✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

x

ज
जव्हेरगंज यांनी
Sun, 10/29/2017 - 14:19  ·  लेख
लेख
सुंदर सुंदर सकाळ झाली. सुंदर सुंदर सुर्य उगवला. काळ्या लाल पिसांचा सुंदर कोबडा भल्या सकाळी सुंदर आरवला. नदी सुंदर दिसत होती. झाडे सुंदर दिसत होती. आभाळही सुंदर दिसत होते. अधूनमधून ढग दिसत होते. तेही तितकेच सुंदर होते. जागोजागी धुके पसरले होते. ते ही तितकेच सुंदर होते. कुठेसा थोडासा हलकासा भुरभुरा पाऊस पडत होता. तो ही तितकाच सुंदर होता. एका सुंदर झाडाखाली म्हसोबाचे एक सुंदर देऊळ होते. त्याच्या पायऱ्यांवरती फुलांचा सुंदर सडा पडला होता. 'ही पण एक सुंदर दुपारंच म्हणायची' काळ्या पाषाणावर झोपलेल्या वैराग्याने हात वर करून कडकडून आळस देत मनाशीच म्हटले. उठून त्याने कमंडलूतल्या अमृतधारांचा आस्वाद घेतला. माथ्यावर शिकडवा करण्यास ओंजळीत जेव्हा त्याने पाणी घेतले, तेव्हा 'ह्या जलधारेचा एकेक कण जगातल्या प्रत्येक अणूरेणूस जगण्यास प्रवृत्त करतो' ही ओळ आपल्या ग्रंथात नमूद करण्याचे मनात साठवले. मग प्रसन्न मुद्रेने तो उजळून निघाला. "आहाहा, काय सुंदर दुपार आहे!" वैरागी आंब्याच्या झाडाकडे बघत म्हणाला. "हो ना. फक्त दुपारंच नाही, ते आंब्याचे झाडसुद्धा किती सुंदर आहे." समोर उभारलेली मंदाकिनी म्हणाली. तिचा आवाज खूप सुंदर होता. पांढऱ्या सुंदर मोगऱ्याचा गजरा तिने आपल्या केसात माळला होता. तिचे मधाळ लाघवी ओठ अगदी लालचुटूक दिसत होते. स्वर्गातून अप्सरा अवतरावी इतकी ती सुंदर होती. "फक्त झाडंच नाही, ते आंबेसुद्धा किती सुंदर आहेत" वैरागी गर्द झाडीत दडलेल्या लाल कोवळ्या कैऱ्या निरखत म्हणला. "हे आंबे आणि झाडेच बघायची आहेत तर?" मंदाकिनीने एक विनंतीवजा आर्जवी सवाल केला. "आईसाहेबांची नजर चुकवून आम्ही इथवर आलो आहोत. याचसाठी सांगावा धाडला होतात वाटतं." तिच्या श्वेत वर्णावर आता एक लालसर छटा उमटली. 'नव्हे नव्हे. तसे नव्हे. मंदाकिने, चिडू नकोस. चिडली की तू अजूनच गोजिरी दिसतेस." वैरागी झाडाच्या खोडावरून हात फिरवत म्हणाला. "या रम्य दुपारी एक नितांतसुंदर गोष्ट जी या ह्रदयात आहे. तिच तुला अर्पण करायची आहे." खोडाची साड खरवडून काढत तो म्हणाला. "बोल वैराग्या, दिलखुलास बोल. तुझ्या ह्रदयातली गोष्ट ऐकण्यास मी आतुर आहे" मंदाकिनीची लालसर छटा आता गुलाबी होऊ लागली होती. "हे मंदाकिने, फुलांचा सडा जिथे पडतो, ते म्हसोबाचं देऊळ आहे साक्षीला. माझ्या कुटीत आजन्म राहण्याचा पवित्रा घेशील काय. तुला सुखात ठेवण्याचे वचन देतो मी. माझ्याशी गाठ बांधशील का?" सुंदर सुंदर दुपारी सुंदर सुंदर आमराईत वैरागी सुंदर सुंदर हसला. कबूतरांचा एक थवा आकाशात चहूकडे पसरला. "हे, वैराग्या. तू खूप चांगला आहेस. पण माझ्या मनात अगोदरच कोणीतरी भरले आहे." आमराईत विंचू असतात. सापही असतात. निसरड्या जागेवरून कोणीही घसरून पडू शकेल अशी शेवाळे असतात. झालंच तर भटकी कुत्री आणि लांडगेही असतात. "मला माफ कर" आर्त स्वरात ती म्हणाली. वैराग्याने बाभळीच्या झाडाकडे बघितले. नजर जाईल तिकडे काटेच काटे. शेतीला गांडूळखत महत्त्वाचे. तसंही आता तुरीला भाव नाही. "I am sorry, please" मंदी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. "अच्छा. ओह. वा वा. बरं झालं सांगितलं. मी आपला उगच कायतरी इचारत होतो." विऱ्या आपली धोपटी खांद्यावर घेत कसनुसं हसला. सदा न्हाव्याची चाळीस रुपयाची उधारी बाकी आहे. ती आधी चुकवायला हवी. "जाते रे. वाईट वाटून घेऊ नकोस. आई वाट बघत असेल. भेटू उद्या कॉलेजवर. " हातात केमिस्ट्रीच्या वह्या घेऊन अखेर त्या बाभळीच्या झाडाखालून मंदी निघाली. "आणि आपण अजूनही दोस्त आहोत हे विसरू नकोस" मध्येच थांबून ती म्हणाली. उन वखवख करत होतं. दिवस भणाणून आला होता. सुर्य पिसाळला होता. जमीनीला भेगा पडल्या होत्या. कावळे काव काव करत होते. माळावरचा बोडका म्हसोबा आता सुस्तावला होता. धूळदान झाली होती. झाडपाला करपला होता. पंक्चर झालेल्या सायकलला इऱ्या पंप मारत होता. "काय म्हणली रं?" बबन्या म्हणाला. "कुटं काय. केमिस्ट्रीच्या वह्या मागत हुती." इऱ्यानं थुका लावून वाल गेलाय का बघितलं. "तुझ्याकडंच कश्या मागती रं वह्या?" इऱ्यानं पुढच्या चाकातली हवा चेक केली. ओके होती. "धोंड्याबर दिसली ब्वॉ मला .जोरात चाललंय त्यांच." बबन्या माव्याची पिचकारी मारत म्हणाला. दोन रुपये सुट्टे काढून इऱ्यानं त्याला दिले. आपल्यालापण आसंच दूकान टाकायचंय पंक्चरचं. चांगला धंदा हुतू. यीळाकाठी दहा सायकली जरी आल्या तरी घराबाराचं भागंल. इचार करत इऱ्यानं सायकलवर टांग टाकली. गटारे तुडुंब भरून वाहत होती. जागोजागी घाणीचे साम्राज्य. डुकरे अस्ताव्यस्त लोळत होती. ड्रेनेजच्या उघड्या भोकात एक कुत्रं अडकलं होतं. दिवेलागणीचा भयाण अंधार चोहीकडे माजला होता. एका टपरीवर इऱ्यानं भुर्जीपाव खाल्ला. दोन कच्च्या मिरच्या खाऊन त्यानं तोंडाची आग केली. 'मादरच्योद. आजचा दिवस किती मादरच्योद आहे' मगातलं मचूळ पाणी तोंडात ओतत त्यानं ती आग शांत करायचा प्रयत्न केला. पण ती अजूनच भडकली. "खाते पे लिख देना बे" तो थोडा गुर्मीतंच आला. "परसोका पच्चीस है. और ये दस. पैतीस हुवा जी" भुर्जीवाल्याने हिसाब मांडला. "तो क्या देगा नै क्या मै? साले रांड की औलाद." "अरे वैरीभाय. भडकते कायको. आपकाईच गाडा है. आपसे पयसा लेके मरनेका हमको." भुर्जीवाल्याने शेपूट घालून घातले. "धंदा करो ठिकसे. नही तो जला डालूंगा ये सबकुछ." बुलेटची किक मारत वैरीभाय म्हणाला. रस्ता अफूची गोळी घेतलेल्या रांडेसारखा निपचित पडून होता. वैरीभायची बुलेट जागोजागी उभ्या असलेल्या छमियांच्या छातीत घुसून धडधड करत असे. हिजडे कधी त्याच्या वाटेला गेले नाहीत. तस्करी करून आणलेल्या मद्यासारखी ही रात्रसुद्धा बेवडी होऊन गेली होती. "r u angry on me?" सोन्याचं कव्हर घातलेला नोकिया ११०० वैरीभायनं बाहेर काढला तेव्हा हा एसेमेस झळकत होता. अचानक अख्खी मुंबई भारनियमात गेल्यासारखी शांतता पसरली. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. त्याने खिडक्यांची तावदाने लावली आणि मोबाईलमधला तो एसेमेस वाचत बिछान्यावर लवंडला. 'please reply to me.' असा अजून एक एसएमेस आला. आणि तो मनोमन सुखावला. त्याने कपाट उघडले. आतल्या लॉकरमध्ये लपवलेला गुलाबी बॉक्स बाहेर काढला. त्यातल्या कागदांवर त्याने स्वतः काढलेला वेगवेगळ्या रंगातला, वेगवेगळ्या भाषेतला, वेगवेगळ्या डिझाईनचा 'मंदाकिनी' हा फॉन्ट. तो बघतच राहिला. मग फोनच वाजला. नकोच उचलायला असे म्हणून त्याने शेवटी तो उचललाच. "काय प्रॉब्लेम आहे.? एकही फोन नाही केलास.? "नाही असं काही नाही." "वीर. मी काही चूक केलीय का?" "नाही नाही. असंही काही नाही." "तू नेहमीसारखं बोलत नाही माझ्याशी. काय प्रॉब्लेम काय आहे.?" "नाही. खरंच तसं काही नाही." "तू माझा अजूनही मित्र आहेस लक्षात ठेव. आहेस ना?" "येस.." "मग असं तुटक तुटक का बोलतोयस?" "बस... असंच.." "अरे तो रॉकी खूप चांगला मुलगा आहे. टू बीएचके फ्लॅट आहे त्याचा मुंबईत. मला तोच आवडतो रे. काय करू मी." "आय नो. प्लीज. डोन्ट वरी. आय एम फाईन.." "वी वील बी ए गुड फ्रेंड्स. फॉरेवर.." "नो. वी वील नॉट.." फोन कट करून त्याने छताकडे पाहिले. त्याला उगाचच रिकामं रिकामं वाटत गेलं. विनाकारण त्याने थोडा एसीही वाढवला. लॅपटॉप बंद करून शेवटी तो विचार करत करत झोपी गेला. रात्री झोपेतल्या गडद अंधारात त्याने नकळतपणे एक फूली मारली. 'x' विथ ब्लॅक बॅकग्राऊंड. आर्द्रता 75℅ पर्यंत वाढली होती. टेंम्परेचर साधारण 10℃ असावे. प्रिसिपीटेशन 85℅ च्याही पुढे गेले होते. व्हिजिबिलीटी 500m एवढी तटपुंजी होती. इन शॉर्ट ती एक सुंदर सकाळ होती. मऊ मखमली बिछान्यावर पसरलेल्या विराजने हात वर करून कडकडून आळस दिला. "ग्रीन टी प्लीज." समोरच्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आलेल्या अनेक पेयांमधून त्याला केवळ ग्रीन टीच देण्यात आला. बाथटबमध्ये सुमारे तासभर घालवल्यानंतर तो तयार झाला. सूट आणि टाय घातल्यानंतर सहजच त्याने आपला आयपॅड चापचला. 57 missed calls from Mandakini. एक तुच्छ कटाक्ष टाकून तो लिफ्टमध्ये शिरला. मग त्याच्या फेसबुक मेसेंजरवर एक मेसेज आला. "अरे तो रॉकी खूप नालायक निघाला. आय डोन्ट लाइक हीम. हाऊ कॅन आय डू धीस टू यू. बीग मिस्टेक फ्रॉम मी." मेहतांची ८५ कोटींची डील फायनल झालीच पाहिजे. बिजनेस टायकूनचा पुरस्कार यावर्षीही आपलाच. "Fuck you" असा रिप्लाय करून त्याने तळमजल्याचे बटन दाबले. शिवाय फॉर्म्युला वनमध्येपण गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. ग्रोजरला चिरडला पाहिजे. "Fuck you too" क्षणार्धात त्याला अजून एक मेसेज आला. एव्हाना तो लिफ्टमधून बाहेर पडला होता. मेसेज वाचून तो बेरकी हसला. काहितरी आठवल्यासारखे त्याने आजूबाजूला पाहिले. हाऊ ब्यूटीफूल डे इज धीस! हिल स्टेशनवरचा आल्हाददायक गारवा. दाट धुक्यात हरवलेला. नागमोडी वळणांचा. इथली झाडेसुद्धा लाजरी. "Now we can be friends forever.." असा रिप्लाय करून पुढच्या महिन्यात येणारे प्रायव्हेट जेट पांढरे की निळे यावर त्याने एक मिटींग घ्यायचे ठरवले. अँड हाऊ ब्यूटीफूल सन इज धीस! वाळवंटे तप्त करणारा. घामाच्या धारांनी चिंब करणारा. शेवटी, अंटार्क्टिकाला गेल्याशिवाय याची किंमत कळणार नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
13578 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

भन्नाट.

प्रचेतस
Sun, 10/29/2017 - 15:02 नवीन
भन्नाट. जबरदस्त कन्सेप्ट. मान गये.
  • Log in or register to post comments

वल्ल्या मला समजावून सांग ना

अभ्या..
Sun, 10/29/2017 - 15:50 नवीन
वल्ल्या मला समजावून सांग ना प्लीज. थ्रीडी मॅक्समधील फाईल पाहिल्यासारखं वाटलं रे. एका प्रतलात काही नाहीच. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

Inception

कपिलमुनी
Sun, 10/29/2017 - 16:26 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मधलाय तो खरा, पहिलं आणि

प्रचेतस
Mon, 10/30/2017 - 18:03 नवीन
मधलाय तो खरा, पहिलं आणि तिसरे ही त्याला दिसलेली दृश्य किंवा स्वप्नं किंवा त्याची मनोराज्ये म्हणूयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जबरदस्त!

एस
Sun, 10/29/2017 - 20:14 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

चला नोकिया ११०० एवढंच समजलं

कंजूस
Sun, 10/29/2017 - 20:45 नवीन
चला नोकिया ११०० एवढंच समजलं
  • Log in or register to post comments

त्रिमिती

चष्मेबद्दूर
Sun, 10/29/2017 - 22:01 नवीन
भन्नाट झालीये गोष्ट. एकदम 3 डायमेन्शनल.
  • Log in or register to post comments

एका वस्त्राला तीन पदर. ..

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/29/2017 - 22:40 नवीन
एका वस्त्राला तीन पदर. ..
  • Log in or register to post comments

तीन कुठे दोनच..

जव्हेरगंज
Sun, 10/29/2017 - 22:47 नवीन
धोंड्याचा पुढे रॉकी झाला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

इऱ्या कोन व मंग?

चांदणे संदीप
Mon, 10/30/2017 - 12:40 नवीन
इऱ्या कोन व मंग? कैच कळंना.... Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

इऱ्या आपल्या स्टोरीचा नायक...

जव्हेरगंज
Mon, 10/30/2017 - 14:02 नवीन
इऱ्या आपल्या स्टोरीचा नायक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

जबरा

चाणक्य
Sun, 10/29/2017 - 23:04 नवीन
खास जव्हेरगंज टच
  • Log in or register to post comments

गद्य ग्रेस

अत्रन्गि पाउस
Mon, 10/30/2017 - 12:23 नवीन
गद्य ग्रेस म्हणावे तुम्हाला ... काहीतरी जबरा जाणवत पण शब्दात सांगता येत नाही ... तुम्हीच जरा उलगडून सांगितल तर ह्याचा आस्वाद अजून चांगला घेता येईल
  • Log in or register to post comments

गद्य ग्रेस म्हणावे तुम्हाला .

राजाभाउ
गुरुवार, 11/02/2017 - 10:30 नवीन
गद्य ग्रेस म्हणावे तुम्हाला ... काहीतरी जबरा जाणवत पण शब्दात सांगता येत नाही ...
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

| जव्हेरगंज जी ...

विशुमित
Mon, 10/30/2017 - 16:11 नवीन
इऱ्यानं थुका लावून वाल गेलाय का बघितलं.>> ==>> तोंडाने ऑइलयुक्त मातकट चव चाखल्यासारखे वाटले. तुमच्या अशा डिटेलिंगचा मी जबरा फ्यान आहे.
  • Log in or register to post comments

ह्यॅ !! ह्ये सम्दं डोक्यावनं

किसन शिंदे
Mon, 10/30/2017 - 17:11 नवीन
ह्यॅ !! ह्ये सम्दं डोक्यावनं ग्येलं, कायबी समजलं नाय.
  • Log in or register to post comments

बब्बो....कित्ती म्हणजे कित्ती

टवाळ कार्टा
Mon, 10/30/2017 - 17:46 नवीन
बब्बो....कित्ती म्हणजे कित्ती बाण मारायचे....दंडवत
  • Log in or register to post comments

भन्नाटच...

वेल्हाळ
Mon, 10/30/2017 - 17:58 नवीन
"प्रेमभंग्यां"ची वैश्विक कहाणी वेगवेगळ्या समाज स्तरांवर मांडली आहे . खूपच छान
  • Log in or register to post comments

करेक्ट! ब्राह्मण मग दलित मग

एमी
Wed, 11/01/2017 - 11:12 नवीन
करेक्ट! ब्राह्मण मग दलित मग मराठा मग वैश्य... त्यातला एकच खरा आहे आणि बाकीच्या त्याच्याच फॅन्टसी आहेत हे मात्र माझ्या लक्षात आले नव्हते.... काही सुंदर सुंदर वाक्य मात्र द्वयर्थी वाटली :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्हाळ

दरवेळेला कौतुक करायला उपमा

पुंबा
Mon, 10/30/2017 - 18:36 नवीन
दरवेळेला कौतुक करायला उपमा कुठुन आणायच्या, आम्ही काय तुमच्यासारखे शब्दप्रभू नाहीत. फार फार आवडले.. किती कळले, कळले तेच खरे ह्याच्या पल्याड भावली.
  • Log in or register to post comments

एक नंबर... मस्त जमलेली आहे.

थॉर माणूस
Mon, 10/30/2017 - 23:46 नवीन
एक नंबर... मस्त जमलेली आहे. लेखकाचे नाव वाचल्या वाचल्या लेख उघडण्याची घाई करावीशी वाटते अशा काहींमधे तुम्ही एक आहात.
  • Log in or register to post comments

वर्णन जब्बरदस्त केलंय तुम्ही.

वीणा३
Tue, 10/31/2017 - 01:56 नवीन
वर्णन जब्बरदस्त केलंय तुम्ही. पार पुराणकाळातून, गावातून, एकदम कॉर्पोरेट दुनियेत फिरवून आणलात. कथा बघितली तर साधीच आहे, वैरागी - विऱ्या - वैरीभाई - वीर - विराज ह्या सगळ्यांना मैत्रीण दुसऱ्या कोणासाठीतरी नकार देते. पण वाचतानाचा परिणाम माझ्यासाठी खूप visual होता. व्यक्तिरेखा + आसपासचं वातावरण (काळ ) माझ्यातरी अगदी डोळ्यासमोर उभे राहिले, थोडंसं २D इफेक्ट सारखं.
  • Log in or register to post comments

ह्यांनी रोज लिहीत राहावे

वरुण मोहिते
Tue, 10/31/2017 - 11:01 नवीन
असा काही कायदा करता येईल का? जवहेरगंज साहेब आपण जे नजरेने टिपता ते अचूक उतरते लेखणीतून.. जियो
  • Log in or register to post comments

अनुमोदन

टवाळ कार्टा
Wed, 11/01/2017 - 10:29 नवीन
अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

फॅन झालो राव तुमचा. जबराच

वकील साहेब
Tue, 10/31/2017 - 14:19 नवीन
फॅन झालो राव तुमचा. जबराच
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

पद्मावति
Tue, 10/31/2017 - 14:27 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

निशाचर
Tue, 10/31/2017 - 15:58 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

!

जव्हेरगंज
Tue, 10/31/2017 - 23:56 नवीन
धन्यवाद मंडळी ! body { background: url(http://goldwallpapers.com/uploads/posts/light-abstract-wallpaper/light_abstract_wallpaper_007.jpg); background-size: 1000px; }
  • Log in or register to post comments

भन्नाट.

दीपक११७७
Wed, 11/01/2017 - 10:10 नवीन
भन्नाट.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

diggi12
Sun, 09/08/2024 - 01:17 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा