Skip to main content

पहाडी स्पेशल:- हिमाचली खट्टा मटन

लेखक केडी यांनी बुधवार, 14/06/2017 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
Himachali_Khatta_mutton_1 साहित्य १/२ किलो मटण, धुवून, कोरडे करून ३ मोठे कांदे बारीक चिरून १ लसूणाचा गड्डा, सोलून, बारीक चिरून १ इंच आलं, बारीक चिरून १ बडी इलायची ५ ते ६ हिरवे वेलदोडे ३ ते ४ लवंग १ चमचा जिरे २ चमचे धने १ चमचा बडीशेप १ चमचा मेथ्या १ तुकडा दालचिनी ३ तमालपत्र १ चमचा लाल तिखट २ चमचे हळद १ चमचा कसुरी मेथी ५ ते ६ चमचे आमचूर पावडर (हे आवडीनुसार कमी जास्त) २ ते ३ मोठे चमचे तेल मीठ चवीनुसार अर्ध्या लिंबाचा रस कृती मटणाला लिंबाचा रस, १ चमचा हळद आणि मीठ लावून ते किमान २ तास मुरत ठेवावे. रात्रभर ठेवलं तर उत्तम. (अर्थातच फ्रिज मध्ये). सगळे गरम मसाले कोरडे भाजून, मग गार करून त्याची जाडसर भरड काढावी. Ingredients Step1 Step2 Step3 एका जाड बुडाच्या भांड्यात किंवा कुकर मध्ये तेल तापवून, त्यात बारीक चिरलेला कांदा ३ ते ४ मिनिटे परतून घ्या. कांदा थोडा लालसर झाला कि त्यात मुरलेलं मटण घालून ते परतून घ्या. हे सगळं आपल्याला एकदम मंद आचेवर करायचे आहे. (मटण कोवळे असेल तर लवकर शिजेल, साधारण १ तासात आपल्याला मटण मऊसूद वाफेवर शिजवून घायचे आहे. हे सुरु असतांनाच इतर मसाले व जिन्नस टाकत राहायचे आहेत). Step4 Step5 झाकण ठेवून साधारण २० ते २५ मिनिटे मटण शिजू द्या. अधून मधून परतून घेत राहा. [मटणाला पाणी सुटेल, त्यामुळे पाणी घालायची गरज लागणार नाही]. आता भांड्यात बारीक चिरलेला लसूण आणि आलं घालून परतून घ्या. अजून १० ते १५ मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. मटणाला सुटलेले पाणी आटत आले, कि त्यात लाल तिखट आणि उरलेली हळद घालून पुन्हा ढवळून घ्या. झाकण ठेऊन अजून १० मिनिटे शिजू द्या. झाकण उघडून, एकदा परतून त्यात आता मसाल्याची भरड घाला. थोडे परतून मग आमचूर पावडर घालून मटण पुन्हा परतून अजून १० मिनिटे झाकण ठेवून शिजवा. Step6 Step7 Step8 Step9 साधारण २ कप पाणी गरम करून, आपल्याला रस्सा हवा त्या प्रमाणात गरम पाणी घालून, अजून ५ मिनिटे वाफ काढून घ्या. चवीनुसार मीठ घालून गरम गरम भात बरोबर हे खट्टा मटन खायला घ्या! वाढण्यापूर्वी, कसुरी मेथी हाथाने चुरून वरून भुरभुरावी. [साध्या तेला ऐवजी सरसू/मोहोरी चे तेल असेल तर ते वापरा, अजून लज्जत वाढेल. आमचूर मुळे एक वेगळीच चव आणि रंग येतो. पाणी न घालता देखील सुक्क म्हणून छान लागेल. कांदा, लसूण आणि आले हे मिक्सर मधून न काढता सुरीनेच बारीक चिरून घ्या, म्हणजे ते जळणार नाही. मटण शिजले नाही, किंवा इतका वेळ वाट पाहायची नसेल तर, कुकर मध्ये ३ ते ५ शिट्ट्या मारून शिजवू शकता (पाणी घालून).] Himachali_Khatta_mutton_2

वाचने 11100
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

खतरनाक! (मटण न घालता ही पाकृ... :) )

In reply to by आदूबाळ

(मटण न घालता ही पाकृ...
:-) एक प्रयोग म्हणून मटणा ऐवजी कच्चे बटाटे, सोलून घालून पाहायला हरकत नाही. खट्टे आलू छान लागतील बहुदा.

पहिले बुकमार्क केले आणि मग वाचले . आता करून पाहीनच. किंवा कोणाला तरी करायला लावेन :))

हैला लै भारी दिसतंय. लगेच ताटात घेऊन खायला बसावं असं वाटतं आहे !! जबरी - नक्की करून बघणार.

जबरी झकास आहे, तरी ५-६ चमचे आमचूर वाचून अन मटनात 'खट्टा' वाचून मात्र एकदम कसेसे झाले. आंबट मटन कन्सेप्ट स्वीकारली जात नाहीये प्रभू.

In reply to by जेम्स वांड

तरी ५-६ चमचे आमचूर वाचून अन मटनात 'खट्टा' वाचून मात्र एकदम कसेसे झाले. आंबट मटन कन्सेप्ट स्वीकारली जात नाहीये प्रभू.
मला देखील हेच वाटलेलं, पण आमचूर पावडर मुळे अगदी हलका आंबटपणा येतो, आणि इतर मसाल्यांची चव खुलून आली, अर्थात हा माझा अनुभव.

आधीच तुला म्हणाले तसं खात नाही पण पाहून खूप मस्त वाटतंय. कसले सुरेख फोटो काढतोस....लाजवाब प्रेझेंटेशन. मस्त दिसतंय फार

लिखाण , प्रेझेन्टेशन , फोटोंची रचना व कोलाज ... हे पण टिपून ठेवलंय . जे जे चांगले ते शिकावं माणसाने .. या तत्वावर ... बाकी लाजवाब ... कधी खाऊ घालता ? (जाता जाता - आपण दोन केडी नी मिळून एक फिरतं हॉटेल काढूया का ? )

असे फोटो आणि प्रेझेन्टेशन असेल तर दोन गोष्टी नक्की होतील - बरीच व्हेज जनता नाँन-व्हेज होईल आणि - तुमच्या पा.क्रू. त येण्यासाठी कोंबड्या/ बकर-यांची लाईन लागेल.☺

टोमॅटो, दही,लिंबू घालून मटण केलंय पण इतकी आमचुरपावडर घालून नाही केलाय कधी. आता करून पाहीन.फोटो सुरेखच!