कण-भौतिकी आणि LHC
आगाऊ सूचना: जर कुणाला विज्ञानाची (विषेशतः भौतिकशास्त्राची) ऍलर्जी असेल तर हा लेख वाचून स्वतःचे डोके आपटून घेऊ नये. हे लिखाण विकिपिडिया तसेच इतर काही पुस्तकांच्या आधारे केले आहे. याच संदर्भातील 'मिपा'वरचा अजून एक धागा येथे सापडेल.
कण-भौतिकी
विषयाचे नाव वाचून धक्का बसला असेल... मलाही बसला. कारण 'Particle Physics' चे भाषांतर करताना नाकी नऊ आले; 'कण-भौतिकी' पेक्षा जर अधिक संयुक्तिक नाव कुणाला सुचले ('बिंदू-भौतिकशास्त्र' वगैरे!), तर जरूर कळवा. अजून एक विनंती: मी भौतिकशास्त्रज्ञ नसल्यामुळे मूळ इंग्रजी संज्ञांचे मराठी भाषांतर करण्याचा आचरट प्रयत्न काही ठिकाणी केला आहे. तसेच मराठीमधील समांतर शब्द न सापडल्याने बरेच 'विंग्रजी' शब्द खाली वापरले आहेत. चू.भू.द्या.घ्या.
तुम्ही शाळेत असताना भौतिकशास्त्र नक्कीच शिकला असाल (बहुदा मराठी माध्यमातून). पण बहुतेकांनी हा विषय फक्त परीक्षेसाठी घोकला असेल (मनातून शिव्या देत). खरेतर या विषयाची थोडी गोडी लागली तर आपले जग किती अद्भुत आहे याची जाणीव होते. विकिपिडियाच्या (विश्वकोश) आणि इतर पुस्तकांच्या रूपाने सामोरे येणारे आधुनिक भौतिकशास्त्र हे लहानपणी शिकलेल्या भौतिकशास्त्राच्या बरेच पुढे गेले आहे. तरीपण सगळ्यांना इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूचे घटक माहीत असतील अशी आशा करतो.
कण-भौतिकी म्हणजे अणूच्या आत राहणार्या या बालगोपाळांचा आणि त्यांच्या लहान भावंडांचा (quarks, photons, neutrinos इ.) अभ्यास. थोडक्यात म्हणजे, विश्वातील अति-सूक्ष्म कणांची माहिती मिळवणे. शवविच्छेदन करण्याइतके हे 'कणविच्छेदन' करणे सोपे नाही; आणि म्हणूनच LHC (Large Hadron Collider) प्रयोगाचा हा प्रपंच!
लार्ज हॅड्रॉन कोलायाडर (LHC)
LHC हा आतापर्यंतच्या मानवी इतिहासातला सगळ्यात मोठा, आणि तितकाच महत्त्वाचा, वैज्ञानिक प्रयोग. विश्वाची मुलभूत कोडी उलगडण्यासाठी, वेगवेगळ्या ८५ देशातील १०,००० शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न. LHC ची काही वैशिष्ट्ये: विश्वातील सर्वात थंड (-२७१से.), सर्वात उष्ण (सूयर्याच्या तापमानाच्या १लाख पट तापमान) आणि सर्वात 'पोकळ' (emptiest) जागांपैकी एक जागा...सर्वाधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली चुंबके (magnets).. पृथ्वीवरील सगळ्यात जटिल (complex) उपकरण!
या प्रयोगाची साधारण रुपरेषा अशी: सुमारे २७ किमी. लांब वर्तुळाकार नळीतून प्रोटॉन्सचे पुंजके (beams) फिरवले जातील. अशी कल्पना करा, की २ प्रोटॉन्स या नळीतून एकमेकांच्या विरूद्ध दिशेला सोडलेले आहेत; ते साधारण प्रकाशाच्या वेगाने जात आहेत; जेव्हा हे कण एकमेकांवर आदळतील, तेव्हा प्रचंड ऊर्जा तयार होईल. अर्थात ही ऊर्जा अत्यंत सूक्ष्म क्षेत्रापूतर्ती मर्यादित असेल. विश्वाची निर्मिती ज्या बिग-बँग पासून (महाविस्तार) झाली असा कयास आहे, त्यावेळच्या परिस्थितीची झलक या प्रोटॉन्सच्या टकरीमधून पहायला मिळेल. मिनि-बिगबँग म्हणा हवेतर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रोटॉन्सच्या टकरी सूचकांच्या (detectors) मदतीने टिपून घेतल्या जातील. हे detectors म्हणजे अतिप्रचंड क्षमतेचे डिजीटल कॅमेरे! प्रत्येक टकरीतून बाहेर पडणार्या कणांचा परिपूर्ण अभ्यास केला जाईल - कणांचा वेग, दिशा, ऊर्जा वगैरे. अशा किती टकरी होतील? एका सेकंदाला ६०० दशलक्ष!! ('जबर्या'च ना!)

LHC चे विहंगम दृश्य
या सगळ्याची तंतोतंत माहिती गोळा करायची म्हणजे प्रचंड अशा प्रकारची साठवण क्षमता (storage capacity) हवी... एका वर्षामध्ये मिळणारी माहिती (data) साठवायला जवळपास ३० लाख CD's लागतील (सहीच...त्या CDs ची शिडी करता येईल - २० किमी. उंच!). याचा बंदोबस्तही आपल्या चतुर शास्त्रज्ञांनी केला आहे. जगातील वेगवेगळ्या ठिकाणचे संगणक आणि अति-जलद internet चा वापर करून एक जागतिक जाळे (LHC computing grid) बनवले आहे. ह्या grid ला जोडलेले सर्व संगणक LHC प्रयोगांची माहिती साठवतील तसेच परिक्षणासाठी (analysis) वापरले जातील. एका दिवसाला अंदाजे २७ TB (टेरा बाईट) इतकी माहिती गोळा होईल अशी अपेक्षा आहे.
युरोपीय आण्विक संशोधन संस्थेने (CERN) उभा केलेला हा प्रयोग स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमारेषेवर असून हा कोलायडर जमिनीच्या आत १०० मीटर खोलीवर आहे. आपण सध्या 'मिपा'चा आस्वाद ज्या माध्यमातून घेत आहोत त्या world-wide-web (www) चा उगम CERN मध्येच झाला. आता जमिनीच्या आत हा प्रयोग करायचे काय कारण? आर्थिकदृष्ट्या हे खूप कमी खर्चाचे आहे; जमिनीचे भाव किती वाढलेत हे तुम्हाला माहीत असेलच. आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही ते योग्य आहे. LHC सारखे आणखी काही कोलायडर्स (particle accelerators) अस्तित्वात आहेत, पण LHC पेक्षा त्यांची क्षमता कमी आहे. LHC प्रयोगानंतर कदाचित शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राची पुस्तके पुन्हा लिहायला लागतील, कारण यानंतर 'नव्या भौतिकशास्त्राचा' (New Physics) अध्याय सुरू होईल.
पण हा सगळा अट्टाहास कशासाठी? एवढं काय नडलंय का?
पार्श्वभूमी
हे शास्त्रज्ञ ज्या अगम्य (म्हणजेच 'गणिती') भाषेत बोलतात ती भाषा सगळ्यांना समजणे अशक्य आहे (जरी तुम्हाला गणित आवडत असले तरी). पण सांगायचा मुद्दा हा: आजपर्यंतच्या इतिहासात माणसाने काही प्रश्नांचा पिच्छा नेहमी पुरवला आहे - 'आपण कुठून आलो?', 'आपण काय आहोत?'. (मला पु.लं.च्या 'असा मी असामी' मधली जुहूच्या बंगल्यातील गुरूदेवांची ओळ आठवली - 'हू ऍम आय?', 'हू आर यू?'). आत्तापर्यंत या गोष्टींची मक्तेदारी फक्त अध्यात्मिक, धार्मिक इ. कक्षेपर्यंत मर्यादित होती असे समजले जाई. पण विज्ञानालाही आपली बाजू मांडायचा हक्क आहे. LHC चा प्रयोग म्हणजे वरील प्रश्न सोडवण्याचा विज्ञानाचा एक प्रयत्न आहे.
विचार करा, रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशात तुम्ही तारे बघत आहात. त्या तार्यांचा जो प्रकाश तुम्ही बघता, तो लाखो-करोडो वर्षांपूर्वीचा प्रकाश आहे. म्हणजे लाखो-करोडो वर्षांपूर्वी ते तारे जसे असतील ते तुम्ही आज बघताहात! मग तुम्ही डोके खाजवता... हे सगळे आले कुठून? विश्वामध्ये सगळ्यात सूक्ष्म अशा मुलभूत कणांपासून ते अतिदूर पसरलेल्या अजस्त्र आकाशगंगांपर्यंत कितीतरी गोष्टी आहेत. शास्त्रज्ञांनी या सगळ्यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष निरीक्षण केले. आणि विश्वाचा संपूर्ण इतिहास, ठराविक सिद्धांतांच्या आधारे पुन्हा उभा केला. अब्जावधी वर्षे चाललेल्या जगाच्या अव्याहत कोलाहलाचे स्पष्टीकरण मांडायचा हा प्रयत्न. हे संपूर्ण विश्व कसे तयार झाले आणि आजपर्यंतचा विश्वाचा प्रवास कसा झाला हे सांगणारा सिद्धांत म्हणजे बिग-बँग सिद्धांत.
या सिद्धांतानुसार, विश्वाची निर्मिती साधारण १३.७ अब्ज वर्षांपूर्वी एका महाविस्तारामुळे झाली. तसेच, विश्व हे अनंत-अमर्याद (infinite) नसून ते मर्यादित आहे. यामागची संकल्पना अशी: जगातील सर्व पदार्थ आणि ऊर्जा हे एका बिंदूमध्ये (singularity) सामावले होते. या बिंदूचे अतिजलद प्रसरण (inflation) होऊन त्यापासून विश्व तयार झाले. काळ आणि स्थळ (time and space) हे बिग-बँगपासूनच सुरू झाले; त्यापूर्वी ते अस्तित्वात नव्हते. बिग-बँग झाल्यापासून विश्व हे एखाद्या फुगणार्या अतिप्रचंड फुग्याप्रमाणे सतत विस्तारत आहे, आत्तासुद्धा!

बिग-बँगपासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासाची समयरेषा (timeline)
बिग-बँगच्या अगदी सुरवातीला विश्व हे अतिशय उष्ण आणि अतिघन होते ज्यावेळी फक्त क्वार्क-ग्लुऑन प्लाझ्मा अस्तित्वात होता. जसजसे विश्व फुगत गेले आणि त्याचे तापमान कमी होत गेले तसतसे मुलभूत घटक तयार झाले उदा. photons, hadrons (प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स) इ. हे सगळे व्हायला साधारण ३ मिनिटे लागली! नंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉनच्या मदतीने हायड्रोजनचा अणू तयार झाला. त्यानंतर रेणू, मुलद्रव्ये, तारे, आकाशगंगा हे सगळे निर्माण व्हायला करोडो वर्षे लागली. खुद्द आपली सूर्य-मालिका तयार व्हायला ९ अब्ज वर्षे लागली (म्हणजे ती अंदाजे ५ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली). विश्वाच्या निर्मितीपासून ते आजपर्यंतचा धावता घटनाक्रम तुम्हाला येथे बघायला मिळेल. बिग-बँगपासून ते बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंतचा हा अद्भुत प्रवास हा 'साध्या'कडून 'गुंतागुंती'कडे अखंड चालू आहे - सर्वप्रथम मुलभूत कण, मग अणू, रेणू, तारे, ग्रह, पेशी, जीवाणू, जीवसृष्टी आणि विश्वाची सगळ्यात आधुनिक उत्पत्ती 'माणूस'! सगळ्या अवस्था कशा साखळीप्रमाणे सलग; उत्क्रांतीच्या धाग्याने बांधल्या गेलेल्या! आपण सगळेजण (सजीव-निर्जीव पदार्थ) या मुलभूत कणांपासून आलेले आहोत; आणि त्या कणांमुळेच चराचर विश्व अब्जावधी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. विश्व, जीवसृष्टी व मानवजात या सगळ्यांना विज्ञानाने एकत्र आणले आहे. त्या कणांची - म्हणजेच आपल्या उगमस्थानाची - पूर्ण ओळख करून घेण्याचा प्रयत्न म्हणजे LHC चा प्रयोग.
आता या LHC प्रयोगातून काय-काय साध्य करता येईल ते पाहू.
अदृश्य पदार्थ (dark matter)
अवकाश-शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार, विश्वामध्ये फक्त ४% दृश्य पदार्थ (visible matter) असून २२% अदृश्य पदार्थ (dark matter) आणि ७४% अदृश्य ऊर्जा (dark energy) आहे. या अदृश्य पदार्थाबद्दल जास्त माहिती सध्यातरी उपलब्ध नाही; LHC प्रयोगातून ती मिळण्याची शक्यता आहे.
अँटी-मॅटर
अँटी-मॅटर (अ-पदार्थ?) म्हणजे मॅटरचा (पदार्थ) जुळा भाऊ - पण विरूद्ध (opposite charge)! उदा. इलेक्ट्रॉनचा जुळा भाऊ पॉसिट्रॉन (+ve charge असलेला इलेक्ट्रॉन), प्रोटॉनचा जुळा भाऊ अँटीप्रोटॉन (-ve charge असलेला प्रोटॉन). दिलीप कुमारच्या 'राम और शाम' मधला राम जर गोरापान आणि शाम जर काळाकुट्ट असता, तर त्यांना 'मॅटर और अँटीमॅटर' असे म्हणता आले असते :-).
जग जर व्यवस्थित, निटनेटके असते तर आपल्याला ५०% मॅटर व ५०% अँटीमॅटर दिसले असते. खरेतर, बिग-बँगच्या अगदी सुरवातीच्या क्षणांत अशी परिस्थिती होती. आपल्या सुदैवाने, निसर्गाचे माप 'मॅटर'च्या दिशेला झुकले ('मॅटर'ने कदाचित वशिला लावला असेला :)) आणि विश्वात 'मॅटर'चा प्रभाव वाढला. आजपर्यंतच्या निरिक्षणावरून असे दिसते की विश्व हे मुख्यतः पदार्थापासून (matter) बनले आहे. अशी विषम विभागणी का? बिग-बँगच्या वेळी अस्तित्वात असणारे विश्वातील सगळे अँटी-मॅटर गेले कुठे? या जुळ्या भावाचा शोध LHC प्रयोगात घेतला जाईल. अगदी "आपण यांना पाहिलंत का?" श्टाईलमध्ये!
हिग्ज बोसॉन्स
कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण शास्त्रज्ञांना साधीसरळ आणि सुंदर असलेली समीकरणे आवडतात. आइन्स्टाईनचे E=mc^2 हे सुप्रसिद्ध समीकरण सगळ्यांना ठाऊक असेल. ऊर्जा (E) म्हणजे वस्तुमान (mass) गुणिले प्रकाशाच्या वेगाचा (c) वर्ग! शास्त्रज्ञांना पडणारा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे 'हे वस्तुमान किंवा वजन आले कुठून?'. आत्तापर्यंत आपल्याला विश्वाचे जे आकलन झाले त्याला वैज्ञानिकांनी "कण-भौतिकीचे स्टँडर्ड मॉडेल" म्हटले आहे. याबद्दल थोडक्यात सांगायचे तर, विश्वातील सर्व प्रकारचे पदार्थ आणि ऊर्जा ज्या नियमांनी कार्य करतात त्या सर्व नियमांना एकत्र करून काही मोजके सिद्धांत मांडले आहेत. तात्विकदृष्ट्या, हे सिद्धांत अतिसूक्ष्म कणांपासून (quarks, electrons इ.) ते आकाशगंगेच्या समूहापर्यंत (galaxy superclusters) सगळ्या गोष्टींना लागू पडतात. विचार करा, या विश्वाच्या भयानक पसार्यातील सर्व पदार्थांचे, घटनांचे आणि त्यामागील नियमांचे वर्णन फक्त मोजक्या सिद्धांतांच्या आधारे करणे ही गोष्टच किती रोमहर्षक आहे.
या मॉडेलनुसार, असे कण विश्वामध्ये अस्तित्वात असावेत की ज्यामूळे काही गोष्टी (उदा. प्रोटॉन्स) जड बनतात तर काही गोष्टी (उदा. फोटॉन्स) वजनरहित बनतात. या अतिसूक्ष्म कणांना हिग्ज बोसॉन्स (Higgs bosons) म्हणतात. यांना God particles असेही म्हटले जाते, कारण स्टँडर्ड मॉडेलमध्ये हे कण महत्त्वाची भूमिका बजावतात, विशेषतः मुलभूत कणांच्या 'वस्तुमाना'चे समर्थन करतात.
याची संकल्पना थोडक्यात अशी: संपूर्ण विश्व हे हिग्ज क्षेत्राने म्हणजेच हिग्ज कणांनी व्यापलेले आहे (जसे विद्युतचुंबकीय क्षेत्र असते तशा प्रकारचे हे हिग्ज क्षेत्र). मुलभूत कण जसजसे या हिग्ज क्षेत्रातून प्रवास करतात तसतशी त्यांची हिग्ज कणांबरोबर आंतरक्रिया होते. आणि त्यामुळे कणांना वस्तुमान प्राप्त होते. एक उदाहरण देतो. समजा, आपण 'मिपा'चे सगळे कलंदर एका हॉलमध्ये जमलो आहोत (स्नेहसंमेलन म्हणा हवेतर). सगळेजण हॉलमध्ये विखुरलेले आहेत, आपापल्या गप्पांमध्ये दंग आहेत. तेवढ्यात हॉलमध्ये 'सचिन तेंडुलकर' आला तर काय होईल! त्याच्याभोवती माणसांचा घोळका तयार होईल, सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले जाईल. तो जसजसा पुढे जाईल, तसा तो घोळकाही त्याच्याबरोबर जाईल. जरी 'सचिन' आणि त्याच्याभोवतीचा 'घोळका' एकाच गतीने पुढे जात असले तरी घोळक्याच्या केंद्रस्थानी असल्याने 'सचिन'ला जास्त 'वजन' प्राप्त होईल. तो एकदा चालू लागला की त्याला थांबवणे कठीण जाईल; आणि एकदा थांबला की पुन्हा चालणे कठीण जाईल. याच न्यायाने एखादा प्रोटॉन जर हिग्ज क्षेत्रातून जात असेल तर त्याच्याभोवती हिग्ज कणांचा घोळका तयार होतो. या घोळक्यामुळेच प्रोटोनला जडत्व म्हणजेच 'वस्तुमान' प्राप्त होते असे या सिद्धांतात म्हटले आहे. याची छोटीशी झलक येथे पहायला मिळेल.
इतर सर्व मुलभूत कणांचे अस्तित्व हे प्रत्यक्ष निरीक्षणाने सिद्ध झाले आहे; पण हिग्ज बोसॉन्सचे प्रत्यक्ष निरीक्षण करता आलेले नाही. कारण त्यासाठी असामान्य प्रकारची ऊर्जा असणारा कोलायडर आवश्यक आहे. LHC मुळे हिग्ज बोसॉन्सचे निरीक्षण करता येईल.
LHC प्रयोगाचे महत्व
पण समजा, हे हिग्ज कण दिसले नाहीत तर? वैज्ञानिकांसाठी ही गोष्ट जास्त कुतूहलदायक असेल; याबाबत एक शास्त्रज्ञ म्हणतो,"कोलंबस जेव्हा प्रवासाला निघाला तेव्हा त्याला माहीत होते की तो काहीतरी शोधणार. त्याला जे हवे होते त्याचा शोध लागला नाही; पण त्याला ज्याचा शोध लागला ते नक्कीच महत्वाचे होते". जर आत्तापर्यंतच्या सिद्धांतांना अपेक्षित असलेले काहीच सापडले नाही तरीही LHC प्रयोग महत्वाचा मानला जाईल; कारण ४०-५० वषर्षांपासून मांडलेले सगळे सिद्धांत शास्त्रज्ञांना पुन्हा पहिल्यापासून तपासावे लागतील.
आणि हेच विज्ञानाचे बलस्थान आहे. कोणताही सिद्धांत तार्किकदृष्ट्या खरा आहे असे मानून चालत नाही. प्रात्यक्षिकरित्या तो पुन्हापुन्हा तपासून - चांगला तावून सुलाखून - मगच सिद्धतेस पात्र होतो. प्रयोगातून जर तो अपुरा वाटत असेल तर त्याजागी नवे तर्कसुसंगत सिद्धांत मांडले जातात. "सिद्धांत - प्रयोग - निरीक्षण - अनुमान - नवे सिद्धांत" हे चक्र अखंडपणे चालू राहते. विज्ञानाची प्रगती ही 'सिद्धांत' (संकल्पना) आणि 'प्रयोग' (परीक्षण) या दोन्हींवर अवलंबून आहे.
भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा समावेश ज्यात होतो त्याला 'सैद्धांतिक भौतिकशास्त्र' (theoretical physics) असे म्हणतात. सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञांची परंपरा न्यूटन, आईन्स्टाईन, फाइनमन पासून ते स्टीफन हॉकिंग्जपर्यंत चालू आहे. हे सिद्धांत मुख्यतः गणिती भाषेत असतात. आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद तसेच क्वांटम मेकॅनिक्स (पुंज यामिक!) हे आधुनिक भौतिकशास्त्रातील महत्वाचे सिद्धांत. त्यामानाने नविन असणारे आणि प्रायोगिकरित्या सिद्ध न झालेले काही सिद्धांत आहेत उदा. स्ट्रींग थिअरी, सुपरसिमेट्री वगैरे. जागेअभावी यांचे स्पष्टीकरण इथे करणे योग्य होणार नाही. मात्र हे सिद्धांत जर खरे ठरले, तर "वास्तवता (reality) ही परिकथेपेक्षा (fiction) थक्क करून सोडणारी आहे" यात काही शंकाच उरणार नाही; उदा. आपण ज्यात रहातो ते जग 'त्रिमिती' (3-Dimensional) नसून ११ मितींनी (11 Dimensions) बनले आहे असे अनुमान निघेल. थोडक्यात म्हणजे, विश्वाची संपूर्ण रचना समजून घेण्यासाठी हे सिद्धांत आवश्यक आहेत. तर गेल्या काही दशकांपासून विकसित होणारे हे महत्वाचे सिद्धांत जर प्रात्यक्षिकातून पडताळायचे असतील तर त्यासाठी LHC सारखा मोठा प्रयोग होणे आवश्यक आहे.
व्यावहारीक फायदा
आता या सगळ्याचा सामान्य माणसाला काय फायदा? सध्यातरी या प्रयोगाचा व्यावहारिकदृष्ट्या काय फायदा होईल हे सांगणे कठीण आहे. पण काय सांगावे, दूरच्या भविष्यकाळात यामुळे जगाचा पूर्ण कायापालटही होऊ शकेल. इलेक्ट्रॉनचा शोध जेव्हा लागला तेव्हा सामान्य माणसासाठी ती एक "बाहेरून दिसणारी अलिबाबाची गुहा"च होती; त्याचा फायदा त्यावेळी दिसला नाही. पण त्याच इलेक्ट्रॉनने नंतर तांत्रिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणली. त्याचप्रमाणे, LHC मधून एखादे संपूर्ण नवे तंत्रज्ञान उदयाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच संशोधनासाठी वापरलेली अत्याधुनिक साधने, उपकरणे व्यावहारीकदृष्ट्या वापरता येतील.
अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. माणसाचे वेगळेपण जर कशात असेल तर ते त्याच्या जिज्ञासूवृत्तीत. जगाबद्दलचे ज्ञान जाणून घ्यायची ही दुर्दम्य इच्छाच विज्ञानाच्या मूळाशी आहे. या कुतूहलामुळेच वैज्ञानिक शोध लागतात आणि नंतर त्याचा वापर करून नवनवीन तंत्रज्ञान तयार होते. हेच तंत्रज्ञान मग सामान्य माणसापर्यंत संगणक, मोबाईल फोन यासारख्या माध्यमातून पोचते. LHC हे मानवातील अफाट जिज्ञासेचे एक उदाहरण आहे. आपण ज्या जगामध्ये रहातो त्या जगाची अधिक जवळून ओळख करून घ्यावी...आपण सर्वजण ज्या मुलभूत कणांपासून बनलेले आहोत त्या कणांना जाणून घ्यावे, हाच LHC प्रयोगाचा गाभा आहे. श्रीकृष्णाकडून विश्वरूप जाणून घेण्याची इच्छा असणारा अर्जुन आणि LHC साठी तळमळीने झटणारे शास्त्रज्ञ यांच्यात काहीतरी साम्य असले पाहिजे (अर्थात, हे दोघेही त्या मुलभूत कणांपासून बनले आहेत हे एक साम्य आहेच म्हणा).
प्रयोगाचे धोके!
काही जणांच्या मते, या प्रयोगातून कृष्ण-विवरे (black-holes) तयार होतील आणि त्यामुळे पृथ्वीचा नाश होईल. हे वाचून मला बिरबलाच्या खिचडीची गोष्ट आठवली. LHC मुळे अतिसूक्ष्म कृष्ण-विवरे तयार होण्याची शक्यता खूप कमी आहे (साधारण १%). आणि ती तयार झाली तरी क्षणार्धात नष्ट होतील; त्यामुळे कोणताही धोका उद्भवणार नाही. अशा प्रकारच्या घटना पृथ्वीच्या वातावरणात नैसर्गिकरित्या दररोज घडतात, आणि तरीही आपण अजून जीवंत आहोत. हां, आता माझे एवढे मोठे 'चर्हाट' ऐकल्यानंतर तुम्ही जीवंत आहात की नाहीत ते माहीत नाही!
तर मंडळी, बिनधास्त रहा... आणि माझी अगम्य भाषेतली गिचमीड वाचून डोक्याला मुंग्या आल्या असतील तर मस्तपैकी झोप काढा! किंवा अजूनही उत्साह बाकी असेल तर खाली दिलेले संदर्भ तपासा.
सोप्या भाषेत लिहिलेले काही सुंदर लेख, पुस्तके (PDF files for downloads) आणि इतर:
Mysteries of the Universe
The First Three Minutes
A Brief History of Particle Physics
The Atlas Experiment
eTour of Physics
काही उद्बोधक चलचित्रे (YouTube 'तू-नलिका' आणि इतर)
LHC accelerator at CERN
CERN in 3 minutes
Brian Cox: What really goes on at the LHC
The Birth of the Universe, Big Bang and Beyond
The Atlas Animations
--
आईन्स्टाईनचा चेला
I have no special talents. I am passionately curious. - Albert Einstein
वाचने
17100
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
सुंदर लेख
In reply to सुंदर लेख by सहज
+ १
In reply to + १ by मुक्तसुनीत
+१
एकदम झकास
सुप्पर !!!
विश्वरुप
राहूलशेठ, इ
In reply to राहूलशेठ, इ by विसोबा खेचर
अवांतर -
छान आहे
उत्तम
In reply to उत्तम by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to उत्तम by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो
In reply to हो by राहूल
प्रश्न
In reply to प्रश्न by धनंजय
माझे मत
In reply to माझे मत by राहूल
'विस्फोट'
In reply to 'विस्फोट' by ३_१४ विक्षिप्त अदिती
महास्फोट / महाविस्तार
In reply to महास्फोट / महाविस्तार by मुशाफिर
कवी आणि भौतिकशास्त्रज्ञ
In reply to 'विस्फोट' by ३_१४ विक्षिप्त अदिती
महा विस्फोट.........महाविस्तार
In reply to उत्तम by ३_१४ विक्षिप्त अदिती
मग..
In reply to मग.. by नाटक्या
महाविस्तार / महाप्रसरण / महास्फोट
In reply to महाविस्तार / महाप्रसरण / महास्फोट by मुशाफिर
तुम्ही
In reply to महाविस्तार / महाप्रसरण / महास्फोट by मुशाफिर
मान्य
अतिशय सुंदर
वा! अगदी माहितीपूर्ण लेख
खूप सुंदर
राहूल,
अती प्रचंड उष्णता . . . . . !
In reply to अती प्रचंड उष्णता . . . . . ! by केशवराव
उष्णता
लेख आवडला.
वा लेख
खुप
याच
In reply to याच by भाग्यश्री
छान
वाखाणण्यासारखे