Skip to main content

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 22/09/2014 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?

वाचने 100349
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

या प्रसंगाविषयीच्या मराठ्यांकडील अस्सल आणि विश्वसनीय नोंदी खालीलप्रमाणे आहेत. जेधे शकावली (निवडक नोंदी) शके १६१० विभव सवछरे कार्तिक मासी कवी कलश याजवरी सिरके पारखे जाले कलश पळोन खिलणियावर गेला तेच मासी संभाजी राजे रायेगडाहून कलशाचे मदतीस आले समगे स्वारी सिरकियांसी युध्य करून त्यास पलउन खलणियास आले मार्गासीर्ष मासी संभाजी राजे याणी कलशाच्या बोले प्रह्लादपंत व सर कारकून व कितेक लोकास धरिले तेच मासी औरंगजेब विजापुरीहून तुलापुर नजीक भीमातीर येथे आले माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजी राजे व काविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास अले असता सेक निजाम दौड करून येउन उभायेतास जीवतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किलेदार चांगोजी काटकर व येसजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसावले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कायेभाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले फालगुण वद्य १३ त्रायोदसी हारजी माहडिक याणी केसो त्रीमाल यांस संभाजी राजे याचे विपरीत वर्तमान यैकोन त्रिणामली धरिले फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कविकलश यास जीवे मारून सिरछेद केले बाकीच्या गोष्टीबद्दल मराठ्यांकडील अस्सल माहिती उपलग्ध नाही कारण १) या प्रसंगात प्रत्यक्ष हजर असणारी सर्व महत्वाची माणसे (स्वतः राजे, मुख्य कारभारी कवी कलश, सेनापती म्हलोजी घोरपडे) एक तर कैद झाली किंवा मारली गेली २) वरकड माणसे ( यात म्हलोजीचा मुलगा संताजी घोरपडे हाही होता कि नाही याची कल्पना नाही) रायगडाकडे गेली आणि त्यांनी ही बातमी येसूबाईस दिली. पण यानंतर रायगडच शत्रूच्या ताब्यात गेला आणि मूळ सरकारी दफ्तरखाना नष्ट झाला. ३) फारसी साधने औरंगझेबाच्या दरबारात म्हणजे ३०० किलोमीटर दूर अर्थातच ऐकीव माहितीवर आधारित लिहिली गेली आणि शत्रुपक्षाकडील असल्यामुळे मोगलांना कमीपणा आणणारी माहिती अर्थातच त्यात नसणार त्यामुळे कादंबरीकारांनी जे तपशील भरले आहेत ते तर्क आणि कल्पना वापरूनच ठरवले आहेत. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माझे काही तर्क. (यांना कोणताही आधार नाही) १) तो काळच अराजकाचा आणि अनिश्चिततेने भरलेला होता. विजापूर आणि गोलकोंड्याची राज्ये दोन वर्षापूर्वीच नष्ट झाली होती. त्यांचे सरदार मोगलांना जाऊन मिळाले होते. मुकर्रबखान शेख निजाम पूर्वी विजापुरी मनसबदार होता आणि त्याला शिर्के अथवा विजापुरी मुलुखाची चांगली माहिती असणे अशक्य नव्हते. तसेच त्याला संभाजी राजांची बातमी मिळणेहि अवघड नव्हते कारण संभाजीराजे पूर्वी विजापूरच्या मदतीनेच मोगलांशी लढत होते. मुकर्रबखानच्या दृष्टीने त्याची स्वतःची उपयुक्तता मोगलांना सिद्ध करण्यासाठी हि उत्तम संधी होती. संभाजी राजांनी कित्येक लोक कैदेत ठेवले होते वातावरण एकंदरीत भीतीदायक आणि गोंधळाचे असले पाहिजे. २) नुसते सैन्य असून अशा गोष्टी करणे शक्य नसते, त्याला नेतृत्व लागते. संभाजी राजांना सोडवू शकणारी आणि त्यांच्या पाठीशी उभी राहणारी माणसे खालीलप्रमाणे होती. हंबीरराव मोहिते १६८७ साली साली वाईच्या लढाईत मारले गेले. कवी कलश मुख्य कारभारी (पकडले गेले) सेनापती म्हलोजी घोरपडे (मारले गेले) येसाजी कंक (रायगडावर होते म्हणून त्यांच्यावर शाहू, राजाराम आणि येसूबाई यांच्या रक्षणाची जबादारी होती) येसूबाई (बखरीत रायगडचा खजिना रिकामा आहे, पुरेसे सैन्यही जवळ नाही अशी वाक्ये आहेत.) त्यामुळे त्यांना फार काही करणे शक्य नव्हते असे वाटते राजाराम नजरकैदेत असल्याकारणाने त्याच्याकडे सैन्य नव्हते, त्याचे समर्थकही अटकेत होते. ३) इतिहासात जसे शत्रूच्या मुलुखातून औरंगझेबाच्या कैदेतून सुटून जाणे जमते तसेच अचानक छाप्यात पकडले जाणेही होते. शिवाजीराजांच्या काळी त्यांच्याकडे मोगल विरुद्ध विजापूर असे राजकारण करण्याची संधी होती आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला (जसे मिर्झा राजा जयसिंगाच्या वेळी). पण एकदा विजापूरचे राज्य नष्ट झाल्यावर आणि पकडले गेल्यावर संभाजी राजांकडे असा काही पर्यायच उरला नाही. ४) जेधे शकावलीनुसार राजारामाचे मंचकारोहण संभाजी राजांच्या वधापुर्वी झाले. त्यावरून असे वाटते की मराठ्यांनी संभाजी राजे जिवंत परत येण्याची आशा आधीच सोडली होती. ५) संभाजी राजांचे सैन्य शिर्क्यांच्या मोहिमेसाठी पुरेसे असावे पण खानाच्या सैन्याचा पराभव करण्याइतपत जास्त नसावे. त्यामुळे लगेच सुटकेचे काही प्रयत्न शक्य झाले नसावे.

शहेनशहा मधे एक वाक्य आहे, औरंगजेब दानिष्मंद्खान (का शहजादी झेबुन्निसाला) म्हणतो. माझ्या हातात मराठ्यांच्या तिन्ही पिढ्या लागल्या पण मी प्रत्येकाबरोबर वेगळा व्यवहार केला. १. शिवाजीला मी जाऊ दिले शिवाजी मुघलांच्या बाजुने वळेल किंवा जयसिंगाला दिलेले वचन मोडेल हे कारण असावे.असे माझे मत) २. संभाजीला मी ठार केले (आदिलशाह, कुतुबशाह ताब्यात होतेच मात्र संभाजीने प्रखर विरोध केल्यामुळे दृष्टीपथात आलेला आणि आयुष्यभर उराशी बाळगलेला दक्षिण विजयाचा क्षण निसटेल की काय असे त्याला वाटत असावे.असे माझे मत) ३. शाहुला मी आश्रय दिला पण मोकळे सोडले नाही. (म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी लहानग्या शाहुला आपल्या ताटाखालचे मांजर बनवले तर दक्षिण मुघलांच्या ताब्यात असल्यासारखीच राहील असा त्याचा विचार असावा.असे माझे मत)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

८९ वर्षे जगलेल्या कोणत्याही व्यक्तीला साधारणतः तीन पिढ्यांच दर्शन सहाजिकच घडत औरंगजेबाने तीन पिढ्या पाहिल्या हे नोंदवण्यासाठी कपोलकल्पित कादंबरीच्या आधाराची गरज रिव्हिजिट करून पहाण्याची गरज वाटते.
१. शिवाजीला मी जाऊ दिले
यात कादंबरीकाराच्या कपोल कल्पनेपलिकडे हाती काय लागते ? मिर्झाराजे जयसिंगा मार्फत दबाव देऊन शिवाजीराजे मांडलीक होतात का ते पहाणे हा सामान्य मुत्सद्देगिरीचा भाग समजा की औरंगजेबाने केला, औरंगजेबाच्या जागी कोणताही बादशहा असता तरीही त्यानेही ते केलेच असते या मुत्सद्देगिरीला जाऊदिले असे स्वतः औरंगजेबसुद्धा म्हणेल की नाही हा प्रश्नच वाटतो. आग्र्यातून सुटकेच्या वेळी शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली याला जाऊ दिले म्हणणार का ? म्हणजे की आग्र्यातील कैदेतून पळून जाणार आहे हे औरंगजेबाला बादशहा माहित होते पण औरंगजेबाने मनोरंजन म्हणून शिवाजी महाराजांना जाऊ दिले ? औरंगजेबाने शिवाजीला जाऊ दिले म्हणजे नेमके काय ? :)
२. संभाजीला मी ठार केले
सत्तेच्या संघर्षात जो स्वतःच्या वडील आणि भावंडाशी क्रौर्य दाखवताना मागे पुढे पहाणार नाही. तसेही भारतातील तो काळ मानवाधिकारांचा विचार करणार्‍यांचा नव्हता, जनता आणि शत्रुच्या अनुयायांवर जरब बसवण्यासाठी हाती आलेल्या शत्रु प्रमुखाला मारणे हि काही अपवाद वगळता त्या काळी सर्वसामान्य बाब नसेल काय ? समजा औरंगजेबाला दक्षिण विजयाच स्वप्न नसतं तरी सुद्धा त्याने संभाजी महाराज म्हणून नव्हे इतरही त्याच तोला मोलाच्या शत्रूशी काही वेगळा व्यवहार केला असता का ? समजा शाहीस्तेखान स्टाईल मध्ये औरंगजेब शिवाजी महाराजांच्या हाती आला असता तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सोडला असता काय ? या बाबीचे शिवाजी महाराजांच्या उत्तर अथवा दक्षिण विजयाच्या स्वप्नाशी एकुण किती नाते राहिले असते. भारताचे पहाडी उत्तरांचल आणि आसाम हे प्रांत मोगलांना कधीच घेता अथवा टिकवता आले नाहीत म्हणून त्यांचा बाकीचा दक्षिण विजय थांबला का ? संभाजी महाराजांच्या काळात निश्चितपणे मराठवाडा आणि बेरार भागात जाऊनही औरंगजेबास नाकी नऊ आणले तरी सुद्धा दिल्लीचा बादशहा दक्षिणेत अधिक खोलवर संभाजी महाराजांच्या नंतर पोहोचला आधी नाही असे असेल तर त्याचे ललितेतर इतिहास संशोधनाच्या साधनातून संदर्भ देऊन लेखन करावयास हवे त्यास कादंबरीचे आधार देऊन तर्क साधणे कितपत योग्य आहे या बद्दल मी साशंक आहे.
३. शाहुला मी आश्रय दिला पण मोकळे सोडले नाही. .......लहानग्या शाहुला आपल्या ताटाखालचे मांजर बनवले तर दक्षिण मुघलांच्या ताब्यात असल्यासारखीच राहील असा त्याचा विचार असावा.असे माझे मत)
ज्या औरंगजेब स्वतःच्या बापाच्या ताटाखाली श्वास घेऊ शकला नाही तो शाहू महाराज हत्या केलेल्या शत्रूचा मुलगा ताटाखालचे मांजर बनतील असा खरेच विचार करेल का या बद्दल साशंकता वाटते, नेमकंकारण औरंगजेबच सांगू शकेल तरीही काही कारणच असेल तर १) पडद्यामागून मराठा सरदारांनी अथवा शाहू महाराजांच्या आजोळून रदबदली २) औरंगजेबाच्याच कुटूंबातन झालेली भावनीक रदबदली ३) औरंगजेब म्हातारपणामुळे दयाळू झाला होता (तसे असते तर संभाजी महाराजांवरही गंभीर प्रसंग गुदरला नसता) ४) कोवळ्या वयातील भोसले घराण्याच्या वंशाच्या दिव्यास हात न लावणे म्हणजे संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी अधिक हल्ले होणार नाहीत ५) किंवा महाराष्ट्रातील जनतेची आणि भोसले घराण्याच्या स्वामी भक्तांची अधिक नाराजी न घेणे ६) मराठा सरदारांशी भविष्यकाळात तडजोडीचा प्रसंग आलाच तर मुत्साद्दी वाटाघाटीं साठी ओलीस ठेवणे यापैकी सुद्धा एखादे कारण असू शकेल किंवा एकही नसेल. तरीही >>म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी हा तर्कही पुरेसा पटत नाही. ज्या स्थितीत संभाजी महाराज आणि कुटूंबीय मोगलांच्या हाती लागले तेव्हा >>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा खरेच चालू होता का ? माझ्या हाती संदर्भ साधने नाहीत पण याच धाग्यावर झालेली आधीची चर्चा पाहता औरंगजेबाचा दबाव ढिला पडत नव्हता वाढलेला होता असे प्रथम दर्शनी वाटते त्यामुळे आपल्या या तर्का बाबत साशंकता वाटते.

In reply to by माहितगार

म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा
माझ्याकडे इतिहासाची संदर्भ साधने उपलब्ध नाहीत पण संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटूबींयांना अटक करण्याच्या नेमक्या वेळी औरंगजेबाचे सैन्य स्ट्रॅटेजीकली यशस्वी होताना दिसते असे या धाग्यावरील आधीच्या प्रतिसादातील चर्चांवरून वाटते. संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर काही वर्षे लोटूनही मराठे पूर्ण नियंत्रणात राहीले नाहीत तर नंतर औरंगजेब उद्वीगन झाला असेल नाही असे नाही परंतु ज्या काळात संभाजी महाराज आणि त्यांचे कुटूंबीय हाती पडले तेव्हा औरंगजेब अथवा त्याचे सरदार उन्मादात असण्याची शक्यता अधिक उद्वीग्नतेची नव्हे. संभाजी महाराजांची हत्या करातानाच्या क्रौर्यात जेवढा जनतेवर जरब बसवणे हा हेतु असू शकेल तेवढाच शत्रूच्या प्रमुखास जेरबंद करण्याचा उन्माद हेही कारण असू शकेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हे माझे मत आहे. मी इतिहास अभ्यासक / संशोधक नाही.
मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेले बरे, मीही आपल्या प्रमाणेच इतिहात रुची तेवढीच ठेवतो, अभ्यासक / संशोधक वगैरे नाही. २१व्या शतकात सर्व दस्तएवज केवळ अभ्यासक अथवा संशोधकांची मक्तेदारी होऊन काही मोजक्याच जणांना उपलब्ध होतात ते ऑनलाईन याची डोळा पाहण्या साठी आणि युनिकोडात सहज शोधणेबल याची हाते शोधण्यासाठी उपलब्ध व्हावयास हवेत. अभ्यासकांची मत विचारात घेतली पाहिजेत पण तर्क हि कुणाची मक्तेदारी नाहीत तुम्ही तुमच तर्क आणि मत बनवू आणि मांडू शकता त्या बद्दल आदरच आहे. अर्थात मला जिथे साशंकता वाटली ती नोंदवली एवढेच. धन्यवाद

In reply to by माहितगार

मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेले
पटले म्हणुन तर मिपावर येत असतो

सोयराबाई व अष्टप्रधान मंडळाच्या मनात राजारामाला गादीवर आणायचे होते. हंबीरराव मोहित्यांनी संभाजीराजांना साथ दिल्यामुळे कोणाचे चालले नाही व संभाजीराजे सत्तेवर आले. संभाजीराजांनी सोयराबाईंना कैदेत टाकले. जेव्हा संभाजीराजांना अटक झाली तेव्हा विरोधकांना राजारामाला सत्तेवर आणण्याची संधी मिळाली. म्हणून सरदार व पंतप्रतिनिधीनी संभाजीराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला नाही.

In reply to by हेमंत लाटकर

जेव्हा संभाजीराजांना अटक झाली तेव्हा विरोधकांना राजारामाला सत्तेवर आणण्याची संधी मिळाली. म्हणून सरदार व पंतप्रतिनिधीनी संभाजीराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला नाही.
हे कुठल्या तत्कालीन पुराव्याच्या आधारे तुम्ही सांगत आहात, राजारामांना संभाजीराजांच्या विरोधकांनी नव्हे तर छत्रपतींच्या नंतर मुख्याधिकारी असणार्या शंभूपत्नी येसूबाई यांनी सिंहासनावर बसवले तेही अगदी संभाजीराजे यांना मोगलांनी पकडल्यावर ८ दिवसात म्हणजे ९ फेब १६६९ ला. गोवा ,म्हैसूर,जंजिरा सह मोगलांच्या विरुध्द झालेल्या सर्व स्वर्यात आणि युद्धात सर्व सरदारांनी संभाजीराजांना पूर्ण साथ दिली.

In reply to by धडपड्या

नाही हो। अस कोणत प्रकाशन आहे हेच आता कळल २००९-१०साली बाजीरावाच एक दोन खंड असणार चरित्र वाचला होत त्यात होता हा उल्लेख लेखक आठवत नाही आणि तुमच्या माहिती साठी मी कोणतही ब्रिगेडी साहित्य वाचत नाही तुम्ही वाचत असाल

In reply to by धडपड्या

आणि त्यात काय कुणावर चिखलफेक केली नव्हती माझ वाचन काही तुमच्या इतक नाही पण बाजीरावावर आजवर मी वाचलेल सुंदर पुस्तक होत ते लेखक लक्षात नसल्यामुळे संदर्भ आठवत नाही म्हणटलेल

In reply to by धनावडे

अहो, माझा प्रतिसाद तुम्श्हाला नव्हता. तो फक्त तुमच्या नंतर दिला, म्हणून तुमच्या प्रतिसादाखाली आलाय. थंड घ्या. तुम्हाला दिलेला प्रतिसाद, असा दिसतो..

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?
खूप छान . नास्तिकतेच ढोंग करणार्यांना मारलेली चपराक आवडली . नवते झाले . आणि ह्याला फितुरी कारणीभूत नाही .