जुने जाऊद्या मरणालागुनी...
'जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुसून टाका...' नाविन्याची एक तुतारी फुंकायला मागताना केशवसुतांनी ही ओळ लिहिली.
आज ती ओळ आठवली याचं कारण म्हणजे ही बातमी. मुंबापुरीचं एक सांस्कृतिक ठिकाण म्हणता येईल अशी ही म. ज्योतिबा फुले मंडई पाडून तिथे आता एक चकचकित मॉल बांधणार!अशा बातम्या आपण नेहमी वाचतो.
पुण्यात, सांगलीत, कोल्हापुरात, सोलापुरात आणि झालंच तर तासगावातसुद्धा वाडे पाडून अपार्टमेंट उभी राहतात. एखाद्या दहामजली 'मेफ्लॉवर हाईटस' वर"सुप्रसिद्ध(?) लेखक श्री. क्षयज्ञ यांचा जन्म १८९५ साली या ठिकाणी झाला" अशी पाटी पहायला मिळते.
बर्याच दिवसात देवाचं तोंड न पाहिलेला मी एखाद्या जुन्या देवळात जातो. जुन्या कलाकुसर केलेल्या आणि युगायुगांचा तेलकट राप बसलेल्या खांबांवर आता ग्रॅनाईटचा थर चढलेला असतो. काळ्या, टाकीच्या फरसबंदीवर शूभ्र संगमरवराच्या पायघड्या घातलेल्या असतात.
जांभूळ, पेरू, तुती, जास्वंद, मोगरा, जाईजुई, रातराणी, बोगनवेली, कोरंटी, अबोली असल्या झाडांनी भरलेल्या अंगणाचे घर भुईसपाट झालेले असते. झाडे गायब झालेली असतात आणि एखाद्या आर्केडचा पायाभरणी समारंभ तिथे थाटात साजरा होतो.
कुणी रेडिओवर मराठी कार्यक्रम करते आणि तरीही म्हणते की तिचं मराठी हरवलं आहे. हे वाचून क्षणभर थक्क व्हायला होतं.
मग हॅरी पॉटर वाचणारा मुलगा पुस्तकातून डोळे न काढताच "हाय डॅड" म्हणतो. आपणही हसतहसत "हाय बेटा, सो व्हॉट हॅप्पन्स टू यू'र मेलनी ?" वगैरे उगीचच म्हणतो आणि जाणवतं की आपलंही मराठी आता हरवतंय.
पण तात्याबांनी खूप काही हरवलं आहे असं म्हटलं की डोळे भरून येतात. पुन्हापुन्हा जाणवतं की कदाचित आपणच जुने झालो असावे. गेल्या दहा-बारा वर्षात तर फारच जुने.
एकीकडे लक्ष्मी आणि सरस्वती, समृद्धी आणि संस्कृती यांचं जन्मजात वाकडं आहे असं म्हणतात.
दुसरीकडे ज्याला एक वेळ अन्नाची ददात आहे तो संस्कृती कशाशी खाणार? हे बुद्धवाक्य आठवतं.
दोन्हीही आपआपल्या जागी योग्यच.
या दोन्हींचा सुवर्णमध्य साधणारा मध्यमवर्ग भारतात मोठ्या प्रमाणावर होता. काहीसा कनिष्ठ मध्यमवर्ग! आता मोठ्या प्रमाणात तो उच्च/ उच्च मध्यमवर्गाकडे झुकलाय. आमदनी वाढली आहे - अजून वाढते आहे. भरभराटीच्या या पर्वामुळे या उच्चमध्यमवर्गाने केशवसुतांची तुतारी फारच उमेदीने फुंकायला सुरुवात केली आहे काय? असा प्रश्न पडतो.
जागतिक सपाटीकरणाच्या रेट्यात दहा रुपयाला डॉलर मिळेल.'दिवाली ईज अ फेस्टिव्हल ऑफ लाईटस' असं म्हणत 'बाथ टब'मध्ये अभ्यंगस्नान होईल. तात्यांची साधना कोळीणही 'क्रॉफर्ड मॉल' किंवा 'म. ज्योतिराव फुले विक्रीसंकुला'त शूभ्र पांढरा 'ऍप्रन' घालून, बांधलेल्या केसांवर वेणीऐवजी 'कॅप' लेऊन 'ग्लोव्ज' चढवलेल्या हातांनी 'फ्रेश फिश'ची 'पॅकेटस' 'चिलर रॅक'वर रचू लागेल.
पडतेय फुले मंडई तर पडूदे बापडी - एस्केलेटर्स सुरू झाले की जाईन नव्या मॉलमध्ये! असं आता म्हणायचं का?
टीव्हीवरचे 'मराठी' कार्यक्रम खरोखर मराठीच आहेत का? मराठी पुस्तकांची विक्री सध्या भरमसाठ वाढते आहे. पण जीएंची मराठी आताच भल्याभल्यांना समजत नाही.मग 'बटाट्याची चाळ' या दोन शब्दांचा खरा अर्थ तरी पुढच्या मराठी पिढीला समजेल काय? येत्या दहा-वीस वर्षात मराठी रद्दीही वाढणार काय?
हे सगळं कुठं जात आहे? मराठीपणा, मराठी बाणा, मराठी संस्कृती लयाला जात आहे काय? हे योग्य आहे की अयोग्य?
हे थांबलं पाहिजे का? थांबावं असं वाटत असेल तर काय प्रयत्न केले पाहिजेत? मराठी संकेतस्थळांमुळे काही फरक पडेल काय?
आपली मुले मराठी राहिली आहेत काय? आपण काही प्रयत्न केल्याने ती मराठी बनणार-रहाणार आहेत का? मुलांसाठी मराठी संकेतस्थळे काढली तर मुले ती वाचणार का?
की आपल्या संस्कृतीचंच क्रॉफर्ड मार्केट झालेय? 'कालाय तस्मै नमः' म्हणून हे सारे मोडून टाकायचे आणि आपणच स्वप्राणाने तुतारी फुंकायला लागायचे?
विस्कळीत विचार आहेत हे मान्य. मराठीपणा अणि संस्कृती यांची गल्लतही मान्य. पण असं काही जाणवलं म्हणून चर्चा करावीशी वाटली.
तुम्हाला काय वाटतं?
वाचने
9394
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
वेगवान
In reply to वेगवान by आजानुकर्ण
हे थोपवायला -
In reply to हे थोपवायला - by विसुनाना
थोपवणे
नानासहेब,
आवडले !!!
बरोब्बर
नव्या युगाची नांदी : सत्य की भ्रम ????
बदल हा स्थायीभाव आहे!
प्रमोद देवांशी सहमत.