मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] निकाल

मधुरा देशपांडे · · स्पर्धा
दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु. उत्तरार्ध

वाचने 18690 वाचनखूण प्रतिक्रिया 76

+१ (सकारात्मक कथा) +१ (पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....दुसर्‍या भागाचा शेवट पण सकारात्मक होवू दे.)

प्यारे१ 08/08/2015 - 17:26
+१ टीपीकल बंडखोरी. बाकी मंगळसूत्र मोडलं की तोडलं?

In reply to by मधुरा देशपांडे

प्यारे१ 08/08/2015 - 21:17
मंगळसूत्र 'तोडून' आली असती तर कथा जास्त परिणामकारक झाली असती असं वाटतंय. (नवर्यानं घालायचं असतं ना ते!) थोड़ा 'व्यावहारिक' विचार केला असेल. असो! :)

स्पंदना 09/08/2015 - 08:41
कॉप्या करणारी चुलत बहिण सायन्सला घालुन मला आर्टस मध्ये घातलेला दिवस आठवला. जास्त मार्कस होते तिच्यापेक्षा. अस काही मोदायला जमल नाही, पण कुणीतरी मोडलेलं वाचून भले शाब्बास!! म्हणावस वाटतयं.

In reply to by स्पंदना

प्यारे१ 09/08/2015 - 13:28
यात मुलगा मुलगी अशा वेगळेपणाच्या/ दुजाभाव करण्याच्या वृत्तीपेक्षा अप्पलपोटेपणाची भावना/ आपपरभावाची भावना जास्त असते. बर्‍याच गोष्टी असतात. एक पातळीवर बघून नाही चालत. माझ्या वडीलांना तेव्हा (१९६५ सालच्या आसपास) ६०% च्या वर मार्क असताना त्यांच्या काकांनी स्वतःच्या मुलीला सायन्स ला अ‍ॅडमिशन घेऊन वडीलांना आर्ट्स ला टाकलं होतं. (एकत्र घरात असं कोणीतरी असतंच ज्याचं ऐकावं लागतंम) महिन्याचे लिमिटेड पैसे मिळत असल्यानं खाणावळ लावलेली. त्यात तेव्हाच्या पं.प्र. लालबहादूर शास्त्रींच्या आवाहनावर खाणावळ वाल्यानं आठवड्यातला एक दिवस सुट्टी म्हणून खाणावळ सोमवारी बंद ठेवल्यावर वडलांचा सोमवार उपवास सुरु झाला होता. काकांची मुलगी एखाद वर्ष कॉलेज केल्यावर उजवली गेली पण वडीलांचा करीअर चा मार्गच बदलला म्हणण्यापेक्शा खुंटला म्हणता येईल. असो!

दिपक.कुवेत 09/08/2015 - 13:39
प्रतिसाद कमीत कमी शब्दात द्यायचे असं काहि आहे का? नाहि आत्तापर्यंत जेवढ्या कथा वाचल्या त्या +१ ह्या प्रतिसादापलीकडे नाहित. असो हि कथा आवडली.

नाखु 10/08/2015 - 08:36
कथा नायीका स्वावलंबी बनावी हीच सदीच्छा!!!

बबन ताम्बे 10/08/2015 - 10:57
समाजात अशा गोष्टी घडतात. नातेवाईकांत एखादी व्यक्ती अशी असते ज्याचे इतर नातेवाईक (विशेषतः आर्थिक परीस्थिती हलाखीची असणारे) मिंधे असतात. हा मनुष्य वयाने , अनुभवाने जेष्ठ आणि दरारा असणारा असतो. इतरांचे त्याच्यासमोर काही चालत नाही. कथा खूप आवडली.

सौंदाळा 10/08/2015 - 12:33
+१