल्या होत होत्या लेका संतच की रे तू असो पिच्चर नाही पण तुमच्या लिखाणाने मजा आणला

एकदम मजेदार परीक्षण आहे!

चित्रपटाबद्दल खुसखुशीत लिहिलंय. डिव्हीडीवर संपूर्ण चित्रपट फॉर्वडच्या बटनावर बोट ठेवून पाहिला. शेवटची हानामारी फॉर्वडची फूलस्पीड करुनही संपत नव्हती. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वामी विवेकानंद म्हणे पाने उलटत पुस्तके वाचत. त्याची आठवण झाली. हा चांगला प्रकार आहे बकवास चित्रपट पहाण्याचा ! :) बाकी परीक्षण झकास!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

. डिव्हीडीवर संपूर्ण चित्रपट फॉर्वडच्या बटनावर बोट ठेवून पाहिला. व्वा! शेवटची हानामारी फॉर्वडची फूलस्पीड करुनही संपत नव्हती. ठ्या....

पावसाळा सुरू झालाच आहे. विहिरींना पाणी येऊ द्या. मग तुमचा खुनशी विचार पूर्ण करा..
ह्या चौघांना (आणि पटकथाकार असल्यास तो पाचवा) गळ्यात धोंडा बांधून विहिरीत टाकावं, असा एक खुनशी विचार माझ्या मनातून काही केल्या जात नाहीये.

आता बघावाच लागणार...

परा गुरुजी व रसप यांची परीक्षणे वाचून खूप बरे वाटले व मनावरचा ताणही हलका झाला. आपणास साष्टांग दंडवत. कारण कर्मधर्मसंयोगाने अथवा पूर्वजन्मीच्या पापकर्मामुळे या चित्रपटाचा प्रथम दिवस प्रथम खेळ गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहात जाऊन पाहिला. स्वेच्छेने पाहिला नव्हताच, पण पाहावा लागलाच. मूळ चित्रपटाचे असे काही कौतुक करण्यात आले होते की तो न पाहून मी फारच मोठे पाप केले होते. अन या पापक्षालनासाठी रा. रा. पाहणे तोही प्रथम दिवस - प्रथम खेळ या तत्त्वावर हा एकमेव उपाय आहे असे सूचित केले गेले होते. याहून मोठी मजबूरी म्हणजे निम्म्यातून पळून येणेही या दुर्दैवी जीवास शक्य नव्हते. काहीतरी अघटित घडून वीज वगैरे जावी अशी मनोमन प्रार्थना करीत होतो पण तसेही घडले नाही. वेळ - इंधन - पैसे (अर्थातच ऊर्जाही) वाया गेल्याच दुःख आहेच पण काळ (टॉलीवूड रुपी) काळ सोकावतो आहे याचे अतीव वाईट वाटते. काही महिन्यांपूर्वी देऊळ चित्रपटाचा चित्रपटगृहातील एकमेव खेळ मी न पाहणे व रा. रा. मला प्र. दि. प्र. खे. पाहावा लागणे यात नक्कीच कुठेतरी नियतीचा खेळ असावा. अशी वेळ या पुढे या निरागस बालकावर न येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

In reply to by श्रीरंग_जोशी

जोशी साहेब आता एक काम करा संत तुकाराम पाहून घ्या. म्हणजे ह्या जन्मी तुम्ही पुढच्या जन्मासाठी पुण्य संचय करून ठेवाल.म्हणजे पुढील जन्मी तुम्हाला पहिल्या दिवसाचा पहिला शो चांगल्या सिनेमाचा पहावयास मिळेल.

In reply to by निनाद मुक्काम …

निनादराव - नक्कीच संत तुकाराम संधी मिळेल तेव्हा नक्कीच बघीन. येथील महाराष्ट्र मंडळाला विशेष खेळ आयोजित करायची विनंती करेन...

ह्यापेक्षा, आमच्या रवितेजाने येक लंबर अभिनय केलाय विक्रमार्कुडु सिनेमात... हो हो... तोच तो... प्रतिघात... अन अनुष्का काय दिसते राव... या भिक्कारचोट सोनाक्षीच्या %#%^$^$&^%&^ट& http://www.youtube.com/watch?v=m-Lwl608dnY (విక్రమార్కుడు )

In reply to by वपाडाव

तो चित्रातला माणूस आहे त्याच्या मिश्यांसारख्या पण खोट्या मिश्या (स्टीकरवाल्या) लावून माझा मुलगा घरात हिंडत बसला होता.

असले सांबारपट इतके निघायला लागले आहेत की लवकरच १९८० च्या हिंदी चित्रपटांचा सुवर-ण काळ येणार याची खात्री पटायला लागली आहे (उदा: पाप-को-जलाकर-राख-कर-दूंगा) ! सांबार इडली डोशाबरोबरच चांगले लागते. पराठ्याबरोबर सांबार घेतलं तर रावडी सारखं होतं.