लपलेल्या जंगलातली शब्दचित्रं
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकालपलेल्या जंगलातली शब्दचित्रं

दिवस लहान होताहेत. तसंही पहाडांत झुंजुमुंजु लवकरच. आता आणखीनच लवकर. रजई, पांघरूण ह्यामधून उठून बसणं कठीण होतंय. गर्द वृक्षराजीमुळे सभोवताली हाडं गोठवणारी थंडी. तरी दूर दूर पसरलेल्या घरांतून छपरांवरची धुराडी, घरं जागी झाल्याची खूण म्हणून अलगद स्वयंपाकाचा, पाणी तापवायचा इत्यादी धूर, वाफा वगैरे नि:शब्दपणें आसमंतात भिरकावतायत. निरव शांततेची लय न बिघडवता. सकाळचं वृक्षांवरून, झाडांझुडपांवरून, आसमंतात दाट सायीसारखं साचून राहिलेलं धुकं, त्यातच मिसळणारा उबदार धूर आणि हे सारं अंगावर पांघरत शिखरांटेकड्यांंफांद्यांंघरांवरून खाली जमिनीवर उतरत हलकेच दृश्यमान होणारी सूर्यकिरणं फार सुंदर दिसताहेत. सगळं चित्र कसं देखणं दिसतंय.. जंगलाच्या काठावरची ही एक छोटीशी वस्ती. जंगलदेखील फारसं प्रसिद्ध नाही. ते एक बरं आहे. गर्दी आणि पर्यायाने होणारा कलकलाट नाही.

घरातली मोठी पुरुष मंडळीं आन्हिकं आटोपून, न्याहारी करून, थंडीचा मुकाबला करायला कानटोपी, काहीतरी गरम कोट, जाकीट किंवा शाल पांघरून, आपली खेचरं, एखादं गुर घेऊन बाहेर पडलीत. खेचरांच्या गळ्यांतल्या घंटा नाजूक, आश्वासक किणकिणत राहतात. आता बिड्या फुंकत, एकमेकांना हाकारे घालत, मध्येच कुठे बसून गप्पा छाटत, चाय पीत कामाच्या ठिकाणी पोहोचतील. कोणीतरी कचेरीत काम करणारा बाबू असला तर आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचेल. लहानगी मुलं अनिच्छेने उठत, सगळं आवरून शाळेत जायला निघालीत. गणवेशातले लहानगे घोळके जवळ येताहेत, तसा आख्खा सभोवताल चिवचिवत जागा होतोय! घोळका दूर जातोय, तसा चिवचिवाटही मंद होत जातो आहे. जरा मोठी मुलं, मुली आपापल्या घोळक्यांमधून खुसपुसत वाट कापतायत. लहान-मोठे सर्वच समोरून येणाऱ्या व्यक्तीला हसत रामराम घालताहेत, नमस्ते म्हणताहेत. ती पद्धतच इथे. त्याचं प्रत्युत्तर देताना त्यांचा निर्मळ, प्रसन्न भाव एकमेकांना स्पर्शून जात असावा. इतकं सोपं आहे प्रसन्न असणं.. पहाडातल्या बायका आता कामाला लागल्यायत. त्यांचा कामाचा उरक अफाट आहे. घरी, शेतात, बाजारहाट, गुरं, त्यांचे गवत भारे आणणं, लाकूडफाटा, स्वयंपाक सगळे व्याप ह्यांच्या माथी. पण खमक्या आणि तितक्याच आनंदी आणि मायाळू. पटकन चहाचा कप पुढे करतात. प्रेमाने बोलतात. सगळं निरपेक्ष. त्यांना आयुष्याची खूप जाण आहे, हे नक्की. त्या कधीच हरत नसाव्यात. दिवस लख्ख उजाडलाय. निळंभोर आकाश, पायातळी गवत, गवतफुलं, शैवालयुक्त हिरवे पोपटी वृक्ष, आकाशात सूर मारणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट, माणसांची संथ लगबग, फूलपाखरांच्या नि:शब्द भराऱ्या, खारी, इतर छोटे छोटे इतस्ततः धावणारे प्राणी.. सगळं स्वप्नवत वाटतं खरं.

'गर्द सभोती रान साजणी' असा मामला असला तरी रानवाटा तशा सुगम आहेत. पायांखाली रुळलेल्या असल्याने असाव्यात. पायाखाली खूप पाचोळा असला तरी चालताना खूप खुर्रsssफुर्रsss आवाज होत नाहीये, क्वचित एखादी वाळकी काडी वगैरे पायाखाली आली तरच. माथ्यावरच्या गर्द सावलीमुळे, पाचोळ्याचा दवाने, थंडीने भिजलेला नरमपणा तसा पथ्यावर पडलेला. शहरी पावलांना मांजरपावलांनी चालायची सवय नसते, पण हे ठीके, फार आवाज होत नाहीये. सोबतीला दोन भूभू उगवलेत कुठूनतरी. पहाडांत येणाऱ्या प्रत्येक भटक्या जिवाला इथे कोणीतरी भूभू वाटाड्या म्हणून लाभतोच. आता फिरा बिनधास्त जंगलात. तसंही हे फार घनघोर जंगल वगैरे नाहीये. भटकायची सवय आणि आवड असेल, तर शहरी जिवांनासुद्धा बऱ्यापैकी सोसेल असंच आहे. जंगलात शिरल्यावर पक्षीबोली ऐकू येतायत, वेगवेगळ्या पद्धतीचे कुकारे, घातलेली शीळ, हाका. मिळणारे साद, प्रतिसाद. सोबतचा वाटाड्या भाई मज्जेत येऊन एक शीळ घालतोय आणि त्याला चक्क प्रतिसाद मिळतोय! हे भारीच! तेवढ्यात वरून कुठून तरी हुपहुपाट ऐकू येतोय. 'आली मेली माणसं' असं काहीसं असेल का? की, 'आली का नवीन टोळी? बघून घ्या! नाई तर क्काय!' असं? टोळीचा नर एकदम एका बाजूने खाली उतरून शांतपणे बसतोय, थोडेफार दात दाखवतोय. आक्रमकतेने नव्हे, हुकमी आत्मविश्वासाने. 'इथून जाताय ते ठीके, पण भूमी माझी आहे..' 'जो हुकूम' म्हणत आम्ही पुढे सरकायचा उत्तम, सावध मार्ग स्वीकारलाय. "चौकन्ने चलो दीदी.. डरने की बात नहीं, बस, चौकन्ने चलो.." इति वाटाडे भाईसाहेब. "चौकन्ने कसलं, इथे मिनिटामिनिटाला मी थक्क होतेय! बस, आपही सहारा!" मी मनातल्या मनात. बाकी, हो, हो म्हणत मान डोलावतेय. आणि ते वाटाडे भूभू? ते बहुधा पुढल्या वाटा शोधायला गेलेत. मागे राहिलेल्यांचं काय झालं, त्यांना चिंता नसावी. नवीन कोणी दोस्त भेटतीलच. त्यांचा हिशेब सोप्पा आहे! आहेत मात्र भलतेच प्रेमळ. समोर खायला काही असलं तर आणखीनच! मध्येच मुंगसांची एक जोडी इथे तिथे फिरत फिरत आमच्याकडे मधून मधून कुतूहलपूर्ण कटाक्ष टाकत राहतेय. त्यांचं मध्येच स्वतःचं अंग उचलत दोन पायांवर उभं राहणं फार लोभसवाणं आहे.
सशासारखा दिसणारा एक गोंडस जीव आहे, फार लाजाळू असतो म्हणे. हिमालयात सापडणारा पिका असावा का? तो धावतोय. थोडं पुढे जाता वाटाड्याच्या पहाडी नजरेला एक साळिंदर दिसतंय. "देखो दीदी.. " हे दबक्या आवाजात. बऱ्यापैकी नजरेस पडावं असं असलं, तरी माझ्या शहरी नजरेला पहिल्या फटक्यात दिसलेलं नाहीये. जरा खट्टू व्हायला होतंच आहे. इतकंही दिसू नये आपल्याला?
"इधर ये दिखता हैं?" ये म्हणजे साळिंदर. हिंदीतलं त्याचं नाव मला ऐन वेळी आठवत नाहीये. थोड्या वेळाने लक्षात येतंय, आपल्याला बहुतेक माहीतच नाहीये हिंदी नाव. घ्या! "हाँ दीदी, दिखता हैं ना, इसे खाने बाघ भी आता हैं.. " बाघ म्हणजे बिबट्या. पट्टेरी वाघ, बिबट्या सगळे बाघ. सर्वप्राणिसमभावाचं उदाहरण. "आपने देखा हैं कभी?" "ना! मैंंने तो नहीं देखा, पर इतनी आसानीसे नहीं दिखता दीदी। वैसे दिनमें दिखेगा भी नहीं.." त्याने न म्हटलेलं, 'घाबरायची गरज नाही', हे मला ऐकू येतंय. तसाच एक मृगसुद्धा बघायचा निसटला आहे माझ्या नजरेतून. वाटाड्या भाईने बरोब्बर बघितलंय. मध्येच ऐकू आलेली खुसपुस त्याचीच. सोन्यासारखी संधी गेली, म्हणून मन हळळतंय. पुढे मग वृक्षराजी बघत, शांत रानवाटांचा अनुभव घेत भटकंती करणं झालंय. थोडंफार जंगल अनुभवायला मिळालंय. बाळशिखरांवरून सभोवतालची वृक्षराजी दृष्टीत साठवताना हिरव्याकच्च रानाचा ओला वास नाकाला अनुभवायला मिळालाय, आणि एक स्मृती म्हणून, आठवण म्हणून आता कायमचा मनात स्थिरावलाय. वाटेत बैठक मारायला, विश्रांतीसाठी टेकायला मोठासा सपाट खडक, वृक्षांची सावली मिळालीय. रानवाऱ्या-झुळकांसंगतीत सोबत नेलेलं अन्न संपवून शेवटी परतीच्या प्रवासासाठी वेगळी वाट धरणं झालंय.
वाटेवर एका ठिकाणी साळिंदराला मारलेलं बघायला मिळालंय. रक्त बऱ्यापैकी ताजं वाटतंय. आठवण म्हणून साळिंदराचे दोन काटे घेऊन, झपाझप पावलं उचलत सूर्यास्ताला मुक्कामी पोहोचलोय. *** राहायची सोय साध्या, अंगण असलेल्या घरात. ते बघताना कोकणातल्या घरासमोरचं अंगण असोशीने आठवतंय. खळं म्हणतात तिथे. ह्या अंगणात फक्त तुळस कमी आहे. घर जरासं खाली. रस्त्यावरून खाली उतरून जावं लागतंय. भवतीने फूलझाडं आहेत, जराशा अंतरावर भाज्यांचे वाफे. भवताल अंधारात डुंबत चालला आहे. वृक्षवल्लींंचा हिरवा रंग काळा दिसायला लागलाय. येतो न येतो असा पाण्याचा खळाळ ऐकू येतोय. सुखावणारा आवाज. एखादी गत पकडून चालल्यासारखा. जवळपास नळातून थेंब ठिबकताहेत.
रातकिडे चारही बाजूंनी वेगवेगळ्या सुरात जयघोष लावून आहेत. कुठेतरी झाडावर फांद्यांच्या बेचक्यातून बसलेलं घुबड हू sss हू ss करत हूल देतंय. सोबतीला आमच्या गप्पांचा आवाज. खेचरांंच्या, गुरांच्या गळ्यातल्या घंटेचा मधूनच येणारा आवाज. शहरी कान बरेच आवाज टिपतायत, त्यांना शाबासकी! किती आवाज टिपायचे राहिले, कोण जाणे.
बसल्या जागेवरून जाईचा वेल बहरल्यागत चांदण्या दिसतायत. अगदी फिकुटलेल्या आहेत, त्या पण चक्क डोळ्यांना दिसतायत! आकाशात हे असं वैभव बघताना हरखायला होतं आहे. तिथल्यांना तसं म्हटलं, तर उत्तरादाखल एक समजूतदार हसू पदरात पडलंय. त्यांनी ही अशी दिवाळी कितीदा पाहिली असेल, आणि आणखी कितीदा बघतील... प्रत्येकाच्या पदरातलं दान वेगळं. आणीत होती। माणिक मोती।। वरतुनी राजस रात।। नाव उलटली। माव हरपली।। चंदेरी दरियांत।। ती ही वरची। देवाघरची।। दौलत लोक पहात।। ... आठवल्याशिवाय राहिलेलं नाही. त्या दिवशी आमचाही पुण्यप्रभाव जोरावर असणार आहे! गाण्याला जोडून आजोबा, त्यांचा लाडका ग्रामोफोन अशा आठवणीसुद्धा फेर धरून गेल्यात. जेवायला साधं, चविष्ट पहाडी खाणं. त्यात ताटात 'रोतरू' म्हणून एक पहाडी पदार्थ आलाय, पानात गुंडाळलेला असा. अतिशय चवदार. कसा बनवतात, विचारलंय. एकदम सोपी कृती! मक्याचे कोवळे दाणे भरडायचे, एकत्र करून, चिमूटभर मीठ घालून एका पानावर थापायचे आणि वाफवायचे. आमच्या कोकणातल्या पातोळ्यांचा पहाडी मैतर की हा. खाताना तूप घेऊन खायचं. बघा आता! मैत्रीवर शिक्कामोर्तब झालंय की नाही! जेवणखाणानंतर घुबडाच्या हूss हूssच्या सोबतीने भुतांच्या गप्पा निघाल्यात. पहाडी भुतांना दऱ्याखोऱ्या, पहाड खूप आवडत असल्याने जंगल सोडून इथे वस्तीवर कुठे येणार, म्हणून निर्धास्त होतोय. तसंही, ही भुतं काही भयानक वाटत नाहीयेत, निसर्गासोबत राहून मवाळ झाली असणार. आमच्या कोकणातली भुतं कशी ड्येंजर. ती असताना ह्यांची काय भीती! मनातल्या मनात हूंss असं नाक उडवून झोपायला जायचा विचार पक्का होतो आहे. बिबट्या वस्तीवर येतो का, विचारायचं राहून गेलं आहे... हू sss हू ss हू sss. पाणी, घुबड आणि सुस्तावल्या रातकिड्यांना ऐकत दमले डोळे नकळत, अलगद मिटू पाहताहेत... *** पहाटेच डोळा उघडला आणि दव पडताना चक्क ऐकू येतं आहे. खिडकीवरला पडदा जरासा बाजूला करून पाहिलं तर अंधार फिकुटतोय, धुक्याच्या रजईतून हिरवी वनराई हळूहळू डोकं वर करतेय. आज, असाच दिवस घालवायचा आहे, निवांत. इथल्या भूमिपुत्रांचा दिवस नेहमीसारखाच सुरू झालाय. संथ लयीची लगबग. त्याहून संथ लय माझ्या दिवसाला. विलंबित ख्यालासारखी. निवांत न्याहारी, गप्पा संपवून आज निरुद्देश भटकायचं आहे. जंगलात एकटं न घुसण्याचा सल्ला मिळालाय, त्यामुळे असंच पायवाटांनी, वस्तीतून, जंगलाकडेकडेने भटकत, जाईन विचारीत रानफुलां, करत जायचं आहे. जाता जाता, उन्हाला शेकत बसलेल्या आज्ज्यांच्या हातातलं लोकरकाम अचंब्याने पाहिलंय. चक्कर मारायला निघालेल्या आजोबांना हात जोडत नमस्कार घालत, आदराने दोन शब्द बोललेय. इथे तिथे उगवलेली फुलं, उतरणीवर जिथे उभं राहायलाही जमणार नाही, अशा ठिकाणी चक्क गप्पा मारत, दिलखुलास हसत, विळ्याकोयत्याने गवत कापणाऱ्या पर्वतकन्या लाल, पिवळ्या पेहरावात सुरेख दिसतायत. ह्या युगातल्या पार्वत्या. त्यांचं मला सगळं आवडतंय. स्वभाव, हिम्मत, पेहराव, चटपटीतपणा, हसरे चेहरे, नाकातल्या नथीदेखील. त्या नथीला काहीतरी नावही आहे. बायकांचे शंकर हाताला काम असलं तर कामाला गेले असतील, नाहीतर आहेच मटरगश्ती. निरुद्देश भटकताना रानफुला गातानाचा किशोरीताईंचा आवाज आठवत राहतोय..
भग्न शिवालय परिसर निर्जन पळसतरूंचे दाट पुढे बन तरुवेली करितील गर्द झुला.. या इथे, खुल्या आकाशाखाली, खुळा जीव बुडाला तरी काही हरकत नाही... दिवस असाच, मटरगश्ती करत मजेत संपलाय. संध्याकाळ आलीय आणि रात्रीने मुक्काम संपल्याची आठवण करून दिलीय. रात्रीच्या जेवणाच्या गप्पांंमधून निरोपाचे सूर उमटू लागलेत. मन जड झालंच आहे. निघावं अशी इच्छा होत नाहीये. हा त्रास नेहमीचाच आहे. प्रत्येक वेळी तितकाच त्रासदायक. 'कोई बात नहीं, वापस आना। सब ऐसेही मिलेगा।' कोणीतरी दिलासा देतंय. तितकीच मलमपट्टी. *** कालच्या मिळालेल्या दिलाशाच्या भरवंशांवर आज परतीच्या प्रवासाची सुरुवात केलीये. निरोपादाखल हललेले हात आणि निर्मळ हसणारे चेहरे मनात अनंत दिवस रुंजी घालणारेत.
प्रकाशचित्रे श्रेयनिर्देश: १. हिमालयीन पिका : श्री. उपमन्यू घोष. २. घुबड : श्री. विनायक जोशी.

.png)
याद्या
26302
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
सुरेख .. अगदी चित्रमय ..
वेळ काढून जायला पाहिजे इथं.
फारच सुंदर. निसर्गाचा सजण भेटला ........
अतिशय सुखद
हा लेख वाचून मला शेल्लार,
काय लिहलंय, काय लिहिलंय, काय
हे फार सुरेख आहे.
तुम्हां सर्वांचे खूप आभार!
जॉनविक्क - आभार. ट्रेकिंगचा
वा !
नखशिखांत
खल्लासच
हो! काय दृश्य असते ते! आकाशात
In reply to खल्लासच by जेम्स वांड
अगदी, अगदी. नेमके हेच मी
In reply to खल्लासच by जेम्स वांड
गडद लाल!
In reply to अगदी, अगदी. नेमके हेच मी by मनिष
नाही. डार्क ग्रे. (#333333)
In reply to गडद लाल! by यशोधरा
अगदी ..
In reply to खल्लासच by जेम्स वांड
सुंदर
सुंदर!
सुंदर लेख. प्रत्यक्ष तेथे
अत्यंत सुंदर. हे सर्व
अतिशय सुन्दर!
छान वाटतंय वाचून.
अती सुंदर
सुंदर...तुमच्याबरोबर आम्हीही
सर्वांचे खूप, मनापासून आभार!
उत्तमरीत्या शब्दांकित केलेले हे निसर्गचित्र खूप आवडले.
आहाहा
उत्कृष्ट दर्जाचे लेखन.
काय सुरेख वर्णन आहे.
सुंदर लिहिलेत
आभार!
एकदम कमाल लिहिले आहे. आताशा
वाह!
मस्तच यशो. शब्द आणि चित्रे
तुम्ही हिमालयातून येता पण
In reply to मस्तच यशो. शब्द आणि चित्रे by कोमल
उत्तम ओघवते निसर्गचित्र
धन्यवाद डॉ.
In reply to उत्तम ओघवते निसर्गचित्र by सुबोध खरे
नाही.
In reply to धन्यवाद डॉ. by यशोधरा
गवे अवाढव्य असले तरी बरेच
In reply to नाही. by सुबोध खरे
मृ, जुइ आभार.
लेख आवडला. ...