Skip to main content

तीखी पुरी

लेखक पद्मावति यांनी मंगळवार, 17/10/2017 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Header2 मिपाकरहो, आपल्या सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. दिवाळी म्हणजे घरोघरी फराळ, फटाके आणि पाहुणे या बिग थ्रीचे आगमन झाले असेलच. तर घरी येणार्‍या पाहुण्यांना फराळाबरोबर वाढायला आणि बच्चेकंपनीला येता जाता तोंडात टाकायला एक झटपट पाककृती आपण बघणार आहोत.
साहित्य -
  • कणीक २ वाट्या
  • मीठ,
  • हळद
  • लाल तिखट
  • तीळ
  • किंचित ओवा
  • १ लहान चमचा साखर विरघळलेले पाणी
  • तेल - साधारण अर्धी वाटी किंवा किंचित कमी
कृती - कणकेत मीठ, हळद, लाल तिखट, तीळ, ओवा आणि तेल घालून कणीक नीट मिक्स करावी. मिक्स केलेले पीठ जरासे भरड दिसू लागेल इतपत तेल टाकावे.मग साखरेचे पाणी घालावे. मग साधे पाणी टाकून सगळे एकत्र करून छान मळून काढावे.
या पिठाच्या अगदी पातळ पुर्‍या लाटून घ्याव्या. लाटलेल्या पुर्‍या थोडा वेळ तशाच राहू द्याव्या. लगेच तळू नयेत.
लाटल्यानंतर एक दहा-पंधरा मिनिटांनी त्या पुर्‍या तेलात मंद आचेवर तळून घ्याव्यात. पुर्‍या फुलता कामा नये.
थंड झाल्या की डब्यात भरून ठेवाव्यात.

अगदी दहा- बारा दिवसही पुर्‍यांना काहीही होत नाही. छान राहतात. साखरेच्या पाण्यामुळे पुर्‍या क्रिस्पी होतात. टेक्श्चरही छान येते. गुजराती घरांमध्ये तर हा पदार्थ दिवाळीत हमखास बनवला जातो.
दिवाळीतच नाही, तर इतर वेळीही या पुर्‍या कधीही करून ठेवण्यासारख्या आहेत. चहाच्या वेळी खायला आणि प्रवासाला नेण्यासाठी उत्तम. दिवाळीच्या गोडाधोडाच्या जेवणावर उतारा म्हणून आणि दगदगीचा श्रमपरिहार म्हणूनसुद्धा या पुर्‍या आयत्या वेळी मस्त कामाला येतात. कुठलीही चटकन होणारी रस्साभाजी किंवा घट्ट दाल फ्राय बनवा आणि त्याबरोबर या खुसखुशीत पुर्‍यांचा आस्वाद घ्या.

Footer

वाचने 12563
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

झकास! मस्त दिसत आहेत पुर्‍या. करुन बघाव्याच लागणार.. पमीचान सुगरणपण आहे हे माहीतच नव्हतं ;) भटकंती, लेख, कविता, अभिवाचन.. आता पाकृपण! ग्रेटच!

फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं. किचन मधली स्वच्छता पाहून भारावलो.

तोंपासु............!! मस्त आहेत. मला स्वतःला मात्र कडक पुर्‍यांपेक्षा थोड्या नरम पुर्‍याच आवडतात. दुपारच्या चहाबरोबर रोल करून खातांना तर त्यांची चवच भारी.. चहाची चव घेण्यापेक्षा त्यावेळेस पुर्‍यांची चव प्रायॉरिटीवर असते! :-)

धन्यवाद राघव. मऊ पुर्‍या हव्या असतील तर यात साखरेचे पाणी हा घटक फक्त वगळावा. बाकी कृती तीच. आणि हो, ओवा पण टाकु शकता मऊ किंवा या कडक पुर्‍यांमधे सुद्धा. अशा मऊ पुर्या सुद्धा मस्तं टिकतात.

गजोधर आणि रायनची आई- अनुक्रमे रवा किंवा बेसन टाकले तरी हरकत नसावी. मी करून पाहयले नाही तसे. पण चांगलेच लागेल. ही पाककृती तशी फ्लेक्सिबल आहे.

In reply to by पद्मावति

नै नै चवीसाठी नाही विचारलं .... समजा साखर वापरायची नसेल तर रवा टाकून अपेक्षित कडकपणा आला असता का पुरीला ??

माझे लहानपण गुजरात मध्ये गेले. तेथे हा पदार्थ आमच्या मराठी घरी खाऱ्या पुऱ्या या नावाने बरेच वेळा बनवला जात असे.

माझ्या वडिलांचे बालपण गुजराथ मध्ये गेले त्यामुळे आमच्या घरातही गुजराथी पदार्थांचे प्राबल्य होते. खार्‍या पुर्‍या हा त्या पैकीच एक माझा आवडता पदार्थ. माझ्या लहानपणी अनेकदा व्हायचा. विशेषतः शाळेच्या सहलीच्या वेळी ह्या पुर्‍या आणि बटाट्याची पिवळी भाजी हा ठरावीक मेन्यू असायचा. पद्मावतीचीही ही पाककृती करून पाहीनच. पण मलाही साखर वर्ज्य आहे आणि मीही मऊ पुर्‍यांचा भोक्ता आहे.

एका रुचकर पदार्थाची तपशीलवार पाककृती आवडली. फोटो पाहून लगेच या पुर्‍यांचा आस्वाद घ्यायची इच्छा झाली.

In reply to by सस्नेह

नाही 'मठरी' वेगळी. ती मैद्यापासून बनवितात. मैद्याच्या पावपट घी किंवा तेल, ओवा, जीरं, मीठ वगैरे घालून पीठ घट्टसर मळायचं आणि जरा जाडसर लाटून काट्याने (चमचा-काटा मधला काटा) त्याला भोकं पाडून (फुगू नये म्हणून) मंद आंचेवर तळायचं. ही बिस्कीटा सारखी खुसखुशीत होतात. मधल्या वेळेस चहा बरोबर छान लागतात.