Skip to main content

बाप्पाचा नैवेद्यः खजूर शेंगदाणा लाडू

लेखक पैसा यांनी शुक्रवार, 25/08/2017 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीबाप्पाचा नैवेद्य म्हणजे विविध प्रकारचे लाडू आलेच. गणेश चतुर्थीला उपास करणारी मंडळी भरपूर आहेत. त्या सर्वांना चालेल असे लाडू म्हणजे खजुराचे लाडू. मी खजूर आणि शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू केले. मात्र शेंगदाण्याऐवजी तुम्ही सुका मेवा, बदाम, काजूगर या गोष्टी वापरूनही असेच लाडू तयार करू शकता. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तसेच पांढरी साखर न वापरता खजूर वापरल्याने शरीराला काही प्रमाणात लोह मिळते. हे लाडू इतरही उपासाला चालतात. पाहूया तर कृती साहित्यः अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट १२ ते १५ बिया काढलेले खजूर थोडेसे तूप कृती: शेंगदाणे भाजून त्याचे जाडसर कूट करून घ्यावे. खजूर मऊ असेल तर बिया काढून हाताने कुस्करावा. फार मऊ नसेल तर तुकडे करून मिक्सरमधून भरड वाटून घ्यावे आणि कढईत किंचित परतून घ्यावे. आवश्यकतेप्रमाणे तूप घालून (अर्धा एक चमचा पुरते, किंवा अजिबात घातले नाही तरी चालते.) सगळे नीट एकत्र करून छोटे लाडू वळावेत. या प्रमाणात ७/८ लाडू होतात. करा तर सुरुवात! 1 गणपतीबाप्पा मोरया!

वाचने 18121
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

आई ने सेम लाडु केलेयत. दाण्याचा कुट लावल्याने भावाने टेस्ट सुध्दा नाहि केले पण मि संपवणार आहे.

वा. छान लाडू आहेत. साखरेऐवजी खजूर वापरण्याची कल्पना चांगली आहे. खजुरात कधीकधी किंचित माती किंवा खडे वगैरे निघतात. ते कसे साफ करतात?

In reply to by एस

मी lion चा खजूर वापरते. तो साफ असतो. पण बिया सुट्या करताना काडीकचरा काढता येईल. किंवा हलक्या हाताने थोड्या पाण्यात धुवून मऊ कपड्याने टिपून घ्यायचे.

मस्तच. अजून एक अ‍ॅडिशन केली तर चालेल का पैसाताई इथेच? हेच लाडू दाण्याच्या कुटाऐवजी तू म्हणतेस तसं सुकामेवा घालून बनवायचे आणि किंचित नेसकॅफे किंवा ब्रू कॉफीत घोळवायचे. खूप नाही वापरायची कॉफी.नाहीतर कडसर होतील.पण याने या लाडूंना अजून भारी चव येते.

In reply to by सविता००१

किंवा मेल्टेड चॉकलेट मध्ये बुडवून मग रोस्टेड बदामाच्या चुर्‍यात घोळवून थोडा वेळ फ्रीझ करायचे.

सोपे आणि छान! शेंगदाणे नसले तर सुकामेवा घातलेले मी चालवून घेतो. (सुकामेवा गोड केलेला असण्यापेक्षा खारा चांगला लागतो.)

हेच मिश्रण जर मोदकाच्या साच्यात घातले, तर मोदक बनेल. फक्त खजूर थोडा वाफवून घ्यायला लागेल म्हणजे मऊ होईल.

मस्त ! पुढच्या वेळी काजूचे लाडू पहायला मिळु दे ही गणराया चरणी प्रार्थना ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आला रे... आला रे गणेशा... :- Daddy

आज्जे, आम्ही हे बनवलेले लाडु खोबर्‍याच्या किसात घोळवुन घेतो मस्त दिसतात पण आणी लागतात पण, ;)

मी काजू आणि बदाम पदर घालून रोल केलेत यावेळी! साखरेला उत्तम पर्याय!!

परवा करून पाहीले. उत्तम होतात. मी बदाम, काजू, शेंगदाणे .मावे मध्ये खरपूस भाजून घेतले. खजूर (Seedless) हि थोडे गरम करून घेतले. आणि थोडी वेलची पूड, जायफळ पण किसून घातलं. भाजलेल्या बदामाचा घमघमाट येत होता.

हे तर भूक लाडू. बाप्पाला प्रवासाला जाण्यासाठी द्यायला हवेत. खूप सुंदर चवीचे असणार आणि पौष्टिकही !

काल करुन पाहिले. अजून एक अ‍ॅडीशन म्हणजे चवीला थोडा गुळ घातला. लाडु अत्यंत रुचकर झाले आहेत. पैजारबुवा,