Skip to main content

श्रद्धेमुळे विकृती

लेखक यनावाला यांनी शुक्रवार, 01/12/2017 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धेमुळे विकृती........यनावाला ................................ रविवारच्या वृत्तपत्रात -(दि.२०-मार्च-२०१६)-"नातवासह आजोबांचा अंत" ही बातमी वाचून मन सुन्न झाले. आजोबा ( सुधीर शहा, वय ६५ वर्षें ) यांनी पहाटेच्या वेळी नातू (जिनय, १० वर्षे) याचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आठव्या मजल्यावरून खाली उडी टाकून आत्महत्या केली. मृत्युपूर्वीच्या पत्रात त्यांनी लिहिले., "कोर्टातील खटल्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे. " "जिनयला माझ्याबरोबर नेत आहे." हे वाक्य त्यांच्या चिठ्ठीत दोनदा आहे. असंभवनीय वाटणारी ही घटना सकाळी वृत्तपत्रात वाचल्यापासून डोक्यात घोळत राहिली. खटल्याला कंटाळून आत्महत्या का ? आणि लाडक्या नातवाची हत्या ? छे ! प्रतिष्ठित वृत्तपत्रात नावानिशी छापून आली म्हणून ही बातमी खरी म्हणायची. अन्यथा विश्वास बसतच नाही. आत्महत्येचा निर्णय का घेतला असेल? बहुधा सुधीर शहांची बाजू सत्याची असावी. विश्वास ठेऊन त्यांनी काही कागदांवर सह्या दिल्या असतील. प्रतिपक्षाने विश्वासघात करून त्यांच्याविरुद्ध खोटा पुरावा बनवला असेल. आपली बाजू सत्याची असूनही आपल्याला आता न्याय मिळणार नाही. हे दिसून आल्यावर सुधीर शहांना सात्त्विक संताप आला असेल. त्यांतून ,"हे जग काही सत्याचे नाही" अशी अगतिकता आली असेल म्हणून आत्महत्येचा निर्णय घेतला असेल. हे एक वेळ समजू शकते. पण लाडक्या नातवाचा जीव जाईपर्यंत गळा का दाबला ? श्वास कोंडल्यावर त्याने जगण्यासाठी धडपड केलीच असेल. हातपाय झटकले असतील. प्रत्येक सजीवाची ही नैसर्गिक प्रेरणा असते. तरी प्रेमळ आजोबांच्या हाताची पकड सैल कशी पडली नाही ? एवढे क्रौर्य कुठून आले ? कसे आले ? कशामुळे आले ? त्या दहा वर्षांच्या मुलाला अजून खेळायचे होते. शिकायचे होते. जग समजून घ्यायचे होते. अनुभवायचे होते. कर्तृत्व दाखवायचे होते. मोठे व्हायचे होते. पण वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच सगळे संपले. त्याच्या आवडत्या दादाजीनींच स्वहस्ते सारे संपवले. आपले आजोबा हे असे काय करीत आहेत हे त्याला समजले नसेल. सगळेच कल्पनेच्या पलीकडचे. सकाळी वाचले ते सारे असंभवनीय, अनाकलनीय वाटत होते. पण ही घटना सत्य असणार यात शंका नव्हती. बातमी पुन्हा शांतपणे वाचली. "जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे." या दोन वाक्यांनी आता उलगडा झाला. स्पष्टीकरण सापडले. अनाकलनीयता संपली. हे आजोबा आपल्या प्रिय नातवाला बरोबर घेऊन जात आहेत. ते कुठे निघाले आहेत ? मृत्युनंतर ते कुठे जाणार आहेत ? सुधीर शहा धार्मिक आहेत. देव-धर्माचे संस्कार त्यांच्या मनावर बालपणापासून बिंबवले असणार. त्यांना ठावूक आहे की मृत्युपश्चात् माणूस नरकात पडतो, किंवा स्वर्गात जातो अथवा मोक्षपदाला पोचतो. मोक्ष प्राप्त होणे दुर्मीळ. तो योगी, संन्यासी, साधु-संत यांना क्वचित् मिळतो. दुष्ट, पापी माणसे नरकात पडतात. हे शहांनी ऐकले आहे. वाचले आहे.....मी आयुष्यभर नीतीने वागलो. धर्माचरण केले. परंपरा पाळल्या. म्हणून मी स्वर्गाला जाणार. तिथे कोर्ट-कचेर्‍या, वकील-साक्षी-पुरावे काही नाही. शांत जीवन. केवळ सुखच सुख. पण स्वर्गात कितीही सुखे असोत. तिथे जिनयशिवाय मी राहूच शकणार नाही. त्याला बरोबर घेऊन जायला हवे. कसे न्यायचे ते ठरविले आहे. जिनय तर निरागस, निष्पाप, मुलगा आहे. त्याला स्वर्ग मिळणारच. आम्ही दोघे स्वर्गात जाणार. "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् ।" असे साक्षात् श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले आहे. ते भगवद्वचन असत्य कसे असेल ? मी आणि जिनय स्वर्गात जाणार यात शंकाच नाही. आकाशाच्या पलीकडे स्वर्गलोक आहे. तिथे नंदनवन आहे. कल्पतरूंच्या बागा आहेत. कामधेनूंची खिल्लारे आहेत. काठोकाठ भरलेले अमृताचे घट आहेत. नृत्य करणार्‍या अप्सरा आहेत. स्वर्गात राहाणे किती आनंददायी, किती सुखाचे असेल ! मी आणि जिनय तिथेच राहाणार. ..... असल्या स्वर्गवासावर त्यांची दृढ श्रद्धा होती. स्वर्ग संकल्पना खरी वाटत होती...स्वर्ग आहे असे धर्मग्रंथांत लिहिले आहे. साधु-संत, योगी-संन्यासी यांनी सांगितले आहे. त्यांची वाणी खोटी असूच शकत नाही. मृत्युसमयी आम्हा दोघांना काही क्षण वेदना होतील. पण पुढच्या निर्भेळ सुखासाठी ते सहन करायला हवे.... सुधीर शहा हे मध्यमवर्गीय सांसारिक गृहस्थ होते. त्यांनी व्यवसाय केला. पैसे मिळविले. आर्थिक स्थिती सुधारली. मुलाला शिक्षण दिले. ( त्यांच्याविषयी वृत्तपत्रात जे छापून आले आहे त्यावरून हे दिसते.) म्हणजे सर्वसाधारणपणे ते बुद्धिमान गृहस्थ होते. देव-धर्म-श्रद्धा आणि त्याच्याशी निगडित गोष्टी हे त्यांचे श्रद्धा-क्षेत्र होते. ते सोडता अन्य क्षेत्रांत त्यांनी स्वबुद्धी वापरून विचारपूर्वक निर्णय घेतले असणार असे दिसते. परंतु स्वर्ग ही संकल्पना त्यांच्या श्रद्धा क्षेत्रात मोडते. अशा संकल्पनेवर विचार करताना मन श्रद्धेने लिप्त होते. (म्हणजे मनावर श्रद्धेचा लेप चढतो). भावना प्रबळ होते. त्यामुळे बुद्धी पांगळी होते. ती तर्कशुद्ध विचार करू शकत नाही.....मृत्युनंतर आमच्या दोघांच्या (आजोबा आणि नातू) शरीरांचे दहन होईल. मग हे देह परत कसे मिळतील.? शरीरे नसतील तर स्वर्गात आम्ही कोणत्या स्वरूपात राहाणार ? एकमेकांना कसे ओळखणार ? कसे बोलणार ? देह नसतील तर स्वर्गातील सुखे कशी उपभोगणार? अशा शंका बुद्धीत उद्भवतच नाहीत. त्यामुळे आम्ही दोघे आहोत तसेच स्वर्गात जाणार. हे त्यानी गृहीत धरले. परगावी किंवा परदेशी नाही का जात? तसेच स्वर्गात जायचे. त्यामुळे "जिनयला बरोबर घेऊन जात आहे." असे वाक्य त्यांनी सहजतेने लिहिले. याप्रमाणे बुद्धी बाजूला पडून श्रद्धेच्या प्रभावाखाली निर्णय होतो. त्यामुळे प्रिय नातवाचा खून आणि आत्महत्या या गोष्टी अगदी योग्य किंबहुना आवश्यक वाटतात. त्याप्रमाणे कृती घडते. काही दिवसांपूर्वी "क्रौर्याची परिसीमा " या शीर्षकाखाली छापून आलेली बातमी अशाच स्वरूपाची होती. हस्‍नाईल वरेकर (वय ३५ वर्षे) याने आपले आई-वडील, पत्‍नी, मुले, बहिणी, त्यांची मुले अशा चौदा जणांचे गळे चिरून त्यांना ठार केले आणि स्वत: आत्महत्या केली. एवढे क्रूर कृत्य का घडले ? त्याची वैयक्तिक अथवा कौटुंबिक अशी कितीही गंभीर समस्या असती तर त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याने केवळ आत्महत्या केली असती. इतरांना मारले नसते. स्वत:च्या चार महिन्यांच्या मुलीचा गळा चिरला नसता. काही जण म्हणतील की तो वेडा झाला होता. एका अर्थी हे खरे असले तरी वेडाच्या झटक्यात केलेले हे कृत्य नव्हे. सगळे पूर्व नियोजित होते. जेवणाचा कार्यक्रम ठरवला. बहिणींना मुलांसह येण्याचे आमंत्रण दिले. मेव्हण्यांना बोलावले नाही. ते हस्नाईलचे रक्ताचे नातेवाईक नव्हते. पत्‍नीशी रक्ताचे नसले तरी प्रेमाचे नाते असते. तसेच चार महिन्यांच्या मुलीला स्वर्गात बघणार कोण ? दूध कोण पाजणार? असाही विचार असू शकतो. सुधीर शहांची जशी दृढ समजूत होती की ते आणि नातू स्वर्गात जाणार, तशीच हस्‍नाईलची ठाम कल्पना होती की आम्ही सर्वजण स्वर्गात जाणारच. तिथे गेल्यावर कुठली अडचण उरणारच नाही. स्वर्गात सगळ्यांना सुख मिळेल.आकाशाच्या मागे स्वर्ग आहे, असे त्याने अनेक मुल्ला-मौलवींकडून ऐकले होते. कुराणात तसेच लिहिले असणार अशी त्याची श्रद्धा होती. स्वर्गाविषयींच्या अनेक गोष्टी त्याने चित्रपटात पाहिल्या होत्या. गाण्यांत ऐकल्या होत्या. धर्मावर श्रद्धा असेल तर स्वर्गाच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे. हस्‍नाईल या भ्रामक स्वर्गकल्पनेच्या पूर्णतया आहारी गेला होता. त्याला कळत होते की कोणी सगे-सोयरे सर्व मृत शरीरांचे दफन करतील. मूठमाती देतील. आम्हा सर्वांचे मृत देह कबरस्थानात मातीखाली असतील. ..ते जिवंत होऊन स्वर्गात कसे येतील ? असा विचार त्याची बुद्धी करीत नाही. कारण स्वर्गाविषयीच्या श्रद्धेमुळे ती लुळी पडलेली असते. पवित्र ग्रंथातील वचने सत्यच असणार. त्यांविषयी शंका घेणे पाप आहे असे तो मानतो. आम्ही सगळे तिथे भेटणार. स्वर्गात सुखाने राहणार. असेच त्याला वाटत राहाते. त्यामुळे चौदा जणांचे गळे तो सहजतेने चिरतो. आपण काही वाईट कृत्य करतो आहोत असे त्याला वाटतच नाही. स्वर्गात जाणे वाईट कसे असेल ? मी जे करतो आहे ते या सर्वांच्या भल्यासाठी आहे. अशीच त्याची समजूत असते. आत्मघातकी आतंकवाद्यांची धर्मश्रद्धा अशीच अतूट असते. त्यांना वाटते आपण धर्माची आज्ञा पाळत आहो. देवाच्या मनात आहे ते करीत आहो. हे पवित्र धर्मकार्य करताना मृत्यू येणार. मग आपण स्वर्गात जाणारच. तिथे सर्व सुखे आपली वाट पाहात आहेत. या भ्रामक श्रद्धेमुळे ते मरणाला सामोरे जातात. आपला मुलगा देवा-धर्माच्या पवित्र कार्यासाठी शहीद होणार. त्याच्यावर अल्लाची कृपा होणार. तो स्वर्गात जाणार . तिथे तो इथल्यापेक्षा अधिक सुखात रहाणार. अशी त्याच्या पालकांचीही श्रद्धा असते. त्यामुळे ते या आत्मघातकी प्रकाराला विरोध करीत नाहीत. "आतंकवाद्याला धर्म नसतो." हे विधान भोंगळ आहे. आतंकवादी नखशिखान्त धार्मिक असतो. आतंकाची प्रेरणा त्याला धर्मामुळेच मिळते. प्रत्येक सजीवाची नैसर्गिक प्रेरणा अधिकाधिक जगण्याची असते.. श्रद्धेमुळे घडणार्‍या अशा विकृत भयानक घटनांच्या बातम्या अधून-मधून येतच असतात. दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचलेली एक विलक्षण बातमी लक्षात राहिली. थोडक्यात गोष्ट अशी: दादा आणि बाबू हे दोन भाऊ म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी. परस्परांवर खूप प्रेम. त्यांचे तीन बैल. त्यांतील राजा बैलाचा दोघांनाही फार लळा. आधी स्वत:च्या हाताने राजाला हिरवा चारा भरवल्याविना दादा जेवत नसे. दादाचे सर्पदंशाने अकाली निधन झाले. बाबू व्याकूळ, सैर-भैर झाला. एके दिवशीं तो राजा बैलाच्या मानेवर कुर्‍हाडीने घाव घालू लागला. हंबरडा ऐकून लोक धावून आले. तोवर राजा मरणासन्न अवस्थेत पोचला होता. "तू हे असे का केलेस ?" हा प्रश्न विचारल्यावर बाबू म्हणाला," गेले दोन दिवस दादा माझ्या स्वप्नात येत होता. त्याने सांगितले की तिथे स्वर्गात सगळी सुखे आहेत. पण त्याला राजाची सतत आठवण येते. त्याच्यावाचून चैन पडत नाही. " त्यावर विचार केला आणि राजाला मारले. त्याच्यासारखे गुणी जनावर आता स्वर्गातच जाईल. तिथे दादाला भेटेल. दादाला खूप आनंद होईल. दादाला पाहून राजाही खुष होईल." अशी ही श्रद्धा. इथे हा मरून पडलेला बैल देहासह स्वर्गात कसा जाईल ? अशी शंका त्याच्या मनाला शिवतसुद्धा नाही. माणसाचे मन श्रद्धेने लिप्त झाले की त्याची बुद्धी पंगू होते हेच खरे. कोणी म्हणतील अशा दु:खद घटनांवर का लिहावे.? त्यांवर कायमचा पडदा टाकणे योग्य नव्हे काय ? या सत्य गोष्टी आहेत. काल्पनिक नव्हेत. अशा घटनांचे सर्वांगांनी विश्लेषण व्हायला हवे. कारणमीमांसा करायला हवी. ती बुद्धीला पटली तर त्यानुसार आपल्या कल्पना, विचार- आचार यांत योग्य ते बदल करायला हवेत. चुकीच्या, हानिकारक समजुतींचा त्याग करायला हवा. समाजस्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. असे मला वाटते. या तीन हृदयद्रावक घटनांवर साकल्याने, तर्कसंगत विचार करता वर लिहिलेल्या कारणमीमांसेपेक्षा अधिक समर्पक स्पष्टीकरण मला सुचत नाही. कोणी निदर्शनाला आणून दिल्यास ते मान्य करीन.

वाचने 33822
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

In reply to by sagarpdy

बरोबर आहे.. आपण चमत्काराला देवाचे लेबल लावून टाकतो. कद्दचित त्या चमत्कारामागचे विज्ञान काही वर्षांनी जगासमोर येइलही, पण तोपर्यंत अश्या चमत्कारांचे अस्तित्व नाकारणे योग्य नाही असे माझे मत. काही लोक त्याला देव म्हणतात, काही लोक वैश्विक शक्ती म्हणतात, काही लोक अमानवीय म्हणतात, पण अनेक लोकांना असे अनुभव वेगवेगळ्या वेळेस येत असतील तर ते मला का येत नाहीत म्हणून नाकारणे हे सर्वथा अयोग्य आहे. त्याच वेळेस वर गावडेसरांनी लिहिलेली घटना देखील तितकीच दुर्दैवी आहे. केवळ हेच नव्हे, तर अश्या अनेक भामट्यांच्य नादी लागून आयुष्य बरबाद केलेले लोक मी माझ्या आयुष्यात पाहिले आहेत. जेव्हढे अध्यात्म मी वाचले आहे त्यानुसार तुमच्याकडून पैसे मागणारा माणूस हा काम करण्याला विश्वासार्ह नाही. कारण हे पैसे त्याच्या साधनेची किंमत असते, आणि जसे जसे त्याला पैसे मिळत जातात तसे त्याचे साधनेचे बळ संपत जाते त्यामुळे कालांतराने असा माणूस केवळ एक भोंदू म्हणूनच शिल्लक राहतो. लवकरच मी काही ऐकलेल्या (पण ज्यांच्या सत्यतेबद्दल मनात शंका नाही) अश्या घटनांवर एक लेख लिहीन, अश्या घटना अपवादात्मक असल्या, तरी विचारात घेण्यासारख्या आहेत.

In reply to by अर्धवटराव

आपली मते आग्रहाने व सातत्याने मांडणे हा एक ओसीडीच असतो. परफेक्शनिस्ट असण्याचा प्रयत्न हा देखील ओसीडी च. अनेक समाजसुधारक या डिसऑर्डरचे बळी असतात. अनेक 'वेडी' माणसे ओसीडी वालेच असतात. समाजात आता शहाणी माणसे उदंड झाली आहेत देशाला गरज आहे ती वेड्या माणसांची! ध्येयवेड्या माणसांची नेहमी समाजात उपेक्षा होते. टिंगल होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

चर्च अंती असे दिसतंय की कथित आस्तिक लोकांना यानावालांनी गुंडाळलेले आहे . बाकी कोणी त्यांना वेडे समजले तरी त्यांना बहुदा काही फरक पडणार नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

पण यात एक प्रॉब्लेम असा कि अनेक वेडी माणसं देखील स्वतःला समाजसुधारक, ध्येयवेडी वगैरे समजायला लागतात. आपल्याला एखादा डिसॉर्डर आहे हेच जिथे कळत नाहि तिथे पर्फेक्शनीस्टचं लेबलच कामाला येतं. शिवाय हस्तिदंती मनोर्‍यातलं पोकळ इट्लेक्चुअल सुख. फार डेडली कॉकटेल आहे ते.

In reply to by अर्धवटराव

@अर्धवटराव याचीच पुरवणी म्हणा पाहिजे तर. हुशार माणसं विक्षिप्त असतात असे म्हणतात. म्हणून लोकांनी स्वतःला हुशार समजावे म्हणून काही लोक विक्षिप्तपणे वागताना दिसतात.

In reply to by अर्धवटराव

अगदी अगदी इतकं परफेकट. ते परफेक्शनिस्ट लेबलाची मीमांसा तर लैच पटली इथली काही उदाहरणे बघून. जिओ अर्धवटराव.

In reply to by अर्धवटराव

तिथे पर्फेक्शनीस्टचं लेबलच कामाला येतं. शिवाय हस्तिदंती मनोर्‍यातलं पोकळ इट्लेक्चुअल सुख. फार डेडली कॉकटेल आहे ते.
हा भाग जरी खरा वाटला, तरी एक दोन लेख वाचल्यावर मला, यनावाला कुठल्या तरी चौकात बसून लोकांशी बडबडणार्‍या फॉरेस्ट गंप सारखे वाटतात. त्यांना या कॉकटेलचं फार काही पडलं असावं असं वाटत नाही. मला त्यांचे लेख आणि व्रतवैकल्याच्या कथा यात फार साम्य वाटते. दोन्हीत अंश एकच असतो " ढोबळमानाने असे वागा"

In reply to by बांवरे

फॉरेस्ट गंप सर्वकालीन एक्स्प्लोरर आहे. त्याचं बडबडणं म्हणजे त्याचा जीवनाशी संवाद आहे. आपल्यातल्या विद्यार्थ्याची गळचेपी करुन वर आपल्या दुराग्रहांचं इतरांवर लेपन करणारं पुण्यकर्म तो करत नाहि. असो.

In reply to by बांवरे

मला त्यांचे लेख आणि व्रतवैकल्याच्या कथा यात फार साम्य वाटते. दोन्हीत अंश एकच असतो " ढोबळमानाने असे वागा"
आपल्या मताशी/निष्कर्षाशी सुसंगत अशी बोधकथा पाडणारे पुर्वीपासून आहेत. किर्तनकार ,प्रवचनकार,वगनाट्य वाले एकपात्री कलाकार अनेक म्हणता येतील. दै.सकाळ मधे न.म. जोशींच्या अशा कथा असतात.

पण लाडक्या नातवाचा जीव जाईपर्यंत गळा का दाबला ? श्वास कोंडल्यावर त्याने जगण्यासाठी धडपड केलीच असेल. हातपाय झटकले असतील. प्रत्येक सजीवाची ही नैसर्गिक प्रेरणा असते. तरी प्रेमळ आजोबांच्या हाताची पकड सैल कशी पडली नाही ? एवढे क्रौर्य कुठून आले ? कसे आले ? कशामुळे आले ? त्या दहा वर्षांच्या मुलाला अजून खेळायचे होते. शिकायचे होते. जग समजून घ्यायचे होते. अनुभवायचे होते. कर्तृत्व दाखवायचे होते. मोठे व्हायचे होते. पण वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच सगळे संपले. त्याच्या आवडत्या दादाजीनींच स्वहस्ते सारे संपवले. आपले आजोबा हे असे काय करीत आहेत हे त्याला समजले नसेल. सगळेच कल्पनेच्या पलीकडचे. सकाळी वाचले ते सारे असंभवनीय, अनाकलनीय वाटत होते. पण ही घटना सत्य असणार यात शंका नव्हती.
मध्ये
एवढे क्रौर्य कुठून आले ? कसे आले ? कशामुळे आले ?
तर श्रद्धेमुळे आले. -------------------- तर लोकहो, आदिम मनुष्य अत्यंत प्रेमल होता. कारण त्याकाळात ईश्वर, इ संकल्पना नव्हत्या. म्हणून आदिमकाळात विकृती, क्रौय, इ इ काही नव्हतं.

In reply to by arunjoshi123

म्हणून आदिमकाळात विकृती, क्रौय, इ इ काही नव्हतं. इतकं मागे कशाला जायला पाहिजे ? सद्यकाळातील नास्तिक व निधर्मी लोकांमध्येही विकृती व क्रौर्य औषधापुरतेही सापडत नाही. उदाहरणार्थ, "धर्म अफूची गोळी आहे" असे म्हणणार्‍या कम्युनिस्ट पंथाची चाओ-माओ, स्टालीन, पोल पॉट इत्यादी नास्तिक संत मांदियाळी... आणि हो, उत्तर कोरियाच्या सद्य कम्युनिस्ट सत्ताधार्‍यांची अपार मानवी करुणेने समृद्ध वंशावळ सुद्धा यात सामील आहे !! ;-) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, भूतदया, करूणा, प्रेम, परिपक्वता, वैचारिक समतोल, विचारशील आत्म-नियंत्रण, इत्यादी उच्च मानवी गुण हे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक जडण-घडणीवर अवलंबून असतात... त्यांचा ती व्यक्ती आस्तिक/धार्मिक अथवा नास्तिक/निधर्मी असण्याशी तडक संबंध नसतो. दोन्हीही गटांत हे उच्च मानवी गुण किंवा त्यांचा अभाव आढळतात. एखाद्या समान परिस्थितीत, गैरकृत्य केल्यास होणार्‍या "भौतीक शिक्षेची भिती", सर्वांनाच समान असते असे गृहित धरूया. अश्या परिस्थितीत, "खरोखरच्या (हितसंबंध साधण्यासाठी तशी बतावणी करणारा नाही) आस्तिकासाठी" चुकीची न कृती करण्यासाठी देवाच्या कोपाची भिती हे एक अधिक कारण असते. "खरोखरच्या नास्तिकासाठी" हे कारण आस्तित्वातच नसते. तर मग, समान मानवी गुण असलेल्या व्यक्तींमध्ये, चुकीची कृती करण्यात "खरे नास्तिक" पुढे असणार, नाही का ?

In reply to by अर्धवटराव

तर्क हा वैज्ञानिक विचाराचाच एक भाग आहे. किंबहुना, निरिक्षण आणि भूतकालातील प्रयोग/अनुभव हेच "थिअ‍ॅरिटिकल सायन्स" या उच्च दर्जाच्या शास्त्राचा पाया आहेत. सद्य आणि इतिहास यांच्याकडे मोकळ्या मनाने पाहिले तर, "आस्तिक व नास्तिक या दोन्हीही गटांत उच्च मानवी गुण किंवा त्यांचा अभाव आढळतात" या सत्यस्थितीबद्दल सहज समजून येईल. वर सांगितलेले उच्च मानवी गुण हा केवळ आस्तिक किंवा नस्तिक यांच्यापैकी कोणा एक गटचा मूलभूत गुणधर्म (पक्षी : मक्ता) आहे आणि उरलेल्या दुसर्‍या गटात त्याचा अभाव असतो असे मत असले तर मग बोलणेच खुंटले ! :)

In reply to by अर्धवटराव

याबाबत सहमती आहेच. कारण वर म्हटलेच आहे की... निरिक्षण आणि भूतकालातील प्रयोग/अनुभव हेच "थिअ‍ॅरिटिकल सायन्स" या उच्च दर्जाच्या शास्त्राचा पाया आहेत. मात्र, ही सर्व निरिक्षणे आणि प्रयोग नि:पक्षपातीपणे आणि प्रामाणिकपणे "करणे व स्विकारणे" आवश्यक आहे, हेवेसांन :)

यनावालांच्या लेखांमुळे एक वेगळि दृृष्टी मिळते धार्मिक गोष्टिंंकडे बघण्याची, पण त्यांंना उगाचच अति विरोध केला जातो आहे. असे वाटते.

In reply to by एमी

यात मुद्दा धर्मसुधारणेचा आहे . अश्रद्धेचा नाही. झिया सेक्यूलर वातावरणातून राहून सुद्धा धर्म समजावून घेवून मग त्यात सुधारणाबद्दल बोलतो आहे. तो नास्तिक नाही.

नातवासह आजोबा विज्ञानामुळे मरायला मंगळावर निघाले.
Missions to Mars. Our aspirational goal is to send our first cargo mission to Mars in 2022. The objectives for the first mission will be to confirm water resources and identify hazards along with putting in place initial power, mining, and life support infrastructure. A second mission, with both cargo and crew, is targeted for 2024, ...
लोक मंगळावर मरायला का निघालेत? - गार्डीयन. https://www.theguardian.com/science/2016/sep/30/elon-musk-spacex-mars-m…

In reply to by arunjoshi123

या बातमीत ज्या ज्या दीडशहाण्याला कोट केलं आहे त्याचे मृत्यूबद्दलचे विचार बघा. आणि विज्ञानाचा प्रभाव बघा. मला यनावालांच्या लेखातले आजोबा त्यामानाने थोडे बरे वाटतात. http://www.thehindu.com/sci-tech/science/3-indians-in-100-shortlisted-f…