✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लेडी-ओरियेंटेड चित्रपट

प
पिशी अबोली यांनी
Sun, 07/23/2017 - 21:44  ·  लेख
लेख
सेन्सॉर बोर्ड जेव्हा एखाद्या चित्रपटाची जातीने जबाबदारी घेऊन प्रसिद्धी करतं, तेव्हा एरवी कुठेतरी फेस्टिवल्समध्ये वगैरे अडकून पडू शकला असता असा चित्रपटही जवळच्या थियेटरला लागला का, हे आवर्जून बघितलं जातं. तसा तो बघितला, आणि ‘फिलिंग फास्ट’ असल्याने लगेच तिकीट घेऊन टाकलं. तरीही चित्रपटगृहात एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं.. पूर्ण भरलेल्या चित्रपटगृहात ‘ए’ रेटिंगवाला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ बघण्याचं धाडस केलं, तर आता लिहिण्याचंही करूनच टाकावं म्हणते. एका वाक्यात कथा सांगायची, तर चार स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यातून आलेलं आत्मभान हा या चित्रपटाचा विषय. आयुष्याच्या छोट्या छोट्या आनंदांना मुकलेल्या स्त्रियांना त्यांना झेपेल एवढीच बंडखोरी करताना जी धाप लागते, त्याचं स्त्री-मुक्तीचा, नीतीमत्तेचा किंवा इतर कसलाही आव न आणता केलेलं हे चित्रण आहे. ही बंडखोरी त्या इतक्या जीव ओतून करतात, की त्यामुळे त्यातील सर्व दुहेरी अर्थाचे संवाद, रेटिंग सार्थ ठरवणारी दृश्यं, समाजाच्या दृष्टीने चुकीचं ठरणारं वागणं, या सगळ्यांसकट हे चित्रण अतिशय निरागस(हो, निरागस) ठरतं. तर या चौघींच्या कथांना पार्श्वभूमी देणारी एक कथा, म्हणजे यातील एक पात्र ‘बुवाजी’ चोरून चोरून वाचते ती ‘लिपस्टिकवाले सपने’ ही कादंबरी, आणि त्यातली रोझीची गोष्ट. बुवाजी म्हणजे टिपिकल खडूस आणि मायाळू वाडा-मालकीण. फक्त या लिपस्टिकवाल्या स्वप्नांच्या आवडीची एक वाईट खोड सोडली, तर व्यवस्थित संस्कारी आजी कशी असली पाहिजे, तशी म्हातारी. वाडा पाडू न देणारी, मुलं सांभाळणारी बुवाजी जेव्हा तिला एका प्रसंगाने स्वतःतल्या रोझीचा साक्षात्कार होतो, तेव्हा लपून-छपून मोहरायला लागते. मॉल या शब्दालाही ‘माल’ म्हणणारी बुवाजी एक मोठीच धाडसी गोष्ट घेण्यासाठी मॉलमध्ये जाते, तेव्हाचं एक दृश्य खूपच गोड आहे. एस्केलेटरवर पहिल्यांदाच चढून उभं रहायची तिला सगळ्यांप्रमाणेच भरपूर भीती वाटत असते. तेव्हा एक छोटा शाळेच्या मुलींचा (बहुधा अंध) ग्रुप एकमेकींचा हात पकडून एकेका येणाऱ्या पायरीवर चढत जातो, आणि त्यातील शेवटची मुलगी जो हात पुढे करते, तो हात पकडून त्यांच्याइतक्याच निरागस चेहऱ्याची बुवाजी त्यावर चढते. तिला येणारा सगळा नवीन अनुभव जरी फार प्रौढ असला, तरी त्याबद्दलचं तिचं कुतूहल अगदी बालसुलभ आहे, हे खूप सुंदर रंगलेलं आहे. दुसरी रेहाना तर कॉलेजवयीन मुलगी. बुरखे शिवून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि अतिशय कडक घरातल्या मुलीची मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यावर तिथल्या हाय-फाय वातावरणात मिसळून जावं, यासाठीची तीव्र इच्छा तिला बरंच काही करायला भाग पाडते. कोणत्याही घरात आपली कॉलेजमधली मुलगी हे असलं सगळं करते, हे अजिबातच मान्यच होणार नाही असे उद्योग ही मायली सायरसची फॅन करते. घरी येऊन बुरखे शिवायच्या कामात मदत करणारी ही कॉलेजकन्यका त्या बुरख्याचा आणि एकूणच पूर्ण कपड्यांचा कल्पनाशक्तीने चांगलाच वापर करते. कॉलेज वातावरणाची भुरळ पडून वाहवत गेलेल्या मुलीचं काय होईल, याबद्दल सतत भीतीही वाटते आणि वाईटही वाटतं. लीला म्हणजे तर खरीखुरी ‘वाया गेलेली’ मुलगी. बॉयफ्रेंड सोबत पळून जाण्याचे प्लान्स करणारी ही पार्लरवाली कशाची काही पत्रास ठेवत नाही खरी, पण आईच्या आग्रहास्तव दुसऱ्या मुलासोबत अत्यंत अनिच्छेने साखरपुड्याला उभी राहते. आईच्या दृष्टीने अतिशय योग्य असा होणारा नवरा, आणि सगळं ज्याच्यावर उधळून दिलं तो बॉयफ्रेंड या कात्रीत स्वतःला सापडून घेणारी लीला बघताना ‘असंच पाहिजे हिला’ असं पांढरपेशा प्रेक्षकी मनात आलं, तरी ते परतवते यातच काय ते आलं. शेवटी राहते ती शिरीन. सौदीला राहून वर्षातून दोन आठवडे वगैरे येणाऱ्या नवऱ्याच्या हक्क गाजवण्याने तीन मुलं, अनेक अबॉर्शन्स आणि खरंखुरं संसारात अडकलेलं आयुष्य जगणाऱ्या शिरीनला नवऱ्याला नाही म्हणायचं स्वातंत्र्य नाहीये. पण रेहानाप्रमाणे बुरख्याआडचं स्वातंत्र्य तिनेही शोधून काढलंय. तिचा मोकळा श्वास तीही सेल्सगर्लचं दुहेरी आयुष्य जगून घेते. या नोकरीच्या ठिकाणी तिला नवीन संधी चालून येते, तेव्हा तिच्या स्वप्नांना पंख फुटतात. तिच्या बाबतीत खऱ्याखुऱ्या होणाऱ्या मुस्कटदाबीमधून शिरीनचं स्वप्न आहे, ते फक्त जगायचं. या चौघींची स्वप्नं त्यांच्या त्यांच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे आणि वयाप्रमाणे अगदी अति-सामान्य, म्हटलंच तर चावट-वात्रट-चवचाल-उथळ वगैरे आहेत. त्यासाठी जे मार्ग त्या काढतात, ते काही स्पृहणीय म्हणण्याजोगे मुळीच नाहीत. स्पृहणीय एकच आहे, की या स्त्रिया ज्या गोष्टी करतात, त्याचे परिणाम व्हायला लागल्यावर सहजपणे स्वीकारतात. आपल्या स्वप्नांची किंमत मोजावी लागू शकते, याची जाणीव चौघींनाही आहे. संदेश असा म्हणाल, तर हा एकच-जी स्वप्नं बघता त्यांचे परिणामही स्वीकारा. चौकटी मोडल्यावर काही काळाने चौकटी पुन्हा आधीपेक्षा गळा आवळून उरावर बसतीलच, हे माहीत असून या चौघी त्या तात्पुरत्या तोडण्याची मजा चाखून बघतात. चित्रपट पूर्णपणे त्या चौघींचा आहे. समाजाला दांभिक वगैरे ठरवण्याचा अट्टाहास नाही. पण ‘लेडी-ओरीयेंटेड’ स्वप्नं दाखवणारा हा निरागस सामिष चित्रपट उदात्त नाही, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षच करावं असं थोडंच आहे?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
10697 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

मस्त पिशे

इडली डोसा
Sun, 07/23/2017 - 22:20 नवीन
छान ओळख चौकटी मोडल्यावर काही काळाने चौकटी पुन्हा आधीपेक्षा गळा आवळून उरावर बसतीलच, हे माहीत असून या चौघी त्या तात्पुरत्या तोडण्याची मजा चाखून बघतात या ओळी विशेष आवडल्या
  • Log in or register to post comments

खास पिशी-स्टाइल ओळख.

एस
Sun, 07/23/2017 - 22:40 नवीन
खास पिशी-स्टाइल ओळख.
  • Log in or register to post comments

असेच म्हणते.

प्रीत-मोहर
Mon, 07/24/2017 - 11:59 नवीन
असेच म्हणते. शेवटचा पॅरा खूप आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

छान परीक्षण. सिनेमा बघायची

ऋतु हिरवा
Sun, 07/23/2017 - 23:00 नवीन
छान परीक्षण. सिनेमा बघायची इच्छा आहे. बघू कधी जमते
  • Log in or register to post comments

एकदम उठावदार शब्दात मांडलेलं

जेनी...
Mon, 07/24/2017 - 00:08 नवीन
एकदम उठावदार शब्दात मांडलेलं परिक्षण आवडलं ... चित्रपट खुप सार्‍या मैत्रिणी मिळुन ...पहायचा ठरवलाय .. लेट्स सी
  • Log in or register to post comments

चित्रपटाची ओळख आवडली. पहायचाय

रेवती
Mon, 07/24/2017 - 01:11 नवीन
चित्रपटाची ओळख आवडली. पहायचाय पण जालावर आल्यानंतर. चौकटी मोडल्यावर काही काळाने चौकटी पुन्हा आधीपेक्षा गळा आवळून उरावर बसतीलच, सहमत.
  • Log in or register to post comments

छान लिहिलं आहे.

यशोधरा
Mon, 07/24/2017 - 09:23 नवीन
छान लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

चित्रपट बघेन.

अत्रे
Mon, 07/24/2017 - 09:30 नवीन
चित्रपट बघेन. बादवे लेडी-ओरियेंटेड ला मराठीत स्त्री-प्रधान असे म्हणतात.
  • Log in or register to post comments

एवढं मराठी मलाही येत असावं

पिशी अबोली
Mon, 07/24/2017 - 12:58 नवीन
एवढं मराठी मलाही येत असावं कदाचित. :) इथे 'लेडी-ओरियेंटेड' शब्द वापरण्यास काही विशिष्ट कारण आहे. टंकायचा कंटाळा आलाय, गूगल करून बघू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

ओके! आत्ता समजलं https://www

अत्रे
Mon, 07/24/2017 - 13:14 नवीन
ओके! आत्ता समजलं https://www.theguardian.com/film/2017/feb/24/india-film-censors-lipstick-under-my-burkha
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

:)

पिशी अबोली
Mon, 07/24/2017 - 13:16 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

छान लिहिलंयस गं!!

सानझरी
Mon, 07/24/2017 - 13:02 नवीन
छान लिहिलंयस गं!!
  • Log in or register to post comments

पिशे, आवडलं गं! पहायचाय...

मंजूताई
Mon, 07/24/2017 - 13:55 नवीन
पिशे, आवडलं गं! पहायचाय...
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिलंयस. खास पिशी टच.

पद्मावति
Mon, 07/24/2017 - 14:47 नवीन
सुंदर लिहिलंयस. खास पिशी टच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर्वांना. नक्की बघा

पिशी अबोली
Mon, 07/24/2017 - 18:13 नवीन
धन्यवाद सर्वांना. नक्की बघा चित्रपट..
  • Log in or register to post comments

,+१

विचित्रा
Tue, 07/25/2017 - 10:37 नवीन
ओळख आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंस

पैसा
Tue, 07/25/2017 - 14:30 नवीन
मस्त लिहिलंस. सिनेमा बघायचा आहे.
  • Log in or register to post comments

मस्त परीक्षण! लिहिण्यात सहजता

शब्दबम्बाळ
Tue, 07/25/2017 - 20:40 नवीन
मस्त परीक्षण! लिहिण्यात सहजता आहे तुमच्या...
  • Log in or register to post comments

क्लास!

दशानन
Tue, 07/25/2017 - 21:16 नवीन
क्लास!
  • Log in or register to post comments

छान परीक्षण!

सस्नेह
Tue, 07/25/2017 - 21:45 नवीन
छान परीक्षण!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पिशी अबोली
Wed, 07/26/2017 - 11:28 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

परिक्षण फारच आवडले. अशीच

पलाश
Wed, 07/26/2017 - 16:28 नवीन
परिक्षण फारच आवडले. अशीच लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

बघेन

विनिता००२
Wed, 07/26/2017 - 16:31 नवीन
बघेन १८ वर्षाच्या मुलाबरोबर (स्वतःच्या ;) बघता येईल असा आहे का? की एकटीनेच बघावा :)
  • Log in or register to post comments

खरं तर मैत्रिणींसोबत बघावा.

पिशी अबोली
Wed, 07/26/2017 - 17:54 नवीन
खरं तर मैत्रिणींसोबत बघावा. तुमच्या घरात चांगलं मोकळं वातावरण असेल तर बघू शकता त्याच्यासोबत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनिता००२

ओके :)

विनिता००२
गुरुवार, 07/27/2017 - 10:33 नवीन
ओके :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

मस्त लिहिलंय.. चित्रपटाची ओळख

रुपी
गुरुवार, 07/27/2017 - 04:42 नवीन
मस्त लिहिलंय.. चित्रपटाची ओळख आवडली.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय

वरुण मोहिते
गुरुवार, 07/27/2017 - 10:41 नवीन
सिनेमा पाहायचा आहे .
  • Log in or register to post comments

सुंदर परीक्षण! असे चित्रपट

सपे-पुणे-३०
Fri, 07/28/2017 - 08:30 नवीन
सुंदर परीक्षण! असे चित्रपट फार कमी बनवले जातात आणि त्याहून चित्रपट गृहात कमी प्रदर्शित होतात.
  • Log in or register to post comments

धन्यवाद! :)

पिशी अबोली
Fri, 07/28/2017 - 15:49 नवीन
धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलयं

विखि
Mon, 07/31/2017 - 22:42 नवीन
परीक्षण आवडलं...
  • Log in or register to post comments

ओळख आवडली, मलाही बघायचा आहेच,

वीणा३
Wed, 08/02/2017 - 11:58 नवीन
ओळख आवडली, मलाही बघायचा आहेच, पण बहुतेक जालावर आल्यावरच
  • Log in or register to post comments

उत्तम परीक्षण पिशे!आवडले.

इशा१२३
Tue, 08/08/2017 - 12:22 नवीन
उत्तम परीक्षण पिशे!आवडले.
  • Log in or register to post comments

उत्तम परीक्षण पिशे!आवडले.

इशा१२३
Tue, 08/08/2017 - 12:25 नवीन
उत्तम परीक्षण पिशे!आवडले.
  • Log in or register to post comments

https://m.facebook.com/story

एमी
Tue, 08/08/2017 - 20:32 नवीन
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10213670119210251&id=1322657032&refid=28 हे परीक्षण देखील छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

बघेन म्हणतोय

भ ट क्या खे ड वा ला
Wed, 08/09/2017 - 14:34 नवीन
छान परीक्षण. सिनेमा बघायची इच्छा आहे. बघू कधी जमते
  • Log in or register to post comments

अतिशय नेमकं सांगणारा लेख !

चौथा कोनाडा
Wed, 08/09/2017 - 17:18 नवीन
अतिशय नेमकं सांगणारा लेख ! क्लासिक ! शेवटंचं वाक्य तर कळसच ! असे आडवाटेचे चित्रपट पाहण्याची आवड असल्यामुळं कालच्या विकांताला "बुरखा" थिएटरला जाउन आवर्जून पाहिला. आता पर्यंत स्रीची अश्या प्रकारे घुसमट पहिल्यांदाच या सिनेमात पहिली. या सिनेमातल्या चारही कथा बधीर करणार्‍या ! निवडलेलं भोपाळ शहर अन पात्रांचा सामाजिक स्तर अगदी समर्पक ! असा चित्रपट काढणं अन प्रदर्शित करणं हे दिगदर्शक अन इतर सर्वांच मोठं धाडस आहे ! अगदी वाखाणण्या सारखं !
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पिशी अबोली
गुरुवार, 08/10/2017 - 11:15 नवीन
धन्यवाद! ऍमीनी दिलेल्या लिंकमधलं परीक्षणही छान आहे.
  • Log in or register to post comments

ओळख आवडली.

सुबक ठेंगणी
Fri, 10/13/2017 - 13:46 नवीन
माझ्यामते "लिपस्टिकवाले सपने" मधलं शेवटचं वाक्य "खुषीयोंके बंद कमरे की चावी तो रोझी के अंदर ही थी|" हाच चित्रपटाचा संदेश आहे. चौकटी समाज नव्हे तर तुम्हीच स्वतःला घालून घेत असता. त्यामुळे त्या तोडून किंवा वाकवून बाहेर पडायचं की तिथेच झुरत राहायचं हीदेखील सर्वस्वी तुमचीच निवड असते.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा