नींद नही आती बडी लंबी रात है.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मला जाग आली. कुठे आहे मी. आणि हे काय कसला आवाज येतोय. बीप बीप बीप बीप एक सारखा. ठरावीक अंतराने येतोय. कुठे आहे मी. हॉस्पिटलमधे असल्या सारखा वास येतोय. कुठे आहे मी. माझ्या डावीकडे तो आवाज येतोय. ठरावीक अंतराने बहुतेक प्रत्येक एक दोन सेकंदाने तो आवाज येतोय. बीप बीप बीप बीप. डोळ्या समोर काहीच दिसत नाहिय्ये. कुठे आहे मी. फक्त एक पांढरा कसलासा रंग. मी डोळे फाडून बघतोय. बहुतेक खोलीचे छत आहे. तो सिलींग फॅन फिरतोय. पण हा त्याचा आवाज नाहिय्ये. मग कसला आवाज आहे हा. आणि मी कुठे आहे? काहीच कळत नाही. कोणीतरी बोलल्याचा आवाज येतोय.
" डॉक्टराना सांगायला हवं. नो . हार्ट बीट मधे काहीच बदल नाहिय्ये"
दुसरा आवाज ." सलाईन संपत आलंय. अजून पाच मिनीटे चालेल ते. सराना विचार नेक्स्ट कधी लावायचं आहे ते. "
तिसरा आवाज " ती तीनशे चार मधली मुलगी. अजून अनकॉन्शस आहे. तीचा ताप कमी होत नाहिय्ये. पॅरासिटामूल आय व्ही पुन्हा द्यावे लागेल. "
पहिला आवाज " बापरे आज सगळ्या केसेस क्रिटिकलच आल्या आहेत. एक मिनीट बसायला ही वेळ मिळालेला नाहिय्ये. मघाशी जेवावं म्हंटलं जरा तर आणखी एक केस आली ".
म्हणजे मी हॉस्पिटलमधे आहे? हो . पण इथे कसा आलो. माझ्या घशात काहीतरी अडकलय. काय ? ते कळत नाहीय्ये. माझे हात इतके जड का झालेत. बापरे मानही हलवता येत नाहिय्ये. सगंळ अंग आखडलय. हातच काय पण हाताची बोटं पण हलत नाहीय्येत. माझ्या समोर कोणाचा तरी चेहेरा आला आहे. नर्स आहे. तीने माझ्या डोळ्यात ड्रॉपरने कसलेतरी ड्रॉप्स टाकले. हे काय मला डोळेही हलवता येत नाहीय्येत. एकाच जागी थिजून गेले आहेत. काय होतंय मला. अजिब्बात हलता येत नाहिय्ये.
हात पाय मान जाणवतं नाहिय्ये. " मी इथे कसा आलो? मी कुठे आहे? तुम्ही कोण आहात?" मी ओरडतोय. घशातून एकही आवाज फुटत नाहिय्ये. ओठ हलत नाहिय्ये.
सगळंच स्तब्ध झालंय. मला फक्त खोलीचं छत आणि सिलींग फॅन दिसतोय. मी बहुतेक हॉस्पिटलच्या बेडवर आहे. अचानक माझ्या बायकोचा चेहेरा दिसतो. खूप जागरण झाल्या सारखा. खूप काहीतरी उलथापालथ झाली असावी इतका घाबरलेला. तीला मी असं कधीच पाहिलेलं नाही. इतकी कशाला घाबरली आहे ती? ती कोणाशीतरी बोलतेय. डॉक्टरांसारखा अॅप्रन घातलाय. नशीब मला ऐकुतरी येतंय. ते बोलताहेत.
स्पष्ट बोलतो मी. तुम्हाला मन घट्ट करावं लागेल. त्याना शुद्ध येतेय पण कोणत्याच गोष्टीला रीस्पॉन्स देत नाहिय्ये. चार दिवस झाले इथे आणून. त्यांचे हार्टबीट्स चालू आहेत. त्याच गतीने. मॉनिटरवर काहीच बदल दिसत नाही. पण शरीर इतर कुठल्यास स्टिम्यूलेशनला प्रतिसाद देत नाही. सेन्सेस चालू आहेत की नाही तेच समजेनासे झालंय. पेशंट कोमात गेलाय."
ते माझ्या बद्दल बोलताहेत? हो . माझ्याच बद्दल. मी कान देवून ऐकतोय. अचानक माझ्या डोळ्यापुढचा प्रकाश कमी होऊ लागलाय. अंधार. अंधार. खोलखोल गेल्यासारखे होतंय. आता पूर्ण अंधार. ...
दोन दिवस बरं वाटत नाही असे हे म्हणत होते. साठी नंतर असं थोडंसं व्हायचंच. चक्कर येतेय. हातापायाला मुंग्या येताहेत म्हणत होते. बीपी लो झालं असेल . खडीसाखर खा. म्हणून मी भीशी साठी गेले. यांचा फोन आला. घरी ये लवकर. आणि फोन बंद झाला. नक्की काय झाले विचारायला पुन्हा फोन केला तर हे काय बोलताहेत तेच कळत नव्हते. घशातुन कसलेतरी घरघर आवाज येत होते. काय झालं असेल बाई.तडक रिक्शा केली आणि घरी आले. घरी बेल वाजवली कोणीच दार उधडत नव्हते. शेवटी लॅचकी ने दार उघडले. बघते तर काय हे टेबलाजवळ खाली पडलेले. तोंडातून फेस येत होता. बरं तर बरं शेजारचे पाटील घरी होते. त्यांनी अँब्युलन्स बोलावली. आणि हॉस्पिटलमधे घुऊन आले. चार दिवस झाले हे पूर्ण शुद्धीवर येत नाहिय्येत. अधून मधून शुद्ध येते. डोळे मात्र सताड उघडे आहेत. मला तर बाइ भितीच वाटतेय. मला तर काहीच सुचतनव्हते. क्षिप्राला जर्मनीला फोन लावला कुलकर्णी वहिनीनी . ती बिचारी आली तडक. तेंव्हा कुठे जरा धीर आला.
चार दिवस झाले काय झालंय याचं काही निदान होत नाहिय्ये.
मला माझ्या मुलीचा क्षिप्राचा आवाज ऐकु येतोय. डॉक्टर तिच्याशी बोलताहेत.
डॉक्टर मला सांगाल एक्झॅक्टली काय झालंय.
पेशंट कशालाच रीस्पॉन्स देत नाहिय्ये. पेशंट वेजीटेटीव्ह स्टेज मधे आहे. लाईफ सपोर्ट वर आहे. लघवी साठी कॅथेटर लावलाय, पोटात अन्न जावे या साठी त्यांच्या नळ्या लावता येतील . घशातून लाळ श्वासनलीकेत जाऊ नये म्हणून सक्शन पंप लावलाय. त्यांना इतर सेन्सेशनही नाही. हात पाय बोटे कान कुठेच नाही. स्पर्श , आवाज उजेड कसलेच सेन्सेशन नाहिय्ये.
डॉक्टर हे बोलत असतानाच एका नर्स ने माझ्या डोळ्यात पुन्हा ड्रॉप्स टाकले.
"हे असे किती दिवस. ते शुद्धीवर कधी येतील?" क्षिप्राच्या आवाजात काळजी होती. किती धीराने बोलत होतं माझं पिल्लू.
" नक्की सांगता येणार नाही कोमात गेलेला पेशंट कधी शुद्धीवर येईल सांगता येत नाही. लाईफ सपोर्ट आहे तोवर आपण आशा कायम ठेवायची.
आणि काढला तर?
बापरे .... मला झालंय तरी काय. मी मेलो आहे? मरतोय?
लाईफ सपोर्ट काढला तर मग पेशंट कोमातुन बाहेर येण्याचे चान्सेस फारच कमी असतात. लाखात एखादी. पण बेड सोर्स वगैरे मुळे पेशंटचे हाल हाल होतात .
हॉस्पिटलचा खर्च तर होतोच शिवाय पेशंटचे हाल बघवत नाही. पेशंट आहे तोवर पहात रहाणे या पेक्षा दुसरे काहीच करता येत नाही. तुम्ही प्रॅक्टीकल विचार करताय म्हणून हे बोललो.
हे बोलताना क्षिप्रा माझ्या चेहेर्यावरुन , डोक्यावरुन हात फिरवतेय. मला तिचा स्पर्ष जाणवतो. माझ्या आईचा हात लहानपणी माझ्या चेहेर्यावरुन फिरायचा ती आठवण झाली. क्षिप्राचा चेहेरा मला क्षणभर दिसतो. डोळ्यात पाणी आहे. तिने मन भक्कम केलंय.
मी मरतोय का. तसे असेल तर मला असं झिजून मरणाची वाट पहात जगायचं नाहिय्ये. माझा लाईफ सपोर्ट काढून टाका. मला मरू देत.
हे मला कोणाला सांगता येईल का? क्षिप्रा बेटा मला एकदा तुझ्या तोंडावरुन हात फिरवायचाय. कित्ती शहाणी झाली आहेस तु. आणि खंबीरही.
"डॉक्टर, स्पष्ट विचारु. हे ब्रेन डेथ असे आहे का? मला खरं खरं सांगा.
" तसं नाही सांगता येणार आत्ता . पण त्यांचा कशालाच प्रतिसाद मिळत नाहिय्ये. ब्रेन डेथ असेल किंवा नसेलही. आपण आशा करुयात की तसे काही नसेल.
सेकंड ओपीनियन घेता येईल कोणाचे?" क्षिप्राचा स्पष्ट आवाज येतो
हो. ते तर घ्यावेच लागेल. न्यूरो सर्जन डॉ. रवी कामत सर येणार आहेत सकाळी. व्हिजीटला . त्यांंच मत विचारायचंय. कदाचित ते एम आर आय स्कॅन करुन रीपोर्ट पहातील. आणि कन्फर्म करतील.
आणि त्यानीही..... क्षिप्राचा आवाज एकदम कोरडा पडलेला जाणवतोय.
मला नक्की खात्री आहे की मी जिवंत आहे. नर्सेस, डॉक्टर मला समोर आले तर दिसतात. त्यांचे आवाज ऐकु येतात. त्यांचे स्पर्ष जाणवतात. पण मग हे या लोकाना का नाही कळत. काय झालंय. मी त्याना कसे सांगु. माझे ओठच काय पण डोळे सुद्धा हलत नाहीत.
आत्ता रात्रीचे दहा वाजले आहेत.डॉ. रवी कामत सर सकाळी सात वाजता येतील मी त्याना आल्याआल्या इकडेच बोलावून घेतो. डॉक्टर क्षिप्राला उत्तर देतात. " ते येतील तोवर पेशंट आयसीयू मधेच राहील. तुम्ही इथे एकजण बसू शकता. काही लागलं तर नर्सेस आहेतच. त्यांना सांगून ठेवलय सगळं , इन केस इमर्जन्सी "
डोक्टर आणि क्षिप्रा मला दोघेही दिसत नव्हते पण त्यांचे आवाज ऐकु येत होते. आयसीयू चे दार वाजल्याचा आवाज आला. बहुधा डॉक्टर बाहेर गेले असावेत. क्षिप्रा एकटीच असावी बहुतेक रुम मधे. मला फक्त पांढरे छत दिसतेय.
हार्टबीट मॉनीटरचा बीप बीप बीप आवाजाशिवाय बाकी दुसरा कसलाच आवाज येत नाहिय्ये. घड्याळ्याच्या टिकटीक सारखाच. वाटतोय.
दबक्या आवाजात कोणीतरी रडतंय. क्षिप्रा असावी. बेटा रडू नको. मी आहे. मी आहे ना. मी जीवाच्या आकांताने ओरडायचा प्रयत्न करतोय. तोंडातून आवाज फुतत नाहिय्ये. कोणीतरी समजवा रे या मुलीला तिचा बाबा अजून जिवंत आहे. जिवंत रहाणार आहे. हार्ट बीट मॉनिटर सांगतोय ना ,मी जिवंत आहे म्हणून.
आणि उद्या डॉक्टरही सांगतील ते सकाळी. एवढी रात्र संपू देत. एवढी रात्र तग धरायलाच हवा मला.
क्षिप्राच्या जन्मापासूनचे सगळे क्षण माझ्या डोळ्यासमोरुन चित्रपट सरकावा तसे एक एक फ्रेम समोरुन सरकू लागले. तीला पहिल्यांदा पाहिले होस्पिटलमधे. केवढीशी होती. लालचुटूक इवलेशे ओठ आणि तप्पोरे डोळे होते. ती रांगु लागली तेंव्हा, शाळेत पहिल्यांदा सोडताना कावरीबावरी झाली होती तिच्या पेक्षा मीच जास्त हळवा झालो होतो. तिच्या प्लेग्रुपच्या हॉलच्या खिडकीतून चोरुन पहात थांबलो होतो. क्षिप्रा शाळेच्या पांढर्या शुभ्र ड्रेस मधे शाळेत जायची. तीला सायकल शिकवली. ऐटीत सायकल चालवायची, दहावीच्या गॅदरींगला तीने साडी नेसली तेंव्हा अचानक मोठी झाल्यासारखी वाटली होती. मग कॉलेजला गेली. कँपसमधून टी सी एस ला सिलेक्षन झाले अभिमान वाटला होता. तीची पहिली ऑनसाईट असाईनमेंट . एअरपोर्ट वर चेक इन करायला आत गेली तेंव्हा डोळ्यात पाणी आले होते. तीचे लग्न झाले. काय देखणी बाहुली सारखी दिसत होती...... माझ्या डोळ्यातून पाणी ओघळतय. पार कानात जायला लागलं.
किती वेळ झाला कोण जाणे. हार्टबीत मॉनिटरचे बीप बीप चालूच होते. हा आवाज थांबला की मी संपलो हे डिक्लेअर होणार होते. समजा लाईट गेली. मॉनिटर बिघडला आणि बंद पडला तर? माझे डोळे टक्क उघडे आहेत. पापण्या मिटत नाहीत. कपाळावर काहीतरी हुळहुळतय. माझ्या चेहेर्यावर एक झुरळ असावं नीट दिसत नाहीय्ये. ते माझ्या कपाळावरुन कानावर चाललय. आता उलट फिरलय. ओठावर आलंय. नाकातुन आत जाउ नये . पण गेलं तर बर्म होईल. निदान त्यामुळे मला शिंक येईल. तो मी जिवंत असल्याचा पुरावा ठरेल.
अचानक डोळ्या समोरचे पांढरे छत दिसेनासे झालंय .ते झुरळ माझ्या डोळ्यावरुन चाललय. डोळ्यात खूप खाज येतेय. बहुतेक आणखी एक झुरळ असावे. कानात पण खाज यायला लागली आहे. बापरे तिथून ते आत गेलं तर? हे असं किड्या मुंग्यानी जिवंतपणी खाऊन टाकण्यापेक्षा थेट मरण यावं. माझ्यातली धुगधुगी संपून गेली तर बरं होइल. मला उगाचच " जगण्याने छळले होते... मरण्याने ने सुटका केली " ही कविता आठवली. किती वेळ गेला. कोण जाणे . काही कळत नाहिय्ये. घड्यालाचे काटे साखळीने बांधून ठेवल्यासारखं कोणीतरी रात्र कोणीतरी थांबवुन ठेवली आहे.
वेळ सरकतंच नाहीय्ये. माझे डोळे सताड उघडे आहेत. समोरचा छताचा पांढरा पडदा आता मंदावल्या सारखा वाटतोय. माझी दृष्टी पण आता जायला लागली की काय.
मरण येताना हे असंच येत असावं. एकेक अवयव बंद पडत जात असेल आत्ता मला होतय तसं. हात पाय मान डोळे ओठ गळा सगळं बंद एकामागोमाग एक. किल्ली संपल्यासारखं.
क्षिप्रा बेटा... कुठे आहेस तू? तुझा बाबा चालला. दूरच्या प्रवासाला. परत न येण्यासाठी.
दार वाजले. कोण असेल हे? डॉक्टर की मग सलाईन बदलणणारी नर्स? लख्ख प्रकाश आला. मला पुन्हा छत दिसायला लागलं. एका थोराड मुलाचा चेहेरा दिसतोय. तो बहुतेक माझा पलंग हलवतोय.. हिरवा पडदा दिसला.
" एम आर आय स्कॅन साठी घेवुन जायचंय' तो थोराड चेहेरा बोलला.
मला त्याने ट्रॉलीवर ठेवलय. माझ्या डोळ्या समोरचे पांढरे छत मागे पळतय. आता नवे दिवे दिसले. कुठेतरी कॉरीडॉर मधून ट्रॉली चालली आहे. ट्रॉली खाली घेतली. मला कसल्यातरी टेबलावर प्लॅटफॉर्म वर ठेवलय प्लॅटफॉर्म एका पोकळीत गेला. कर्रर्र आवाज झाला. बर्फासारख्या थंड हवे चा एक झोत कपाळावर चेहेर्यावर आला.
थंडीने मी काकडतोय. एक कसलासा तीव्र लाईट डोळ्यासमोरून चमकून जातोय. ती पोकळी हलायची थांबली. मला बाहेर काढले गेले.
त्याच ट्रॉलीवरुन पुन्हा आयसीयू च्या बेडवर झोपवले गेले. माझे डोळे टक्क उघडे. कशावरच फोकस करता येत नाहिय्ये.
रात्र संपली असावी बहुतेक. पण माझ्यासाठी ती संपतच नाहिय्ये. एक नवाच चेहेरा समोर दिसतोय पस्तिशी चाळीशीचा असेल . हातात एक फाईल दिसतेय. तो चेहेरा ती फाईल वाचतोय. माझ्या डोळ्यावर तीव्र प्रकाश पडलाय डोळे दिपलेत.
"ओक्के . कन्फर्मेशन साठी आपण आणखी एक टेस्ट करुया." तोच चेहेरा.
डॉक्टर याना झालंय काय. कंजेनिटल अॅनामोली. जन्मजात दोष आहे त्यांच्या जन्मताना मेंदुतील दोन आर्टरीपैकी एक व्यवस्थित फॉर्म झाली पण ती ब्लॉक झाली आहे आणि दुसरी कधी तयारच झाली नाही. या ब्लॉकेज मुळे मेंदुला धक्का बसलाय. स्टेम स्ट्रोक. स्पायनल कॉर्ड ला जोडणारी स्टेम जी जवळजवळ संपूर्ण शरीराला कंट्रोल करते तीलाच धक्का बसला आहे. टेक्नीकली बोलायचं झालं तर र्हदय व्यवस्थीत चालू आहे पण मेंदु शरीराला काही आदेश देऊ शकेल या अवस्थेत नाही. तुमचे बाबांचा आजार आहे " लॉक्ड इन सिंड्रोम " ते त्यांच्याच शरीराचे कैदी झाले आहेत.
"याला उपाय? "
खरेतर असा जन्मजात दोष असलेली मुले फार जगत नाहीत. तुमचे बाबा एक एक्सेप्शन आहे. आपण पाहुया. मेंदूला थोडासाजरी रक्तपुरवठा होत असेल तर आशा आहे.
त्या साठी आपण एक टेस्ट घेवुया. मी त्याना काही प्रश्न विचारतो. त्यानी उत्तर द्यायचे. डोळ्याची पापणी मिचकावून. जर त्यानी पापणी मिचकावली तर त्याचा अर्थ मेंदुला थोडासा तरी रक्त पुरवठा होतोय. आणि काही ट्रीटमेंट ने पाच सहा महिन्यांनंतर का होईना पॉझीटीव्ह रिस्पोन्स देतील. वर्षभरात जरातरी हालचाली करु लागतील
अरे हा एक चान्स आहे जगाला मी जिवंत आहे हे दाखवुन देण्याचा. आणि हा अखेरचा चान्स आहे.
विचारा डॉक्टर. विचारा.
" बाबा हे डॉक्टर तुम्हाला काहीतरी विचारतील त्याचे उत्तर तुम्ही पापण्या मिचकावुन द्या. द्याल ना बाबा " क्षिप्रा कळवळून सांगत होती.
"देईन हो बेटा. तुझ्यापेक्षा मला त्याची जास्त गरज आहे. माझं जिवंतपण त्यावर ठरणार आहे." माझे शब्द तील कसे कळणार होते देव जाणे.
" बाबा हे डॉक्टर प्रश्न विचारतील उत्तर हो असेल तर पापणी एकदा मिचकवा. उत्तर नाही असेल तर दोनदा मिचकवा. बाबा मी काय बोलते आहे ते ऐकु येतंय तुम्हाला?"
डोळे मिचकवा बाबा.. डोळे मिचकवा." क्षिप्रा अगदी कळवळून म्हणत होती.
मी पापण्या मिचकवायचा प्रयत्न करत होतो. पापणी अजिबात हलत नव्हती.
डोळे मिचकवा बाबा. प्लीज.....
मी प्रयत्न करतोय. काहीच हलत नाही. डोके उचलायचा प्रयत्न करतोय. दगडासारखे झालेय. माझा एकही स्नायू काम करत नाहिय्ये. पापण्यावर कोणीतरी दोन दोन किलोची वजने टांगलेली असावीत. हलत नाहीत अजिबात. उचल पापण्या उचल. उचल पापण्या उचल मी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. काहीच होत नाहिय्ये.
"बाबा प्लीज बाबा...... प्लीज " क्षिप्राच्या आवाजातून जाणवतय ती कधीही कोसळून पडेल. मी प्रयत्न करतोय....
बाबा..... क्षिप्राच्या हात टेबलावर आपटण्याचा आवाज आला.
मिचकवा पापण्या मिचकवा. तुम्हाला आमचा आवाज ऐकू येतोय? डोळे मिचकवा." डॉक्टर म्हणताहेत
माझी पापणी अजिबात उचलली जात नाहिय्ये. संपलं सगळं....
माझी ब्रेन डेथ सिद्ध झाली.... संपली. उचल उचल पापणी उचल. लास्ट चान्स तू जिवंत आहे हे सांगायचा. शेवटची संधी आयुष्य जगण्याची. उचल पापणी उचल. मिचकव. काहीच होत नाहिय्ये. मी हरलो.... संपलं सगळं. माझं शरीर माझ्या विरुद्ध गेलंय. वांसासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णानी नरोपराय..... हे मातीत मिळणार जिवंतपणीच. आपल्याला मुंग्यानी खाताना आपण अनुभवणार. आयुष्यभर ज्यावर प्रेम केलं तो स्वतःचा देह जळताना अनुभवणार.
उचल उचल...पापणी उचल........ आह.....
"ओह... ही इज रीस्पाँडिंग. उठा क्षिप्रा. बघा ते पापणी मिचकवताहेत." डॉक्टर उत्साहाने ओरडत होते.
तुम्ही जिवंत आहात बाबा. तुम्हाला आमच्म बोलणं ऐकू येतय. सगळं. मी क्षिप्रा आहे तुमची म मुलगी.
मी डोळे मिचकवायचा पुन्हा प्रयत्न करतोय. वेळ लागतोय ... उशीर होतोय.... पण मी पुन्हा एकदा पापण्या मिचकावल्या.
नर्स ने खिडकीचा पडदा सरकावला. खोलीत उजेड पसरला. लख्ख सकाळ झाली होती...
चार माहिने उलटले. स्टेम सेल ट्रीटमेंट नी माझ्यात बरीच सुधारणा झाली आहे. क्षिप्रा तिच्या छोटीला घेवुन आली आहे. ती मला धावत येवुन म्हणते." गुड मॉर्निंग आजोबा"
" गुड मॉर्निंग बेटा "
लांबलेली काळ रात्र संपली होती लख्ख सकाळ गुड मॉर्निंग म्हणत उजाडत होती..
प्रतिक्रिया
काटा आला पण भारिये
+१
लक्षवेधी
तिमाशी शंभर टक्के सहमत! सुंदर
आवडलं. असंही घडू शकतं हा
वाह!! खुप सुरेख.
_/\_
शुभ्र
सुरेख
जबरदस्त!
जबरदस्त, सशक्त लिखाण...
काळरात्र
आई ग ! अंगावर काटा आला राव.
आवडली कथा.
सुरेख लिहिलंय!
श्वास रोखुन वाचत राहिले. खूप
जाने क्या बात है, जाने क्या बात है
ठीक वाटली
छान लेखन
भारी!
बाबौ!