✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनुस्मृति (भाग १)

श
शरद यांनी
Sun, 07/23/2017 - 06:11  ·  लेख
लेख
मनुस्मृति (भाग १) आपण जेव्हा कोणत्याही धर्मकृत्याच्या संकल्पात " श्रुतीस्मृतीपुराणोक्त फलप्राप्यर्थम् " असे म्हणतो तेव्हा आपणाला फारफार तर पुराण माहीत असते, अगदी बरीच नावे माहीत नसली तरी त्यात जुन्या देवादिकांच्या गोष्टी असतात, त्यात भक्तीचा पुरस्कार केला आहे इतके जुजबी ज्ञान नक्की असते. श्रुती-स्मृती ही काय भानगड आहे ? आज थोडी माहिती मिळवू. वेदसंहिता-ब्राह्मणे-आरण्यके-उपनिषदे या सर्व साहित्याला श्रुती म्हणतात. आपल्या, विशेषत: पंडितांच्या, धार्मिक व्यवहारात, हा अतिम शब्द. हा सगळा प्रकार कितीही श्रेष्ठ असला तरी सामान्य माणसांच्या रोजच्या व्यवहारात त्याला लागते साध्या साध्या नियमांची जंत्री माणसांनी एकमेकांशी, राजाने प्रजेशी आणि प्रजेने राजाशी, व्यापार्‍याने ग्राहकाशी, आई-वडिलांनी मुलांशी आणि त्यांनी आई-वडिलांशी, एका वर्णाने दुसर्‍या वर्णाशी, इत्यदि इत्यादि कसे वागावे याचे नियम असणे समाजाला अत्यंत गरजेचे असते; नव्हे. समाज त्या शिवाय राहूच शकत नाही. हे नियम किंवा कायदे ज्या साहित्यात लिहले आहे ते साहित्य म्हणजे स्मृती. अध्यात्मदर्शनाचा पाया शुद्ध आचार आहे. तो आचार आणि त्याच्या नीतीरुपी, सदाचाररुपी सीमारेषा नियमबद्ध करणे हे स्मृतींचे कार्य. आचार शुद्ध रहावा, कायदे नीट पाळले जावेत म्हणून " प्रायश्र्चित्त " (दंड) आलेच. तर अशा या स्मृती. किती आहेत ? प्रमुख वीस. उदा. अत्री, आपस्तम्ब, पाराशर वगैरे. त्यातील सर्वात प्रमुख व ब्रिटिश शासन कालातही न्यायालयात वापरली जाणारी म्हणजे " मनुस्मृती ". एक अतिशय प्रज्वलनशील ग्रंथ. भाजपाला मनुवादी म्हणून हिणवावयास व केव्हाही रस्त्यावर जाळावयास उपयोगी म्हणून "बहेनजीं"ना फारच आवडणारा. आज आपण.मनुस्मृतीची माहिती घऊं.. मी अशा विषयावर लिहतो तेव्हा सहसा संक्षिप्त स्वरूपात लिहतो. वाचणार्‍याला किती त्रास द्यावयाचा हा साधा हिशेब. पण आज जरा विस्ताराने लिहिन म्हणतो. लेख तीन भागात आहे. पहिल्या दोन भागात ग्रंथाची माहिती व तिसर्‍या भागात याच स्मृतीला प्रखर विरोध कां ? ते पाहू. तर आता सुरवात करू मनुस्मृती लिहणार्‍या मनुपासून. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र्र ही ओळख सोडली तर त्याचा ऐतिहासिक.काळ काही सापडत नाही. तेव्हा जरा वळसा घेवून मनुस्मृतीचा काळ कोणता ते पहिल्यांदी ठरवून मग तो काळ मनूचा असे म्हणावे लागते. इथेही अडचण अशी की आज आपल्यासमोर जी मनुस्मृती आहे ती मनूने लिहलेली नव्हेच. ती आहे एकामागून एक अशी संस्करणे झालेली. पण महाभारतात जर मनूची वचने दिली असतील तर ती त्यावेळी सर्वांना माहीत होती असे म्हणावयाचे. ती बुद्धपूर्व कालातील असणार. द्या सोडून. तेव्हा आज आपल्या समोर असलेल्या मनुस्मृतीकडे वळू. ग्रंथात १२ अध्याय व २६८४ श्लोक आहेत..प्रत्येक अध्यायातील महत्वाचे विचार बघू... आज ज्यांना मोठा विरोध आहे ते दोन मुदे (१) "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" आणि (२) शूद्र. पहिल्याचा आपण याच भागात योग्य ठिकाणी विचार करू व दुसर्‍याकरिता भाग ३ आहेच. (१) अद्याय १ (श्लोक ११९) परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाने धर्मशास्त्र मनूला शिकवले. त्याने ते ऋषींना दिले. निमिषापासून युगापर्यंत कालगणना; कृतयुगात धर्म, त्रेतायुगात ज्ञान; द्वापारयुगत यज्ञ व कलीयुगात दान प्रधान आहेत; ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण; अध्ययन,अध्यापन,यझ‘करणे-कराविणे दान देणे व घेणे ही ब्राह्मणाची सहा कर्मे; प्रजेचे रक्षण दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन व इंदियजय ही क्षत्रियाची प्रधानकर्मे, गोपालन, दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन, व्यापार, शेती ही वैश्याची प्रधानकर्मे तर शिल्पकर्मे (कलानिर्मिती व त्रिवर्णाची सेवा ) ही शूद्रांची कर्मे आहेत. सर्वांनी सदाचारीच असावे. (२) अध्याय २ (श्लोक २४९) ब्रह्मावर्त, ब्रह्मर्षी, मध्य देश यांच्या सीमा; पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत आणि हिमालय-विन्ध्यामधील प्रदेशास आर्यावर्त म्हणतात. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य याचे उपनयन क्रमश: ८ व्या, ११ व्या; १२ व्या वर्षी करावेत. भोजन एकाग्रचित्ताने अन्नाचा सन्मान करून करावे. अतिभोजन करू नये. पतिसेवा हाच स्त्रीसाठी गुरूकुलवास असून उत्तम रीतीने गृहकृत्ये करणे हाच साय़ंप्रातर्होम होय. प्रतिदिनी जो वृद्धांची सेवा करतो विनम्रभावाने नमस्कार करतो त्याचे आयुष्य, विद्या, यश व बल सर्वच वर्धिष्णु होते. मावशी, मामी, आत्या, काकू, सासू या सर्व मातेसमान आहेत. दहा उपाध्यायासमान आचार्य असतो, शंभर आचार्यासमान पिता असतो आणि पित्यापेक्षा मातेची थोरवी सहस्रगुणित असते. ब्राह्मणाने मानसन्मान विषवत् टाळावे व अपमानची अमृतवत् इच्छा करावी, तात्पर्य त्याने निर्द्वंद्व व्हावे. माता-पिता-आचार्य यांचा कधीही अनादर करू नये. हे तीन लोक, तीन आश्रम, तीन वेद आणि तीन अग्नी आहेत. (त्यांच्याप्रमाणे पवित्र आहेत. उत्तम विद्या शूद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म चांडाळाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा. विद्या, धर्म, सुचिता, उत्तम वचन इ.अनेक प्रकारच्या चिद्या ज्यांच्याकडून मिळतील त्यांच्याकडून घ्याव्यात. (३) अध्याय तीन (श्लोक २८६) गुरूकुलात ब्रह्मचर्यव्रताने राहून मग गुरूच्या आज्ञेनेच गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. ब्राह्म, दैव, आर्य, प्राजापत्य, आसूर, गंधर्व, राक्षस आणि पैशाच्य हे विवाहाचे आठ प्रकार आहेत. यापैकी पहिले चार श्रेष्ठ आहेत. ज्ञानवान पित्याने द्रव्याच्या मोहाने आपल्या कन्येला कधीही विकू नये. स्त्रीचा सदैव आदरच केला पाहिजे.जेथे (ज्या कुळात) स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवता रमतात आणि जिथे स्त्रियांचे पूजन होत नाही, तेथे यज्ञादी सर्व क्रीया निरर्थक होतात. ज्या कुलातील स्त्रिया दु:ख करतात, शोक करतात, त्या कुलाचा तात्काळ नाश होतो स्त्रीला सन्मान वा शोभा असेल तरच त्या कुळाला शोभा आहे. देवता, अतिथी, सेवक, माता, पिता, या सर्वांचा गृहस्थाश्रमीने नित्य सन्मान केला पाहिजे. संपूर्ण जीव ज्याप्रमाणे वायूच्या आश्रयाने जगतात, त्याप्रमाणे सर्व आश्रम गृहस्थाश्रमाच्या आश्रयाने जगतात. सर्वांना जेवण दिल्यावरच पति-पत्नीने अन्नग्रहण करावे. (४) अध्याय ४ (श्लोक २६०) सत्य व प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. असत्य पण प्रिय, सत्य पण अप्रिय तेही बोलू नये हाच सनातन धर्मा होय. निष्प्रयोजन वैर किंवा भांडण कधीही करू नये. धर्मवर्जित व धर्माचे अधिष्ठान नसलेल्या अर्थ व काम यांचा संपूर्ण त्याग करावा. नोकर आपली छाया असतात, त्यांच्या मुखातून काही वाईट बोलले गेले तर त्याचा राग करू नये.. कन्या विशेष कृपापात्र असते. विद्वान पुरुषाने सदैव यम-नियमांचे सेवन करावे. तपाचरण करणार्‍याने अहंकार वाढू देऊं नये; यज्ञ करणार्‍याने असत्य बोलू नये; दु:ख असलेल्याने विप्रांची निंदा करू नये; दान देणार्‍याने दानाची वाच्यता करू नये अहंकाराने तपाचा, असत्याने यज्ञाचा, परनिंदेने आयुष्याचा व वाच्यतेने दानाचा नाश होतो. परलोक प्राप्त करतांना माता-पिता, पुत्र, पत्नी कोणीही उपयोगी येत नाही. केवळ एक धर्मच सहाय्यभूत होतो. जीव एकटाच जन्माला येतो व एकटाच मरतो. एकटाच सुकृत-दुष्कृताला भोगतो. उत्तमांचा संग धरावा आणि अधर्माचा संग टाळावा. (५) अध्याय ५ (श्लोक १६९) आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्‍याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही. शंभर अश्चमेध करणार्‍याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते. सन्मार्गाने द्रव्य मिळविणे श्रेष्ठ आहे.विद्वान क्षमेने, नदी वेगाने, शरीर जलाने, मन सत्याने, जीवात्मा विद्या व तपाने, बुद्धी ज्ञानाने व ब्राह्मण त्यागाने शुद्ध होतात. मांस खाण्यात, दारू पिण्यात वा संभोगात पाप नाही परंतु त्यापासून दूर राहण्यात जास्त फायदा होतो. मुलीने, तरुणीने वा वृद्धेने आपल्या घरातही काहीही स्वेच्छेने करू नये. बाल्यावस्थेत पिता, तारुण्यात पति वार्धक्यात मुलगा असे स्त्रीचे तीन आश्रय असतात. म्हणून स्त्रीने स्वतंत्र राहू नये. पिता, भर्ता वा पुत्रापासून अलग झालेल्या स्त्रीची निंदा होते. पतिसेवेतच स्त्रीची सर्व व्रते, उपवास, यज्ञ समाविष्ट आहे. मन, वाणी व देह यांने पतीला दु:ख न देणारी स्त्री उत्तम लोकाला जाते. (२००० वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रीने जर पिता, भर्ता आणि पुत्र यांचा आश्रय सोडून स्वतंत्र रहावायाचे ठरविले तर तिला चरितार्थाचे साधन काय असणार ? संरक्षणाची व्यवस्था कोणती ? अशा स्त्रीची समाज निंदा करणार हे उघडच होते. मनूने इतर ठिकाणी स्त्रीची केलेली स्तुती पहाता त्याच्या मनात स्त्रीबद्दल आदरच होता असे दिसते.पण समाजाचा एक भाग म्हणून विचार केला तर त्या काळी स्वतंत्र स्त्री ही कल्पना अव्यवहार्य होती हे मान्य करावेच लागेल. आज काळ बदलला आहे. आज स्त्रीने स्वतंत्र रहावयाचे ठरविले तर ते शक्य आहे,सुरक्षित आहे की नाही हे अलग, तेव्हा या विधानाबद्दल मनूला किती दोष द्यावयाचा हे प्रत्येकाने वैयक्तिक ठरवावे.) (६) अध्याय ६ (श्लोक ९७) माणसाने गृहस्थाश्रमात नियमपूर्वक व जितेंद्रिय रहावे. वृद्धत्व आल्यावर वानप्रस्थाश्रमाचा आश्रय घ्यावा. शेवटी सन्यास घ्यावा. या अध्यायात प्रत्येक आश्रमात कसे रहावे याचे मार्गदर्शन केले आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व यती हे चार आश्रम गृहस्थाश्रमाधिष्ठित आहेत. धैर्य, क्षमा, दम अस्तेय, सुचिता, इंद्रियनिग्रह, शास्त्रज्ञान, आत्मज्ञान, सत्य, अक्रोध ही दहा धर्मलक्षणे आहेत. यांच्या अनुसरणानेच मोक्षलाभ होतो.
  • मनुस्मृति भाग २
  • मनुस्मृति भाग (३)
  • प्रिय श्री स्वधर्म

Book traversal links for मनुस्मृति (भाग १)

  • मनुस्मृति भाग २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
65056 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

वाचते आहे..

यशोधरा
Sun, 07/23/2017 - 08:20 नवीन
वाचते आहे..
  • Log in or register to post comments

एका जुन्या लेखावर दिलेली माझी

उगा काहितरीच
Sun, 07/23/2017 - 09:36 नवीन
एका जुन्या लेखावर दिलेली माझी ही प्रतिक्रिया आठवली. यात थोडं ॲडवून असं म्हणेल की , बहुतेक सर्वच जुन्या ग्रंथाला ही गोष्ट लागू पडेल.
  • Log in or register to post comments

जाळून टाकले पाहिजेत अशा फालतू

एस
Sun, 07/23/2017 - 11:15 नवीन
जाळून टाकले पाहिजेत अशा फालतू ग्रंथांचे सिलेक्टिव्ह उदात्तीकरण करणारा लेख. अजूनही काही लोकांना मनुस्मृती आणि इतर स्मृतीग्रंथ आदरणीय वाटतात हे पाहून आश्चर्य मुळीच वाटले नाही, परंतु या शोषणव्यवस्थेविरोधात लढा संपलेला नाही आणि त्याला बळच दिले पाहिजे याची अजूनच तीव्रतेने जाणीव झाली.
  • Log in or register to post comments

प्रश्न दोघांनाही

माहितगार
Mon, 07/24/2017 - 14:45 नवीन
मानवतावाद श्रेयस्कर की ग्रंथ प्रामाण्य ? ; विवेकवाद श्रेयस्कर की व्यक्तीवाद ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

पुन्हा वाचून बघा जरा

पैसा
Tue, 07/25/2017 - 09:27 नवीन
मला तरी लेखाचा टोन उदात्तीकरण करायचा वाटला नाही. निव्वळ त्या काळच्या समाजरचनेची माहिती म्हणून अशा ग्रंथांकडे आता आपल्याला बघता यावे. बहुसंख्य संस्कृत वाङ्मय आता कालबाह्य आहे, अगदी लग्नातले मंत्र वगैरेसुद्धा. तरी केवळ माहितीसाठी किंवा मनोरंजक वाचन म्हणून आशा गोष्टींकडे बघता येते. मी मनुस्मृती वाचली नाही किंवा वाचण्याची शक्यता नाही. मात्र एवढे त्याबद्दल लिहिले जाते तर ते नेमके काय प्रकरण आहे याची जर कोणी माहिती देत असेल तर तेवढा वेळ खर्च करणे मला परवडते. अशी माहिती देताना समजा कोणी जुनाट मूल्यांची भलावण करत असेल तरी माझी मते त्याने बदलणार नाहीत त्यामुळे त्याला भिण्याचे मला कारण नाही. मनुस्मृतीला बहुसंख्य लोक विसरले आहेत कारण स्त्री शूद्रांबद्दल त्यात लिहिलेले आज relevant नाही. ती जाळून टाकण्यासाठी तरी ती प्रचलित राहिली पाहिजे असा काहीतरी विचित्र विरोधाभास इथे झाला आहे. कोणे एके काळी मनुस्मृती हा स्मृतीचा भाग होता काळाबरोबर तो विस्मृतीत जाणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मनुस्मृती हा जाळण्याचा किवा

प्रकाश घाटपांडे
Sun, 07/23/2017 - 11:42 नवीन
मनुस्मृती हा जाळण्याचा किवा पुजण्याचा विषय नाही. त्याकाळात लिहिलेले त्यावेळच्या समाजव्यवस्थेच्या अनुषंगाने केलेले काही निति नियम आहेत. आज त्यातला अनेक गोष्टी कालबाह्य आहेत. खर तर मनुस्मृती वरुन राजकारण केले जातय. एक ऐतिहासिक्/पौराणिक ग्रंथसंपदा एवधेच त्याचे महत्व. सोपी माहिती दिल्याबद्दल शरद यांचे आभार
  • Log in or register to post comments

सहमत आहे. तत्कालीन ग्रंथाना

प्रचेतस
Sun, 07/23/2017 - 19:48 नवीन
सहमत आहे. तत्कालीन ग्रंथाना त्याच काळाच्या परिप्रेक्ष्यातून पाहायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

+१

यशोधरा
Sun, 07/23/2017 - 20:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चांगला आणि माहितीपूर्ण लेख

सौन्दर्य
Sun, 07/23/2017 - 19:50 नवीन
हिंदू धर्मातील किंवा धर्माविषयी खरी माहिती सर्वत्र न पोहोचण्याचे मूळ कारण, हिंदू धर्मग्रंथ हे संस्कृत भाषेत लिहिले गेले आहेत, असे माझे व्यक्तिगत मत आहे. प्रत्येकाला जर संस्कृत छानपैकी येत असते तर निदान हे ग्रंथ वाचता आले असते, पण तसे न झाल्याने आपण इतरांनी लिहिलेले वाचतो व त्यावर आपले मत ठरवतो. कोणत्याही ग्रंथात मांडलेले आचार-विचार, नियम हे त्या त्या कालानुरूपच असतील ह्यात काही शंकाच नाही. कालाप्रमाणे जे काही चांगले असेल ते अंगीकृत करून, कालबाह्य ठरलेल्या गोष्टी टाळून पुढे जाण्यातच खरी बुद्धीमत्ता असते. साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास १९५०-६० आसपास लिहिलेल्या कथा कादंबर्या, सिनेमे आज वाचताना, पाहताना अगदी बाळबोध वाटतात, पण त्या काळासाठी ते सर्व अनुरूपच होते. मनुस्मृतीतील सिलेक्टिव्ह श्लोक पुढे करून त्यावरून त्या ग्रंथाला बडवीणे बरोबर नाही. मनुस्मृतीतील विचार हे विचारपूर्वकच स्वीकारले पाहिजेत. जे काही कालबाह्य असेल ते सोडून व जे आजही उपयोगी असेल ते स्वीकारून पुढे जाण्यातच खरा शहाणपणा आहे. शरद जी, तुम्ही फारच सोप्या पद्धतीने लेख लिहिला आहे, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. अजून लिहा, वाचायला आवडेल, नव्हे ह्या विषयावर वाचायची ईच्छाच आहे.
  • Log in or register to post comments

मनुस्मृतीतील सिलेक्टिव्ह श्लोक पुढे करून ....

Duishen
Sat, 10/21/2017 - 22:18 नवीन
.....काही कालबाह्य असेल ते सोडून व जे आजही उपयोगी असेल ते स्वीकारून..... एखादे उदाहरण देता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

निसटत्या बाजू १

माहितगार
Mon, 07/24/2017 - 08:41 नवीन
एखाद्या ग्रंथात ७ गोष्टी पटणार्‍या आहेत ३ तीन गोष्ट पटणार्‍या नाहीत, ७ पटणार्‍या गोष्टींनी ३ न पटणार्‍या गोष्टींचे समर्थन होत नाही. आणि ३ न पटणार्‍या गोष्टी आहेत म्हणून ७ पटणार्‍या गोष्टींचे समर्थन थांबवता येत नाही. अर्थात ७ आणि ३ हे आकडे उदाहरणा दाखल आहे. १) ज्या काळात स्त्रीयांना सर्वाधीक संरक्षणाची गरज होती (किंवा आहे) त्या काळात किंवा या काळात स्त्रीला स्व आणि समुह संरक्षणाच्या शिक्षणापासून वंचीत ठेवण्याचे समर्थन कसे होऊ शकते किंवा कसे ? २) काळ कोणताही असो, आर्थीक स्वातंत्र्य हे उत्पादन कौशल्याधारीत असते अथवा वडलोपार्जीत संपत्तीवर आधारीत असेल. हिंदू समाजातीलच नायर समाजाने स्त्री सत्ताक पद्धत यशस्वीपणे चालून दाखवली होती, इंडोनेशीयातील एका बेटावर एका आदीवासी समाजाने मुस्लीम धर्मांतरणानंतरही स्त्री सत्ताक पद्धती यशस्वीपणे जोपासून दाखवली आहे. (त्यात वडील आणि मुले यांच्या नात्यातील जवळीक पुरेशी जपली जाऊ शकत नाही हा भाग निराळा) जुन्या काळातही एखादी स्त्री विणकर कलेचे शिक्षण उत्पन्न मिळवण्या साठी दिले आणि स्वसंरक्षण शिक्षण दिले आणि तिच्या स्वातंत्र्याचा आदर केला असता तर बिघडले असते का ? त्या एवजी एखाद्या ग्रंथाला धार्मीकतेची आणि शब्दपुजेची जागा देऊन सकारात्मक शक्यता दाबण्याचे समर्थन कसे होते किंवा कसे ? अर्थात स्त्रीच्या दास्य ह्या भूमिका लादून पेक्षा टिमवर्कची संकल्पना आणि टिमलिडरच्या निर्णयांचा आदर अशी संकल्पना अधिक स्पृहणीय राहू शकली नसती का ? स्त्रीला शिक्षणाचा अधिकार देऊन नैसर्गिक बुद्धीमत्तेस अधिक वाव मिळवून देऊन आर्थीक उत्पादनात अधिक सक्रीय नोंद घेऊन समाजाची उन्नती साधावयाचे सोडून देऊन पायात बेड्या बांधण्याने काय साध्य झाले ? ३) पृथ्वीतलावर असंख्य समुदायांनी स्त्रीचा पुर्नविवाह मान्य केला आणि त्या समाजांचे असे कोणतेही नुकसान त्याने झाले नाही. तथाकथीत धर्मग्रंथांची शब्दपूजा आणि टोकाच्या पातीव्रत्याच्या दडपणातून स्त्रीच्या पुर्नविवाहाच्या शक्यता त्या अनुषंगाने हकनाक नाकारलेले निवड स्वातंत्र्य समर्थनीय ठरते किंवा कसे.
  • Log in or register to post comments

मी हेच म्हणतोय

सौन्दर्य
Mon, 07/24/2017 - 08:47 नवीन
ज्या काही चांगल्या आणि पटणार्या गोष्टी आहेत त्या स्वीकाराव्यात आणि न पटणाऱ्या किंवा वाईट गोष्टी सोडून द्याव्यात. त्यासाठी संपूर्ण ग्रंथाला वाईट ठरवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हम्म.. धागा लेखक मित्र मी आणि

माहितगार
Mon, 07/24/2017 - 11:27 नवीन
हम्म.. धागा लेखक मित्र मी आणि तुम्ही म्हणतो आहोत तेच म्हणताहेत का काही वेगळे म्हणताहेत. एका बिल्डींग मधल्या लोकांना झोप प्रिय, जागे करणे अप्रिय असते पण त्या बिल्डींगला आग लागली तर अप्रिय सत्य सांगावे कि सांगू नये ? धर्म्य काय आहे न्याय्यता कि अन्यायता ? समता की विषमता ? अन्यायतेला धर्म्य म्हणून खपवले तर समाजधारणेत विसंगती निर्माण होणार नाहीत का ? इतरांचे सोडून द्या, तुमचेच चुकलेले तर्क तुमच्याच समाजाचा घात करु शकतात किंवा कसे. उदाहरणार्थ इतर धर्मीयांना धर्मप्रवेशाची साधी सोपी सोय उपलब्ध नसणे ? नुकसान कुणाचे ? विधवा स्त्रीला पुर्नविवाह न करता येणे तिचे अधिकार सोडून द्या तुम्ही तुमच्याच समाजावर संतती नियमन लादता होता ते कशा पोटी ? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

मुददा १

वीणा३
Mon, 07/31/2017 - 15:10 नवीन
याचं मुख्य कारण साततयाने होणारी गभधारणा आणि त्यामुळे येणार परावलंबीतव असाव असं वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अर्धसत्य ?

माहितगार
Mon, 07/31/2017 - 17:39 नवीन
१) किमान वयाच्या दहाव्या वर्षाच्या आधी बाळंतपणाचे प्रश्न नाहीत ! २) ब्रह्मचर्याची अट घालून मुलांना शिक्षण देणे शक्य होते तशीच ब्रह्मचर्याची अट घालून मुलींनाही शिक्षण देणे का शक्य नसावे ? (आजही वयाच्या १८ किंवा अधिक वर्षे बहुतेक मुली (तसे अधिकृत जाहीर करत नसल्यातरीही) ब्रह्मचारी शिक्षण घेतात ना ? ३) बाळंतपणाचा काळ ठीक पण त्या काळात एकत्र कुटूंब पद्धती होती, बाळंतपणाचा काळसंपल्यावर मुले घरात सांभाळण्यास ठेऊन स्व संरक्षणाचे धडे देता आले नसते ? जेव्हा तत्वतः किंवा प्रॅक्टीकली तुम्ही त्यांना (साक्षरता आणि संरक्षण) शिक्षण नाकारत आहात तेव्हा गर्भधारणेमुळे सोपे जात होते अथवा नव्हते हा गैरलागू स्वसांत्वनार्थ मुद्दा आहे किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

मलाही आवडलं असतं जर त्या

वीणा३
Tue, 08/01/2017 - 03:32 नवीन
मलाही आवडलं असतं जर त्या समाजाने स्त्रियांना नीट वागवलं असतं तर. पण जेव्हा मी विचार करते कि नक्की बायकांनी का दुय्यम स्थान स्वीकारलं असावं तेव्हा काही मुद्दे मनात येतातं. हे सगळे मुद्दे लॉजिक वर आधारित आहेत, कुठलाही अभ्यास / पुरावा नाही. थोडेसे विस्कळीत विचार आहेत :( . आणि काही सन्माननीय स्त्रिया त्या काळातही अपवाद असतील सुद्धा पण माझे खालील विचार अपवादांबद्दल नाहीयेत १. असं वाचलं - ऐकलं आहे कि, गर्भातील बाळ मुलगी असेल तर जगण्याची शक्यता जास्त असते. मुलगी गर्भ जास्त ताकदवान असतो (survivor / जगण्याची क्षमता जास्त असलेला - या अर्थाने, तब्येतीने नाही ). - या कारणाने समाजात एकूण स्त्रियांची संख्या जास्त असावी. त्या जरासंध राक्षसाने १६०० का १६००० बायका पळवून आणल्या, आणि त्यांच्या घरचे त्यांना परत घ्यायला तयार नव्हते. जर १६,००० बायका पळवून आणल्या असतील तर कितीतरी पुरुष एकटे राहायला हवेत. आणि फक्त समाजाच्या नियमासाठी १६,००० पुरुष आपल्या हक्काच्या बायको ला नाकारून एकटे राहतील हि शक्यता फार कमी वाटते. - बहुपत्नीत्व होतं, फ़क्त राजे-राजवाडे नाहीत तर सामान्य माणसान सुद्धा एकापेक्षा जास्त बायका असाव्यात असं वाटतं (राम आदर्श मानला जाण्यात त्याच्या एकपत्नी असण्याचा पण वाटा असावा, त्यावरून एकपत्नी असणं हि दुर्मिळ गोष्टं असावी असं वाटतं ) - जर स्त्रिया संख्येने कमी असत्या तर पुनर्विवाह ही गोष्ट खूप आधीपासून अस्तित्वात असती. २. पुरुष युद्धातही / शिकार करण्यात भरपूर मारले जात असावेत, त्यांच्या मानाने स्त्रियांना बाळंतपण हि एकचं लवकर मरायची शक्यता असावी, म्हणूनही स्त्रियांची संख्या जास्त असावी. ३. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये आपला दिनक्रम चालू ठेवणं हे आता खूप सोप आहे. वेग-वेगली सॅनिटेशन उत्पादने, कपड्यांची भरपूर उपलब्धता, आणि तुलनेने बैठं काम यामुळे अगदी शारीरिक त्रास होणारी स्त्री सुद्धा आपलं काम करत राहू शकते. पण जुन्या काळी शारीरिक कष्टाची कामं + कपड्याची उपलब्धता कमी (अंदाज असा कि राजे-राजवाड्यांकडे भरपूर कपडे असतील पण सामान्य लोकांकडे कमीच असणार ), यामुळे मासिक पाळीचे ४ दिवस सुद्धा महिला परावलंबी असतील. ४. आज आपण अशा समाजात राहतो जिथे आजारी असणं / काही काळ परावलंबी असणं आपल्याला परवडू शकत . पण ज्या अर्थी समाजात नियम हवेत असा ग्रंथ लिहिला गेला त्या अर्थी, त्या समाजात नियम कमी असणार, बळी तो कान पिळी - हा प्रकार सर्रास चालत असणार. अशा समाजात स्वतःच्या मालमत्तेचं रक्षण करणं हे एक सततच काम असणार. तसंच शेती / शिकारी सारखं कष्टाचं काम सातत्याने करणं मासिक पाळी + बाळंतपण + लहान मुलाचं संगोपन या कारणामुळे परावलंबी असलेल्या स्त्री ला अवघड जात असणार. तिच्याकडून मालमत्ता काढून /लुबाडून घेणं हे पुरुषाकडून मालमत्ता काढून घेण्यापेक्षा नक्कीच सोपं असणार. आणि जर सामाजिक सुरक्षा / मुलांची पुढची सोय / मालमत्ता या सगळ्या गोष्टीने बहुतांशी स्त्रियांना एका लग्नात राहून नवऱ्याची सेवा करणं हा तुलनेने सोपा पर्याय उपलब्ध असणार. त्यात जर स्त्रीयांची संख्या जास्त असेल तर स्पर्धा जास्त, त्यामुळे संख्येने कमी असलेल्या पुरुषांना अतिशय महत्व मिळून त्यांनी आदर्श पत्नीचे क्रायटेरिया स्वतःला हवे तसे वाढवले असावेत. मार्केट फोर्सस मध्ये ज्याचा सप्लाय अतिशय जास्त त्या गोष्टी ची किंमत कायमच कमी असते.. स्त्रिया जास्त त्यात परावलंबी, आधीच कमी असलेल्या रिसोर्सेस मध्ये स्वतः काही भर न घालता तोच कमी करत राहणार. हि आणि अनेक कारण लक्षात घेतली तर "त्या काळात" मनू ने स्त्री ला आदराने वागवायला सांगितलं हेच कौतुक म्हणायला लागेल. पुरुषांना स्त्रियांची असलेली शारीरिक गरज आणि प्रजोत्पादन ह्या दोनच गोष्टींमुळे स्त्रियाना आजतागायत किमान जगता आलं / पुरुषांनी जगू दिलं असं वाटतं. त्यांना फक्त नवऱ्याची सेवा करायला शिकवणं हि एकाच गोष्ट गरजेची होती आणि बऱ्याचशा स्त्रिया ती सहज करू शकत होत्या. या आणि अशा अनेक वेग-वेगळ्या कारणामुळे पुर्वापार स्त्रीने समाजात दुय्यम भूमिका पत्करली असावी / तिला ती दिली गेली असावी असं वाटतं. स्त्रियांना स्वतःला हवं तसं जगण्याची संधी (स्वतःची मालमत्ता स्वतः कमावणं / आयुष्यातला कमी काळ परावलंबी असणं / माणूस म्हणून विचार केला जाणं) मिळायला फक्त गेली १-२ शतक (भारतात तर गेली ३०-५० वर्ष ) सुरवात झाली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

मला वाटते त्या काळाच्या

पुंबा
Tue, 08/01/2017 - 08:53 नवीन
मला वाटते त्या काळाच्या मानानेदेखिल स्त्रीविषयक मनुचे विचार अनाकलनिय आणि इल्लॉजिकल आहेत. आता बघा, स्त्रियांची संख्या पुरूषांपेक्षा खुप जास्त होती अश्या काळात स्त्रिला अर्थार्जन करण्याचा अधिकार न देता केवळ पुरूषांची सेवा करणे एवढेच काम देणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चुकीचेच होते. कारण कमी पुरूषांवर जास्त स्त्रियांचा भार पडे. पुरूष नसलेल्या घरातल्या स्त्रीची जबाबदारी तिने न घेता कुठल्यातरी दुसर्‍या पुॠषानेच घ्यावी लागत होती किंवा मग ती स्त्री समाजाची जबाबदारी होती हे चुकीचे आहे की. समाजात प्रचंड आर्थिक सुबत्ता असल्याशिवाय हे सस्टेन होणे अवघड आहे/होते. इस पुर्व १७००-१८०० या काळात हामुराबी नियम लिहिले गेले त्याचा आणि मनुस्मृतीमध्ये तुलना केली त्यामध्ये स्त्रीला व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली आहे. बाकी स्त्रिचे स्थान समान नाहीच परंतू निदान अर्थार्जनाचा अधिकार हिरावला गेला नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

इस पुर्व १७००-१८०० या काळात

अत्रे
Tue, 08/01/2017 - 09:19 नवीन
इस पुर्व १७००-१८०० या काळात हामुराबी नियम लिहिले गेले त्याचा आणि मनुस्मृतीमध्ये तुलना केली त्यामध्ये स्त्रीला व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली आहे.
इंटरेस्टिंग! याबद्दल अधिक इथे वाचायला मिळाले http://www.womenintheancientworld.com/hammurabilawcode.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

लिंक रोचक आहे. बरेच कायदे

एमी
Tue, 08/01/2017 - 16:03 नवीन
लिंक रोचक आहे. बरेच कायदे अजूनही तसेच आहेत. पण मला एक कळलं नाही जर त्याकाळात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असेल तर bride price कसे होते हुंडा असायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

एक्झॅक्टली..

पुंबा
Tue, 08/01/2017 - 17:25 नवीन
एक्झॅक्टली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

जर त्याकाळात स्त्रियांची

अत्रे
Wed, 08/02/2017 - 12:07 नवीन
जर त्याकाळात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त असेल तर bride price कसे होते हुंडा असायला हवा.
याचे उत्तर खालील वाक्यात मिळेल असे वाटते
According to French anthropologist Philippe Rospabé, its payment does therefore not entail the purchase of a woman, as was thought in the early twentieth century. Instead, it is a purely symbolic gesture acknowledging (but never paying off) the husband's permanent debt to the wife's parents
https://en.wikipedia.org/wiki/Bride_price#Function
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

नाय कळलं.

एमी
Wed, 08/02/2017 - 14:06 नवीन
नाय कळलं. शेती करणाऱ्या कुटुंबातील एक कामगार व्यक्ती दुसऱ्या कुटुंबात गेली म्हणून दुसर्याने पहील्याला कॉम्पेनसेशन द्यावं हे ठीक आहे. त्याला बाई विकत घेणे नाही म्हणता येणार. *कामगार विकत घेणे म्हणता येईल ;)) पण मला वाटते bride price आणि हुंडा हे ज्याची संख्या कमी त्यानुसार ठरते. जर स्त्रिया > पुरुष असतील तर हुंडा; जर पुरुष > स्त्रिया असतील तर मेहेर असे असते/असायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

bride price ...

Duishen
Sun, 10/22/2017 - 01:11 नवीन
bride price ला महाराष्ट्रात 'देजा' असा शब्द वापरला जातो. हुंडा पद्धत ही मुलत: प्रथम तीन 'उच्च' जातीचे व्यव्वछेदक लक्षण होते. उर्वरित सर्व जाती-जमातींमध्ये एकतर हुंडापद्धत अस्तित्वात नव्हती किंवा 'देजा' अस्तित्वात होते. आजही काही आदिवासी समाजात देजा बघायला मिळतो. मध्यंतरी एक पुस्तक वाचनात आले होते.. कदाचित नामदार जाधवांचे असावे..फारसे स्मरत नाही... त्याच्या संदर्भानुसार अगदी २० शतकाच्या सुरवातीपर्यंत कुणबी समाजात देजाची पद्धत प्रचलित होती असा उल्लेख आहे. देजा पद्धतीला 'उच्च'जातींकडून नेहमीच हिणवल्या गेले आहे आणि हुंडा पद्धत श्रेष्ठ मानल्या गेली आहे..शेवटी काळाच्या ओघात सर्व जाती-जमाती बऱ्यापैकी हुंडा समर्थक बनत आहेत. अजून एका परंपरेबाबत लिहितो ...एकदा पेशव्यांकडे एका 'शुद्र' जातीच्या मंडळाने सतीप्रथा त्यांच्यात सुरु करण्याची परवानगी मागितली..पण पेशव्यांनी निक्षून सांगितले की सती जाणे ही 'उच्च'जातींची परंपरा आहे आणि त्याची 'शूद्रा'ना परवानगी नाही. .....समाज वाईट चालीरीतींचे पण किती अंधानुकरण करू इच्छितो याचे हे उदाहरण... ...हुंड्याचेही तसेच अनुकरण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

माहितीसाठी आभार. रोचक आहे हे

एमी
Tue, 10/24/2017 - 15:18 नवीन
माहितीसाठी आभार. रोचक आहे हे सगळं. निम्न 'वर्गा'त 'देजा' पद्धतच असायला हवी. खरंतर मातृसत्ताकच!! स्त्रियांचं काँट्रीब्युशन फार असतं ती कुटुंब चालवण्यात. तेच जसजशी श्रीमंती वाढत जाईल तसतसं स्त्रिया फक्त ट्रॉफी बनत जातात (जर स्वतःची काही ओळख/इन्कम नसेलतर). त्यामुळे तिथेदेखील हुंडापद्धत योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

विश्लेषणाशी सहमत.. अजुन १-२ गोष्टी जोडतो...

Duishen
Sat, 10/21/2017 - 23:02 नवीन
ज्या आदिम काळात पुरुषांना त्यांचे प्रजोत्पादानातील महत्त्व समजत नसे त्या काळात 'बाळाला जन्म देणारी स्त्री; श्रेष्ठ ठरली...आणि कदाचित पुरुष हे करू शकत नाही याचा त्याला गंड निर्माण झाला असावा... हा गंड एक कारण असू शकतो स्त्रियांना गुलाम बनविण्याचा...! असे मानले जात की पुरुष शिकारीमध्ये असतांना स्त्री गुहेत वा त्याच्या आसपास राहून (...पाळी किंवा गर्भवती असणे इ. कारणांमुळे..) तिने निसर्गाचे अवलोकन करून शेतीचा शोध लावला...पण तिचा नंतर कधी शेतीवर अधिकार राहिला नाही.. (आता कुठे ७/१२ वर स्त्रियांच्या नावाची नोंद असावी असा लढा चालू आहे...) एक महत्त्वाचा मुद्दा असा की स्त्रीयाची नवीन जीव निर्माण करण्याची नैसर्गिक ताकदच तिच्या जीवावर बेतली... सर्व जात व्यवस्था स्त्रीला केंद्रीभूत करून निर्माण करण्यात आली आणि ती तिने कसोशीने पाळावी अशी धार्मिक आणि सांस्कृतिक बंधनेही!!! जीव निर्माण करू शकते म्हणजे भावी सैन्य हिच्याकडून उपलब्ध होऊ शकते. म्हणून मग युद्धात स्त्री पळविणे प्रचलित व्यवस्थेला मान्य झालं... म्हणजे तिचा वापर केवळ मालमत्तेसारखा!!! जबाबदाऱ्या ह्या हळूहळू लादल्या गेल्या... कधी बळजबरीने तर कधी धर्माची भीती घालून... ,,,,कामाची विभागणी आणि जबाबदाऱ्याचे वाटप यात काही गैर नाही पण जेंव्हा हे वाटप जन्माधारित करून त्याला उच्च-नीचतेची जोड दिली ते मात्र भयानक.. ज्यादिवशी समस्त पुरुषवर्गाला कळेल की पितृसत्ताक व्यवस्थेचे त्यानाही तोटे जास्तच आहे; जेंव्हा समस्त ब्राह्मण्यवादी लोकांना कळेल की जातव्यवस्था त्यांच्यासाठीही घातक आहे आणि जेंव्हा समस्त स्त्री वर्गाला जाणवेल की त्यांना जातीव्यवस्थेचे केंद्र केले आहे आणि त्यांचा लढा हा जातीव्यवस्थेविरुद्धाचाच लढा आहे तो भारतासाठी सुदिन!! त्यानंतर कधी मग मनुस्मृतीचा ग्रंथ बाहेर काढणारे असणार नाहीत आणि त्यावर लिहिणारेही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

जाता जाता -- मनुस्मृती किती

सुबोध खरे
Mon, 07/24/2017 - 09:37 नवीन
जाता जाता -- मनुस्मृती किती लोकांनी मुळातून वाचलाय?
  • Log in or register to post comments

मी.

प्रचेतस
Mon, 07/24/2017 - 10:10 नवीन
मी. आणि मनुस्मृती प्रचंड अन्याय करणारी आहे हेही खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मराठी मनुस्मृती

कपिलमुनी
Mon, 07/24/2017 - 20:26 नवीन
मराठी मनुस्मृती पीडीएफ आहे का ? लिन्क असल्यास उत्तम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मराठी पीडीएफ तरी माझ्या

प्रचेतस
Mon, 07/24/2017 - 21:14 नवीन
मराठी पीडीएफ तरी माझ्या पाहण्यात नाही पण sacred-texts.com वर इंग्रजी भाषांतर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

रोचक आहे.

अत्रे
Mon, 07/24/2017 - 09:41 नवीन
रोचक आहे. पण यातले सारे विचार वैयक्तिक/स्वत:च्या घरापुरते का आहेत? भ्रष्टाचाराचा साधा उल्लेख सुद्धा कुठे दिसत नाही. यातून दोन अर्थ निघू शकतात - १. त्या काळात सर्व काही आलबेल होते. सरकारी आणि बिन-सरकारी लोक आपापली कामे पैसे न खाता, मन लावून करत असत. किंवा २. ग्रंथकाराला या विषयात रस नव्हता. तुम्हाला काय वाटते?
  • Log in or register to post comments

पण यातले सारे विचार वैयक्तिक...

Duishen
Sun, 10/22/2017 - 09:45 नवीन
पण यातले सारे विचार वैयक्तिक/स्वत:च्या घरापुरते का आहेत? प्रत्येक जातीने इतर जातींशी कसे वागावे आणि त्यासंबंधी शिक्षा; समस्त स्त्रियांचे कसे शोषण करावे याचे मनुस्मृतीतील सारे वर्णन वैयक्तिक कसे असू शकेल!!! भ्रष्टाचाराचा साधा उल्लेख सुद्धा कुठे दिसत नाही. भ्रष्ट मातीने लिहिलेला ग्रंथ भष्टाचार शब्दाचा उल्लेख करील काय! पूर्ण स्मृतीच भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

मला तर वाईट काहीच आढळत नाही,

Ram ram
Mon, 07/24/2017 - 09:58 नवीन
मला तर वाईट काहीच आढळत नाही, चांगलेच विचार मांडले आहेत मनुने. त्यावेळच्या परिस्थितित थे योग्य होते.
  • Log in or register to post comments

तदानुभूती म्हणजे स्वतःला

माहितगार
Mon, 07/24/2017 - 11:39 नवीन
तदानुभूती म्हणजे स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेऊन त्याच्या भावना, विचार, व वागण्याची पद्धत समजून घेऊन त्यानुसार केलेले वर्तन होय. समोरील व्यक्तीला काय वाटत असेल, तो व्यक्ती असे का वागत असेल, तसेच परिस्थितीमुळे त्याने केलेले वर्तन आणि निर्माण झालेल्या भावना समजून घेऊन तसेच त्यानुसार प्रतिक्रिया देऊन एखादा व्यक्ती वागते तेव्हा ती तादानुभूतीपूर्वक वागते असे म्हणण्यास हरकत नाही. बराच वेळा आपण फक्त सहानुभूतीपूर्वक वागतो. म्हणजेच आपल्याला फक्त त्या व्यक्तीबद्दल सहानुभूतीच वाटते. त्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगामुळे आपल्याला त्याची कीव येते. आपण फक्त अरेरे असे म्हणून सोडून देतो. परंतु जेव्हा आपण तदानुभूती चा वापर करतो तेव्हा त्या व्यक्तीची कीव न करता पूर्णपणे त्याच्या जागी जाऊन विचार करू लागतो. असा विचार करून त्याच्या भावना समजून घेणे खरतर सोप्पे नसते . त्यासाठी स्वतः मानसिक दृष्ट्या सक्षम असणे महत्वाचे असते. संदर्भ - मराठी विकिपीडिया लेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram

म्हणजे...

Duishen
Sat, 10/21/2017 - 23:12 नवीन
...म्हणजे औरंगजेबाने 'काफिरां'वर जिझिया कर लावून "मला तर वाईट काहीच आढळत नाही, चांगलेच विचार मांडले आहेत औरंगजेबाने... त्यावेळच्या परिस्थितित ते योग्य होते." .....म्हणावयाचे आहे का?. वाईट न वाटू शकणारी बरीच उदाहरण देता येतील... इतिहासातील आणि सद्यपरिस्थितीतील!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram

निसटत्या बाजू २

माहितगार
Mon, 07/24/2017 - 12:31 नवीन
सामाजिक उतरंड रचताना वर्णांची संख्या घेताना ती ४ घ्या ५ किंवा जेवढे जातीय स्तरीकरण तेवढी, सामाजिक उतरंडीची संकल्पनाच मुदलातच झोल असते. भारतीय चातुर्वण्य संकल्पनेतील शुद्रत्वाची संकल्पना तर सगळ्यात मोठा झोल आहे. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु आणि सेवांच्या उत्पादन आणि विनीमयावर आर्थीक संस्कृती उन्नत होते. भारतीय चातुर्वर्ण्य संकल्पनेत वैश्यांचा विचार केला असला तरी त्यांना प्रामुख्याने व्यापारी समजून. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु उत्पादक जो अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा आधार असतो त्यांच्या करता स्वतंत्र विशेष वर्णाची व्यवस्था नाही मग त्यांचे वर्गीकरण वैश्यांमध्ये करणार की शुद्रांमध्ये ? अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु उत्पादन यात प्रत्यक्षात तथाकथीत चारही वर्णिय सहभागी होताना दिसतात. तिच गोष्ट अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु उत्पादन साठी लागणार्‍या सेवांच्या उत्पादनांचीही आहे. च होताना असणारे सपोर्ट लेव्हल्स सेवा क्षेत्र काळजी घेत असते. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु आणि सेवा उत्पादन होताना उन्नत होणार्‍या संस्कृतीस जशा इतर सेवा आहेत तशाच ज्ञानदान, संरक्षण , आणि व्यापार या वस्तुतः सेवाच आहेत. म्हणजे एका अर्थाने कुणी कुणाची सेवा करायचीच असेल तर उन्नत संस्कृतीत ज्ञानदान, संरक्षण , आणि व्यापार करणार्‍यांनी अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु उत्पादकांची सेवा करावयास हवी. पण भारतीय चातुर्वर्ण्य संकल्पनेत ज्ञानदान, संरक्षण , आणि व्यापार सेवा देण्याची ज्यांच्या कडून अपेक्षा करावी तेच बळी तो कान पिळी ह्या न्यायाने उत्पादकांकडूनच सेवा मागत होते एवढेच नाही त्यासाठी विषमतेचे तत्वज्ञान रचणे आणि त्याचे घाऊक समर्थन करण्यापर्यंत मजल जाऊन त्या ज्ञानदान, संरक्षण , आणि व्यापार करणार्‍या समुहांच्या हितसंबंधांचे संरक्षण झाले . आपल्याच समाजाच्या मह्त्वपूर्ण अंग असलेल्या अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादकांना हिन ठरवण्यातून काय साधले गेले ? केवळ हिन ठरवणे अथवा धार्मीक ग्रंथांच्या वाचनाचा अधिकार नाकारणे ह्या मानसिक समस्या झाल्या. पण साक्षरता निर्माण करण्याची क्षमता असूनही अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादकांमधील बहुसंख्य गटास कौशल्य विकासाचे आणि त्यातून समाजाची आर्थीक उन्नती साधण्याचे सा़क्षरतेचे साधन नाकारले गेले. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादना बद्दल ज्या ज्ञानाच्या निर्मितीची बांधणी व्हावयास हवी होती ती त्यांना ज्ञानाची एकच व्याख्या करणे आणि ते नाकारण्यातून उत्पादकाशी संवादाचा धागाच सांधला न जाण्याची प्रक्रीया निर्माण झाली. (आजही आमची विद्यापिठे उत्पादकांशी कितपत नीट जोडली गेली आहेत की जुनाच कित्ता गिरवत आहेत हा वेगळ्या चर्चेचा विषय असावा) आध्यात्मिक ज्ञान जरावेळ बाजूला ठेवा. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादनाच्या आर्थीक प्रक्रीयेच्या बळावर तुम्ही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष म्हणजे क्षत्रिय आणि वैश्यांकडून दान (कि कराचा हिस्सा) मिळवत होता त्या अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादनाच्या आर्थीक विकासात तुम्ही केलेल्या ज्ञान विकासाचे कोणते म्हणून योगदान होते ? अभ्यास विषयातील रस-गती आणि प्रतिभा ह्या जन्माधारीत कदाचित असणार नाहीत ह्या शक्यता विश्वामित्र परशुराम असा कथांमधून समोर आल्या तरी त्यांच्याकडे ओढून ताणून हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणार्‍या कथा रचल्या जाऊन वस्तुस्थिती कडे दुर्लक्ष झालेच. म्हणजे अंगात गुण आणि इच्छा असूनही संधी नाकारणारी विषम व्यवस्था राबवली गेली. अन्न-वस्त्र-निवारा, वस्तु व अन्य सेवा उत्पादन करणार्‍या व्यक्तीच्या मुलास ज्ञान संरक्षण आणि व्यापार यात गती असण्याची शक्यता असून संधी दिल्या नसतील तर शेवटी नुकसान कुणाचे झाले ? सबंध समाजाचे झाले नाही का ? अगदी ब्राह्मण्याची समान संधी देऊन धार्मीक सांस्कृतीक संबंधांसाठी पश्चिम आशिया सेंट्रल आशिया चिन आदी देशात पाठवून राजकीय भौगोलीक आर्थीक विकासाच्या संधी अभ्यासता आल्या नसत्या का ? त्या एवजी संस्कृतीस पूर्ण उलट दिशेने नेत आपल्याच समाज घटकांना हिन लेखून संधी नाकारून; परकीयांना सामाजिक भेदाच्या फटी मिळवून देणारी व्यवस्था निर्माण करण्यात शहाणपणा होता किंवा कसे.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला सरजी..

पुंबा
Tue, 08/01/2017 - 08:17 नवीन
प्रतिसाद आवडला सरजी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

मनुस्मृति

कपिलमुनी
Mon, 07/24/2017 - 20:25 नवीन
मनुस्मृति मी वाचली नाही. एखादी गोष्ट चांगली की वाइट हे ठरवायला ती महिती असावी लागते. त्याप्रमाणे इतिहासातील , पुराणातील ग्रंथाविषयी माहिती असे लेखाचे स्वरूप आहे त्यामुळे त्याविषयी गळे काढणार्‍यांचे प्रयोजन कळले नाही. उत्तम लेख ! पुभाप्र
  • Log in or register to post comments

गळे काढणार्‍यांचे प्रयोजन

माहितगार
Mon, 07/24/2017 - 21:14 नवीन
मराठी विश्वकोशातील तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा मनुस्मृती विषयक लेख दोन पानांचा आहे. लेखात बराच उहापोह आहे. पण त्या लेखाचा शेवट आपणास अपेक्षीत प्रयोजन सांगत असावा. तो खालील प्रमाणे
.......मनुस्मृतीमध्ये स्त्री-पुरूषनियमन,स्त्रियांचे पारतंत्र्य आणि जातिबध्द विषम समाजरचना ह्यांचे जोरदार समर्थन आहे. ब्राम्हण जात सर्वश्रेष्ठ व अस्पृश्य जमात ही सर्वात कनिष्ठ, बहिष्कार्य आणि सर्वसामान्य उच्चवर्णीयांच्या किंवा सवर्णांच्या वसतिस्थानांपासून दूर, अलग राहण्यास पात्र होय असे मनुस्मृतीमध्ये सांगितले आहे. म्हणून मनुस्मृतीच्या आणि परंपरागत धर्मशास्त्राच्या विरूध्द आजचे हिंदुसमाजसुधारक वारंवार लिहितात व प्रचार करतात. संदर्भ: मनुस्मृति मराठी विश्वकोशातील जोशी, लक्ष्मणशास्त्री. लिखीत नोंद हा प्रतिसाद देण्याच्या वेळी जशी दिसली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सहमत

Nitin Palkar
Mon, 07/24/2017 - 21:28 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

जग पुढे चालले आहे आणि काही जण

श्रीगुरुजी
Tue, 07/25/2017 - 00:05 नवीन
जग पुढे चालले आहे आणि काही जण अजूनही मनुस्मृती चांगली का वाईट, ती जाळावी का पूजावी याविषयावर मंथन करीत आहेत. मनुस्मृती चांगली असली किंवा वाईट असली, ती जाळली किंवा पूजली तरी कोणालाही शष्प फरक पडणार नाही. मनुस्मृतीत स्त्रियांविषयी काय लिहिले आहे यामुळे आजच्या काळात अजिबात फरक पडत नाही कारण मनुस्मृतीप्रमाणे कोणी वागत असेल असे वाटत नाही. मी मनुस्मृती नावाचे पुस्तक/ग्रंथ अजून पाहिलेला सुद्धा नाही व त्यात काय लिहिले आहे त्याविषयी अजिबात उत्सुकता नाही. त्यात जे काय लिहिले असेल ते त्या काळाला अनुसरून असेल जे आजच्या काळाशी सुसंगत नाही.
  • Log in or register to post comments

+१

अभिदेश
Tue, 07/25/2017 - 00:21 नवीन
पण अजूनही समाजातले काही लोक जुनाट धर्मग्रंथ नुसार राहतात आणि ते प्रमाण मानतात शब्द: ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मनुस्मृती आणि ग्रंथप्रामाण्य

गामा पैलवान
Tue, 07/25/2017 - 03:36 नवीन
माहितगार,
मानवतावाद श्रेयस्कर की ग्रंथ प्रामाण्य ? ; विवेकवाद श्रेयस्कर की व्यक्तीवाद ?
पहिल्याप्रथम तर्कतीर्थांच्या लेखाबद्दल धन्यवाद. या लेखानुसार :
ज्ञानी,सज्जन, रागद्वेषापासून नित्य मुक्त अशांच्या ह्रदयाला पटलेला असा धर्म या मानवधर्मशास्त्रात सांगितलेला आहे
त्यामुळे मनुस्मृतीचं ग्रंथप्रामाण्य मानवतावादाच्या आजिबात विरोधात नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मनुस्मृतीत नक्की काय आहे याचे

पुंबा
Mon, 07/31/2017 - 12:08 नवीन
मनुस्मृतीत नक्की काय आहे याचे कुतुहल शमने एवढेच या लेखाने होऊ शकेल असे वाटते. लेखकाने अतिशय सुगमपणे आणि मुद्देसूद भाषांतर दिले आहे त्याबद्दल आभार. याचा उपयोग असा होऊ शकेल की बुद्धोत्तर काळापासून जे यम-नियम समाजात प्रचलित होते त्यांची माहिती होते. त्या नियमाप्रमाणे वर्तन किती होत होते हे अन्य साधनांच्या आधारे पडताळता येते. विशेषतः जातीप्रथा, स्त्रीदास्य याचे खरेखुरे चित्र कळण्यामागे अशा अभ्यासाचा उपयोग होऊ शकेल. मनुस्मृतीचा आजच्या काळातील उपयोग(नियम म्हणून) शुन्य आहे आणि तसाच तो रहावा. तिचा पुरस्कार किंवा घाऊक विरोध करुन उगाच अति महत्व देऊ नये असे वाटते. आजच्या नैतिक चौकटी आणि सामाजिक व्यवहाराचे नियम हे आधुनिक व्यवस्थतूनच(जसे संविधानः कालानुरूप नविन सामाजिक कंत्राटातून तयार झालेली व्यवस्था) घ्यावेत, मनुस्मृती तिथे(कितीही चांगल्या काही गोष्टी असतील तरीही) अनुकरणिय नसावी.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख !

सस्नेह
Mon, 07/31/2017 - 16:46 नवीन
भाषांतरासोबत मूळ श्लोकही द्यायला हवे, तर रेडी रेफरन्स मिळेल आणि पडताळणीसुद्धा करता येईल.
  • Log in or register to post comments

भाषांतरासोबत मूळ श्लोकही

माहितगार
Mon, 07/31/2017 - 17:48 नवीन
भाषांतरासोबत मूळ श्लोकही द्यायला हवे, तर रेडी रेफरन्स मिळेल आणि पडताळणीसुद्धा करता येईल.
सहमत असलो तरी संस्कृतच्या अनुवादकात अशी परंपरा फार कमी दिसते. खरेतर शब्दवार शब्दार्थ मग लिटरल अर्थ त्या नंतर भावार्थ असा पारदर्शक क्रम हवा . असो. ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवर मनुस्मृतीचा मराठी अनुवाद उपलब्ध दिसतो. श्लोक क्रमांक कदाचित जसेच्या तसे जुळत नाहीत जरा अधिक मेहनत घेतली तर भेटून जातात किंवा किमान अंदाजा येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

संस्कृत श्लोक

शरद
Tue, 08/01/2017 - 14:29 नवीन
मिपावरील किती जणांना उपनिषदे किंवा मनुस्मृति चे संस्कृत कळत असेल ? २% ? की हा अंदाजही फार फारच जास्त वाटतो ? मी स्वत: या २ टक्क्यात बसत नाही. माझी धाव फार फार तर संस्कृत सुभाषितांपुरती. मला शालेय संस्कृत-मराठी शब्दकोष पुरतो. ओकांचा शब्दकोश घेण्याचे राहून गेले. खैर. ह्या वेळीही संग्रहण या शब्दाचा अर्थ जाणकारांना विचारावा लागला.. सुभाषितांच्या धाग्यावरून लक्षात आले अशी माणसे फार फार तर १०-२० असतील. मग ह्या सुसंस्कृत महाजनांकरिता संस्कृत देण्यात काय अर्थ आहे ?. परत अशा लोकांना स्वत: उपनिषदे/मनुस्मृतीसारखे ग्रंथ माहीत असतातच. मी जेव्हा इथे महाभारतावर लिहतो तेव्हा ते लेखन श्री. प्रचेतस किंवा श्री.माहितगार यांच्याकरिता नाही हे उघड आहे. त्यांनी " हे ठीक " असे लिहले की अंमळ बरे वाटते हेही खरे. मग इथे हे लेखन कशाकरिता ? आजच्या धावपळीच्या जीवनात बर्‍याच गोष्टी वाचावयाच्या राहून जातात. अनेक पुस्तके कोठे मिळतील तेही माहित नसते संपूर्ण ग्रंथ वाचावयास वेळही नसतो. थोडक्यात काही माहिती मिळाली तर हवी असते. मी एक नशिबवान माणुस आहे. मी अनेक विषयांवरील ग्रंथ वाचले; गोळा केले. आता तसा मोकळा वेळही असतो. तेव्हा अशा लोकांकरिता, ज्यांना कमी वेळात तोंडओळख करून घ्यावी असे वाटते , त्यांच्याकरिता हे लेखन. लेखांची मर्यादा, जाणूनबुजुन, ५-१० मिनिटात वाचून होईल, एवढीच ठेवतो. हे लेखन म्हणजे Ph.D चा Thesis नव्हे. तेव्हा संस्कृत श्लोक, शबदांचा अर्थ, भावार्थ, मतितार्थ इत्यादी येथे देणे मला अपेक्षित नाही. शिवाय माझ्यासारख्या रिकाटेकड्या ( पण आळशी) माणसालाही हे संस्कृत टंकलेखन करावयास किती वेळ लागेल याचा विचार करावयास लागले की दडापण येते हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

तुम्ही लिहा, काका.

यशोधरा
Wed, 08/02/2017 - 17:37 नवीन
तुम्ही लिहा, काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

लेखामागची भूमिका

स्वधर्म
Mon, 07/31/2017 - 17:47 नवीन
अादरणीय शरदजी, अापण (मनुस्मृतीने नव्हे) लिहिलेली वाक्ये अशी अाहेत: >> एका वर्णाने दुसर्‍या वर्णाशी, इत्यदि इत्यादि कसे वागावे याचे नियम असणे समाजाला अत्यंत गरजेचे असते; नव्हे. समाज त्या शिवाय राहूच शकत नाही. तसेच, >> भाजपाला मनुवादी म्हणून हिणवावयास व केव्हाही रस्त्यावर जाळावयास उपयोगी म्हणून "बहेनजीं"ना फारच आवडणारा. अापणांस मुळात वर्ण व्यवस्था मान्य असल्यासारखे पहिल्या वाक्यावरून वाटते. अापण अापली भूमिका स्पष्ट करू शकाल काय? वर्ण हे मुळात समाजाचे अशास्त्रियच नव्हे, तर अन्यायकारक वर्गीकरण अाहे. असे असेल, तर मनुस्मृती अाणखी चिवडण्याचे कारणच काय रहाते? हे लिहिण्याचे कारण म्हणजे अापले दुसरे वाक्य! जे मनूस्मृतीला प्रखर विरोध करतात, त्यांचा तुंम्ही तीव्र उपहास केलेला अाहे. विषय बराच सगळीकडून चघळला गेला अाहे, पण अापली भूमिका समजून घ्यावीशी वाटली म्हणून विचारतो.
  • Log in or register to post comments

वर्ण = कल

गामा पैलवान
Wed, 08/02/2017 - 12:32 नवीन
स्वधर्म,
वर्ण हे मुळात समाजाचे अशास्त्रियच नव्हे, तर अन्यायकारक वर्गीकरण अाहे.
प्रत्येकास आवडनिवड असतेच. त्या त्या व्यक्तीचा नैसर्गिक कल म्हणजे वर्ण. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

वा! छान!!

स्वधर्म
गुरुवार, 08/03/2017 - 01:18 नवीन
वा! छान!! कसंय ना गामाजी, अापण जर पिढ्यानुपिढ्यांच्या लाभार्थी समाजगटातून अालो असू, तर सगळ, कसं नैसर्गिक दिसतं ना! अन्याय कुठे झालाच नाही. बधा बघा अाजूबाजूला जग केवढं सुंदर अाहे, अापली संस्कृती किती महान होती. अाता काही लोकांचा नैसर्गिक कलच इतरंची घाण सा़फ करण्याचा होता, दुसर्यांनी हिसकावलेली संपत्तीच परत न मागण्याचा होता, याला ‘समाजाची सुयोग्य घडी बसवणारे’ महान ग्रंथ तरी काय करणार? खरं म्हणजे, मूळ प्रश्न लेखकाच्या भूमिकेसंबंधी होता. इतर अनेक प्रश्नांना त्यांनी विद्वत्तापूर्ण उत्तरे दिली तरी अर्थातच त्यांना तो उत्तर देण्यासारखा वाटत नाही. असं निरागस बौध्दिक कुतूहल असणं किती छान आहे! मात्र त्याला पूर्वजन्माची पुण्याईच पाहिजे. नाहीतर अाहेतच मायावतींसारखे नतद्रष्ट लोक! इतक्या महान ग्रंथाला जाळू पहाणारे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा