मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप्पाचा नैवेद्यः खजूर शेंगदाणा लाडू

पैसा · · पाककृती
गणपतीबाप्पाचा नैवेद्य म्हणजे विविध प्रकारचे लाडू आलेच. गणेश चतुर्थीला उपास करणारी मंडळी भरपूर आहेत. त्या सर्वांना चालेल असे लाडू म्हणजे खजुराचे लाडू. मी खजूर आणि शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू केले. मात्र शेंगदाण्याऐवजी तुम्ही सुका मेवा, बदाम, काजूगर या गोष्टी वापरूनही असेच लाडू तयार करू शकता. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तसेच पांढरी साखर न वापरता खजूर वापरल्याने शरीराला काही प्रमाणात लोह मिळते. हे लाडू इतरही उपासाला चालतात. पाहूया तर कृती साहित्यः अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट १२ ते १५ बिया काढलेले खजूर थोडेसे तूप कृती: शेंगदाणे भाजून त्याचे जाडसर कूट करून घ्यावे. खजूर मऊ असेल तर बिया काढून हाताने कुस्करावा. फार मऊ नसेल तर तुकडे करून मिक्सरमधून भरड वाटून घ्यावे आणि कढईत किंचित परतून घ्यावे. आवश्यकतेप्रमाणे तूप घालून (अर्धा एक चमचा पुरते, किंवा अजिबात घातले नाही तरी चालते.) सगळे नीट एकत्र करून छोटे लाडू वळावेत. या प्रमाणात ७/८ लाडू होतात. करा तर सुरुवात! 1 गणपतीबाप्पा मोरया!

वाचने 18090 वाचनखूण प्रतिक्रिया 37

एस Fri, 08/25/2017 - 06:29
वा. छान लाडू आहेत. साखरेऐवजी खजूर वापरण्याची कल्पना चांगली आहे. खजुरात कधीकधी किंचित माती किंवा खडे वगैरे निघतात. ते कसे साफ करतात?

In reply to by एस

पैसा Fri, 08/25/2017 - 14:06
मी lion चा खजूर वापरते. तो साफ असतो. पण बिया सुट्या करताना काडीकचरा काढता येईल. किंवा हलक्या हाताने थोड्या पाण्यात धुवून मऊ कपड्याने टिपून घ्यायचे.

सविता००१ Fri, 08/25/2017 - 13:30
मस्तच. अजून एक अ‍ॅडिशन केली तर चालेल का पैसाताई इथेच? हेच लाडू दाण्याच्या कुटाऐवजी तू म्हणतेस तसं सुकामेवा घालून बनवायचे आणि किंचित नेसकॅफे किंवा ब्रू कॉफीत घोळवायचे. खूप नाही वापरायची कॉफी.नाहीतर कडसर होतील.पण याने या लाडूंना अजून भारी चव येते.

कंजूस Fri, 08/25/2017 - 13:54
सोपे आणि छान! शेंगदाणे नसले तर सुकामेवा घातलेले मी चालवून घेतो. (सुकामेवा गोड केलेला असण्यापेक्षा खारा चांगला लागतो.)

इरसाल Sat, 08/26/2017 - 11:22
आज्जे, आम्ही हे बनवलेले लाडु खोबर्‍याच्या किसात घोळवुन घेतो मस्त दिसतात पण आणी लागतात पण, ;)

अनन्न्या Sat, 08/26/2017 - 15:55
मी काजू आणि बदाम पदर घालून रोल केलेत यावेळी! साखरेला उत्तम पर्याय!!

गम्मत-जम्मत Mon, 08/28/2017 - 10:09
परवा करून पाहीले. उत्तम होतात. मी बदाम, काजू, शेंगदाणे .मावे मध्ये खरपूस भाजून घेतले. खजूर (Seedless) हि थोडे गरम करून घेतले. आणि थोडी वेलची पूड, जायफळ पण किसून घातलं. भाजलेल्या बदामाचा घमघमाट येत होता.

जुइ गुरुवार, 09/07/2017 - 12:25
अतिशय सोपे लाडू !! एरव्ही करायला झटपट आणि सोपे!