पावसाळ्याच्या काळात हवामान खात्यातील कर्मचारी दिवसभर पावसाचे अंदाज वर्तवून कामकाज आटोपून घराकडे निघतात. निघताना कार्यालयातील सुरक्षा कर्मचारी आणि सेवकांना बजावतात,‘रात्री दारं खिडक्या नीट लावून घ्या. पावसाचं काही खरं नाही, कधीही येऊ शकतो!’.
सतत चुकणाऱ्या अंदाजांमुळे हवामान विभाग हा एक विनोदाचा विषय बनून राहिलाय. हवामानाच्या अंदाजाची सतत थट्टा होऊ नये म्हणून आता हवामान खातं वाऱ्यानुसार दिशा बदलतं. अधून-मधून जरा सावध पवित्रा घेतात. दर वर्षी ‘१० जून ला पावसाचे आगमन होण्याची शक्यता’ म्हणायचं. नाही आला तर ‘उशीरा चालू होईल’ सांगायचं. एकदा पाऊस चालू झाल्यावर 'पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता'. 'हवामान' ऐवजी 'दोलायमान' विभाग म्हणणे जास्त बरोबर वाटते.
मध्यंतरी एक जोक वाचला - "मला हवामान खात्यातल्या नोकरीचं खुप अप्रूप वाटतं, कुठलं टारगेट नसतं, अंदाज खोटे ठरले तरी कोणतीही कारवाई नाही". असंच 'अप्रूप वाटावं' असा अजून एक व्यवसाय आहे. तो म्हणजे CNBC, ET Now, Zee Business वगैरे ‘बिजनेस वृत्त वाहिन्या वरील ‘शेअर मार्केट चे तज्ज्ञ विश्लेषक’. पूर्वीपासून स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात गुजराती-मारवाडी लोकांसाठी ९०% आरक्षण असावे. ह्यांची पोरं CA अथवा MBA करून आपल्या ब्रोकिंग फर्म ची जाहिरात करण्यासाठी ह्या बिजनेस चॅनेल्स वर विश्लेषकांच्या भूमिकेत दिसतात. उरलेल्या १० टक्क्यात तामिळ, बंगाली, पंजाबी, मराठी लोकं सापडतात.
मार्केट खाली जायला लागलं कि 'अजून पडेल' आणि वर जायला लागलं कि 'अजून वर जाईल' इतका साधा हिशोब असतो ह्या तज्ज्ञ विश्लेषकांचा. मध्यंतरी शेअर मार्केट आपटलं तेव्हा "GST मुळे पडलं" असं हे म्हणाले. दुसऱ्या दिवशी वर उसळी मारल्यावर "GST मुळे वर गेलं" असं हेच लोकं म्हणत होते. आता बोला!!! पाऊस जसा 'कमी दाबाच्या पट्ट्यामुळे' कधी कमी तर कधी जास्त पडू शकतो, तसंच हे असावं. टाटा मोटर्सने इंग्लंडची JLR कंपनी जेव्हा विकत घेतली तेव्हा सर्व तज्ज्ञांनी सडकून टीका केली होती. तेच लोकं आज 'टाटांचा निर्णय कसा बरोबर होता' हे पटवून देताना दिसतात.
हवामानाचे अंदाज एवीतेवी चुकणारंच असतील तर हा पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा एखादा ज्योतिषी का नाही ठेवत; असं अनेकांना वाटतं. ज्योतिषी आणि शेअर मार्केटच्या तज्ज्ञांमध्ये देखील बरेच साम्य आहे. ज्योतिषी लोकांत जसे कुंडली बघणारे आणि हात बघणारे हस्तसामुद्रिक असे मुख्य २ प्रकार आहेत; तसे इथे देखील २ प्रकार आहेत. पहिले 'फंडामेंटल अनॅलिस्ट’ आणि दुसरे ‘टेक्निकल अनॅलिस्ट'. कुंडली बघणाऱ्यांना जसा ग्रहस्थिती, नक्षत्र वगैरेचा अभ्यास करावा लागतो तसा फंडामेंटल वाल्यांना कंपनीची कुंडली म्हणजेच नफा-तोटा, मॅनेजमेंट टीम, आगामी काळातील आव्हाने, एकंदर इकॉनॉमी बद्दलची माहिती असावी लागते. हस्तसामुद्रिक हातावरच्या रेषा पाहून भवितव्य सांगतात आणि 'टेक्निकल वाले 'चार्ट' वरच्या रेषा बघून. चार्ट्स पाहणाऱ्यांचं काम तुलनेने सोपं आहे. Candlestick, Doji pattern, Hammer, Shooting Star, Hanging Man वगैरे अगम्य शब्द वापरून आपण 'लय भारी' असल्याचा आव सहज आणू शकतात.
उर्दू शायर जसे 'शेर सुनावतात' तितक्याच सहजतेने ही तज्ज्ञ मंडळी दिवसभर अनेक 'शेअर्स' सुचवतात'. कार्यक्रमाच्या शेवटी मात्र 'ह्यांनी स्वतः किंवा ह्यांच्या नातेवाईकांनी' १ रुपया देखील ह्यातील एकाही कंपनीत गुंतवला नसल्याचे (निर्लज्जपणे!) सांगतात. 'पुराणातली वांगी पुराणात'! पैसा कमवायची एवढी सुवर्णसंधी असताना स्वतः त्या कंपनीचे शेअर्स का घेत नाहीत? इतका 'परोपकार' कुठून आला ह्यांच्यात? तुकोबांनी धंद्याचं वाटोळं झाल्यावर 'उरलो उपकारापुरता' म्हटलं. मला वाटतं हे विश्लेषक देखील शेअर मार्केट मध्ये स्वतः सपाटून मार खाल्ल्यामुळे 'स्वतः चा बाजार उठल्यावर इतरांना शेअर बाजारात’ येण्याचा आग्रह करत असावेत.
हा प्रकार वरवर जरी सोपा वाटत असला तरी हे करायला थोडंफार चातुर्य लागतं. कायम जर अंदाज चुकले तर लोकं आपल्याला सिरिअसली घेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागते. अश्या वेळी मोघम स्वरूपाचे अंदाज व्यक्त करणं 'सेफ' असतं. हवामान विभाग जुलै महिन्यात ठोकून देतो कि 'मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल'. मध्य महाराष्ट्राचा नंदुरबार ते कोल्हापूर पर्यंतचा विस्तार बघता कुठेतरी थोडा-फार पाऊस पडतोच! स्टॉक मार्केट मध्ये 'बँकिंग, ऊर्जा, फार्मा आणि IT' मध्ये तेजी संभवते असं शेअर मार्केट बद्दल सांगून मोकळं व्हायचं. ह्या सेक्टर मधील शेकडो शेअर्सपैकी दोन-पाच शेअर्स वर जातातंच. त्यामुळे काळजी नसावी.
काही विश्लेषक फार चातुर्याने बोलतात. नुसतं Buy आणि Sell म्हणण्यापेक्षा Overweight आणि Underweight शब्द वापरून आपलं 'वजन' वाढवतात. 'तेजी आणि मंदी' पेक्षा 'Bullish & Bearish' म्हणतात. शेतकऱ्यांच्या मदतीला जसा 'बैल' येतो तसा तेजीवाल्यांच्या मदतीला देखील Bull असतो.
मार्केट मध्ये तेजीचा जोर असताना 'Valuations look stretched but some more upside likely in coming weeks' असं म्हणायचं. "I am CAUTIOUSLY OPTIMISTIC" हे देखील असलंच एक स्मार्ट विधान. एखादया श्रोत्याने अमुक एक शेअर कधी घेऊ? असे विचारल्यास "BUY ON WEAKNESS" असे बोलावे. इतकं भराभर मार्केट का वर जातंय? असा प्रश्न आल्यास (आणि आपल्याला कुठलीच माहिती नसल्यास) "More Buyers than Sellers " असे उत्तर द्यावे. परवा तर एका महाभागाने कहर केला. 'फार्मा कंपन्यांचे शेअर्स चे भाव आगामी काळात वर जातील का" ह्या प्रश्नाला "भाव वर जाण्याची ५०% टक्के शक्यता आहे" असे म्हणून 'भाव' खाल्ला. असं बोलता आलं म्हणजे मार्केट कुठल्याही दिशेनं गेलं तरी आपलं बोलणं खरं ठरतं. ‘चीत मै जीता, पट तुम हारे’!
क्वचित इतकं मोघम बोलूनही हे देखील अंदाज चुकू शकतात. अशा वेळी 'अल निनो' हवामान खात्याच्या मदतीला धावून येतो. (किती वेळा 'अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा' आवळणार!). त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रम्प पासून ब्रेक्झिट पर्यंत आणि GST, नोटाबंदी पासून Liquidity पर्यंत खापर फोडायला अनेक गिऱ्हाईके आहेत.
शेतकऱ्यांचा विचार केल्यास पावसाबद्दल मोघम अनुमान करून उपयोग काहीच नाही. पाऊस जसा जिल्हावार कसा पडेल हे सांगितलं तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी जरा तरी उपयोग होऊ शकतो. अंदाज चुकण्यामागे हवामान खात्याकडील अंदाज वर्तवण्याचे जुनाट तंत्रज्ञान देखील बऱ्याच अंशी कारणीभूत असावे. अनेकदा राजकीय दवाबामुळे देखील उपलब्ध माहितीनुसार दुष्काळाची शक्यता वाटत असेल; तरी राज्य सरकारच्या दवाबामुळे 'सरासरीच्या ८०-८५% पावसाची शक्यता' असे जाहीर केले जाते. राजकीय दबावाचा अपवाद वगळल्यास इतर वेळी हवामान विभाग उपलब्ध साधन-सामुग्री नुसार जे हवामानाचे अंदाज दिसतात ते जाहीर करतात. स्टॉक मार्केट चे तज्ज्ञ विश्लेषक इतके साधे-सरळ नसावेत. शाळेत ज्यांची गणितं कायम चुकायची ते हवामानखात्यात नोकरी करत असावेत. जी हुशार मुलं स्वतः बरोबर गणितं सोडवून आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना मुद्दाम चुकीची उत्तरं सांगतात ते 'स्टॉक मार्केट चे तज्ज्ञ विश्लेषक' झाले असणार. मला वाटतं कि SEBI ने 'ह्या लोकांनी कुठले शेअर्स स्वतः च्या आणि नातेवाईकांच्या पोर्टफोलिओ मध्ये घेतले आहेत' हे सांगणं देखील बंधनकारक केलं पाहिजे!
इंटरनेट च्या विकासामुळे शेअर मार्केट मध्ये उच्च प्रतीचे तंत्रज्ञान आहे. माउसच्या एका क्लिक वर प्रचंड माहितीचा खजिना आहे. अंदाज वर्तवण्याची विविध tools उपलब्ध आहेत. तरीसुद्धा बऱ्याच वेळा न्यूज चॅनेल च्या दबावामुळे जाणून-बुजून गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यात येते. न्यूज चॅनेल ला देखील जाहिरातींच्या पैशावर धंदा चालवायचा असल्याने त्यांचा देखील थोडाफार नाईलाज असावा.
अशा वेळी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं हा 'कळीचा मुद्दा' आहे. अतिशय हट्टी मुलं पालक जे सांगतील त्याच्या मुद्दाम उलटं करतात. ह्यात बऱ्याचदा त्यांच्या मनासारखं होतं. हेच धोरण कधी-कधी कामाला येतं. मी देखील घराबाहेर पडण्यापूर्वी "आजचा हवामानाचा अंदाज" वाचतो. "येत्या २४ तासांत पावसाची शक्यता" म्हटल्यावर गॉगल आणि टोपी (कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी!) बरोबर घेतली आहे ना ह्याची खात्री करून मगच बाहेर पडतो.
शेअर मार्केट मध्ये देखील हे धोरण बऱ्याचदा फायदा देऊन जातं. २००६ साली बर्ड फ्लू मुळे ‘वेंकीज’ चा शेअर जेव्हा जबरदस्त आपटला तेव्हा सगळीकडे 'असतील-नसतील तेवढे शेअर्स विकून मोकळे व्हा' अश्या बोंबा मारत होते. त्याचप्रमाणे २००० साली टाटा मोटर्स ने ५०० कोटीचा तोटा जाहीर केला तेव्हा देखील अतिशय नकारात्मक बातम्या येत होत्या. ह्यावेळी ज्या लोकांनी बिजनेस वृत्त वाहिन्यांचे न ऐकता शेअर्स विकत घेतले त्यांच्या आयुष्याची चांदी झाली. अर्थात हा 'प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा फॉर्मुला' देखील प्रत्येक वेळी चालेल असं नाही. 'सत्यम' चा शेअर गैरव्यवहारामुळे आपटला आणि नंतर त्याने भरघोस फायदा मिळवून दिला. मात्र हाच प्रकार किंगफिशर एअरलाईन्सच्या बाबतीत चालला नाही. स्टॉक मार्केट मध्ये देखील असा ‘Contrarian View’ असणारी तज्ज्ञ मंडळी आहेत. त्यांचं देखील अनुमान बऱ्याचदा चुकत असल्याने 'लांडगा आला रे आला' हा प्रकार घडतो. त्यामुळे ही मंडळी जास्त लोकप्रिय नाहीत.
परवा बीड जिल्हातील शेतकऱ्यांनी चक्क हवामान खात्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पावसाचा अंदाज (अर्थातच!) चुकला आणि केलेल्या पेरण्या वाया गेल्यामुळे तक्रार केली म्हणे. शेतकऱ्यांना निदान राजकीय दबावामुळे का होईना पण अधून-मधून कर्जमाफी मिळते. आमच्यासारख्या भोळ्या इन्वेस्टर्सचं काय हो? अनेक वर्षांपूर्वी टेलिकॉम आणि ऊर्जा क्षेत्राला किती उज्ज्वल भविष्य आहे आकडेवारीसहित सांगितलं. तेव्हा 'रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स पॉवर" Strong Buy म्हणून Recommend केलं. ज्यांनी ह्या कंपन्यांचे शेअर्स घेतले त्यांना आज कुत्रं देखील विचारत नाही. Mid-Cap, Small-Cap वगैरे सांगून लोकांना Large-Caps (टोप्या!) घालण्याचे काम हि मंडळी गेली अनेक वर्षे यशस्वीरीत्या करीत आहेत.
लहान पोरं पाऊस पडेल का हे हवामान खात्याला न विचारता 'भोलानाथ' ला विचारतात. तसा एक 'भोलानाथ' सामान्य गुंतवणूकदारांसाठी हवाय.
वाचने
7619
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी!!!
आवडला
CAUTIOUSLY OPTIMISTIC,
असे आपले टेक्निकल अनॅलिस्ट
(No subject)
३० मार्च २०१५ ते ३० मार्च
In reply to (No subject) by सुबोध खरे
हे लोक असे कोलांट्या मारतात
मस्त!
बेस्टच की,
अभ्या
In reply to बेस्टच की, by अभ्या..
स्वतंत्र विभाग
In reply to अभ्या by ज्ञानव
धन्यवाद.
In reply to स्वतंत्र विभाग by पैसा
अंदाज पंचे!
In reply to स्वतंत्र विभाग by पैसा
स्टॉक मार्केटचे तज्ज्ञ
अभिजित
In reply to स्टॉक मार्केटचे तज्ज्ञ by अभिजीत अवलिया
नाही हो. माझं कसलं आलय
In reply to अभिजित by ज्ञानव
हा हा हा!!!
In reply to अभिजित by ज्ञानव
नक्कीच...
In reply to हा हा हा!!! by सरनौबत
मिपावरचे
In reply to हा हा हा!!! by सरनौबत
नक्की आवडेल त्या ग्रुप वर सहभागी व्हायला
In reply to मिपावरचे by ज्ञानव
तुमचे म्हणणे पटले
In reply to स्टॉक मार्केटचे तज्ज्ञ by अभिजीत अवलिया
दुकानदाराचे
In reply to तुमचे म्हणणे पटले by सरनौबत
दुकानदाराचे
In reply to तुमचे म्हणणे पटले by सरनौबत
@अभिजीत अवलिया
In reply to स्टॉक मार्केटचे तज्ज्ञ by अभिजीत अवलिया
डॉक,
In reply to @अभिजीत अवलिया by सुबोध खरे
आयटी सी चे मी पण थोडेसेच
In reply to डॉक, by अभिजीत अवलिया
या कंपनीचे समभाग घेणे मला पटत
In reply to आयटी सी चे मी पण थोडेसेच by सुबोध खरे
सकारात्मक बातम्या आणण्यात ह्यांचा खूप वाटा असतो
In reply to @अभिजीत अवलिया by सुबोध खरे
काही मजा नाही आली लेखात......
प्रयोजन म्हणाल तर...
In reply to काही मजा नाही आली लेखात...... by ज्ञानव
छान लिहिलंय.
भांडवली बाजारात पैसे
Nobody knows nothing - Jack
गेल्या जुलैत मि डीमँट खाते